`एकच' तारा समोर आणिक...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
21 Nov 2009 - 8:01 pm

meteor

"सिंह राशीतून सर्वात मोठा उल्कावर्षाव मंगळवारी दिसणार' अशी बातमी वाचून माझ्या भावनिक, वैचारिक विश्‍वात उलथापालथ होण्याचा प्रश्‍नच नव्हता. नेहमीच्या पद्धतीनं ती बातमी वाचून सोडूनही दिली होती. मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीत कामावरही आलो होतो. पण काम सुरू असतानाच्या काळातच दोन सहकारी उगीचच "आज रात्री ड्युटी संपल्यावर काय करणारेस,' म्हणून आसपास घुटमळून गेले. त्यांच्या आविर्भावावरून काहितरी प्रस्ताव असावा आणि त्यासाठी माझी मदत हवी असावी, असा दाट संशय आला. खोदून विचारल्यावर त्यांनी उल्कावर्षाव पाहायला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. रात्री दोन ते पाच या वेळेत उल्कावर्षाव दिसणार होता. त्यासाठी पुण्याहून आम्हाला राजगुरूनगरजवळच्या कडूस गावी जायचं होतं. अंतर 40 किलोमीटरचंच होतं, पण रात्रभर जागरणाचं दिव्य पार पाडायचं होतं. त्यातून दुसऱ्या दिवशीच्या कामांत आणि ड्युटीत कुणी सवलत देणार नव्हतं. त्यामुळंच मला विचारायला ते जरा का-कू करत असावेत. असो. मी फारसे आढेवेढे न घेता होकार भरला आणि आम्ही उत्साहाने काम आटोपून निघालो.
घरी जाऊन कार घेऊन आलो. माझ्यासह चार सहकारी होतो. जाताना टाइमपासला सीडी प्लेअर घेतला होता, पण गप्पा, गॉसिप आणि विनोदांची मैफल रंगली आणि गाणी लावायची वेळच आली नाही! ग्लास नव्हते, (त्यांचा उपयोगही नव्हता!) पण सोबत "चकणा' भरपूर होता. त्यामुळं चरत चरतच इप्तित स्थळी पोचलो. फारशी वाहतूक नव्हती. राजगुरूनगरच्या अलीकडच्या फाट्यावरून दहा किलोमीटर आत असलेल्या या गावातील शाळेच्या मैदानावर आम्ही पोचलो, तेव्हा पावणेतीन वाजले होते. "गाडीचे दिवे बंद करून आत या, जपून पावले टाका,' अशा सूचना आम्हाला तिथे आधीच उपस्थित असलेला आमचा सहकारी आणि हौशी आकाशनिरीक्षक मयुरेश प्रभुणे याच्याकडून मिळाल्या होत्या. अंधारात चाचपडतच गाडीतून उतरलो. बरेच लोक त्या मोकळ्या मैदानात पथारी टाकून निवांत पहुडले होते. पायाखाली किडा-मुंगी चिरडू नये म्हणून काळजी घेतात, तशी कुणाच्या अंगाखांद्यावर पाय पडू नये म्हणून आम्हाला काळजी घ्यावी लागत होती.
कसेबसे धडपडत शाळेचा कट्टा गाठला नि विसावलो. गप्पा-विनोदांना ऊत आलाच होता. आमचा सहकारी मयुरेश कुठल्या तरी गच्चीवर जाऊन उल्कांचे फोटो घेण्यासाठी धडपडत होता. त्याचं दर्शन होणं दुरापास्त होतं. मैदानात पहुडलेली माणसं नि "उल्का' या नामविशेषावरून यथेच्छ कोट्याही करून झाल्या. थोड्याच वेळात उल्का पडताना दिसायला लागल्या. अगदी "वर्षाव' नसला, तरी नेत्रसुखद दृश्‍य होतं ते. निदान आपण गेल्याबद्दल पश्‍चात्ताप तरी झाला नाही, एवढा दिलासा देणारं! काही छोट्या, काही मोठ्या उल्का पडताना पाहायला मिळाल्या. पहाटे अपेक्षित असलेलं मोठ्या प्रमाणातलं उल्कावर्षावाचं नाट्य मात्र हुलकावणी देऊन गेलं. "आत्तापर्यंत दोन ढगांतून उल्का पडल्या आहेत. आता तिसऱ्या ढगातून आणखी मोठा वर्षाव पाहायला मिळेल,' असं आश्‍वासन मयुरेश देत होता, पण आम्हाला त्यानं फारसा फरक पडत नव्हता. वातावरण एन्जॉय करण्याचा उद्देश सफल झाला होता.
दहा वर्षांपूर्वी असाच एकदा उल्कावर्षाव झाला होता, त्या वेळी तो बघायला दुचाकीवरून बोंबलत पौडच्या पुढे गेलो होतो. फारसा अनुभव त्या वेळीही घेता आला नव्हता, असं आता अंधुकसं आठवतंय.
असो. पण या वेळचा अनुभव धमाल होता. उल्कांचा नसला, तरी आनंदाचा, उत्साहाचा आणि विनोदांचा भरपूर वर्षाव झाला! "एकच तारा' समोर दिसला असला, तरी "पायतळी अंगार' मात्र नव्हता!!

