ही नाती कोणती?

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 2:20 am

"ओ काकी, लवकर जेवायला वाढा, पुन्हा पळायचय." - माझं नेहमीच ओरडणं.
"अरे ह्या पोळ्या लाटण्यार्‍या बाया लवकर येतच नाहीत. मी तरी काय करु" काकीच ठरलेलं उत्तर.
"मला तुम्ही केलेल्या पोळ्याच आवडतात, अगदी मऊसुत असतात, ह्या बाया नुसत्या कळकट, जळालेल्या कडक पोळ्या करतात" - मी
"थांब, मीच तुला गरमागरम पोळ्या करुन देते बघ फटकन." काकी
"अहो कॉलेज फक्त अर्धा तासच सुटी देत जेवण्यासाठी, त्यात अर्धा किमी पळत यायचं, कसबसं गिळायचं आणी पुन्हा कॉलेजात जायचं, कसं करणार सांगा बरं?" - मी.
अगदी आईवर हक्क गाजवावा तसा आम्ही या आमच्या मेसवाल्या काकीवर गाजवायचो. तरी ही काकी आमच्यावर कधी रागावली नाही की चिडली नाही. काकी मेस चालवायच्या, तशी त्यांना आर्थिक अडचण अशी नव्हती. काका सरकारी ईंशुरंस कंपनी मधे डेवलपमेंट ऑफिसर होते. काका, काकी आणी काकांची आई एवढच काय ते कुटूंब. काकीला आणी आजीला आईसक्रीम जीवापाड प्रिय. दोघींची फ्रीजमधल्या उरलेल्या आईसक्रीमसाठी नेहमी जुंपायची.

काकींना मुलबाळ नव्हते. साधारण चाळीशीच वय, पाच फुट उंची, बारीक अंगकाठी, पण घरकामात अतिशय हुशार आणी चपळ. पहाटे पाच वाजता ह्यांचा दिवस सुरु होई. रात्रीची उरलेली कामे, सासुबाईचं आवरणं कारण त्या आजींना वयामुळे चालता येत नव्हते, एक दोन वेळा घरातच पडुन ऑपरेशन्सही झालेली. त्यामुळे सासुबाईंना पुर्णपणे संभाळण्याची कामगिरी काकींकडे होती, रात्री त्यांना बाथरुमला जायचे असले तरी काकींनाच उठावं लागे. २०-२५ लोकांचा दोन वेळचा स्वयंपाक, शिवणकाम, पापड बनवणे, केटरींगची ऑर्डर घेणे, ईतकी असंख्य कामे करुन ही काकी थकत कशी नाही याचं सर्वांनाच नवल वाटे. पहाटे पाचला सुरु झालेला दिवस रात्री बाराला संपे. तरी काकीच्या चेहर्‍यावर नेहमी प्रसन्न भाव आणी कायम आनंदी.

आम्हा सर्वांवर काकी-काका आणी आजी यांचा खुप जीव होता. सर्व दात पडलेले, क्षीण नजर झालेली आणी एकाच खुर्चीवर बसुन राहणारी पंचाहत्तर वर्षांची आजी सर्वांचे वाढदिवस बरोबर लक्षात ठेवायची आणी प्रत्येकाला वाढदिवसाच्या दिवशी आणी रिझल्ट्च्या दिवशी काहीतरी बक्षिस द्यायची. बर्‍याचदा रात्रीच्या जेवणानंतर आम्ही आजीला तिच्या आवडीची पुस्तके वाचुन दाखवत असु. मग आजी तिने लिहिलेल्या कविता आणी गाणे आठवेल तसं म्हणुन दाखवायची. एखाद्या दिवशी मी आलो नाही तर तिला हुरहुर लागायची, काळजी वाटायची. एकदा आजी न्हाणीघरात पडली, कंबरेचे हाड मोडले, बरेच दिवस हॉस्पिटलमधे होती. त्या अवस्थेत सुद्धा ती माझ्याबद्दल चौकशी करायची. मी सुद्धा आजीला न चुकता भेटायला जायचो. एकदा असाच तिला भेटायला गेलो तर म्हणाली, "तुला परिक्षेत चांगले मार्क मिळाले ना, पण काय करु रे यावेळी तुला बक्षिस द्यायला विसरलेच बघ. हॉस्पिटल मधुन सुटले कि नक्की बक्षिस देईन तुला." मला रडु आवरेनाच, हॉस्पिटलच्या बाहेर येऊन ओक्साबोक्शी रडुन घेतलं.

