लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जनातलं, मनातलं
3 Feb 2010 - 11:36 am

"लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला.
"भलतंसलतं म्हणजे?"
"म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे.."
"अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं..."
"कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस" तो धूर सोडत म्हणाला.
"फक्त सकाळमध्ये नाही. बर्‍याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय?
"काय त्याचं?"
"काय म्हणजे ... त्यात लताबाई म्हणतात की.. म्हणजे एकीकडे म्हणतात की... की थोरले बर्मनदा मला वडिलांच्या ठिकाणी होते आणि दुसरीकडे म्हणतात की बर्मनदांनी एक गाणं पुन्हा रेकॉर्ड करायला पाहिजे म्हटल्यावर आमचे गैरसमज झाले आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही कोण माझ्याबरोबर काम करायला नकार देणारे. मीच तुमच्याबरोबर काम करत नाही ज्जा.."
"मग त्यात काय एवढं? तसं झालंसुद्धा असेल.."
"अरे मग नंतर 'आता आर्डीला लाँच करायच्या वेळी आलात की नाही झकत पाय धरायला..' हा माज कशाला?"
"माज? माज तुझ्या मते. माज? आम्ही याला स्वाभिमान म्हणतो. सेल्फ रिस्पेक्ट. एस्टीम. माज? 'नुसती मराठी येता कामा नये, तो जन्माने मराठी असला पाहिजे' असं परवा राजाभाऊ म्हणाले त्यालाही तू माजच म्हणशील. हा माज नव्हे. हा अभिमान. अस्मिता. हाच तो मराठी बाणा.."
"हां, हे चांगलं आहे. म्हणजे हा बाणा तुम्ही आपापल्यात भांडायला वापरणार म्हणा की."
"बर्मनदा कुठे मराठी होते?" त्याने एक प्रश्नार्थक झुरका घेतला.
"च्च... अरे मराठी- अमराठी नाही रे. संगीताच्या क्षेत्राविषयी म्हणतोय मी. 'तुम्ही असाल एवढे थोर, ज्येष्ठ संगीतकार वगैरे, पण शेवटी माझ्यासमोर झुकलातच की नाही' हा तुझ्या मते बाणेदारपणा काय?'
"ऑफ कोर्स. आणि समजा असला माज तर असू दे. मी म्हणतो लताबाईंनी करावाच एवढा माज. तो शोभूनही दिसतो त्यांना. त्यांनी माज नाही करायचा तर काय अमरसिंगांनी करायचा?"
"हम्म. आता तू म्हणशील की आण्णा चितळकरांबाबत लताबाईंनी केलं तोही स्वाभिमानच. सेल्फ रिस्पेक्ट."
"काय केलं आण्णांबाबत?"
"हेच की आण्णांचा कोणता तरी रेकॉर्डिस्ट होता. तो म्हणे लताबाईंबद्दल काहीतरी बोलला. लताबाई मग आण्णांना म्हणाल्या की त्याला काढून टाका, तरच मी गाणार. आण्णा म्हणाले की बाई, हा माझा जुना सहकारी आहे. त्याला काढून टाकणं काही मला जमणार नाही. मग लताबाई म्हणाल्या की... तेच रे!! II धॄII असं म्हणूया आपण फार तर. बाईंनी गायचं थांबवलं आण्णांबरोबर. मग 'ऐ मेरे वतन के लोगों' च्या वेळी आण्णा पाय धरायला आले आणि बाई फणकारुन म्हणाल्या की आणंच्याबरोबर गाणं? मी नाही ज्जा! दिल्लीला तालमी? मी नाही ज्जा! शेवटी गीतकार प्रदीप हात जोडून म्हणाले की बाई, तुम्ही हे गाणं गायलं नाही तर हे गाणं तसंच पडून राहील बरं का. मग बाईंनी आपला जरतारी पदर सावरला आणि एक समाजकल्याण खात्यासारखा निश्वास टाकून म्हणाल्या की बरं येते बाई. मग बाई दिल्लीला गेल्या, त्यांनी ते गाणं पंडीतजींसमोर म्हटलं आणि पंडीतजी...."
"पुरे, पुरे. II धॄII II धॄII II धॄII .... पण महाशय, हाही कणखर मर्‍हाटी बाणाच. अगदी आण्णाही मराठी असले म्हणून काय झालं? ते कितीही थोर संगीतकार असले म्हणून काय? "
