नाहीश्या होत चाललेल्या पाककृती

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in जनातलं, मनातलं
29 Jan 2010 - 2:41 pm

नमस्कार मंडळी,

आज एक लेख वाचता वाचता "धनगरी मटणा"चा उल्लेख पाहीला. मी आंतरजालावर शोधूनही पाहीलं पण त्याबद्दल माहीती काही मिळाली नाही. (कुणाला ठाऊक असेल तर नक्की द्या...). मग मनात आलं की आपल्या प्रत्येकाच्या घरातही आई-आज्जी असेच काही पदार्थ बनवत होत्या, अगदी निगुतीने नी सीझनल जसे डिंक-मेथीचे लाडूंचा रूबाब तो हिवाळ्यातच आणि आंब्या-फणसाच्या पदार्थांचा मान उन्हाळ्यात...

असाच माझी आई हिवाळ्यात एक धिंडे म्हणून प्रकार बनवायची , तो ज्वारी आणि मेथ्यांपासून बनतो...अतिशय वेळखाऊ पण इट'स वर्थ वेटिंग फॉर एवरी सिंगल मिनट अस्सा...ज्वारी ३ दिवस भिजत घालून मग मिक्सरमध्ये वाटायचं, आईतर म्हणे माझी आज्जी ते पाट्यावर वाटायची...मग ते गरगट....हो गरगटच, मला तर वाटतं की 'गरगट' हा शब्द या पिठावरूनच आला असावा...तर मग हे वाटलेलं गरगट शिजवायचं नी दुसर्‍या दिवशी डोश्यांसारखे धिंडे बनवायचे...धिंडे गरम असतानाच त्यावर बारिक चिरलेला गूळ घालून २ मिनीटे गरम तव्यावरच ठेवायचं नी मग ताटात दुधासोबत घेऊन ओरपायचे...हे लिहीतानाही तोंडाला पाणी सुटतंय...

अस्सेच अजून एक असायचे ते नागपंचमीचे दिवे...तेही ज्वारीपासूनच बनत... कांडलेल्या ज्वारीमध्ये थोड्याश्या तांदूळकण्या, गूळ, किसलेले खोबरे, वेलची, जायफळ घालून वाफवलेले दिवे...अहाहा...अतिशय सुंदर दुधाळ-मधाळ चव असलेले हे दिवे साजूक तुप घेऊन गरम गरमच खायचे, तसे शिळेही छानच लागत...पण अतिशय परफेक्ट गोडपणा...आणि साजूक तुपासोबत खाताना त्यांची चव अश्शी काय लागे की विचारूच नका...आम्ही भावंडं गरम गरम दिव्यांवर घट्ट तुप टाकत असू, ते तुप वितळलं की सुर्रकन घसरगुंडीवरून घसरल्यासारखं वाटे...मस्त असाच तुकडा मोडायचा दिव्याचा नी तुपाचा ओघळ कोपरापर्यंत कां जात असेना पण तोंडात गेला पाहीजे या ईर्षेने खायचा...

