मी पयल्यांदा हातात नांगर धरला; तवा माझा बां मला म्हणला व्हता,
"तुज्या आयला जर तू वरबाडलास; तर ती गप बसलं का?"
"आर ही बी धरणी माय हाय.
धर ह्यो गुळाचा खडा, अन आम्बलिची धार; वाहा तिला. म्हन , आधीच उन्हान तरपासलेल्या
तुला; मी नांगरटीन उलथवतोया !
धरणी माते , माझ्या हाताला यश दे!
माग! माग! तिचा आशीर्वाद माग बाबा!
तुम्हा शिकलेल्या लोकानला; मी अंधश्रद्धाळू वाटन .
पण आजपत्तर, माझी कारभारीण; वडाला फेरया मारते.
सांज सकाळ, तुळशीला पाणी घालते.
वड, पिप्पळ, चीच्च ला दहा पिढ्यांनी ; आसच पाहयल.....
म्हणून त्यास्नी वडील धार मानते.
तुमच्या शेरात, लोक पिकनिकला जात्याती.
पर आम्ही भू पूजेला जातो बघा.
जेवाण घेवून, शेतात जावून;
पयला पाच दगड मांडतो.
त्यांना हळद कुक्कु लावून , आणलेला
घास घास; तेंच्या म्होर ठेवतो.
रानची पाखर, किडा मुंगीच आम्हा देवा प्रमाण वाटते.
एकदा पाडाला आलेला आंबा उतरताना
माझा बा मला म्हणला,
"ग्वाड लागल म्हणून मुळासकट न्हाय खायचं गड्या!
झाडावर थोडा शेर पाखरांचा बी हाय!
तेंच्या धरन चार फळ राखून झाड उतरीव.
आर तुझ्या साटन त्यो मेवा हाय; पर पाखरांचा त्यो घास हाय".
आमी नदीला गंगा मानतो.
कधी कोंबड, बकर कापायच झाल तर
उदबत्ती लावतो.
सणा सुदीचा घास माझी खिल्लार बी खात्याती;
आन रानातल; परड्यातल सार देव; माझ्या हर एक नवसाला पावत्याती.
शान्या सुरत्या पर अश्रद्ध माणसांनो
माझ्या अंधश्रद्धाळू नजरेन ,
तुमच कधीच रोग निदान केलया .
'अति' शिकून तुम्हाला 'भस्म्या' झालाया.
अपर्णा
तळटिपः-
{सेव्ह गाया! सेव्ह गाया!! म्हणून शंभर एक लोक स्टेज वर नाचली! त्यांना पाहायला पाच हजार जमली! या साऱ्यांनी मिळून प्रत्येकी दहा दिवसात करणार नाही; एव्हढा कचरा, घाण एका रात्रीत केली!! वर आणि ध्वनी प्रदूषण झाल ते वेगळंच !!! कुठलीही चळवळ म्हंटल की आज काल नाच गाण्यान सुरुवात होते. अन त्या नाच गाण्याच्या धुंदी बरोबर चळवळ ही उतरून जाते.
हल्ली दर महिन्याला निदान चार तास उर्जा वाचविण्यासाठी माझ्या इथली मंडळी बागेत जाउन बसतात . आणि उर्जा वाचवायची म्हणुन कॅंडल्स जाळतात???
अश्यावेळी मला नवल वाटत आपण आपल्या संस्कृतीत का नाही डोकावत ? एव्हढी पुरातन अन संस्कारांनी समृद्ध आपली संस्कृती आपल्याला या बाबतीत काही सांगते का? आपल्या संस्कृतीची सर्वात मोठी देणगी म्हणजे निसर्गाचा आदर. निसर्गावरील श्रद्धा. आज आपण या प्रदूषणाच्या कड्यावर येऊन पोहोचायचं मुख्य कारण म्हणजे आपली निसर्गावरील अश्रद्धा.
जशी अंधश्रद्धा वाईट तशीच ही अश्रद्धा सुद्धा घातकच. किंबहूना मी तर म्हणेन अंधश्रद्धा एका व्यक्तीला वां एका समाजाला ग्रासते तर अश्रद्धा पुऱ्या जगाला विनाशाकडे ढकलते.
