मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला. हा चित्रपट दयामरण या संकल्पनेवर आहे. इच्छामरण या संकल्पनेशी साधर्म्य दर्शवणारी गोष्ट असल्याने माध्यमांनी त्याला इच्छामरणाभोवती गुंफले आहे, परिसंवादाच्या निमित्ताने चित्रपट व वास्तव यातील साम्य व तफावत याचा उहापोह झाला. एका अर्थाने चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच त्याचे सर्वांगिण परिक्षण. डॊ मोहन आगाशे यांनी मरण हा अपरिहार्य विषय असला तरी अप्रिय असल्याने त्याचे विश्लेषण होत नाही. विचार व भावना यांच्या कात्रीत सापडलेला हा विषय आहे. प्रेक्षकांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर त्याच्या दृष्टीने हा चित्रपट भावनेला हात घालणारा आहे.मधेच तो विचाराकडे झुकतोय कि काय अस वाटतानाच तो पुन्हा भावनेकडे वळतो. मुकुंद संगोरामांनी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जीवनमान हे वाढत आहे म्हणुन मत्युच्या दर्जाविषयी विचार होणे गरजेचे आहे हा विचार मांडला. संध्या टांकसाळे यांनी हा अप्रिय विषय साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात घेताना मनात वाचकांच्या प्रतिक्रिया काय येतील अशी धाकधुक असल्याचे सांगितले.डॊ शिरिष प्रयाग यांनी वैद्यकीय नितीमत्ते मध्ये हा विषय मांडताना होणारी मतमतांतर व त्यातील व्यवहार्यता यांची सुरेख मांडणी केली. आयसीयु क्षेत्रातील वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष असताना त्यांनी दयामरण या संकल्पनेला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी अनुकुल प्रयत्न केले. अतुल कुलकर्णी हा अभिनेता विषय पटल्याशिवाय भुमिका स्वीकारत नाही.कायद्याचा गैरवापर होतो म्हणुन कायदाच करायचा नाही का? प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग होत असतो. दुरुपयोग थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन करुन आपण आपल्या घरात, नातेवाईकात माणस जेव्हा मृत्युच्या बेतात असतात त्यावेळी आपण त्यांना बांधुन ठेवत असतो. आपण त्यांना का शांतपणे जाउ देत नाही? या चित्रपटाच्या निमित्ताने यावर सखोल विचार आपली प्रक्रिया चालु झाली. ज्योती चांदेकरांना आईची भुमिका आव्हान होत. चित्रीकरणात गाडीला ब्रेक लागण्याच्या प्रसंगातुन त्यांना खरच मानेला धक्का बसला होता. किरण यज्ञोपवित ला कथेच्या निमित्ताने इंटरनेट पुस्तकाच्या माध्यमातुन सखोल माहिती मिळवुन अभ्यासकाच्याच भुमिकेत जावे लागले. कथेसाठी त्याच्यातला अभ्यासकाला थोडी तडजोड करावी लागली. परिसंवादात बोलताना त्याची ही थोडीशी नाराजी जाणवत होती. अनुया म्हैसकर यांचा ही पहिलीच निर्मिती. आई मुलगा संबंधावर चित्रपट तयार करण्याच्या मुळ कल्पनेतुन हा विषय घेतला गेला. चाकोरीबाहेरचा चित्रपट तयार करताना घेतलेली 'रिस्क' त्यांनी प्रेक्षकांवर सोपवली आहे.
आपल्या जगण्याशी संबंधित सगळे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे मग मृत्यूशी संबंधित निर्णय आपला आपल्याला का घेता येऊ नये, असा प्रश्न संजय सूरकर दिग्दर्शित या सुखांत नावाच्या उद्या म्हणजे २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार्या चित्रपटात मांडला आहे.परिसंवादात प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली गेली. त्यामुळे परिसंवाद एकतर्फी न होता खर्या अर्थाने सुसंवादी झाला.