एकादश्या, महाशिवरात्री या दिवशी तर नेहमीपेक्षा जास्त चंगळ असते, म्हणतातच ना "एकादशी नी दुप्पट खाशी"...साबूदाण्याची खिचडी, स्पेशली याच दिवसाकरिता बाबांनी आणलेले पेण-खजूर, साबूदाण्याच्या चकल्या- पापड्या, घरी बनवलेले बटाटा वेफर्स,साबूदाणा-बटाटा पापड, काय काय नी काय काय पण एक वेगळीच ओळख असलेला पदार्थ असायचा तो म्हणजे बोरोनी...हवं असल्यास शुध्द भाषेत "बोरावणी" म्हणा पण मी तर बोरोनीच म्हणणार....गावठी बुटकी, गोलमटोल नी हमखास आंबट असणार्‍या बोरांपासून बनवतात हा पदार्थ, ही बोरं तशी आंबटच असतात पण बोरोनी तर गोड-आंबट अशी मस्त चट्ट चट्ट करत खायची असते...बोरं भिजवून त्यांना २-३ शिट्ट्या मारतात मग त्यात मीठ आणि गूळ घालून उकळी आणतात पण खरी चव लागते ती शिळ्या बोरोनीची...आई आदल्या दिवशी नाही बनवायची कारण आम्ही बोरोनी संपवणार याची तीला फुल्ल ग्यारंटी होती...मग ती सकाळी-सकाळी बोरोनी बनवून लपवून ठेवायची नी संध्याकाळी भगर-आमटीसोबत द्यायची...पातेलंभर बोरोनीमध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे असत...अहाहा!!! काय सुंदर चव असते की मला शब्दांमध्ये लिहीताच येत नाहीये...तर ही बोरोनी, आई तर मोठ्ठं पातेलंभर बनवून ठेवायची पण जास्त द्यायची नाही म्हणे जास्त खाल्ल्याने तिकडे ;) जास्त जावं लागतं... :D पण आम्ही विचार करायचो की गेल्यावेळी तर आम्हाला असं काही झालं नव्हतं... :) आम्ही कसले ऐकतोय, मग दुसर्‍या दिवशी आई दुपारी झोपली की तिन्ही भावंडं फ्रिजमधनं वाट्या पास करायचो... ते पण चोरांसारखं पायाचा आवाज न करता, वाट्या बाहेरच्या नळावर धूऊन चकाचक परत जागच्याजागी .... :D

पावसाळ्यातली हमखास ठरलेली भाजी म्हणजे टाकळा आणि त्याची भजी...लहानपणी आम्ही चारजणं बजाजच्या स्कूटरवर....चार जणं म्हणजे गाडी चालवणारे बाबा...त्यांच्यामागे लहान भाऊ, त्याच्यामागे बहीण आणि सगळ्यात मागे मी...अणि अश्शीच सेम टू सेम माझ्या मामाची स्कूटर....अस्सा लवाजमा निघायचा तो सरळ शिळफाट्याच्या डोंगरावर...तिकडे काय मस्त टाकळ्याची भाजी मिळे म्हणून सांगू...आणि लगेहाथों शंकराचं दर्शनही करायचो..मला तर शंकरापेक्षा त्या मंदिराच्या बाजूच्या तळ्यातल्या माश्यांमध्येच भारी इंटरेस्ट होता...त्यांना ब्रेड टाकला की ते उड्या मारून ब्रेड खायचे...खुप मज्जा वाटायची...आणि देवाकडे मागून मागून काय मागणार तर "देवा मला चांगल्या मार्कांनी पास होऊदे" एव्हढंच... :) . नंतर तिकडेच असलेल्या गोठ्यांमधून चीकाचं दूधही आणायचं खरवसासाठी आणि त्यासाठी आईने दिलेला एक मोठ्ठा कडीचा स्टीलचा डब्बा, टाकळ्याची भाजी असलेल्या दोन प्लास्टीकच्या पिशव्या...स्वारी निघाली लंडनला च्या थाटात काहीतरी मोठ्ठं काम फत्ते केल्यासारखं घरी येत असू...त्या स्कूटरवर तोल सांभाळताना उडणारी धांदल नी काय काय...आज आठवलं की काय ठ्ठो करून हसायला येतं...आजही आम्ही भावंड एकत्र जमलो की लोळून लोळून हसतो...

मग ओट्यावर पेपर पसरवून भाजी निवडण्याचा प्रोग्रॅम व्हायचा, तेव्हा बर्‍याच नातेवाइकांचे स्वभाव समजायचे, आता कसं ते नका विचारू... :D, मग दोन-चार दिवसांनी कधीतरी दुपारी आई टाकळ्याची भाजी करायची, मस्त शाळेतून येताना पावसात ओलं होऊन आलं की गरम गरम पाण्याने हातपाय धूवून ऊन-ऊन वरण भात तुपासोबत टाकळ्याची भाजी, बनवायला अत्तिशय सोप्पी...कांदा, लाल तिखट, मीठ आणि तुरीची डाळ घालून केलेली...खर्‍या चवीला कशाचीच गरज लागत नाही त्याचं हे अगदी सुंदर नी चविष्ट उदाहरण आहे...