"आलं, जिरं, खोबरं आणी कोथिंबीर याशिवाय माझी भाजीच होत नाही बघ. आलं, जिरं पाचक आणी उत्साहवर्धक, खोबरं पौष्टीक आणी कोथिंबीर जीवनसत्व देते ना." -- काकी. गोड आंबट, गोड आंबट फोडणीचं गरमागरम वरण. काकी भातावर वरण वाढताना म्हणायची. एखादा पदार्थ मागितला तर दुसर्‍या दिवशी न चुकता ताटात तो पदार्थ हजर असे, तोसुद्धा घरी बनविलेला, मग गुलाबजाम क असेना. स्वच्छ भाज्या, चांगल्या प्रतीचा गहु आणी तांदुळ काकी स्वतः बाजारातुन घेउन यायची. "माझी मुलं आजारी पडली म्हणजे?" असं भाजीवाल्याला दमटावायची. काही मुलं-मुली होती मेसवर जी काकीच्या भोळेपणाचा फायदा घ्यायची. काकीकडुन ५०-१०० रुपये गरज म्हणुन घेउन जायची आणी काकी विसरते असं समजुन परत करायची नाही. जेवणाचे पैसे नेहमी कमी द्यायची. मला हा प्रकार माहित होता, मी एकदा काकीला म्हंटलं "काकी, तुमचा हिशोब चुकतो असं मला वाटतं".- मी
"अरे मी बी.कॉम आहे म्हंटलं, कशी चुकेन?" काकी हसत म्हणाली.
"म्हणजे तसं नाही...."- मी
"मला माहिती आहे तुला काय म्हणायचय ते, ती मुलं आहेत ना, मुलं लहान असताना अशीच वागतात, आता त्यांची आई इथे नाही ना, मग त्यांच्या ह्या चुका कोण पदरात घालणार?" मी निशब्द झालो आणी काकीकडे पहातच राहिलो. एकदा मी रात्री उशीराच जेयावला गेलो. काकी घरात एकटीच टीवी पहात बसली होती. काकीला आरामत बसलेलं पहिल्यांदाच पहात होतो. काकी म्हणाली "ये, उशीर केलास?"
मी हो म्हंट्ल आणी जेवायला बसलो, काकीन ताट वाढलं.
"बाकीची जेवुन गेले?"- मी विचारलं
"नाही रे, आज माझी तब्येत बरी नाही, त्यामुळं सुटी दिली" - काकी
"मग मला का बसवलत जेवायला?"- मी
"अरे या महिन्यात तुझ्याकडे पैसे कमी आहेत ना, कुठे बाहेर जाशील, आणी गेलास तरी पनास, शंभर रुपये झटक्यात घालवशील. ते पैसे संभाळुन ठेव. कामी येतील तुझ्या."

माझा कंठ दाटुन आला, अश्रु पाझरले, मग त्या ममतेच्या मऊसुत पोळ्यांचा अमृताचा घास मी तोंडी घेतला.
मी काकीला विचारलं "काकी मला नोकरी लागली मी काय आणु बरं तुमच्यासाठी?"
काकी म्हणाली "मला एक छोटा कप आईसक्रीम घेऊन ये, बास आणखी काही नको."

आजही मी त्या शहरात गेलो की काकीला भेटायला जातो. अर्थात आईसक्रीम घेऊनच्.
पण एक प्रश्न नेहमी माझ्या मनात घोळतो - "ही नाती कोणती?"

आपला मराठमोळा.

साहित्यिकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मीनल's picture

27 Jul 2010 - 2:39 am | मीनल

ही नाती जिव्हाळ्याची!
लेख छान आहे.

