सदगुरु च्या शोधात..

संजीव नाईक's picture
संजीव नाईक in काथ्याकूट
23 Mar 2008 - 3:50 pm
गाभा: 

|| प्रस्तावना ||

व्यवहारात कोणतेही कार्यसिध्दी प्राप्त होण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते.
अभ्यास नित्यएनियमाने चालु राहील तरच कार्यसिध्दी होउ शकेल. भगवंताने गीतेत सांगितले आहे--

" अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् |
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय || "
-- गीता १२.९
अभ्यास नित्यनियमानें करणें हेच सर्व बाबतींत श्रेयस्कर कार्य होय. अभ्यास नित्यनियमाने चालवित असता देहाला, इंद्रियांना व मनाला एक प्रकाराचे नियमित वळण लागते व त्यायोगे इंद्रिये व मन कार्यक्षम बनूं शकतात.
परमार्थमार्ग हा प्रापंचिकांना फारच अवघड वाटतो, कारण नित्याच्या प्रापंचिक व्यवहारापुढे पारमार्थिक कार्याचा बोजा वाढवून घेणे त्यांना शक्य नसते व सतत प्रापंचिक व्यवहाराच्या मार्या्मुळे इच्छा असूनसुध्दा पारमार्थिक उपासना करणे दुर्लभ घडते. परंतु प्रापंचिक व्यवहाराप्रमाणेंच जर पारमार्थिक उपासनेचा नित्यनियमित अभ्यास सुरु झाला तर पारमार्थिक उपासना हाही भाग प्रापंचिकांना नित्याच्या व्यवहारातील एक विषय होउन बसेल आणि म्हणुनच यासाठी उपासनेचे वळण लावण्यासाठी नियमित अभ्यासाची आवश्यकता आहे.

" नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्मकर्मणः |
शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ||
-- ३.८

यावरुन नियमित उपासनेची आवश्यकता पटेल यात शंका नाही. साधुसंतांनी प्रापंचिक लोकांचे ह्या लोकी कल्याण होण्यासाठी भक्तिमार्गाची अनेक साधने निर्माण केली आहेत. तथापि प्रपंचांचा बोजा चालविण्यार्यां ना साधनांची महती समजुनसुध्दा, ते साधना करु शकत नाहीत. याचे कारण एकच की, त्यांना अभ्यासाचे वळण लागण्यासाठीच नित्यनियमित साधनांचा अभ्यास घडला पाहिजे. अशा प्रकारे साधनांचा नियमित अभ्यास करणें यालाच " नित्यनियम " म्हणावें.
साधनाचा नित्यनियमित अभ्यास करीत असता,
" जैसा शरत्कालु रिगे | आणि सरिता वोहटूं लागे | तैसे चित्त काढेले वेगें | प्रपंचैनि || " ..... अथवा .....
" विषयी विसर पडला नि:शेष | अंगी ब्रम्हारस ठसावला || ( अंभग )
हा अनुभव साधकास प्राप्त होतो. साधनाचे नित्यनियमित व्रत चालू ठेवले अथवा चालू राहिले तर साधकास खडतर तपश्र्व्रर्येची सुद्धा आवश्यकता भासणार नाही व प्रपंचांचे नित्याचे व्यवहार चालवीत असताना सुध्दां साधक सिध्दस्थितीस जाऊन पोहचतो व त्याला भक्तीज्ञान आणि वैराग्य यांचा आपोआप अनुभव येत जातो.
बालपनापासून तो थेट वृध्दावस्थेपर्यत पोहोचलेल्यांना जे काही व्यवहारातिल ज्ञान प्राप्त झाले असले तेही त्यांच्या नित्यनियमाच्या आचरणाचे फल होय. अशा रीतीनें नित्यनियम चालू राहिला तर परमार्थसाधन कठीन आहे असे वाटणार्यांचना पण परमार्थ सहज, साधा व सोपा विषय आहे याची जाणीव झाल्याशिवाय रहाणार नाही.

