का होत असेल हो असं !?

चिगो's picture
चिगो in जनातलं, मनातलं
20 Sep 2010 - 5:06 pm

माफ करा. जरा चावून चोथा झालेल्या, मेंदुचा भुगा करणार्‍या प्रश्नावर विचार करतोय. आजच बातमी कळली की माझ्या एका सहकार्‍याने, बॅचमेटने आत्महत्या केली? का केलं असेल त्याने? मुलगा दिसायला चांगला, घरची परिस्थिती उत्तम.. अगदी दर दोन आठवड्यांनी विमान प्रवास करु शके, इतकी. त्याच्या लग्नात त्याने एका प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रम ठेवला होता. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधे अश्वपथाचे संचालन करण्याचा मान मिळवलेला.. नोकरी कुठल्याही आई-वडीलांना अभिमान वाटावी अशी.. वन ऑफ द बेस्ट अ‍ॅथलिट्स आय हॅव सीन.. सगळं कसं आलबेल (दिसायला तरी)...
.... आणि असा हा माणूस एका अतिशय शुल्लक वाटणार्‍या कारणावरुन आत्महत्या करतो ? कमकुवत मनाचा म्हणावा तर आयुष्यातले अनेक टक्के-टोमणे पचवलेले.. जिथे पोहचला होता, तिथंपर्यंत जाता जाता लोक गळून, उन्मळून पळतात हारून, पराभुत होऊन.. हा तिथे पोचून वर मस्त मजेत जगत होता. मग असं काय झालं असेल, की अचानक त्याला सगळं संपवावसं वाटलं? कुठली असते ही अंत:प्रेरणा आणि कुठून येते की माणूस सगळी नाती, सगळी बंधनं झुगारुन एकटाच निघून जातो, परत न फिरण्यासाठी? स्वतःला संपवतांना एकदाही त्याच्या मनात त्याच्या वृद्ध आई-वडीलांचे विचार आले नसतील? एकदाही त्याला त्याच्या नुकत्याच लग्न होउन जीवनात आलेल्या बायकोबद्दल काहीही वाटलं नसेल? अजून आयुष्यात बाकी असलेल्या ध्येयांनी त्याला परतीची साद दिली नसेल? आणि जर हे सगळं झालं असेल तर कसल्या ताकदीच्या बळावर त्याने हे सगळं नाकारुन मृत्यूला मिठी मारली ? आणि मृत्यु आपले पाश आवळत असतांन त्याने सुटकेची धडपड, पुन्हा एकदा परत फिरण्याचा, केविलवाणा का होईना, प्रयत्न केला असेल का? काय होत असेल नेमकं त्याच्या मनात त्या क्षणी...??
सॉरी... माझ्या मनात दाटुन आलेले हे प्रश्न, ह्या भावना तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटल्या.. कूणी म्हणेलही कदाचित, काय नालायकपणा आहे हा? मी बाजार मांडतोय का? फुकट शहाणपणा, संधी साधतोय का शब्दांचा खेळ मांडन्याची? असेल्ही... नसेलही... बोलावंस वाटलं, मोकळम व्हावंसं वाटलं एवढं मात्र खरं..

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

20 Sep 2010 - 5:13 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मानसिक बैठक डळमळीत झालेली असते.त्यामागच्या कारणही कदाचित तितके हरवुन टाकणारे असेलही! तितकी अगतिकता आल्याशिवाय नाही धाडस होत मुत्यू ला कवटाळायचं!
विचार करण्या पलिकडे मन गेलेलं असत...
आणि मनाची तड्फड थांबवण्याचा एकमेव मार्ग काही लोकाना दिसतो!
..किंवा सुटका दिसते!
हे मागचे विचार वगैरे काहीही नाहि लक्षात येत त्यावेळी!

स्वानन्द's picture

20 Sep 2010 - 6:00 pm | स्वानन्द

ग्रेट! धाडसी म्हणायला हवा तुमचा मित्र. एरव्ही, कित्येकदा मला ही वाटलं असेल... नको यार हे सगळं. कशातच काही अर्थ नाही. पण प्रत्यक्ष कृती करायला मात्र धाडसच हवं.

आणि रुढार्थाने जरी त्याचे आयुष्य ही एक 'अचिव्हमेंट' असली तरी ती त्याच्या दृष्टीने असेलच असे नव्हे. असो. हा तसाही बराच मोठा विषय आहे. जितकं बोलू तितकं कमीच वाटतं.

