अरे तुझी टोपी : अरुण कोलटकरांच्या कवितेचं रसग्रहण

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
23 Feb 2010 - 9:08 pm

प्रथम वाचनात खालील कविता अगम्य वाटते. पण नीट अर्थ लावल्यास कवीला काय म्हणायचंय हे नुसतंच स्पष्ट होत नाही, तर आतमध्ये कुठे तरी लागतं

अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात
कपाळ पहिलं सांभाळ
काय डेंजर वारा सुटलाय
डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोक्यात

साहेबाची खिडकी फुटली
गादीवर काचा काचा
आपोआप गुंडाळतोय
पंजाब्याचा गालिचा
पार्शिणीचा फ्लावरपाट
गडाबडा लोळतोय

सिंधीणीच्या दांडीवरली
म्हागडी नायलॉन साडी
चालली वार्‍यावर हवाई झाज
नवव्या मजल्यावरल्या
बंगाल्याचा लेंगा लगेच
लागला तिच्या पाठी

खापरांना फेफरं भरलं
फडफड करतायत पाखरांसारखी
कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या
डिगर्‍या ठिकर्‍या फरशीवरती
नार्‍या नार्‍या तुझा बाप
सटकला की फोटोमधनं

मैदानावर जिकडंतिकडं
एसेस्सीचे पेपर
धावत्या मर्जीडीझवर
कडकडकडाट झाड पडलं
प्रोफेसरसाहेब तुमची
कविता गेली उडत

पळा पेंटर
र्‍हाऊदे रंगाचं डबडं
झ्यायरातपत्रा खडखड करतोय
तुम्हीच रंगविलेली पंचवीस फुटी हेलन
तुमच्या बोकांडी बसणाराय
ढेंगात मानगूट पकडणाराय

मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
भारताचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट
गेला सरळ आकाशात

------------------------

अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात
कपाळ पहिलं सांभाळ

मला असं वाटतं की बाजूला चालू असलेल्या चर्चेशी या कवितेचा घनिष्ठ संबंध आहे. आपलं कपाळ फुटत असताना, दर्शनी टोप्या सांभाळण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकं, लहान मुलं - कुपोषण, हगवण, मलेरिया, प्रसुतीसुविधांचा अभाव, अस्वच्छता, गढूळ पाणी यामुळे दशलक्षांनी दरवर्षी मरतात. शिक्षणाचा अभाव, गरीबी आणि भ्रष्टाचारामुळे कित्येक कोटी 'कुणी दाबुनी जखम आजची, जरा उद्याचा काढावा पू' (आयला पुन्हा मर्ढेकरच) करत जगतात. हे सगळं भारतात होतं.

आणि इंडियातले विचारवंत

डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोक्यात

घालून लोकशाहीची टोपी सांभाळत बसतात. राजकारण्यांच्या सर्कशीकडे मंत्रमुग्ध होऊन पाहात राहातात. आणि ही खेळी चुकीची ,हे नियमाप्रमाणे नाही यातला कोणाचा कौल बरोबर यावर जणु काही थर्ड अंपायर असल्याप्रमाणे भांडतात.

या दु:खातून, गरीबीतून अशांततेचं, असंतोषाचं वादळ निर्माण झालंय. सगळीकडे हे वादळ सुटलंय, आणि त्यात सगळेच सापडले आहेत. वादळाला भारत, इंडिया असले भेद माहीत नाहीत. ते सर्वभक्षी आहे - पंजाब, सिंध, मराठा, बांग्ला सगळे त्याच्या कचाट्यात सापडतात. त्यात साहेबाच्या खिडकीचा - उधार घेतलेल्या दृष्टीकोनाच्या ठिकऱ्या उडतात. पायाखालची जमीन (गालिचा) सरकते. शिक्षणाच्या चिंधड्या उडाल्या - कारण सुशिक्षितांच्या घोकंपट्टीचा काही उपयोग नाही. आपल्या पूर्वजांचे जुने पुराणे विचार चौकटीतून नष्ट होतात (फोटोमधून निसटले). या वादळात प्रोफेसरांचं उच्चभ्रू गुलगुलीत काव्य काय किंवा तीच ती हेलन रंगवणारी षंढ कला काय, सगळ्या उडून जाणार. कशाला काही अर्थ नाही, किंमत नाही. यात टिकून राहील असं काय आहे? नीतीमत्ता? ती लेंगे साड्यांसारखी उडून जाणार. कृत्रिम सौंदर्य? ते फ्लॉवरपॉटसारखं घरंगळून जाणार. शाश्वत काय आहे? शेवटी "अशाश्वताच्या वादळामध्ये शाश्वताचीही उडेल टोपी..."

