नेदरलँड्सची सफर - १
या सफरीचे वर्णन इतर भटकंती सारखे नसून सामान्य माणसाला, जो कधीही भारताच्या बाहेर गेलेला नाही त्याला उपयोगी पडावी या हेतूने लिहिलेले आहे. शिवाय केवळ प्रेक्षणीय स्थळे कोणती आणि काय आहेत एवढे न करता त्या देशातील नागरिकांचे जीवन कसे आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. युरोपातील प्रेक्षणीय स्थळे आणि निसर्गसौंदर्य यावर अनेक लेखकांनी उत्तमोत्तम लेख लिहिलेले आहेत/ असतील. मी असे कोणतेही वर्णन न करता फक्त घेतलेल्या फोटोद्वारे हे निसर्गसौंदर्य आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
ट्युलिप्स
या सफारीची सुरुवात अशी झाली --
म्हणजे असं कि आमच्या लग्नाला मागच्या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली तेंव्हा मला बायकोला घेऊन स्वित्झर्लंड ला जायचे होते. परंतु ऑक्टॉबरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये भयंकर थंडी असते असे वाजल्याने बायकोने चक्क नकाराधिकार( व्हेटो) वापरला. मग आम्ही आपले कोडाईकॅनालला तीन दिवस जाऊन आलो. त्यानंतर उन्हाळ्यात स्वित्झर्लंडला जायचे का असा विचार चालू असताना क्यूकेनहॉफ येथे असणारा ट्युलिपच्या फुलांचा फुलोरा याची माहिती समोर आली. हा फुलोरा पाहायचा हे आमच्या यादीत असल्याने तेथे जायचा विचार चालू झाला. त्यात आमच्या बायकोचा चुलतभाऊ ऍमस्टरडॅम मध्ये सध्या असतो हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा समोर आला. त्यात मध्येच त्याची परत भारतात यायची हूल उठली त्यामुळे आरक्षण करण्यात थोडा उशीर झाला.
त्याचे भारतात यायचे रद्द झाल्यामुळे वास्तव्य त्याच्या घरीच होते. हे त्याच्या घरातून काढलेले खालच्या रस्त्याचे फोटो
परंतु ट्युलिपच्या फुलांचा फुलोरा हा १३ मे पर्यन्तच असतो म्हणून मी विमानाचे आरक्षण करून टाकले. जेट आणि इतिहाद यांचे कोड शेअरिंग असलेले आरक्षण केले. यात अबूधाबीला विमान बदलायचे होते त्यात २ तास वेळ जाणार होता. परंतु थेट ९ तास प्रवास असलेले जेटच्या विमानाचे तिकीट दोघांसाठी ८७ हजार होते तर दोन तासाच्या विश्रामानंतर जाणाऱ्या या विमानाचा दर होता ५४ हजार रुपये. मध्यमवर्गीय माणसाला ३३ हजार रुपये खूप जास्त असतात.
यानंतर व्हिसा साठी अर्ज करण्यात आला. व्ही एफ एस इंटर नॅशनल हि कंपनी बऱ्याच देशांच्या व्हिसाचे काम करते तिचे कार्यालय लोअर परेल आणि महालक्ष्मी च्या मध्ये आहे. जेंव्हा जालावर पाहिले तेंव्हा त्यांनी लिहिले होते कि व्हिसा मिळण्यास १० दिवस लागतील. मला ३२ दिवसांचा अवधी होता म्हणजे मी ५ एप्रिल ची वेळ घेतली होती आणि तिकीट ७ मे चे होते म्हणून मी निःशंक होतो. ज्या दिवशी जायचे होते त्या दिवशी परत जालावर पहिले तर तेथे लिहिले होते कि व्हिसा साठी २१ दिवस लागतील. तरीही वेळ आहे म्हणून मी शांत होतो.
एके दिवशी सकाळी साडे नऊची वेळ घेतली. तेथे सर्व कागदपत्रे नेऊन दिली. कोणताही एजंट किंवा काहीही जास्त न त्रास होता दुपारी एक वाजता हाताचे ठसे पासून सर्व सोपस्कार करून परत आलो. आपलं व्हिसा कुठवर आला आहे हे आपल्याला जाला वर पाहण्याची सोया आहे आणि ८५ रुपये भरले तर आपला व्हिसा कुठे आहे याचा आपल्याला एस एम एस येतो.