तर एका शेतकर्याच्या नजरेतुन या मॉडर्न पर्यावरण वाद्यांच मोज माप!!
कवितेच नाव आहे भस्म्या! ही एक पौराणिक व्याधी! या व्याधीने ग्रस्त व्यक्तीच कशानेही आणि कधीही पोट भरत नाही. ती व्यक्ती घर दार, गावं, नगर, खाऊन फस्त करत सुटते.}
प्रतिक्रिया
3 Jun 2010 - 1:36 pm | मी ऋचा
अप्रतिम, खरंच विचार करायला भाग पाडलंत!! एक नंबर =D> =D> =D>
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
4 Jun 2010 - 2:27 pm | झुम्बर
अतिशय सुन्दर अगदी स्पर्शुन गेलि .........
खुप अवड्ली
3 Jun 2010 - 2:14 pm | Dhananjay Borgaonkar
खुप मौलीक विचार मांडलेत!!
पण गद्य आहे की पद्य?
3 Jun 2010 - 7:26 pm | स्पंदना
वरच पद्य आणि तळटिप गद्य.....
धन्यवाद!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
3 Jun 2010 - 7:39 pm | मदनबाण
पद्य आणि गद्य दोन्ही छान आहे... :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
3 Jun 2010 - 7:50 pm | अरुंधती
छान मांडलं आहेस! तळटीप माथ्यावरपण शोभून दिसेल! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
4 Jun 2010 - 2:04 pm | स्पंदना
होय ग , आधी वरच होती गंगे सारखी...मग खाली आली..गंगे सारखी.. :))
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
3 Jun 2010 - 7:55 pm | भानस
भिडलं. पद्य व गद्य दोन्हीही नेटकं व विचार करायला लावणारं.
3 Jun 2010 - 7:56 pm | शुचि
लेख फार आवडला. अश्रद्धेचा भस्म्या रोग : ) .... मस्तच अपर्णा.
माझ नीरीक्षण - स्वतःला वैचारीक , सुधारक, आधुनिक, पुरोगामी सिद्ध करण्यासाठी , स्वतःचा फार विज्ञान्-निष्ठ दृष्टीकोन ठसवण्यासाठी , दिसेल त्याच्या श्रद्धेवर घाला घालायचा हेच काही लोक शिकलेत.
स्वतःची रेषा लांब करण्यासाठी दुसर्याची रेषा पुसलीच पाहीजे का? दुसर्याच्या श्रद्धेची टवाळी केलीच पाहीजे का?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
3 Jun 2010 - 8:25 pm | टारझन
(जर श्रद्धा बांधेसुद असेल तर) सहमत आहे :)
बाकी कोण चोच्या कोणाच्या भावनांना दुखावतोय रे ?
- (भावणाप्रधान) इग्रजाज पसार
3 Jun 2010 - 8:05 pm | नरेश_
सदर लेखन मुखपृष्ठावर विराजमान झाल्यास आश्चर्य वाटायला नको...!
कविता आवडली हे वे.सां.न.ल.
आणि हो, भाशा पन आवरली :)
भारतीय रेल्वे हागणदारीमुक्त कधी होणार देव जाणे !
3 Jun 2010 - 8:33 pm | अभिज्ञ
सुरेख.
गद्य व पद्य दोन्ही आवडले.
अभिज्ञ.
3 Jun 2010 - 9:16 pm | धमाल मुलगा
अग्गदी वाक्य अन वाक्य आवडलं. प्रचंड आवडलं.
ज्यानं आपल्या मातीत खेळलेलं आहे, गुडघे-कोपरं फोडुन घेतली आहेत, तीच माती खेळताना त्या जखमांवर लावली आहे, त्या प्रत्येकाला ह्या लेखनातल्या वाक्यावाक्यातला अर्थ, त्यातुन उभं राहणारं गावाकडचं जगणं सगळं नजरेसमोर छान उभं राहिल जसं मला हा अनुभव आला. :)
छान लिहिलंत. फार फार आवडलं.
3 Jun 2010 - 11:27 pm | शिल्पा ब
खूपच छान कविता...आवडली . निसर्गाचे भान ठेवले नाही तर निसर्ग आपल्याला ठेवणार नाही. मग बसा ग्लोबल वार्मिंग वाढले करत...पाऊस नाही पडत म्हणून रडत...
