अर्जुनाने द्रौपदीला
स्वयंवरात जिंकिले
मात्र भावांनी फुकट
पत्नीसुख संभोगले
वस्त्रहरणप्रसंगी
षंढ पाचही दादुले
आणि भीष्म द्रोण थोर
पोरासारखे वागले
उच्च तात्विक कारणे
देती महा प्रज्ञावंत
पतिव्रतेच्या अब्रूला
कवडीमोलाची किंमत
बंधुप्रेमाच्या शेल्याने
शील रक्षिले अभंग
एक पान थाळीतले
भक्षी भुकेला श्रीरंग
कृष्णे कृष्णा ओवाळिले
भाऊबीज ती अपूर्व
वनवासातही लाभे
महाराणीचे वैभव
पण एक शल्य होते
भाऊरायाच्या अंतरी
कुरुक्षेत्री झळाळली
क्रोधवह्नीने वैखरी
क्लीब म्हणता अर्जुना
नाही जीभ कचरली
शहाण्याला शब्दाचीच
एक ठिणगी पुरली
अर्जुनालाच कळला
अर्थ शब्दांचा ज्वलंत
तारे तोडती विद्वान
शिवी देतो भगवंत!
--अशोक गोडबोले, पनवेल.
प्रतिक्रिया
28 Sep 2007 - 1:54 am | व्यंकट
अर्जुनालाच कळला
अर्थ शब्दांचा ज्वलंत
तारे तोडती विद्वान
शिवी देतो भगवंत!
वा वा
28 Sep 2007 - 2:33 am | गुंडोपंत
कविता आवडली.
"क्लीब म्हणता अर्जुना
नाही जीभ कचरली
शहाण्याला शब्दाचीच
एक ठिणगी पुरली "
क्लीब म्हणजे काय?
क्षमा करा पण शब्द माहीत नाही त्यामुळे कवितेचे अंतरंगच कळले नाही असे वाटते आहे मला... :(
आपला
गुंडोपंत
28 Sep 2007 - 2:42 am | प्रियाली
म्हणजे षंढ, हिजडा असे काहीसे असावे. श्रीकृष्णाने हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला त्याच्या पुरुषार्थाचा अपमान करण्याकरता तसे म्हटले असावे.
कविता आवडली.
28 Sep 2007 - 3:27 am | व्यंकट
क्लिब म्हणजे षंढ, हिजडा, छक्का, विर्यहीन, पुरुषार्थहीन वैगेरे.
28 Sep 2007 - 3:38 am | धनंजय
पहिल्या कडव्याचा या कवितेच्या संदर्भात अर्थ लागत नाही -
> अर्जुनाने द्रौपदीला
> स्वयंवरात जिंकिले
> मात्र भावांनी फुकट
> पत्नीसुख संभोगले
अर्जुनाचे क्लैब्य इथपासून सुरू झाले म्हणता? की पाचही भावांचे?
28 Sep 2007 - 6:55 am | सहज
असा काहीतरी काल अर्जूनाने व्यतीत केला होता ना म्हणे? मग सखोल अभ्यास, स्वानुभव असल्यावर क्लिब म्हणल्यावर ट्यूब लगेच पेटणार, एका ठीणगीत काम होणारच, नवल ते काय.
जर (बृहन्नडा) ही अज्ञातकालावधीतील बाब असेल, तर मला वाटते अर्जून त्याकाळी कूठल्यातरी नाटकमंड्ळीत स्त्री पार्ट करीत असावा (डेली ५ शोज म्हणून नेहमी त्याच वेशात) . अगदीच पूढारलेला समाज असेल तर बहूदा "ड्रॅग क्लब"मधे ही मात्र हॉबी असावी.
