आभास

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जे न देखे रवी...
16 Apr 2008 - 2:36 am

आभास
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा

पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा

गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा

पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता
मुद्दाम आठवांना त्या टाळले कितीदा

होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे
( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

नव्हते म्हणे कुणाच्या यादीत नाव माझे
मुद्दाम त्यास त्यांनी डागाळले कितीदा
सोनाली जोशी

हे ठिकाणगझलविचार

प्रतिक्रिया

धनंजय's picture

16 Apr 2008 - 3:08 am | धनंजय

सर्व सुंदर अशआरांपैकी १, २, ३, ४, ६वे अधिक आवडले. पैकी सर्वाधिक :
गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा

चित्रा's picture

16 Apr 2008 - 3:32 am | चित्रा

सुरेख. ५ वे कडवे नसते तर अर्थ वेगळा लागला असता का?

नंदन's picture

16 Apr 2008 - 4:02 am | नंदन

दुसरा शेर सर्वात अधिक आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मीनल's picture

16 Apr 2008 - 5:30 am | मीनल

मस्त काव्य.

मीनल.

प्रमोद देव's picture

16 Apr 2008 - 6:55 am | प्रमोद देव
चतुरंग's picture

16 Apr 2008 - 8:19 am | चतुरंग

पाचव्याचा संदर्भ लागला नाही पण एकूण सुरेख गज़ल!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

16 Apr 2008 - 4:32 pm | सुवर्णमयी

वाघाचे कातडे पांघरून वागणारे गाढव या गोष्टीचा संदर्भ या शेरात आहे.पण अर्थ वेगळा - प्रत्येक व्यक्ती वर सोंग आणून वावरत असली तर आपली कुवत ओळखून असते असे म्हणायचे आहे...
ते स्पष्ट झाले नाही .. जरा वेगळे लिहून बघेन

विसोबा खेचर's picture

16 Apr 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा

क्या बात है सोनाली! अत्यंत दर्जेदार काव्य!

जियो....!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Apr 2008 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभास फक्त होता, मी थांबले कितीदा
माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा

पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा

वा क्या बात है, एकदम मस्त गझल !!!

फक्त पाचव्या शेराचा आस्वाद नाही घेता आला बॉ :(
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

16 Apr 2008 - 10:29 am | धमाल मुलगा

पाने झडून गेली,पक्षी उडून गेले
मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा

हे छानच...गज़ल वाचताना, पटकन लक्ष वेधून घेणार्‍या ओळी !

गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला?
मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा

आहाहा !!! कसं माझ्या मनातलं उतरवलंय गज़लेत.

मस्त.
पण शेवटच्या कडव्याचा अर्थ नाही लागला. वैयक्तिक गोष्टींशी संबंधित नसेल तर जरा उकलून सांगणार का?

-------
अवांतरः आ.का.का.क.ना.हे.वे.सां.न.ल. अशी झोकात सही ठोकणारा मी, हल्ली आवडीनं कविता बिविता वाचतोय, गज़लेतल्या कडव्यांचे अर्थ विचारतोय....मिपानं पार बिघडवलं बुवा आम्हाला!

आनंदयात्री's picture

16 Apr 2008 - 10:48 am | आनंदयात्री

म्हणतो, बर्‍याच दिवसांनी काहितरी छानसे वाचायला मिळाले. शेवटचे कडव्याचा मात्र वरच्या सगळ्या कडव्यांच्या संदर्भात अर्थ लावता आला नाही. :(

होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे
( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

भारी !!

-(गाढव) आनंदयात्री

उदय सप्रे's picture

16 Apr 2008 - 4:33 pm | उदय सप्रे

सोनाली जी,

अतिशय सुरेख !

या काही ओळी कश्या वाटतात बघा :

पाहून आज तुजला, बसले चितेत ताठ
असुनी तुझाच "खांदा", सुस्तावले कितीदा?

होती सदाच जेंव्हा धुंदावली पहाट,
"उदया"विनाच तेंव्हा , अस्तावले कितीदा?

सुरेश भट साहेबांची आठवण झाली.

माझ्या काही कलाकृती तुम्हाला खाली दिलेल्या २ ब्लॉग्ज वर पहायला मिळतील, वेळ झाल्यास बघून अभिप्राय कळवा.

उदय "सप्रे"
http://uday-saprem.blogspot.com/

आणि

http://uday-sapre.blogspot.com/

सुवर्णमयी's picture

16 Apr 2008 - 4:36 pm | सुवर्णमयी

सर्वांचे आभार.

शितल's picture

16 Apr 2008 - 6:18 pm | शितल

वाचता वाचता काव्य कधी वाचुन स॑पते कळ्त नाही, फक्त आमचे घोडे ही गाढवार आडकले.

शेवटचा बाजीराव's picture

16 Apr 2008 - 7:08 pm | शेवटचा बाजीराव

फारच छान सोना . गझल॑ सुरेख होती .
अशाच गझल करीत रहा. वाचायला आवडतील.
शेवटचा बाजीराव.

सचिन's picture

16 Apr 2008 - 8:00 pm | सचिन

दर्जेदार काव्य ! खूप दिवसांनी वचायला मिळाले !
धन्यवाद !!