मेरे मौला करम हो करम... (येथे ऐका)
मेरे मौला मौला, मेरे मौला मौला हो करम...
मेरे मौला करम हो करम
मेरे मौला करम हो करम...
हे देवा, हे मौला, खुदा, तुझ्या दारी आलो आहे..रेहेम कर, कृपा कर. खूप थकलो आहे, दर दर भटकतो आहे, फाके पडले आहेत..
१ ली ओळ - मेरे मौला करम हो करम
शुद्ध निषाद, शुद्ध रिखभ आणि कोमल गंधार यांचं राज्य. या तिघांनी मिळून साकारलेली करुणता. हात जोडले आहेत- प्रार्थनेकरता..! Low tone मध्ये.
२ री ओळ -
मेरे मौला करम हो करम
डोकं ठेवतो बा तुझ्या पायावर.. माझ्या अश्रुंनी भिजवले आहेत तुझे चरण. दया कर!
नी़सारेम रे ध ...! किरवाणी रागातली 'तोहे बिन मोहे चैन नही आवे..' ही राशिदखाची सुरेख बंदिश सहजच आठवली.. 'रेधप' संगती जीव हळवा करून जाते..!
'तुमसे फर्याद करते है हम...'
दुसरीकडे कुठे मी माझं गार्हाणं मांडणार? तुझ्याचकडे येणार ना? तेवढा हक्क आहे रे माझा तुझ्यावर! 'फर्याद' शब्दावरची छोटेखानी हरकत आतपर्यंत पोहोचते..!
पटदिपातली 'गमपनीसांधप...संगती! हीच संगती 'मर्मबंधातली ठेव ही..' करता वापरली आहे... रे देवा, माझ्या मर्मबंधाची गाठ तुझ्यापाशीच बांधली आहे रे..'दु:ख देवासि सांगावे..' असं म्हटलं आहे आमच्या बाबूजींनी..! तूच माझा सुहृद..!
मेरे मौला करम हो करम..!
मग सांग मी कुठे जाऊ? तुझ्याकडेच येणार ना रे?
मान्य करतो की सर्वत्र तुझंच राज्य आहे.. तुझ्या कृपेनंच होतं सर्वकाही.. तू सगळ्यांचं ऐकतोस असं ऐकून आहे..मग माझंही ऐक ना रे..! तू अभाग्यांचा सहारा.. तू बुडत्याचा आधार..संकटांची वादळं तू क्षणात दूर कातोस.. मग माझ्याही आयुष्यातली घोंघावणारी वावटळ शमव की रे..!
'तू करे जो मेहेरबानिया, दूर हो जाए हर एक ग़म!'
सुंदर ओळ, सुंदर सुरावट!
ही मूळ उर्दू प्रार्थना थोडे शब्द बदलून खाकी या चित्रपटाकरता फार सुंदर रितीने वापरली आहे. टची आहे!
एक साधा, सरळ, सहृदयी, सेवाभावी डॉ अन्सारी.. त्याला दहशतवादी ठरवण्यात येतं.. तो निर्दोष आहे हे फक्त चार पोलिस अधिकार्यांना माहीत असतं.. अखेर तो मारला जातो. दहशतवादी ठरवला गेल्यामुळे त्याच्या मयतालाही कुणी जात नाही. अखेर तेच चार पोलिस अधिकारीच त्याला दफन करतात..गाण्याचं चित्रिकरण केवळ सुरेख..!
सोबत त्याचं अनाथ झालेलं पोरगं आणि त्याची असहाय्य, म्हातारी विधवा आई. ती तिथे हजर असते..
मेरे मौला करम हो करम...
कोण विचारतो त्या माउलीला? कोण ऐकतो तिची ही प्रार्थना?!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
14 Sep 2010 - 10:30 pm | दाद
सुंदर गाण ऐकताना सुंदर वाटल नाहि जेवढ वाचताना सुंदर वाटल !
तात्या जियो!
16 Sep 2010 - 11:19 am | अमोल केळकर
पुर्णपणे सहमत
अमोल केळकर
14 Sep 2010 - 10:31 pm | शुचि
करुण!!
आइकेन हे गाणं गेल्यावर घरी.
रसग्रहण खूप करूण आहे.
