पुन्हा एकदा भ्रमणगाथा-३

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
4 Jul 2010 - 9:16 pm

ह्याआधी-
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-२

नॉर्डलिंगनला आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस आणि वार्‍याचा जोर इतका वाढला आणि त्याच बरोबर हवेतला गारवाही! त्यामुळे आधी गरमागरम कॉफी प्यायलो. आम्ही ज्या गेस्टहाउसमध्ये उतरलो होतो ते रेल्वेस्टेशनाच्या अगदी १०० पावलांवरच होते, तरीही अजिबात गजबजाट नव्हता. आपल्या कोकणरेल्वेच्या लाईनीवरची लहानलहान स्टेशने कशी असतात? तसेच हे रेलस्टेशन होते.किंबहुना मार्सेलाने आम्हाला तेथे सोडताना स्टेशन दाखवले म्हणूनच तेथे रेल्वेस्टेशन आहे हे समजले. अशा ह्या निर्जन वाटणार्‍या गावात जेवणासाठी टेबलबुकिंगची गरज आम्हाला वाटली नसली तरी तिथल्या म्यानेजरणीला वाटली. तेवढी तरी गिर्‍हाइके नक्की करत असेल असे वाटून आणि एवढ्याशा गावात अजून काही हाटेल असेल का? अशी शंका येऊन आम्ही रात्रीच्या जेवणासाठी तेथेच टेबलही बुक केले. बायरिश खासियत "केझं स्पेट्झलं " तेथे मिळते ना एवढी खात्री मात्र करून घेतली. तिने दिलेल्या खोल्यात आमची सामानाची बोचकी टाकून फ्रेश होऊन गावात एखादी चक्कर मारावी असे ठरवत होतो पण पाऊस आणि वारा काही थांबायचे नाव घेत नव्हते.

शेवटी रोममध्ये रोमनासारखे वागावे ह्या धर्तीवर आम्ही बव्हेरियात बायरीशांसारखे वागायचे ठरवून खाली असलेल्या दालनात जेवण्यासाठी गेलो. तासादोनतासापूर्वी सामसूम असलेले ते रेस्तराँ आता माणसांनी फुलून गेले होते. एका टेबलावर काही टुणटुणीत आजोबा बियरचे मास घेऊन पत्त्यांचा डाव टाकत बसले होते. कुठल्या टेबलावर युगुलांचे गुटरगू चालले होते तर काही जण सहकुटुंब जेवायला आलेले होते. ते अवघे १०/१२ टेबलांचे दालन एकदम गजबजून गेले होते. आमच्या साठी आरक्षित टेबल होते म्हणून बरे नाहीतर परत खोलीत जाऊन काही वेळाने परत यायला लागले असते. रक्तवारुणी, बायरिश बियरच्या साक्षीने येथली खासियत केझं स्पेट्झलं,सलाड, चीजबरोबर बेक केलेल्या भाज्या आणि त्याबरोबर जर्मन जेवणात हवेतच असे बटाटे! असा बेत होता. भरपूर हादडल्यावर मात्र शतपावली नव्हे तर सहस्त्रपावलीची गरज भासू लागली. एव्हाना पाऊस थांबला होता आणि आठ वाजून गेले असले तरी उजेडही भरपूर होता म्हणून मग एक फेरफटका मारायला बाहेर पडलो.

१४व्या शतकात बांधलेल्या भरभक्कम दगडी भिंतीची वेस अजूनही ह्या गावाला आहे आणि त्या भिंतीच्या टेहळणी बुरुजांवरुन चालत गावाला प्रदक्षिणाही घालता येते.ह्या बुरुजांवर आणि गावातही जाण्यासाठी चार ते पाच मुख्य बुलंद दरवाजे आहेत. आता जरी लाकडी दरवाजे काढले असले तरी दगडी कमानी मात्र तशाच ठेवलेल्या आहेत. आमच्या हॉटेलापासून अगदी दोनच मिनिटाच्या अंतरावर डाइनिंगर टोअर म्हणजे डाइनिंगर दरवाजा होता. तेथे गेलो तर मोठ्ठा लाकडी जिना दिसला. चढून वर गेलो तर बुरुजावरच पोहोचलो की. त्या भक्कम ,दगडी बांधकामावरुन खालचे गाव पाहत चालत होतो. सूर्यास्ताची वेळ होतच आली होती. तो नेमका क्षण कॅमेर्‍यात पकडण्याचा प्रयत्न केला आणि मग मात्र त्या अंधार्‍या वेशीवरुन न चालता लॉपसिंगर दरवाज्याशी खाली उतरलो आणि मग रस्त्यावरुन फेरफटका मारत हाटेलावर परतलो तेव्हा १० वाजून गेले होते. खोलीवर आल्यावर परत एकदा गप्पांचा फड रंगला.