आपल्याला आज वादळाच्या खुणा दिसत आहेत. पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो म्हणून ते दाखवून देण्याची कवीवर पाळी येते. आणि हे वादळ हाताबाहेर गेलं तर सगळा भारत देशच तो ज्या तत्त्वांच्या खुंटीवर टांगला आहे त्यासकट उडून जाईल... तेव्हा वादळ थांबवा, टोप्या नंतर ठीकठाक करा असा कवीचा रोख वाटतो. वादळ थांबवणं सोपं नाही. पण नुसताच डोक्यात कचरा भरून टोप्या सांभाळणं हे त्यावर उत्तर नाही.

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Feb 2010 - 10:06 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर विवेचन... या दृष्टिकोनातून ही कविता परत वाचायचा प्रयत्न करतोय.

बिपिन कार्यकर्ते

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 6:43 am | अक्षय पुर्णपात्रे

कवितेतला वारा रसग्रहणात चाणाक्षपणे पकडला आहे. कोलटकरांची कविता एक चित्रसफरच असते. सोसाट्याचा वारा सोडून पाळलेली बंधने, सीमा धूसर झालेल्या आहेत. हेतर रसग्रहणात चांगलेच पकडले आहे. पण पहिल्या सहा ओळी विचारवंतांसाठी आहेत काय? कवितेत वादळ थांबवण्याची गरज जाणवते आहे का? या गोष्टी मात्र प्रत्येकाने स्वत:करता पाहता येतील.

धूळ, कचरा बाहेरून डोक्यात जाणार आहे. त्या आधीच आत आहे असे मात्र नाही. काय लपवायचे आहे? प्रतिक्षिप्तपणे टोपी पकडण्याची धडपड आलेल्या वादळास जोखण्यास कमी पडत आहे का? कोलटकरांनी सगळे उडत असतांना पेंटरला (काहीतरी पुन्हा चितारण्यासाठीचा असलेला रंग सांभाळू नको तर पळ) आणि डोके लपवणारे (कपाळ सांभाळा) यांनाच काहीतरी करायला लावले आहे. इतर तर दृष्याचाच भाग आहेत. आपल्यापुरते यात पाहीजे ते शोधावे.

कोलटकरांनी वाचलेली एक कविता खाली अशीच चित्रांनी भरलेली, सरमिसळ करणारी.

मुक्तसुनीत's picture

24 Feb 2010 - 7:11 am | मुक्तसुनीत

कविता समजावून घेण्याचा प्रयत्न आवडला. माझ्या एका कोलटकरवेडया मित्राने आम्हाला सांगितले होते की कोलटकर बॉब डिलनचे फॅन होते. डिलनच्या "blowin' in the wind" आणि "the times they are a' changing" या गाण्यांचा प्रभाव या कवितेवर पडलाय असे त्याचे म्हणणे.

कोलटकरांच्या कविता एकदम वायझेड असतात काहीकाही. नव्वदोत्तरी पोरांवर त्यांची घनदाट छाया पडलेली आहे....

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 7:37 am | अक्षय पुर्णपात्रे

डिलन कोलटकरांना आवडत असेल पण वारा सोडून सारख्या जागा मला सापडत नाही. 'ब्लोइंग इन विंड' मध्ये डिलनला श्वास घेतो त्या हवेत समाजातील अनेक मानवी उणीवांची उत्तरे आहेत, असे काहीसे जाणवते. या कवितेत असे काय आहे जे या गाण्याशी साधर्म्य जाणवते? दोन्ही गाणी सरळ आहेत. व्यक्तिगत क्षणांत जाणवाव्या अशा जाणीवा नाहीत. वरच्या कवितेत असे खूप आहे जे स्वतःसाठी पाहता येते. अर्थ शोधता येतो. निरीक्षकाची तटस्थता आहे तसेच अनुभवांच्या फांद्यांची सावलीही आहे. डिलनची दोन्ही गाणी तशी आत्ममग्न नाहीत. गाणी ऐकून त्या पिढीतल्या सगळ्यांनाच एकच अनुभव येतो. कोलटकरांच्या कवितेत वाचकाला स्वातंत्र्य आहे.

कोलटकरांच्या कविता एकदम वायझेड असतात काहीकाही. नव्वदोत्तरी पोरांवर त्यांची घनदाट छाया पडलेली आहे....

तसेच वरील विधानही अनुत्तोरीत आहे. नव्वदोत्तरी पोरे म्हणजे काय तेही माहीत नाही. थोडा प्रकाश पाडा.

डिलनचे 'ब्लोइंग इन द विंड' गाणे खाली देत आहे.

तसेच 'टाइम्स दे आर ए चेंजिंग' हे पण

मुक्तसुनीत's picture

24 Feb 2010 - 8:06 am | मुक्तसुनीत

कोलटकरांचा प्रभाव नव्वदोत्तरी लोकांवर पडला आहे हे माझे माझ्यापुरते बनलेले मत.

