फॉर हिअर ऑर टू गो!!.. पुस्तक परिक्षण

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
4 Nov 2009 - 7:44 am

फ़ॉर हिअर ऑर टू गो!!

जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं? मंडळाचे अध्यक्ष लिहितात,"अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या मराठी समाज जीवनाची ही कहाणी आहे. भूतकाळात अनेक लेखक, साहित्यिक महारष्ट्रातून इथे आले, थोड्या वेळांत बर्‍याच ठिकाणी धावती भेट देऊन गेले. आणि त्या तुटपुंज्या अनुभवावर त्यांनी अमेरिकेतल्या समाज जीवनावर पुस्तके "पाडली." बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. ठाणेदार यांनी या पुस्तकासाठी आर्थिक मदत पुरवली.."
एका अर्थाने, वर वर हिंडणार्‍या आणि त्यावर पानांचे ढिगारे रचणार्‍या लेखकांनी अमेरिकन मराठी माणसांबद्दलचे पसरवलेले गैरसमज दूर करण्याचा लेखिका प्रयत्न करते. पुस्तकात एक वाक्य आहे, "काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." वर वर पाहणार्‍या लेखकांना अमेरिका फ़क्त सुखासीन, भोगवादी, चंगळवादी दिसली.. अमेरिकन आयुष्यात फ़क्त स्वैराचार दिसला, उत्तानपणे छाती उघडी टाकून चालणार्‍या अमेरिकन मुली दिसल्या, त्यांच्या शरीराशी चाळे करणारे कामांध युवक दिसले.. मात्र अमेरिका म्हणजे फ़क्त इतकेच का? या प्रशाचे प्रश्नाचे रोखठोक उत्तर म्हणजे "फ़ॉर हीअर ऑर टू गो!"

लेखिका प्रारंभ करते विजय तेंडुलकरांपासून. २००३ साली जेव्हा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क अधिवेशनात डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांची जाहिर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने लेखिकेचे अमेरिकेत पहिल्यांदा आगमन झाले. न्यूयॉर्क अधिवेशनात तेव्हा तेंडुलकर महनीय अतिथी होते. तेंडुलकरांशी गप्पा मारताना "मग? अमेरिका कशी वाटली?" या त्यांच्या काहीशा खोचक प्रश्नाने हे पुस्तक लिहिण्याचा पाया रोवला गेला असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. एक मात्र तेंडुलकरांनी सांगितलं ते म्हणजे की, "ए बी सी डी म्हणजे अमेरिका बॉर्न्ड कन्फ़ूज्ड/कॉन्फ़िडेंट देसी" म्हणजे अमेरिकेत जन्मलेली भारतीय वंशाची मुले यांच्यासोबतच त्यांच्या आई - वडीलांच्या पिढीशी आधी बोल... "
त्यानंतर जवळ जवळ वर्षभर लेखिका अमेरिकेतल्या वेगवेगळ्या प्रांतात, कॅनडा मध्ये हिंडली आणि जे जमवलं ते एकत्र करून शब्दबद्ध करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. आणि लेखिकेने ते योग्य तर्‍हेने पेललं आहे असंच म्हणावंसं वाटतं.
सुरूवात होते कॅनडामध्ये १९६४ साली नशिब आजमावण्यासाठी आलेल्या विनायक गोखले यांच्यापासून.

ब्रुक बॉण्ड चहा
लिंबाचं लोणचं
सुई-दोरा, बुटाची लेस
आणि डिक्शनरी..

४३ वर्षापूर्वीच्या डायरीमध्ये अजूनही जपून ठेवलेली काहीशी जीर्ण झालेली, ही यादी टोरान्टो मध्ये विनायक गोखल्यांच्या घरी अजूनही जपून ठेवलेली आहे. लेखिकेने तिच्या या दौर्‍यामध्ये हजारो मराठी माणसे पाहिली जी स्वातंत्र्योत्तर काळात देशान्तर करून आली. त्यांनी आपलं अस्तित्व जपण्यासठी केलेली धडपड, प्रसंगी जीवावर बेतलेले प्रसंग वाचतना नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.
या प्रवासात मग येतात दिलीप चित्रे, नानासाहेब आणि तारा पटवर्धन आणि अशी बरीच मंडळी जी चाकरमानी होती पण जगण्याच्या वेगळ्या महत्वाकांक्षेपायी धोपटमार्ग सोडून पंख पसरण्याच्या उद्दीष्ट्याने देशाबाहेर पडली. नवी आव्हाने स्वीकारताना होणारी ससेहोलपट, डिस्क्रीमीनेशनचा फ़ुफ़ाटा, आणि त्यातूनही तावून सलाखून झळकणारं त्यांचं व्यक्तित्व. सगळंच विलक्षण. पुस्तकात लेखिका भारतातल्या अमेरिकेत येऊन शिक्षण घेणार्‍या पहिल्या वहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचेही चरित्र थोडक्यात सांगते. १८८३ साली बोटीने एक हिंदुस्थानी , नऊवारीतली स्त्री शिक्षण घेण्यासाठी ते ही एकटीने प्रवास करून येते, त्यातलं थ्रील आनंदी बाईंनी पत्र मैत्री जोडलेल्या "कार्पेंटर" बाईंनाही नविन होतं आणि इथल्या गारठलेल्या अमेरिकन शिष्टाचारात त्यांनी तितक्यात उबदारपणाने आनंदीचं न्यूयॉर्कच्या किनार्‍यावर स्वागत केलं.
पुस्तकात मग उल्लेख येतो तारा पटवर्धन या आजींचा. राम पटवर्धन उर्फ़ नानासाहेब. ते पर्मनंट मिशन ऑफ़ इंडीया टु युनायटेड नेशन्स" या संस्थेत काम करत होते. पंढरपूरात सगळा गोतावळा आणि नवविवाहीत पत्नी. नानांना घरून निर्वाणीचा निरोप आला, " आत्ताच्या आत्ता परत ये नाहीतर बायकोला घेऊन जा." पत्नीला बोलावून घेतले. मात्र राहण्याची सोय नव्हती. जीन पीयर्सन या हॉलिवूड तारकेला भारतीय संस्कृती, वेद, संस्कृत या बद्दल आकर्षण आहे असे ते ऐकून होते. भारतीय वकिलातीने दिवाळीच्या निमित्तने मेजवानीसाठी निमंत्रीतांची यादी केली होती त्यात नानांनी जीन पियर्सनचेही नाव घातले. आणि मेजवानीला ती आल्यावर तिची भेट घेऊन तिला संस्कृत शिकवण्याची तयारी दाखवली. मात्र त्याबदल्यात त्यांच्या पत्नीने अमेरिकेत जो गृहप्रवेश केला तो या जीन पिअर्सन च्या घरीच. हा अनुभव केवळ विलक्षण आहे. तारा पटवर्धन अजूनही न्यूयोर्कच्या एका भागात रहाताहेत.

