दापोलीला पहिल्यांदा गेलो, तेव्हा आसूदबागच्या केशवराज मंदिराला भेट दिल्यावर वेडावलो होतो. नारळा-पोफळांच्या बागेतून जाणारी वाट, अरुंद पण सुबक पूल, दमछाक करणारी घाटी आणि वर गेल्यावर झाडांच्या कुशीत विसावलेलं विष्णूचं सुबक मंदिर! दुधात साखर म्हणजे वर डोंगरावरून येणारा आणि बारमाही वाहणारा झरा! गेल्या वेळी सहकुटुंब गेल्यानं फार वेळ थांबायला वेळ नव्हता. परंतु पुढच्या वेळी येऊ, तेव्हा या झऱ्याचा उगम शोधून काढायचाच, असं निश्चित केलं होतं.
गेल्या रविवारी तशी संधी मिळाली. दीड दिवसासाठी दापोलीला गेलो होतो. पहिल्या दिवशी एका मित्राबरोबर तामस तीर्थ-लाडघर इथे फिरल्यानंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून एकट्यानंच केशवराजला जायचं ठरवलं. रस्ता माहीत असल्यानं कुठे वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता. दापोली स्टॅंटवरून टमटम पकडली आणि आसूदच्या उतारावर उतरलो. ठरल्याप्रमाणं माडा-पोफळांच्या बागेतून वाटचाल सुरू केली. सकाळचे साडेआठ वाजले होते. कोवळ्या उन्हाची तिरीप पोफळींच्या मागून डोकावत होती. तिला जमिनीपर्यंत पोचण्याची संधी अभावानंच मिळत होती. अनेक ठिकाणी "फियान'च्या खुणाही दिसत होत्या.
माडा-पोफळांचं बन पार करून या वाटेवरच्या पायऱ्यांवर आलो. माझ्यापुढे एक साठीच्या आजी वॉकरचा आधार घेऊन चालत होत्या. ""मुंबईहून आलेल्या दिसतायंत. या काय घाटी चढून देवळापर्यंत पोचणारेत?'' - माझ्या पुणेरी-कोकणी मनानं मनातल्या मनात टोमणा मारला.
याच पायऱ्यांवर एक झाड फियानच्या हल्ल्यात शहीद झालेलं दिसत होतं. त्याच्याखालून जाण्याची वाट मात्र मजेशीर होती. "मनस्वी आली असती, तर इथे धिंगाणा केला असता!' क्षणभर वाटून गेलं.
या वेळी डिजिटल कॅमेरा सोबत असल्यानं सगळ्या वाटेचे आणि दिसेल त्याचे ("तिचे' नव्हे!) फोटो काढत होतो. ब्लॉग लिहायला उपयोगी पडतील, हा विचार मनात होताच! पुढे आसूदचा तो प्रसिद्ध पूल आला. शेजारीच जुन्या साकवाचे अवशेष शिल्लक होते. तिथून पाच-दहा मिनिटांत घाटी चढून वर पोचलो.
केशवराजच्या दर्शनानं मन प्रसन्न झालं. म्हणजे मूर्तीच्या नव्हे - देवळाच्या! मी मूर्तीला क्वचितच नमस्कार करत असलो, तरी कोकणातली आणि कुठल्याही आडवाटेवरची देवळं मला फार आवडतात! अगदी शांत, प्रसन्न वाटतं तिथे. मी पोचलो, तेव्ह्ा अगदी सामसूम होतं. साफसफाई करणाऱ्या महिलेच्या खराट्याचा आवाज तेवढा शांततेचा गळा घोटत होता. या वेळी झरा अगदी खळखळून वाहत होता. हात पाय धुवून पाच मिनिटं देवळात टेकलो आणि वर उगमाकडे सुटलो.
नीट बांधलेल्या दगडी पाटातून खाली पाणी खळाळत वाहत होतं. उभी चढण चढून गेल्यानंतर एका कातळातून चर पाडून हे पाणी खालच्या पाटात आणलं असल्याचं दिसलं. तिथून आणखी वर गेलो. उगम त्याच्याही वर होता. मध्येच एक शेवरी भिरभिरत खाली आली. मी कॅमेरा सरसावून फोटो काढेपर्यंत खाली धरणीला जाऊन भिडली देखील! तिचं रूपच एवढं लोभस होतं, की डोळ्यांच्या कॅमेऱ्यांना मध्ये कोणताही अडथळा नकोसा वाटत होता. पुन्हा उचलून वर उडवायचा प्रयत्न केला, पण पठ्ठी काही कॅमेऱ्यात टिपून घेईना! खरी रूपगर्विता असावी!! शेवटी मीच नाद सोडला.
वर गेलो आणि एकदाचा त्या झऱ्याचा उगम सापडला. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात. मी ऋषीच्या कुळाच्या वाटेला जाण्याची कधी शक्यता नाही, पण या झऱ्याचं मूळ तरी मी शोधून काढून काढलं होतं! दोन-तीन ठिकाणांहून त्याचा उगम झाला होता. अगदी पावसाळ्यातली उपळटं फुटावीत, तसा! (जमिनीखालून वाहणारं पावसाचं पाणी एखाद्या ठिकाणी गडगा किंवा बांधाखालून बाहेर पडतं, त्याला "उपळट' म्हणतात.) तिथून खाली देवळापर्यंत येईपर्यंत मात्र हा झरा त्या भोपळ्यातल्या म्हातारीसारखा गलेलठ्ठ होत होता! निसर्ग त्याला कुठली तूप-रोटी भरवत होता, कुणास ठाऊक!