साधारण २५ एप्रिल पर्यंत व्हिसा चा कोणताही एस एम एस आला नाही. म्हणून जालावर गेलो तर आता व्हिसा ला ३० दिवस लागतील असे लिहिलेले आढळले. मला संतापच आला. मी व्ही एफ एस इंटर नॅशनलला इ मेल टाकली कि तुम्ही सारखी तारीख कशी बदलत आहात? हा अप्रामाणिकपणा आहे. याची कॉपी नेदरलँड्सच्या वकिलाला (AMBASSADOR) ला पाठवून दिली.
लगेच दुसऱ्याच दिवशी (२६ एप्रिल ला) तुमचा व्हिसा दिल्लीच्या व्ही एफ एस इंटर नॅशनल कार्यालयात पाठवला आहे म्हणून एस एम एस आला आणि)तिसऱ्या दिवशी तुमचा व्हिसा मुंबईत आला आहे तेंव्हा आपला पास पोर्ट दाखवून व्हिसा घेऊन जा म्हणून एस एम एस आला.
तात्पर्य -- व्हिसा साठी काम दोन महिने अगोदरच सुरु करावे. आता व्ही एफ एस इंटर नॅशनल व्हिसा घरपोचपण देता अशी जाहिरात वृत्तपत्रात पाहिली.
यानंतर तेथे जाण्यासाठी पैसे-- म्हणून मी थॉमस कुक आणि ऍक्सिस बँक यांची प्रत्येकी ५०० युरोची प्रीपेड डेबिट कार्डे घेतली. हि कार्डे स्वस्त पडतात म्हणजे यात युरो मला ८० रुपये ५० पैशाला पडला तोच एच डी एफ सी बँकेच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डासाठी ८३. ३० पैसे पडला.( या कार्डावर कुठूनही नेट बँकिंगने पैसे भरता येतात). शिवाय ऍक्सिस बँकेकडून १०० युरो रोखही घेतले.
जालावर कोणत्याही देशाची इत्यंभूत माहिती आहे. ती आपण स्वतः वाचावी. कारण लोकांनी सांगितलेली माहिती बदलू शकते आणि कालबाह्य झालेली असू शकते.
विमानाचे तिकीट काढताना एक चूक झाली होती. ती म्हणजे माझ्या नावाचे स्पेलिंग SUBODH ऐवजी SUBDH असे टाकले गेले होते. मी याच्या कडे दुर्लक्ष केले होते परंतु तीन दिवस अगोदर मला मित्राकडुन कळले कि असे चालत नाही. इमिग्रेशन अधिकारी जर असून बसला तर तुझी सहल रद्द होईल. यावर मी क्लिअर ट्रिप या जालावरील कंपनी जेथून आरक्षण केले होते त्यांना संपर्क केला. त्यावर त्यांनी हात वर करून सांगितले कि तुम्ही जेट एअरवेज कडे संपर्क करा. जेट एअरवेजच्या सांगितले कि आम्ही काही करू शकत नाही तुम्ही क्लिअरट्रीप कडे जा. या प्रकरणात कोणीही काहीही मदत करण्यास राजी दिसले नाहीत. मग मी टरकलो. मी आमच्या हवाई वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या नातेवाईकांमध्ये विचारणा सुरु केली की असे झाल्यास काय होते. त्यांनी असे सांगितले कि इमिग्रेशनच्या माणसाच्या मर्जीवर अवलंबून आहे. या मध्ये माझ्या पुतणीच्या नवऱ्याने सांगितले कि त्याचा एक मित्र जेट एअरवेज मध्ये आहे. (श्री अमर पेठे) त्यांच्याशी आम्ही संपर्क केला त्यांनी सर्व मदतीचे आश्वासन दिले. यात मुंबई ते अबूधाबीचे तिकीट जेटचे होते. त्याचे काम लगेच झाले आणि पुढचे तिकीट इतिहाद चे होते त्यांचे कार्यालय शनिवारी बंद त्यामुळे काम रविवारीच होईल रविवारी रात्री/ सोमवारी पहाटे ५ चे विमान होते. परंतु श्री अमर पेठे यांच्या मदतीने रविवारी दुपारी १ वाजता नावातील बदल करून मिळाला आणि एकदाचे हुश्श झाले. असा मानसिक तणाव होणे अजिबात चांगले नाही. (माझ्या नातेवाईकाचे एकदा नाव श्री ऐवजी कुमारी झाले होते तेसुद्धा श्री अमर पेठे यानि बदलून दिले होते.)