आज जी डोनाव रिस मधील नॉर्डलिंगन आणि आसपासची गावे आहेत त्या भागात सुमारे १.५ कोटी वर्षांपूर्वी साधारण एक किमी व्यासाचा अशनी ७०,००० किमी /तास वेगाने येऊन आदळला आणि तेथे उत्पात झाला. २.५ लाख हिरोशिमा बाँब एकत्र पडल्यावर होईल तसा विध्वंस तेथे झाला आणि १२ किमी व्यासाचा,एखादे मोठे सरोवर होईल एवढा मोठा खड्डा तेथे पडला. त्यावेळी निर्माण झालेल्या प्रचंड उर्जेने तेथल्या दगडधोंड्यांच्या ठिकर्‍या ठिकर्‍या तर झाल्याच पण कितीतरी मण दगडधोंडे वितळले आणि तो रस परत त्या खड्ड्यात भरला गेला आणि ते दगडांचे लहानसान तुकडेही परत त्या खड्ड्यात जाऊन बसले. खड्ड्याचा व्यास आता २५ किमी पर्यंत वाढला होता. त्या प्रचंड दाबाने ते वितळलेले, चुरा झालेले ,तुकडे ठिकर्‍या झालेले दगड एकमेकांवर घट्ट बसले आणि सुवेत नावाचा दगडाचा नवाच प्रकार तयार झाला. ह्या उत्पाताने आजूबाजूच्या साधारण १०० किमी च्या परिसरातली परिसंस्था नष्ट झाली आणि त्या खड्डयामध्ये एक सरोवर तयार झाले. काठाला वनस्पती उगवल्या,पाण्याजवळ प्राणीही आले.साधारण २ कोटी वर्षांमध्ये गाळ,चिकणमाती,वाळू इ.ने ते तळे भरुन आले अन्यथा युरोपातल्या मोठ्या सरोवरांपैकी ते एक झाले असते. हळूहळू तेथे झाडे वाढली, प्राणीजीवन सुरू झाले आणि जीवसृष्टीच्या सॄजनाची सुरूवात झाली.

हा सारा इतिहास तेथल्या बाल्डींगर दरवाज्याजवळ असलेल्या रिसक्रेटर म्युझियममध्ये जपून ठेवलेला आहे. तो पहायला अर्थातच आम्ही तेथे गेलो. इंग्रजी आणि जर्मन अशा दोन्ही भाषांत आलटून पालटून ह्या अशनीपाताची चित्रफित दाखवतात. तेथील संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे खडक,वेगवेगळ्या दाब आणि तपमानामुळे कसे तयार झाले हे सचित्र समजावले आहे आणि त्या, त्या प्रकारच्या खडकांचे नमुनेही ठेवले आहेत.त्या उत्त्पातात नष्ट झालेल्या प्राणीजीवनाचे पुरावे फॉसिल्सच्या रुपात तेथल्या म्युझियममध्ये जतन करुन ठेवले आहेत. प्रो. ए. एम. शूमाकर आणि डॉ. इ. सी. टी. चॉव यांच्या अथक संशोधनातून रिसचा हा भूभाग अशनीपातातून तयार झालेला आहे हे सिध्द झाले. त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ त्यांचे नाव ह्या चौकाला दिलेले दिसले.हे गाव म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञांना अभ्यासाच्या दृष्टीने अगदी खजिनाच असावा असे वाटले.

येथले अजून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे १९७० मध्ये नासाच्या अपोलो १४ आणि १७ मधील अंतराळवीर येथे फिल्ड ट्रेनिंग आणि चंद्रावरील जिऑलॉजिकल अभ्यासासाठीच्या पूर्वतयारीसाठी आले होते. त्यांनी येथल्या म्युझियमला औचित्यपूर्ण अशी भेट म्हणून 'चंद्रावरचा दगड' दिला आहे. तो पाहण्याची अर्थातच आम्हाला उत्सुकता होतीच! आमचे येथे येण्यामागचे ते ही एक महत्त्वाचे कारण होते.डोळे भरुन किती वेळ ते अद्भुत पाहत होतो पण शेवटी वेळेची मर्यादा होतीच ना.. नाइलाजाने त्या एरवी चित्रातच दिसणार्‍या,परिकथेत शोभणार्‍या गावातून घराकडे यायला निघालो.