"खरं आहे. 'मुझपे इल्जाम-ए-बेवफाई है, बेचैन नजर आणि तुम अपनी याद भी दिलसे मिटा जाते तो अच्छा था' ही सगळी रत्नं त्यांनी एकाच सिनेमात दिलेली असली म्हणून काय झालं? 'अनारकली' ला लताबाईंचा आवाज त्यांनी अजरामर केला असला म्हणून काय झालं? आणि पंडीतजींसमोर जेंव्हा हे गाणं बाईंनी गायलं तेंव्हा संगीतकाराचा उल्लेख करायला दिलीपकुमार सोयीस्करपणे विसरला म्हणून काय झालं असंच ना??"
"गुरुवर्य,..." त्यानं शेवटचा झुरका घेऊन सिगारेट रक्षापात्रात विझवली. "कुजकटपणा नको. बोलायचा मुद्दे सुचले नाही की माणूस असा तिरक्यात शिरतो. आण्ण्णा माझेही आवडते. पण म्हणून त्यांनी काय लताबाईंबरोबर पंगा घ्यायचा?"
"पंगा... घाणेरडा पण अगदी बरोबर शब्द वापरलात महाराज. पंगा. शिवसेनट पंगा. म्हणजे आपल्याला पाहिजे ते झालं नाही की घ्यायचं वैर. वर्चस्व. वर्चस्व की लडाई. 'सहर' मध्ये अर्शद वारसीची आई झालेली सुहासिनी मुळ्ये सांगते तशी अनकंडीशनल पॉवर. आणि आम्ही पामर असं समजत होतो की कलेच्या पवित्र वगैरे क्षेत्रात असलं काही राजकारण असत नाही. असू नये. 'मेरी तो सारी दुनिया घूम फिर के अनिलदाके पास आती है ' म्हणणारा तलत आणि ' ये तो तलतका बडप्पन है, मैं तो एक बहाना हूं जिसके जरिये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं' असं म्हणणारे अनिलदा हे आमचे आदर्श.'विद्येप्रमाणेच कलाही विनयानं शोभते असले आमचे बुरसटलेले समज. आम्हाला असली पंग्याची भाषा कशी कळणार, सरकार?"
"व्वा. शब्द अगदी शेणखतात बुडवून ठेवल्यासारखे कुजके वापरलेत साहेब. बट राईट. म्हणून तुमच्या तलतला सत्तरीनंतर एकही गाणं मिळालं नाही आणि अनिल विश्वास दिल्लीत मेला तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला दहा माणसंसुद्धा नव्हती. लताबाई बघ. आजही त्या जिथं पाऊल ठेवतील, लोग वहांकी मिट्टी चूमनेको तैयार है..."
"ओहोहो. आहाहा. एहेहे.... हे आमच्या ध्यानातच आलं नाही बृहस्पती. शेवटी तुम्ही याच फूटपट्टीनं मोजणार नाही का सगळं! रफीसारखा सरळ माणूस लताबाईंच्या या वर्चस्वाला आव्हान देतो तेंव्हा लताबाई हेच करतात, अं? काये ते तुमच्या भाषेत? हां, पंगा. सुमन कल्याणपूरला तुम्ही कुजवलंत का? या प्रश्नावर लताबाई म्हणतात की मी कुजवणारी कोण? संगीतकारच म्हणायचे की आमच्याकडं ओरिजीनल लता आहे, तर आम्ही लताची नक्कल कशाला घेऊ? पंगा. आशाचं काय म्हटल्यावर बाई म्हणणार की आशाचं काही नव्हतं हो इतकं, पण ते भोसलेसाहेब होते ना, ते फार दुष्ट होते. पण ते गेले बघा अकाली. अरेरे, फार वाईट झालं हो. पण त्यानंतर आता सग्गळं सुरळीत झालं आहे. पंगा, अं?"
"चष्मा बदला शहजादे, चष्मा बदला. तुम्हाला बासुंदीत मिठाची कणी टाकायची एवढी हौस असेल तर दुसरीकडे जा. लताबाईंविषयी असलं काहीबाही आम्ही तरी ऐकून घेणार नाही." त्याने नवी सिगारेट पेटवली.
"तुम्ही असं बोलणार हे माहीतच होतं राजाधिराज. घाऊक प्रेम आणि घाऊक तिटकारा करणारे तुम्ही. तुम्हाला असली वस्तुनिष्ठता कशी पटणार? पण ध्यानात ठेवा आचार्य, एखादा ओंकारप्रसाद नय्यर निघतो. दशकातून एकदा निघतो, पण निघतो. आणि तो अशा माज करणार्‍यांना.. ओहो, चुकलो, अशा बाणेदारांना आपली जागा दाखवून देतो. 'तू नही और सही, और नही और सही' असं म्हणून जातो. पंगा घेणार्‍यांबरोबर तसाच पंगा घेतो..."
"ते मला काही माहिती नाही पण लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र पुन्हा म्हणाला.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

