"किरण नगरकर....." ३५ वर्षात एकच मराठी पुस्तक... तरीही !

Primary tabs

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in जनातलं, मनातलं
8 May 2010 - 4:32 pm

`
किरण नगरकर.....आज वय ६८.... "सात सक्कं त्रेचाळीस" ही मराठी साहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आणि Rawan & Eddie (1995), Cuckold (1997), God's Little Soldier (2006) या तीन इंग्रजी कादंबर्‍या..... बस ! तरीही पहिल्या मराठी कादंबरी पासून ते अलीकडील २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी कादंबरीच्या वाटचालीपर्यंतचा किरण नगरकर यांचा प्रवास म्हणजे साहित्यातील एका वेगळ्या धर्तीचा चालता बोलता इतिहास म्हटला पाहिजे.

काल रात्री मी Cuckold ही त्यांची "साहित्य अकादमी" पारितोषिक विजेती कादंबरी वाचून संपविली आणि जरी कादंबरीचा विषय सोळाव्या शतकातील एका घटनेवर आधारित असला तरी तिची स्पंदनं कालातीत आहेत. आपल्या संस्थाळावरील प्रत्येक सदस्याने आवर्जून वाचावी अशी ही अजोड कलाकृती असून कादंबरीवर भाष्य करताना ज्येष्ठ पत्रकार श्री खुशवंत सिंग यांनी लिहिले आहे, "...मराठीतील प्रथम श्रेणीचे लेखक किरण नगरकर यांची इंग्रजीतील 'ककल्ड' ही कादंबरी मी भारतीय लेखकांच्या कादंबर्‍यात सर्वोत्कृष्ट मानतो...".

केवळ मराठी भाषेतील साहित्य वाचनार्‍या वाचकांना किरणची ओळख (किरणला 'अहोजाहो' म्हणूच शकत नाही इतका तो किंवा "ते" आपल्यातील वाटतात... ["लता आशा" यांचा उल्लेखही आपण एकेरी केला तरच मनाला बरे वाटते] किंबहुना त्यानी जर हे लिखाण वाचले ~~ मराठी संस्थाळांना भेटी देणे हा त्यांचा विरंगुळा आहे.... तर मी आणि आपण सर्वच... त्यांना एकेरी संबोधितो याचा खचितच आनंद होईल) फक्त "सात सक्कं त्रेचाळीस" मुळे आहे; त्यामुळे इंग्रजी भाषेतील त्यांच्या तीन पुस्तकांनी त्यांना जागतिक पातळीवर नेऊन ठवले आहे ही खचितच आपण सर्व मराठी भाषिकांना अभिमानास्पद बाब आहे.

कोण हे "किरण नगरकर"? असा प्रश्न जर कुणाला पडला असेल, तर त्यांच्यासाठी तसेच त्यांच्यावर प्रेम कारणार्‍या (आणि असे खूप आहेत...) त्यांच्या वाचकासाठी, Cuckold च्या निमित्ताने किरणवर हा छोटासा लेख प्रपंच.... जो आपण स्वीकारावा ही विनंती.

१९४२ मध्ये मुंबई येथे ब्राह्मो समाजाची (प्रार्थना समाज तत्वाशी निगडीत...) तत्वे मानणा-या कुटुंबात किरणचा जन्म झाला. त्यांचे आजोबा ब्राह्मो समाजाच्या चळवळीशी अत्यंत जवळीक साधून होते, इतकेच नव्हे तर शिकागोच्या धर्म परिषदेसाठी (१८९३ व १९०२३) अमेरिकेला गेले होते. घराची "अत्यंत" म्हणावी अशी गरिबी त्यामुळे "मी अशा कुटुंबात वाढलो कि जिथे दोन वेळेच्या अन्नाची तरतूद कुटुंब प्रमुखाला रोज करावी लागत असे." असे असलेतरी किरणच्या वडिलांना शिक्षणाचे महत्व खूप वाटत असल्याने शिक्षणाची आबाळ झाली नाही. चौथी पर्यंत मराठी माध्यम पण तेथून पुढे चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांनी वाळीत टाकलेल्या नगरकर कुटुंबाला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरावे लागले असल्याने एक ख्रिश्चन संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत किरणला प्रवेश देण्यात आला आणि तिथून सर्वच शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केले. पुण्याचा फर्गसनमधून पदवी तर मुंबईच्या एस. आय. इ. एस. कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यत्तर. पुणे काय मुंबई काय, किरण मितभाषी आणि दारिद्रयामुळे स्वताला सतत मागेच ठेवत असल्याने या दोन्ही ठिकाणी खास मैत्री अशी कोणाशीच झाली नाही, एकटेपणा होता, मात्र त्यामुळे वाचनावरच जास्त भर. एम. ए. नंतर त्याच कॉलेजमध्ये एक वर्ष तात्पुरत्या स्वरूपाची प्राध्यापकाची नोकरी, त्या क्षेत्रात किरणचे मन रमने शक्यच नव्हते पण तिथे विलास सारंग, करंदीकर, पार्थसारथी अशा नामावंतांशी त्याचा परिचय झाला आणि सारंग यांच्यामुळे नंतर थेट दिलीप चित्रे मित्र बनला. किरणच्या लेखन शैलीवर चित्रे खूष होते.....(तो पर्यंत किरण फक्त स्वैर लेखन करून स्वत:जवळच ठेवी व असेच मित्रासमवेत वाचन....गप्पांच्या स्वरुपात...). दिलीपने "अभिरुची" मध्य लेखन करण्यास किरणला प्रवृत्त केले. अभिरुचीचा साहित्यक्षेत्रात सत्यकथेसारखा दबदबा ! एक कथा किरणने लिहिली आणि ती अभिरुचीमध्ये प्रसिद्ध झालीही... मोबदल्याचा तर प्रश्न नव्हताच पण आपणाला "मराठी" लिहिता येते याचा किरणला आनंद झाला....कारण सर्व शिक्षण इंग्रजीमधून झाले असल्याने मराठीविषयी खात्री नव्हती. त्या कथा अनुभवावरून बरेच दिवस डोक्यात घोळत असलेले विषय किरणने लिहिण्यास सुरुवात केली....साल १९६७....आणि कादंबरीला नाव दिले "सात सक्कं त्रेचाळीस..."