लेखिकेने अशा सगळ्याच लोकांचे अनुभव इतके परिणाम कारक रितिने मांडले आहेत की आपणही त्या अनुभवातून जातो आहोत का अशी पुसटशी शंका यायला लागते.
अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांचे प्रश्न.. लेखिका म्हणते "ही मुलं मला कुठेही कन्फ़ूज्ड नाही दिसली, उलट आय एम प्राऊड अमेरिकन एण्ड आय रिस्पेक्ट माय इंडीयन रूट्स" असं स्वच्छ सांगणारी कॉन्फ़िडंट वाटली."
साधारण ४०-४५ वर्षापूर्वी केवळ आठ डॉलर्स, आणि वीस किलो सामान घेऊन आलेल्या या मंडळींनी आता तेवढ्या शिदोरीवर डोलारे उभे केले आहेत. भरली वांगी, बटाटे वडे , गोडाच्या शिर्‍यासोबत केक, पेस्ट्रीज, बर्गर, पिझ्झा यांच्याही चवीशी जीभेने मिळतंजुळतं घेतलं. नाहीतर थँक्स गिव्हिंची टर्की कशी चाखायला मिळाली असती??
आता ज्यांची अमेरिकन नातवंड आहेत अशा लोकांना मागे वळून पाहताना, "आय रिअली डीड ऑल दिस??" असे कृतार्था समाधानाचे सूर काढताना पाहून त्या काळात म्हणजे आयटी बूम नव्हती, माऊसच्या एका क्लिक वर जगाचे दरवाचे उघडत नव्हते आणि एच वन वाल्यांच्या इतकी भली थोरली पॅकेजेसही नव्हती.. त्या काळात त्यांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान आपल्यालाही होते.
ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
या पुस्तकात बर्‍याच गोष्टी अशाही आहेत ज्यामध्ये अमेरिकेत आल्याचा पश्चातापही झालेली कुटुंबे आहेत. काही मुलांच्या बाबतीत झुरताहेत तर काही आई-वडीलांच्या शेवटच्या क्षणी त्यांना सोबत न करता आल्याचे ओझे अजूनही खांद्यावर घेऊन अपराधीपणाने जगताहेत.
अमेरिका कशी? लेखाकांनी पुस्तकातून दाखवली तशी की संधी देणारी.. म्हणजे लॅण्ड ऑफ़ ऑपॉर्चुनिटी??
पंचेचाळिस वर्षांपूर्वी चालू झालेली ही देशान्तराची झुंज .. म्हंटलं तर एकाकी म्हंटलं तर समूहाची.. पण तिची कहाणी विलक्षण आहे. या कहाणीच्या निरूपणात त्यांच्या राजरस्त्यांखाली दडलेल्या, देशान्तरीतांच्या पहिल्या पिढीच्या खडकाळ, उंचसखल पाऊलवाटा सध्याच्या एच वन पिढीच्या तरूणांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

हे पुस्तक ज्या क्षणी वाचून पूर्ण झालं त्या क्षणी नकळत डोळे मिटले गेले आणि हल्कीशी ओल पापण्यांवर आलेली जाणवली.

- प्राजु

नाव : फॉर हिअर ऑर टू गो
लेखिका : अपर्णा वेलणकर.
प्रकाशक : मेहता प्रकाशन , पुणे.
किंमत : रूपये २२५

देशांतरप्रकटनसमीक्षा

प्रतिक्रिया

एकलव्य's picture

4 Nov 2009 - 8:08 am | एकलव्य

धावता आढावा आवडला प्राजुताई!

"काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही."

फ़ॉर हिअर ऑर टू गो!! म्हणजे अमेरिकेत राहायचे का भारतात परतायचे (हा म्हटला तर दुखरा आणि म्हटला तर स्वतःची समजूत किंवा फसवणूक करणारा) प्रश्न लेखिकेने मांडला आहे की काय असे वाटले.

मराठी एकलव्य

भडकमकर मास्तर's picture

5 Nov 2009 - 3:05 pm | भडकमकर मास्तर

सेम विषयावरचा आमचा पूर्वीचा धागा...
http://www.misalpav.com/node/6503
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

छोटा डॉन's picture

4 Nov 2009 - 8:15 am | छोटा डॉन

सुरेख ओळख ...!!१
पुस्तक परिचय आवडला, पुस्तक नक्की वाचेन मिळेल तिकडे.

अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."

:)
मस्त, हा परिच्छेद आवडला.
अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...
असो.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

दशानन's picture

4 Nov 2009 - 8:22 am | दशानन

असेच म्हणतो,

प्राजु तै.
मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

प्रभो's picture

4 Nov 2009 - 9:51 am | प्रभो

असेच म्हणतो,

प्राजु तै.
मस्त परिक्षण आवडले, पुस्तक मिळाले की वाचण्यास आनंद होईल हे नक्की.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रशांत उदय मनोहर's picture

4 Nov 2009 - 12:22 pm | प्रशांत उदय मनोहर

असेच म्हणतो,

हे पुस्तक नक्की वाचणार.

आपला,
(वाचक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

गणपा's picture

4 Nov 2009 - 1:17 pm | गणपा

प्राजु ताई छान परिक्षण केलयस.
एक चांगलं पुस्तक नजरेस आणुनदिल्या बद्दल आभार.