कवटी's picture

3 Feb 2010 - 12:01 pm | कवटी

छान लिहिलय...
फारच स्फोटक विषयाला स्पर्श केलाय...
किती काळ लेख राहील हिच शंका.

कवटी

Nile's picture

10 Feb 2010 - 9:00 am | Nile

लताबाईंचे असे बरेच किस्से ऐकुन असल्याने(असेल कदाचित) स्फोटक वगैरे वाटला नाही. संजोप रावांच्या प्रतिभेचा विचार केला तर त्यांना ह्यापेक्षा कित्येक पटीने 'अपिलींग' लिहता आला असता हे माहित आहे. पण बहुधा ह्या संकेतस्थळाच्या नियमांकडे बघुन त्यांनी जरा हलकेच माप टाकले आहे असे दिसते. अर्थात तरी हा लेख इतका वेळ टिकला म्हणजे आश्चर्यच आहे! नक्की कुणाची प्रतिभा म्हणायची ही? ;)

ज्ञानेश...'s picture

3 Feb 2010 - 12:16 pm | ज्ञानेश...

नो कमेंट्स !! :> :$

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2010 - 12:28 pm | llपुण्याचे पेशवेll

छान लिहीलं. आहे. ओंकारप्रसाद नय्यर म्हणजे ओ.पी. नय्यर का? पण त्यांनी काय केलं होतं दिदीला?

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2010 - 12:32 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!! जोरदार. लेखात मांडलेल्या विचारांशी बर्‍यापैकी सहमत आहे.

बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन's picture

3 Feb 2010 - 6:29 pm | छोटा डॉन

असेच म्हणतो.
तिरकस लेखन आवडले, बर्‍याच मनोरंजक संदर्भांच्या पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. ;)

------
छोटा डॉन
सध्या आमचा एकंदरीतच उपास आहे, बाकी अजुन काय बोला ?

आनंदयात्री's picture

4 Feb 2010 - 11:03 am | आनंदयात्री

हेच म्हणतो. लेख वाचायला मजा आली, जुन्या गंमती जंमती समजल्या.

माधुरी दिक्षित's picture

3 Feb 2010 - 12:37 pm | माधुरी दिक्षित

आवडला !!!!!!!!!!

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Feb 2010 - 12:51 pm | ब्रिटिश टिंग्या

तिरकस फटके लै भारी! :)

एकदम समयोचित लेख असेच म्हणता येईल.सगळी कडे पैशाचच राज्य आहे.

वेताळ

गणपा's picture

3 Feb 2010 - 1:44 pm | गणपा

मस्त रावसाहेब.
बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या तर काही जुन्या गोष्टींच स्मरण झाल.

(लेखकाशी बहुतांशी सहमत)-गणपा

स्वाती दिनेश's picture

3 Feb 2010 - 1:47 pm | स्वाती दिनेश

चिमटे घेत लिहिलेला लेख आवडला,
स्वाती

अमोल केळकर's picture

3 Feb 2010 - 1:53 pm | अमोल केळकर

विश्वास बसत नाही !!

(आश्चर्यचकीत ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अविनाशकुलकर्णी's picture

3 Feb 2010 - 1:59 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त लेख आहे..सुमन ताई ना कुजवले हे खरे..आजच्या जमान्यात लता व सुमन ताई असत्या तर सुमन ताईंनी दिदिला कच्चा खाल्ल असत..

श्रावण मोडक's picture

3 Feb 2010 - 2:07 pm | श्रावण मोडक

वाह!
बायदवे, हा कुठं भेटला तुम्हाला? मामा काण्यांचे पुण्यातील होटेल कुठले?

