शुचिताईंचा हा गंमतीशीर धागा वाचला आणि तुम्हासर्वांप्रमाणेच मीही माझ्या राशीबद्दलची निरीक्षणे पाहिली. यावरून विचारांची गाडी तडक आमच्या ऐतिहासिक प्रेमकहाणी कडे वळली! (प्रत्येकालाच आपली/आपल्या प्रेमकहाणी/प्रेमकहाण्या ऐतिहासिक वाटते/ वाटतात राव! ;) एखादा प्रेमवीरांचा चित्रपट पाहताना प्रत्येकजण त्यात स्वतःची प्रेमकहाणी बघतच असतो! )
अर्थातच आम्हाला आम्ही साजरा केलेला ऐतिहासिक व्हॅलेंटाईन डे, ज्या दिवशी (नि)धडधडत्या छातीने, थरथर कापणार्या हातात गुलाब घेऊन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीला 'इलू' चा अर्थ समजावला होता, तो दिवस आठवला. खरंच तो दिवस ऐतिहासिक ठरला होता आमच्यासाठी. सुवर्णाक्षरात नाव लिहिलं गेलं होतं आमचं कॉलेजात! डायरेक प्रिन्सिपलच्या पोरीलाच टार्गेट केलं होतं!!
आमच्यासाठी त्यावेळी सुंदरतेची व्याख्या, परिमाण आणि मर्यादा ती म्हणजे तीच होती. आणि त्यात ती केमिस्ट्री प्रॅक्टीकलला माझी पार्टनर! त्यावेळि तिचं आडनाव आणि माझं आडनाव इंग्रजी भाषेत इतकं जवळ आहे यासाठी देवाचे मी किती आभार मानले होते काय सांगू! इतकी रसायनं आम्ही दोघांनी मिळून मिसळली पण आमची केमिकल रिअॅक्शन होतंच नव्हती! ही माझी पार्टनर, पण दुसर्यांसोबत गप्पा मारायची आणि माझ्याकडे अभ्यासाशिवाय दुसर्या विषयावर बोलायचीही नाही! टाळक्यात अमोनिआ गेल्यागत व्हायचं तेव्हा! पण तरी ती आवडायची! तिच्याकडे बघत बसणं हा मनाला जडलेला छंद होता. एकदा तिच्याकडे टक लावून बघत राहिलो असताना हातावर सल्फ्युरिक अॅसिड सुद्धा ओतून घेतलं होतं मी! नशीब डायल्युट अॅसिड होतं!! पण तरी अख्ख्या वर्गाने पुढचा निदान महिनाभर मला "दिलजले के हात जले" म्हणून हिणवलं होतं! पुढे पुढे त्याच केमिस्ट्री लॅब मधे चेष्टामस्कर्या सुरू झाल्या. मग लेक्चर्स ना एकत्र बसू लागलो. मला वाटायला लागलं होतं - ते शिणेमात सांगतात तसं - "यही लडकी है जिस्की मुझे तलाश थी" वगैरे वगैरे!!
डिसेंबर मधे क्रिकेटच्या टूर्नामेंटला ती तीनही दिवस ग्राउंडवर आली होती. माझं प्रेरणास्थान आलं होतं मला चीअर करायला! तेव्हा मोठ्या फुशारक्या मी मारल्या हे सांगायची गरज नसावी! सेमी फायनल मॅचच्या वेळी मी बॅटिंग करत असताना ती बरोब्बर समोर उभी होती! पिवळाधम्मक फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस, खांद्यावरून सरकणारी ओढणी सावरत उभी असलेली ती पाहून मी आधीच आऊट झालो होतो!! अहो असली मादक 'साईट स्क्रीन' लावल्यावर कसला स्कोर करणार~? बॅटिंग करताना सारखं वाटत होतं त्या अंपायरला जाऊन हाणावं आधी. उगाच मधे अडथळा आणत होता! पण तिनंच जरा बाजूला सरकून माझ्या कडे बघून 'थम्ब्स अप' केल्यावर तर माझ्या अंगात काय संचारलं कोण जाणे? केवळ तिसर्या चेंडूवर - आता हा बाहेर मारायचाच असं ठरवूनच - फुल ताकद काढून बॅट फिरवली तो नेमका स्लोवरवन निघाला आणि सरळ उंच मनोरा हवेत!! शेंबड्या पोराने सुद्धा घेतला असता इतका शिंपल कॅच डायरेक बॉलरच्या हातात!! आयुष्यात पहिल्यांदा मी इतका वाईट बाद झालो होतो! पण काय करणार राव! समोरचा नजाराच इतका सुंदर होता की विकेट केव्हाच पडली होती!! सगळ्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली, पण त्या सगळ्या 'मा-भे-य-चु' च्या गदारोळात मला फक्त ती "डोण्ट वरी, पुढल्या वेळी नीट खेळ" असं बोलल्याचा भास होत होता! तिच्याकडे एकदा बघितलं तेव्हा तिने एकदा गोड हसून, डोळ्यांनीच "जाऊदे" अशी खूण केली आणि कट्यार काळजात पुरती घुसली!