बाकी असं ही असू शकेल ना.... म्हणजे एक शक्यता म्हणून बघा.... मला वाट्लं की आयुष्याकडून जी काही 'क्वालिटी' मला अपेक्षित आहे ती आता मला नाही मिळत आहे. आणि मला कमी दर्जाचं आयुष्य यापुढे नको आहे. किंवा आता मला जीवनात काही करण्यासारखं वाटत नाही. आणि म्हणून मी ठरवलं की मला आयुष्य संपवायचं आहे तर..

असो. एक चांगला जवळचा मित्र अचानक गमावल्यामुळे तुम्हाला किती वाईट वाटत असेल याचा अंदाज बांधी शकतो.

जाता जाता.... कधी मिळालंच तर, कमलेश वालावलकरांचं 'बाकी शून्य' नक्की वाचा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Sep 2010 - 11:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>ग्रेट! धाडसी म्हणायला हवा तुमचा मित्र. एरव्ही, कित्येकदा मला ही वाटलं असेल... नको यार हे सगळं. कशातच काही अर्थ नाही. पण प्रत्यक्ष कृती करायला मात्र धाडसच हवं.

स्वानंद साहेब, आत्महत्या करण्याच्या निर्णयाला धाडसी म्हणू नका. आल्या समस्येला सामोरे जाण्यात धाडस असते, त्यापासून पाठ फिरवून जाण्यात नाही. आत्महत्या करायला काही क्षणांचे धाडस लागत असेल, पण नकोश्या परिस्थितीला सामोरे जाऊन निभावून नेण्याला जास्त आणि दीर्घकालीन धाडस लागते.

वसंत कानेटकरांचे "प्रेमा तुझा रंग कसा" मध्ये (दुसऱ्या संदर्भात) एक वाक्य आहे, काहीसे खालील प्रमाणे...
"आयुष्य म्हणजे पत्त्यांचा डाव नाही की मनासारखी पाने हातात आली नाही म्हणून उधळून टाकावा. हातात फत्री पाने आली असताना पण डाव पूर्ण खेळण्याची आणि प्रसंगी जिंकून दाखवायची जिद्द हवी"

टिप्पणी :- हा मूळ धाग्याच्या संदर्भात प्रतिसाद नाही. उगाच आत्महत्येचे ग्लोरिफिकेशन नको म्हणून.

मी ऋचा's picture

21 Sep 2010 - 10:55 am | मी ऋचा

अगदी सहमत.

आत्महत्येला ग्लोरिफाय वगैरे करायचं नाही आहे मला. पण उगीच आत्महत्या करणार्‍याला भेकड ठरवणार्‍याला मात्र माझा नक्कीच विरोध आहे. माझे म्हणणे खाली एन्द्रराज पवारांनी दिलेल्या प्रतिसादात व्यवस्थितपणे मांडले गेले आहे. त्यामुळे पुन्हा तेच लिहीत नाही. असो.

सुख आणि समाधान यामधील धुसर रेघ मनाचा जेंव्हा पुर्णपणे कब्जा घेते. तेंव्हा ही स्थीती येत असेन.
माणुस कीतीही सुखी असेल .. तरी समाधान मिळत नसले की माणुस हतबल होतो.
सुखी माणसे समाधानी असतात हे आपल्या सार्ख्या लोकांचा गैर समज असतो.

सुख हे आत्मकेंद्रीत असते.. माझे हे .. माझे ते.. या मध्ये मन गुरफुटुन जात असते.
समाधान सार्वभौम असते .. ज्या मआणसाला ह्या सार्वभौमत्वाची उशीरा जाणीन होते तो माणुस आत्मकेंद्र उध्वस्त करतो ...

तुम्ही म्हणाल सार्वभौम वगैरे काय शब्द आहे, अनेक आत्महत्या करणार्या लोकांना हे असले काय माहीत ही नसेन.
पण तसे नसते .. प्रत्येकाची सार्वभौमत्वाची व्याख्या वेगळी असते .. काहींना आयुष्यात सर्व मिळवुन ही आपली समाजातील प्रतिमा स्वछ ठेवता येत नाही , अआणि मग त्याची खंत ते बाळगू लागतात.
काहिंना विशिष्ट पद्धतीची साथ मिळत नाहि .. अआणि त्यामुळे आपले जे आहे ते काही कामचे नाही ती साथ या एव्हड्या ऐश्वर्या ने मला मिळत नसेन तर मग ह्याचा काय उपोयोग या जगण्याचा काय उपोयोग अशी स्थीती निर्मान होते.

