मी कात टाकली

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
9 Nov 2009 - 4:34 pm

(वैधानिक इशारा ः हा लेख म्हणजे हाताला झालेल्या इजेबाबतचा हलक्‍याफुलक्‍या शब्दांतील वर्णन आहे. कमकुवत हृदयाच्या वाचकांनी कृपया तो वाचण्याचं धाडस करू नये!)

कोणतीही गोष्ट साधी, सरळ, सुव्यवस्थित होता कामा नये, हा माझ्या जीवनाचा दंडक आहे. काहितरी खुसपट, अडचण, समस्या त्यात निर्माण झालीच पाहिजे. त्यानंतरच ते काम पूर्ण व्हायला हवं. मी स्वखुशीनं स्वीकारलेला नव्हे, तर नशीबानं/दैवानं/देवानं किंवा जगण्यानं म्हणा, माझ्यावर लादलेला हा नियम आहे.

बऱ्याच दिवसांत तसं काही झालं नव्हतं. यंदाची दिवाळी व्यवस्थित पार पडत होती. शेवटचा दिवस होता. पाडव्याला संध्याकाळी घरी नको, म्हणून आम्ही सासुरवाडीला (माझ्या!) जाऊन आलो होतो. फटाके उडवण्याची ही शेवटचीच संधी मनस्वीला दवडू द्यायची नव्हती. तसेही, दिवाळी यंदा दोनच दिवस होती आणि लगेचच शाळा सुरू होणार होती. त्यामुळे साडेदहा वाजले होते, तरी मी तिच्याबरोबर गच्चीत फटाके उडवायला जायला तयार झालो. फुलबाजे वगैरे उडवून झाल्यानंतर आम्ही भुईनळे उडवायला घेतले. तिला भुईनळा लावायला शिकवण्याचा बेत होता. तिच्या हातात फुलबाजा देऊन मी तिला शिकवायच्याच प्रयत्नात होतो, पण तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिनं अचानक माघार घेतली. "मी नाही उडवणार' म्हणायला लागली. मग तिचा नाद सोडून तिच्यासाठी मीच तो भुईनळा पेटवण्यासाठी सरसावलो. छोटाच फुलबाजा होता. भुईनळ्याच्या टोकाला तो लावला आणि एकदम "ठाप्प' आवाज आला. माझ्या डोळ्यापुढे अंधार झाला. दोन मिनिटं काही सुचेचना. दिसेचना. मी जोरात ओरडलो फक्त. भानावर आलो तेव्हा कळलं, हाताचा अंगठा आणि एक बोट पूर्णपणे भाजलं होतं. मधल्या बोटालाही अर्धवट इजा झाली होती. भुईनळा वर उडण्याऐवजी फुटला होता. बॉंबसारखा! माझ्या हाताचा जो भाग मिळाला, तो पोळून निघाला होता.

सुरुवातीला भाजण्याची तीव्रता कळली नाही. चटकन नळाच्या धारेखाली हात धरला, पण आग वाढत होती. सहन होण्याच्या पलीकडे गेली होती. काय झालं, ते मनस्वीला कळतच नव्हतं. "बाबा, फटाके उडवायला चला,' हे तिचं टुमणं सुरूच होतं. मी ताडकन घरी आलो आणि पुन्हा हात पाण्याखाली बुडवून ठेवला. पण तरीही वेदना कमी होत नव्हती.

डोळ्यापुढे अंधार झाला, पण सुदैवानं डोळ्यांना काही झालं नव्हतं. काही क्षणांत मला व्यवस्थित दिसू लागलं. बाथरूममधल्या गॅस हीटरवरची काही अक्षरं वाचूनही पाहिली. मग समाधान झालं. हाताची आग मात्र थांबत नव्हती. पाण्याखाली तरी किती वेळ धरणार?

फटाके उडविण्याच्या कार्यक्रमाचा फियास्कोच झाला होता. कुणीतरी सांगितलं, बटाट्याचा किस हातावर लावा. तो उष्णता शोषून घेईल. मग तसं केलं. जरा गार वाटलं. पण नंतर पुन्हा तो किस गरम झाल्यासारखं वाटू लागलं. हात झोंबायचा काही कमी होईना.