अॅन्युअलला आम्ही 'सरफरोश' मधलं "जो हाल दिल का" हे द्वंद्वगीत गायलो आणि वार आणखी गहिरा झाला.. अगदी तल्लीन होऊन गात होती हो! म्हणजे मला वाटलं होतं ही माझ्यासाठीच गातेय की काय.. मला इतका आनंद झाला की "जानेजां दिलों पे प्यार का.." ला मी तिचा हात धरला आणि "अजबसा असर हो रहा है.." म्हणता म्हणता तिला जवळ घेतलं! लगेच पुढल्या कीबोर्डच्या पीस वर तिनं माझा हात धरून डान्स चालू केला म्हणून वेळ निघाली! अजिबात अनकम्फर्टेबल न होता तिनं प्रसंगावधान राखलं होतं! तेव्हा वाटलं होतं तिथं स्टेजवरच एकदा "आय जस्ट वॉण्ट टू से आय लव्ह यू" म्हणून घ्यावं पण पहिल्या रांगेत बसलेल्या आमच्या प्रिन्सिपल बाई माझ्याकडे आक्रमण करण्याच्या मूडमधे असलेल्या म्हशीसारख्या बघत होत्या. त्यांना बघितल्यावर माझ्या चेहर्याकडे जर 'मराठी वाक्प्रचार' पुस्तकाच्या रचनाकारांनी पाहिलं असतं तर कदाचित 'पाचावर धारण बसणे' या वाक्प्रचाराचं उदाहरण देण्यासाठी या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला असता! दोन मिनिटांपूर्वी गब्बरच्या आवेशात असणार्या माझा आमच्या मॅमना पाहिल्यावर असहाय्य इमाम साहब झाला होता!! बस्स तेव्हाच ठरवलं दिड महिन्याने व्हॅलेन्टाईन डे ला काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया!
आणि परिक्षेचा दिवस उजाडला.. शैक्षणिक परिक्षांना कधीही न घाबरणारा, नेहमी आत्मविश्वासाने जाणारा 'मार्कस चाटे' (मला चांगले मार्क्स मिळायचे आणि मी चाटे क्लासेस ला जायचो म्हणून.. ;) ) असणारा मी आज फुल्टू 'टर्कन फाटे' झालो होतो!! त्यात सम्या आणि दिन्या मला झाडावर चढवत होते, "रस्त्यावर प्रपोज कर रे .. त्यात खरी मजा आहे! बघ, असा विचार कर .. रस्त्यावर सगळ्यांसमोर तिने गुलाब घेतला आणि हो म्हणून मिठी मारली!! चायला काय इज्जत होईल तुझी कॉलेजमध्ये!! ते च्च्यायचं हलकट माजुर्डं कलिंगड, ते बघ त्यानं पण केल्लं रस्त्यावर प्रपोज त्याच्या त्या टरबूजाला.. तू पण कर एक दम इष्टायील मधे!!" (इथे कलिंगड आणि टरबूज म्हणजे सुमित आणि स्वाती .. आम्च्या क्लास मधलं एकमेकांना पूरक असं 'हेवी ड्युटी', 'रोडरोलर्स' कपल!)