पण आता नोकरीचे वांधे झाले होते.... आणि मुंबईच्या कॉलेजमध्ये तर शिकविणे आता शक्य नसल्याने किरणने पुणे गाठले आणि तिथे "इंडिअन रायटिंग टुडे" इथे दरमहा रुपये २३० इतक्या "मोठया" पगारावर टेबल लिखाणाचे काम सुरु केले. मुंबईत पगार ३५० मिळत होता, पण आता १०० रुपले पगार कमी झाला असल्याने दोन वेळेच्या खाण्याची भ्रांत पडू लागली आणि साहजिकच पुढील तीन चार वर्षे किरणमधील "लेखक" ठार झोपलाच. १९६७ ला लिहिण्यास घेतलेली "सात सक्कं त्रेचाळीस" ला प्रसिद्धीचे तोंड पाहण्यास १९७४ साल उजाडावे लागले. पण कादंबरी प्रसिद्ध झाली.... "मौज" परंपरेत अजिबात गाजावाजा न करता..... आणि किरण आपण "लेखक" झालो ही बाब विसरूनही गेला. मौजे मुळे टीकाकारांनी किमान नोंद तरी घेतली, पण सर्वसामान्य मराठी वाचकबाबा अजूनही "स्वामी", "ययाती", "मृत्युंजय", इ.इ. यांच्या कोशातून बाहेर पडायला तयार नव्हता. हसवीण्यासाठी पु. लं. होतेच, १० ते ५ नोकरी करता करता लोकलमध्ये, बसमध्ये वाचनाची भूक भागविण्यासाठी व. पु. काळे, काकोडकर, दळवी आणि तमाम महिला लेखक वर्ग .... सुळसुळीत पाच रुपयेवाली "हंस". "मोहिनी", "नवल" होतेच. जास्तीतजास्त "दिवाळी" अंक हेच मराठी साहित्य मानणारी मध्यमवर्गीय कुटुंबे होतीच, जोडीला अधून मधून दलित हुंकार चालूच..... अशा परिस्थितीत जो महाराष्ट्र अजून "कोसला"च्या धक्क्यातून बाहेर पडला नव्हता, त्याला "सात सक्कं त्रेचाळीस" चे गणित काय आहे हे उमजून घेणे अंमळ गरजेचे वाटले नाही. तरीही "ठणठणपाळ" ने आपल्या एका "खास" अशा लेखाद्वारे या कादंबरीची त्यांच्या लकबीत स्तुती केली (किंवा चिरफाड केली असे म्हणू या....) पण ब-याच लोकांनी निदान त्यामुळे का होईना ही कादंबरी हाताळली. किरणने तर आता मराठीला रामराम ठोकलाच होता. तरीही त्यांची त्या कादंबरीतील "कुशंक" आणि "रघु" ही दोन पात्रे मनात आजदेखील घर करून राहिली आहेत.

विशेष म्हणजे मी स्वत: किरण नगरकर यांची "Rawan and Eddie" ही १९९५ मध्ये प्रसिद्ध झालेली इंग्रजीमधील कादंबरी प्रथम वाचली आणि हिच्या गुणवैशिष्ट्याबद्दल माझे या विषयातील मार्गदर्शक (माझे मामा) यांच्या समवेत चर्चा करीत असताना त्यांनीच मला "सात सक्कं त्रेचाळीस" अगोदर वाच मग नंतर आपण किरणबद्दल बोलू असे सुचविले.... ही गोष्ट साधारणत: १९९९-२००० ची.... त्यांच्या सूचनेनुसार मराठी भाषेतील तो चमत्कार मी वाचला... नव्हे अक्षरश: खाल्ला.... आणि किरणबद्दल काय बोलू, काय वाचू, कुठून मिळवू असे होऊन गेले.

प्रकाशन व्यवसाय म्हणजे काय, तो कसा चालतो, त्यातील आर्थिक बाजू कशा व कोणी सांभाळायच्या या बाबतचे किरणचे ज्ञान "अगाध" असल्याने "सात सक्कं त्रेचाळीस" ची आवृत्ती कितीची निघाली, दुसरी निघणार की नाही, "रॉयल्टी" चितळे मिठाई आपणाला भागवत देणार की नाही... या बाबीपासून तो अनभिज्ञच राहिला. त्याला मौजेकडून सांगण्यात आले कि १००० ची आवृती होती व ती संपण्यास "मौज" परंपरेनुसार २१ वर्षे लागली. त्यामुळे मराठीमध्ये कसला आला आहे अस्तित्ववाद आणि कुठली आली आहे शब्दमाध्यमातून क्रांती !!! (कवितेची तर ३०० ची आवृत्ती निघते असे म्हणतात..... बाप रे....३०० ? आणि ती संपण्यास परत २० वर्षे !! आता केशवसुत जरी असले तर ३०० चोपड्यातून कोणत्या प्रकारची क्रांती इथे रुजायची आणि फुलायची ???) साहजिकच आपणाला लेखनातून जे काही सांगायचे ते "इंग्लिश" या जागतिक पातळीवरील भाषेतूनच सांगितले पाहिजे असे किरणने मत बनिवले आणि त्या क्षणापासून त्याची लेखणी त्या प्रांतात भ्रमण करीत आहे.

