शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा
शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||
गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||
नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||
घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०
प्रतिक्रिया
8 Sep 2010 - 7:05 pm | अवलिया
मस्त ! :)
सर्वांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा !!
8 Sep 2010 - 7:10 pm | पाषाणभेद
सर्वांना शब्दाबद्दल खुलासा व्हावा!
:-)
8 Sep 2010 - 7:27 pm | धमाल मुलगा
वा वा!
आज आमच्या सणाचं गाणं वाचुन आनंद गोठ्यात मावेना :)
8 Sep 2010 - 7:50 pm | शुचि
सुंदर!!!
बरेच नवीन शब्द कळले.
8 Sep 2010 - 9:32 pm | गणेशा
शब्दबद्ध केलेली प्रत्येक वस्तु चित्र रुप होत आहे .
अप्रतिम
8 Sep 2010 - 9:48 pm | पक्या
छान जमलीये कविता.
पाभे भाऊ, तुमच्याकडे गावाकडील संबंधित गोष्टींचा भरपूर शब्दसंग्रह दिसतोय आणि अनुभव ही.
बरेच नवीन शब्द दिसले. जरा अर्थ पण सांगा की ..जसे माढोळी, म्होरकी , कासरा, छमच्या. चित्रासकट अर्थ दिलात तर अजून छान.
धन्यवाद.
9 Sep 2010 - 9:59 am | पाषाणभेद
पोळ्याच्या दिवशी बैल सजवण्याचे साहित्य आहे ते. कासरा हे बैलांच्या मानेत असणारी दोरी आहे. माथोटी पण तशीच. बाकीचे साहीत्य म्हणजे बैलांचे दागीने आहेत पोळ्याचे.
8 Sep 2010 - 9:54 pm | विलासराव
मस्त!!!!!!
9 Sep 2010 - 9:16 am | इंटरनेटस्नेही
चांगली कविता. खरोखर आवडली.
9 Sep 2010 - 1:02 pm | चिगो
छान कविता... गावात घरी केलेला पोळा आठवला.
आमच्या घरी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाला आमंत्रण देतात... बैलाला धुवून त्याला तेल-हळद लावुन त्याची पुजा केली जाते, आणि पोळ्याचं आमंत्रण देतात.. त्यावेळी म्हटल्या जाणार-या ह्या ओळी....
"आज आवतण घे
उद्या जेवाले ये..
तुत्यानं ढोसलं, तुले कास-यानं व्हढंलं
त्याचा राग नको मानू..
आज आवतण घे
उद्या जेवाले ये..."
पोळ्याच्या शुभेच्छा...!!