पर्नल नेने मराठे's picture

5 Nov 2009 - 4:19 pm | पर्नल नेने मराठे

अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...
हेच म्हणते.

चुचु

शक्तिमान's picture

7 Nov 2009 - 3:35 am | शक्तिमान

अमेरिकाच काय पण करियरसाठी एकदा बाहेर पडले की कुठल्याही ठिकाणी हेच लागु होते. मग ते अमेरिका असो की फ्रँकफर्ट अथवा बेंगलोर ...

थोड्या फार प्रमाणात ही सर्व ठिकाणे अमेरिकेशीच संबंधित आहेत..

निमीत्त मात्र's picture

4 Nov 2009 - 8:27 am | निमीत्त मात्र

४०-४५ वर्षांपृर्वी गेलेली काय आणि गेल्या १०-१५ वर्षांपूर्वी गेलेली काय.. सगळीजणं स्वखुशीनेच नविन वाटा चोखाळायला गेलेली ना? त्यांची का इतकी कवतिकं?

ही असली नको त्यांचा नको तितका उदो उदो करणारी पुस्तकं इथल्या अमेरिका द्वेष्ट्यांच्या हातात कोलित देतात.

विंजिनेर's picture

4 Nov 2009 - 8:41 am | विंजिनेर

चांगला आढावा..
बाकी,

पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"

हे आजही तितकंच खरे आहे. आणि मायभुमी सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडणार्‍या प्रत्येक भारतीयाला लागू होतं (अमेरिका/इंग्लंड इ. आंग्लभाषिक देशांशिवाय युरोप/पूर्व आशिया इ. ठिकाणी तर अजूनच)

जाता जाता: चांगल्या पुस्तक परि़क्षणाच्या धाग्याचा निवासी वि अनिवासी वादात सापडून विचका होउ नये ही माफक अपेक्षा..

सहज's picture

4 Nov 2009 - 8:52 am | सहज

पुस्तक वाचले पाहीजे.

फॉर हिअर ऑर टू गो!! हा प्रश्न आहे खरा. ह्यावर एक वेगळा धागा सुरु करावा का? :-)

बहुतेक एका मिपाकरानी या वेलणकरबाईंची मुलाखत घेतली होती.

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2009 - 8:53 am | मिसळभोक्ता

सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. मिसळपावावरील मालकप्रणीत (आणि बिरूटे, नाना, वगैरे इतर "छोटे" सदस्य प्रतिपादित) अनिवासी भारतीयांविरुद्ध उघडलेल्या आघाडीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे.

ह्याला धैर्य लागते. ते धैर्य दाखवल्याविषयी प्राजूताईंचे किती कौतुक करावे तेवढे कमीच. इतर लोकांनी, त्यांचा धैर्याच्या बाबतीत कित्ता गिरवावा अशी विनंती करावीशी वाटते. अर्थात, ही विनंती अनिवासी भारतीयाने केली, तर ती फाट्यावर मारण्यात येईल, ह्याची खात्री तेवढीच अधीक वाटते.

असो, ते झाल्यावर, मूळ पुस्तक आणि त्यातील व्यक्तिचित्रे ह्याविषयी थोडासा खेद व्यक्त करावासा वाटतो.

आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे.

बदल, जे सगळीकडे होतात, तसेच इथेही होत आहेत. ह्या बदलांविषयी अधिक लिहायला हवे.

४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही.

असे माझे मत आहे, एनी वे.

येथे बरेच काका आणि आजोबा "आमच्या वेळी असे नव्हते", "आम्हाला किती झगडावे लागले" असे वारंवार सांगताना मला भेटतात. आणि मी आमच्या झगड्यांची इथ्थंभूत यादी दिल्यावर गप्प बसतात. त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे. ते आलेत त्यावेळी, स्वतःच्या आकांक्षा दडपून टाकणारी व्यक्ती इथल्या लोकांना दिसली. अम्ही आलोत, त्यावेळी, त्यांच्या पोटावर पाय येणार ह्याची त्यांना जाणीव झाली.

एवढा मोठ्ठा फरक लेखिकेला दिसू नये, ह्याचा खेद होतो.

बाकी पुस्तक बरे आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

4 Nov 2009 - 11:09 am | विकास

सर्वप्रथम, प्राजूताईंचे कौतुक करायला हवे. ...त्यांनी अनिवासी भारतीयांविषयी लिहिलेल्या ह्या पुस्तकाचे चक्क परीक्षण चक्क मिसळपावावरच चक्क केलेले आहे.

कौतुक वाटायचे कारण: एक अमेरिकेचे कौतुक असलेल्या पुस्तकाचे कौतुक आणि तेही ज्या "वेलणकर" नामक व्यक्तीने लिहीलेल्या! ;)

असो. बाकी गंभीर प्रतिसाद सकाळी...

प्राजु's picture

4 Nov 2009 - 7:53 pm | प्राजु

आपण म्हणताहात ते खरे असेलही. पण..

४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही.

मी अशी तुलना कुठेच नाही केलेली.
या पुस्तकात मला दिसले ते, मूळासकट उपटलेले रोपटे नव्या जमीनीत पुन्हा तग धरून राहिले आणि त्याचा वृक्ष झाला.. असे ज्यांच्याबद्दल म्हणावे अशी लोकं. काही १९४८ च्या गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर.. तर काही भष्टाचारला कंटाळलेली तर काही शिक्षणव्यवस्थेतल्या आरक्षणांना. जी जशी दिसली तशी रेखाटली गेलेली आहेत.
कदाचित आपण म्हणता तशी मी पुस्तकाचा अभ्यास करण्यात कमी पडले असेन. मी एकाच बाजूने विचार केला असल्याची शक्यताही आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

मिभो हे "लेखिका" म्हणजे अपर्णा वेलणकरांसबंधी बोलत असावेत. ते स्पष्टीकरण करतीलच.

