जेपी यांची 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा' ही लेखमाला वाचल्यावर सतत क्रिकेटवर काहीतरी लिहीण्याची खुमखुमी होत होती. आणि त्यात काल वीरू व सचिननं तर आज लक्ष्मण व धोनीनं शतकं झळकावून आयताच विषय पुढ्यात ठेवला!
क्रिकेटवरचं लिखाण म्हणजे साहेबांचा उल्लेख हा आलाच! आमच्यासाठी ईशस्तवनच ते!
साहेबांवर कितीही लिहीलं तरीही कमीच..
"निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू॥
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥" हे शब्द आपल्या साहेबांच्या बाबतीतही लागू पडतात. गेली अडीच वर्षं तो उत्तम क्रिकेट खेळतोय आणि टीकाकारांना त्यानं दिलेलं सडेतोड उत्तर आहे हे! एकामागून एक धावांचे आणि शतकांचे मैलाचे दगड ओलांडत चाललाय.. त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, "काही वेळा तुमच्यावर दगड फेकले जातात, त्यांना मैलाचे दगड तुम्ही बनवायचे असते!".. त्याच्या शतकांचा अन् धावांचा 'वेलु गेला गगनावरि'! अशी परिस्थिती आहे सध्या.. आमचा लाडका सच्या असं काहीतरी 'भीमरूपी महारूद्र' करून ठेवणार आहे, जिकडे पोचणं उभ्या मानवजातीत कुणाला शक्य होईल असं वाटत नाही! "वाढता वाढता वाढे.." हे शब्द त्याने निर्माण केलेल्या धावांच्या आणि शतकांच्या डोंगराला अक्षरशः लागू पडतात! असं म्हणतात की विक्रम आणि नियम हे मोडण्यासाठीच बनतात! पण आजच्या तारखेला आधीच टेस्ट क्रिकेटच्या अस्तित्वावर वादविवाद चाललेत, त्यामुळे जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत सचिनचे विक्रम मोडण्याची शक्यता दिसत नाही! यानं आनंद द्विगुणित झालाय!! पण बरोबरीच टेस्ट क्रिकेट अस्ताला जाऊ नये असंही वाटतंय!! असो, आपल्या शिरपेचात आणखी एक शतकरूपी तुरा खोवल्याबद्दल, त्याच्या ४७व्या शतकासाठी आमच्या प्रिय लाडक्या लिटल मास्टरचं हार्दिक अभिनंदन!!
लागोपाठ चार शतकं झळकावून त्यानं त्याच्या करीअरच्या शेवटाच्या बाता करणार्या 'हुच्च प्रतिभेच्या' टीकाकारांना आपल्या नेहमीच्या शैलीत, बॅटनं उत्तर दिलंय! सिडनीत तो जेव्हा त्याची 'शेवटची' (आतापर्यंत शेवटची.. कुणी सांगावं, पुढल्या ऑस्ट्रेलियन दौर्यात पुन्हा भारतीय फलंदाजीची मदार त्याच दोन समर्थ खांद्यांवर असायची!) मॅच खेळला त्यावेळी भावनाविवश प्रेक्षकांनी झळकावलेल्या अनेक फलकांपैकी एक फलकः
सचिननं खरोखर इतकं काही दिलंय की प्रत्येकवेळी त्याची एखादी संस्मरणीय खेळी बघून मनात विचार येतो, हा गेल्यावर क्रिकेटचं काय? कल्पनाच करवत नाही हो! आणि या चाहत्यांसारखीच आमचीही अवस्था होते.. मनाच्या कानाकोपर्यातून आवाज येऊ लागतात, "सचिन, थँक्स फॉर एवरीथिंग यू'व गिव्हन अस्!"