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

21 Nov 2009 - 8:25 pm | देवदत्त

हे तुम्ही कॅमेर्‍याने काढलेले चित्र आहे का? मस्त आहे.

तुम्हाला उल्कापात दिसला हे चांगले झाले. इथे तर ढगाळ वातावरणच होते आणि रात्री २/३ वाजता पाहणे बहुधा जमलेही नसते. :(

असो. पण ह्या निमित्ताने बहुधा ९८ मध्ये पाहिलेला उल्का वर्षाव आठवला. खरोखरच वर्षावच होता तो. एका मागोमाग एक भरपूर उल्का पडताना दिसत होत्या आणि त्यांचा प्रकाशही चांगलाच होता. :)

आपला अभिजित's picture

22 Nov 2009 - 10:53 am | आपला अभिजित

हे तुम्ही कॅमेर्‍याने काढलेले चित्र आहे का? मस्त आहे.

माझ्या छायाचित्रकलेबद्दल तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. हे मीच काढलेले छायाचित्र आहे. पण क्यामेर्‍याने नव्हे (जळला तो शब्द कसा टाइप करायचा?) नव्हे, तर माऊसने. गूगल झिंदाबाद!

श्रावण मोडक's picture

22 Nov 2009 - 12:57 am | श्रावण मोडक

वाचायचं आहे ते हे -
असो... उल्कांचा नसला, तरी आनंदाचा, उत्साहाचा आणि विनोदांचा भरपूर वर्षाव झाला!
आणि ते वरच्या मजकुरात फारसं दिसलं नाही!

Nile's picture

22 Nov 2009 - 3:09 am | Nile

अरे वा! पहायला गेलात हे उत्तम! अर्थात अश्या गोष्टी ग्रुप मध्ये करण्यात खरच खुप मजा असते. मी इथल्य थंडीत सुमारे एक तास कुडकुडलो पण दोन उल्कांचे दर्शन झाल्याने मात्र 'पावलं' असं झालं आणि मग झोपी गेलो!

मोडक म्हणतात त्याप्रमाणे इतर विनोद, अर्थात अश्या गोष्टी आठवुन लिहिणे फारसे गमतीशीर नसले तरी, किस्से ऐकायला आवडतील.

आपला अभिजित's picture

22 Nov 2009 - 10:59 am | आपला अभिजित

मोडक म्हणतात त्याप्रमाणे इतर विनोद, अर्थात अश्या गोष्टी आठवुन लिहिणे फारसे गमतीशीर नसले तरी, किस्से ऐकायला आवडतील.

नक्की नक्की. पण इथे चव्हाट्यावर नाही लिहिता येणार. खव/पोहा मध्ये भेटू.