मिसळभोक्ता's picture

4 Nov 2009 - 10:32 pm | मिसळभोक्ता

लेखिका म्हणजे वेलणकर.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

निमीत्त मात्र's picture

4 Nov 2009 - 8:18 pm | निमीत्त मात्र

गांधी वधानंतर आलेली तर काही दुष्काळानंतर तर काही भारतीय अर्थ व्यवस्था कोसळल्यानंतर..

गांधी वध ह्या शब्दयोजनेवर आक्षेप नोंदवत आहे. गांधी हत्या म्हंटले गेले पाहिजे.

प्राजु's picture

4 Nov 2009 - 8:42 pm | प्राजु

माफ करा...
माझे शब्द मागे घेते. गांधी हत्येनंतर हेच योग्य आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Nov 2009 - 8:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री मिसळभोक्ता यांच्याशी सहमत. अपर्णा वेलणकर या लोकमतच्या उपसंपादक असतांना मी त्यांना ओळखत असे. त्यांना अनिवासी भारतीयांविषयी कौतुकमिश्रित कुतुहल असल्याचे माहीत असल्याने या पुस्तकाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत असा माझा समज झाला आहे. (अपर्णा वेलणकर यांनी शोभा डे यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला होता व मूळच्याच टूकात पुस्तकाचा आणखी टूकार अनुवाद वाचवला गेला नव्हता, हे आठवते.)

श्री मिसळभोक्ता म्हणतात त्याप्रमाणे 'बरेच काका आणि आजोबा' त्यांच्या धडपडींचे पुराण सुरू करतात. एखाद्या नवीन देशात येऊन तेथे स्थिरस्थावर होणे हा अनुभव जरी व्यक्तिगत समाधान देत असला तरी हा अनुभव एका वीराचे स्वगत म्हणून सांगणे हे इतरत्र 'काका-आजोबा' करतात त्याप्रमाणेच आहे. हे लोक आले तेव्हा सुशिक्षित होते, यांच्याकडे असलेल्या कौशल्यांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती तसेच स्पर्धेचा मोठ्या प्रमाणात अभाव होता. थोडक्यात या लोकांच्या आर्थिक प्रगतीस मोठ्या प्रमाणात वाव होता. त्यांची व आजकाल येत असलेल्या भारतीयांची तुलना करणे योग्य नाही. आजकाल येणार्‍यांनी प्रवासवर्णनाचे क्षेत्र समृद्ध(?) केले आहे. (डिजिटल कॅमेर्‍याने तर या लिखाणाला फारच बरकत आणली.)

कौशल्य नसतांना, इंग्रजी भाषेचा गंधही नसतांना, आफ्रिकेतून हाकलून दिलेले गुजराथी काका-आजोबा जेव्हा मॅटर ऑफ फॅक्टली आपले अनुभव सांगतात तेव्हा मराठी काका-आजोबांचे रिस्क अ‍ॅव्हर्स अनुभव फारच दुबळे वाटतात, प्रेरणा तर अजिबातच देत नाहीत.

टीप: प्राजुतैंचे परीक्षण चांगले झाले आहे, त्यांच्या परीक्षणाबाबत वरील प्रतिसाद नाही.

अवांतर: श्री मिसळभोक्ता यांनी पाच ओळीपेक्षा मोठा प्रतिसाद लिहिल्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. (आधीही लिहिले असतील पण हा विशेष गंभीरपणाने लिहिला आहे, हे विशेष.)

मुक्तसुनीत's picture

5 Nov 2009 - 3:10 am | मुक्तसुनीत

परीक्षण आवडले.

आनंदी-गोपाळ मधल्या आनंदीबाई जोशी पासून ते काल ह्यूस्टनला ल्यांड झालेला समीर जोशी, ह्या सर्वांना एकाच क्याटेगरीत, म्हणजे "अनिवासी भारतीय" ह्या क्याटेगरीत टाकण्याच्या प्रवृत्तीला सदर पुस्तकाने गो-अहेड दिलेला आहे.

हे बर्‍यापैकी सरसकट विधान आहे. पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे.

पुस्तकामधे अनेक दोष असतील परंतु उपर्युक्त दोष त्यात नाही हे खचित.

माझ्या दृष्टीने , पुस्तकातली पाल्हाळिक भाषा हा एक दोष आहे. अनेक मुद्दे जे सरळसोटपणे मांडता येतात त्यापायी काहीसे आख्यान लावल्यासारखे. (याची प्रचिती प्राजु यानी करून दिलेल्या पुस्तकाच्या ओळखीतल्या उतार्‍यामधे येते. आणि श्री. दिलीप चित्रे यांची प्रस्तावना याच दोषामधे अडकल्यासारखे मला वाटले. )

दुसरा दोषच म्हणायचा तर असे म्हणता येईल की हा जो दस्तावेज आहे त्याचे स्वरूप "अ‍ॅनेक्डोटल" (मराठी शब्द) आहे. अमेरिकेतल्या लायब्ररीमधे अशी शेकड्याने पुस्तके मिळतात की ज्यामधे (उदाहरणार्थ) वीस च्या दशकात बोटीने न्युयॉर्क ला आलेल्या लोकांच्या जीवनमानाचे , त्यांच्यातल्या शारिरीक बदलांचे स्टॅटिस्टीक्स मांडलेले असते. त्यातून काही मार्मिक व ठोस असे निष्कर्ष काढलेले दिसतात. हे सारे किचकट आहे पण दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने अनमोल. या पुस्तकाचे स्वरूप किस्सेवजा बनते. आकडेवारीचा मागमूस नाही. अर्थात लेखिकेचा तो उद्देश नसावा.

पुस्तकाची जमेची बाजू ही, की त्यामधे अनेक पैलूंचा धांडोळा घेतला गेला आहे. यशाबरोबर अपेशाची नोंद घेतली गेली आहे. एकच एक दृष्टीकोन, पूर्वग्रहदूषित अनुमाने यांना टाळण्यात पुरेसे यश आलेले आहे. पुस्तक थोडे "रगेड" (मराठी शब्द) हवे होते असे मला वाटले इतपतच.