संशोधनाची, ट्रेकिंगची आणि साहसाची हौस बऱ्यापैकी भागल्यावर मी खाली उतरायला लागलो. "कसा दमवला' म्हणून तो झरा माझ्यापुढे पळत मला वेडावत असलेला भासला. खाली गेल्यावर त्याला आठवणीसाठी नव्हे, तर उदरभरणासाठी बाटलीत भरून घेऊया, असं ठरवलं होतं. पण बाटलीत बंद होणं त्याच्या प्रवृत्तीला मानवणारं नसावं बहुधा. खाली आलो आणि तसाच घाटी उतरून परतीच्या वाटेला लागलो. मघाच्या त्या आजी घाटी चढून वरपर्यंत आल्या होत्या.
घाटी उतरून पूल पार करून खाली आलो आणि लक्षात आलं, झऱ्याचं पाणी भरून घ्यायचंच राहिलं!
काही सुखं अशी अर्धवटच चाखायची असतात. पुढच्या वेळी त्यांच्यापर्यंत जाण्याचं त्यामुळंच बळ मिळतं...!!
प्रतिक्रिया
17 Apr 2010 - 12:36 pm | मदनबाण
शोध कार्याचे फोटो भारी हायेत... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
17 Apr 2010 - 12:37 pm | डावखुरा
छान जमलंय....
पण छायाचित्रे एका बाजुला आणि लेखन दुसर्या बाजुला करण्या ऐवजी लेखनात वर्णनानुसार छायाचित्रे डकवली असती तर जास्त मजा आली असती...
"राजे!"
17 Apr 2010 - 12:41 pm | झुम्बर
फरच सुन्दर शोध
विलोभनिय असा
सुन्दर
17 Apr 2010 - 1:18 pm | पांथस्थ
मलाहि हे मंदिर आवडले होते. बाकि शोध जबराच!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
17 Apr 2010 - 6:31 pm | अनिल हटेला
उगमाचा शोध आवडला बरे......:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
4 May 2012 - 7:05 pm | बॅटमॅन
उगम शोधणे मलापण लै आवडते, पण अजून्प्पर्यंत चान्सच नै मिळाला.
4 May 2012 - 10:51 pm | बालगंधर्व
आपला अभिजित, तुमचे शोधकार्य चांगले आहे. कोकण हे महाराश्त्राचे वैभव आहे. झर्याचे उगम शोधणे हे काम खुप आह्वानाम्तक आहे. छ्हान.
5 May 2012 - 6:15 pm | चौकटराजा
लेखनच मुळी इतके चित्रमय आहे की फोटोच थोडे डावे वाटतात. सवे चित्रात काहीशी हेज दिसते आहे. की माझ्या चषम्याची कांच भुर्कट झाली आहे . की मा झ्या मॉनिटर चे कॅलीब्रेशन चुकले आहे ?
तुम्हाला लिहिण्याचे अंग आहेच यात शंका नाही . त्यामुळे मी आपल्याना मनात " मनमार्क " करून ठेवले आहे.
7 May 2012 - 12:06 pm | योगप्रभू
त्या मधल्या पुलावर उभे राहिल्यास दोन्ही बाजूंकडे इतके विलोभनीय दृश्य दिसते. केवळ झाडे, हिरवाई आणि नदी.
खूप छान जागा आहे केशवराज मंदिर. बिच्चारा केशवराज मात्र एकटाच उभा आहे. लक्ष्मीमाता नेहमीप्रमाणे रुसून माहेरी गेलेली दिसते.
मंदिरापर्यंत चढून जाणे म्हणजे दमछाक होते, पण वर पोचल्यावर शीणवटा दूर होतो. विशेषतः ते झर्याचे पाणी प्यायले तर इतके समाधान मिळते.
धन्यवाद अभिजित. शक्य असल्यास आंजर्ल्याजवळच्या कड्यावरचा गणपती व वरुन दिसणारा समुद्राचा फोटो टाक. आहे का तुझ्या संग्रहात?
8 May 2012 - 3:23 pm | स्वानंद वागळे
हे केशावाराजाचा मंदिर बांधताना ३ एकसारख्याच मूर्ती आणल्या होत्या. पहिले मंदिर हे दापोलीत बांधले ज्याचे आपण वर्णन केले आहे. दुसरे मंदिर इथूनच जवळ असणार्या मंडणगड तालुक्यात अगदी डोंगराळ भागात घराडी आणि शेडवई या दोन गावांच्या हद्दीवर आहे आणि तिसरे बहुतेक दक्षिण कोकणात अशाच कुठल्यातरी दुर्गम भागात बांधले आहे. मंडणगड तालुक्यातील हे मंदिर लोकांच्या फारसे परिचयाचे नाही कारण ते फारच दुर्गम भागात आहे. पावसाळ्यात पहिला महिना भर या मंदिरा बरोबर संपर्क नसतो कारण जो ओढ पार करून मंदिरात जावे लागते तो दुथडी भरून वाहात असतो. या मंदिराच्या बाजूलाच एक बारमाही विहीर आहे जेथून घराडी आणि शेडवई या गावांना पाणी पुरवठा होतो..........
परत संधी मिळाल्यास या मंदिराला ही आवश्य भेट द्यावी.
--स्वानंद वागळे
15 Jul 2012 - 11:31 am | पैसा
अभिजित किती दिवसांनी उगवला याचा शोध घेताना हा लेख गवसला. मस्त!