चंद्रगड आणि ऑर्थरसीट

बज्जु's picture
बज्जु in कलादालन
11 Mar 2010 - 5:22 pm

चंद्रगड आणि ऑर्थरसीट

चंद्रगड आणि ऑर्थरसीटचा ट्रेक म्हणजे महाबळेश्वर आणि जावळी खोर्‍यांमध्ला एक नितांत सुंदर ट्रेक. सदाहरित जंगलाचा हा प्रदेश. तर अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या, आणि निर्सगरम्य परिसरातून ट्रेक करणं म्हणजे एक अविस्मरणिय अनुभवच.

थोडक्यात इतिहासः- जावळी खोर्‍यावर वर्चस्व असलेले सूर्यराव/चंद्रराव मोरे सहजासह्जी स्वराज्यात सामील होत नाहीत हे पाहून महाराजांनी त्यांच्याकडे असलेला रायरीचा किल्ला म्हणजे रायगड स्वारी करुन स्वराज्यात सामील करुन घेतला. जिवाच्या भितीने मोरे जावळीखोर्‍यात असलेल्या चंद्र्गडावर लपून राहिला. महाराजांना ही माहिती समजताच त्यानी मोर्‍यांना माफ करुन स्वराज्यात येण्याची विनंती केली. पण मग्रुर मोर्‍यांनी महाराजांनाच उलट निरोप पाठ्वला तुम्ही उद्या येणार असाल तर आजच या, आमचा प्रदेश महाभयंकर जंगलानी वेढ्लेला आहे. जावळीला येताच तुम्ही आमच्या मुठित याल, आम्ही तुमचा सपशेल पराभव करु वगैरे वगैरे. अखेर महाराजांनी मोर्‍यांच पूर्ण पारिपत्य केलं आणि जावळी व आजुबाजूचा परिसर स्वराज्यात सामील करुन घेतला. मुळचे "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य बखरीत चंद्रराव मोरे यांच्या तोंडी आहे. असो हा झाला थोडक्यात इतिहास. आता इतिहासातुन थोडे बाहेर येउ.

शनिवारी सकाळी ६.३० ला आम्ही चौघे जण मारुती ८०० घेऊन निघालो. साधारण १०.३० पर्यंत महाड्ला आलो. तिथे यथेच्छ मिसळपाव, चहा हाद्डून पुढे पोलाद्पूर - कापडा फाटा मार्गे, ऊमरठ या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्म ठिकाणी आलो. ऊमरठला येईपर्यत ११.३० वाजुन गेले.
ऊमरठ
Umrath - Road Map

नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीचे प्रवेश्द्वार
Tanaji Malusare Janmasthala - Umratha

नरवीर तानाजी आणि शेलारमामा यांची समाधी
Tanaji Malusare Samadhi

Tanaji & Shelarmama Samadhi

तानाजी आणि शेलारमामा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे ढवळे गावात जाण्यासाठी निघालो. ढवळे गावातुनच पुढे चंद्रगड आणि ऑर्थरसीटला जायचे होते. ढवळे गावात यायाला दुपारचे १२.३० झाले. गावातील एका घरात जेवणासाठी व रहाण्यासाठी चौकशी केली. जेवून साधारण ३.०० च्या सुमारास चंद्रगडावर जाण्यासाठी निघालो. ५-१० मिनीटातच चंद्रगडाचे पहिले दर्शन झालं.

चंद्रगड - ढवळे गावातुन
Chandragad from Dhavale Villege

ढवळे गावातुन जवळच असलेल्या धनगरवाड्यात पुढची वाट विचारुन घेतली आणि १५ मिनीटातच गडाच्या मुख्य चढणीला लागलो. पुढ्ची वाट दाट झाडीतून जाणारी होती. पण वाटेवर "हरी ओम" चे बोर्ड झाडाला लावलेत असं धनगरवाड्यातील लोकांनी सांगुन ठेवलं होत, त्यामुळे वाट शोधायला लागली नाही.

दाट झाडीतून जाणारी वाट.
At 2.30 p.m. we started for Chandragad from Dhavale Villege

वाटेत एके ठीकाणी चंद्रगड दर्शन अशी पाटी दिसली. या पाटीपासुन चंद्रगडाच्या माथ्यापर्यंत सगळा अंगावरचा चढ आहे. वाटेत घसाराही भरपुर आहे.

Chandragadachya Vatevar

साधारण अर्ध्यातासात चंद्रगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर ऊघड्यावर पडलेले देव, पाण्याचे टाके व कड्याच्या पोटात लपलेली छोटीशी गुहा या व्यतिरिक्त काही नाही. माथ्यावरुन ढवळे गाव, ढवळी नदी, आजुबाजूचा रायरेश्वर पर्यंतचा परिसर आणि आमचे दुसर्‍या दिवशीचे टार्गेट ऑर्थरसीट फार सुरेख दिसत होते.

पाण्याचे टाके
Chandragad - Kadyatil Panyache Take

रायरेश्वराजवळील नाखिंदा टोक
Chandragadavarun Samoril Ranget Nakhinda Tok

ढवळी नदी व जावळी परिसर
Dhavali Nadi & Villege from Chandragad

मागील रांगेत महाबळेश्वरचे ऑर्थरसीट
Arthurseat Zoom

संध्याकाळी पाचच्या सुमारास चंद्रगडाहून निघालो ते पुन्हा ढवळे गावात यायला ६.३० झाले.

ढवळे गावात परतताना
At 6.30 p.m. - Enroute Dhavale from Chandragad

दुसर्‍या दिवशी सकाळी चहा प्यायला, पाणी भरुन घेतलं आणि मामांचा निरोप घेऊन आम्ही तिघेजणं ऑर्थरसीटकडे रवाना झालो. आमच्यापैकी एक, संदीप, गाडी घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला ऑर्थरसीटला घ्यायला येणार होता.