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2009 - 1:47 pm | मिसळभोक्ता

पुस्तक हे मुख्यत्वे साठीच्या दशकात आलेल्या लोकांबद्दल आहे. वर केलेले विधान विपर्यस्त, दिशाभूल करणारे आहे

श्री. सुनीत, माझे विधान पुन्हा एकदा वाचा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
(आणि नंतर विपर्यस्त, दिशाभूल असे शब्द वापरण्याविषयी पुन्हा एकदा विचार करा.)

- निश्चय केळामात्रे

मुक्तसुनीत's picture

5 Nov 2009 - 6:32 pm | मुक्तसुनीत

प्रस्तुत पुस्तकात सर्वाना एकाच कॅटेगरीत टाकण्याबद्दल तुम्हाला जे वाटते त्याचे तुम्ही दाखले द्यावेत. पुस्तकाबद्दलच्या माझ्या आकलनानुसार , तुमचे विधान मला चुकीचे वाटले. मी तसे म्हणालो. तुम्ही तुमची बाजू सप्रमाण सिद्ध करा. मी आनंदाने मुद्दा मान्य करेन.

- दर्शन हेळामात्रे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

5 Nov 2009 - 8:45 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री सुनीत, आनंदीबाई १८८३ मध्ये अमेरिकेत आल्या आणि १८८६ मध्ये भारतात परतल्या. पुस्तक वाचले नसल्याने आनंदीबाई व साठीच्या दशकात आलेल्या भारतीयांमध्ये काही समान सूत्र (अमेरिकेत येणे याखेरीज) लेखिकेने दाखवले आहे काय? याविषयी कृपया माहिती द्यावी.

मुक्तसुनीत's picture

5 Nov 2009 - 9:01 pm | मुक्तसुनीत

पुस्तकामधे आनंदीबाई जोशी, डॉ. केतकर यांचे उल्लेख आहेत. त्यांच्या सारख्या लोकांची अमेरिकायात्रा म्हणजे ज्ञानार्जनासाठी अज्ञात प्रदेशामधे , दळणवळणाची नि संप्रेषणाची साधने उपलब्ध नसताना केवळ हिमतीच्या जोरावर केलेले असामान्य प्रवास अशा अर्थाचे वर्णन लेखिका करते ; जे माझ्या मताने अगदी योग्य आहे.

अमेरिकेची दारे महायुद्धानंतर किलकिली झाली नि साठीच्या दशकाच्या सुरवातीला तर ती सताड उघडली. याच घटनेच्या सुमाराला , भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला पंधराएक वर्षे उलटल्यानंतर, भारतातल्या नवीन वास्तवाबद्दल ज्यांचा भ्रमनिरास झाला ती पीढी अमेरिकेकडे वळली. "ब्रेन ड्रेन" हा शब्द १९६५ च्या सुमारास अस्तित्त्वात आला. तर , या पीढीमधे जे लोक इथे आले त्यांचा प्रवास , त्यांन्ची आयुष्ये, त्यांची यशापयशे , त्यांचे तिढे नि प्रश्न याबद्दल हे पुस्तक आहे. हा सगळा लेखाजोखा घटनाक्रमानुसार सविस्तर मांडला गेला आहे. भूमिका नीट विशद केली गेली आहे.

नव्वदीच्या नि त्यानंतरच्या लोकांची ही स्टोरी नाही. तसा कुठे उल्लेखही नाही.

अक्षय पुर्णपात्रे's picture

5 Nov 2009 - 9:08 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री सुनीत, तसे असल्यास धन्यवाद. श्री मिसळभोक्ता यांच्याकडून एकाच कॅटेगरीत कसे टाकले आहे याविषयी स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

सुधीर काळे's picture

4 Nov 2009 - 8:58 am | सुधीर काळे

माझ्या सौ.ने हे पुस्तक वाचले आहे, मी अद्याप वाचायचे आहे. पण त्यातल्या "म्हातारपणी तिथं रहायचं कीं परत यायचं" या विषयाची चर्चा तिला खूप आवडली व "थेट उपयुक्त" वाटली.
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

चित्रा's picture

4 Nov 2009 - 10:10 am | चित्रा

पुस्तकाविषयी घरातल्यांकडून ऐकलेले आहे, पण आधी वाचावेसे वाटले नाही हे कबूल करते. एकतर अनिवासी भारतीय म्हणून अशा पुस्तकांमधील काही गोष्टी जरा अधिक भिडतात, काही तितक्याश्या रूचत नाहीत, यामुळे इच्छा झालेली नाही. पण प्राजूचे परिक्षण वाचून हे पुस्तक वाचावेसे वाटते आहे. त्यामुळे पुस्तक परिचयाबद्दल मनापासून धन्यवाद.

तरी काही गोष्टी अपर्णा वेलणकरांना खरेच समजल्या आहेत का असे वाटले (त्यासाठी अर्थातच पुस्तक वाचावे लागेल) .
जसे -
"ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्‍याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."

काम चांगलं असण्याशी (निदान सद्य परिस्थितीत) मोबदल्याचा संबंध फारसा लावू नये! (उदा. मागच्या वर्षी ज्यांना भरपूर कामाचे भरपूर मोबदले मिळत होते अशा गृहकर्ज आणि विम्याच्या कंपन्यांतील मोठ्या पदांवरचे लोक नक्की काय चांगले काम करीत होते? आणि किती वर्षे असे काम ते करीत होते? )

बाकी डॉनराव म्हणतात ते योग्य, की तुमच्या परिघाबाहेर पडल्यावरच (मग ती गल्ली असो, की गाव किंवा राज्य किंवा देश) तुमच्यातील शक्तींची तुम्हाला जाणीव होते. त्या शक्ती असतातच, त्या परदेश जागृत करतो एवढेच.

परदेशात आल्यानंतर जाणवलेल्या अतिशय एकाकीपणापासून ते गलबल्यापर्यंतचा प्रवास हा खूप ठेचकाळत झालेला असू शकतो. (त्यातही नंतर मजा वाटते, पण त्याबद्दल अमेरिका अशी काही वेगळी काढण्याचे कारण नाही, हे स्थलांतरितांचे कुठेही गेले तरी प्रश्न असावेत).

