संपादकांच्या कथा आणि व्यथा

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
27 Aug 2010 - 8:18 am

(डिस्क्लेमर : मुळात या शीर्षकाचा लेख लिहावा ही कल्पना मिभोंनी आमच्या डोक्यात भरवून दिली त्यामुळे या सगळ्या भानगडीत मुख्य दोष त्यांचा आहे. मी फक्त लिहिण्याचं काम केलं. तसंच हे लेखन हलक्या फुलक्या, खेळीमेळीच्या वातावरणात घ्यावं ही नम्र विनंती. पुन्हा, माथी भडकलीच तर मिभो जबाबदार हे लक्षात असू द्या.)

Be not afraid of greatness; some are born great, some achieve greatness, and others have greatness thrust upon them.

शेक्सपिअरची थोरवी अशी की गेली चारशे वर्षं त्याचं थोरवीविषयीचं हे विधान अजून टिकून आहे. थोरवी कशी का मिळालेली असेना, थोर लोक नेहेमीच जगासमोर असतात. जग त्यांचा उदोउदो करतं. त्यांना बिरुदांनी मढवतं, खांद्यांवर घेऊन नाचतं. पण रूढार्थाने जे थोर नाहीत अशा तुमच्या आमच्यांचं काय? आपण रोज कष्ट करतो, आपलं सामान्य जीवन जगण्यासाठी घाम गाळतो... आपली दखल कोण घेतो? तरी आपण निदान स्वतःच्या भल्यासाठी, कुडीत प्राण टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या पोराबाळांना महागड्या शाळांमध्ये घालण्यासाठी तरी झटतो. थोडक्यात स्वार्थासाठी खस्ता खातो. पण या जगात इतरही असे आहेत, जे हे जग सुंदर व्हावं यासाठी अविरत कष्ट घेतात. त्यांच्या पदरी काय पडतं? त्यांचा उदो उदो करणं तर जाऊच देत, पण प्रसंगी त्यांना शिव्याशाप मिळतात. काही जण पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करतात, तर काही केवळ परमार्थासाठी, सर्व संसारी जबाबदार्‍या सांभाळून विरक्त भावनेने हे काम पत्करतात. त्यांची आठवण सर्वांना करून देण्यासाठी हे लेखन. तेव्हा हे मूळ वाक्य थोडं बदलून असं लिहावंसं वाटतं.

'संपादकत्वाची भीती बाळगू नका; काही जन्मजात संपादक असतात, काही संपादकत्व मिळवतात, तर काहींवर संपादकत्व लादलं जातं.'

या वाक्याच्या आधारेच मी या लेखाद्वारे संपादकांच्या कथांना वाट आणि व्यथांना तोंड फोडणार आहे. (तोंड फोडणे चा भलता अर्थ घेऊ नये). शेवटी शेक्स्पिअरने थोरांविषयी म्हटलं आहे की इतर कुठल्याही गोष्टीप्रमाणे थोरवी देखील वडिलोपार्जित, कमावलेली, किंवा लादलेली असते. पैशांविषयी हे लागू होतं, तसंच दुःख व ओझ्याविषयीही ते लागू होतं. त्याचा सांगायचा उद्देश होता की थोर लोकं, श्रीमंत लोकं ही वेगळी नसतात, तुमच्याआमच्यासारखी माणसंच असतात. संपादकांच्या बाबतीतही हेच म्हणता येतं. वरचा, छद्मी हसतोय असं वाटणारा आधिकारिक मुखवटा काढला की त्यांचाही चेहेरा दिसतो हाडामांसाचा, दुःख-वेदना-पराभव यांनी गांजलेला. तुमचा विश्वास बसो वा न बसो, तीही माणसंच असतात. त्यांना आपलं म्हणा.