साडेअकराला अंथरूणावर अंग टेकलं. दिवाणाच्या शेजारी तेवढ्याच उंचीचं स्टूल घेऊन त्यावर हात ठेवला. स्टुलावर हात, त्यावर बटाट्याचा किस, अशी "लगोरी' रचलेली दिसत होती. तरीही, स्वस्थ झोपवेना. हाताची वेदना काही सुचू देईना. मग उठलो. टीव्ही लावला. दिसेल ते बघत बसलो. रात्री दोनपर्यंत हात ठणकत होता. मी अस्वस्थ येरझारा घालत होतो, चॅनेल बदलत होतो, हातावर फुंकर मारत होतो, बटाट्याचा किस खालीवर करत होतो. शेवटी दोनला जरा वेदना कमी झाली आणि पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना करण्याचा विचार केला. सुदैवानं झोप लागली.

दुसऱ्या दिवशी काळी पडलेली बोटं आणि भाजलेली कातडी भयानक दिसत होती. डॉक्‍टरांकडून रंगीबेरंगी गोळ्या आणल्या. (कुठलाही आजार झाला, की आमच्या डॉक्‍टरांना रंगीबेरंगी गोळ्या द्यायची हौसच आहे. पूर्वी पानपट्टी चालवायचे बहुधा!) बॅंडेज करायचं नव्हतं, हात बांधायचा नव्हता. त्यामुळं आमचा हा उवद्‌व्याप सर्वांना चर्चेच्या गुऱ्हाळासाठी उपयोगी पडणार होती. ऑफिसच्या दैनंदिन गॉसिपव्यतिरिक्त चघळायला आणखी एक विषय!

साधारणपणे आठ दिवस जुन्या कातडीच्या खाली येणारी नवी कातडी जाम चावत होती. कराकरा खाजवायची इच्छा होत होती, पण इलाज नव्हता. सुदैवानं उजवा हात असला, तरी ऑपरेटिंगसह सगळी कामं मला करता येत होती. पंधरा दिवसांनी हात व्यवस्थित झाला. जुनी कातडी जाऊन नवी कातडी आली. मला कात टाकल्यासारखंच वाटू लागलं. आता नवी कातडी जुन्या कातडीशी जुळूनही आलेय बहुतांश भागात. पूर्ण बरं व्हायला अजून काही दिवस, महिने लागतील, अशी शक्‍यता आहे.

सुदैव म्हणजे मनस्वीला तो भुईनळा न उडविण्याची सुबुद्धी लवकर झाली. तो फुटणार आहे, हे तिला "सिक्‍स्थ सेन्स'नं कळलं की काय कोण जाणे! (ती मुलगी असल्यानं तिच्याकडे तो असण्याची दाट शक्‍यता आहेच. पण बापाला घडोघडी पिडू नये, हे पहिले पाच "सेन्स' वापरूनही का कळत नाही, ते तिलाच ठाऊक!)

मोठा झाल्यानंतर भाजण्याचा हा पहिलाच अनुभव. शाहिस्तेखानासारखं आमचंही त्या बोटांवरच निभावलं. लहानपणी असाच एकदा भाजलो होतो. खुर्चीवर मागे उभं राहून खुर्चीच्या दोन पायांवर ती आपल्या अंगावर घेऊन झुलण्याचा आवडता खेळ खेळत होतो. मागे स्टोव्हवर पिठलं रटरटत होतं. खुर्ची जास्तच अंगावर आली नि मी पिठल्यात पडलो. उजवा खांदा नि बरीच बाजू खरपूस भाजून निघाली होती. पिठल्यासारखी! दुसऱ्याच दिवशी परीक्षा होती नि मी मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये बसून पेपर दिला होता! तरीही भाजल्याच्या रात्री मी व्यवस्थित जेवलो आणि मला भाजलं म्हणून माझी बालमैत्रीण कम बहीण मात्र उपाशी राहून रडत बसली होती, हे ती अजूनही सुनावते कधीकधी!

असो. कात टाकल्यानंतर आता लिहायलाही बरेच विषय आहेत. दर दोन-तीन दिवसांनी लिहीनच एखादा. वाचत राहा, म्हणजे झालं!