कोलटकरांच्या कवितेमधे मला प्रतिमांचा सोस दिसत नाही, कठीण शब्द दिसत नाहीत ; मात्र होणारा परिणाम फार गडद असतो. त्यांची कविता सामाजिक भाष्य करताना मला आढळलेली नाही. "ही कसली कविता ?" असे देखील बर्‍याचदा वाटून जाते. मात्र काही गोष्टींच्या बाबतीत पुढील कवींच्या पिढीने त्यांचे ऋणी राहायला हवे.

मर्ढेकरांच्या महायुद्धोत्तर जाणीवा आणि शैलीमधली क्रांती करणार्‍या कवितेपेक्षा , चित्र्यांच्या किंवा ग्रेसच्या प्रतिमासंपृक्त कवितेपेक्षा , ढसाळ यांच्या अत्यंत उग्र अशा विद्रोही कवितेपेक्षा , डहाके यांच्या काफ्काच्या जवळ जाणार्‍या अधोलोकदर्शनी कवितेपेक्षा , कोलटकरांच्या थेट शैलीचा , शब्दांच्या रोकडेपणाचा , कवितेमधून दाखवलेल्या अतिवास्तवतेचा , डार्क ह्युमरचा "बळवंतबुवा" , "जेजुरी" यांच्या जगातल्या रोचक नैतिकतेचा प्रभाव सचिन केतकर , हेमंत दिवटे , मन्या जोशी, वर्जेश सोलंकी यांच्या कवितांवर मला जास्त जाणवतो. कोलटकरांच्या संपूर्ण "चिरीमिरी" चा अपवाद वगळता, माझ्यामते कोलटकरी कवितेतला निवेदक हा नागरी संस्कृतीतून आलेला आहे. नव्वदीतल्या शहरी कवींशी इथेसुद्धा त्यांची नाळ जुळते असे मला वाटले. आणि प्रयोगशीलतेमधे तर कोलटकर हे या लोकांचे धुरीण शोभावेत. मजूरांच्या तोंडचे संवाद काय , तक्त्यातली अक्षरे काय , "चरित्र" मधल्या "दिखता नही क्या , दिखता नही " सारखी भन्नाट पुनरुक्ती काय ... हाच प्रकार मग आजच्या नितीन कुलकर्णी सारखे लोक करताना दिसतात.

असो. माझे विधान फारच जनरल होते हे मी पुन्हा नमूद करतो.

राजेश घासकडवी's picture

24 Feb 2010 - 8:16 am | राजेश घासकडवी

तर मग दुसरं काय आहे?

तक्त्यातल्या अक्षरात जर तुम्हाला वर्णव्यवस्था दिसली नाही याचं आश्चर्य वाटलं...दुसरं नाहीच काही. ती ठासून भरलेली आहे त्या कवितेत. ती उगाच अक्षरांची व चित्रांची भरताड नाही.

राजेश

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 8:29 am | अक्षय पुर्णपात्रे

नव्वदोत्तरी कविता म्हणजे काय? हे माहीत नाही. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर असा अर्थ गृहीत धरतो. प्रभाव कोणाचा कोणावर हा तर खूपच व्यापक प्रश्न आहे. माझ्या अपर्‍या वाचनाने त्यावर कुठलेच विधान माझ्याच्याने करणे शक्य नाही. नागर निवेदकाबाबत (सचिन केतकर , हेमंत दिवटे , मन्या जोशी, वर्जेश सोलंकी (यातील केतकरांचे निबंध सोडून माझे वाचन नाही.)) काही मात्र सांगता येईल. तुम्हा-आम्हाला नागर निवेदक सोडून कुठल्या निवेदकास पाहता येते? मागे एकदा बिरुट्यांनी कुठल्या तरी नवोदीत कवीविषयी (कदाचित ग्रामीण) लिहिले होते. आमच्या अनुभवांच्या मर्यादेसाठी सबंध भुगोलास वेठीस धरणे योग्य नाही. आम्हाला माहीत नाही म्हणून नव्वदोत्तरी कवितेत नागर निवेदक सोडून कोणी आले नसेल, हे मला मान्य नाही. आणि समजा निवेदकच असेल तर त्यास नागर-ग्रामीण असे कसे वर्गावे? माझे अर्धे बालपण खेड्यात गेले आणि उर्वरीत शहरात. माझ्या अनुभवविश्वाकडे मी नागर-ग्रामीण असे पाहणे योग्य आहे काय? या सगळ्या धेडगुजरी वातावरणात वर्गीकरणावर आधारीत समिक्षेला गुंडाळून ठेवावे, असे माझे मत आहे.

माझे वरील मत जनरलावरच जनरल आहे, हे नमूद करतो.

मुक्तसुनीत's picture

24 Feb 2010 - 8:36 am | मुक्तसुनीत

कप्पेबंद विचार - निदान काव्याच्या बाबतीत तरी - करू नये हे विधान पटण्यासारखे आहे.