विजुभाऊ's picture

3 Feb 2010 - 2:17 pm | विजुभाऊ

लेखनाचे ;कर्ता कर्म क्रीयावद क्रीयाविशेषण असलेले शीर्षक समर्पक असावे असे वाटते.लेख विस्तॄत आहे. परंतु विस्तृत लिखाण म्हणजे जे काही सांगायचे आहे त्याचा गाभा सापडला असे नव्हे. विस्तृत लेखनाचा एक गुण आहे की जे काही सांगायचे आहे त्यापेक्षा बरेच काही नुसतेच चिवडले जाते. सकस पणा नष्ट होतो.
बरेचदा जे काही सांगायचे असते ते एका ओळीत सांगता येते पण नमनालाच घडाभर तेल जाळून होते आणि मुख्य प्रवेशाच्यावेळेस दिवटी विझते. तसे काहीसे झाल्यासारखे वाटते.
अर्थात प्रत्येक लेखाणातून सकस मजकूर दिलाच पाहिजे असे नाही.
सांगायचेच झाले तर "शेख करता है मसजीद में सजदे....उनका असर हो ये जरूरी तो नही"
असो. लिहिणाराने लिहीत जावे. वाचकानी ते वाचावे. निके ठेवावे. फुके फुंकूनी टाकावे असे समर्थानी म्हंटले आहेच
लेखाणातली पात्रे वास्तवाशी नाते सांगत असली तरी लिखाणातला मजकूर वास्तवाशी इमान ठेवून असेलच असे नाही.
प्रस्तूत लेखात जो वास्तवाचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे नक्की प्रयोजन काय आहे ते संदीग्ध ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे हा लेखाचा सर्वात मोठा गूण म्हंटला पाहिजे.
चिखल उडवायचा कसा उडवायचा नाही ते सांगतानाच चिखल उडवून दाखवायचा हा या लिखाणातील आणखी एक गूण.
लेखाच्या या गुणांबद्दल लेखकाचे अभिनन्दन.
अर्थात कविता जशी प्रसूत होईपर्यन्त वैयक्तीक असते ती एकदा लिहून झाली की सार्वजनीक होते.
तद्वत लेख लिहून होईपर्यन्त लेखाकाच्या मनातल्या सर्व गोष्ती झाकत दाखवत असतो. तो लिहून झाला की वाचकाना जे जाणवते तो अर्थात लेखाचा नसून लेखानाचा गूण असतो. असे दांते म्हणून गेला आहे
ब्रेख्त म्हणतो त्याप्रमाणे लेखनातून लेखक जे दाखवतो त्यापेक्षाही जे दाखवत नाही ते कितीतरी सांगून जाते.

ज्ञानेश...'s picture

3 Feb 2010 - 5:50 pm | ज्ञानेश...

(|:

chipatakhdumdum's picture

4 Feb 2010 - 1:19 am | chipatakhdumdum

--- वैयक्तिक रोखाचा अभिरूचीहीन मजकूर संपादित - सदस्यांनी जबाबदारीने लेखन करावे ---

शुचि's picture

3 Feb 2010 - 2:48 pm | शुचि

काय भन्नाट शैली आहे लेखनाची. असं वाटलं समोरसमोर दोन अस्सल मराठी मित्र बोलत आहेत , ते ही व्यासंग, माहीती असणारे. एकमेकाना हार न जाणारे. असंच लिहीत रहा.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

विजुभाऊ's picture

3 Feb 2010 - 3:05 pm | विजुभाऊ

व्यासंग, माहीती ?
शुची तै गॉसीप आणि व्यासंग, माहीती यात फरक आहे.
जसा डाटा आणि इन्फोर्मेशन मध्ये आहे.
सदर लेखनात उपयुक्त माहिती कुठे आहे ते सांगाल काय?

शुचि's picture

3 Feb 2010 - 3:12 pm | शुचि

पण जसं प्रत्येक जेवण आपण जीवनसत्वांकरता खात नाही ..... कधी कधी पाणी पुरी सुद्धा खातो, तसं काही वाचन खुमासदार असाव असं वाटतं.
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

chipatakhdumdum's picture

4 Feb 2010 - 1:25 am | chipatakhdumdum

का हो.. तुम्ही हा चवीचा राग आमच्या पन्नालाल समोर गाउ शकाल का ?

