पावसांत वडवानल ! ! !
बरसत होता श्रावण अगणित,
ऋतू प्रेमाचा होता फुलला,
विद्युलतेसम प्रकटलीस तू,
इंद्रधनूहि स्वागतास अवतरला.
पाऊस रिमझिम, तू ओलेती,
तन-मन माझेहि ओलेती,
केस झटकणे तुझे त्या क्षणी,
बरसले अगणित माणिक मोती.
उधळीत रंग असे लावण्याचे,
आलीगिले तू अवचित मजला,
पावसांत जर वडवानल पेटला,
मी दोषीन पावसाला..
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
6 Sep 2010 - 5:17 pm | मदनबाण
हनुमान वडवानल स्तोत्र आहे की काय असे वाटले... ;)
छान कविता...
6 Sep 2010 - 5:23 pm | मेघवेडा
कवितेचा विषय छान आहे. गेयतेच्या ग्राफाचा स्लोप/ग्रेडियण्ट 'ऋण' आहे असं वाटतंय! ;)
7 Sep 2010 - 9:24 am | निरन्जन वहालेकर
" गेयतेच्या ग्राफाचा स्लोप/ग्रेडियण्ट 'ऋण' आहे असं वाटतंय ! "
योग्य मार्गदर्शन.धन्यवाद ! ! !
गेयतेच्या दृष्टीने लिहिण्याचा पुन्हा प्रयत्न करीन पाहू कितपत जमते ते..
7 Sep 2010 - 9:28 pm | स्वानंद मारुलकर
बरसत होता श्रावण अगणित,
ऋतू प्रेमाचा होता फुलला,
विजेसारखी प्रकटलीस तू,
इंद्रधनू स्वागतास सजला.
पाऊस रिमझिम, तू ओलेती,
तन-मन माझेहि ओलावे,
केस झटकणे तुझे त्या क्षणी,
अगणित मोती मी झेलावे
उधळत रंग असे प्रीतिचे,
बिलगलीस तू अवचित मजला,
ऊर पेटवू लागे पाऊस
फितूर झाला ऋतूचक्राला
आगाऊपणाबद्दल माफ करा.
पुलेशु.
7 Sep 2010 - 9:31 pm | मेघवेडा
सुरेख! चित्रच उभे राहिले डोळ्यांसमोर! :)
7 Sep 2010 - 9:34 pm | मिसळभोक्ता
ऊर पेटवू लागे पाऊस
फितूर झाला ऋतूचक्राला
सुंदर, आवडले...
फक्त, ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते.
(मास सायकोलॉजी)..
जरा वेगळे शब्द वापरले, तर ?
फितूर झाला वैशाखाला
असे म्हटले, तर एक वेग्ळीच नशा.. नाही का ?
(ता.क. साला, आपण मारुलकराचा फ्यान झालोय आज.)
7 Sep 2010 - 9:40 pm | स्वानंद मारुलकर
>>ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते
भा. पो.
>>फितूर झाला वैशाखाला
तिथे पाऊस त्याच्या स्वभावाला फितूर झालाहोते.मला म्हणायचे होते.
मूळ कवितेतल्या शेवटच्या २ ओळी कळल्या नाहीत. तेव्हा मनानेच भर टाकली :)
7 Sep 2010 - 11:04 pm | मिसळभोक्ता
मारुलकर साहेब,
संभाजी महाराज औरंगजेबाला फितूर झाले, असे म्हटले, म्हणजे, औरंगजेबाला सहाय्य करू लागले, असे होते.
स्वतःच्या स्वभावाला (द्विरुक्तीबद्दल क्षमस्व) सर्वच फितूर होतात.
पाऊस आणि वैशाख ह्यांचे सहा-बाराचे नाते आहे (अधिक माहितीसाठी घड्याळ बघा.)
त्यामुळेच म्हणतो, की "फितूर झाला वैशाखाला" खूप उठून दिसते.
7 Sep 2010 - 11:45 pm | स्वानंद मारुलकर
>>"फितूर झाला वैशाखाला" खूप उठून दिसते.
याच्याशी १००% सहमत.