क्रिकेटवर लेख लिहायला घेतला की सचिनवरच नमनाला घडाभर तेल जातं, आणि याचं खचितही वाईट वाटत नाही..! असो, तर मुळात आज मी हा लेख लिहायला घेतला तो क्रिकेटच्या मैदानाच्या कॅनव्हासवर आपल्या कुंचल्यानं निरनिराळ्या रंगांची मुक्तहस्ताने उधळण करून अनेक दर्जेदार चित्रं अगदी सहजतेने रंगवणार्या एका कलाकाराबद्दल. एखाद्या प्रेयसीनं लाडिकपणे तिच्या प्रियकराला गालावर थाप मारून "चल, जा की तिकडे" म्हणून प्रेमान दूर सारावं तसे त्याचे ते कव्हर्स मधून हळूच बघता बघता सीमारेषेपार जाणारे फटके पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. "अ गुड यॉर्कर बट वेल डिफेन्डेड" असं आपण म्हणणार इतक्यात आपल्याला कळतं की चेंडूनं साईट स्क्रीनच्या शेजारून केव्हाच सीमारेषा ओलांडलीये! आणि लेगसाईड ही आपल्या बापाच्या मालकीची आहे असं समजून, मनगट हलकेच थोडेसे वळवून पायाशी घुटमळण्यार्या चेंडूला, "जा बेटा घरी सावकाश" असं - एखाद्या शिक्षकानं विद्यार्थ्याला सांगावं तसं - समजावत 'फ्लिक' करण्याचं याचं कसब अजबच! सचिन, राहुल आणि अझरइतकेच याचेही "और कलाईका सुंदर उपयोऽग" वाले फटकेही लाजवाब! तर असा हा टायमिंगच्या जोरावर उत्तमोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा, क्रिकेटरसिकंच्या मनावर आपल्या शैलीदार फलंदाजीने एक दशकाहून अधिक काळ राज्य करणारा, शब्दशः 'प्रेक्षणीय' खानदानी कलाकार म्हणजे 'वांगीपुराप्पु वेंकट साई उर्फ व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण.' हे बघा त्यानं काढलेलं एक सुंदर चित्र, फ्लिकः
इकडे सकाळी पावणेचारला मॅच सुरू होते. काल उठायला साडेचार झाले, बघतो तर साहेब आलेले होते! वीरूने आणि साहेबांनी शतकं झळकावली! दिवसाचं सोनं झालं! आज पावणेचारलाच उठलो कारण लक्ष्मण खेळत होता! पहिल्या षटकातच जेव्हा त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर फ्लिकचे दोन चौकार लगावले तेव्हाच वाटलं "आज मेजवानी आहे!". टिपी़कल लक्ष्मण स्टाईल, 'कलाई का सुंदर उपयोग' वाले ते फटके पाहून स्टेनसुद्धा एकदा म्हणाला असेल, "ओव्हर संपलीये, पण मी अजून एक चेंडू टाकतो. तू परत एक फ्लिक मार. मला बघायचाय!!" एक एक प्रेक्षणीय फटके पाहून आपसूकच 'वाह, लाजवाब', 'ओह, अमेझिंग' अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. स्टेनला त्याने आज त्याच्या नेहमीच्या शैलीत कव्हर्स मधून हलकेच हद्दपार केल्यावर तर आनंदाच्या भरात जोरात ओरडलोच मी! घरातले सगळे उठले!! फटक्यागणिक आपलं सकाळी लवकर उठणं सार्थकी लागलंय याची जाणीव होत होती मला!
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने म्हणजे लक्ष्मणच्या खेळाचा वसंत ऋतु! त्याच्या खेळाला नवी पालवी फुटते जणू! मग त्या फुललेल्या क्षणांत अवघं क्रिकेटविश्व हरखून जातं. आठवा त्याच्या त्या ९९ साली सिडनीत काढलेल्या १६७ धावा! पूर्ण फॉर्मात असणार्या ग्लेन मॅग्रा, ब्रेट ली, डॅमियन फ्लेमिंग आणि शेन वॉर्न असल्या बॉलिंग अटॅकसमोर आपला संघ अक्षरशः नांगी टाकत असताना पठ्ठ्यानं एका बाजून किल्ला लढवला आणि आपण काय चीज आहोत हे दाखवून दिलं. आणि मुख्य म्हणजे त्याने त्या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात केली होती. त्या दौर्यावर भारताचे सलामीवीर (?) होते देवांग गांधी आणि सदगोपन रमेश! लक्षूभाई तिसर्या क्रमांकावर. म्हणजे खर्या अर्थाने लक्ष्मणच सलामीला येत होता!! लक्ष्मण पॅड बांधतो म्हणेपर्यंत कुणीतरी एकटा परत आलेला असायचा!! इतर ठिकाणी तो भले एक ओपनर म्हणून अपेशी ठरला असेल, वाद नाही. पण मुळात एक मधल्या फळीचा फलंदाज असताना ऑस्ट्रेलियासमोर ऑस्ट्रेलियात जाऊन डावाची सुरूवात करणं म्हणजे काही खाऊ नाही महाराजा! आपण शिवसुंदर दास, आकाश चोप्रा, देवांग गांधी, सदगोपन रमेश, दीप दासगुप्ता, पार्थिव पटेल असे कित्येक सलामीवीर (पुन्हा ?) वापरून पाहिले. पण सगळे फसले! अरे तो मॅग्रा आणि ली जीव तोडून बॉलिंग टाकतायत आणि सहा सात ढाणे वाघ बॅटची कड लागून झेल घेण्याच्या अपेक्षेत आ वासून तैनात आहेत हे पाहूनच अर्धी गळून पडत असेल फलंदाजाची! तिथे फलंदाजासाठी ऑफसाईडचा चेंडू म्हणजे विवाहितासाठी परस्त्रीच! शिवणं म्हणजे पाप! तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे! अशा वेळी लक्ष्मण आला आणि जिंकून गेला!