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

9 Nov 2009 - 9:53 pm | चतुरंग

हातात घेऊन तर पेटवूच नयेत इतकेच काय त्यावर वाकूनही पेटवू नयेत. माझ्याही समोर असाच एक भुईनळा फुटला होता. डोळ्यांसमोर १५ मिनिटं काजवे चमकत होते. काहीच नीट दिसत नव्हतं. जाम टरकलो होतो. गार पाण्यानं सारखे सारखे डोळे आणि तोंड धुवून येत होतो. शेवटी एकदाचं अर्ध्या तासाने नीट दिसायला लागलं आणि जीव भांड्यात पडला.
फटाके उडवताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा मोठा साध्या काचांचा गॉगल लावून उडवावेत. किमान डोळ्यांवर थेट आघात होण्याचे टळते.

भाजलेल्या जखमेवर लोणी-हळद लावावी अतिशय उत्तम उपाय. (उकडलेल्या बटाट्याची सालही लावतात जखम लवकर भरुन येते असं ऐकलं आहे. हा दुवा वाचा.)

चतुरंग

आपला अभिजित's picture

10 Nov 2009 - 10:51 am | आपला अभिजित

फटाके उडवताना संपूर्ण डोळे झाकले जातील असा मोठा साध्या काचांचा गॉगल लावून उडवावेत. किमान डोळ्यांवर थेट आघात होण्याचे टळते.

डॉक्टरांनीही असंच झापलं मला. पण किती काळजी घेणार?
मनस्वीलाही तोंडावर मास्क बांधून फटाके उडवायला सांगितलं होतं. भलतीच विनोदी दिसत होती! हे बघा!!

mahabaleshwar-nov 09 017

पक्या's picture

10 Nov 2009 - 12:21 am | पक्या

काळजी घ्या इथून पुढे.
आता ह्या लेखनाला वा, छान लिहिलंत असं म्हणणे म्हणजे जरा अतीच होईल. पण तुमची अनुभव कथन करण्याची शैली मात्र छान आहे ...त्या अर्थाने लेखन छान झालेय.

आपला अभिजित's picture

10 Nov 2009 - 10:38 am | आपला अभिजित

आता ह्या लेखनाला वा, छान लिहिलंत असं म्हणणे म्हणजे जरा अतीच होईल.

:S

पण तुमची अनुभव कथन करण्याची शैली मात्र छान आहे ...त्या अर्थाने लेखन छान झालेय.

:)

काळजी घ्या इथून पुढे.
धन्यवाद. पण लिहिताना की फटाके उडवताना? ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2009 - 12:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिजित, तू फटाके उडवताना काळजी घे आणि आम्ही वाचताना घेऊ! ;-)
(एक दुष्ट विचारः याने काळजी घेतली तर आपल्याला असं लिखाण कसं वाचायला मिळणार?)

अदिती

पक्या's picture

10 Nov 2009 - 1:04 pm | पक्या

>>काळजी घ्या इथून पुढे.
>>धन्यवाद. पण लिहिताना की फटाके उडवताना?
अर्थात फटाके उडवताना.

खुलासा - हाताला एवढं भाजल्यावर लेखाला नुसतीच वा छान लिहीलत अशी प्रतिक्रिया दिली असती तर ती चांगली नसती वाटली.
पण अनुभव कथन मस्त केलयं

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

घाटावरचे भट's picture

10 Nov 2009 - 1:57 am | घाटावरचे भट

माझ्या हातावर पण भुईनळा उडाला होता लहानपणी. अर्थात त्याला माझा मूर्खपणा कारणीभूत होता. मी भुईनळ्याची वात फाडून त्यात उदबत्ती घातली :P. उजव्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट सोलून निघालं होतं आणि पांढरी साल बाजूला लोंबत होती. मग ८-१० दिवसांनी झालं बॉ बरं. दिवाळीची सुट्टी वाया गेली म्हणून खूप वाईट वाटलं होतं एवढंच आठवतंय आता. :)

आपला अभिजित's picture

10 Nov 2009 - 10:40 am | आपला अभिजित

तुम्ही पण उद्योगी दिसताय! बराय.