संपादन या शब्दाची व्युत्पत्ती मला ठाऊक नाही. वरकरणी वाटते त्यापेक्षा ती क्लिष्ट असावी असा माझा अंदाज आहे. (वरकरणी म्हणजे, पाद म्हणजे पाय, लेखनाची पायाखाली सं-तुडवणुक करणे या अर्थापेक्षा) पण व्युत्पत्ती काहीही असली तरी त्या कामाची गरज ही कालातीत आहे. गॅलिलिओच्या काळात कॅथलिक चर्चने संपादकीय भूमिका अंगावर घेतली होती. काळ बदलला, निकष बदलले, आता कोणी कुठला गॅलिलिओ उठून काहीही म्हणू शकतो, पृथ्वी गोल असण्याविषयी तर्कट वितंडवाद घालू शकतो. एका अर्थाने ही परिस्थिती संपादकीय आधिकारिक विस्तृतीचा व्यास आकुंचित करणारीच आहे. (किंवा परीघ आकुंचित करणारी असेल. मी एकदा लिहिलं ते चुकीचं असलं तरी बदलणार नाही.) संपादन या व्यवसायाला मानसशास्त्रीय जगतात मानाचं स्थान (काहीसं अभावितपणे) दिलं ते फ्रॉइडने. त्याच्या मते प्रत्येक पुरुष मुलाला संपादनाची सूप्त भीती असते. इथे अर्थातच त्याने संपादन हा शब्द वापरला नाही, पण तो सर्वसाधारणपणे कर्तनाविषयीच बोलत होता. हीच मुलं मोठी होऊन लेखन वगैरे करायला लागल्यावर, आधिकारिक खुर्चीवर बसून कर्तन करणार्‍या संपादकांविषयी अनामिक भीती का असते हे त्यातूनच लक्षात येतं. (कार्टा हा शब्द कर्त धातूच्या कभूधाविचा अपभ्रंश आहे का अशीही रास्त शंका येते.)

संपादन हे तसं जिकीरीचं काम. कोणालाच न आवडणारं, पण तितकंच आवश्यक. एखाद्या लेखाचा डायपर बदलून, बरे कपडे वगैरे घालून त्याला लोकांत नेण्याच्या लायकीचं करण्याचं काम. भरमसाठ लेखन करणाऱ्या कुठल्याही टिनपाटी लेखकुलासुद्धा आपली प्रत्येक ओळ म्हणजे कालिदासाचं (किंवा किमानपक्षी अनिरुद्धबापूंचं तरी) महावाक्य वाटत असतं. अशा परिस्थितीत संपादन म्हणजे खरं तर तडजोड असते. संपादकाला सर्वच लेखन फेकून देण्याची इच्छा असते तर लेखकाला सर्वच जसंच्या तसं, अगदी शुद्धलेखनाच्या चुकांसकट प्रसिद्ध करण्याची इच्छा असते. व्हेनिसमध्ये सोळाव्या शतकात प्रसिद्ध होणाऱ्या एका साप्ताहिकाविषयी एक वदंता प्रसिद्ध आहे. संपादकांना लेखनाच्या घसरत्या दर्जाविषयी इतका वीट आला की त्यांनी काही अंक लेखनाशिवाय, निव्वळ जाहिरातींनी भरलेले काढले. त्यांच्या दुर्दैवाने ते अतोनात यशस्वी ठरले, व मालकाला एकंदरीत संपादकांचीच गरज काय असा प्रश्न पडला. लेखकांच्या मानधनाचा प्रश्न मिटल्यावर मालकाने ताबडतोब संपादकांच्या पगाराचा प्रश्न त्यांना डच्चु देऊन सोडवला व साप्ताहिक जाहिरातींसाठी फुकटात वाटायला सुरूवात केली. तेव्हापासून संपादकांनी लेखकांना, कुंकू राखण्यासाठी का होईना, पण रोज दारू पिऊन आपल्याला बडवणार्‍या नवर्‍याला एखादी स्त्री सांभाळून घेते तसं सांभाळून घ्यायला सुरूवात केली. अर्थातच अशा नात्यात संघर्ष झाल्यावाचून राहात नाहीत. माझं लेखन का नाकारलं? असं तावातावाने विचारणारे लेखक आहेत. संपादकांची चेष्टाही भरपूर होते. छापील माध्यमांतलं उत्तम उदाहरण म्हणजे ठणठणपाळ यांनी उडवलेली भागवतांची खिल्ली. तीच परंपरा काही लेखक आधुनिक इ-माध्यमांतूनही चालू ठेवताना दिसतात.

असो, नमनालाच घडाभर तेल पडलं. हरकत नाही. खरं तर संपादकांना नमन करणं हेच या लेखनाचं उद्दीष्ट आहे. पुढच्या आरत्या अधिक जाणकारांनी ओवाळाव्यात ही नम्र विनंती.

संपादकांच्या कथांविषयी - (म्हणजे संपादकांनी लिहिलेल्या किंवा लिहून अर्धवट सोडलेल्या कथांविषयी नाही) या बाबतीत मला फारशी माहिती नाही. काही संपादक लोक कोंडाळं करून बसले आहेत व पुढीलप्रमाणे गप्पा मारत आहेत अशी कल्पनाच फक्त मी करू शकतो. प्रत्यक्ष संपादकीय अनुभव असणार्‍यानी यात भर घालावी, अथवा त्रुटी दाखवून द्याव्यात.