आठवा त्याची ती ईडनवरची २८१ धावांची खेळी! द्रविडसोबत ३७६ धावांची भागीदारी करत त्यानं गेलेली मॅच परत आणली. दुसर्या दिवशी तो ३र्या क्रमांकावर फलंदाजीस आला. भारताचा पहिला डाव तिसर्या दिवशी सकाळी आटोपला त्यावेळी सर्वात शेवटी बाद होणारा फलंदाज होता लक्ष्मण. ऑस्ट्रेलियानं फॉलोऑन लादल्यावर पुन्हा दुसर्या डावाची १५-१६ षटकं होतात न होतात तो "लक्ष्मणा, धाव" म्हणत संघाने, आणि अख्ख्या देशाने हाक मारली. "कठीण समय येता कोण कामास येतो?" या उक्तीला साजेलसा खेळ लक्ष्मणाने केला आणि तब्बल २८१ धावांची लक्ष्मणरेषाच ओढली! तिसर्या दिवसाच्या अखेरीस लक्ष्मणनं आपलं शतक साजरं केलं होतंन आणि भक्कम तटबंदी ७ धावांवर नाबाद होती. दोघांनी चौथा दिवस अख्खा खेळून काढला, नव्हे ऑस्ट्रेलियन बॉलिंग अटॅक दळून काढला!
पाचव्या दिवशी सकाळी दोघे बाद झाल्यावर भारताने डाव घोषित करून केवळ ६८ षटकांतच कांगारूंना गुंडाळले आणि अक्षरशः वाघाच्या तोंडून घास ओढून खाला अगदी! तीन दिवस तो नुसता ईडन गार्डन रंगवत होता आपल्या कुंचल्यानं! हरभजननं त्या सामन्यात १३ विकेट्स घेतल्या होत्या पण लक्ष्मणनं केलेल्या रंगरंगोटीत हरभजनची कामगिरीही लपली! आणिबाणीच्या वेळी आपल्या खेळाचा दर्जा कसा उंचावायचा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे लक्ष्मण!
कालचंच उदाहरण घ्या.. सचिन सेहवाग काल शतकं झळकावून एकामागोमाग बाद झाले! पाठोपाठ बद्रीही "थांबा मी आलोच" म्हणत परतला! बॅट पॅड मधे गॅरेजएवढी गॅप ठेवून खेळला, स्टेनचा खतरा इन्स्विंगरच काय डेव्हिड बून सुद्धा धावत धावत गेला असता! सामन्यावर व्यवस्थित नियंत्रण मिळवलेल्या भारताची अचानक पडझड होते की काय असं वाटत असताना धोनीच्या सोबतीनं पठ्ठ्यानं २५९ धावांची भागीदारी रचलीसुद्धा! सगळं कसं एकदम फ्लॉलेस! ना कधी घाई दर्शवली, ना कूर्मगती! विष्णूनं मोहिनी अवतार धारण केला होता त्याची आठवण झाली! इतकी मनमोहक फलंदाजी की कॅलिस, डी व्हिलीअर्स, अमला, स्मिथ सगळ्यांची गणती प्रेक्षकांतच! स्टेन, मॉर्केल, हॅरिस तर बिचारे "मला बॉलिंग नको, मला ही कलाकृती पाहायचीय!" असं म्हणत होते! स्मिथला बिचार्याला कळलं सुद्धा नसेल हे नयनरम्य दॄश्य पाहता पाहता सामना हातातनं केव्हा निसटला!