उदाहरणे अनेक आहेत, तुम्ही सगळे जाणताच .. त्यामुळे थांबतो बाकी सार्वभौमतेची व्याख्या जो जगतो तो संत असतो.. निस्वार्थी .. निर्लेप .. बाकी सर्वांच्या मनात असते फक्त त्याबद्दल खंत आणि तेथेपर्यंत आपण पोहचु शकलो नाही ही भोंगळ व्यथा बस्स ...

--

चिगो, तुमच्या दु:खात सहभागी आहे. हा किती मोठा मानसिक धक्का असू शकतो हे मी समजू शकते. आपण लवकरात लवकर यातून बाहेर पडाल अशी आशा करते.

आत्महत्येपर्यंत गेलेलं प्रकरण एका रात्रीत चिघळत नाही हो. माणसाचा जो अंतर्मनाशी संवाद चालू असतो तो महत्त्वाचा. त्यात गिल्ट, स्वतःबद्दल घृणा या भावना हळूहळू शिरतात.

सातत्यानी स्वतः स्वतःला उमेद देणं, प्रोत्साहन देणं आणि तशी अ‍ॅटीट्युड तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. स्वतःला, आपल्या मित्र-मैत्रिणींना प्रोत्साहीत करणं हे खूप महत्त्वाचं असतं.

दुसरं भारतात असलेला मानसोपचारतज्ञांकडे जाणाबाबत असलेला टॅबू. अमेरीकेत हा टॅबू खूप कमी आहे असं मला जाणवलं. काय वाईट आहे मदत घेण्यात? डिप्रेशन, अँग्झायटी, व्यसन या गोष्टी बर्‍याच कॉमन असतात. त्यावर उपचार हे व्हायलाच पाहीजेत.

पैसा's picture

20 Sep 2010 - 8:04 pm | पैसा

खूप वाइट वाटतं. कदाचित त्याला वेळेवर भावनिक मदत मिळाली असती तर............
कदाचित...............

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2010 - 8:14 pm | नगरीनिरंजन

हम्म्म. आयुष्य प्रत्यक्षात खरोखरच निरर्थक आहे. आपणच त्याला काही ना काही लेबलं लावून अर्थ देत असतो. सामान्यतः जी सुखाची, यशाची लेबलं असतात ती सगळ्यांची सारखीच असतात पण काही काही लोकांची ती लेबलं वेगळी असतात.
काही काही लोक आयुष्याचा फार गंभीरतेने विचार करतात. अमुक एक नाही झालं तर जगण्यात राम नाही असं त्याना वाटत असावं.
शेवटी काय व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणी हा आयुष्याचा खेळ मन लावून खेळत बसतात आणि तो संपला तरी जायला तयार नसतात तर कोणी लवकर कंटाळून खेळ अर्धवट सोडून निघून जातात. ज्याचा त्याचा निर्णय.

"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे."

माझ्या घरातल्या एका मृत्युनंतर ही वाक्यं मी स्मशानभूमीत वाचली आणि दु:ख खरंच खूप कमी झालं.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Sep 2010 - 8:50 pm | प्रकाश घाटपांडे

सॉरी... माझ्या मनात दाटुन आलेले हे प्रश्न, ह्या भावना तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटल्या.. कूणी म्हणेलही कदाचित, काय नालायकपणा आहे हा? मी बाजार मांडतोय का? फुकट शहाणपणा, संधी साधतोय का शब्दांचा खेळ मांडन्याची? असेल्ही... नसेलही... बोलावंस वाटलं, मोकळम व्हावंसं वाटलं एवढं मात्र खरं..