शुचि's picture

4 Feb 2010 - 6:18 pm | शुचि

पन्नालाल कोण? पन्नालाल हे जर मालकांचे आय डी असेल तर मी नक्कीच हा राग आळवणार नाही. मला त्यांची भूमिका माहीत नव्हती जेव्हा मी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या वसाहतीत मस्त प्राणी आहेत आणि मला इथे रहायचे आहे. B)

||विकास|| यांनी उदधृत केलेल्या नोड मुळे मला या कम्युनिटीचा नियम कळला.
***************
फक्त जीभच अस इन्द्रिय आहे जे की ज्ञानेंद्रिय ही आहे आणि कर्मेंद्रिय ही.

Dhananjay Borgaonkar's picture

3 Feb 2010 - 2:53 pm | Dhananjay Borgaonkar

रावसाहेब लेख एकदम खुमासदार आहे. शालजोडीतले मारले आहेत.
तात्यासाहेबांच्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे.
लताबाई म्हणजे तात्यांचा जीव की प्राण.

गणपा's picture

3 Feb 2010 - 3:27 pm | गणपा

काही लोकांना खरच 'मोठ' होण्याची गरज आहे अस वाटतय.

विजुभाऊ's picture

3 Feb 2010 - 3:43 pm | विजुभाऊ

गणपाशी १०००% सहमत.

JAGOMOHANPYARE's picture

3 Feb 2010 - 5:36 pm | JAGOMOHANPYARE

:)

फिर मिले सुर मेरा तुम्हारा मध्ये लतादीदी नाही.... १५ मिनिटे सगळं गाणं संपेपर्यन्त वाट पाहिली..... शेवटी कळलं यात लता नाही... !

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 5:42 pm | स्वाती२

मस्त !

गणा मास्तर's picture

3 Feb 2010 - 6:19 pm | गणा मास्तर

दादा कोंडकेंचे चरित्र 'एकटा जीव' वाचले आहे का कुणी?

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2010 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll

ह्म्म्म्म. खरे आहे. असो. देव-भक्त हे नातं सुधा फार जुनं आहे. दादा एक भन्नाट माणूस होता हे तर कळलंच.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मी: रावांचा लेख वाचलास का?
मित्र : हो. लेखातले मुद्दे नेहमीचेच आहेत .. त्यात भालजींच्या स्टुडिओचा संवाद यायला हवा होता...
मी : ह्म्म्म्म काय आहे रे तो... मला निट माहित नाही.
मित्र: स्टुडिओला गहाण ठेवले होते भालजींनी लताबाईंकडे, एका सिनेमाला पैसे पुरत नव्हते म्हणून...
नंतर पैसे आले पण लताबाईंनी काही हक्क सोडला नाही, मी तुमच्या मुलीसारखी वगैरे म्हणत..
याचा उल्लेख दादा कोंदके यांच्या आत्मचरित्रात आहे
मी: ओह... ओके
मित्र: दादा नी इशारा दिला होता , भालजींना, सोडवून घ्या स्टुडिओ लवकर, ताई डेंजर आहेत.. पण त्यांनी ऐकले नाही.
आता ताई स्टुडिओ बिल्डरना विकून पैसा करत आहेत.
मी: आयला... मग?
मित्र: त्याच मालक आहेत आता.... अत्यंत कमी पैशात अख्खा स्टुडिओ घशात घातला त्यांनी, प्रचंड जमीन होती, विचार कर..
कोल्हापुरात.. आता कडेकडेने प्लॊट पाडून विकताहेत .. मज्जा
मी: आयचा घो.
मित्र: बाबांचा स्टुडिओ, सांस्कृतिक वारसा वगैरे गेला खड्ड्यात ;)
मी: आयला आणि हे कुठे न्युज मधे कसे येत नाही?
मित्र: दोन वर्शांपूर्वी लोकसत्तात मस्त बातम्या होत्या...
पहिली बातमी होती, सांगली पालिका दीनानाथ नात्यगृह पाडून मॊल उभारणार म्हणून मंगेशकर भगिनींनी निषेध केला.. दुसर्‍याच दिवशी स्तुडिओ प्लॊट पडून कसा विकताहेत याची बातमी... दुटप्पी धोरणाचा पर्दाफ़ाअश...
मी: आयला...
मित्र: हे मी लै थोडक्यात सांगितले... साहेब, गोल गरगरीत रुपया हाच खरा देव... बाकी सारे झुट..
म्हणूनच कोनीतरी प्रतिक्रियेत लिहिले आहे, दादा कोंडके यांचे आत्मचरित्र वाचले का.. एकट जीव..