लक्ष्मणच पदलालित्य तसं काही सर्वश्रेष्ठ नाही पण केवळ आणि केवळ उत्तम टायमिंगच्या जोरावर तो मोठमोठया खेळ्या खेळतो. सचिननं मागं एकदा म्हटलं होतं, "त्याचं हॅण्ड-आय को-ऑर्डिनेशन उत्तम आहे. त्याच्याच जोरावर तो इतक उत्तम टायमिंग साधू शकतो. ही'ज गॉट ब्रिलियंट हॅण्ड्स!" आणि खरंच कधी कधी तर तो सेहवागप्रमाणेच पाय अजिबात न हलवता '१४० किमी/तास' च्या चेंडूला लीलया कव्हर्स मधून हाकलतो तेव्हा आश्चर्यच वाटतं! आणि हेच उत्तम हॅण्ड-आय को-ऑर्डिनेशन स्लिपमधे किंवा क्लोज-इन क्षेत्ररक्षण करताना काम येतं. जवळपास सगळेच टायमिंगचे बादशाह उत्तम स्लिप्/क्लोज-इन फील्डर्स आहेत. (मार्क वॉ, मार्क टेलर, राहुल द्रविड, जॅ़क कॅलिस, स्टीफन फ्लेमिंग इ.)
लक्ष्मण पूर्ण बहरात खेळत असला की मला तो मोहोरलेल्या आंब्यासारखा वाटतो. आंबा मोहोरला की जसा कोकिळ कुहू कुहू करू लागतो तसे मग हे माध्यमवाले लक्ष्मणावर गोड गोड स्तुतीसुमनांचा वर्षाव करू लागतात. आंबा त्याचा सीझन संपला की मात्र उपेक्षितच! इतर वेळी त्याने थकल्याभागल्यांना वेळोवेळी सावली पुरवलेली असते, त्याची दखल मात्र कुणीही घेत नाही. वर्ष सरतं, आंबा पुन्हा मोहोरतो! एखाद्या 'सिडनी' वा 'कलकत्ता' महिन्यात खूप फळं देतो! लोक स्तुती करत सुटतात! आज आंबा मोहोरला पुन्हा! अवेळीच मोहोरला खरंतर! पण "या झाडाचं आयुष्य संपलं" असं लोक म्हणत असतानाच झाड पुन्हा मोहोरलं याचा आनंद अवर्णनीय आहे! त्याला खेळताना पाहताना खेळ संपूच नये असं वाटत राहतं. बॅटिंग ही एक कला आहे हे तो त्याच्या एकापेक्षा एक खेळींनी पुन्हा पुन्हा सिद्ध करतो! एखाद्या प्रतिभावंत चित्रकार, कवी अथवा साहित्यिकाइतकाच त्याच्यातला कलाकारही मला भावतो. इतकी सुंदर अदाकारी की एकदा पाहून मन भरत नाही, आणि मी खुळा टिव्हीकडे पाहत म्हणत राहतो, " मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती?"
-- मेघवेडा.
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 8:43 pm | ब्रिटिश टिंग्या
एकच शब्द - क्लास!
18 Feb 2010 - 12:39 am | शाहरुख
जिकलास !!
16 Feb 2010 - 9:03 pm | मदनबाण
मस्त लिहलय... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
16 Feb 2010 - 10:15 pm | संग्राम
खूप छान लिहलयं ...
>>'१४० किमी/तास' च्या चेंडूला लीलया कव्हर्स मधून हाकलतो ..
खरचं खूप जोरात फटकवतोय असं वाटतचं नाही ...
त्याचं टायमिंग खूप छान आहे ...
16 Feb 2010 - 10:52 pm | सनविवि
सुंदर लिहिलंय!
16 Feb 2010 - 11:07 pm | विसोबा खेचर
एक मस्त लेख..
मला या लेखावर जेपीचा प्रतिसादही वाचायला आवडेल! :)
तात्या.