रोडरोलर्स पासून प्रेरणा घेऊन मीही "आता अजिबात घाबरायचं नाही" असं मनाला समजावून कॉलेजबाहेर रस्त्यावरच प्रपोज करायचं असं ठरवलं! त्या दिवसाला साजेलसा फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस तिनं घातला होता!! दैवी सौंदर्याचा तो आविष्कार या पृथ्वीतलावर कसा काय घडला असा मला प्रश्न त्यावेळी पडला होता! व्हॅलेन्टाईन डे असल्याने, आणि त्यात मी प्रपोज करण्याच्या फूल मूड मधे असल्याने ती माझ्या मानवी नजरेला स्वर्गातली अप्सराच वाटत होती! मी काही तिला पहिल्यांदा भेटत नव्हतो, पण आमच्या या भेटीचं वर्णन 'ती आली, तिनं बघितलं, ती हसली आणि तिनं जिंकलं!' या शब्दांतच होऊ शकेल. वास्तविक, त्यापूर्वीच्या बर्याच दिवसांतील तिच्या माझ्या भेटींचं वर्णन नेमक्या याच शब्दांत करता येईल, पण तो दिवस खास होता म्हणून त्याचा मान.. एक हात मागे घेऊन देवानंद श्टाईल मधे वाकून, मी तिला 'हाय' केलं. पुन्हा एकदा ती गोड हसली. झालं.. परत विकेट पडली! मी नुसता तिच्याकडे बघून हसतच होतो! मागून दिन्या आणि सम्या ओरडत होते, चिडवत होते..
"हातात काय आहे त्याच्या विचार त्याला..." इति दिन्या.
"काय रे? काय म्हणतोय तो दिन्या??" तिनं अगदी लाडिकपणे विचारलं!
"काही नाही अगं ते .. ते.. " - मी!
"गुलाब आहे .. लाल" सम्या ओरडला..
आता ती लाजेल, तिनं घातलेल्या गुलाबी ड्रेसपेक्षा आणि माझ्या हातातल्या गुलाबपेक्षा सुंदर रंग तिच्या गालांवर चढेल अशा अपेक्षेत असलेला मी तिचं उत्तर ऐकून भांबवलोच ..
"ग्राऊंड फ्लोअर क्लासरूम १७ मधे ये. मला असल्या गोष्टी रस्त्यावर बोलायच्या नाहियेत." इति ती.
असं रागीट बोलणं तिच्याकडून अनपेक्षित होतं मला.. ती निघून गेली.. माझं पुरतं अवसान गळालं .. सम्याला त्याने आयुष्यात ऐकल्या नसतील असल्या शिव्यांचा प्रसाद देऊन मी तडक १७ कडे निघालो.. आत ती एकटी होती.. रागाने बघत होती.. माझी नजर थेट स्वतःच्या पायांकडे..
"प्रेमवीर! प्रिन्सिपलच्या मुलीला गुलाब द्यायचंय? तेही रस्त्यावर? थांब आई येतेय खाली!"
मी डोळे मिटलेच! मला माझे आईबाबा प्रिन्सिपल मॅमच्या केबिन मधे बसलेले दिसले. हा प्रसंग मी स्वप्नांत कित्येकदा पाहिला होता. पण तेव्हा (स्वप्नात) ते आमच्या लग्नाबाबत बोलत होते.. मी काही बोलणार म्हणून मान वर केली तर एक सुंदर लाल गुलाबाचं फूल माझ्याकडे बघत होतं आणि ते फूल हातात धरणारी ती नेहमीसारखी गोड हसत होती.. मला कळेचना काय चाललंय.. तेवढ्यात हळू आवाजात ती म्हणाली..
"अरे अशा गोष्टी कॉलेजबाहेर रस्त्यावर बोलायच्या असतात का? वेडा.. आता बोल काय सांगायचं होतं तुला?".. मला खरोखर वेड लागणं तेवढं बाकी होतं..
यापुढचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. पहिल्यांदाच कुणा मुलीला 'इलू'चा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करत होतो मी आणि माझी तिने नेहमीप्रमाणे विकेट काढली होती! शेवटी आमची केमिकल रिअॅक्शन घडली! आजही ती तितकीच गोड हसते, आजही तिला पाहताच माझी विकेट पडते. लवकरच 'ती'ला 'ही' करायचा विचार आहे, म्हणतोय या व्हॅलेन्टाईन डे ला विचारतोच.. पण रस्त्यावर मात्र नक्कीच नाही ;) !!!
अवांतरः शुचिताई, आमच्या राशी ओळखू शकता का?
प्रतिक्रिया
10 Feb 2010 - 11:56 pm | प्रमोद देव
प्रेमकहाणी मस्त आहे.
लिहीलीय देखिल मस्त.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
10 Feb 2010 - 11:57 pm | अनिल हटेला
'मार्कस चाटे'
'टर्कन फाटे'
'हेवी ड्युटी', 'रोडरोलर्स' कपल!
=)) =))
सह्ही लिहीलय रे ..बोले तो एकदम झक्कास ष्टाईल क्या? ;-)
>>लवकरच 'ती'ला 'ही' करायचा विचार आहे
--->>>शुभस्य शीघ्रम....आल इज वेल.....:-)
(हसून बेजार)
बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.
11 Feb 2010 - 12:12 am | खान्देशी
छान लिहिलय...
11 Feb 2010 - 12:21 am | विसोबा खेचर
खूप सुंदर लेख रे!
साला जुने दिवस आठवले आणि हळहळलो रे!
कॉलेजच्या जमान्यात एकदा भर पावसाच्या दिवसात राजमाचीच्या ट्रेकला गेलो होतो. दुपारचं कुंद वातावरण. इच्छित स्थळी पोहोचलो होतो. तेथील कुण्या एका म्हातारीनं नाचणीची भाकरी, हरभरा उसळ आणि सोबत कांदा असं अमृततूल्य जेवायला दिलं होतं. जेवून सारी मंडळी जरा निवांत झाली होती.. गाण्यागप्पांचा फड जमला होता.. मित्रमंडळींमध्ये बसून त्या कुंद वातावरणात 'सावर रे सावर रे उंच उंच झुला..' या माझ्या अत्यंत आवडत्या गाण्याचं खास तात्याच्या शैलीत लेकडेमो करत रसग्रहण केलं होतं आणि त्याने भारावून जाऊन एक छानशी पोरगी मला पटली होती रे! :)
जाऊ द्या...!
(हळवा) तात्या.
11 Feb 2010 - 12:22 am | शुचि
तुम्ही पूर्वी सांगीतल्याप्रमाणे - सिंह (अग्नी तत्व) आणि मीन (जल तत्व) ............ भलताच स्टीमी रोमॅन्स होणार बॉ ;)
मस्त लिहीलय. असेच लिहीत जा.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 12:24 am | शेखर
>> भलताच स्टीमी रोमॅन्स होणार
हो ... पण पाणी जास्त झाले तर आग विझायची... ;) (ह. घे.)
11 Feb 2010 - 3:29 pm | मेघवेडा
हो ... पण पाणी जास्त झाले तर आग विझायची...
हो तिजायला! :D हा विचार मी केलाच नव्हता!
पण शेवटी तिची रास मीन आहे म्हटल्यावर पाणी जास्त होणारच शेखरजी! ;)
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
30 Jun 2010 - 10:19 am | मृगनयनी
हे मेघ, आय लाइक युअर लवस्टोरी! :)
वेरी नाईस्स! विथ फन अॅन्ड रोमान्स! :)
रिअली लकी गाय! :)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
11 Feb 2010 - 4:39 am | टुकुल
खतरा लिहिल, सुरुवातीला वाटल कि तुझा पण पोपट होतो का काय, पण नशीब जोरात दिसत आहे ;-)
शुचिताई: नशीब जोरात असणारी राशी कोणती हो?
(पोपट झालेला पण सिंह राशीचा),
टुकुल.
11 Feb 2010 - 9:46 am | शुचि
ली-ब्रा
बाकी पोपट झालेला सिंह ऐकून ह. ह.पु.वा.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 10:34 am | टुकुल
ली-ब्रा =)) =)) =))
हे लिब्रा आहे हे कळायला थोडा वेळ लागला पण तो पर्यंत ह. ह. पु. वा झाली.