सुखांत ची कथा थोडक्यात अशी आहे . एक अत्यंत कर्तृत्ववान पण असाध्य आजारामुळे अंथरुणाला खिळलेली सीता बाई गुंजे ही स्त्री ( ज्योती चांदेकर) आणि तिला आदर्श मानणारा, तिच्यावर नितांत प्रेम करणारा तिचा मुलगा (अतुल कुलकर्णी) यांच्यातल्या नात्याची ही गोष्ट आहे. लोळागोळा होऊन जगण्याच्या सक्तीपेक्षा मृत्यूचा अधिकार या कथेतल्या आईला हवी आहे. सीताबाई गुंजे ही खरं तर एक खेडेगावातली बाई आहे. पण अत्यंत कर्तृत्वशाली आहे. लघुउद्योगाच्या माध्यमातून आपलं हे कर्तृत्व तिने सिद्ध केलेलं आहे. आपल्या वकील मुलाशी असलेलं नातं अतिशय भावनिक व वैचारिक आहे. त्याला तीनेच कष्टाने शिकवून मोठं केलेलं आहे. आयुष्याच्या एका वळणावर तिला कार मधे प्रवास करताना ब्रेक मारल्यावर मानेला हिसका बसुन अपघात होतो. त्यातुन 'क्वाड्रीप्लेजिया' नावाची व्याधी जडते.( उच्चारताना जीभेशी फारच झटापट करावी लागते) अतिशय दुर्धर अशा या व्याधीमध्ये रुग्णाचं मानेपासून खालचं शरीर लुळं पडतं. त्यामुळे सगळ्याच गोष्टीं परावलंबी बनतात.पण मेंदूचं काम मात्र सुरळीत चालू असल्याने हे परावलंबित्व जाणवत राहतं.भावना व विचार यांच द्वंद्व चालु रहात. सीताबाई गुंजेसारख्या आत्माभिमानी बाईला आपल्यामुळे लोकांना होणारा हा त्रास आणि स्वत:चा स्वत:लाही होणारा त्रास पाहवत नाही . म्हणून ती मृत्यूची मागणी करते; ती मान्य व्हावी म्हणून मुलाला कोर्टात लढायला लावते.
चित्रपटात वकील मुलाची भूमिका करणारा अतुल कुलकर्णी हा प्रताप सिताबाई गुंजे या आपल्या नावात आईचे नांव लावतो यातच त्याची मातृभक्ती आली .हा मुलगा, तिनेच केलेली मृत्यूची मागणी पूर्ण करण्यासाठी कोर्टात बाजू मांडत आहे, दयामरणाच्या बाजूने कोर्टात आपली बाजू मांडण्याचा निर्णय हा एका विचारावर आधारलेला आहे. हे पात्र त्याच्या आईसारखंच अत्यंत कणखर आणि तर्कनिष्ठ आहे. आणि तर्काच्या कसोटीवर घासूनच त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचं हे प्रतिपादन जगभरातल्या विविध खटल्यांवर आधारलेल आहे.
परिसंवाद संपल्यावर अनुया म्हैसकर यांना भेटुन अधिक माहिती घेतली. मिपा, उपक्रम, मायबोली, मनोगत इत्यादी सारखी मराठी संकेत स्थळांवर गप्पा टप्पांसोबत एक विचारमंथनही चालू असत असे सांगुन त्यांना या चित्रपटावर आम्ही जरुर चर्चा करु असे सांगितले. http://finalwishthefilm.com या संकेत स्थळावर त्यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया जरुर द्या असे सांगितले.
असो! हा विषयच असा आहे कि नसलेली/ नको असलेली जवळीक आयुष्यात कधी ना कधी विचार करायला भाग पाडते. मंडळी, आपल्याला काय वाटतं?
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 12:03 pm | ज्ञानेश...
कुठल्याही चर्चेसाठी काही विषय एव्हरग्रीन असतात. त्यातलाच एक म्हणजे- इच्छामरण.
हा एक विचित्र तिढा आहे. 'कायदा व्हावा' आणि कायदा होवू नये' अश्या दोन्ही बाजू तुल्यबळ आहेत.. प्रत्येकाचे समर्थक आणि विरोधक आहेत.. आणि विशेष म्हणजे दोन्ही पक्षांचे मुद्दे अतिशय तर्कसंगत आणि बिनतोड आहेत!
मी स्वतः 'कायदा नको' च्या बाजूचा असलो, तरी केस टू केस परिस्थीती बघून असे निर्णय घेतले गेले पाहिजेत. आणि हे काम, अर्थातच प्रचंड अवघड आहे.
Great Power Comes With Great Responsibilities
19 Nov 2009 - 12:13 pm | सुनील
एखाद्या कायद्याचा गैरवापर होतो म्हणून तो कायदाच नको की, गैरवापर टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, हा कळीचा मुद्दा आहे.
असो, हा वाद दीर्घकाळ चालेल. परंतु, मराठी चित्रपट आता अशी अनवट वाट चोखाळत असल्याचे पाहुन बरे वाटते.
