भेग.. भाग - ३

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
17 Sep 2010 - 5:23 pm

भाग १ : http://www.misalpav.com/node/14413
भाग २ : http://www.misalpav.com/node/14430
----------------------------------------------------------------

अव गौराक्का, जाताल की जरा येळानी, इतक्या वर्षानी येव्हड्या लांबुन आलायती, वाइच इसंत घ्या अन मग जावा की. म्या बी बघा अडानी तुमी शहराला काय करता, कुठ असता असलं काय बी अजुन पुसल नाय.
सांजेला गप्पा मारुच की निवांत असे म्हणतच माझे पाय शेजारील पडलेल्या वाड्याकडे वळाले.

ए टिंग्या, तुझी आत्या तर लय डेंजर दिसतीया .. मन्या.
का रं ?
अर्रर्र माय म्हणती इथं भूत हाय, वाड्याकड अजिबात जायचं नाय, मला तर जाम भीती वाटतीया, मी तर जातू बाबा इथनं तूच रा आत्यासोबतस्नी.
ए मन्या अरं थांब की का पळतोयास, अस नाय काय .

माझा वाडा .. आता भग्नावस्थेत पडलेल्या शिला पाहिल्या तरी मनातल्या स्मृती जाग्या होतात, मन हळूच मागच्या काळात जातं अन या निर्जीव वस्तूंनाही पुन्हा मनामध्ये संजीवनी मिळते.
मी आणखीन थोडी पावले पुढे टाकली.. जिथे उभी होते तेथेच आमचे आंगण होते.. मी इथेच माझ्या बालपणीतील भातकुलीचे डाव मांडलेले होते, याच अंगणाच्या मध्यभागी तुळशीवृंदावन होते, भराभर सगळी चित्रे डोळ्या समोर फेर धरून तरळत होती आणि तेव्हड्यात सरकण या सगळ्या आठवणींनी डोळ्यात पाण्याच साम्राज्य वाढलं.

मनात मागच्या आठवणी फडफडत असतानाच, समोर अर्धवट पडलेली ती खोली दिसली.. बाबांची, त्या भिंतीतली ती देवरी अजून तशीच होती, आता तिथं चिमणीनं वास्तव्य केल्या सारखं दिसत होत. ती खोली पाहिली अन मनात धस्स झालं .. सगळ्या आठवणींनी माझं चित्त बेभान झालं, मनात भय दाटून ओठांची थरथर अन हृद्याची कंपने वाढली अन हळूच डोळ्यातून संतधार गालावर ओघळली. खरेच, मन हे एक वृक्ष असते अन आठवणी त्या वृक्षाची पाने, ओळखीच्या दृष्यांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात.. पूर्ण वृक्ष शहारून जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अश्रू फुलांची ओघळण होते.

काय र टिंग्या ? कोण पाव्हणी म्हणायची हि ?
आवाजा बरोबर माझी नजर तिकडे वळाली ..
गौरात्या हाय, आजच आलीया शहाराकडनं.
आबा ऽऽ माझी हाक नकळत बाहेर पडली. आबा डोळे बारीक करून काठी टेकवत पुढे आले..
चेहरा तर वळखीचा वाटातुया.. कोण .. ? गौरा ऽऽ ?

आबा .. अशी पुन्हा आपुलकीने , भावुकतेने हाक मारत मी आबांच्या पाया पडली.
किती दिसानं ताँड दाखवतीयास पोरी .. अस म्हणत असतानाच आबांना खोकल्याची उबळ आली. मी आबांना तिथेच एका शिलेवर बसवलं.

कुठ असतीयास पोरी ? कवा आलीयास?
आबा .. कोल्हापुरला असते आता, सगळे व्यवस्तीत आहे माझ. इकडे सगळं संपल आहे आबा, म्हणून नाही आली, काय करणार होते इकड येऊन ?
पोरी अस का बोलतीया.. अजून आबा पाटील जीता हाय, कवा बी बिनधास्त घरच्यापरी येत जा की , अस परकं का समजतीयास आम्हास्नी.
अहो नाही आबा, तसं नाही. सकाळीच आले बघा आबा, वस्ती ओळखू पण येईना लवकर ..
काय सांगायचय पोरी.. आता सगळं संपलया, काय बी नाय उरलं. उभी हयात या आबा पाटलानं गाजवली पण शेवटच्या वक्ताला नाथानं काय हे अपरीत समूर मांडून ठेवलया, बघवत नाय आता. जीव हाय म्हणूनश्यान जगतूया बाकी काय नाय पोरी.
गौरा, तो दीस अजून डोळ्यासमोरून जात नाय, इथंच तुझ्या बा कड आलो होतू मी ...