कवटी

प्रमोद देव's picture

4 Feb 2010 - 2:11 pm | प्रमोद देव

त्यांनीही बर्‍याच कलाकारांचे पैसे बुडवले आहेत.
शेवटी काय? कुणीही कितीही मोठा असला तरी कोणत्या तरी एखाद्या क्षेत्रातच असतो...बाकी ठिकाणी तोही अगदी सर्वसामान्यांसारखाच असतो.
तेव्हा सोडून सोडा. ज्यानं त्यानं आपल्या लायनीप्रमाणं जावं म्हणतात तेच खरं आहे.
कलाकारांचे रुसवे-फुगवे,राग-लोभ हे पूर्वापार चालत आलेत. कोणीही त्याला अपवाद नसतं . शेवटी सगळीच माणसं आहेत...माणसात असणारे गुण-दूर्गुण त्यांच्यातही असणारच.

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

योगी९००'s picture

3 Feb 2010 - 6:23 pm | योगी९००

भन्नाट लेखनशैली..लताबाईंविषयी नवीन माहीती मिळाली.

दादा कोंडकेंच्या"एकटा जीव" या पुस्तकातही लताबाईंचे कुजकट वागणे दाखवले आहे. कोल्हापुरच्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात त्यांनी कसे भालजी पेंढारकरांना नाचवले(की रडवले) ते लिहीले आहे.

खादाडमाऊ

II विकास II's picture

3 Feb 2010 - 6:46 pm | II विकास II

लताताई बद्दल आदर आहेच.
पण त्यांचे काही वागणे बघुन मन दुखावते. देवाने/देवीने देवासारखेच वागावे.
विशेषतः भालजी पेंढारकर याच्याशी केलेले वर्तन.

जास्त बोलत नाही.
येथे. लताताई बद्दल बोलायला मनाई केली आहे.
http://www.misalpav.com/node/9955#comment-159006

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 7:29 pm | स्वाती२

>>देवाने/देवीने देवासारखेच वागावे.
लताबाईंचा आवाज स्वर्गीय आहे हे मान्य. पण म्हणून त्यांना देवत्व देणे अणि त्यांच्या कडून तशी अपेक्षा करणे पटत नाही. त्या एक माणूस आहेत. त्यातून मोहमयी दुनियेतल्या कलाकार. जिथे गरज संपल्यावर माणसं फेकून दिली जातात. लताबाई कडे एक कमोडिटी म्हणून पाहिलत तर त्यांचे वागणे विचित्र वाटणार नाही. इथे मी त्यांच्या वागण्याचे समर्थन करत नाहिये पण स्वर्गीय आवाजा बरोबर वागणेही देवासारखे असावे ही अपेक्षा बरोबर नाही.

II विकास II's picture

3 Feb 2010 - 7:32 pm | II विकास II

सचिनला , अमिताभला सुद्धा देव मानले जाते.
सचिन क्रिकेटमधील देव आहेच.
त्याप्रमाणे लताताईला गाण्यातील देवी मानायला हरकत नसावी.

स्वाती२'s picture

3 Feb 2010 - 7:36 pm | स्वाती२

>>सचिनला , अमिताभला सुद्धा देव मानले जाते. =)) =)) =))

II विकास II's picture

3 Feb 2010 - 9:11 pm | II विकास II

माफ करा,
त्यांची मंदिर बांधणारी लोक भारत्तात आहेत.

रेवती's picture

3 Feb 2010 - 7:55 pm | रेवती

लेख आवडला.
काही गोष्टी ऐकून होते काही नवीन समजल्या.
फटके मस्त दिलेत!