नित्यनियम कसा करावा?...
नित्य नियमानें इष्ट देवता प्रसन्न होऊन ध्येयाच्या निश्र्चानें पुढे पाऊल पडण्यासाठी तो कसा करावा समजणें जरुरीचे आहे. यासाठी काहीं उपयुक्त सूचना पुढें देंण्यात येंत आहेत.
१) नित्य- नियम अर्थाकडे लक्ष देऊन म्हणावा. २) नित्य-नियम शक्य तितका सावकाश प्रेमळ भावानेनें म्हाणावा व करावा.
३) नित्य्-नियम हेंच त्याचें नांव असल्यानें तो निंत्य, नियमितपणें, नियमितवेळी केलाच पाहिजे.
४) काहीं विशिष्ट अड्चणीमुळे सर्व नित्यनियम वरिल प्रमाणे करणें (म्हणणे) श्क्य नसेंल तर श्रींनी समक्ष ठरवून दिलेला भाग तरी वरील तत्त्वत्मक सूचनांस अनुसरुन करणें फार जरुर आहे. " पंजाबमेलप्रमाणें" वेठीनें केलेल्या' नित्य्-नियमानें ध्येयाकडे प्रगति होणे शक्य नाही.
संजिव
क्रमष..२

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2008 - 7:06 am | llपुण्याचे पेशवेll

तुकाराम महाराजानी म्हणूनच भक्तीमार्ग हा सुगम म्हटले आहे. पण त्याच वेळेला भक्तीमार्गाला संत सुळावरील पोळी पण म्हणतात. जेवढा वाटतो तेवढा तो सोपा पण नाही. म्हणूनच या कामी सद्गुरुला शरण जा असेही सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज, रामानंद बीडकर महाराज यांनी नेटाने चालविलेल्या सद्गुरुशोधाचे वर्णन त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते.
आपण मांडलेला विषय उत्तम आहे संजीव साहेब. माझे ज्ञान त्या बाबतीत अतीशय अल्प आहे.

पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 8:21 am | विसोबा खेचर

संजिव साहेब,

आपला लेख चांगला आहे, पुढील लेखांकरताही शुभेच्छा!

व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर --

१) समाजातील एका घटकाला दरवर्षी यथाशक्ति, यथामती तन-मन-धनाने मदत करणे..

२) देशाचे सर्व कर वेळच्यावेळी, न चुकवता भरणे

३) आईची सर्वतोपरी सेवा करणे, तिची हाक, तिचा शब्द हा अंतिम मानणे, इतर वृद्ध मंडळींचीही यथाशक्ति, यथामती सेवा करणे, मदत करणे, शुशृषा करणे, ओळखीच्यांत, नातेवाईकात, मित्रमंडळीत, वेळीअवेळी अडल्यानडल्याला सर्वतोपरी, यथाशक्ति, यथामती मदत करणे,

हीच माझी नित्यनियमांची पारमार्थिक साधने आहेत व तीच मी आजपर्यंत पाळत आलेलो आहे !

पोथ्यापुराणं, मंत्रपठण, जपतप, यागत्याग, सत्संग, यज्ञ, होमहवन, यात मला काडीइतकाही रस नाही! माझं मनच त्यात लागत नाही..

आणि याच बरोबर फावल्या वेळात,

गोडाधोडाच्या, तिखटाच्या, सर्व आवडीच्या पदार्थांवर यथास्थित ताव मारणे, आवडत्या ललनेसोबत उंची विदेशी मद्यांची चव चाखणे, मित्रमंडळीत चावट विनोद करणे, सुखदु:खाच्या गप्पा मारणे, हीदेखील माझी स्वार्थिक आणि पारमार्थिक साधने आहेत!

अहो नियमितपणे संगीतसाधना, संगीताची श्रवणभक्ति, यातून जे पारमार्थिक सुख मिळते, जो आत्मिक आनंद मिळतो, तो दुसर्‍या कशातूनच मिळत नाही असं माझं मत आहे!

सुरेल तंबोर्‍याच्या जोडीत जमलेला एखादा यमन किंवा पुरिया, ताज्या फडफडीत मासळीचं गरमागरम जेवण आणि लालसर, खरपूस तळलेल्या पुरीसोबत देवगडी आमरसाचा एक घास, मोक्षप्राप्तीकरता मला पुरेसा आहे!

असो, आपल्या लेखमालेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

चतुरंग's picture

24 Mar 2008 - 10:53 am | चतुरंग

आपला लेख चांगला आहे.
माझे सूत्र असे - "ज्या ज्या वेळी जे जे काम करणे गरजेचे आहे ते ते न चुकता/चुकवता करणे ह्यालाच मी परमार्थ म्हणतो."
कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपले मन शांत रहाते आणि ते शांत असेल तर सहाजीकच आपण आपल्या स्व च्या जवळ जातो.
आपण जितके स्व च्या जवळ तितकेच आपण परमेश्वराजवळ!

चतुरंग