मी त्याला सरळ दम भरला, हा असला वात्रटपणा इथे चालायचा नाही. म्हणजे तसं प्रत्यक्ष बोललो नाही, फक्त त्याचं लेखन साभार परत पाठवलं. पण साभार हे तिरकस अक्षरात लिहिलं.
मी बहुतेक लेखन वाचत नाही. मात्र परत पाठवण्याआधी प्रत्येक कागद पेपर कटरने सुटा निश्चित करतो. काही हरामखोर लेखक मुद्दाम खळ लावून कागद चिकटवतात, व नंतर कांगावा करतात की संपादक काही न वाचताच लेखन परत करतात.
... रोज हाणामार्‍या करतो आहे व रात्री कुणाचे तरी तंगडे तोडुनच झोपायला जातो आहे.

संपादकांच्या व्यथा - या भरपूर माहीत आहेत. कारण शेवटी संपादक हे व्यथित जीवच आहेत.
- बऱ्याच वेळा लोक संपादकाशी बोलताना मित्र म्हणून बोलतात, तर कधी मैत्रीपूर्ण बोलण्यात संपादकत्व मध्ये येतं.
'काश तुम्हारे और मेरे बीच ये वर्दी न होती!' किंवा 'क्या मै ये जान सकता हू के मै मेरे दोस्त से बात कर रहा हू या उसने चढाई हुई वर्दीसे?' वगैरे एखाद्या हिंदी सिनेमात म्हणावं तशी वाक्य येतात... मग एखाद्या साहित्य संमेलनात वगैरे भेट झाली की वातावरण चाकूने कापता यावं इतकं दाट होतं.
- कधी कधी एखादा चेष्टेखोर, भरपूर वेळ असलेला(ली) संपादक शुद्धलेखन वगैरे दुरुस्त करतो(ते) आणि मग ते इतरांना (वाचकांना व इतर संपादकांना) बोचलं की मग त्यांना मी हे केलं नाही वगैरे जाहीर करावं लागतं.

आजच्या इ-माध्यमांत काही नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. लेखन, प्रकाशन, समीक्षण, संपादन व वाचन यांच्या सीमा धूसर झाल्या आहेत. लेखक हेच प्रकाशक आहेत - त्यांचे स्वतःचे ब्लॉग वगैरे असतात. बरं तेच ते लेखक एकमेकांचे ब्लॉग वाचून अहो रूपम् अहो ध्वनी या नात्याने एकमेकांची समीक्षा/प्रसिद्धी करतात. ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रिया संपादित करू शकतात. स्वयंसंपादनाने तर हे सगळंच चित्र बदलतं. त्यामुळे खोडसाळ लेखकांचं फारच फावतं. आणि बहुतेक लेखन हे खोडसाळपणेच होत असल्यामुळे त्यावर आळा कसा घालायचा यामुळे संपादक व्यथित झालेले असतात. त्यात "सगळ्यांनाच सगळे माहित नसते (किंबहुना सगळ्याच गोष्टी संपादक पुढे आणू शकत नाहीत हे ध्यानात ठेवावे) आणि त्यामुळे संपादकांच्या कृत्यांमागच्या भूमिकेबद्दल गैरसमज होऊ शकतात." ही तर संपादकांची मोठी व्यथा. काही वेळा इतके संपादक असतात की ते एकमेक काय करतात हेही एकमेकांना माहीत असणं शक्य नसतं.
- "असं झालं की लेख नक्की कोणी उडवला हे कळत नाही."
- "नमस्कार. तुमचा "XYZ" हा लेख तुम्ही स्वतःच काढून टाकला आहे का इतर कोणी अप्रकाशित केला आहे?" वगैरे लेखकालाच विचारायची पाळी येते. ही फारच मोठी व्यथा आहे.

असो. तर असे हे संपादक. काहींना ते 'कर्तनकाळ' वाटतात, तर काहींना त्यांचा समूह म्हणजे आतल्या गोटातला सर्वशक्तिमान कंपू वाटतो. याउलट काही संपादकांनीच आपल्या बिरादरीबद्दल लोकांना टरकलेले, लोकांच्या अद्वातद्वा बोलण्यामुळे झोप उडलेले असं वर्णन केल्याच्या अफवा कानावर आलेल्या आहेत. असो. माझ्या ज्ञानाच्या अल्प व्यासात जे काही सामावलं, ते मी लिहिलं. ज्यांना संपादकीय व्यवसायाचा, कामाचा, कार्यपद्धतीचा अनुभव आहे अशांनी भर घालावी ही विनंती.