असं म्हणावसं का वाटल? आपल्या संवेदनशीलतेची चेष्टा होईल अस वाटल का?
काही दिवसांपुर्वी नागपुरच्या एका बाईंचा फोन आला होता नेटवरील माझ लिखाण वाचुन. त्यांच्या एका बारावी च्या मुलाने वैराग्य येउन आत्महत्या केली होती? हे का झाल असावं असा त्यांचा प्रश्न होता. मी त्यांना माझे गुरुतुल्य ज्येष्ठ फलज्योतिष चिकित्सक मित्र कै माधव रिसबुड ">फलज्योतिष चिकित्सक मित्र कै माधव रिसबुड यांच्या एकुलत्या एक आय आय टीयन मुलाने अमेरिकेत आत्महत्या केल्याच उदाहरण सांगितल होत.
पैसा म्हणते तस आपल्या मित्राला जर भावनिक मदत मिळाली असती तर कदाचित ही घटना टळली असती.

धमाल मुलगा's picture

20 Sep 2010 - 9:30 pm | धमाल मुलगा

साला हा विषयच इतका विचित्र आणी अवघड आहे, की काही बोलायची सोय नाही.
सारं काही आलबेल होतं म्हणताय तर मग त्या मित्राच्या मनात काय चाललं होतं ते कुणाला ठाऊक आहे का? काही डायर्‍या वगैरे? किंवा कुठे काही खरडलेलं?

कुठली असते ही अंत:प्रेरणा आणि कुठून येते की माणूस सगळी नाती, सगळी बंधनं झुगारुन एकटाच निघून जातो, परत न फिरण्यासाठी?

सगळं सुरळीत असतानाही आत्महत्येच्या घटना घडु शकतात. कुणाकुणाला 'मरण' ह्या विषयाचं म्हणा, किंवा गोष्टीचं प्रचंड आकर्षण असतं. (गंमत नाही करत, खरंच सांगतोय.) कित्येकदा डोक्यात मरण, मरणानंतर आपण कसे दिसु, कसे असु, आपलं काय होईल? ते आपल्याला कळेल का असे विचार घोळत असले की त्यांच्या रेट्यापुढे अचानक माणुस असं काहीतरी करुन बसु शकतो.

फार बोलण्याइतकी माझी कुवतही नाही, अन तेव्हढा अधिकारही नाही पण, सर्वसामान्य बुध्दीपलिकडची काही गोष्ट असण्याची शक्यताही मला नाकारवत नाही.

झाले ते वाईटच. आम्ही इथुन कोरड्या सहानुभुतीपलिकडे फार काय देऊ शकणार?
पण तुमचं मन मोकळं होत असेल तर खरंच बोला, आम्ही आहोत इथे आपले काही सहृद.

रश्मि दाते's picture

20 Sep 2010 - 11:20 pm | रश्मि दाते

खरंच ती वेळ्च तशी असते,पण घरातिल लोकांचा वीचार मनात येत नाही असे नाही,पण आपल्या शिवाय फारसे काही अडाणार नाही असे वाटुन्ही माणुस असे निर्णय घेतो,मि स्वतः या परीस्थीतीतुन गेलेली आहे.
आज २ वर्शानंतर आश्चर्य वाटते कि आपण काय करणार होतो म्हणुन

शिल्पा ब's picture

21 Sep 2010 - 12:06 am | शिल्पा ब

कधी कधी फार depression आले (कोणत्याही कारणाने) तरी हे पाऊल उचलले जाऊ शकते...
स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा...म्हणतात ना रात्रीनंतर दिवस हा येतोच ...रात्र कायमस्वरूपी राहत नाही.

वाटाड्या...'s picture

21 Sep 2010 - 12:52 am | वाटाड्या...

सगळं कसं उत्तम..ह्याच वाक्यात खरी गोम असते.

सगळं ठीक आहे असं कधीच नसतं. कुठेतरी काहीतरी एखादी गोष्ट अशी असते जी त्या माणसाला खात असते. त्याला ती सांगता येत नाही नी सहनही करता येत नाही. मिळालेल्या हजार गोष्टींपेक्षा न मिळालेली १ गोष्ट त्या माणसाला आयुष्यातुन उठवते असा अनुभव आहे....

- वा

सविता's picture

21 Sep 2010 - 9:54 am | सविता

>>मिळालेल्या हजार गोष्टींपेक्षा न मिळालेली १ गोष्ट त्या माणसाला आयुष्यातुन उठवते

सहमत..