रेवती

उपास's picture

3 Feb 2010 - 8:17 pm | उपास

मार्मिक लिहीलय.. पण लताबाईंकडून चांगलं गाणं आपण घेतो त्यांना त्याच चौकटीत बघावं.. त्यांच्याकडून अधिक वेगळे (उदा. अत्युत्तम स्वयंपाक) अपेक्षित करणे योग्य ठरेल का? तद्वत, समोरच्या माणसाकडे चांगलं काय आहे ते बघावं, घ्यावं, उपभोगावं.. ती व्यक्ती ही माणूस आहे त्यामुळे तिच्याकडेही सगळे षडरिपु असणारच.. तिला देवत्व देताच कामा नये नाहीतर मग असा अपेक्षाभंग होतो.. तसच दुसर्‍यात दिसणारे ते षडरिपु उगाळत बसण्यातही अर्थ नाहीच.
आता लताबाईंनी सुमनबाईंना पुढे येऊन दिलं नाही हा व्यावसायिकतेचा भाग झाला.. पण आमच्या सारख्यांना दोन्ही प्रिय आहेतच (त्यांच्या आवाजाकरता) :)
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

अमृतांजन's picture

3 Feb 2010 - 8:46 pm | अमृतांजन

१००% सहमत

अमृतांजन's picture

3 Feb 2010 - 8:43 pm | अमृतांजन

प्रकाटा

प्राजु's picture

3 Feb 2010 - 8:40 pm | प्राजु

नाण्याच्या नेहमीच दोन बाजू असतात. शेवटी लताबाई त्याही माणूस आहेत आणि माणसाने माणसासारखेच वागले तर त्यात नवल काय?
हे सगळे असूनही, त्या जिथे आहेत तिथे केवळ सामान्य माणूस नतमस्तकच होऊ शकतो..
लेख आवडला हे वेगळे सांगायला नको.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

ऋषिकेश's picture

3 Feb 2010 - 9:05 pm | ऋषिकेश

हा लेख नक्की लताबाईंवरच आहे का लताबाई प्रतिकात्मक आहेत हे ज्याने त्याने ठरवावे. काहिहि विषेथ/थेट न बोलता बरंच काही गप्पांमधे सांगणारा हा लेख भ न्ना ट!!!!!!!!!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

अमेरिकन त्रिशंकू's picture

3 Feb 2010 - 9:14 pm | अमेरिकन त्रिशंकू

माझा मतलब मिठाईशी आहे हलवाई कसा का असेना.

विंजिनेर's picture

3 Feb 2010 - 9:28 pm | विंजिनेर

ह्मम्मम...
मालक अंमळ इतरत्र बिज्जी असल्याकारणानेच चिखलफेक+'वस्तुनिष्ठ' विचारांचा लोलक/इ./इ. असेला लेख इथे टिकून राहिला.
त्यांच्या देवस्थानांवरच्या टिका/उपहासाला 'जनरल'-ई डायर ट्रिटमेंट मिळते.

चिरोटा's picture

3 Feb 2010 - 10:01 pm | चिरोटा

मार्मिक लेख आवडला.
कलाकाराची कला पहावी. वर म्हंटल्याप्रमाणे देवपण दिले तरी व्यक्तीत स्वभावदोष असतातच.त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
भेंडी
P = NP

अश्विनीका's picture

3 Feb 2010 - 10:05 pm | अश्विनीका

माज आहे, मराठी बाणा, पंगा हे सर्व ख्ररं मानलं तरी त्यांच्याकडे जो स्वर्गीय आवाजाचा गुण आहे त्यापुढे ह्या सर्व गोष्टी म्हणजे अगदीच क्षुल्लक . नाहीतर कुजकट वागणे सहन केल्यावरही (?) लोक पाय धरायला का जात असतील .
माणूस म्हटला की चुका होणारच. आणि एवढ्या उंचीवर पोहचलेल्या माणसाच्या किरकोळ चुकांची चर्चा पण जरा जास्तच होते.

- अश्विनी

मिसळभोक्ता's picture

4 Feb 2010 - 3:13 am | मिसळभोक्ता

प्रत्येकाच्या आयुष्यात पितळी तांबे येतातच.

माणसांना देवत्व देणारे खवळतात.

देवांना माणसाळवणारे संतोषतात.

देवांना त्यांच्या जागी, आणि माणसांना त्यांच्या जागी ठेवणारे हवे आहेत.