मिसळभोक्ता म्हणतात "४०-४५ वर्षांपूर्वी आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले लोक, आणि ३-४ वर्षे आपल्या वरिष्ठांशी आणि अमेरिकन कौन्सुलेटशी युद्धे करून, बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स मध्ये कन्वर्ट करून, दहा हजार डॉलर्सचा एक्स्चेंज घेऊन आलेले, ह्या दोघांनाही एकाच पारडीत तोलणे योग्य नाही."

बरोबर आहे, त्यांची एकास एक नग म्हणून (क्वालिटेटिव्ह) तुलना करू नये. पण येथे स्थलांतरित झालेल्या समूहात त्यांचेही स्थान आहे हे विसरू नये. त्यांची अमेरिकेत येण्याची आकांक्षा ही एकाच उद्देशाने प्रेरित झालेली नसली तरी ती किमान एकाच धगीची आहे हे मान्य करायला हरकत नाही. समूहाचा विचार करताना सगळ्या प्रकारच्या नगांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे मला वाटते.

रेवती's picture

4 Nov 2009 - 4:31 pm | रेवती

अगदी हेच लिहायचे असल्याने 'सहमत' एवढेच म्हणते.

रेवती

सुनील's picture

4 Nov 2009 - 10:24 am | सुनील

चांगले परीक्षण. मिभो आणि चित्रा यांचे प्रतिसादही उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

4 Nov 2009 - 10:27 am | ऋषिकेश

विषय रोचक आहे.. परिक्षणही नेटके आणि उत्सुकता वाढवणारे आहे. पुस्तक हातात पडलं तर वाचेनच.. आभार

शेवटी अश्या प्रश्नांची उत्तरे ज्याने त्याने स्वतःच्या प्रायोरिटीजनुसार शोधावीत हे उत्तम

ऋषिकेश
------------------

विजुभाऊ's picture

4 Nov 2009 - 10:28 am | विजुभाऊ

परदेशी जाणारे बहुतेक जण तेथे सर्व्हाईव्ह होण्याच्या धडपडीत असतात. मिळेल ते काम करायची त्यांची तयारी असते.
मला कौतूक वातते ते कॅनडा / न्यूझीलंड येथे स्थाईक होणारांचे.
नोकरीची कसलीही व्यवस्था नसताना ते तेथे जातात धडपड करतात आणि सुस्थितीत येतात.
भारतात इतरत्र रहाणे आणि यूरोप अमेरीकेत रहाणे यात मुख्य फरकाहे तो रंगभेदाचा. भारतात या समस्येला आपल्याला फारसे तोंड द्यावे लागत नाही.
रंगभेद समस्या अमेरीकेत नाहीच मुळी असेही नाही.
इथून गेलेले लोक त्याला तोंड देत असतील तेथे जम बसवतात. हे कौतुकास्पद नाही का?
परदेशी गेलेले लोक तेथे पैसे कमवायलाच गेलेले असतात. बर्‍यापैकी उत्तम जीवन जगायला गेलेले असतात. त्यांची धडपड यशस्वी होते याची असूया एतद्देशियानी का बाळगावी.

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

ज्ञानेश...'s picture

4 Nov 2009 - 10:35 am | ज्ञानेश...

मला वाटते, लोकसत्ता 'चतुरंग' मधेही या पुस्तकाचे परीक्षण आले होते.

वाचले पाहिजे एकदा!

"Great Power Comes With Great Responsibilities"

पक्या's picture

4 Nov 2009 - 12:51 pm | पक्या

पुस्तक ठीकठाक आहे. एवढे काही खास नाहिये.
मागच्या पिढीतील किंवा आपल्या आजोबांच्या पिढीतील लोकांविषयी जास्त लिहीले आहे ...असे लोक की ते आता अमेरिकामध्ये व्यवस्थीत स्थिरस्थावर झाले आहेत. 'फॉर हिअर ऑर टू गो ?' हा प्रश्न सध्या आपल्या सारख्या पिढीतील लोकांना नेहमी भेडसावत असतो त्यां लोकांबद्द्ल, त्यांच्या झगडण्याबद्द्ल , त्यांच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्द्ल लेखिकेने खूपच कमी (किंबहुना नाहिच) लिहिले आहे.
तरी बरंय, लेखिका या दशकातच अमेरिका हिंडली आणि लोकांचे अनुभव गोळा केले. तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही.
पण ४०-४५ वर्षापूर्वी जे लोक अमेरिका मध्ये स्थलांतरीत झाले त्यांच्या अनुभवाविषयी , झगडण्याविषयी वाचायचे असेल तर अवश्य वाचावे.

संदीप चित्रे's picture

4 Nov 2009 - 8:20 pm | संदीप चित्रे

>> तरीही एक मोठा समूह - आयटी आणि आयटी शी संलग्न क्षेत्रातील आताच्या पिढीतले लोक ह्यांच्या अनुभवाविषयी लेखिकेने फारसे काही लिहीलेले नाही.

कारण माझ्या माहितीप्रमाणे हे पुस्तक जे लोक साठच्या दशकात किंवा त्याच्या आसपास प्रामुख्याने अमेरिकेत आले त्या पिढीबद्दल आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Nov 2009 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

प्राजु तै एकदम छान ओळख करुन दिली आहेस ग. तुझे लेखन आधीच सुंदर आहे त्यात अजुन एका सुंदर लेखनाची ओळख करुन दिली आहेस म्हणजे अगदी दुधात साखर वगैरे...

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

अमोल केळकर's picture

4 Nov 2009 - 1:34 pm | अमोल केळकर

मस्त पुस्तक आहे. ओळख करुन दइल्याबद्दल धन्यवाद

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

स्वाती२'s picture

4 Nov 2009 - 6:32 pm | स्वाती२

पुस्तक परिचय आवडला.

संदीप चित्रे's picture

4 Nov 2009 - 8:17 pm | संदीप चित्रे

पुस्तक परिक्षण चांगलं लिहिलं आहेस प्राजु.
एकूण पुस्तक लिहिण्यासाठी अपर्णा वेलणकरांनी बरेच कष्ट घेऊन माहिती गोळा केली आहे. काही अपवादाचे भाग वगळता मलाही पुस्तक आवडलं.