परीक्षण उत्तम. चित्रपट पाहणारच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Nov 2009 - 12:15 pm | सहज
शेवट सुखकर व्हावा म्हणून कायद्यात बदल झाले पाहीजेत.
सध्यातरी बेल्जीयम, नेदरलॅन्ड्स मधे इच्छामरणाचा कायदा आहे. आधीक माहीती.
19 Nov 2009 - 12:25 pm | अमोल केळकर
अवघड विषय आहे. सध्या तरी सर्व मुद्दे समजावून घेत आहे.
(नापास ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Nov 2009 - 1:20 pm | समंजस
अवघड प्रश्न आहे.
मला तरी वाटतं की इच्छा मरण हे संबंधीत व्यक्तीला मिळायला हवं. जगण्या प्रमाणे त्याला मरणाचा सुद्धा अधिकार मिळायला हवा.
असा जर कायदा केला तर त्याचा गैर वापर होउ शकतो हे मान्य आहे.
त्या वर उपाय म्हणून, सरसकट कायदा न करता, इच्छा मरण हे संबंधीत व्यक्तीला द्यावे की नाही याचा निर्णय कोर्टाला घेउ द्यावा. म्हणजेच की जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीला इच्छा मरण हवे असेल(दुर्धर आजारामुळे, संपुर्ण परावलंबत्व असल्यामुळे, कसलेही वैद्यकीय उपाय शक्य नसल्यामुळे, ई. ई.) त्याने कोर्टात केस दाखल करावी, यावर कोर्टाने त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकावे/जाणुन घ्यावे(शक्य असल्यास), वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि जर या सर्वांवरून हे निश्चित झाल्यास की संबंधीत व्यक्ती ही उर्वरीत आयुष्यात अश्याच प्रकारे राहणार आहे तर संबंधीत व्यक्तीला इच्छा मरणाची परवागी द्यावी.
असं करण्यात मला तरी काही चुकीचं/कायद्याचा गैरवापर/मानवता विरोधी असलं काहीही वाटत नाही.
का म्हणून इच्छा मरण हवं असलेल्या व्यक्तीने काही वर्षे वेदना सहन करीत घालवावी जर शेवटी मरायचंच असेल तर? कुटुंबातील इतर सदस्यांवर का म्हणून आर्थीक/मानसीक/शारीरीक बोजा टाकावा जर काही हशील होणार नसेल तर?
कुटुंबातील लोकं करतील सगळं प्रेमाने/काळजीने/वेळप्रसंगी हवा तो त्याग करून, कष्ट घेउन पण संबंधीत व्यक्तीला तरी हे आवडणार का? माझ्या मते तरी नाहिच.
19 Nov 2009 - 1:55 pm | प्रकाश घाटपांडे
परमसखा मृत्यु : किती आळवावा ही या पुर्वी मिसळपाववर चर्चा झाली होती. ती इच्छामरणावर होती. नंतर यावरील काही प्रतिक्रिया सुधारकमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. दया मरण या संकल्पनेत आता माझ्यावर दया दाखवा व मला मरण द्या हा सुर आहे. इच्छामरणात मला मरण्याचा अधिकार हवा हा सुर आहे. जगणे नकोसे झाले म्हणुन नव्हे पण जगण पुरेसे झाले म्हणुन मरण हा भाग आहे. इच्छामरणा पेक्षा स्वेच्छामरण हा शब्द मला अधिक संयुक्तिक वाटतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
19 Nov 2009 - 3:14 pm | मिसळभोक्ता
अशा वारंवार होणार्या रटाळ परिसंवादात सहभागी होणार्या (आणि काही काम नसल्यासारखे असे परिसंवाद ऐकायला जाणार्या) सर्वांच्या जीवनातील निष्क्रियतेची समाप्ती म्हणून ह्या सर्वांना दया मरण देण्यात यावे, अशी मी जाहीर विनंती करतो.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Nov 2009 - 3:30 pm | प्रकाश घाटपांडे
पोचवतो ! पोचवतो! त्यांच्या पर्यंत निरोप पोचवतो म्हंतोय मी!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
19 Nov 2009 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
परिक्षण छानच लिहिले आहे हो पका काका.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Nov 2009 - 7:59 pm | सूहास (not verified)
लेख छान !!
परीक्षण छान !!
विषय अवघड !!
सू हा स...
19 Nov 2009 - 8:32 pm | प्रभो
लेख छान !!
परीक्षण छान !!
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
19 Nov 2009 - 8:41 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री घाटपांडे, एका वेगळ्या चित्रपटाची आणि त्यासंदर्भात होत असलेल्या मतमतांतराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
_____________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law