१९७६-७७ च्या आणीबाणीच्या काळात किरणने महाभारतातील काही घडामोडीवर आपल्या शैलीत भाष्य करणारे "Bedtime Story" नामक नाटक लिहिले आणि हिंदू धर्माचा अपमान अशी ओरड त्या काळी इतकी झाली की रा. स्व. संघ, हिंदू महासभा, तसेच शिवसेनेने त्यावर बंदी पुकारली.... काम कारणार्‍या कलाकारांना धमकी देण्यात आली.... साहजिकच नाटकाच्या तालिमी बंद पडल्या. सेन्सोर बोर्डाने ७८ "कट्स" सुचविले.... ते श्री. मे. पु. रेगे आदींच्या मध्यस्थीने २८ पर्यंत खाली आले, पण नाटकात काम करायला कुणीच तयार नसल्याने ते बासनात गेले, ते कायमचेच. याच दरम्यान किरणची आणि अरुण कोलटकर यांची जाहिरात क्षेत्राच्या निमित्ताने ओळख झाली. दोघेही आचार विचाराने समानधर्मी असल्याने साहजिकच मैत्री झाली आणि ती फुलली देखील. जाहिरात क्षेत्रात किरणचा जम बसत असतानाच त्याला १९९१ मध्ये रॉकेफेलर शिष्यवृत्तीवर शिकागो येथे जाण्याची संधी मिळाली. तिथे पडेल ती कामे करून किरणने स्वत:ला पूर्णवेळ लेखन कार्याला वाहून घेतले. "रावण अ‍ॅन्ड एडी" व नंतर "ककल्ड" या निर्मिती तिथल्याच. इंग्रजी भाषेत लिखाण केले ते पैसे मिळतात म्हणू असे नव्हे तर किरणला त्या भाषेची पडलेली भुरळ होय. असे असले तरी किरण नगरकर, अरुण कोलटकर, विलास सारंग यांनी आपल्या मराठी मातीचा गंध सोडून दिलेला नाही.....(विशेषत: कोलटकरांची "जेजुरी" वाचताना ही बाब प्रकर्षाने अनुभवायला मिळते...) तिघांच्याही लेखनाला इथल श्वास, नाद आणि गंध आहे.

किरण नगरकरला इंग्रजी भाषा किती वश झाली आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजेच "ककल्ड" ही महाकादंबरी होय. ~~ "मीरा" आपल्या मनातील "मीरा...." ~~ श्री कृष्णालाच आपला प्रियकर, पती, परमेश्वर मानणारी मेराथची राजकुमारी.... ती मेवाडची महाराणी झाली. महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतात "मीरा" या व्यक्तिरेखेकडे अत्यंत भाऊकतेने पाहण्याचा प्रघात आहे.....अर्थात त्यात गैर काहीच नाही... त्याला कारण भगवान श्री कृष्ण. आता जी कृष्ण भक्त आहे तिला कोण आणि का दोष देणार? पण किरण नगरकर यांनी या कादंबरीत "त्या" दुर्दैवी "युवराज"च्या नजरेतून या प्रकरणाकडे पाहिले आहे. ... पण म्हणून ही काही खास "ऐतिहासिक" कादंबरी नाही, तर ती आहे कालातीत.... आजही पती, पत्नी आणि प्रियकर यांच्यासंबंधी भोवर्‍यातील गतिमानता आणि परिणाम जाणवून देण्याचे कार्य "ककल्ड" करते.... नव्हे वाचकाना खिळवून ठेवते.

श्रीमती रेखा सबनीस यांनी "प्रतिस्पर्धी" या शीर्षकाने "ककल्ड" चा अनुवाद केला आहे जो पॉप्युलर प्रकाशन यांनी अतिशय सुंदररीत्या प्रकाशित केला आहे. आपल्या सर्वासाठी किरण नगरकर यांची दोन्ही भाषेतील ही कलाकृती सध्या बाजारात उपलब्ध आहे.

"प्रतिस्पर्धी" च्या मलपृष्ठावर "पायोनियर" चे श्री. मकरंद परांजपे यांची प्रतिक्रिया छापलेली आहे... ते म्हणतात : ".... मी वाचलेल्या कुठल्याही भारतीय लेखकाच्या इंग्रजी कादंबरीपेक्षा "ककल्ड" इतकी वेगळी आहे की तिची विशेष प्रशंसा व उल्लेख करणे मला आवश्यक वाटते. भूतकाळ इतक्या जिवंतपणे उभा करणे एवढेच जरी साध्य मानले; तरीही ही एक महान कादंबरी आहे...."

वाचल्यानंतर निव्वळ कादंबरीच नव्हे तर खुद्द श्री. किरण नगरकर यांच्याबद्दलदेखील तुम्हा सर्वांचे असेच मत होईल.

धन्यवाद.

(एका इंग्रजी संस्थळावर [Another Sub-Continent] संस्थापक संपादक श्री. अर्नब चक्लदार यांनी सन २००५ मध्ये श्री. किरण नगरकर यांची मुंबई मुक्कामी एक प्रदीर्घ मुलाखत घेतली होती, त्यातील काही भागांचा उपायोग या लेखासाठी मी केला आहे, त्या संस्थळाचा मी रीतसर सदस्य असल्याने मला त्या मुलाखतीचा "अभ्यास" उद्देशासाठी वापर करता येतो, त्याबद्दल श्री. अर्नब यांचे मी मन:पूर्वक आभार मानत आहे.......
खरे तर, ती संपूर्ण मुलाखतच कुणीतरी (कधीतरी...) मरठीमध्ये अनुवादित करुन येथील सर्व सदस्यांसाठी दिली पाहिजे, इतकी ती अभ्यासपूर्ण आहे ~~ आपले ज्येष्ठ सदस्य श्री. मुक्त सुनीत हे काम अत्यंत सार्थरित्या करु शकतील असा विश्वास वाटत

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

8 May 2010 - 5:23 pm | डावखुरा

छान ओळख करुन दिलीत..
धन्यवाद.......

