जॅझ जुगलबंदी

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
5 Apr 2008 - 9:15 am

सॅक्सोफोन आणि ड्रमची जुगलबंदी

सॅक्सोफोन-ड्रमच्या जुगलबंदीमध्ये
कोणी प्रमुख कलाकार नाही
कोणी सहायक कलाकार नाही

जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्ये
गती आणतो,
त्याच्या सुरांत मध ओघळतो -
तो गोफ विणतो
हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये.
ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला,
आणि मानतो आपल्या भाग्याला -
सॅक्सोफोनच्या भरारीमागचे
स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.

भाग्याचे देणे आहे दुप्पट....
कारण क्षणात बदले रंगपट
आणि ड्रमर बोल बरसतो
बहुपदरी ठेका,
तालात नेमका
नाजुक नक्षीची बुलंद इमारत!
नि सॅक्सोफोन गहरा
धरतो लहरा
ज्यावर ड्रमचे तुफान गलबत.

प्रमुख नाही कोणी कलाकार
सहायक नाही कोणी कलाकार
या प्रेमाच्या जुगलबंदीमध्ये

कविताभाषांतर

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

7 Apr 2008 - 5:56 pm | सुवर्णमयी

न्यू ऑर्लियन्सला जॅझ फेस्टिवला गेले होते त्याची आठवण झाली.
एक वेगळे रूपक. कविता आवडली

विसोबा खेचर's picture

8 Apr 2008 - 7:31 am | विसोबा खेचर

सॅक्सोफोनच्या भरारीमागचे
स्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.

नाजुक नक्षीची बुलंद इमारत!
नि सॅक्सोफोन गहरा
धरतो लहरा
ज्यावर ड्रमचे तुफान गलबत.

सुंदर..! केवळ अप्रतिम शब्दयोजना...!!

ड्रमचं सॅक्सोफोनच्या भरारीमागचं स्पंदन आणि ड्रमच्या बुलंद इमारतीला सॅक्सोफोनचा लेहेर्‍याची नाजूक नक्षी, हे मैतर, हे अद्वैत आवडले!

धन्याशेठ, क्लासच कविता केली आहेस! जियो...!

अवांतर - परंतु इथे ड्रम आणि सॅक्सोफोनच्या ऐवजी तबला आणि सारंगी असती तर कविता अधिक गहरी झाली असती असं वाटतं! हिंदुस्थानी अभिजात संगीताचा आधार असल्यामुळे तबला आणि सारंगी यांची अभिव्यक्ति ड्रम आणि सॅक्सोफोनपेक्षा खूपच अधिक वैविध्यपूर्ण आहे, बहुरंगी आहे!

काय म्हणतोस?

तात्या.

अशाच प्रकारे वेगवेगळ्या संगीतप्रकारांत आपल्याला सौंदर्यानुभूती होते.

शेवटची ओळ लिहिता यावी म्हणून कविता लिहिलेली आहे - दोन ओळखीच्या व्यक्ती माझ्या मनात आहेत. त्यामुळे विवक्षित संदर्भ मला बदलता येत नाही :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2008 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जेव्हा सॅक्सोफोन त्याच्या हरकतींमध्येगती आणतो,त्याच्या सुरांत मध ओघळतो -तो गोफ विणतोहृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये.ड्रमर कळे-न-कळे शिवतो ताशाला,आणि मानतो आपल्या भाग्याला -सॅक्सोफोनच्या भरारीमागचेस्पंदन होणे त्याला प्राप्त झाले.
सुंदर !!!!प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश's picture

13 Apr 2008 - 9:24 pm | ऋषिकेश

धनंजयराव,
अतिशय सह्ह्ह्ही!!!!!.. अतिशय प्रभावी रूपके.. जरा उशीराच वाचतोय त्याबद्दल स्वारी ;)..
पण कविता खूप आवडली
भाषांतराच्या विभागात टाकलिए.. मुळ कविता मिळेल का?

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय's picture

13 Apr 2008 - 11:00 pm | धनंजय

माझीच.

------------------------------
A DUET OF SAX AND DRUMS

In this duet of sax and drums
None is the soloist
None the accompanist.
When the sax brings
Flow to his riffs, coats
Them with honey-notes
And into his siren song
Twines his heart-strings,
The drummer gently daubs
The snares - as he hums
And thinks himself long
On luck
That lets him lend
A steady throb
To the sax's flight.
His luck
Is redoubled, for what he might
Do with a moment's decision:
Now! the drummer lets descend
A deluge of beats.
An ever intricate rhythm,
A complex precision
An engineering feat.
Awhile, the sax meets
Him with a tune so soft
That he thunders above,
And he may glide aloft.
None is the soloist
None the accompanist
In the duet of love.
------------------------------

मुक्तसुनीत's picture

14 Apr 2008 - 8:16 am | मुक्तसुनीत

मला मराठी भाषांतर आवडलेले होतेच. पण , मूळ इंग्रजी कविता फार, फार जास्त चांगली आहे असे वाटले... तुम्हाला इंग्रजी शब्दांचे नेमके अर्थ माहित आहेत यात माझ्या मनात संदेह नाही. पण

And into his siren song
Twines his heart-strings,

मधला नेमकेपणा, भाषेतल्या एका सुंदर वाक्प्रचाराचा तितकाच चपखल वापर

तो गोफ विणतो
हृदयातील नसांचा आर्त गीतामध्ये.

या ओळींच्या फार वरचा आहे.

मराठी भाषेत मूळ कवितेला नेताना भाषांतराऐवजी रूपांतर कदाचित जास्त रोचक ठरले असते.
इंग्रजी कविता वाचताना "आनंदाचे डोही आनंद तरंग" म्हणजे काय असते त्याची थोडी कल्पना आली :-)