संदीप चित्रे's picture

21 Sep 2010 - 1:50 am | संदीप चित्रे

हे पुस्तक वाचलंयत का?
नसेल तर जरूर वाचा.
आत्महत्यांबद्दल वेगळ्या प्रकाराने विचार करू लागाल.
'तमाच्या....' नंतर कुठल्याही आत्महत्येबद्दल वाचलं / ऐकलं की पहिला प्रश्न माझ्या डोक्यात येतो तो म्हणजे -- त्या व्यक्तीच्या जीन्सचा (गुणसूत्रे) काही संबंध असेल का?

अर्धवटराव's picture

21 Sep 2010 - 6:44 am | अर्धवटराव

मला आपल्या मित्राबद्दल काहिही माहिती नाहि राव. पण एकंदरीत जर आयुष्य सुखा-समाधानाने जात असेल आणि आपला मित्र सहजासहजी हार मानणार्‍यापैकी नसेल तर... त्याने अत्महत्याच केली कशावरुन ?? हा खुन/घातपात नसावा काय ??

अर्थात, हे फार फिल्मी वाटेल.. पण.. जस्ट एक शंका आलि

(आपल्या दु:खात सामिल) अर्धवटराव

माझा एक वर्गमित्र..दहावी अन बारावीला गुणवत्ता यादीत आलेला. डॉक्टर होण्याची प्रबळ ईच्छा होती त्याची. तेवढी मेहनत करुन मेडिकलला प्रवेश मिळवला. घरची परिस्थिती ठिकठाक.

या वर्षी अंतिम वर्षाला होता. मध्यंतरि घडलेल्या केतन देसाई का कोण तो मेडिकल ऑफिसर, त्याच्या लाच प्रकरणातून याच्या कानावर आलं की पदव्युत्तर शिक्षणासाठि एक कोटी रुपये लागणार. आपण ही रक्कम अफ्फोर्ड करु शकत नाही म्हणुन याने एका पहाटे रेल्वेखाली जीव दिला.

आम्ही सर्व लोक ह्या विचाराने हादरुन गेलो होतो की आता ह्याच्या आई वडिलांनी काय करावं? किती तडजोडी करुन त्यांनी याचं शिक्षण पूर्ण केलं असेल? आपल्या मुलाचं स्वप्नं काही महीन्यांत पूर्ण होणार या विचारंनी किती आनंदी असतील ते?

बरं प्रॅक्टीकली विचार केला तरी पुढचं शिक्षण पूर्ण करण्याचे किती मार्ग होते. इतक्या हुशार मुलाला सहज एखादी शिष्यवृत्ती मिळली असती किवा काहीतरी मार्ग निघालाच असता.

येवढा विचार करण्याची बौद्धिक कुवत त्याची नक्कीच होती मग त्या क्षणी खरच असं काय "हावी" होत असेल की माणसाची सदसदविवेकबुद्धी गहाण पडल्यासरखी व्हावी?

चिगो तुमची मनःस्थिती मी पूर्णपणे समजु शकते मात्र आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मात्र या घटनेला चार सहा महीने उलटून गेले तरी मी समजु शकले नाहीए....

तुमच्या ही मित्राच्या आई वडिलांबदल खरेच वाईट वाटले.
मध्यमवर्गीय पालकांची स्वप्ने त्यांची मुले असतात, प्रसंगी स्वता न जेवता .. नविन कपदे वगैरे न घेता ते मुलाच्या स्वप्नामधेय आपले स्वप्न पाहत असतात.
ही असली स्वताला हुशार समजणारी पण साधा आपल्या आई वडिलांचा ही विचार न करता आयुष्य संपवणारी माणसे पाहिली ना की किव वाटते त्यांच्या बुद्धीची ही , वरती सहानभुती पुर्व ते हुशार होते हे म्हणने पण लाजीवारणे वाटते.

शमस्व , जास्त हार्श भाषा आली .
पण जे मनात आले ते लिहिले राग नसावा

तो हुशार होता हे मी सहानुभूती म्हणुन नाही म्हणत. मी त्याला जवळ जवळ दहा वर्ष ओळखते. शाळेपासून त्याची हुशारी मी निदान शिक्षणाबाबत तरी अनुभवली आहे.