----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

http://lh3.ggpht.com/_v6NwzplyH

प्रमोद देर्देकर's picture

24 Jul 2014 - 12:57 pm | प्रमोद देर्देकर

मी.पा.वरिल एक अत्यंत सुंदर पुस्तक परिक्षणाचा लेख. मी मागे एकदा वाचला होता.
पुस्तकाची ओळख तर झाली आहे. पण ते पुस्तक वर लेखात म्ह्टल्याप्रमाणे खरचं दुर्मिळ आहे.
मी गेले २ महिने शोध घेत आहे, जर कुणाकडे हे पी.डी.एफ. मध्ये कुठे उपलब्द्ब असेल तर त्या साईटचा पत्ता द्यावा. तसेच शक्य असल्यास श्री. इंद्राज पवार यांचाही संपर्क पत्ता द्यावा.
धन्स

मुक्तसुनीत's picture

8 May 2010 - 6:05 pm | मुक्तसुनीत

उत्तम लेख.
सविस्तर प्रतिक्रियेसाठी जागा राखून ठेवतो :-)

प्रमोद देव's picture

8 May 2010 - 6:16 pm | प्रमोद देव

तसं माझं वाचन फारसं नाही आणि त्यातून हे नाव आजवर कुठेच ऐकल्यासारखंही वाटत नाहीये... त्यामुळे त्यांचे काहीही वाचलेले नाहीये.

इंद्रराज, आपण ह्या व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मी कादंबर्‍या वगैरेंसारखे भारंभार लेखन वाचायचं केव्हांच बद केलंय आणि आजवर इंग्लीशच्या वाटेलाही कधी गेलो नाही आणि भविष्यातही जाण्याची सुतराम शक्यता नाहीये...त्यामुळे हा लेखक आमच्यापासून दूरच राहणार हे नक्की....मात्र त्यांनी मराठीत लिहिलेले स्फुट,ललित इत्यादि लेखन कुठे वाचायला मिळणार असेल तर नक्कीच वाचायला आवडेल.

रामदास's picture

8 May 2010 - 7:02 pm | रामदास

वाटलं की कुशंकला लोकं विसरलेत.पण देवकाकांच्या प्रतिक्रियेवरून असं वाटतं की बर्‍याच जणांनी हे पुस्तक वाचले नसावे.
या पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल लेखकाचे आभार.

प्रदीप's picture

8 May 2010 - 7:33 pm | प्रदीप

पुस्तक व लेखक परिचय, दोन्ही आवडले.

'सात सकं त्रेचाळिस' बद्दल बरेच ऐकून आहे. १९७४ साली ती प्रथम प्रसिद्ध झाली ही मलातरी नवीनच बातमी आहे. त्याच्याही बर्‍याच अगोदरपासून मी मराठी साहित्य वाचतोय (जी. ए. नावाचे भूत १९६५ साली मानगूटीवर बसले ते आजतागायत मी आनंदाने पेललेय--), ललित आमच्या घरी सुमारे ६७- ६८ सालापासून येत असे; मराठी साहित्यात रमणारी मित्र मंडळी आजूबाजूस होती. तेव्हा दिपुचित्रे, अरूण कोलटकर, भाऊ पाध्ये, ढसाळ इत्यादींची नावे गाजत असत-- अर्थात दळवी, तेंडुलकर आणि जी. एंच्या व्यतिरीक्त-- तरीही नगरकरांचे नाव तेव्हा कुठल्याही संदर्भात वाचल्याचे आठवत नाही!

ह्या कादंबरीविषयी खरे तर मी नव्वदीच्या सुमारास प्रथम वाचले, तेव्हा ही अलिकडची कांदबरी असावी असा माझा समज होता!

आता 'ककोल्ड' घेऊन वाचली पाहिजे.

इन्द्र्राज पवार's picture

8 May 2010 - 8:53 pm | इन्द्र्राज पवार

".....आता 'ककोल्ड' घेऊन वाचली पाहिजे....."

नको..... "ककल्ड" ची घाई करू नका. १९६५ ला "जी. ए." भुताने तुम्हाला झपाटले असल्याने कदाचित १९७२ ते १९७६ या काळात मराठी साहित्यात काय प्रयोग होत होते याची जाणिव झाली नसेल. म्हणून सर्वप्रथम "सात सक्कं त्रेचाळीस" खाऊन टाका...."किरण" झाड तुमच्या अंगणात त्यामुळे येईल, मगच "रावण अँड एडी"... "ककल्ड" आहेतच. तुम्ही कुठे राहता हे माहित नाही, पण आपल्या गावी "नगर वाचन मंदीर" असेल... किंवा एखादे जुने नामांकित कॉलेज असेल तरच "सात सक्क....." मिळण्याची शक्यता आहे. पुस्तक विक्रेत्यांकडे मिळण्याची अतिशय धूसर शक्यता आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

श्रावण मोडक's picture

8 May 2010 - 8:30 pm | श्रावण मोडक

चांगला लेख. मला वाटतं "सात सक्कं त्रेचाळीस"ची दुसरी आवृत्ती अलीकडेच निघाली आहे. माझ्याकडे आहे. या कादंबरीच्या प्रवासाची कथा हीच मराठी प्रकाशन व्यवसायाची स्थिती कशी भिक्कार आहे हे सांगणारी कथा आहे.