अवांतर : टारझनच्या प्रतिसादाने डोळ्यात पाणी आले...हसुन हसुन =))
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
3 Jun 2010 - 11:33 pm | टारझन
मिपाचे वयोवृद्ध तपोवृद्ध सदस्य श्रीमान ५१२ यांनी ग्लोबल वार्मिंग चं एक नितांत सुंदर सोल्युषण (सुलोचन) शोधलेले आहे ... कळजी णको हो :)
3 Jun 2010 - 11:39 pm | शिल्पा ब
त्या उपायाने ग्लोबल वार्मिंग कमी होण्याऐवजी वाढून जायचे एक्दम.. :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
3 Jun 2010 - 11:31 pm | बेसनलाडू
(जागरूक)बेसनलाडू
3 Jun 2010 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एकूण विचार आवडला, पण अश्रद्ध माणसं सरसकट गोष्टी ओरबाडतच सुटतात हे दुसर्या टोकाचं विधान झालं! डोळस विचार आणि अश्रद्धपणा एकाच माणसाच्या ठायी असू शकतो.
अदिती
4 Jun 2010 - 1:55 pm | स्पंदना
'श्रद्धा' म्हणजे एखाद्या गोष्टीचा आदर्..विश्वास. मी येथे कोणत्या ही देवाधर्माची चर्चा नाही केली. जो डोळस असेल तो अश्रद्ध असण अशक्य. त्याच्या डोळस पणावरच्या श्रद्धेन तो चालत रहातो.
धन्यवाद!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
5 Jun 2010 - 1:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमची व्याख्या काही पटली नाही, पण म्हणून मला माझी व्याख्याही नीट देता येत आहे असं नाही.
तुमच्या लिखाणातून तुम्ही जी उदाहरणं दिलेली आहेत त्यातली बरीचशी माझ्यासाठी फारच अनोळखी आहेत. शहरात राहून दिसेल तेवढ्या छोट्याश्या जागेत फुलझाडं लावणारे आम्ही!
पण जमिनीवर पाय ठेवून चालायचं म्हणून 'भूमाते'ची क्षमा मागणं मला नेहेमीच हास्यास्पद वाटलं. तुम्ही नांगरणीचं उदाहरण दिलं आहेत, किंवा वडाला दोरा बांधण्याचं उदाहरण दिलेलं आहेत हे माझ्यासाठी भलत्याच विश्वातून आल्यासारखं आहे.
तुमचा असा विचार नसेलही पण लिखाण वाचताना एकूण असं वाटत आहे की शहरातले सगळेच लोकं किंवा परंपरा अमान्य करणारे लोकही निसर्ग ओरबाडून खातात. म्हणून मी टोकाला जाणे हा शब्दप्रयोग वापरला.
अदिती
4 Jun 2010 - 1:52 am | प्राजु
आवडली.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
4 Jun 2010 - 8:56 am | सहज
हाही छान विचार
4 Jun 2010 - 1:48 pm | स्पंदना
तो विचार वाचुनच तर हा विचार मांडला मी सहज
विशेषतः त्यांच शेवट च वाक्य मी सही म्हणुन मिरवणार आहे. परवानगी मिळवली आहे मी.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
4 Jun 2010 - 10:23 am | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान ...
binarybandya™
4 Jun 2010 - 11:27 am | अरुण मनोहर
मस्त!
>>'अति' शिकून तुम्हाला 'भस्म्या' झालाया.<< खरच!
आणि भ्रष्ट लोकांना अति खावून भस्म्या झालाय.
4 Jun 2010 - 12:37 pm | राजेश घासकडवी
तळमळीची भावना पण काहीशी बाळबोध वाटली.
'एक होता कार्व्हर' मध्ये समर्पक उदाहरण आहे. वरील भूमिका बाळगणार्या गावरान शेतकर्यांनी सतत पिकं घेऊन मातीचा कस घालवला. शेरात चार बुकं शिकलेल्या कार्व्हरने भुईमुगाचं पीक घेऊन जमिनीतलं नत्र वाढवलं. जमीन सुपीक झाली.