अदितीला भारतात जाणार्‍या विमानात बसवून भ्रमणमंडळ काही काळ विश्रांती अवस्थेत गेलेले असले तरी पुढच्या ब्याचची नोंदणी चालू केलेली आहे,तेव्हा त्वरित संपर्क साधा.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

4 Jul 2010 - 9:27 pm | श्रावण मोडक

अदितीला भारतात जाणार्‍या विमानात बसवून भ्रमणमंडळ काही काळ विश्रांती अवस्थेत गेलेले असले तरी पुढच्या ब्याचची नोंदणी चालू केलेली आहे,तेव्हा त्वरित संपर्क साधा.

देशपांडे, झालं का बुकिंग?
लेखमाला अर्थातच 'स्वादि'ष्ट!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jul 2010 - 9:27 pm | बिपिन कार्यकर्ते

दिसले ब्वॉ एकदाचे 'धोंडोपंत चांदोरकर' ;)

अवांतर: नवीन नोंदणी चालू केली, जुन्या नोंदण्यांचं काय?

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

4 Jul 2010 - 9:29 pm | रेवती

स्वातीताई, तू हा भागही ग्रेट लिहिला आहेस.
फोटू छान आलेतच पण त्या सगळ्याची माहितीही चांगली दिली आहेस.
' भ्रमणमंडळाच्या ब्याचची नोंदणी' ही कल्पना मजेशीर.

रेवती

टारझन's picture

4 Jul 2010 - 9:39 pm | टारझन

हा हा हा ! भ्रमण मंडळ एकदम जोर्‍यात आहे :)
लौकरंच येतोय तिकडे !! केस फार वाढलेत , जर्मनीत माझा खास हेयरकट डिझायणर आहे एक. तिकडे आलो की णक्की भेटुयात ;)

-(आक्रमणमंडळ ,मिपा) टारझन

ऋषिकेश's picture

4 Jul 2010 - 10:16 pm | ऋषिकेश

हा भाग जरा छोटा वाटला.. मात्र नेहमीप्रामाणे मस्त रंगला आहे.

अदिती,
क्यामेरा गळ्यात अडकवून फुल्टू अमेरिकानु झलेली दिसतेयस ;) (बाकी स्वतः काहि बघितलंस का आम्रिकन इष्टाईलने आधी फक्त भराभर (अधाशासारखे) फोटो काढलेस नी आता घरी जाऊन आरामात फोटो बघत बसली आहेस ;) )

बाकी चंद्रावरचा दगड इथे बराच गुटगुटीत आहे.. तिथे आम्रिकेतल्या वॉशिंग्टन डीसीला ठेवला आहे तो छोटासा चपटा दगड अगदी भारतातल्या "कडप्पा" सारखा दिसतो.

येऊ देत पुढ्चा भाग.
(भ्रमणमंडळात आजीव नोंदणी करता येते काय?)

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jul 2010 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे तो कॅमेरा खरा नाहीये, तो उगाचच पट्टा अडकवला आहे गळ्यात ... दाखवायला! फोटो तर दिनेश दादानेच काढले आहेत, मी उगाच 'शाईन' मारत होते. ;-)
स्वातीताई, पुन्हा एकदा मनाने फिरून आले मी नॉर्डलिंगनला!

लोक्स आणि देशपांडे, फार मज्जा आली फ्रान्कफुर्टला! एयर इंडीयाचे अनेकोत्तम आभार. सर्कारी कामासाठी जायचं असेल आणि सर्कारी खजिन्यातून त्यासाठी फंडींग हवं असेल तर एयर इंडीयानेच जावं लागतं. त्यामुळे आसेन, नेदरलंड्सला जायचं असूनही मला फ्रान्कफुर्टचंच विमानच पकडावं लागलं. बिपिन "देशपांडे" कार्यकर्ते आणि रा.को. डान्रावांनी लगेचच, तत्परतेने "स्वातीताईशी बोल" असा सल्ला दिला.

मीपण विचार केला नाहीतरी फ्रान्कफुर्टला विमानतळाबाहेर येऊन ट्रेन पकडायची आहे तर स्वातीताईला विचारू या भारतातून काही सामान मागवायचं असेल तर! पण हे एवढ्यावरच संपणार नव्हतं. स्वातीताईने दमातच घेतलं आणि फ्राफुला चार दिवस का होईना रहावंच लागेल असा प्रेमळ ओरडा दिला (शिक्षकांच्या शिकवायच्या आणि ओरडायच्या सवयी जन्मभर जात नाहीत म्हणतात ते असं! ;-) ).