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 12:42 am | इन्द्र्राज पवार

श्री. श्रावण >>> तीस पस्तीस वर्षानंतर इतक्या गाजलेल्या (खपाच्या दृष्टीने नव्हे तर चर्चेच्या....) कादंबरीची दुसरी आवृत्ती निघते याचा अर्थ प्रकाशकांना "किरण नगरकर" या लेखकाविषयी काही विशेष ममत्व वाटते म्हणून नव्हे तर "ककल्ड" ला इंग्रजी भाषेतील लिखाणाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला लागोपाठ अनेक भाषात तिचे अनुवाद निघु लागले, आणि मराठी विश्वात "कोण हे नगरकर" अशी अपेक्षित चर्चा सुरु झाली, कारण नाव अस्सल महाराष्ट्रियन. त्या अगोदर मुंबईत "रावण अँड एडी" वर देखील मंथन सुरु होतेच. श्याम बेनेगल, निहलानी, आमीर खान आदी मंडळीसमवेत किरणचे फोटो सिने मॅगेझिनमधून झळकू लागल्यावर आपल्या महान प्रकाशकांना किरण नगरकर हे भलतेच "चलनी" नाणे असल्याचा साक्षात्कार झाला.... मग चला धुऊन घेऊ या वाहत्या गंगेत हात... म्हणून दुसरी आवृत्ती. बाकी काही नाही. फार घाणेरडे राजकारण आहे या प्रकाशकांच्या दुनियेत. (नेमाडे यांच्या "बिढार" मध्ये वाचले असेलच...आवाज करणार्‍या लेखकाला हे प्रकाशक कसे "झोपवतात" ते..)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

चिरोटा's picture

8 May 2010 - 10:11 pm | चिरोटा

७x6=43 वाचली पाहिजे.माझ्या माहितीप्रमाणे नगरकर 'द हिंदु'मध्येही बराच काळ कॉलम लिहायचे.
भेंडी
P = NP

चिंतातुर जंतू's picture

8 May 2010 - 10:51 pm | चिंतातुर जंतू

ज्यांना कोसला आपल्या शालेय/महाविद्यालयीन काळात प्रचंड आवडलेली असते, अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच. याउलट ज्यांना कोसलामधल्या उदाहरणार्थ वगैरेंविषयी 'फुकट काहीतरी बोअर करायचं आणि त्याला प्रायोगिक प्रायोगिक म्हणत उगाच डोक्यावर घ्यायचं!' एवढेच वाटलेले असते, त्यांना 'सात सक्कं...' कधीच भेटत नाही, असा साधारणतः अनुभव आहे.

कोसला अजिबातच आवडली नाही, पण 'सात सक्कं...' प्रचंड आवडली, असे येथे कुणी आहे काय, हे जाणून घ्यावयास आवडेल, कारण त्यामुळे वरील सर्वसाधारण अनुभवास छेद जाईल.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

बिपिन कार्यकर्ते's picture

8 May 2010 - 11:36 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. जंतु, भाष्य / निरीक्षण आवडले. कोसला आवडली असल्याने आता नगरकर वाचावेच बहुतेक...

बिपिन कार्यकर्ते

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 12:55 am | इन्द्र्राज पवार

"...कोसला अजिबातच आवडली नाही, पण 'सात सक्कं...' प्रचंड आवडली, असे येथे कुणी आहे काय,...."

नाही, असे होणार नाही असा माझा तरी विश्वास आहे..... दोनच शक्यता >>> "कोसला आणि सात सक्कं त्रेचाळीस दोन्हे ग्रेट आहेत" वा "कोसला आणि सात सक्कं त्रेचाळीस दोन्ही टाकाऊ आहेत".
"पहिली आवडली मात्र दुसरी नाही.... किंवा व्हाईस व्हर्सा..." असे होणार नाही. (निदान मी तरी या मताशी ठाम आहे.)
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भडकमकर मास्तर's picture

9 May 2010 - 3:56 am | भडकमकर मास्तर

ज्यांना कोसला आपल्या शालेय/महाविद्यालयीन काळात प्रचंड आवडलेली असते, अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच. याउलट ज्यांना कोसलामधल्या उदाहरणार्थ वगैरेंविषयी 'फुकट काहीतरी बोअर करायचं आणि त्याला प्रायोगिक प्रायोगिक म्हणत उगाच डोक्यावर घ्यायचं!' एवढेच वाटलेले असते, त्यांना 'सात सक्कं...' कधीच भेटत नाही, असा साधारणतः अनुभव आहे.
हे निरीक्षण प्रचंड आवडले...
आणि तुमच्यासारखीच दोहोंपैकी एकच कादंबरी आवडलेला कोणी आहे का ते पहायची उत्सुकता आहे...

प्रदीप's picture

9 May 2010 - 10:17 am | प्रदीप

....अशांनी जर वाढत्या वयाबरोबर आपले वाचन अधिकाधिक प्रगल्भ करत नेले, तर कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर 'सात सक्कं त्रेचाळीस' त्यांना गाठतेच.

चांगले आहे, आवडले.