>> त्यांचे झगडे वेगळे, आमचे झगडे वेगळे.
एकदम बरोब्बर बोलालास मिभो ! 'फॉर हिअर्....'मधे आदराने उल्लेख केल्या गेलेल्या आमच्या एका स्नेहींनी मला एग्झॅक्टली हेच वाक्य सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "अरे, आमचे झगडे वेगळे होते. तुमचे झगडे वेगळे आहेत."
---------
योगायोगाने मी 'फॉर हिअर्...'नंतर काही दिवसांत लगेच जे पुस्तक वाचायला घेतलं ते म्हणजे 'सामन्स ऑफ नर्मदा' (Salmons of Narmada). डॉ. भूषण केळकर ह्याने NRI व्यक्तींकडून मागवलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. फक्त फरक इतकाच की इथे NRI म्हणजे Nest Returned Indians ! जे अनिवासी भारतीय काही वर्षे भारताबाहेर राहिले आणि मग काही ना काही कारणाने कायमचे भारतात परतले त्यांनी स्वत:च्या अनुभवांबद्दल लिहिलेले हे लेख आहेत.

माझ्या माहितीप्रमाणे भारतात हे पुस्तक सहज उपलब्ध असावं.

स्थलांतर आणि झगडा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्थलांतर कुठून कुठे होते त्यावर त्या झगड्याचा प्रकार आणि तीव्रता ठरते. शिवाय ते कुठल्या काळात झाले आहे ह्यावरही त्याचे मूल्यमापन करावे लागेल.
वरती मिभो म्हणतात तसे ४०-४५ वर्षांपूर्वी अनेक गोष्टी वेगळ्या होत्या. संधी, स्पर्धा ह्यांची गणितं आजच्या काळापेक्षा वेगळी होती.
गेल्या १५-२० वर्षात इकडे आलेल्या लोकांना चढत्या क्रमाने स्पर्धा, संधींची उपलब्धता, वीसा वगैरे तांत्रिक बाबींचे सतत बदलणारे नियम इ. ना तोंड द्यावे लागले असणार.
सगळ्यांना एकाच पारड्यात मोजणे अयोग्य ठरेल.
मानसिक पातळीवरचा झगडा तर अनिवार्यच असतो.

एकूणच स्थलांतर ह्या विषयाबाबत वेलणकरबाई किती खोल पाण्यात आहेत आणि पुस्तकाचा एकूण वकूब कसा असेल ह्याबद्दल मी साशंक आहे, तरीही चाळून बघायला हरकत नाही.

चतुरंग

मस्तानी's picture

4 Nov 2009 - 10:11 pm | मस्तानी

पुस्तक कदाचित परिपूर्ण नसेलही पण मुळात 'अमेरिका म्हणजे काय बॉ, मज्जाच आहे तुमची' इतकाच विचार करू शकणाऱ्या लोकांना हे वाचून इतका तरी कळेल ना कि इथे आलं म्हणजे सगळं छानच असतं असं नाही. अमेरिकेत काही म्हणता काहीही 'कमी' नाही काही अडचणीच नाही असं विचार करणारे लोक आहेत अजूनही. तेव्हा अशा पुस्तकाचं स्वागतच व्हावं.

"तुमचे झगडे वेगळे ... आमचे वेगळे होते " हेच खरं ! या पुस्तकात काय नाही यावर जी चर्चा चालू आहे त्यातूनच कदाचित ते नसलेलं असेल असं एक पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळेल कुणालातरी :)

प्राजू ताई, हे पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं खरं पण अजून हाती आलं नाहीये ... बर झालं लिहिलंत याबद्दल ते ...

विकास's picture

5 Nov 2009 - 12:54 am | विकास

सर्वप्रथम प्राजूचा लेख आणि पुस्तक परीक्षण नेहमीप्रमाणेच आवडले. पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल. पुस्तक वाचले नसताना त्यावर टिका करणे हे मला पटत नाही म्हणुन खालील स्फूट विचार हे या विषयाशी संबंधीत आहेत इतकेच समजावे. :-)

फॉर हीअर टू गो प्रमाणेच त्याच्या बरेच आधी शोभा चित्रे यांचे "गोठलेल्या वाटा" हे पुस्तक भारतातच असताना वाचनात आले होते. त्यातील सूर हा अनिवासी भारतीयाचा होता हा एक मुख्य फरक. पण "टू गो" चे "हीअर" कसे आणि कधी झाले हे समजले नाही असे त्या लेखिकेचे म्हणणे होते. अमेरिकेसंदर्भात अनेक मराठी लेखकांनी लिहीले आहे. त्यात पुल असतील तसेच वपू पण आहेत ज्यांना खड्डे विरहीत रस्ते पाहून अस्वस्थता आली (आणि बर्फानंतर असे वपूंनी कुठे पाहीले हे खड्ड्यातून गाडी चालवताना आम्हाला अस्वस्थता येते ;) ). अनिल अवचटांच्या अमेरिका पुस्तकातील अमेरिका वाचल्यास अमेरिका म्हणजे शिक्षाच वाटेल. वर संदीपने सांगितलेले सामन्स ऑफ नर्मदा वाचलेले नाही पण तसेच त्याचे मराठी पुस्तक वाचले आहे. पण तो वेगळा विषय होईल म्हणून "टेम्प्टेशन" टाळतो. :) तरी थोडक्यात भारताप्रमाणेच ह्यातील प्रत्येकच लेखन हे एका हत्तीचे सात आंधळ्यांनी केलेले वर्णन वाटते. असो.

असे जेंव्हा विषय येतात तेंव्हा खेड्यातून शहरात रहायला आलेल्या माणसाच्या मनातील (कोरडी?) व्यथा दाखवणारी बा.सी. मर्ढेकरांची "किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो" ही कविता आठवते. या कवितेच्या नायकाला एकीकडे बालपणचे मोकळे रान, नदीमधे डुंबणे वगैरेने गावाची ओढ लागलेली असते. पण आता सवय गेल्याने "आज अंतरात भिती खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी" असे म्हणत शेवटी तो, "बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पार्‍याचा, बरी तोतर्‍या नळाची शिरी धार मुखी ऋचा" असे म्हणत परत कामाला लागतो...