आसेन, जिथे आमची कॉन्फरन्स होती, तिथून दोन कलीग्ज आणि मी, रेल्वेने एकत्रच फ्राफुला आलो. प्रवासात त्या दोघांना समजलं, या माझ्या मैत्रिणीला मी अजूनपर्यंत भेटलेलेही नाही. आता मात्र त्यांनाच झीट येणं बाकी होतं. ते लोकं अमराठी असल्याने त्यांना मिपा दाखवण्यात अर्थ नाहीच, पण त्यांना थोडक्यात मिपाबद्दल सांगितलं. त्यांना फार काळजी, "आता तुम्ही दोघी एकमेकांना ओळखणार कशा? खूप गर्दी असेल तर?" पण "एकवेळ मुंबई विमानतळाबाहेर मला माझ्या भावाला शोधणं कठीण जाईल, पण फ्रान्कफुर्टच्या मुख्य रेल्वे स्टेशनात दोन भारतीयांना एकमेकांना शोधणं फारसं त्रासदायक असणार नाही" हे वाक्य ट्रेनमधून उतरल्यावर अक्षरशः अर्ध्या मिनीटात खरं ठरलं.

कळवल्याप्रमाणे स्वातीताई आमची गाडी आली त्या फलाटावर आमची वाट पहात बसली होतीच आणि आम्ही तेव्हा ज्या भेटलो ते म्हणजे, "कित्ती दिवसांनी भेटतोय गं आपण!" असंच झालं. मी अगदी फ्राफुला सिक्युरिटी चेकसाठी आत जाईपर्यंत आमची अखंड बडबड सुरू होती. अर्थात, दिनेश दादालाही नाही म्हटलं तरी आम्ही थोडा वेळ दिला बोलायला!! ;-)

आपण सगळेच एक भाषा बोलतो, एकाच देशातले आहोत, आपली संस्कृती एकच आहे; किती गोष्टी आपल्यांत सारख्याच, आपण एकमेकांमधे सहजच मिसळून जाऊ शकतो. पण स्वातीताईच्या त्सेंटा आजी आणि अकिम आजोबांना भेटले, त्यांची भाषा मला बोलता येत नाहीच, आणि अगदी थोडी थोडी कळत होती. पण आजीआजोबांचं स्वातीताई-दिनेशदादावरचं प्रेम दिसायला भाषेचा अडसर कसा येईल? "ही स्वातीची मैत्रिण म्हणजे आपलीही कोणीतरी जवळचीच!" अशा पद्धतीने आजी-आजोबांनी माझ्यासाठी खास रक्तवारूणी, ऑलिव्ह्ज, आजीच्या हातचा केक असं काय काय टेबलावर मांडलं, कसं काय म्हणावं की ही माणसंही आपली नाहीत?

अजून माझा हाच शेंगन व्हीजा व्हॅलीड आहे, आणि या सर्कारी नोकरीचे काही महिनेही अजून शिल्लक आहेत. पुन्हा युरोपात यायची वेळ आली की मला एयर इंडीयाचं मुंबई-फ्रान्कफुर्ट हेच विमान आठवेल आणि या वेळेला स्वातीताईला इमेल जाईल, "तुला आणि त्सेंटा आजीला काय काय हवंय त्याची यादी पाठव. चार दिवस सुट्टी टाकून फ्रान्कफुर्टला राहून जाईन."

अदिती

ऋषिकेश's picture

5 Jul 2010 - 10:46 am | ऋषिकेश

आम्ही जळून त्या चंद्रावरच्या दगडापेक्षा काळे ठिक्कर पडलो आहोत. ;)
हा उत्स्फूर्त प्रतिसादही खूप आवडला..

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

नंदन's picture

6 Jul 2010 - 9:43 am | नंदन

सहमत आहे :). लेख आणि प्रतिसाद - दोन्ही उत्तम!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

6 Jul 2010 - 6:31 pm | चित्रा

असेच म्हणते.

स्पंदना's picture

5 Jul 2010 - 6:43 am | स्पंदना

परत एकदा मेजवाणी. अन या वेळची तर एकदम खास!!
बिपीन दांचा रिस्पॉन्स कळायला नाही म्हंटल तरी पुरा एक सेकंद लागला. पण मग जाम आवडला.
तर त्या धोंडोपंतांच दर्शन फक्त तुमच्या मुळे घडल बर!! त्या बद्दल धन्यवाद!!

सुनील's picture

5 Jul 2010 - 7:31 am | सुनील

हाही लेख वाचनीय.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

5 Jul 2010 - 7:35 am | सहज

असेच म्हणतो.

हा हा "धोंडोपंत चांदोरकर" बिकाजी, क्या बात है!