असो. कोलटकरांच्या किंवा कुणाच्याही कविता ही समोर असलेली एक वस्तू म्हणूनच एंजॉय करावी हेच खरे. ही सगळी वर्गीकरणाची नि परंपरांची भानगड गेली @#@#@# च्या @#@#@ मधे नाहीतरी ! :-)

तुम्ही योग्य कप्प्यात योग्य गोष्टी घालता.

माझ्यामते कोलटकरी कवितेतला निवेदक हा नागरी संस्कृतीतून आलेला आहे.

हा कोलटकरांसाठी पूर्णपणे चुकीचा कप्पा आहे.
त्यांच्या अक्षराच्या तक्त्यावरून तर ते 'नागरी' नाही हे सिद्ध होतं.

अक्षरांचा तक्ता किंवा तक्ता असं कवितेचं नाव आहे. इथे कवीने चलाखीने त्याचं संस्कृत नाव टाळलेलं आहे. तक्त्याला 'वर्णमाला' म्हणतात. पहिल्या काही ओळींमध्ये प्रत्येक अक्षर, म्हणजे प्रत्येक 'वर्ण' कसा सुंदर रीतीने एका चौकटीत बंदिस्त केला आहे याचं ते वर्णन करतात. प्रत्येकाला आपली जागा दिलेली आहे. चौकटीत बंद करण्याचं कारण असं की एक दुसऱ्याला उपद्रव देणार नाही, सतावणार नाही. या चौकटी सध्या तरी न फुटणाऱ्या आहेत.

मग ते म्हणतात, की जोपर्यंत शहामृग झबलं घालत नाही तोपर्यंत क्षत्रिय गणपतीला बाण मारणार नाही. आणि एडक्याने ओणव्याला धडक दिली नाही, तर ओणव्याला तरी थडग्यावर कप फोडायची काय गरज आहे?

शहामृग हे वाळूत डोकं खुपसून बसलेल्या विचारवंताचं प्रतीक आहे. जोपर्यंत तो आपलं क्लैब्य जाहीर करत नाही, म्हणजे शहाणपणाचा आव कायम ठेवतो तोपर्यंत, क्षत्रिय (समाजातल्या शक्ती, हिमतीचं प्रतीक) गणपतीला (देवत्वाला नेलेल्या शाश्वताला - एस्टॅब्लिशमेंटला) बाण मारणार नाही. म्हणजे वाळूत डोकं खुपसणारे विचारवंत व्यवस्थेचं रक्षण करतात. ओणवा हे उघड उघड पददलितांचं प्रतीक आहे. एडका हे पुन्हा रानटी शक्तीचं, ऊर्जेचं प्रतीक. एडका धडक मारतो म्हणजे तो ओणव्याला शक्ती देऊन सरळ करतो. त्याची एकदा धडक लागली की तो ओणवा व्यवस्थेचा कप थडग्यावर फोडतो. पण हे सगळं होणारच नाही अशी युक्ती वर्णव्यवस्थेने केलेली आहे.

आता हा संदेश देणाऱ्याला नुसतं नागरी म्हणून कसं हिणवायचं? तो याच्या पलिकडचा पददलितांचा पुरस्कर्ता आहे. हे मार्क्सला तो शहरात राहातो म्हणून नागरी म्हणण्यासारखं आहे... तो तळागाळाचा आवाज आहे. टोपी मधून सुद्धा हेच प्रतीत होतं. नागरी संस्कृतीला तो वादळ येतंय म्हणून सांगतो...

राजेश

मुक्तसुनीत's picture

24 Feb 2010 - 9:22 am | मुक्तसुनीत

"तक्त्या"चे विवेचन रोचक आहे.
मात्र अशी एकास-एक-संगती लावून कविता पाहाता येणे शक्य आहे का, याबाबत मी थोडा साशंक आहे. ही अशी संगती कुणाला ठोकळेबाज , वाईट प्रतीचे सांकेतिक वाटू शकेल.

कोलटकरांच्या कवितेमधे काही वेगळी ऊर्जा आहे ; त्या कवितेने वेगळी वाट दाखवली ; काहीतरी नवे काव्याच्या प्रांतात जन्माला घातले येथवर मला कळते. मात्र "लाल धूळ उडते आज" मधला थेट संदेश "डेंजर वार्‍या"मधे शोधणे म्हणजे कोलटकरांवर, ते जे नाहीत त्याचे कलम लावल्यासारखे होईल असे मला वाटते.

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Feb 2010 - 9:36 am | अक्षय पुर्णपात्रे

चौकोण सोडलेच नाही तर संघर्ष कसा होईल? 'ठाण मांडून बसले आहेत' यात प्रस्थापित व्यवस्थेशिवाय काय दिसते? उतरंड आहे. ती बदलली नाही तर कशाला काय होईल? तक्ताच आहे. माणसांना एका एका चौकटीत ठेवणारा. प्रत्येकाने चौकटीत काय पहायचे ते ठरवावे. राजेशला वर्णव्यवस्था दिसली तर कोणा स्त्रीला आणखी काही दिसेल. कोलटकरांनीच काय पण प्रत्येक कवितेने वाचकाला हे स्वातंत्र्य दिले आहे.