थोडक्यात माणूस लहानपणी घडत असताना जे काही अनुभवतो ते जसजसे कामानिमित्ताने अथवा इतर कशाने दुरावते तेंव्हा ह्याच अवस्थेतून जातो. मग कोणी मुंबईत राहून "आमच्या कोकणातील देवगड मधे..." सांगतो तर कोणी बॉस्टनमधे येऊन, "आमच्या भारतात..." सांगतो :-)

म्हणलं तर यात गैर काहीच नाही. उद्या आमच्या मुलांनी आमच्यामुळे अथवा स्वतःच्या इच्छेने भारतात आली तर त्यांना अमेरिका, बॉस्टन, ह्युस्टन, बे एरीया वगैरे जे काही "मिस" होईल ते त्यांच्या बालपणातील आठवणीमुळे असेल (तसे ही झालेले पाहीले आहे - पहीली पिढी अमेरिकेत आणि दुसरी पिढी कामाने आणि नंतर आवडल्याने भारतात!).

मग अशा पुस्तकांची वर प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे गरज नाहीच आहे का? मला तसे वाटत नाही. कुणाचे उदात्तीकरण होऊ नये या बद्दल मी सहमत आहे पण म्हणून त्यांच्या कथाच येऊ नयेत याच्याशी नाही. किंबहूना मी आत्ताच्या ज्येष्ठ नागरीकांना (घरापासून) सांगायचा प्रयत्न करतोय की तुमचे अनुभव लिहून काढा. अनुभव हे काही केवळ प्रसिद्ध व्यक्तीसच आलेले नसतात. ते प्रत्येकालाच येत असतात. मधे येथेच, चतुरंग ने सावरकरांबद्दल (त्याला भेटलेल्याआजोबांबद्दल) लिहीले अथवा स्वातीदिनेश ने तिच्या सासर्‍यांकडून लिहून घेतले तसेच काहीसे...

------------------

बाकी मिभोच्या तेव्हांचे आणि आत्ताचे संदर्भात:
भारतीय लोंढे (आडनाव नाही!) येण्याच्या सुरवातीच्या काळात अमेरिका ही तसे मर्यादीत भारतीयांपुरतेच स्थलांतराचे स्थान होती. परीणामी अमेरिकेचे सामान्य भारतीयांना अप्रूपही होते आणि तसे अप्रूप वाढवत ठेवणार्‍यांची सगळेच नसले तरी संख्या देखील होती. कालांतराने, विशेष करून ऐंशीच्या शेवटाला आवक वाढत गेली आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीस तर काय भारतीयांचे माथेरान-महाबळेश्वरला जाण्याप्रमाणे अमेरिकेत अथवा इतर प्रगत, प्रगतशील देशात जाणे वाढले. सर्वच घरोघरी अमेरिकेत गेलेला नसला तरी जवळचा कोणीतरी (२, ३ डिग्री सेपरेशनमधेच) कोणीतरी नक्कीच दिसू लागला. थोडक्यात अमेरिकेचे अप्रूप राहीले नाही. शिवाय झगागाटाशिवाय बाकीच्या वास्तवाचे पण दर्शन होऊ लागले.

जाता जात अजून एक ("बापाने कमवलेल्या काळ्या रुपयांना डालर्स...," च्या संदर्भात) : दिडदोन वर्षांपूर्वी मॅनहॅटनच्या एका रेस्टॉरंटमधे एका विशेष कार्यक्रमात एक एकदम उमदा दिसणारा तरूण (२५+) मुलगा भेटला. आम्ही गप्पा मारत होतो. एकीकडे व्यवस्थित बोलत होता तर दुसरीकडे अंगभूत माज दिसत होता. स्वतःची भारतातील श्रीमंती सांगत होता. पण स्वतःच्या नावापेक्षा अधिक (आडनावपण) सांगायचे टाळत होता. नंतर टोकल्यावर कळले की मोठ्या राजकारण्यांच्या जवळचा होताच पण आजोबा हे नको त्या काळ्या अध्यायात देशामधे प्रसिद्ध झालेले असल्याने लपवालपवी चालली होती. पण सर्व माज दाखवत असताना देखील शेवटी तुमच्या-आमच्यासारखे व्हिसाच्या लाईनीतच उभे रहावे लागले आणि इथे न्यूयॉर्कमधे नेटवर्कींगने का होईना पण जॉब शोधत बसावे लागले होते...

पिवळा डांबिस's picture

5 Nov 2009 - 4:12 am | पिवळा डांबिस

परीक्षण वाचून "हे पुस्तक वाचलं पाहिजे!" अशी इच्छा निर्माण झाली....
मला वाटतं यातच या परीक्षणाचे यश आहे....

फारएन्ड's picture

5 Nov 2009 - 6:40 am | फारएन्ड

चांगले लिहीले आहे हे परीक्षण, आवडले. मला पुस्तक ही वाचनीय वाटले.

मुक्तसुनीत's picture

6 Nov 2009 - 10:13 am | मुक्तसुनीत

मिसळभोक्ता's picture

7 Nov 2009 - 12:28 am | मिसळभोक्ता

तरीच.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शक्तिमान's picture

7 Nov 2009 - 3:39 am | शक्तिमान

उत्कृष्ट परिक्षण.. वाचतोच आता...

विसोबा खेचर's picture

7 Nov 2009 - 9:11 am | विसोबा खेचर

उलट आय एम प्राऊड अमेरिकन एण्ड आय रिस्पेक्ट माय इंडीयन रूट्स" असं स्वच्छ सांगणारी कॉन्फ़िडंट वाटली."

अरे वा, छानच! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Nov 2009 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक परिचय आवडला...!
प्रतिसादही माहितीपूर्ण आहेत.

-दिलीप बिरुटे