माझ्यापुरते सांगायचे तर 'कोसला' मला प्रचंड आवडली होती. पण माझे वाचन अलिकडच्या एक-दोन दशकांमधे फिक्शनकडून अन्यत्र सरकले आहे. अवचट (सर्वच), रेणू गावस्कर तसेच चरित्मक लेखने/ललित निबंधः उदा.'भगिरथाचे वारस', मेमॉयर्स (डॉ. सुनिलकुमार लवटे ह्यांचे 'खाली जमिन, वर आकाश', डॉ. हिम्मतराव बावस्करांचे 'बॅरिस्टरचे कार्टे', विठठल कामतांचे 'ऑर्किड्स आणि इडली आणि मी', प्रकाश आमट्यांचे 'प्रकाशवाटा', किशोर आरसांचे 'आठवणींच्या आठवणी, रामदास भटकळांचे 'जिगसॉ', मंगला आठलेकरांचे 'जयवंत दळवींविषयी' इ.) आता हे असले वाचन बहुधा (किंवा नक्कीच) 'प्रगल्भ' ह्या सदरात मोडत नसावे, तेव्हा 'सात सक्कं...', मेघना पेठे, कविता नरवणे, अनंत सामंत इत्यादि लेखकांचे काहीही माझ्या वाचनात नाही.

जाता जाता, सत्तरीच्या दशकातील गाजलेल्या आणि मलाही अत्यंत आवडलेल्यांपैकी अजून एक चांगले पुस्तक म्हणजे हमोंचे 'निष्पर्ण वृक्षावर, भर दुपारी...' तसे हमो नंतर कुठे भेटले नाहीत. त्यांचे प्रदीर्घ आत्मचरित्मक 'बालकांड' ही फारसे मनास भिडू शकले नाही.

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 11:57 am | इन्द्र्राज पवार

"....पण माझे वाचन अलिकडच्या एक-दोन दशकांमधे फिक्शनकडून अन्यत्र सरकले आहे....."

असे हे प्रकटन म्हणजे वाचनात प्रगल्भता आली याचेच उदाहरण आहे, आणि त्यात वावगे तरी काय आहे ? मला स्वतःला "अरेबीयन नाईट्स" वाचायला खूप आवडतात, तसेच मन कधीतरी कोणत्यातरी कारणास्तव खिन्न असते त्यावेळी तर मी चक्क "इसापनिती" वाचनाची मजा घेत असतो.... पण ही स्थिती सदासर्वकाळ चालू ठेवता येत नाही...शैक्षणिक वाट्चालीत पदवी, पदव्युत्तरसाठी शेक्सपीअर वाचणे, अभ्यासने केवळ अपरिहार्य असते, मात्र आता मला त्याच्या नावाच्या कोणत्याही पुस्तकाकडे बघवत नाही व वाचवतही नाही. आपल्याकडेही खांडेकर-फडके-नाथ माधव-आपटे-पेंडसे आदीनी राज्य केले होतेच की... पण या क्षणी आपल्यातीलच असे कितीजण असतील की जे यांची पुस्तके दुकानातून आणून उत्सुकतेने वाचत बसतील?

टीप ~~ ह. मो. नी "निष्पर्ण...." नंतर किती लिहीले यापेक्षा पुण्यामुंबईच्या प्रकाशकांनी त्यांच्याकडून किती लिहवून घेतले याची "सुरस आणि चमत्कारिक" कथा खुद्द ह. मो.च पुढे कधीतरी एका "कांडात" सांगतीलच..! आणि ते सर्व एक प्रकाशकच प्रसिद्ध करेलदेखील... करेलच.... कारण? लेखक खपाऊ आहे.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

स्पंदना's picture

8 May 2010 - 11:02 pm | स्पंदना

कुतुहल चाळवलत अगदी यशस्वी रित्या.
आता शोधलीच पहिजेत ही पुस्तक!!

आभार या ओळखी बद्दल.
तसा माणुस दिसतोच कलन्दर!! फोटोत हो!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 2:28 pm | इन्द्र्राज पवार

"....आता शोधलीच पहिजेत ही पुस्तक!!.."

नक्कीच तुम्हाला आवडेल त्यांचे साहित्य.... मात्र सुरुवात "सात सक्कं त्रेचाळीस" पासुनच करावी. गंगा आवडायची तर ती उगमापासूनच निरखावी.

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

बिपिन कार्यकर्ते's picture

8 May 2010 - 11:34 pm | बिपिन कार्यकर्ते

इंद्र, अतिशय उत्तम आणि महत्वाचा धागा टाकल्याबद्दल धन्यवाद. भारतिय साहित्यातील अतिशय उंचावरचे नाव अशी नगरकरांची ख्याति ऐकून आहेच. ती यानिमित्ताने अधोरेखित झाली. नगरकरांचे साहित्य वाचायचे आहेच. यानिमित्ताने अजून खूप काही वाचायचे आहे ही रूखरूख ताजी झाली.

बिपिन कार्यकर्ते

इन्द्र्राज पवार's picture

10 May 2010 - 10:01 am | इन्द्र्राज पवार

"सतत वाचनाची भूक.... " हे लक्षण उत्तम आरोग्याचे उदाहरण मानले जाते, आणिi "किरण" मुळे तुमची वाचन भूकेची रुखरुख ताजी झाली ही एक चांगलीच बाब आहे. जरूर वाचा.... पण प्रथम "सात....".

-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

शुचि's picture

9 May 2010 - 1:21 am | शुचि

अप्रतिम लेख आहे हा. कुतूहल पूर्ण चाळवणारा.
>>"त्या" दुर्दैवी "युवराज"च्या नजरेतून या प्रकरणाकडे पाहिले आहे. ..>>>> काय अफलातून "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असेल नगरकरांनी : ) खरच!

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 9:28 am | इन्द्र्राज पवार

"...काय अफलातून "आउट ऑफ बॉक्स" विचार केला असेल नगरकरांनी : ) खरच!..."