राजेश घासकडवी's picture

24 Feb 2010 - 11:09 am | राजेश घासकडवी

ते जे नाहीत त्याचे कलम लावल्यासारखे होईल असे मला वाटते.

मला जशी संगती दिसली तशी मी ती लावली. ती संगती, तो अर्थ एकतर स्वीकारार्ह, मनाला भावणारा आहे किंवा नाही - प्रत्येकालाच तो भावेल, पटेल असं नाही. पण त्या संगतीतून जे आकृतीबंध निर्माण होतात त्यातून कवीच्या प्रतिमेवर कुठच्या कलमांचं आरोपण होतं याच्याशी माझं देणं घेणं नाही. कवीचीसुद्धा माझ्याकडून ती अपेक्षा असेल असं वाटत नाही. मला जे अर्थ दिसले ते आधी कोणाला न दिसता त्यांनी कवीविषयी काही खास प्रतिमा करून घेतली असेल तर ती माझी चूक नाही.

अशा 'कोलटकर कोण आहेत' याविषयीच्या गृहितकांतून आपण त्यांच्या कवितांच्या अर्थाविष्काराला कोतेपणा आणतो असं वाटतं. 'कोलटकर क्ष आहेत तेव्हा त्यांच्या कवितातून य अर्थ येणे म्हणजे ते क्ष राहात नाहीत, व ते योग्य नाही' हा तर्क मला जगावेगळा वाटतो. हे म्हणजे घोड्यापुढे गाडी बांधण्यासारखं आहे.

एकास-एक संगती लावून का होईना मला हाताला काहीतरी गवसलं आहे. एकास अनेक, किंवा अनेकास एक या पद्धतीने आत्म्याला तितकंच समाधान देणाऱ्या अर्थाच्या प्रतीक्षेत आहे. जर अर्थ नाही, केवळ ऊर्जा असंच उत्तर असेल तर मी माझाच स्वीकारेन. मला अगम्य ऊर्जेपेक्षा हलता, बोलता, अवयव असलेला जीव अधिक पसंत आहे.

Nile's picture

2 Mar 2010 - 6:26 am | Nile

एकंदरीत वरील चर्चा रोचक, खुप आवडली. (कवितेच्या बाबतीत मंद असल्याने प्रतिक्रियेस उशीर!)

एक थोडीशी अवांतर शंका:

शहामृग हे वाळूत डोकं खुपसून बसलेल्या विचारवंताचं प्रतीक आहे.

हे कसं ते कळलं नाही! तुम्ही काढलेला अर्थ इंटरेस्टींग. आपल्याला नसतं ब्वॉ सुचलं!

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2010 - 6:57 am | राजेश घासकडवी

त्यावेळी ती प्रतिक्रिया पंधरा मिनिटांत टंकली असल्यामुळे फार खोलात गेलो नाही, व तितका खोल विचारही केला नव्हता.

शहामृग - पंख नसलेला पक्षी. झेप फारशी नाही. मान उंच करून जगतो. पण वादळ आलं की तो तीच मान खाली करून वाळूत डोकं खुपसून बसतो. स्वताच्या संरक्षणासाठी. त्याचा वादळ नाकारण्याकडे कल असतो - जे दिसतच नाही, ते नाहीच. डोकं खुपसण्यासाठी त्याला उंच, सरळ मान खाली वाकडी करण्याचे कष्ट पडतात, ते तो घेतो. खालच्या वाळूतच तो काहीतरी शोधत बसतो. पण वादळाचा उघड्या डोळ्याने सामना करत नाही. यातून विचारवंत किंवा किमान पांढरपेशा वर्ग - ज्यातून विचारवंत निर्माण होतात - असा अर्थ काढता येतो.

झबलं घालणं - मी तो मुलीचं झबलं म्हणून त्यातून स्त्रैणत्वाचा अर्थ काढला. त्यातून पोरकटपणाचाही अर्थ काढता येईल.

हे माझे अर्थ झाले. तुम्ही तुमचे शोधावेत.
राजेश

चतुरंग's picture

24 Feb 2010 - 8:53 am | चतुरंग

सगळे वाचून टोपी पडली! #:S

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

24 Feb 2010 - 2:58 pm | मेघना भुस्कुटे

माझीही. मी एकदाच 'भिजकी वही' वाचण्याचा प्रयत्न केला होता, पण मला काही झेपेना.
इथली सगळी चर्चा वाचताना तर एकदम बावळट-शरणागत-भारलेला भाव तोंडावर आणून, तोंड उघडं टाकून ऐकत असल्याचा भास झाला. असो! काही कविता आपल्यासाठी नसतात. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2010 - 3:26 pm | बिपिन कार्यकर्ते

तुझी ही अवस्था... मग माझी काय असेल? आय डोन्ट इव्हन काउंट हिअर... :)

पण हा धागा मात्र खूप काही नवीन सांगणारा असा आहे. वाचनखूण साठवत आहे.