एकनाथ बॉ-चा अनुयायी,
टुकुल
11 Feb 2010 - 4:35 am | सुधीर काळे
झकास भाषाशैली! तितकीच सुंदर गोष्ट!!
शेखर-जी: लेखकाच्या नावातच 'मेघ' असल्यावर पाणी जास्त होईलच, पण हा रोमान्स विझेल असे वाटत नाहीं!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
11 Feb 2010 - 9:36 am | प्रमोद देव
फक्त गरजतात. बरसत नाहीत.;)
तेव्हा आग विझण्याची भिती नको.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
11 Feb 2010 - 4:41 am | शाहरुख
लय भारी दोस्ता !!
11 Feb 2010 - 12:44 pm | मदनबाण
मस्त लिवलं हायेस रे मित्रा... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 1:04 pm | अनामिका
मेघ !
तुमची इतकी सुंदर प्रेमकहाणी वाचुन मी सुद्धा माझ्या जुन्यादिवसात रमले ......आणि त्यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. :> :\
प्रेमदिनाच्या पार्श्वभुमीवर तुमची कहाणी आंम्हास स्फुर्ती मिळवुन देणार हे मात्र निश्चित! ;)
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
11 Feb 2010 - 1:34 pm | चिऊ
फारच छान लिहिले आहे :-).....मित्रा किती वेळा एकाच गोल॑नदाजानी तुझी विकेट घेतली रे.....पुढच्या आठवड्यात या १४ ला कोण कोणाची विकेट काढते ते वाचायला नक्कि आवडेल्...मनापासुन शुभेच्छा...
11 Feb 2010 - 1:35 pm | चिऊ
फारच छान लिहिले आहे :-).....मित्रा किती वेळा एकाच गोल॑नदाजानी तुझी विकेट घेतली रे.....पुढच्या आठवड्यात या १४ ला कोण कोणाची विकेट काढते ते वाचायला नक्कि आवडेल्...मनापासुन शुभेच्छा...
11 Feb 2010 - 2:09 pm | फ्रॅक्चर बंड्या
जबरा स्टोरी आहे राव..
मस्त लिहलय...
binarybandya™
11 Feb 2010 - 3:35 pm | मेघवेडा
प्रतिसादांसाठी सर्वांचे मनापासून आभार! माझा लिखाणाचा हा पहिलाच प्रयत्न! तुमच्या प्रतिसादांवरून लेख बर्यापैकी जमलाय असं वाटतंय! आणि मलाही जरा चेव चढलाय ;) यापुढेही लिहीत राहायचा प्रयत्न करीन.
अर्थात मिपाचा यात सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
11 Feb 2010 - 5:02 pm | शुचि
यंव रे पट्ठे!! आ जा मेरे शेर मैदानमे.
इसको बोल्ते है - सुरसुरी-ए-लिखाण ........ जिस मुकाम्से हम भी गुजर रहे है B)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 5:30 pm | मेघवेडा
शुचिताई, शेर बीर म्हणल्यावर कॉलर बगा अशी ताडकन उबी रायली!!! पण तुमच्या तुलनेत अजून कच्चा लिंबू आहे हो मी! आणि हो .. 'लिखाण-ए-सुरसुरी' म्हण्जे काय फक्त सुरसुर्यांवर लिहायचं असतं काय?? ;) त्याबाबतीत मात्र फूल्टू कॉण्फिडण्स आहे हां आपल्याला! ;) यादीच आहे तयार आपल्याकडे!!
-- सुरसुर्यांची सूचि ;)
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
11 Feb 2010 - 5:56 pm | शुचि
मला या फायर साइन्स चा आत्म्विश्वास भारी आवडतो. आता एक ब्लेझ्झींग हॉट्ट ;) स्कूप येऊच्च द्या. आम्ही मेजवानीच्या आशेत बसलो आहोत. ;)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 4:56 pm | स्वाती२
प्रेमकहाणी आवडली.