कड्यापर्यंत वगैरे लिहायला सोपं असतं, पण कड्यावरून कोसळणं ची तुमची व्याख्या कळली तर बरं होईल. म्हणजे गेल्या चार अब्ज वर्षांत, मनुष्याच्या सहाय्याशिवाय निसर्ग किती वेळा कड्यावरून कोसळला आहे हेही तपासून बघता येईल. कार्व्हरला तुम्ही अश्रद्ध म्हणाल काय? 'शेरी' संस्कृती नसती तर कार्व्हर निर्माण झाला असता काय?
पर्यावरणवादाच्या नावाखाली काही भंपकपणा चालतो त्याला माझा देखील विरोध आहे. पण निसर्ग देव म्हणून आंधळी पूजा करण्यापेक्षा त्याची फळं खाऊन समृद्ध होऊ आणि निसर्गालाही समृद्ध करू अशी भूमिका, विश्वास, श्रद्धा हवी.
4 Jun 2010 - 1:44 pm | स्पंदना
वरील भूमिका बाळगणार्या गावरान शेतकर्यांनी सतत पिकं घेऊन मातीचा कस घालवला.<
मी आपल्या संस्क्रुतीत डोकवुन बघा अस लिहील आहे.थोड माग जाउन बघा. जमिनीला विश्रांती देण्याची एक पद्धत पुर्वी होती. त्या चार महिन्या करता तो शेतीचा भाग पडीक ठेवला जात असे. खत घालुन, युरीयाच पोत अक्षरशः पाठीला लावुन सरीत पळत जाउन खुप मात्र झालय ईव्हन शेतीच. अमेझोन मधे जमीनीचा कस वाढावा म्हणुन राख आणी कोळसा वापरलेली बघुन आपण त्यांच कौतुक करतो. हीच पद्धत अगदी २० वर्षापुर्वी आम्ही वापरत होतो. पण खत मोडर्न झाली ना? आजचा शेतकरी म्हनन्या ऐवजी जो मातीला माय म्हणुन रहायचा त्या शेतकर्या बद्दल मी लिहीलय. जो मी थोडा का असेना पण माझ्या पणजोबांच्या मोडी लिखीत डायरीत वाचला.बांधाला कडधान्य लावुन तो बांध नंतर फोडुन शेतात मिसळुन काय होणार आहे?अस मला पहिल्यांदा वाटल्..थोड्या दिवसानी अचानक एक माहिती मिळाली...कडधान्याच्या मुळाशी नायट्रोजन्च्या गाठी असतात. मग मी ती डायरी तपासायला सुरुवात केली अन मग आपण काय गमावतो आहे हे मला जाणवल.
नाग पंचमीला काय पुर्वी नाग पकडुन त्याच जबरदस्ती दर्शन नाही घेतल जायच, ते हल्ली त्या पंचमीच कमर्शीयलायझेशन झाल्या नंतरची प्रथा आहे. झाड कधी बेनायची? कुठल पाखरू काल रात्री पाउस घेउन आल?किंवा बेंदुर, वट सावीत्री, गौरी साठी आणलेला फुलोरा(पावसान शेतात चिक्कार तण माजत, या निमित्तान सार साफ होत्)या साध्या साध्या सणांकडे थोड दोळस पणे पाहिल तर मला काय म्हणायच आहे ते तुम्हाला समजेल.
झाडाला चार आम्बे पाखरांसाठी वा झाड म्हणुन राखायची पुर्वजांची पद्धत आज चा शिकलेला शेतकरी चालवतोय का?
ज्या गोष्टी आपण पुर्वजांचा अंधश्रद्धाळु पणा वा जुन्या चालीरीती म्हणुन फारसा विचार न करता धुडकावुन देतो, त्याच गोष्टी पर्यावरण वाद्यांनी सांगीतल्या की डोक्यावर घेतो. तुम्ही दिलेल्या उदाहरणातील जो कार्व्हर आहे तो शिकुन आला म्हणुन थोडा विचार करुन शेती करायला लागला असेल. माझा आक्षेप आहे 'अती ' शिकुन फक्त नफ्याचा विचार करणार्या लोकांवर्..ज्यांचे आदर्श आपण गिरवायचा प्रयत्न करतो .