तुम्ही काही म्हणा भारतात "क्लिब" बघीतल्यावर (त्यांच्या एकंदर अवताराने) सामान्यांनाच (मला तरी) भीतीयुक्त किळस (बायकांना झूरळ/पाल पाहील्यावर होते तसे काहीसे) वाटते. याउलट परदेशात तर कधी कधी ओळखूपण येणार नाही "हे" "बाईमाणूस" आहे. CSI ह्या सिरीयल मधे तर बाईमाणूस ओळखू न आल्याने चिडून खून होतो असा एक एपीसोड होता.
बाईमाणूस - (श्लेश) ना धड बाई ना धड पुरूष - क्लीब
28 Sep 2007 - 8:29 am | जुना अभिजित
अर्जुनाला शाप होता की तुला काही काळ किन्नर रुपात घालवावा लागेल. तपशिल शोधतो आहे तरी जाणकारांना माहित असल्यास सांगून सोडावा.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
28 Sep 2007 - 7:06 am | प्रकाश घाटपांडे
तृतीय पंथी या प्रकारावर एका लेखिकेचे माहीतीपुर्ण पुस्तक आहे नाव आठ्वत नाही. पुर्वी जनानखान्यात अशा लोकांचा दरोगा म्हणून वापर होत असे. शारिरीक ताकद भरपूर पण पौरुषत्वाचा धोका नाही.
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2007 - 7:11 am | बेसनलाडू
पुर्वी जनानखान्यात अशा लोकांचा दरोगा म्हणून वापर होत असे. शारिरीक ताकद भरपूर पण पौरुषत्वाचा धोका नाही.
म्हणूनच हिंदी चित्रपटांमध्ये (आजही) बरेचदा 'दरोगा बाबू' असतात काय? ;)
कवितेची कल्पना आवडली; पण कविता बरीच 'रॉ' वाटली. आणखी सहज असती, तर अधिक आवडली असती. मला वाटते हे बर्यापैकी क्लिष्टशा शब्दरचनेमुळे झाले असावे. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत.
(वैयक्तिक)बेसनलाडू
28 Sep 2007 - 7:36 am | प्रियाली
समस्त दरोगांना तुम्ही भयंकर पेचात टाकलंत.
असो या तृतीयपंथी सेवकाला खोजा म्हणत. जनानखान्यातच नाही तर खुद्द राजाचीही सेवा ते करत. युद्धप्रसंगी बायकांना आपल्याबरोबर नेऊन अडचणीत येण्यापेक्षा खोजांना घेऊन जाणे योग्य ठरत असे. लैंगिक भूकही शमत असे आणि वेळ पडल्यास अंगरक्षकाची भूमिकाही.
राजकारणात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. गुपीते फोडणे, कपटकारस्थाने करणे इ. इ. साठी त्यांचा वापर होत असे.
28 Sep 2007 - 9:00 am | प्रकाश घाटपांडे
समस्त दरोगांना तुम्ही भयंकर पेचात टाकलंत.
य़ा अरबी सुरस व चमत्कारीक कथांमध्ये त्यांना 'खोजा 'म्हणतात हे वाचले होते. धन्यवाद. या वरुन घाशीराम आठवले. "अरे कोतवाली म्हणजे समस्त पुण्याची अवघी रखवाली"
प्रकाश घाटपांडे
28 Sep 2007 - 7:54 am | कोलबेर
चीनी राजे पण असे अनेक तृतीयपंथी बाळगून असत. 'फॉरबीडन सिटी' ह्या फक्त राज घराण्यासाठी बांधलेल्या गावात राजाच्या बायका आणि अंगवस्त्रांसोबत फक्त हिजड्यांना प्रवेश होता.
28 Sep 2007 - 8:32 am | विसोबा खेचर
तारे तोडती विद्वान
शिवी देतो भगवंत!
खरं आहे! म्हणून मी सुद्धा काही गोष्टी असह्य झाल्या की शिवी देऊन मोकळा होतो! :)
तात्या.
30 Sep 2007 - 12:51 pm | अशोक गोडबोले
सर्व वाचकांचा मी आभारी आहे.