त्याबद्दल मी सुरुवातिलाच लिहिलेही आहे...
म्हणूनच त्याच्या अश्या कृती बद्दल सखेद आश्चर्य वाटते

इन्द्र्राज पवार's picture

21 Sep 2010 - 1:08 pm | इन्द्र्राज पवार

"बोलावंस वाटलं, मोकळम व्हावंसं वाटलं एवढं मात्र खरं....."

~~ माणूस ही 'समाजप्रिय' व्यक्ती आहे, त्यामुळे ज्याप्रमाणे तिला आनंदाच्या सोनेरी बिंदूचे क्षण जसे चारचौघात वाटावे वाटतात त्याचप्रमाणे दु:खाच्या, वेदनेच्या ठसठसणार्‍या ताराही इतरसमोर झंकाराव्या वाटल्या तर ती बाब नैसर्गिकच मानावी लागेल. त्यामुळे श्री.चिगो यांनी धाग्यात व्यक्त केलेला प्रसंग व त्यांना वैयक्तिकरित्या जाणवलेले तीव्र दु:ख यात जरी येथील सदस्य केवळ शब्दरूपानेच तिथे सहभागी होऊ शकतात, तरीही त्याचे मोल अपार आहे. प्रसंगी एखाद्या शारीरिक जखमेचे व्रण औषधोपचाराने नाहीसे होऊ शकतात, पण मनावर वरील प्रसंगामुळे उमटलेला लाल ओरखडा जाण्यास काळ जावा लागला तरी अन्य लोकांच्या तीत सहभागी भावनेमुळे त्या ओरखड्याची आग निश्चितच सुसह्य होऊ शकते.

तुमच्या मित्राची आत्महत्या आणि बेकारी वा कर्जबाजारी वा असाध्य रोगामुळे एखाद्याने केलेली आत्महत्या यात लक्षणीय फरक आहे. ज्या युवकाच्या करीअरला आणि प्रतिभेला आत्ता आत्ता पंख फुटले असून सारे विश्व आपल्या कवेत येण्याचे दिवस पुढे चमचम करीत असताना एका अनाकलनीय क्षणी तो तितकाच अनाकलनीय निर्णय घेतो आणि एका क्षणात होत्याचे नव्हते करतो,... का? कशासाठी? कुठला होता तो प्रसंग की त्याला धीराने तोंड देण्याचे ऐवजी एक तरूण आकाशापल्याड असलेल्या अज्ञात जगात विरून जातो... हे जर कोडेच असेल तर आजतागात विज्ञानाला न सुटलेले कोडे आहे असे म्हणावे लागेल.

कोणत्या कारणाने [सकारण/अकारण] आयुष्य बदलून जाते हे पाहिले म्हणजे काही वेळा हतबुद्ध व्हायला होते. एक मात्र खरे की आत्महत्या करणारी माणसे दुबळी असतात असे मला वाटत नाही; आणि कोडगेपणे आयुष्य जगणार्‍या व्यक्ती अर्जुनासारख्या पराक्रमी असतात असेही नाही. आपला श्वास चालू आहे म्हणजे ती आपली 'अचिव्हमेंट' नसून ती केवळ एक नैसर्गिक उलाढाल आहे; त्यामुळे या उलाढालीला अटकाव करण्यासाठी फार मोठे धाडस लागते हेही तितकेच [दाहक असले तरी] सत्य आहे. मानवी जीवनातील हे विलक्षण वाटणारे वळण आणि त्यापुढे असणारी अंधारदरी आपणाला सदैव अज्ञातच राहणार, हे सांगण्यासाठी एखादा तत्ववेत्ताच पुढे आला पाहिजे असे नाही, तर तुमच्या आमच्यासारखी सामान्य स्तरावर आयुष्य जगणारी व्यक्तीदेखील वरील अनुभवाला साक्षीदार राहिल्याने समजू शकतो.

असो...फार गहन विषय आहे आणि तितकाच व्यापकही. तरीदेखील इथे धाग्यावर व्यक्त झालेल्या वैविध्यपूर्ण अशा प्रतिसादांनी आणि त्यातील शब्दांनी तुमच्या मनावर काही क्षण का होईना पण चांदण्याची शीतलता पसरली तरी पुष्कळ झाले.

इन्द्रा

प्रकाश घाटपांडे's picture

5 Oct 2010 - 7:31 pm | प्रकाश घाटपांडे

दै.सकाळ मधील ही बातमी वाचली तेव्हा या धाग्याची आठवण आली.