भडकमकर मास्तर's picture

22 Nov 2009 - 5:25 pm | भडकमकर मास्तर

१९९८ च्या जानेवारीमध्ये एका मित्राला घेऊन खानापूरला गेल्याचे आठवते.... ( ९७ नोव्हेंबरमध्ये सिंह राशीतून प्रचंड उल्कावर्षाव झाल्याचे ऐकले होते, बघूया तरी, अशी खूप उत्सुकता होती.)
तिकडे जत्राच होती..
स्लाईड शो, दुर्बिणीतून ग्रह बिह दर्शन, आणि भाषणे, डबेबिबे खाऊन नंतर आडवे पडून उल्का पाहण्याचा कार्यक्रम...
...
तशा रोज जितक्या दिसत असतील तितक्याच दिसल्या ....
उगीच कुठल्या तारकासमूहातून उल्का पडल्याचे भासले इ.इ.नोंद वगैरे ठेवण्याचे भंपक काम करत काही जण खूप उत्साहात करत होते...
मला चांगली डुलकी लागली... ( आठवा शाम मनोहरांची कादंबरी, उत्सुकतेने मी झोपलो")
सगळे जण काहीबाही डायलॉग मारून एकामेकांची करमणूक करत होते... मित्र कोणत्यातरी मुलींच्या ग्रुपमध्ये शिरकाव करत उगीच लाफ्टर काढत होता, असे मध्येच जाग आली तेव्हा कळाले....

परत येताना मित्राची प्रतिक्रिया... मजा आली...उल्काबिल्का जाउदे, आडवं पडून इतक्या मुलींशी एवढ्या गप्पा यापूर्वी कधी मारल्या नव्हत्या....
आता पुढचा उल्कावर्षाव कधी आहे?"

चतुरंग's picture

23 Nov 2009 - 3:16 am | चतुरंग

एकदम मुद्द्याचं बोलला की तुमचा मित्र!! लई भारी!!! ;)

('उल्का', 'वर्षा' व)चतुरंग

स्वाती२'s picture

22 Nov 2009 - 5:40 pm | स्वाती२

>>परत येताना मित्राची प्रतिक्रिया... मजा आली...उल्काबिल्का जाउदे, आडवं पडून इतक्या मुलींशी एवढ्या गप्पा यापूर्वी कधी मारल्या नव्हत्या....
आता पुढचा उल्कावर्षाव कधी आहे?">>
=)) =)) =)) =))

आपला अभिजित's picture

23 Nov 2009 - 2:44 pm | आपला अभिजित

आडवं पडून इतक्या मुलींशी एवढ्या गप्पा यापूर्वी कधी मारल्या नव्हत्या....

????? 8}

काय वाचतो मी हे???
संपादक कुठे गेलेत?????

धमाल मुलगा's picture

23 Nov 2009 - 3:03 pm | धमाल मुलगा

=)) =))
तिथं तुम्ही एक काना जास्तीचा वाचताय का? :D

असो,
अनुभवकथन छान लिहिलंय, पण अंमळ मजा आली असती जर तिथे चाललेल्या 'इनोदांचं'ही वर्णन केलं असतं :)

@भडकमकर मास्तरः
तुमच्या मित्राला आमचा साष्टांग पोहोचवा हो! ('तो' मित्र म्हणजे आपले दाढे डागदर तर नव्हेत ना? ;) )

jaypal's picture

23 Nov 2009 - 3:41 pm | jaypal

पोरं लै दंगेखोर बघा. जास्त लावुन न्हाई घ्याचं.
बरं तेवढ ते..... .........म्हंजी बघा............आता कसं इचारु राव?
(इचारतोच आत्ता -: आमचीबी खाजगी शिकवनी घेनार काय? आमाला बी लै नाद बघा .भटकयचा वो भटकायचा ) अन ते आडव पडुन इनोद,गप्पा काय ते सम्द रंगवा की, आमाला बी वाइच आडव पडुन ऐकल्याच सुख वो.

****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2009 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या मित्राला आमचा साष्टांग पोहोचवा हो! ('तो' मित्र म्हणजे आपले दाढे डागदर तर नव्हेत ना? )

हाण हाण्तेज्यातला !!!

=)) =))

बाकी अभिदा ग्लास बरोबर असते तर तुला सकाळी सकाळी पण उल्का वर्षाव दिसला असता रे ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सूहास's picture

23 Nov 2009 - 5:50 pm | सूहास (not verified)

बाकी अभिदा ग्लास बरोबर असते तर तुला सकाळी सकाळी पण उल्का वर्षाव दिसला असता रे>>

सहमत .....

अभीजीत ...थोड सविस्तर लिहा ...

सू हा स...