(एक तर भाषेचा संबंध तुटुन फार वर्ष झाली आणि चर्चा करायची कधीही न मिळालेलीसंधी या दोन गोष्टींमुळे मला नक्की काय म्हणायच आहे ते दुसर्यासाठी मांडायला थोड कमी जमत असाव. प्रयत्न केलाय्...तुमचा हात धरुन शिकेन म्हणते)
strong>शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
4 Jun 2010 - 8:36 pm | टारझन
डोळे पाणावले :)
- (मेदुबाला द्वेष्टा) बोपार्ना सुनिल
4 Jun 2010 - 1:10 pm | दत्ता काळे
'शेरी' संस्कृती नसती तर कार्व्हर निर्माण झाला असता काय? :S
... ह्याच्या अर्थ थेट असा होतो कि, शास्रज्ञ निर्माण होण्यासाठी केवळ शहरी संस्कृतीच कारणीभूत ठरते. हे पटंत नाही. कारण ज्या शोंधामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले, त्या शोधांचे जनक सगळेच काही शहरात जन्मले नव्हते, ना त्यांचे सगळे शिक्षण शहरात झाले होते.
4 Jun 2010 - 2:26 pm | राजेश घासकडवी
शेरी संस्कृतीचा शहरात जन्मलेला की खेड्यात जन्मलेला असा कोता अर्थ नाही. मला तंत्रप्रधान या अर्थाने म्हणायचं होतं.
एकंदरीतच दोन, काहीसे कृत्रिम गट झालेले दिसतात. ते कदाचित विचारप्रवाह किंवा मनोवृत्तीदेखील असतील (एकाच व्यक्तीच्या मनात असलेल्या). मी सोयीसाठी गट म्हणतो.
गट १ - गावाकडचे, काळ्या आईवर प्रेम करणारे, निसर्गाची पूजा करणारे, वगैरे.
गट २ - शहरी, सुशिक्षित, काँक्रीटच्या जंगलात राहाणारे, निसर्गाला भोगवस्तू मानणारे, वगैरे.
गट १ ला साधेभोळे, श्रद्धावान, इत्यादी विशेषणं लागतात,
गट २ ला स्वार्थी, अश्रद्ध, विज्ञानवादी, तर्ककठोर, कोरडे ही विशेषणं मिळतात.
सगळेच लोक गट १ प्रमाणे वागले तर जग फारच सुंदर होईल अशीही एक समजूत असते. कार्व्हर मी गट २ मुळे निर्माण झाला असं मानतो.
4 Jun 2010 - 7:40 pm | अविनाशकुलकर्णी
माझ निरीक्षण - स्वतःला वैचारिक , सुधारक, आधुनिक, पुरोगामी सिद्ध करण्यासाठी , स्वतःचा फार विज्ञान-निष्ठ दृष्टीकोन ठसवण्यासाठी , दिसेल त्याच्या श्रद्धेवर घाला घालायचा हेच काही लोक शिकलेत.
स्वतःची रेषा लांब करण्यासाठी दुसर्याची रेषा पुसलीच पाहीजे का? दुसर्याच्या श्रद्धेची टवाळी केलीच पाहीजे का?..............वा सुंदर..अगदी मनातल बोललात
5 Jun 2010 - 1:13 am | भाग्यश्री
अतिशय आवडले !!
5 Jun 2010 - 1:52 am | धनंजय
लेखन मनस्वी आहे म्हणून स्तुत्य आहे.
कल्पना मात्र भाबडी वाटते.
माझे आयुष्य बहुतेक "प्रगत गावांत" आणि शहरांत गेले. तरी "मागास खेड्यांत" मी अनेक महिने राहिलेलो आहे. पारंपरिक ग्रामीण शेतकीने सुद्धा जमिनीची धूप गेलेली मी बघितलेली आहे. मावळात मी होतो, तेथे "ठाकर" या जमातीच्या भटक्या वस्तींमध्ये लसीकरणाला फार विरोध होता. वस्तीच उठून पळून जात असे. ही समस्या सोडवण्यासाठी ठाकरांचा मनुष्य म्हणून मान करूनच काही जमू शकते, हे शिकण्यास फार वेळ लागत नाही. (महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग म्हणजे ब्रिटिशांचा प्लेग-लसीकरण विभाग नव्हे - पोलीस-सैनिकांच्या बळावर लसीकरण करणार नाही!)