भोचक's picture

5 Jul 2010 - 12:40 pm | भोचक

हाही मस्त लेख. आदितीबैंची सफर मस्तच झाली म्हणायची.

(भोचक)
जाणे अज मी अजर

jaypal's picture

5 Jul 2010 - 6:29 pm | jaypal

तीन ही भाग आवडले. आगदी चित्र उभ केलस डोळ्यासमोर.....धन्यवाद =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

चित्तरंजन भट's picture

5 Jul 2010 - 7:48 pm | चित्तरंजन भट

महमीप्रमाणेच चित्रांसकट मस्त. त्या अशनीपातापेक्षा टुणटुणीत आजोबांच्या बिअरच्या मासाबद्दल अधिक जाणून घ्यावेसे वाटते आहे.

समंजस's picture

6 Jul 2010 - 11:21 am | समंजस

छान सफर घडवून आणलीत जर्मनीच्या आतील भागांची :)

प्रभो's picture

6 Jul 2010 - 6:17 pm | प्रभो

मस्त!!!

विसोबा खेचर's picture

6 Jul 2010 - 9:28 pm | विसोबा खेचर

छानच! :)

स्वाती दिनेश's picture

8 Jul 2010 - 5:56 pm | स्वाती दिनेश

सर्वांना मनापासून धन्यवाद!
स्वाती

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2010 - 6:16 am | मिसळभोक्ता

तिन्ही भाग खूपच छान झालेले आहेत.

या वर्षीची आमची जर्मनी ट्रिप काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

कळवू.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

स्वाती दिनेश's picture

9 Jul 2010 - 1:53 pm | स्वाती दिनेश

तुम्ही ऑक्टोबर फेस्ट साठी जर्मनीला येणार आहात ना?
ह्या वर्षी नाही जमले तर पुढच्या वर्षी...
कळवलेत की व्यवस्था करु,:)
स्वाती

केशवसुमार's picture

9 Jul 2010 - 7:44 pm | केशवसुमार

हा माणूस ऐन वेळी टांग देतो.. असा आमचा अनुभव आहे..
सर्व ठरवेल.. तुम्ही प्रवास करून म्युनिक ला जाल आणि हा बाबा परस्पर काही तरी बदल करेल(मुद्दामुन नाही).. पण कळवणार पण नाही.. आणि तुम्ही त्याने सांगितलेल्या ठीकाणावर मुर्खागत तसभर उभे रहाल.. स्वानुभव आहे राणिच्या देशातला.. म्हणून म्हटले सावधान..
(अनुभवी)केशवसुमार
बाकी तो दगड मी येईपर्यंत जपून ठेवा.. ;)

मिसळभोक्ता's picture

9 Jul 2010 - 10:13 pm | मिसळभोक्ता

अरे तुला तेव्हाच भरभरून स्वारी म्हटले होते, केशा.

(आणि टांग नाही रे दिली, माझाच पोपट झाला होता तेव्हा. बायको-पोरांना एकटेच लंडन भटकायला लावून मला कुठे तरी पाट्या टाकाव्या लागल्या होत्या. नंतर माझे काय हाले झाले असतील, विचार कर.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

गुंडोपंत's picture

9 Jul 2010 - 7:18 pm | गुंडोपंत

रक्तवारुणी, बायरिश बियरच्या साक्षीने येथली खासियत केझं स्पेट्झलं,सलाड, चीजबरोबर बेक केलेल्या भाज्या आणि त्याबरोबर जर्मन जेवणात हवेतच असे बटाटे!
वा काय मज्जा केलीत तुम्ही लोकांनी! धमाल धमाल म्हणतात ती हीच!

१४व्या शतकात बांधलेल्या भरभक्कम दगडी भिंतीची वेस

हे किती छान आहे. युरोपातल्या लोकांचे ऐतिहासिक जपणुकीसाठी कौतुक केले पाहिजे.

हा ही लेख फारच छान उअतरला आहे. आदितीचा प्रतिसादही बोलका आहे!
तुमचे माणसे जोडण्याचे कौतुक मात्र मला आहेच! :)

माझी नोंदणी करून काही उपयोग नाही मला कधी जमेलसे वाटत नाही. त्यामुळे यावरच माझी तहान भागवतो! अजून लिहित राहा आम्ही वाचत राहूच...

युरोपातल्या या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, नाशकातले सुंदर चेहरे असलेले वाडे पाडून, तेथे चैकोनी चेहेर्‍याच्या बेढब इमारती झाल्यानंतर मला भलत्याच शहरात आल्या सारखे वाटते.
मी जुन्या नाशकात जातच नाही हल्ली!

आपला
गुंडोपंत