लताबाईंसारखी सोलकढी अख्ख्या मंगेशकर घराण्यात कुणीही करत नाहीत. आणि साडी पांढरी असली, तर किनारीवरून किंमत ठरवावी.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शाहरुख's picture

4 Feb 2010 - 3:39 am | शाहरुख

आम्ही फक्त बाजारातून कॅसेट आणून ऐकायचे काम करतो..आमाला यातलं काय माहित नाय...ते सगळं देव (आणि सगळे प्रतिसादकर्ते) जाणे.

सौरभ.बोंगाळे's picture

4 Feb 2010 - 5:27 am | सौरभ.बोंगाळे

फक्कड लेख आहे... आवडलाय... :)

मुक्तसुनीत's picture

4 Feb 2010 - 6:16 am | मुक्तसुनीत

लिखाणाचा बाज "टंग इन चीक" आहे हे खरे; पण एकंदर हा "वग" पुरता जमला नाहीसे वाटले.
लताबाईंच्या गायकीबद्दल आणि कलाबाह्य वर्तनाबद्दल काही नवे मुद्दे देण्याचा प्रस्तुत लिखाणाचा उद्देश असेल असे वाटत नाही; कारण या सर्व बाजू आता अनेक पिढ्या हिरीरीने मांडत आलेल्या आहेत. यापुढचे सगळे चर्वितचर्वणच ठरावे. त्यामुळे राहिला मुद्दा "अंदाजे बयाँ"चा. मौका, दस्तूर, साकी (नुक्त्याचे तंत्र विसरतोय !) ये सब था लेकीन.... मज्जा नाही आली राव.

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Feb 2010 - 7:46 am | डॉ.प्रसाद दाढे

लताबाईंच्या गायकीबद्दल आणि कलाबाह्य वर्तनाबद्दल काही नवे मुद्दे देण्याचा प्रस्तुत लिखाणाचा उद्देश असेल असे वाटत नाही; कारण या सर्व बाजू आता अनेक पिढ्या हिरीरीने मांडत आलेल्या आहेत. यापुढचे सगळे चर्वितचर्वणच ठरावे.

सहमत. आम्ही लताच्या गाण्याचे फॅन आहोत, कदाचित लताचे नसू..

टमटमचे इंजिन बसवावे तसे काहीसे झाले राव. पुलेशु.

(पितळी लोट्यातून दूध घेणारा)चतुरंग

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2010 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे

खास संजोपशैलीतील लेख!
अवांतर- प्रतिक्रियेत जुने हिशोब चुकते होतील हे भाकीत आमी कवाच वर्तवल होत
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सहज's picture

4 Feb 2010 - 10:58 am | सहज

वा वा! छान छान!

आता फक्त हा लेख, सर्प्राईझ गिफ्ट की मेड टू ऑर्डर म्हणायचा? तेवढे सांगा की. ;-)

-------------------------------------------
ह्यांचा तर मसंस्थवरचा सर्वात जुना "दोस्ताना" हो मंडळी!

अभिज्ञ's picture

7 Feb 2010 - 8:43 am | अभिज्ञ

लेख आवडला.

अभिज्ञ.

श्रीयुत संतोष जोशी's picture

7 Feb 2010 - 8:50 am | श्रीयुत संतोष जोशी

अगदी झक्कास.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

भानस's picture

12 Feb 2010 - 5:47 am | भानस

आहेच पण लेकी बोले सुने लागे सारखा प्रकार असावा की काय? :)

कपिलमुनी's picture

11 Nov 2014 - 3:23 pm | कपिलमुनी

भारीच की ! संदर्भ शोधणे आले

'लताबाईंचा फक्त आवाज स्वर्गीय आहे, बाकी स्वभावगुण सामान्य माणसांसारखे असू शकतात' हे लोकांना कळेल तो सुदिन!!

शिद's picture

11 Nov 2014 - 7:18 pm | शिद

सहमत.

इतकी धुळधाळ उडवुन झाली.
मग लता मंगेशकरांच्या आयुष्यातील हे सुवर्णपर्व का झाकुन ठेवल.
राजसींग च लता च्या आयुष्यातील स्थान हे ही महत्वाच नाही का ?

जिन्क्स's picture

11 Nov 2014 - 7:10 pm | जिन्क्स

सन्जोप रावान्ना परत इथे (किंवा कुठेही) लिहिते करण्यासाठी काय कराव लागेल ब्वा????

राव साहेबांच्या लेखणीचा परम भक्त,
जिन्क्स