रामा, ए रामा ‌‌ऽऽ कौसल्या वहिनी रामा हाय काय घरात ? मी बाहेरणच आरोळी ठोकत आलो होतू इथं
हाईत की मागं, बसा त्या खाटल्यावर, बोलावती ह्यास्नी..
तेव्हड्यात रामा, आपलं पांढरं फटाक धोतर सावरत पुढं आला ..
काय र आबा ? सकाळच्या पारी आज.. काय भानगड हाय ..?
अरं काय नाय, जरा वाईच आलो होतू, अवंदाच्या वर्षी जत्रपुतुर नाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा म्हणतुया .. तुला पहिलं इचाराव म्हंणल्ल मग सभेत बोलू.
अरं यात काय इचारणं झालं व्हय ! तुझं बी ना .. अगं कौसल्या च्या झाला का नाय ..?
इतक्यात सारी जमीन हादरली.. धाडधूड‌ऽऽ सगळीकडे आवाज आलं, काय कळायच्या आत आजूबाजूच्या भिताडावरची दगडं धडाधड पडू लागली, आतनं वाहिनीच्या किंकाळण्याचा आवाज आला.. तसा रामा आत धावला, किंकाळण्याच्या.. ओरडण्याचा आवाजानं सगळं चक्रावून गेलं, शेजारची माळवदाची घर तर पत्त्यांवाणी पडली..
आतनं रामाचा आवाज आला.. आबाऽऽ आबाऽऽ, मी आत धावलू.. वाहिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याल्या, रामाचं डोकं फुटलेलं, म्या पुढं धावलू .. इतक्यात काय कळायच्या आत सरकणी शेजारच भिताड आमच्या अंगावर ढासळलं अन म्या बी त्या खाली गाडला गेलो. मला सुध आली तवा, सगळीकडं डाक्टरच डाक्टर .. अन कोकलणारी पोरं, रडणारी माणसं अन धाय मोकलून ओरडणाऱ्या बायका .. कोणाचा हात तुटलेला, कोणाचं पाय.. कोणाची माय तर कोणाचा बा मरून पडलेला ..सगळी वाडीच उध्वस्त झाल्याली ..
त्याच काळ्या दिशी सगळं संपलं पोरी, तुझा बा..कौसल्या वहिनी..माझी पोर, रुक्मिणी समदं समदं संपलं.
याच डोळ्यानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली माणसं अन सरणावर जाणारं वाडीच्या अस्तित्वाची निशानं पाहिल्यात. अन काय सांगू या सगळ्या यातनांनी.. जखमांनी सगळं खाक केलया अन पाह्यलेल्या सगळ्या सप्नाची, आशेची राख घेऊन हिंडतोय हा आबा बाकी काय नाय.
अस म्हणतच आबा पुन्हा जोरात खोकू लागले, भरलेल्या डोळ्यांना पदराला पुसत मी उठले.
जाऊद्या आबा, अन कोणास दोष द्यायचा, दोष ना डोळ्यांच्या दृष्टीचा ना सभोवतालच्या विस्कटलेल्या या सृष्टीचा, उगाच आपल्याच अस्तित्वास विसरून आपण समजुतीच्या थेंबानं मनास भिजवत असतो .

बरोबर हाय पोरी तुझं, पण आता आवेशाची रेघ कवाच पुसट झालीया, भूकंपानं सार अवसानच गेलया बघ अन उमेदेची पार होळी झालीया. , मंदिराचच काय लोकास्नी घर बी नाय नीट राहायला, अन जे काय चार भिताड उभी दिसतायेत ती बी कसली घरं हाईती .. कर्त्या सवरत्याचा आधार नसल्यानं थडगी हाईत थडगी.. परत्येक घरातला माणुस आपल्या माणसाच्या वेदना घेवून जगतोय. ही भेगाळलेली जमीन अन त्यांचे भेगाळलेल आयुष्य, काय बोलु पोरी .. आजच आलीया जरा आराम कर, दु:ख तर वस्तीच्या पाचवीलाच पुजल हाय.. एक एक आइकलं - पाहिल की तुझा जीव कसावीस हुईल उगाच ....

क्रमशा:

जीवनमानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

मनाला भावेल असं लेखन आहे... खुप छान लिहिता...

स्वतन्त्र's picture

17 Sep 2010 - 6:21 pm | स्वतन्त्र

येऊ दे अजुन !

नगरीनिरंजन's picture

17 Sep 2010 - 6:27 pm | नगरीनिरंजन

तुमची लिहीण्याची शैली आवडली!
लिहीत राहा.

पैसा's picture

17 Sep 2010 - 7:17 pm | पैसा

पुढचे भाग लौकर द्या!

चिगो's picture

17 Sep 2010 - 9:25 pm | चिगो

छान लिहीताय, मनाला भावेल असं.. रंगतीय गोष्ट..

प्राजु's picture

17 Sep 2010 - 9:48 pm | प्राजु

वाचते आहे. येऊदे अजून.

गणेशा's picture

20 Sep 2010 - 3:23 pm | गणेशा

सर्वांचे मनपुर्वक आभार ..
लिखान चालु आहे.. पण हापिसात आपल ऑफिस मध्ये काम जास्त आहे हो.. आणि घरी नेट नाहीये .. म्हणुन थोड संभाळुन घ्या उशीर झाल्यास.

बाकी तुमच्या प्रतिसादा मुळे लिखानाला मज्जा येत आहे,
तरी काय आवडले नाही ते सांगितले तर मला जरा बदल करुन लिहिता येईल.

शब्दमेघ

खरे खुरे भुकंप पिडीत लोकांचे अनुभव लिहाय्चे आहेत..
त्यासाठी वेळ लागेल ..

परंतु कोणी लातुरच्या समाजसेवी संघटनेचा पत्ता कींवा फोन नं देयील का ओलखीचे कोणी असले तर ..
, की ज्या संस्थेने भुकंप पिडीतांसाठी काम केले आहे ..

प्रचेतस's picture

8 May 2015 - 6:44 pm | प्रचेतस

सुरेख कथा आहे रे.
अर्धवट का सोडलीस?