15 Sep 2010 - 12:06 am | मी-सौरभ
सा. न.
15 Sep 2010 - 1:59 am | असुर
तात्या, अप्रतीम पद्यचित्र! खाकी पाहताना या गाण्याकडे साफ दुर्लक्ष झालं होतं! आज लक्षात आणून दिल्याबद्दल धन्स!
अशा अनेक दुर्लक्षिलेल्या गाण्यांना तुम्ही हे असे नवे सदरे चढवून समोर आणता आणि ती गाणी ऐकायचा दृष्टीकोन, त्या गाण्याचा मूड पार बदलून जातो!
कल्लास!
पण तात्या, पद्यचित्र मध्यातच संपलं असं वाटतंय का हो? की या गाण्याचा मूडच आहे तसा?
--असुर
15 Sep 2010 - 9:13 pm | अनिल हटेला
असुराशी बिल्कूल सहमत !!
:-)
सुर आणी सुरा चा पंखा ;-)
15 Sep 2010 - 7:09 am | राजेश घासकडवी
तात्या,
तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला गाण्यात जाणवलेल्यातलं कदाचित दहा वीस टक्के सौंदर्य माझ्यापर्यंत पोचत असेल. पण तेवढ्यावरूनच तुमच्या संगीताच्या जाणीची व प्रेमाची कल्पना येते. व गाणं पुन्हा ऐकून त्यातली सौंदर्यस्थळं शोधण्याची गरज वाटते. असंच लिहीत राहा.
राजेश
15 Sep 2010 - 10:33 am | विसोबा खेचर
मा. श्री. रा. घा. गुर्जी,
माझ्या लेखनात जे खटकले ते लिहिता आणि वेळप्रसंगी अशी आवर्जून दादही देता याचे बरे वाटते..
तसे नव्हे.. उलटपक्षी मीच केवळ १०-२० टक्के लिहू शकतो, वर्णन करू शकतो, अभिव्यक्त करू शकतो असे म्हणेन. एखाद्या गाण्याबद्दलच्या माझ्या भावना मला (किंवा कदाचित कोणालाच!) ठरवूनदेखील १०० टक्के उतरवता येणार नाहीत. कारण अखेर गाणे ही अनुभवायची गोष्ट आहे, स्वान्तसुखाय, स्वानंदची गोष्ट आहे. तो अमृतानुभव कागदावर उतरवणे तसे मुश्किलच. तरीही थोडाफार यत्न करतो झाले!
ते मात्र सुदैवाने खरे.. बालपणीपासूनच कानावर संस्कार होत गेले. मैफलींमुळे समृद्ध होत गेलो. गाणे आवडत गेले आणि मीदेखील त्याचा रसिकतेने आस्वाद घेऊ लागलो, अभ्यास करू लागलो. अभ्यास अर्थात अजूनही सुरूच आहे. कारण तो कधीच न संपणारा आहे. तो सांगितिक महासागर दोन्ही हात पुढे करून 'घ्या, घ्या..' असे म्हणतोय. परंतु आपलीच झोळी तोकडी आहे, दुबळी आहे. जमेल तेवढे अन् जमेल तितके घ्यायचे व जे आवडले ते जना सांगायचे. दुसरे काय?
हाच माझ्या लेखनचा हेतू आहे आणि तो आपल्या उपरोक्त वक्तव्याने सफल झाला आहे असे वाटते..
कृतज्ञ आहे..
तात्या.
15 Sep 2010 - 9:55 am | अब् क
रविवारि पाहिला!!! मस्तच आहे!!!
15 Sep 2010 - 7:49 pm | गणेशा
छान लिहिले आहे तुम्ही
16 Sep 2010 - 10:06 am | विसोबा खेचर
प्रतिसाद देणार्या सर्व रसिकांचे आणि वाचनमात्रांचे आभार..
तात्या.
16 Sep 2010 - 12:44 pm | यशोधरा
गाणे तर सुरेख आहेच, पण रसग्रहणही सुरेखच जमले आहे. तरीही असूर ह्यानी म्हटल्याप्रमाणे थोडे काही राहून गेल्यासारखे वाटले...
16 Sep 2010 - 3:10 pm | बिपिन कार्यकर्ते
सुरेख!!!