बिपिन कार्यकर्ते

मेघना भुस्कुटे's picture

24 Feb 2010 - 4:25 pm | मेघना भुस्कुटे

खरं सांगू का, कवितेच्या बाबतीत असली त्रैराशिकं नसतात. काही माणसांना काही काही कविता कळतात / आवडतात. काही काही माणसांना काही काही कविता कळत नाहीत / आवडत नाहीत. बास.
असो!
बर्‍याच दिवसांनी मैदानात आले. :D

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2010 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

खरंय!!! 'सौमित्र'च्या पुस्तकावर अजून डोके फोडतो आहे. :)

बिपिन कार्यकर्ते

मुक्तसुनीत's picture

24 Feb 2010 - 5:42 pm | मुक्तसुनीत

तुम्हाला नाय आवडली ही डेंजर कविता सुद्धा ? कमाल झाली राव !

मेघना भुस्कुटे's picture

24 Feb 2010 - 7:34 pm | मेघना भुस्कुटे

'आवडली नाही'पेक्षा 'कळली नाही'.
अगदी शरदिनीच्या कविता वाचताना होते, तितकी गत झाली नाही; तरी साधारण त्याच जातकुळीतला प्रकार. कविता वाचतोय असे वाटण्याऐवजी एखादे कोडे सोडवतोय की काय, असे वाटत असेल - तर मी तरी त्या कवितेच्या वाट्याला जात नाही.
नाही त्या कवितेच्या नशिबात, मी तरी काय करू!

सुवर्णमयी's picture

24 Feb 2010 - 8:26 pm | सुवर्णमयी

मला ही कविता अतिशय आवडली. पण मला अरूण कोलाटकरांच्या सगळ्याच कविता कळल्या तरी आवडतातच असे नाही. या कवितेवर चर्चा झाली, चार मते व्यक्त झाली हे त्या कवितेचे भाग्यः)

कवीने कविता करायचे काम करावे, कुणासारखे कुणासाठी इत्यादीचा विचार कवी करू लागला तर तो प्रामाणिकपणे लिहू शकेल का?मी ब्लॉगवर, मासिकात, दिवाळी अंकात, प्रकाशित होणार्‍या काव्यसंग्रहात जमतील तेवढ्या कविता वाचते. गेल्या चार पाच वर्षातही मराठी कविता बदलली आहे, बदलते आहे. एक दशक हा तर फार मोठा काळ आहे.

कुठल्या कविता कुणाला अगम्य वाटतील, कुठल्या विकृत वाटतील , काही गद्य लेखन वाटतील ,काही ट लावून केलेली वृत्तपूर्ती सुद्धा- याचा हिशोब समीक्षकाने ठेवायचा, ते त्यांचे काम.

मला वेगवेगळे प्रयोग असणारी, मनाला स्पर्श करेल असा विषय असणारी कविता चटकन भावते. कवीची जात, त्याचे गाव , त्याचे शिक्षण हे मधे न येता कविता वाचता आली पाहिजे असे मला वाटते. मी तसेच करायचा प्रयत्न करते.

कुठली कविता लिहावी, कुठली कविता वाचावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दाम ठळक शब्द वापरून स्त्री पुरुषाची शारिरीक वर्णने असलेल्या अनेक कविता आजकाल दिसतात. हे सर्व सूचकतेने लिहिता येऊ शकते असे मला वाटते म्हणूनच अशा कविता माझ्या अंगावर येतात. अनेक वाचकांना तीच वर्णने चवीने वाचाविशी वाटू शकतील, अनेकांना ते उल्लेख आवश्यकच आहेत असेही वाटेल. सध्याचे मराठी लेखन वास्तवतेच्या फार जवळ जाते आहे,तिचा अतिरेक होतो आहे असे मला अनेकदा वाटते. पण कविता शेवटी कविता असते..

ता.क. - मला शरदिनीच्या कविता अतिशय आवडतात.त्यातली कल्पकता आणि प्रयोग करण्याची धडाडी,विषयांचे नाविन्य मला आवडते. (माझ डो़क फिरल आहे असे सुद्धा कोणी म्हटेल.म्हणू देत. )

धनंजय's picture

24 Feb 2010 - 9:30 pm | धनंजय

"कविता पाचोळ्यासारखी हलकीफुलकी आणि त्याच वेळी वादळासारखी घनघोर आहे"

मला तरी कवितेचा मुख्य आशय सामाजिक वाटला.

रसग्रहणही आवडले, चर्चाही रोचक आहे. (कुठलेही रसग्रहण फारच तपशील देते, किंवा कुठल्याशा तपशिलावर अधिक भर देत. काव्याचे आशयवर्तुळ संकुचित करते. तरी आपण एकमेकांना रसग्रहण सांगतो, सांगितल्याशिवाय राहावत नाही.)