खुद्द खुशवंत सिंग यांनी याच मुद्द्यावर "हिंदुस्तान टाईम्स" मध्ये प्रभावी मत मांडले आहे. श्री कृष्णाला प्रियकर मान, आणि कुंवरर्जीला त्यागून एकतारा वाजवीत "मीरा कहे गिरीधर..." म्हणत म्हणत सो-कॉल्ड भाविकांच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा काढणे हे तर मद्रास धर्तीचे हिंदी चित्रपट आख्यान झाले. इतके जर मीरा कृष्णाची इतकी दिवानी होतीच तर तितक्याच ठामपणे ती भोज बरोबरच्या लग्न प्रस्तावाला नकार देऊ शकली नसती का? सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती कमल देसाई यांनी नेमका हाच बिंदू पकडून म्हटले आहे की, "कुंवरर्जी हा या कादंबरीचा नायक आहे. इतिहास त्याच्याबद्दल फार मूक आहे... त्याचे अस्तित्वच पुसून टाकले आहे काळाच्या पाटावरून. हीच फार मोठी शिक्षा आहे त्याला."
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

डॉ.श्रीराम दिवटे's picture

9 May 2010 - 8:22 am | डॉ.श्रीराम दिवटे

खरे तर ४२ असतात परंतु ते ४३ का? याची प्रचिती नगरकरांच्या कादंबरीतून मिळते..
असो प्रत्येकाने एकदा तरी वाचावीच!

मुक्तसुनीत's picture

9 May 2010 - 8:41 am | मुक्तसुनीत

सर्वप्रथम इंद्रराज यांचे या लेखाबद्दल आभार. नगरकर यांच्याबद्दल लिहायला मी त्याना विनविले व त्यानी या गोष्टीला मान देऊन आवर्जून इतका मोठा लेख लिहिला.

नगरकर यांच्या लेखनाच्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घटनांकडे लेख प्रकाश टाकतो. मराठीपासून इंग्रजीकडे वळलेल्या मोहर्‍यामागची मीमांसा विशद करतो. हे सारे लेखकाने दिलेल्या त्या प्रदीर्घ मुलाखतीमधे आलेलेच आहे.

नगरकर नावाचा कुणी लेखक मराठीमधे आहे, तो आवर्जून दखल घेण्यालायक आहे आणि मराठी पलिकडच्या जगात या नावाला निश्चित असे स्थान आहे या सर्व बाबी अगदी व्यवस्थित अधोरेखित झाल्यात.

मात्र याहून अधिक या लेखात निश्चित हवे होते.. अजूनही लिहिता येईल. "सात सक्कम.." वाचून प्रस्तावलेखकाच्या मनावर एक खोल संस्कार उमटला आहे असे लेखात (थोड्या निराळ्या शब्दांत ) म्हण्टलेले आहे. मात्र , हा संस्कार नक्की का उमटलेला आहे ? ही कादंबरी अशी काय आहे की जिला काही सन्माननीय नावांनी "संप्रति कोण हा नवा पुरुषावतार ?" च्या जातीच्या प्रतिक्रिया द्याव्यात ? "ककल्ड" मधे असे काय आहे की जिला "आजवर वाचलेल्या इंग्रजी कादंबर्‍यांपेक्षा निराळ्या जातकुळीची" असे परांजप्याना वाटावे?

थोडक्यात , हा लेख काहीसा "हाय ऑन र्‍हेटरिक, लो ऑन डेलिव्हरी" असा झाल्याचा प्रत्यय , विशेषतः किरणबद्दल अनभिज्ञ असणार्‍या (माझ्यासारख्या ) लोकांना येऊ शकतो.

काही प्रतिक्रियांमधे "कोसला"चा उल्लेख आलेला आहे. "सात सक्कम" आणि "कोसला" यांच्यामधे "एक्स्क्लुझिव ऑर" असणे अशक्य आहे असे प्रतिपादन झालेले आहे आणि त्यावर इंद्रराज यांनी ठामपणे रुकार भरलेला आहे. या प्रतिपादनामागची/रुकारामागची भूमिका त्यांनी उपरोल्लेखित मूलभूत घटकांच्या विश्लेषणासोबत मांडावी असे सुचवितो.

इन्द्र्राज पवार's picture

10 May 2010 - 6:30 pm | इन्द्र्राज पवार

श्री. एमएस.... आपण दिलेल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबाबत आभार अन् जे मुद्दे अधोरेखीत केले आहेत त्यांना सविस्तर उत्तर दिले पाहिजेच, पण ते इथे न देता त्यांना स्वतंत्र धाग्याचे रूप देत आहे. ~~ गिव्ह मी सम टाईम...!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2010 - 3:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किरण नगरकरांच्या लेखनाबद्दल फारसे माहिती नाही. 'सात संक्कं...ही वाचलेले नाही. मात्र आपल्या लेखनामुळे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करुन आपण ज्या 'ककल्ड' मधे 'कोसला' पाहात आहात तर त्यात काय असेल त्याचीही तितकीच उत्सूकता लागली आहे.

