वाटा हसत हसत, पत्ते पिसून बावन्न
येवो फलतू का पाने, होऊ नका कधी खिन्न
पाने येणे हे प्रारब्ध, खेळा यत्न कौशल्याने
जन्मा कोठेही कसेही, उंच व्हा कर्तृत्वाने
कुणी राजा कुणी राणी, कुणी जाहला गुलाम
हुकुमाच्या दुरीलाही, एक्का करीतो सलाम
सारे नाहीत बदाम, काही काळे किलवर
झाले चौकट हुजूर, आणि इस्पिक मजूर
खेळताना एका हाती, सारे एकत्र नांदती
चातुर्वर्ण्याची चौकट, किती सहज मोडिती
त्रेपन्नावा दूर राहे, शांत एकला जोकर
खेळ ब्रह्मांडाचा बघे, तटस्थ तो सूत्रधार
हात करूनिया सारे, डाव शेवटी जिंकिला
सारा जन्म हसण्यात आणि पिसण्यात गेला
भल्याभल्यांना जगती, जादू पत्त्यांची कळेना
आपुलाच रे अखेरी, त्यांना पत्ता सापडेना
--अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
28 Sep 2007 - 8:18 am | सहज
नेहमीच्या घडणार्या प्रसंगांना, क्रियेला सोप्या शब्दात वेगळ्या तत्वात रंगवले की छानच दिसते.
28 Sep 2007 - 8:26 am | जुना अभिजित
त्रेपन्नावा दूर राहे, शांत एकला जोकर
खेळ ब्रह्मांडाचा बघे, तटस्थ तो सूत्रधार
वाह..
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
28 Sep 2007 - 11:59 am | गुंडोपंत
वा! मस्तच आहे...
आवडली!
आपला
गुंडोपंत
28 Sep 2007 - 12:04 pm | नंदन
कविता आवडली. पत्त्यांचे रुपक छान आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
28 Sep 2007 - 12:15 pm | स्वाती दिनेश
कविता छान आहे,आवडली.
स्वाती
30 Sep 2007 - 12:50 pm | अशोक गोडबोले
सर्व वाचकांचा मी आभारी आहे.
3 Oct 2007 - 10:00 pm | चंद्रप्रभा
छान कविता
आवड्लि
दुर्रिला
सलाम
-चंद्रप्रभा