17 Feb 2010 - 12:44 am | मेघवेडा
असंच म्हणतो!
--मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
17 Feb 2010 - 7:31 pm | जे.पी.मॉर्गन
इतके दिवस मिपावर क्रिकेट हे माझं राखीव कुरण होतं ! आता मला सवंगडी मिळाला ! :D
लेखाबद्दल काय लिहू मित्रा ! एक तर तू "ईशस्तवनातच" जिंकलंस ! आपल्या दोघांच्या गळ्यात एकच माळ आहे आणि कपाळाला एकच टिळा ! लक्ष्मणसारख्या कलाकाराबद्दल तितक्याच नजाकतीनी लिहीलं आहेस ! काही वाक्यं तर लखूभाऊंच्या फ्लिक्स आणि कव्हर ड्राईव्ह इतकीच भन्नाट !
>>ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने म्हणजे लक्ष्मणच्या खेळाचा वसंत ऋतु!<<
>>तीन दिवस तो नुसता ईडन गार्डन रंगवत होता आपल्या कुंचल्यानं!<<
बास बास !
हँड-आय कोऑर्डिनेशन आणि स्लिप फील्डर्स बद्दलच ऑब्झर्वेशन पण जबर्या ! काय काय लिहू यार? लेख वाचताना गुदगुल्या होत होत्या बघ ! येऊदे अजून !
17 Feb 2010 - 7:37 pm | विसोबा खेचर
जेपींच्या प्रतिसादाची वाट पाहात होतो तो वाचून खूप आनंद वाटला.. :)
आपला,
(किरमाणीप्रेमी) तात्या.
17 Feb 2010 - 7:39 pm | विसोबा खेचर
जेपीच्या प्रतिसादाची वाट पाहात होतो तो वाचून खूप आनंद वाटला.. :)
आपला,
(किरमाणीप्रेमी) तात्या.
17 Feb 2010 - 8:09 pm | मेघवेडा
धन्यवाद जेपी!!
प्रतिसाद वाचून अत्यानंद झाला! तुझ्या लेखमालेनेच प्रेरणा दिली खरंतर काही लिहायची.
टिळा आणि माळ एक आहे ते ताडलं होतंच मी आधी! म्हणून तर सर्वात आधी तुला खरड करून कळवलं की हा लेख लिहीला आहे! असो. पंढरीची वारी कधीये ते सांग! ;)
रंगाशेठ तुमचेही धन्यवाद!
जाता जाता: तेरे कुरण मे अब खूब रंग जमायेंगे! एकत्र चरेंगे अब कुरण में!!! :D
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
16 Feb 2010 - 11:10 pm | स्वाती दिनेश
क्लास!
आवडला लेख, मस्त लिहिलं आहे.
स्वाती
16 Feb 2010 - 11:18 pm | प्रभो
लेख आवडला.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
17 Feb 2010 - 1:56 am | सुमीत भातखंडे
लिहिलय
17 Feb 2010 - 3:47 am | दिपाली पाटिल
लेख आवडला...
दिपाली :)
17 Feb 2010 - 12:29 pm | जयवी
फारच सुरेख लेख !!
प्रत्येक वाक्यात इतका सुरेख शब्दवसंत !! ही बसंतबहार पुन्हा पुन्हा बघायला आवडेल.
17 Feb 2010 - 3:46 pm | शुचि
मेघ क्रिकेट कळत नाही पण वाचत असताना, लेखकाच्या ओचंबळून आलेल्या भावना कळतात. आणि त्या भवनांमध्ये वाहून जाण्यासाठी मी मला अगम्य लेख बरेचदा वाचते ..... आपला सुंदर लेख त्या सदरात मोडतो. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 7:38 pm | चतुरंग
मारलेल्या झकास फ्लिकसारखाच लेख सीमापार!! =D> =D> =D>
(अझ्झूभाईच्या कलाईदार फ्लिकचा चाहता)चतुरंग
18 Feb 2010 - 3:45 pm | विजुभाऊ
आंबा त्याचा सीझन संपला की मात्र उपेक्षितच! इतर वेळी त्याने थकल्याभागल्यांना वेळोवेळी सावली पुरवलेली असते, त्याची दखल मात्र कुणीही घेत नाही. वर्ष सरतं, आंबा पुन्हा मोहोरतो! एखाद्या 'सिडनी' वा 'कलकत्ता' महिन्यात खूप फळं देतो! लोक स्तुती करत सुटतात! आज आंबा मोहोरला पुन्हा! अवेळीच मोहोरला खरंतर! पण "या झाडाचं आयुष्य संपलं" असं लोक म्हणत असतानाच झाड पुन्हा मोहोरलं याचा आनंद अवर्णनीय आहे
छान लिहिताय भौ तुम्ही.

