एक गिअर मेला
एक गिअर मेला.
तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो.
मी म्हणतो तो गिअर मेलाच.
असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला.
दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार?
तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे.
बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन.
आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्यांची.
तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये.
अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच. सगळे एकजात सारखेच पणे चालणारे.
ह्या गिअरवर अवलंबून लहान मोठे असे ५/६ गिअर्स होतेच.
अन तो एका मुख्य मोटरने जोडलेला असल्याने मुख्य म्हणायचे इतकेच.
हातात हात घालून तो चालत होता, अन जोडलेल्या इतर लहानमोठ्या गिअर्सला चालवत होता.
आताशा त्याला त्याच्या कामाचे ओझे वाटू लागले होते. त्याच्या वरचे गिअर्स आता खुप अवलंबून राहत होते.
त्याला मोटरकडून मिळणारी उर्जा कमी कमी होत होती. तो तरी किती उर्जा परावर्तीत करणार.
हळूहळू त्याचा एकएक दात झिजत होता. वंगण कमी पडत होते. त्याच्या अन इतर गिअरमध्ये अंतर पडू लागले.
त्याच्यामुळे इतरांचा खोळंबा होवून कामे रखडू लागली. उत्पादन कमी पडू लागले.
शेवटी व्हायचे तेच झाले. म्हणजे त्यालाही त्याची कल्पना होतीच. पण ती वेळ इतक्या लवकर येणार नाही ही आशा होती.
एके दिवशी त्याला मालकाच्या सांगण्यावरून काढून टाकण्यात आले.
फॅक्टरीत लागल्यापासून त्याला ओळखणारी मेंटेनन्स ची माणसे आता वेगळीच वागली.
खसाखसा पाने, हातोड्यांचे वार केले गेले अन त्याला बाहेर काढून भंगारात टाकले गेले.
त्याला लावलेली पिन, नट अन बोल्ट काढून त्याच्याच अंगावर फेकले गेले.
आता तो गिअर अगदी गलितगात्र झालेला होता. दात काढलेल्या नागासारखा. असूनही काहीच उपयोगाचा नसण्याचा.
..............................................................................................
मंडळी, म्हणूनच म्हटलो होतो, "एक गिअर मेला!" हो मेला!"
अहो, एखाद्या कामगाराला व्हि.आर.एस. घ्यायला लावली म्हणजे त्या कामगाराचे अन त्याच्यावर अवलंबून असणार्यांचे मरणच नाही तर काय?
म्हणूनच म्हटलो होतो,
"एक गिअर मेला!"
"एक गिअर मेला!"
प्रतिक्रिया
18 Apr 2010 - 8:55 am | जयंत कुलकर्णी
प्रत्येक गिअर हा दुसर्या गिअर्अनीच फिरत असतो. शेवटी त्या गिअर ट्रेनचा आत्मा असतो प्राईम मुव्हर. हा थांबला की सगळी ट्रेन थांबलीच ! जर प्राईम मुव्हर थांबायला नको असेल तर अधले मधले गिअर्स जर खराब झाले असतील तर बदलायलाच लागतील ना ! त्याच्या पुढचे म्हणजे एखादा गिअर खराब व्हायला नको असेल तर त्याच्या बरोबर फिरणार्या गिअर्सनी त्याच्या वर आपला अनावश्यक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे की नको ? आणि कमीत कमी गिअर्सअची गिअर ट्रेनची कार्यक्षमता ही जास्त असते हेही लक्षात घेतले पाहिजे ! एक कामगार आणि पाच अपत्ये...... गिअर तुटणारच......
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
18 Apr 2010 - 9:59 am | पाषाणभेद
"एक कामगार आणि पाच अपत्ये...."
हा हा हा... चांगली कल्पनाशक्ती. अहो घरी म्हातारे किंवा आजारी आई वडील, अजून कोणीतरी असू शकते. जयू भाऊ लय सिरीअस नगा घेवू ओ आमचं ज्ञान. लय कमी हाये त्ये.
:-) बाकी काय म्हणतात? खव वर बोला.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
18 Apr 2010 - 3:19 pm | इंटरनेटस्नेही
त्याला लावलेली पिन, नट अन बोल्ट काढून त्याच्याच अंगावर फेकले गेले.
जबरी..
19 Apr 2010 - 2:18 am | मीनल
लेखन छान आहे.
अमेरिकेतल्या ऑटो गिअरचे काय होत असेल काय माहित? तो ही मरतो का कधी?
मीनल.
http://myurmee.blogspot.com/