किरण नगरकरांचा उत्तम परिचय करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

इन्द्र्राज पवार's picture

9 May 2010 - 11:04 pm | इन्द्र्राज पवार

धन्यवाद सर.... वास्तविक अशा चर्चांचा खर्‍या अर्थाने हाच उपयोग म्हटला पाहिजे की, अचानक असे काही समोर येते जिच्यामुळे आपणास निखळ आनंदच मिळतो. मात्र "ककल्ड" च्या अगोदर "सात..." वाचण्याचा आग्रह धरा.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

दत्ता काळे's picture

9 May 2010 - 4:10 pm | दत्ता काळे

लेखक आणि पुस्तक हे दोन्हीही मला माहीत नव्हते, पण दोन्हींचीही ओळख छान करून दिलीत. सात सकं त्रेचाळीस वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

इन्द्र्राज पवार's picture

10 May 2010 - 12:06 pm | इन्द्र्राज पवार

"सात...." ची दुसरी आवृती "प्रतिमा प्रकाशन" ने काढली आहे अशी बातमी वर श्री. श्रावण मोडक यांनी दिली आहे.... आपल्या भागातील स्थानिक पुस्तक केंद्राकडून ती मागवून घ्यावी लागेल..... लेखक "खपाऊ" गटात नसला की, विक्रेतेदेखील अशा पुस्तकावर गुंतवणूक करीत नाहीत.... मात्र वैयक्तिकरित्या सांगीतल्यास मिळवून देतात, असा अनुभव मला आला आहे.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

अविनाशकुलकर्णी's picture

9 May 2010 - 7:32 pm | अविनाशकुलकर्णी

चित्पावन ब्राह्मण कुटुंबीयांनी वाळीत टाकलेल्या नगरकर कुटुंबाला इकडून तिकडे तिकडून इकडे फिरावे????? वाळीत>? हे नविनच ऐकतो आहे

इन्द्र्राज पवार's picture

10 May 2010 - 12:10 am | इन्द्र्राज पवार

खालील वाक्य खुद्द श्री. किरण नगरकर यांचे आहे. मुलाखतीत ते म्हणतात :
He (his grandfather) was ostracized because he broke away from the stranglehold of the Chitpavan brahmins. He died early and he left my father to look after the family. But despite the poverty, as is usually the case with middle-class Indians, education had a very high value. And then because moved around a lot there was a change in the medium of instruction. I moved to and stayed with English.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

विनायक पाचलग's picture

9 May 2010 - 7:39 pm | विनायक पाचलग

या माणसाबद्दल अगदी छोटे कुठेतरी वाचले होते हे खरे.....
वाचले पाहिजे ..
नक्की वाचीन

विष्णुसूत's picture

10 May 2010 - 4:02 am | विष्णुसूत

लेख आवडला.

महत्प्रयासाने हे पुस्तक मिळवून वाचले. आंतरजालावर कार्यरत असणार्‍या राज जैन या प्रकाशक अधिक पुस्तक विक्रेत्या दोस्ताने मिळवून दिले.

पुस्तक जितका गाजावाजा झाला आहे तितके भावले नाही मनाला. अर्थात आवड ज्याची हा भाग आहेच.

हीच गोष्ट कमलेश वालावलकर लिखित "बाकी शुन्य"ची. ती ही कादंबरी फारशी भावली नाही मनाला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन्ही कादंबर्‍या दोन वर्षांपूर्वी आऊट ऑफ प्रिंट होत्या.

आदूबाळ's picture

24 Jul 2014 - 1:43 pm | आदूबाळ

द एक्स्ट्राज हे रावण अँड एडीचे सीक्वलही आहे.

मेराथ नव्हे ते मेड़ता आहे.(आजच्या घडीला त्याचे नाव "मेड़ता सिटी" असुन ते नागौर जिल्ह्यात आहे)

बाकी चालू द्या!

श्रीगुरुजी's picture

25 Jul 2014 - 11:46 am | श्रीगुरुजी

"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात आवडले नव्हते. सुरवातीपासूनच लेखकाला नक्की काय म्हणायचे होते ते कळतच नव्हते. नेट लावून शेवटपर्यंत पुस्तक वाचले आणि संपल्यानंतर सुद्धा कणभरही पुस्तक समजले नाही ही जाणीव झाली. काही काळानंतर "ककल्ड" चा मराठी अनुवाद वाचायचा प्रयत्न केला. पुस्तक इतके कंटाळवाणे होते की ६०-७० पाने वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवले. असो.

"सात सक्कं त्रेचाळीस" अजिबात आवडले नव्हते. सुरवातीपासूनच लेखकाला नक्की काय म्हणायचे होते ते कळतच नव्हते. नेट लावून शेवटपर्यंत पुस्तक वाचले आणि संपल्यानंतर सुद्धा कणभरही पुस्तक समजले नाही ही जाणीव झाली.

अगदी अगदी.
कशाचाच कशाला ताळमेळ लागत नाही. एखदया कथा नसलेल्या चित्रपटासारखी आहे ही कादंबरी.

मी अजून सात सक्कं त्रेचाळीस वाचली नसली तरी रावण आणि एडी वाचली आहे जी खूप आवडली. कोसला मात्र पूर्ण कादंबरी म्हणून नावडती असली तरी काही भाग खूप जमून आले आहेत. प्रतिस्पर्धी लिस्ट वर आहे. बघू कधी योग येतोय.

पुस्तकमित्र's picture

28 Jul 2014 - 5:00 pm | पुस्तकमित्र

ही कादंबरी निपोंची पण भयानक आवडती आहे. :)

प्रचेतस's picture

28 Jul 2014 - 5:01 pm | प्रचेतस

निपो कुठे गेलेत?

किरण नगरकर या असामान्य महान लेखकाला श्रद्धांजली !

कोसला आवडलेली असल्याने 'सात सक्कं त्रेचाळीस' ची पहिली २० पाने वाचली, आणि नाही आवडली.

Cuckold चा मराठी अनुवादाची काही पाने वाचली आणि ती मात्र आवडली, थोडी वि स खांडेकरांच्या ययाती सारखी आहे असं वाटलं.

इथे दोन्ही पुस्तकांची सुरुवात मोफत वाचता येईल

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=56142757927210...

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=47861081564906...