राहून जा की आजच्या रातीला
अहो पाव्हणं राहून जा की आजच्या रातीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||धृ||
कोरस:
अहो दाजी हिची इच्छा पुरवा तुमी, ऐका लवकरी, ऐका तिच्या मागणीला
आनमान नका धरू, उशीर नका करू, लवकर स्टार्ट करा तुमच्या गाडीला
एकली मी बाईल आहे घरात
कशी मी राहू रात नाही सरत
तुमीच या हो धिर मला द्या हो
कुणी दुसरं नाही बोलायला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||१||
चोरचिलटं झाल्यात लई
मागनं शिरन्याचा भरोसा न्हाई
कडीकुलपातला ऐवज जाई
बंदुक र्हावूद्या तुमची राखणीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||२||
जेवन कराया तुमी लवकर या
तोंड रंगवाया विडा हाती घ्या
रंगमहाल सजवला फुलांनी
छपरी पलंग आहे झोपायला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||३||
झोपायची आता करू नका घाई
मी बाई काही पळून जात नाही
गुलुगुलु बोला कानात माझ्या
हात धरा माझा उशीला
सोबत व्हईल मला कुणी दुसरं न्हाय वस्तीला ||४||
कोरस:
अहो दाजी हिची इच्छा पुरवा तुमी, ऐका लवकरी, ऐका तिच्या मागणीला
आनमान नका धरू, उशीर नका करू, लवकर स्टार्ट करा तुमच्या गाडीला
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०१०
प्रतिक्रिया
23 Sep 2010 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शाहीर, लावणीनं चांगला जोर धरलाय चालू दे...!
लावणीवर जरा दोन-चारदा हात फिरवत राव्हा.
तिच्यात अजून रंग भरेल. :)
-दिलीप बिरुटे
[लावणीचा दिवाना]
23 Sep 2010 - 1:57 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त..असतात तुमच्या कविता
23 Sep 2010 - 2:04 pm | मेघवेडा
लै लै झकास बा पाषाना! लैच झकास!
23 Sep 2010 - 6:13 pm | गणेशा
एक्दम छान लिहिले आहे
23 Sep 2010 - 6:17 pm | धमाल मुलगा
क्काऽऽय कडक पैल्या धारेचा माल है हो शाहीर!
खल्लास!
एकदम खाजगी बैठकीतली लावणीच डोळ्यापुढं हुबी र्हायली ना भौ!