पारुबाई's picture

27 Jul 2010 - 3:16 am | पारुबाई

डोळ्यात पाणी उभे राहिले.

भाग्यवान आहात तुम्ही.

इंटरनेटस्नेही's picture

27 Jul 2010 - 3:16 am | इंटरनेटस्नेही

सुंदर! वास्तल्यमुर्ती काकु डोळ्यासमोर उभ्या राहिल्या...

अजबराव's picture

27 Jul 2010 - 5:29 am | अजबराव

हि नाति युगा युगान्चि......

सहज's picture

27 Jul 2010 - 6:08 am | सहज

सुरेख लेख.

शुचि's picture

27 Jul 2010 - 6:17 am | शुचि

व्यक्तीचित्रण आवडलं.

ममोसाहेब, तुम्ही भाग्यवान खरेच!
खास करून खाण्यापिण्याची आबाळ हा आया आणि आज्ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो.
असे लोक परगावात भेटले कि घरच्यांची एक काळजी कमी होते.

स्पंदना's picture

27 Jul 2010 - 7:33 am | स्पंदना

अशी नाती कोणत्याही प्रकारे परत फेड करु न्हंटल तरी ती परत फेड होत नाही...एकच करायच 'घेता घेता घेणार्‍याचे हात घ्यायचे' तोच वारसा जमेल तसा पुढे चालवायचा. अन हे करताना आपणही परत फेडीची अपेक्षा नाही ठेवायची.

सुन्दर लेखन.

पाषाणभेद's picture

27 Jul 2010 - 9:37 am | पाषाणभेद

काय गोष्ट आहे! खरंच मग ती नाती रक्ताची नसली तरी चालतात.

रेवती's picture

27 Jul 2010 - 5:45 pm | रेवती

अगदी अगदी!
छानच लिहिलस अपर्णा!

स्व's picture

27 Jul 2010 - 10:07 am | स्व

घराबाहेर घरासारखं खायला मिळणं आणि घरची माणसं मिळणं तसं विरळाच....
लेख जमलाय मस्त.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2010 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे

व्यक्तिचित्रण आवडले. आमच्या मेसच्या मावशी आठवल्या

माझ्या मेसवाल्या काकू पण अश्शाच छान आहेत. रोज रात्री मऊसूत गरम गरम पोळ्या...स्वतःहून वरण भातावर तूप वाढणार...आणि त्यांच्या मुलींबरोबर आम्हाला आग्रह करुन आम्हाला वाढतात...

काहीही नातंगोतं नसताना काकू इतका जीव लावतात....ही नाती जिव्हाळ्याची हेच खरं!!!

जागु's picture

27 Jul 2010 - 11:46 am | जागु

सुंदर.

स्वाती दिनेश's picture

27 Jul 2010 - 12:08 pm | स्वाती दिनेश

काकी आवडल्या,
छान लेख!
स्वाती

शाल्मली's picture

27 Jul 2010 - 10:52 pm | शाल्मली

काकी आवडल्या,
छान लेख!

असंच म्हणते..

--शाल्मली.

श्रावण मोडक's picture

27 Jul 2010 - 1:05 pm | श्रावण मोडक

नाती? नाती म्हटलं की आपल्याला बहुदा रक्तसंबंधच आठवतात. जग बदललं, रक्तसंबंधांच्या पलीकडं काही गोष्टी घडू लागल्या आणि त्यातून नातीच तयार होत गेली. त्या नात्यांना रक्तसंबंधांचा आधार लागत नाही. लागते ती फक्त जिव लावण्याची वृत्ती. ही नाती याच वृत्तीतून आलेली. पूर्वी बहुदा जीव लावण्याची वृत्ती रक्तसंबंधांतून येत असावी.
मी अनेकदा म्हणतो, माझ्या रक्तसंबंधांतील काही नातलगांपेक्षा मी असे संबंध नसलेल्या अनेकांशी अधिक रिलेट करतो. जालावरचेही काही त्यात आहेत. जालाबाहेरचे आहेत. या नात्यांचा आधार कोणता? जीव लावण्याची वृत्ती.
ममोही आता व्यक्तिचित्रं लिहू लागणार की काय? लिही, लिही. वाचायला मिळण्याशी मतलब माझा.

