(...लवकर ये!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 Apr 2008 - 11:43 pm

कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:)

(ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;)

रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये !
हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये !

थंडगार एकटाच खणखणतो...
देहाची वाफ किती दवडवितो...
किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो -
-`सोड सोड तू बाटली; लवकर ये `!

तेच भक्त; तूच मदिरा त्यांची!
पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची!
ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची!
पेग तो आता भर...लवकर ये !

सांग त्यांना वाट किती दावू मी?
का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ?
वाट बघत कोरडा का राहू मी ?
धारेचे ते का 'अंतर' ? लवकर ये !

* * *

मिटले; सार्‍यांचे नयन मिटले...
फिटले रे, जाल 'धूम्राचे' फिटले...
तन आता या तहानेला विटले...
ये वारुणि, ये लवकर ! लवकर ये !
..........................................
रचनाकाल ८ एप्रिल २००८
..........................................

चतुरंग

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

9 Apr 2008 - 12:31 am | प्राजु

ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले...
तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्तरंजन भट's picture

10 Apr 2008 - 2:30 am | चित्तरंजन भट

ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि...

खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले...
तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!!

प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास.

एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे.

अवांतर
होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.

चतुरंग's picture

10 Apr 2008 - 2:45 am | चतुरंग

( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे.

तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे.
(माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;)

(अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;)

चतुरंग

प्राजु's picture

11 Apr 2008 - 12:32 am | प्राजु

आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही.
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुशील's picture

11 Apr 2008 - 8:36 am | सुशील

बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे...

तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?

बेसनलाडू's picture

9 Apr 2008 - 2:26 am | बेसनलाडू

आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले.
विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो.
पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
(आस्वादक)बेसनलाडू

आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले!
अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)!
धन्यवाद!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

9 Apr 2008 - 8:50 am | सुवर्णमयी

डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )

केशवसुमार's picture

9 Apr 2008 - 10:08 am | केशवसुमार

चतुरंगशेठ,
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले.
धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते !
(ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार

ठणठणपाळ's picture

9 Apr 2008 - 9:22 pm | ठणठणपाळ

धक्क्याने ग्लास पडून फुटायची भीती वाटली असेल त्यांना!

चतुरंग's picture

9 Apr 2008 - 7:52 pm | चतुरंग

धक्का तंत्र वापरायची चांगली संधी गमावली खरी;((!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 8:51 am | विसोबा खेचर

रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये !
हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये !

हे मस्त! :)

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2008 - 8:01 pm | स्वाती दिनेश

विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले.
स्वाती

ठणठणपाळ's picture

9 Apr 2008 - 9:26 pm | ठणठणपाळ

अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.

बाजीराव's picture

9 Apr 2008 - 10:12 pm | बाजीराव

विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले.
स्वाती

मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?