व्वा, मस्त म्हणत म्हणत मस्त आळस देऊन ताणून द्यावीशी वाटे पण रप्पाटेच पडत...कारण एकच.... "अ भ्या स"...तरीही आम्ही "थंडी वाजतेय"चं कारण सांगून चादर जवळ घ्यायचोच आणि थोड्यावेळाने सरकत सरकत झोपत असूच ती बाब अलाहिदा... :D ....तर अशी ही टाकळ्याची भाजी बहूधा दुपारीच होत असे कारण बाबांना ही भाजी म्हणजे पावसाळ्यात उगवलेलं गवत वाटे आणि भजी म्हणजे अगदी उलट, बहुधा त्यांना अजून्ही माहीत नसावं की भजी टाकळ्याची होती :D ... बारिक चिरलेली टाकळ्याची भाजी, भिजवून भरड वाटलेले तांदूळ,मीठ नी बारिक वाटलेली मिरची...यांपासून बनवलेली भजी म्हणजे स्वर्गसुख आणि त्यातही बाहेर रिपरिपणारा पाऊस पाहीजेच नाहीतर अख्ख्या लव्याजम्यासहीत शिळफाट्याला गेल्याची मेहनत पाण्यातच गेली म्हणायची...

आज नेहमीपेक्षा घरची आठवण जास्तच येत आहे कारण इकडे पाउस पडत आहे नी अगदी मनापासून वाटतंय की आलं-गवतीचहा घातलेला चहाचा आयता कप मिळावा, या वर्षी ना धिंडे खायला मिळाले ना दिवे ना टाकळ्याची भाजी...बोरोनी मिळू शकेल बहुतेक,जर पुढच्या वर्षी भारतात गेलोच तर आणि तिकडून येताना बोरं ठेवायला बॅगेत जागा असलीच तर...

तुमच्याही आयुष्यात असतीलच की अश्या आठवणी आणि पाककृती ज्या आता "कोणाकडे वेळ आहे" या कारणाखाली नाहीश्या होत आहेत...तर नक्की सांगा...

आहो मी तर तुमच्याकडच्या पाककृत्या टंकायला सांगितल्या होत्या...खुप कमी सदस्यांनी लिहील्या आहेत....

दिपाली :)

मांडणीसंस्कृतीविचार

प्रतिक्रिया

मनीषा's picture

29 Jan 2010 - 2:59 pm | मनीषा

आठवणींच सुंदर असं शब्दचित्रच आहे हे..

समंजस's picture

29 Jan 2010 - 3:23 pm | समंजस

सुंदर!!! @)
(आयुष्यात एकदाच ज्वारीचे धिरडे खाल्लेत. ते सुद्धा एका आजीने बनवलेले :) कष्ट खुप असतात त्यामागे. कदाचीत त्यामुळेच नंतरच्या पिढ्यांनी तो वारसा पुढे जोपासला नाही :( . खरवसाकरता लागणारं चीकाचं दुध तर माझ्या लहानपणी, रोज सकाळी दुध घरी आणून देणाराच देउन जायचा... फुकटात :D )

टारझन's picture

29 Jan 2010 - 3:25 pm | टारझन

डिसेंट आणि मन से लिखाण ... आवडेश :)

- दापोडी

मीनल's picture

29 Jan 2010 - 6:31 pm | मीनल

+१
मीनल.

धनंजय's picture

29 Jan 2010 - 7:36 pm | धनंजय

स्मृतिमधुर!

