"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही.
आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे.
मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही. (काय तयारी आहे!) पण बुद्धप्रणीत तत्त्वज्ञानाचे त्यांना आकर्षण असणारच, आणि बुद्ध म्हणजे एक महात्मा, एवढेच काही ते नव्हते. कारण एका कवितेतला हा भाग पहा (इथे स्मरणात आहे तसा लिहिला आहे):
कणा मोडला निश्चलतेचा
ह्या पालीच्या आवाजाने
धम्मं सरणं कुणी बोलले
पाषाणातिल बुद्ध-मिषाने
"पालीचा आवाज" म्हणजे धम्मं सरणं ह्या घोषाचा आवाज, असाही अर्थ लागतो. ही तर खास मर्ढेकरांची श्लिष्ट शैली आहे. त्या अर्थाच्या दृष्टीने "कणा मोडला निश्चलतेचा" ह्याचा वेगळा अर्थ लागतो का? मानायला जागा आहे. "गहकारक! दिठ्ठोसि" ह्या धम्मपदातील प्रसिद्ध उक्तीचा अर्थ काय? घर बांधणा-या (गृहकारका), दिसलास! दिसल्यावर तुझ्या घराचे वासेच मोडले ("सब्बा ते फासुका भग्गा"). पुन्हा बांधू शकणार नाहीस.
बोधीचा विजयी अनुभव पालीभाषेत असा सांगितला गेला. साधर्म्य स्पष्ट आहे. "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, असा अर्थ ह्यातून निघतो.
ह्यात मूळ कवितेबद्दल काहीच आले नाही. पण विचार सुरू करायला एवढे पुरे आहे. शेवटी अर्थ लागेलच ह्याची शाश्वती नाही. थोडाफार लागला तर तो पुढील भागात.
प्रतिक्रिया
23 Sep 2007 - 9:48 am | व्यंकट
"निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना असे मर्ढेकरांनी का म्हटले असेल?
ब्रम्ह निश्चल आहे का? की चल आहे? की चल + निश्चल मिळून आहे? की सर्वम खल्विदं ब्रम्ह आहे?
23 Sep 2007 - 10:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण दिलेल्या कवितेचा अर्थ आम्हाला सांगता येणार नाही आणि आम्ही ती कविता वाचलेली नाही पण मर्ढेकरांच्या बाबतीत ते इंग्लंडला जाऊन येईपर्यंत रविकिरण मंडळाच्या स्वप्नाळू आणि रोमॆंटीक कविता श्रेष्ठ होत्या मात्र इलियेट,ऒडेन आणि काही इतर पाश्चिमात्य कविंचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांची कविता जमिनीवर उतरुन चालू लागली, असे म्हणतात. नवे वास्तव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या दुष्पपरिणामुळे वैयक्तिक जीवनात येणारे दैन्य,लाचारी,स्वार्थ, ढोंग त्याचबरोबर आलेली यांत्रिकता,महायुद्धांचे परिणाम यांच्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून उपरोधाने,उपहासाने,तिरस्काराने आणि कारुण्याने त्यांची कविता मानवतेची बनली इतकेच आम्हाला माहित आहे.बुद्धांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता का ? या बद्दल आमचे फारसे वाचन नाही.
बाकी "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, याचा विचार आम्हाला तरी तेव्हाच्या काळाच्या दृष्टीने अप्रस्तुत वाटतो ! (प्रतिसादाचा सूर हलकेच घ्या असा आहे.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
27 Jun 2017 - 4:32 pm | धर्मराजमुटके
पुढचा भाग शोधून देता काय प्लीज ?