कलाईका सुंदर उपयोग.... हा सुशीलदोशींचा लाडका शब्द त्यानी विश्वनाथ साठी राखून ठेवलेला बर्याच वर्षानी वाचायला मिळाला
7 Oct 2010 - 3:28 pm | अस्मी
कालच ह्या लेखाची आठवण झाली होती आणि आज फारएन्डचा लेख वाचून परत एकदा वाचावासा वाटला...
बेस्ट!!!
या दोहोंची ची परवा परत एकदा प्रचिती आली :)
- अस्मिता
7 Oct 2010 - 6:36 pm | पैसा
लक्ष्मणच्या खेळाएवढाच बहारदार लेख! मेवे ते फोटो मात्र अदृश्य झालेत, त्यांचं काहीतरी कर.
7 Oct 2010 - 6:37 pm | मेघवेडा
फोटोंचे भवितव्य आता संपादकांच्या हाती हो! ;)
7 Oct 2010 - 6:45 pm | असुर
लैच भारी रे मेव्या!
मेव्या नुसता बरसलाय या लेखात!
ते म्हणजे एखाद्या मैफिलीत गवयाच्या गळ्यातून अवचित एखादी तान निघून जाते आणि तमाम जनता वाहवाही करते ना, तस्सं काहीतरी या लेखाबद्दल झालंय. अनेक ठिकाणी उत्तम जागा घेतल्यामुळे लेख विशेष वाचनीय झालाय! क्रिकेटचा खेळ नीरस वाटणार्यांना सुद्धा हा लेख वाचण्याजोगा वाटतो ही याची खासियत!
जियो मेवे! (तात्यांकडून साभार)
--असुर
7 Oct 2010 - 7:49 pm | प्रभो
मेव्या, आता भारत-ऑस्ट्रेलिया खुनशीबद्दल एक लेखमालिका येऊ दे रे... :)
8 Oct 2010 - 12:17 am | बेसनलाडू
आवडले.
(श्रोता)बेसनलाडू
15 Oct 2010 - 11:25 pm | फारएन्ड
आवडले एकदम. बाकी कोणत्याही क्रिकेटर बद्दल लिहायला किंवा विचार करायला लागल्यावर साहेब मधे येणे हे ओघानेच आले. सर्वांचेच होत असावे :)
16 Oct 2010 - 3:07 am | वाटाड्या...
मेवेशेठ...
क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही. पण तुझा लेख वाचुन जरा मलाही माझ्यात वसंत फुलला असच म्हणाव लागेल असा तुझा लेख आहे...
धन्यवाद...
- (क्लिनबोल्ड) वाटी...
28 Sep 2011 - 1:08 pm | मृत्युन्जय
आयला हा लेख कसाकाय सुटला राव नजरेतुन. जबराय हो मेवे. आवडेश.
18 Aug 2012 - 8:42 pm | पैसा
तुज सांग लक्ष्मणा पाहू कुठे!
19 Aug 2012 - 10:39 am | सुहास झेले
क्लास.... मास्टरपीस !!
हा लेख बोर्डावर आणल्याबद्दल पैसा ताईचे खूप खूप आभार :) :)
फेसबुकवर वाचले होते - आज ओस्ट्रेलियात राष्ट्रीय सण असेल ;-)
19 Aug 2012 - 1:03 pm | भडकमकर मास्तर
आंब्याचे झाड पडले...
19 Aug 2012 - 1:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्हेरी व्हेरी स्पेशलची फलंदाजी (कसोटीत) नेहमीच इंजॉय केली आहे. भले भले बाद झाल्यावर, अजुन लक्ष्मण मागे आहे, हा कॉन्फिडन्स आम्हा खेळ रसिकांना सामना बघायला प्रवृत्त करत असायचा. स्लीपमधे उभा राहुन झेलाची वाट पाहणारा लक्ष्मण आता कसोटीत दिसणार नाही, याची रुख रुख राहील. हं आता चपळ क्षेत्ररक्षक नव्हता, तेव्हा एवढं तेवढं चालायचंच.