विंजिनेर's picture

29 Jan 2010 - 3:58 pm | विंजिनेर

आयला! दिपालीतै, तुम्ही फर्मास पाककृतींची वर्णनं जितक्या सहजतेनं करता तेव्ह्ढंच ललित लिखाण पण जमतंय फस्क्लास!
अजून येऊद्या...
बाकी आठवणीतल्या अशा नाही (कारण अनेकांकडे हे पदार्थ होतही असतील आजकाल) पण खास असे दोन-तीन पदार्थ (हे उगीच बरंका. इथे हे पदार्थ होणं शक्य नाही त्यामुळे दुधाची तहान टाईपिंगवर .. तर असो)

१. शिरांची चटणी: दोडक्यांची साल तीळ, मिरची आणि चवीपुरतं मीठ किंचितशी साखर घालून तेलावर मस्त कुडकुडीत परतायची. बहुदा सणासुदीला पानात येते.

२. नील-फणसाचे कापः रव्यात घोळलेले आणि तेलावर भाजलेले. पापलेट+वरणभाता आधी मी ह्याच्या प्रेमात पडलो होतो.

३. अनसा-फणसाची भाजी: अननस+फणस+आंबा यांची ही रस्सा(!) भाजी. सारस्वती लग्ना-मुंजीत हमखास व्ह्यायची. आताशा होते का माहित नाही.

जाऊदे अजून परत कधीतरी...

बंडू बावळट's picture

29 Jan 2010 - 4:09 pm | बंडू बावळट

वा वा! अगदी चवदार लेख!

--बंड्या.

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2010 - 4:25 pm | स्वाती दिनेश

दिपाली, सुरेख लेख, किती तरी आठवणी जाग्या झाल्या.. टाकळा आमच्या अंगणातच भरपूर उगवत असे.
पावसाळ्यातली भारंगीची भाजी, उन्हाळ्यातली डोंगरची काळी मैना.. पार गालापर्यंत चीक गेला तरी लालचुटूक करवंद आहे की फिकटसर यावरुन कोंबडा की कोंबडी करत बाहेरच्या पेटीवर बसून फस्त केलेली करवंदे, ताडगोळे.. अम्म .. सगळ्या चवी जिभेवर आणि मनावर तरंगल्या.
स्वाती

चिरोटा's picture

29 Jan 2010 - 4:29 pm | चिरोटा

धोंडस- मोठ्या आकाराच्या काकडीपासुन बनवलेला केक- गोव्याला करतात.
भेंडी
P = NP

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2010 - 4:42 pm | स्वाती दिनेश

धोंडस/तवसाळे येथे पहा.

शुचि's picture

29 Jan 2010 - 5:41 pm | शुचि

दीपली , वर्णन मस्त. मजा आली वाचून.

गव्हाचा चीक नावाचा भलताच चवदार पदार्थ लहानपणी एकदा खाल्ल्याच आठवत.

>>आणि लगेहाथों शंकराचं दर्शनही करायचो..मला तर शंकरापेक्षा त्या मंदिराच्या बाजूच्या तळ्यातल्या माश्यांमध्येच भारी इंटरेस्ट होता...त्यांना ब्रेड टाकला की ते उड्या मारून ब्रेड खायचे...खुप मज्जा वाटायची ............ वाचून खूप मजा आली. माझ लहानपण आठवल. सारसबागेत माशाना सकाळीसकाळी ब्रेड घालन, गणपतीच दर्शन सगळ आठवल.

>>>मग ओट्यावर पेपर पसरवून भाजी निवडण्याचा प्रोग्रॅम व्हायचा, तेव्हा बर्‍याच नातेवाइकांचे स्वभाव समजायचे, आता कसं ते नका विचारू... ............ =)) =)) घरोघरी मातीच्या चूली.

***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो र्आम अम्हाला देतो

चित्रा's picture

29 Jan 2010 - 5:53 pm | चित्रा

सुंदर लिहीले आहे.