राजेश घासकडवी's picture

24 Feb 2010 - 11:29 pm | राजेश घासकडवी

आइन्स्टाईनने म्हटलेलं आहे की सट्ल इज द लॉर्ड, मॅलेशिअस ही इज नॉट. वेगवेगळे कवीदेव मात्र या दोन टोकांच्या पलिकडे जाऊन दशांगुळे उरतात. काही वाच्यार्थाचे हातोडे हाणतात, तर काही क्लिष्ट प्रतिमांच्या चक्रव्यूहात नेऊन कोडी मांडतात. पण प्रबळ, सहज रूपकं कवितेला संपन्न करतात.

एका व्यक्तीने त्या रूपकांचा लावलेला अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आकलनप्रतलात पडलेली त्या कवितेची छाया. वाच्यार्थप्रधान कविता गोलाकार - कुठूनही पाहिलं तरी एकच आकार - अशा असतात. काही द्विमितीय, एका विशिष्ट दृष्टीकोनातून बघितलं तर पूर्ण आकार प्रतीत होणाऱ्या असतात. त्या दुसऱ्या दृष्टीकोनातून दिसतही नाहीत. त्रिमितीय अर्थाच्या कविता वेगवेगळ्या प्रतलांवर वेगवेगळी छाया पाडतात. अशी एकच छाया, कितीही सुबक असली तरी तिने संपूर्ण अर्थ सामावत नाही, हे धनंजय यांचं मत पटतं.

आता हेच मला हत्ती आणि आंधळे रूपक वापरून म्हणता आलं असतं पण मी थोडंसं मॅलेशियस व्हायचं ठरवलं :-) शेवटी कुठेतरी आशय आणि आकार यांची सांगड घालावीच लागते न‍!

एकमेकांना आपल्याला प्रतीत होणारे आकार सांगितले तर या सर्व आकारांच्या संगती लावण्याचा प्रयत्न तरी करता येईल असं वाटतं. त्यामुळे मला ही सामुदायिक रसग्रहणाची कल्पना खूप आवडली. आणखी रसग्रहणं येऊ द्यात.

राजेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2010 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रसग्रहण आवडले..!!!

अरुण कोलटकरांची patient is RH positiive नावाची कविता रसग्रहणासाठी टाकण्याचा मूड होता. पण तो विचार पोस्पाँड केला. :)

बाय द वे, रा.ग.जाधवांनी 'साठोत्तरी मराठी कविता व कवी ' या पुस्तकात काही कवींच्या कवितांबरोबर अरुण कोलटकरांच्या कवितेवरही अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. कोलटकरांच्या चाहत्यांनी ते पुस्तक जरुर वाचावे. नव्या कवितेवर अनेक समीक्षकांची मतेही त्यातच वाचायला मिळतात. त्यात भालचंद्र नेमाडे यांनी अरुण कोलटकरांच्या कवितेबाबत म्हटले आहे-

'' भाषिक घटकांची अनपेक्षित पेरणी, विरामचिन्हे आणि मुद्रणशैली ह्यांचे सूचक वापर, अत्यंत तासून पैलू पाडलेल्या घाटदार ओळी, सुरेख मांडणीची कडवी, तपशिलाची अचूक निवड, अवकाश आणि काळ अनेक पातळ्यांवरुन सुचविणारी तंत्रे ही कोलटकरांची खास वैशिष्टे. प्रखर नाट्यात्मकतेने उपरोधाच्या नानाविध छटा मराठी कवितेत व्यक्त करीत असतात. शब्द, वाक्यखंड किंवा ओळी वरकरणी विसंगतीने जोडणे ही त्यांची खास मराठी शैली होय.''

खरं म्हणजे वरील उतारा वाचल्यावर त्यांच्या कवितेची ओळख बर्‍यापैकी व्हायला हरकत नाही. अतिवास्तवता, शहरी जाणिवांची रेलचेल. गुढ वगैरे अशी त्यांची कविता मला तरी भासते. मला त्यांच्या काही कविता वाचायला आणि समजायला सोप्या वाटतात, काही कविता डोक्यावरुन जातात तो भाग अलाहिदा. असो, कविता आकलनाच्या बाबतीत माझ्या काही मर्यादा आहेत हे मात्र आठवणीने नमूद करतो.

बाकी चर्चा चालू द्या. वाचायला मजा येत आहे.

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

27 Feb 2010 - 5:27 am | धनंजय

कालिदास "वागर्थाविव संपृक्तौ" म्हणतो, वाणी आणि अर्थ हे एकाला-एक जोडल्यासारखे आहेत. पण खरे तर शुद्ध ध्वनीतून येणारा अनुभव आणि त्याच्या अर्थाचा येणारा अनुभव यांचा मिलाफ फक्त काही पोचलेल्या कारागिरांना साधू शकतो. ज्यांना जमतो, ते उत्तम कवी होत.