चालायला सुरवात केली आणि साधारण एक तासाने लक्षात आलं कि आपण वाट चुकलो आहोत @) , पुन्हा गावाच्या दिशेने मागे फिरलो, अर्ध्या वाटेत आलो तेव्हा कुठे शेतात काम करणारा एक माणूस भेटला, त्याला म्हंट्ल जरा वाटेला लावून द्या पण शेतातलं काम सोडून यायला तो तयार होईना, अगदीच हातापाया पड्लो तेव्हा तो तयार झाला पण अर्ध्या वाटेत असलेल्या सापळखिंडीपर्यंतच आपण येऊ असे त्याने सांगितले. सापळखिंडीपर्यंत त्या मामाने कुठ्ल्या वाटेने आणले ते आजपर्यंत काही लक्षात येत नाही. पण वाटेला लागलो हे नक्की. मामाला निरोप दिला, जाता जाता पुढ्ची वाट विचारुन घेतली. तोपर्यंत भरपुर वेळ निघुन गेली होती. सापळखिंडीचा चढ काही संपता संपत नव्ह्ता.

सापळखिंड - केव्हा संपणार हा चढ ?? ~X(
Kevha Sampanar ha chadh?? Sunil in Sapalkhind

दुपारी दोन वाजून गेले तेव्हा कुठे आम्ही सापळखिंडीचा चढ चढुन बहिरीच्या देवांपाशी आलो. येथून एक ते दिड तासात ऑर्थरसीटला पोहोचू असा अंदाज होता. जवळ्चे पाणी संपत आले होते पण बहिरीच्या देवांपाशी पाण्याची टाकी आहेत हे माहीत होते. पण ती टाकी काही आम्हाला कुठे दिसली नाहीत. ऑर्थरसीटला जाणारी वाट त्या टाक्यांच्या मागुनच जाते त्यामुळे पाण्यासाठि जास्त वेळ न घालवता लगेच निघायचे ठरले. पुन्हा एक दिड तास चालल्यावर लक्षात आले कि आपण चुकत आहोत, बराच वेळ निघून गेला होता. आत्ता जवळ पाणीही अगदी कमी होते आणि वाटही मिळ्त नव्ह्ती. शेवटी चारही दिशेला वाटा शोधून दमलो आणि लक्षात आलं कि आज काही आपण ऑर्थरसीटला पोहोचू शकत नाही. आज जंगलातच झोपाव लागणार, ऊद्या सकाळी ऊठून काय ते बघू. रात्र झाली, जंगलातून वेग्-वेगळे आवाज यायला सुरुवात झाली (बहुदा पक्षी आणि रातकिडे) पण त्याचे विशेष काही वाट्ले नाही. तसेच उघड्यावर झोपलो. तशी उघड्यावर झोपायची सवय होती म्हणा. पण नुकताच मलेरियातुन ऊठ्लो होतो म्हणुन जरा काळजी.

याच पठारावर झोपलो.
Our Stay on Pathar Near Bahiriche Dev

पहाटे ऊठून नव्या ऊत्साहाने पाण्याची टाकी शोधायला सुरुवात केली आणि १० व्या मिनीटाला आम्ही टाक्याला पोचलो जी आद्ल्या दिवशी २ तास प्रयत्न करुनही मिळाली नव्हती.

पाण्याची टाकी
Enroute Arthurseat - Panyachi Taki

भरपुर पाणी पिऊन, बाट्ल्या भरुन निघालो. १५ मिनीटात पहिला चढ चढला आणि समोर एकदम दरीच आली. हेच ते सावित्रीचं खोर.

Savitri Khore

ईथून २५-३० मिनीटात ऑर्थरसीटला पोहोचणार होतो.
On the ridge - From this spot Arthurseat is half hour

सावित्रीचं खोर
Savitri Khore - View from Arthurseat

आता ऑर्थरसीटच्या अगदी जवळ आलो, नजरेच्या टप्प्यात. ऑर्थरसीटला ऊभे असलेले लोक कौतुक मिश्रीत आश्चर्याने आमच्याक्डे बघत होते. हे इक्डुन कुठून आले ? असेच भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते.
Arthurseat Just 10 minutes

ऑर्थरसीट
Arthurseat Point - Our Destination

Sandip came by car & meet us on the Point

आम्हाला घ्यायला आलेला संदिप रात्री ऊशिरा पर्यंत आमची वाट बघून शेवटी क्षेत्र महाबळेश्वरला जाऊन झोपला, तो दुसर्‍यादिवशी सकाळी पुन्हा आम्हाला घ्यायला आला. धन्य त्याची

अशातर्‍हेने "येता जावली, जाता गोवली" हे वाक्य वाट चुकल्यामुळे आमच्या बाबतीत खरे ठरले.

गडप्रेमी बज्जु

ता.क.: कॅमेरातील लेन्समध्ये काहीतरी तांत्रीक बिघाड झाल्याने फोटो धुरकट आलेले आहेत.

प्रवासइतिहासभूगोल

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 12:25 am | विसोबा खेचर

मस्तच रे! :)

प्रचेतस's picture

12 Mar 2010 - 8:59 am | प्रचेतस

ओघवते वर्णन........
तुमच्याबरोबर भटकंतीसाठी यायलाच पाहीजे.

........
(भटंकतीप्रेमी) वल्ली

संताजी धनाजी's picture

12 Mar 2010 - 10:26 am | संताजी धनाजी

क्लास!

- संताजी धनाजी