कालच्या बातम्यांमधे सर्व वाहिन्यांवर भोपाळ दुर्घटनेवर माहिती ऐकली.. राजदीपला प्रत्यक्ष फील्डवर खुप कमी वेळा बघितला होता.. एकएक कहाणी बघुन मन सुन्न झालं.. खुप वेळ तळमळ चालली होती.... मानवी मनाचा काहीतरी गुण असावा खास.... सगळ्या जगातल्या पापापुण्यांचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर एकदा फोडले कि मग आपण आपापले गटारजिणे जगायला मो़कळे.. बर ते खापर फोडायला प्रत्येकवेळेला कुणिनाकुणी सापडतोच आपल्याला....अॅन्डरसन वा राजीव गांधी वा ईतर कुणिही.... सकाळी जाग आल्यावर (अस नुसते म्हणायचे, खरी जाग येतच नाही.. एका झोपेतुन दुसर्या झोपेत....सारखा भ्रमप्रवास चालू) पण भोपाळ मनातुन जाईना..... तेवढ्यात प्रणव मुखर्जी चे स्टेटमेंट ऐकलं.."त्यवेळेला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणुन, लोकक्षोभाचा विचार करुन आम्ही अॅन्डरसनला जाउ दिले"......म्हणजे पुन्हा खापर माझ्याच डोक्यावर.. पण त्यावेळेला कारखाना उभारताना काही तपासण्या झाल्या नसतील का?.... का त्यावर कुणी पर्यावरण खात्याच्या कारकुनाने पाचपन्नास रुपये घेउनच सही केली असेल.... मी काल ७/१२ घेताना दिली तीच असेल का ती नोट.... ईतकी रक्ताळलेली असुनही कशी चालली कुणास ठाउक...... मर्ढेकर हातात धरले कि नेहेमीच असं का होते.... सगळे प्रश्न शेवटी बुमरँगसारखे मलाच शोधत का येतात....
सत्तेचेच तुप | सत्तेचीच पोळी |
मानव्याची होळी | भाजाया ती ||
देवा ऐशी भूक | कासया दिलीस? |
झालो कासवीस | मीही नंगा ||
नंग्याचाच आता | येथे कारभार |
कोंडी आरपार | फोडा या ही ||
टिर्या अर्धपोट | जोवरी आहेत |
ओंगळ समस्त | आम्ही नंगे ||
- मर्ढेकर.
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 10:44 pm | राजेश घासकडवी
पैशाला काळे, लबाडी करणारे हात लागले असतील ही कल्पना करता येते, पण रक्त लागलेलं असेल हे डोक्यात येत नाही.
मला वाटतं भोपाळसारख्या दुर्घटनेत नंगेपणापेक्षा आंधळेपणा हे रूपक जास्त लागू पडेल. सर्वांनाच हे प्रश्न दृष्टीआड सृष्टी झालेले हवे असतात. नोटांच्या इतिहासाकडे आपण डोळेझाक करतो. दृष्टीहीनांकडे आंधळी न्यायदेवता दुर्लक्ष करते....
14 Jun 2010 - 10:50 pm | शिल्पा ब
+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 Jun 2010 - 10:11 am | Pain
पैशाला काळे, लबाडी करणारे हात लागले असतील ही कल्पना करता येते, पण रक्त लागलेलं असेल हे डोक्यात येत नाही.
तुमची मर्यादा.
मला वाटतं भोपाळसारख्या दुर्घटनेत नंगेपणापेक्षा आंधळेपणा हे रूपक जास्त लागू पडेल. सर्वांनाच हे प्रश्न दृष्टीआड सृष्टी झालेले हवे असतात.
सर्वांना नव्हे, काही जणांना. बर्याच लोकांना माहिती नसते आणि आपल्यासारख्या चांगल्या लोकांकडे गुन्हेगारांना शिक्षा देण्याची ताकद नसते.
नोटांच्या इतिहासाकडे आपण डोळेझाक करतो.
शब्दांप्रमाणे आता नोटांची रीझर्व बँकेपासून कोणाकोणाकडे आल्या त्याची व्युत्पत्ती शोधायची का ? आणि कशी ?
दृष्टीहीनांकडे आंधळी न्यायदेवता दुर्लक्ष करते....
न्यायालयात न्याय मिळत नाही, जे मिळत त्याला न्याय म्हणतात. तिथे सत्य नाही, चांगला वकील, खरेदी केलेले साक्षीदार, पैसे, राजकारणी जिंकतात. जिथे खर्या देवांनाच आपले काही पडलेले नाही तिथे या मानलेल्या देवता काय उखाडणार ?