आणि त्यातही ज्यांना कविता अगदी सहज स्फुरल्याचा आभास निर्माण करता येतो, त्यांच्याबद्दल कौतूक करू तितके कमीच. कारण लवकरच लक्षात येते, की सहजतेचा आभास वठवण्यासाठी रचनेत खूपच परिश्रम घ्यावे लागतात.

वादळाच्या अर्थप्रतिमेला वादळाची ध्वनिप्रतिमा बेमालूम जोडण्यासाठी कवितेची लय कवी वापरतो आहे. लयीवर नियंत्रण होते आहे ते अनुप्रासांनी आणि लपलेल्या यमकांनी.

अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खड्ड्यात

"तुझी टोपी"च्या दोन-शब्दी पुनरक्तीमुळे मला पहिल्या ओळीनंतरचा विराम थोडा लांबवावा लागतो आहे.

कपाळ पहिलं सांभाळ

येथे पाळ/भाळ चे यमक एकीकडे लयीवर काबू करू बघते, तर
कपाळ पहिलं सांभाळ
अशी ओष्ठ्य आघातांची वेगळीच लय दुसरा निर्देश देऊ बघते. येथेही मलातरी ओळ संथ वाचणे भाग पडते.

मात्र पुढे :

खापरांना फेफरं भरलं
फडफड करतायत पाखरांसारखी
कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या
डिगर्‍या ठिकर्‍या फरशीवरती
नार्‍या नार्‍या तुझा बाप
सटकला की फोटोमधनं

इथे प्रत्येक ओळीतल्या अनुप्रासांची वेगवेगळी मिश्र लय अशी, की "नार्‍या नार्‍या तुझा बाप" ओळीपर्यंत लय वाढवत जाण्यास मला भाग पडते!
खापरां<->पाखरां यांच्यातला वर्णविपर्याय पहिल्या वाचनात सहज लक्षात येत नाही, पण काहीतरी ध्वनी पुन्हापुन्हा येऊन जीभ वळवत असल्याचा भास होतो तो होतोच. वादळी वार्‍याबरोबर खडबडीत मूर्धन्य वर्णांचा (ट, ठ, ड, ढ, ण, र यांचा) खडखडाट साउंड इफेक्ट्स देतो. हे लक्षात आले नाही तरी परिणाम साधतोच. (सिनेमातले पार्श्वसंगीत लक्षात आले नाही तरी किती महत्त्वाचे असते - म्यूट दाबून बघा!) आणि इथे तर पार्श्वसंगीत आणि संवाद दोन्ही कामे तेच ते शब्द करत आहेत.

डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट

काय तिहाई साधली आहे.

गेला सरळ आकाशात

या ओळीचा शेवट आश्चर्यचकित चढ्या सुरावटीत केला, तर कवितेचा सारांश वेगळा जाणवतो.
"आकाशात" मध्ये सुर अलगद (किंवा धप्पकनही) पडू दिला तर कवितेचा मथितार्थ वेगळा जाणवतो.

आशयाबद्दल वेगवेगळे अनुभव असल्याची चर्चा वर झालीच आहे. ध्वनि-आशयांच्या सांगडीचा अनुभवही वेगवेगळ्या आस्वदकांना भिन्न होऊ शकतो!

"मुक्त"छंदाचे इंद्रधनुष्य दिसायला सहज-सुंदर वाटते, पण पेलायला शिवधनुष्यच आहे.

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2010 - 7:05 am | राजेश घासकडवी

(मूळ प्रतिसाद मी खूप खोलात लिहिला होता, पण तो जालविश्वात कुठेतरी नाहीसा झाला. हा त्याचा सारांश)

तुमच्या रसग्रहणामुळे मला कवितेतल्या अनेक खुबी लक्षात आल्या.

"तुझी टोपी"च्या दोन-शब्दी पुनरक्तीमुळे मला पहिल्या ओळीनंतरचा विराम थोडा लांबवावा लागतो आहे.

त्या विरामात अविश्वास, छद्म-निश्वास असं बरंच काही टाकता येतं - टाकावं लागतं.

"नार्‍या नार्‍या तुझा बाप" ओळीपर्यंत लय वाढवत जाण्यास मला भाग पडते!

माझ्या बाबतीत लय तीच राहिली, स्वर उंचावला. त्यामुळे शेवटच्या वाक्यात एक धार येते. रेलगाडी सारख्या तालामुळे अपरिहार्यता, प्रवेग येतो.

पार्श्वसंगीत आणि संवाद दोन्ही कामे तेच ते शब्द करत आहेत.

छान निरीक्षण.

राजेश

शानबा५१२'s picture

2 Mar 2010 - 11:43 am | शानबा५१२

मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
भारताचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट
गेला सरळ आकाशात

हे फार भारी होतं "बालकवी" या नावाला शोभतं,
पण 'हिसडे मारतोय' म्हणजे????????