वाङ्मयप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

सहज's picture

27 Aug 2010 - 9:04 am | सहज

>व्हेनिसच्या साप्ताहिकाविषयी एक वदंता ...तेव्हापासून संपादकांनी लेखकांना, कुंकू राखण्यासाठी का होईना, पण रोज दारू पिऊन आपल्याला बडवणार्‍या नवर्‍याला एखादी स्त्री सांभाळून घेते तसं सांभाळून घ्यायला सुरूवात केली.

हे बेस्टच!

खर तर १६(?) भागांची लेखमाला होईल हो गुर्जी!

बाकी कर्तनाच्या उल्लेखामुळे आता रब्बी, मौलवी व संपादक जोक बाजारात येणार.

असुर's picture

27 Aug 2010 - 2:30 pm | असुर

एक १६ आण्याचा सवाल -:

>>>'संपादकत्वाची भीती बाळगू नका; काही जन्मजात संपादक असतात, काही संपादकत्व मिळवतात, तर काहींवर संपादकत्व लादलं जातं<<<

आपल्या 'द सिक्स्टीन सामुराई' पैकी कोणकोण वरीलपैकी कुठल्या क्यॅटॅगरीमध्ये येतात ते कळेल तर फार्फ्फार मोठी आणि महत्वाची माहीती आनायसेच हाती लागेल! गुर्जी या ज्ञानलालसेकडे लक्ष देतील कय?

-- (ज्ञानपिपासू) असुर

राजेश घासकडवी's picture

28 Aug 2010 - 11:26 am | राजेश घासकडवी

आमचं या बाबतीतलं ज्ञान तीनचार आणेच आहे. अधिक जाणकारांकडून ज्ञानलालसा ज्ञानहिरवासा करून घ्यावी.

नितिन थत्ते's picture

28 Aug 2010 - 12:19 pm | नितिन थत्ते

ज्ञानभगवासापण करून घ्यावी :)

An editor is someone who separates the wheat from the chaff and then prints the chaff.

हे खरं की खोटं ?

प्रकाश घाटपांडे's picture

27 Aug 2010 - 12:22 pm | प्रकाश घाटपांडे

आमचे मते काही संपादक लेख नाकारायचा असेल तर लेखकालाच स्वयंसंपादित करावयास लावतात. असे वारंवार केले कि लेखक कंटाळून पाठवायचे थांबवतो.

नितिन थत्ते's picture

27 Aug 2010 - 1:16 pm | नितिन थत्ते

:| :| :| :| :| :|

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2010 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा ... काय गुर्जी, तुम्हीही काल रात्री म्हणे ... असो!

संपादन शब्दाची व्युत्पत्ती आवडली. मला वाटलं होतं, संपादन म्हणजे सगळ्यांना सारख्याच प्रकारे पाय दाखवायचा! तसाही तो एक स्थिरांकच, बदलणार कसा? पण शेवटचं वाक्य आवडलं. "देशी" आणि नवीन संपादकांना त्यांची मतं न विचारण्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे कमीच!

डॉ.श्रीराम दिवटे's picture

27 Aug 2010 - 4:23 pm | डॉ.श्रीराम दिवटे

मी ज्या संपादकमजकूरांकडे लेखन पाठवायचो, ते फोन करुन 'अमूक मजकूर, तमूक ओळ, फलाना शब्द, बिस्ताना उल्लेख टाळला असता तर योग्य झाले असते, गाळू का?' असे विचारीत. ते फक्त विचारणं असायचं, चिरफाड केल्यानंतरचं!
आम्ही होकार भरायचो अन् ते उरलेल्या बॉक्सेस मध्ये जाहिराती!

मिसळभोक्ता's picture

27 Aug 2010 - 10:51 pm | मिसळभोक्ता

पुन्हा, माथी भडकलीच तर मिभो जबाबदार हे लक्षात असू द्या.

हे बरे आहे. परस्पर मिभोला जबाबदार ठरव्ण्याच्या सल्ल्याबद्दल निषेध.

बाकी, वाचतो आहे.

संदीप चित्रे's picture

28 Aug 2010 - 12:13 am | संदीप चित्रे

तुमचे प्रतिसादही काही न काही विचार करायला लावणारे असतात.
लिहिते रहा !

शुचि's picture

28 Aug 2010 - 3:45 am | शुचि

आक्षी फर्मास लेख टाकलाय.
मस्त. वाचताना हसून हसून मुरकुंडी वळाली. सर्वात आवडलेला लेख.