पण लसीकरण-विरोधाच्या श्रद्धेचा मान केला तर सर्वांचेच नुकसान होते.
- - -
मनुष्य म्हणून कवितेतल्या "मी"चे अवमूल्यन कोणी केले तर निंद्य आहे, मान्य. कुठल्याही मनुष्याचे अवमूल्यन करू नये. पण त्याची सरमिसळ कवितेत "मी"च्या सर्व कृतींच्या अवमूल्यनाशी केलेली आहे.
ही सरमिसळ केल्यामुळे नीरक्षीरविवेक हरवलेला भाबडेपणा आलेला आहे, असे मला वाटते.
- - -
शिवाय "पाखरांसाठी आंबे राखून ठेव" असे कवितेतल्या "मी"चा बा म्हणतो. हे बहुधा हल्लीच्या पर्यावरणवाद्यांच्या सांकेतिक "सेव्ह बर्ड्स" नाचल्यासारखेच असावे. सांकेतिक नसते, तेव्हा खरेखरचे धान्य पक्ष्यांपासून दूर ठेवायला पारंपरिक शेतकरी गोफणीने पक्षी मारतात, ते तुम्हीही बघितलेच असेल. पारंपरिक श्रद्धा जीवमात्राची संकेतापेक्षा अधिक, खरोखरची काळजी घेते, असा काही भाबडेपणा कवितेत दिसतो.
पुन्हा : मनस्वी असल्यामुळे कविता कविता म्हणून स्तुत्य आहे.
5 Jun 2010 - 3:19 am | शिल्पा ब
खरेखरचे धान्य पक्ष्यांपासून दूर ठेवायला पारंपरिक शेतकरी गोफणीने पक्षी मारतात, ते तुम्हीही बघितलेच असेल.
अहो आपले घेऊन झाले कि पक्षांना थोडे ठेवायचे...पण जर सगळ्या पिकाची पक्षांनी नासाडी केली तर काय उपयोग...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
5 Jun 2010 - 5:08 am | धनंजय
फक्त सांकेतिक रीतीनेच पाखरांसाठी अन्न ठेवायचे आहे. पक्ष्यांचे पोट खरेच भरेल असे नाही, तर आपल्या मनाला बरे वाटेल इतके थोडे अन्न पक्ष्यांसाठी ठेवायचे आहे. हे ठीकच आहे. पाखरांचे पोट खरोखर भरू दिले, तर शेतात आपल्यासाठी काही उरायचे नाही.
खालच्या गद्यलेखात आधुनिक पर्यावरणवाद्यांबद्दल तरी काय सांगितले आहे? सांकेतिक रीतीने काही करतात, खरेखुरे काही करत नाहीत, अशी टीका आहे.
मात्र हा मानवस्वभाव फार जुना आहे, याबद्दल भाबडी डोळेझाक झालेली आहे. परंपरेत आणि आधुनिकतेत, दोन्हीकडे "केवळ सांकेतिकता" दिसते. परंपरेकडून खरेपणा शिकता येत नाही. नव्याने विचार करून आपला स्वभाव सुधारावा लागतो. (जमला तर!)
5 Jun 2010 - 5:17 am | शिल्पा ब
पर्यावरणवादी वगैरे मला नुसतीच थेरं वाटतात...प्रत्येकाने आपापल्या शेजारच्या निसर्गाचे जतन करावे...आपण काही संपूर्ण जगाची चिंता करणार्यातले नाहीत...शक्य तिथे झाडे लावावीत...उन्हाळ्यात पक्षांना पाणी ठेवावे...मोठं परस असेल तर दाणे ठेवायला हरकत नाही...कारण छोटीशी बाल्कनी असेल तर पक्षी धुडगूस घालतील आणि आपल्याला बाल्कनी बंद होईल...शाळांजवळ मुलांकडून झाडे लाऊन त्यांची निगा राखणे सहज शक्य आहे...थोडक्यात आपल्याला शक्य तेव्हढे करावे...सगळ्यांनीच थोडे थोडे केले तर ठीक नाहीतर एखादाच पर्यावरणप्रेमी काय काय करेल.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/