मला दिवे हे वर्षभर का करत नाहीत असे वाटत असे ;)
खूप आठवण आली. तुम्ही शिळफाट्याला जायचात का? आम्हीही जात असू, अनेकदा. पण टाकळा आणायला नाही :) शंकराचे दर्शन घ्यायला.
तिथे देवळापेक्षा बाहेरच जास्त रस असे.

टाकळा आमच्या घराच्या बाहेर मोठे पटांगण होते, तेथे मुबलक व्हायचा. टाकळा ही एकच भाजी अशी की ती आणायला आमची आजी आम्हा पोरांना पाठवायची :) मग भरपूर टाकळा आणला, की त्याची एवढीशी भाजी होत असे. त्यात मस्त लोणी घालून भाकरीबरोबर खायची. फारच छान लागते. आणखी काही घालावेच लागत नाही, इतकी भारी चव असते.

असेच काही पदार्थ आमची आजी करायची ते म्हणजे दुधी भोपळ्याच्या साली जरा वाळवायच्या. मग त्या बारीक उभ्या उभ्या कापून (भलताच उद्योग असतो हा) त्याला तव्यावर तेल घालून फोडणी आणि बरेचसे तीळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे असे घालायचे आणि भरपूर वेळ परतायचे. तीही चटणी खूपच छान लागते.

मला लहानपणी करायला देत असा अजून एक (पुस्तकी) पदार्थ म्हणजे आमसुलाच्या जिरे लावून गोळ्या. त्याही भारी होतात. आमसुले वाटायची जिरे घालून आणि नावापुरते मीठ घालून (मी पाट्यावर वाटत असे) , जरा वेळाने त्याच्या लहान गोळ्या करून पिठीसाखरेत भरपूर घोळवायच्या.

आणखी म्हणजे कुरडयांचा चीक. माझ्या घरच्यांना भारी प्रिय होता, मला विशेष आवडत नसे. आणि अर्थातच ओल्या असताना साबुदाण्याच्या चिकवड्या (त्या वाळेपर्यंत का थांबायचे असा मला नेहमी प्रश्न पडे!).

ओव्याच्या पानांची भजी हाही एक प्रकार हल्ली कुठे होताना दिसत नाही. आमच्या घरी ओवा असे, त्याची पाने गोळा करून आणायची, आणि मग नेहमीसारखी भजी करून खायची.

आत्ता एवढेच. आठवल्यावर अजून सांगेन. दिपाली यांनी लहानपणातून फिरवून आणले.

चित्रा's picture

30 Jan 2010 - 1:04 am | चित्रा

भोकराचे लोणचे. कोणाला माहिती नसले तर भोकर हे एक अगदी शेंबडे फळ असते! त्याचे लोणचे आमच्या घरी न चुकता व्हायचे.

मिसळभोक्ता's picture

30 Jan 2010 - 2:46 am | मिसळभोक्ता

मस्त !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चित्रा's picture

30 Jan 2010 - 4:17 am | चित्रा

भोकराच्या लोणच्याच्या आठवणीने का होईना, चला, नॉस्टॅल्जिक मतदारपेठेची सोय करता आली.

बाकी हल्ली +१ म्हणून लिहायला तरी लोक येतात, हे चांगले लक्षण आहे.

सहज's picture

3 Feb 2010 - 2:48 pm | सहज

दिपालीतैंचे सुंदर लेख लिहल्याबद्दल आभार.

चित्रातैंनी प्रतिसादात भोकराच्या लोणच्याचा उल्लेख केल्याबद्दल अनेक आभार.

मग मोठ्या लोकांनी दर्शन दिल्याबद्दल त्यांचेही आभार.

गणपा's picture

3 Feb 2010 - 3:30 pm | गणपा

खारात टाकलेल्या आंब्यांबरोबरच आमची आजी भोकरं पण खारात टाकायची.
नुसत्या आठवणीनेच जीभ पाणावली.