12 Feb 2010 - 5:36 am | भानस
मेघवेडा, एकदम झकास जमलीये गोष्ट(का....?). :)
12 Feb 2010 - 3:23 pm | मेघवेडा
गोष्ट? स्वानुभव आहेत!!! आजही ज्या पद्धतीनं आऊट झालो होतो, जी धमाल केली होती स्टेजवर ते आठवलं की हहपुवा होते! तिचीही अन माझीही!! :)
-- (आठवणींत रमलेला) मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
12 Feb 2010 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन आवडले...!
-दिलीप बिरुटे
13 Feb 2010 - 1:26 am | सुमीत भातखंडे
हा हा हा.
मस्त.
29 Jun 2010 - 2:57 pm | अस्मी
ह्म्म्म्म....छान स्टोरी
मस्त लिहिलंयस :)
- अस्मिता
29 Jun 2010 - 7:49 pm | शिल्पा ब
लै भारी!!! मेवे आगे बढो हम तुम्हारे पीछे है !!
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
21 Oct 2010 - 9:30 pm | शानबा५१२
- मस्तच उपमा दीलीस,भन्नाट!!............मोअर करेक्टली इट्स 'अमोनियम हायड्रोक्साइड' राइट! साला लांबुन वास नाही येत म्हणून जवळुन वास घेतला की.......झींन्ग!!!!
___________________________________________________
![]()
see what Google thinks about me!
इथे
30 Jun 2010 - 10:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे कसं राहिलं होतं वाचायचं!
मेवे, सह्हीच!!
अदिती
30 Jun 2010 - 10:42 am | नंदन
हा लेख राहिलाच होता वाचायचा. झक्कास रे, मेव्या!
>>> पहिल्या रांगेत बसलेल्या आमच्या प्रिन्सिपल बाई माझ्याकडे आक्रमण करण्याच्या मूडमधे असलेल्या म्हशीसारख्या बघत होत्या. त्यांना बघितल्यावर माझ्या चेहर्याकडे जर 'मराठी वाक्प्रचार' पुस्तकाच्या रचनाकारांनी पाहिलं असतं तर कदाचित 'पाचावर धारण बसणे' या वाक्प्रचाराचं उदाहरण देण्यासाठी या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला असता! दोन मिनिटांपूर्वी गब्बरच्या आवेशात असणार्या माझा आमच्या मॅमना पाहिल्यावर असहाय्य इमाम साहब झाला होता!!
--- =)) =)) =)), अरारारारा.
>>> वास्तविक, त्यापूर्वीच्या बर्याच दिवसांतील तिच्या माझ्या भेटींचं वर्णन नेमक्या याच शब्दांत करता येईल, पण तो दिवस खास होता म्हणून त्याचा मान
--- लै भारी :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
30 Jun 2010 - 10:42 am | यशोधरा
अर्रे, हे वाचलच नव्हतं! मस्त रे मेव्या :)
21 Oct 2010 - 4:43 pm | मधु बन
छान लव्ह्स्टोरी आहे.
btw "ती" ची "ही" झाली का??
21 Oct 2010 - 8:03 pm | असुर
मेव्या,
काय वाचतोय मी हे??? लैच भारी!
लिहायची टिपीकल मेवे स्टाईल आहे. या स्टाईलमध्ये 'काल मी १० मिनिट दात घासले' हे सुद्धा रंगवून सांगशील तू! आणि इथे तर दिलाचा मामला दिसतोय, म्हणजे तुझ्या लेखणीला तलवारीची धार आली असणार! व्वा!
अरे, कुणीतरी ते 'वाचनखुणा' प्रकरण चालू करा रे!! अशा वेळी फार्फ्फार गरज पडते!!!
--असुर
21 Oct 2010 - 10:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी योग्य निरिक्षण!
21 Oct 2010 - 8:28 pm | नगरीनिरंजन
व्वा मेवे! ओये लक्की लक्की ओये. भारी लिवलंय!
21 Oct 2010 - 9:21 pm | पैसा
पुढे काय झालं रे?
आणि 'प्रिन्सिपॉलची मुलगी?' म्हणजे ते '5 point someone' वाचून कॉलेजात गेला होतास की काय?