शानबा५१२'s picture

27 Jul 2010 - 1:19 pm | शानबा५१२

मस्त लेख.
तुमचा हेवा वाटतो.
मस्त लिहल आहे.
पण तुम्ही लिहल आहे ना की होस्पिटलच्याबाहेर जाउन रडलात तेव्हा मला थ्री इडीयट मधील अमीर खान कसा भिंतीमागे जाउन रडतो ते आठवल व हसायला आल.

क्रान्ति's picture

27 Jul 2010 - 5:04 pm | क्रान्ति

असतात आपुलकीची, जिव्हाळ्याची जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही कितीतरी घट्ट विणीची असतात. माझ्या लेकीलाही अशाच मेसवाल्या काकू भेटल्या होत्या ज्या तिच्या आजारपणात तिला नुसताच डबा नेऊन द्यायच्या नाही, तर समोर बसून जेवायला लावायच्या आग्रहानं. मेसमधल्या १५-२० मुलींपैकी प्रत्येकीचे वाढदिवस लक्षात ठेवून त्या दिवशी तिचा आवडीचा बेत करायच्या आणि छोटंसं गिफ्टही द्यायच्या. हा लेख वाचून त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jul 2010 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या शेजारची सुलीकाकू आठवली. म्हणायला शेजारची काकू, पण आता खरंतर आई, मैत्रीण सगळंच आहे ती माझ्यासाठी!! माय मरो अन मावशी जगो हे तिच्याकडे बघून अगदी पटतं.

प्रभो's picture

27 Jul 2010 - 7:36 pm | प्रभो

ममो मस्त लेख.

आमच्या पुण्यातल्या स्वयंपाकाच्या मावशीची आठवण झाली..त्यांना सगळे पूनमच्या आई म्हणायचे. २ वेळच्या जेवणाबद्दल बोलणी असूनसुद्धा सकाळी सकाळी येऊन मित्र ऑफिसला जाण्याआधी त्याला गरम गरम डबा बनवून देणार...मला नाश्ता बनवून देणार...मग परत दुपारी येऊन गरम गरम वाढून जाणार..संध्याकाळी परत मस्त जेवण बनवून जाणार. आमच्या (बॅचलर) घरात कोणतातरी जिन्नस नसेल तर दुसर्‍या घरी काम करायच्या, तिथून हक्काने घेऊन येऊन आम्हाला करून खाऊ घालायच्या. सणाच्या दिवशी सुटी घ्यायच्या पण सकाळ संध्याकाळ २ वेळचा साग्रसंगीत डबा त्यांच्या मुलीच्या हाती पाठवायच्या.

एका जैन कुटुंबात आमची खानावळ होती.
साधे शेणाने सारवलेले घर. बाहेर मोकळे अंगण. जरा आडोसा म्हणून मातीचीच भिंत. तिथेच आम्ही बसायचो. १५ एक जण असावेत मेम्बर्स.काकूंचा स्वयंपाक फर्मास असायचा. पोळ्या करायचा स्पीड जाम होता.अगदी खाण्याच्या वयातले इतके मेंबर्स असूनही दोन दोन तवे लावून सटासट गरमागरम पोळ्या येत असत. त्यांचा नवरा आणि मुलगा मुलगी वाढायचे काम करीत.
कधी दोन दिवस वगैरे येणं झालं नाहीतर न विसरता चौकशी करीत. रविवारी सुट्टी असली तरी परीक्षेच्या काळात येऊन डबा घेऊन जायला सांगत.
कुठे कुठे आपलं नाव लिहिलेलं असतं ह्याचा लेखाजोखा घेतला तर अचंबा वाटावा अशी स्थिती! संबंध बनत जातात आणि आपल्या कायम आठवणींचा एक भाग बनून जातात.

ममो तुमच्या मनस्वी लिखाणामुळे ह्या आठवणी जागवल्या. धन्यवाद! :)