रेवती's picture

3 Feb 2010 - 7:47 pm | रेवती

आणखी एक, ओल्या हळदीचे लोणचे आणि माईन मुळाचेसुद्धा!
बाजारात कधी कोवळ्या गवारीच्या शेंगा मिळाल्या तर त्या थोडे कैरीचे लोणचे वेगळे काढून त्यात घातल्या जात, पण हे लोणचे लवकर संपवावे लागते. सुकेळी नावाच्या वाळवलेल्या अख्ख्या केळ्यांचा प्रकार कसा केला जायचा ते एक कोडेच आहे. सध्या आम्ही ट्रेडर जोज च्या सुकेळ्यांचा आस्वाद घेतो. दिपाली छान लेख.

रेवती

आशिष सुर्वे's picture

29 Jan 2010 - 8:47 pm | आशिष सुर्वे

नमस्कार दिपाली,

उत्कृष्ट धागा..
एकदम फक्कड लेख आणि आठवणी आहेत हो!!
तुम्ही उल्लेखिलेल्या आठवणींवर तरंगत माझे मन अलगदपणे आमच्या गावच्या कौलारु घराच्या चुलीपाशी गेले..
अश्या बर्‍याच पाककृती आहेत.. जशा आठवणीत येतील, तश्या आपण सर्वांनी इथे नमूद करूयात..

मीही काही नमूद करू इच्छितो.. सर्वच पाककृती नाहीश्या/विस्मृतीत गेल्या नसतील कदाचित, तरीही..

तांदळाची/ज्वारीची/नाचणीची/कोंड्याची भाकरी अन् 'लसूण-खोबरे-लाल मिरचीची' लाल-तिखट चटणी
झुणका
चण्याच्या पिठाचं पिठलं
कुळीदाच्या पिठाची पिठी
डांगर
टाकळ्याची भाजी
कवळ्याची भाजी
ऋषीची भाजी (गणपतीत करतात ती)
कोवळ्या फणसाची तिळकूट घालून केलेली भाजी
खरवस
तांदळाचे वडे (कोंबडी/मटणाबरोबर खातात ते)
सुका भाजलेला कोलीम-कांदा, लाल तिखट, मीठ लावून
बोटी मसाला (माश्याची बोटी)
आंब्याची/फणसाची साठे
..
क्रमश:

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

मेघवेडा's picture

29 Jan 2010 - 7:16 pm | मेघवेडा

सुपर लिहिलंय हो दीपालीतै तुम्ही! मजा आली.. लहानपणीच्या दिवसांची रम्य सफर घडवून आणल्याबद्दल धन्यु!!

-- मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

प्रभो's picture

29 Jan 2010 - 7:57 pm | प्रभो

सुंदर लेख....

पावसाळ्याच्या दिवसातल्या माझ्या अजून दोन आवडत्या भाज्या म्हणजे तांदूळसा आणी हरभरा/ढाळ्याच्या पानाची भाजी....

बाकी आपलं वरचे बरेचशे पदार्थ होता बॉ आमच्या घरी अजून पण.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

स्वाती२'s picture

29 Jan 2010 - 8:29 pm | स्वाती२

मस्त ग दिपाली!

प्राजु's picture

29 Jan 2010 - 9:15 pm | प्राजु

फार सुंदर!!!
खूप सुंदर आहेत आठवणी या.
सविस्तर प्रतिसाद आणि काही पा कृ सवडीने देईन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

खडूस's picture

3 Feb 2010 - 2:14 pm | खडूस

लोकसत्तामध्ये २लेख आले होते 'कुठे गेले हे पदार्थ' या नावे.

त्यात बरेच विस्म्रुतीत गेलेले पदार्थ पाककृतीसहित दिले होते

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

दिपाली पाटिल's picture

4 Feb 2010 - 10:21 am | दिपाली पाटिल

मी तर पाककृत्या द्यायल्या सांगितल्या होत्या...बर्‍याच जणांनी नुसतीच नावं दिलीयेत... :(
बाकी लेख आवडल्याचे सांगितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद...

दिपाली :)