आज गांगुली एका लेखात म्हणाला तसा अजहर नंतर मनगटाच्या साह्याने फ्लीक करण्याच्या बाबतीत लक्ष्मण हुकमी एक्का होता. मेव.चा हा लेख वाचुन रसिक हळवे वगैरे होतीलही पण योग्य वेळी योग्य निर्णय लक्ष्मणने घेतला, असेच मी म्हणतो.
लक्ष्मण पूर्ण बहरात खेळत असला की मला तो मोहोरलेल्या आंब्यासारखा वाटतो. आंबा मोहोरला की जसा कोकिळ कुहू कुहू करू लागतो तसे मग हे माध्यमवाले लक्ष्मणावर गोड गोड स्तुतीसुमनांचा वर्षाव करू लागतात. आंबा त्याचा सीझन संपला की मात्र उपेक्षितच! इतर वेळी त्याने थकल्याभागल्यांना वेळोवेळी सावली पुरवलेली असते, त्याची दखल मात्र कुणीही घेत नाही. वर्ष सरतं, आंबा पुन्हा मोहोरतो! एखाद्या 'सिडनी' वा 'कलकत्ता' महिन्यात खूप फळं देतो! लोक स्तुती करत सुटतात! आज आंबा मोहोरला पुन्हा! अवेळीच मोहोरला खरंतर! पण "या झाडाचं आयुष्य संपलं" असं लोक म्हणत असतानाच झाड पुन्हा मोहोरलं याचा आनंद अवर्णनीय आहे! त्याला खेळताना पाहताना खेळ संपूच नये असं वाटत राहतं. बॅटिंग ही एक कला आहे हे तो त्याच्या एकापेक्षा एक खेळींनी पुन्हा पुन्हा सिद्ध करतो! एखाद्या प्रतिभावंत चित्रकार, कवी अथवा साहित्यिकाइतकाच त्याच्यातला कलाकारही मला भावतो. इतकी सुंदर अदाकारी की एकदा पाहून मन भरत नाही, आणि मी खुळा टिव्हीकडे पाहत म्हणत राहतो, " मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती?"
केवळ सुंदर. सुंदर आणि सुंदरच. लक्ष्मणचा अलविदा.
-दिलीप बिरुटे
व्हेरी व्हेरी स्पेशल योग्य वेळी निवृत्त झाला आता सचिन कधी निवृत्त होणार.
19 Aug 2012 - 4:44 pm | तिमा
जे शहाणे खेळाडु असतात ते मागून लाथ बसण्याची वाट पहात नाहीत.
19 Aug 2012 - 6:32 pm | चिंतामणी
त्याच्या बद्दलची फार छान कॉमेंट वाचण्यात आली.
" यापुढे १८ ऑगस्ट हा ऑस्ट्रेलियाच नवा स्वातंत्र्यदिन असेल"
19 Aug 2012 - 6:54 pm | शरदिनी
मला वाटतं ऑस्ट्रेलिया गेल्याच वर्षी स्वतंत्र झाली लक्ष्मणच्या जोखडातून...
20 Aug 2012 - 9:38 am | किसन शिंदे
आधी वाचनात आला नव्हता हा लेख आणि आता एकदम योग्य वेळी वाचायला मिळाला.
वर्तमान पत्रात लक्ष्मणाबद्दलचे जे लेख आलेत त्यापेक्षा मेवेचा हा लेख किती तरी पटीने सुदंर आहे.!
धन्यवाद मेवे!
20 Aug 2012 - 10:29 am | प्रचेतस
हेच म्हणतो.
20 Aug 2012 - 9:45 am | दिपक
लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद. जबरा लिहलाय राव. लक्ष्मणच्या फ्लिकवर तर फिदा असायचो मी. डोळयाचे पारणे का काय म्हणतात ते..
क्लास लेख.
20 Aug 2012 - 11:17 am | बॅटमॅन
त्या मूर्ख धोनीमुळे कैतरी उद्विग्न वैग्रे होऊन लक्ष्मणने निवृत्ती घेतली असे वाचले :(