तात्पर्य -- विमानाचे तिकीट आरक्षित करताना आपल्या पासपोर्ट वर असेल तसेच्या तसे तंतोतंत नाव टाका. अन्यथा फार कटकट आणि मानसीक तणाव होऊ शकतो.
ट्युलिप्स
वोंडेल पार्क -- हे अॅमस्टरडॅम च्या संग्रहालयांच्या जवळ असलेले एक सुंदर उद्यान आहे.
फोटो निकॉन D ३३०० या कॅमेऱ्याने काढलेले आहेत. जवळचे फोटो पोर्ट्रेट मोड वर काढले आहेत आणि लांबचे ऑटो मोड वर
प्रतिक्रिया
26 May 2018 - 7:22 pm | कंजूस
फोटो कचकून चांगले आले आहेत.
कुठे कुणाशी ओळख नसेल तर एकूण स्वत: सहल आखणे कठीणच वाटतय.
26 May 2018 - 7:30 pm | एस
फोटो दिसले नाहीत. परंतु सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून आखलेला प्रवास व दिलेली माहिती छान वाटली. पुभाप्र.
26 May 2018 - 8:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
आंतरराष्ट्रिय प्रवास तसा सोपा व सुलभ झाला आहे. पण, तेथे आपल्या सवयीप्रमाणे "चलता है" करता येत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये (नावे, वेळ जागा, इ) अचूकपणाची अट पाळली तर मात्र समस्या येण्याची शक्यता फार कमी असते... किमान विकसित देशांमध्ये तरी. तुमचा अनुभव हेच अधोरेखीत करत आहे. ही खूणगाठ सर्व वाचकांसाठी खूपच फायद्याची आहे.
फोटो दिसत नाहीत. बहुतेक अॅक्सेस-परमिशन्सची समस्या असावी.
26 May 2018 - 8:27 pm | टवाळ कार्टा
माझा गणेशा झालाय
26 May 2018 - 8:56 pm | कंजूस
मलाही आता फोटो दिसत नाहीत.
ब्लॅागरवर पुढचा लेख आणि फोटो टाका. तिथल्या फोटोंच्या लिंक्स इतरांनाही काढता येतात. ब्लॅाग पब्लिश केलेला असल्याने अॅक्सेस पब्लिकच असतो.
26 May 2018 - 9:04 pm | सुबोध खरे
हायला
मला तर फोटो दिसतायत
काय गडबड आहे?
26 May 2018 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही जर गुगल+/गुगलफोटो/जीमेलवर लॉगइन केलेले असेल तर तुम्हाला अॅक्सेस असल्याने (तुमचेच फोटो असल्याने) फोटो दिसू शकतात.
या सर्वांतून लॉगआऊट झाल्यावर "पब्लिक अॅक्सेस" नसलेले फोटो तुम्हालाही दिसणार नाहीत.
26 May 2018 - 9:27 pm | चामुंडराय
फोटू मोबल्यावर दिसताहेत परंतु मांडीवरल्यावर (गुगल क्रोम) नाही दिसत.
26 May 2018 - 9:27 pm | चामुंडराय
फोटू मोबल्यावर दिसताहेत परंतु मांडीवरल्यावर (गुगल क्रोम) नाही दिसत.
26 May 2018 - 9:59 pm | रविकिरण फडके
काही लोकांना फोटो दिसताहेत, काहींना नाही. मी दुसऱ्या गटात मोडतो. तद्न्य लोकांनी याबाबत मार्गदर्शन करावे, की काय केले असता हा प्रश्न सुटेल.
(मी लॅपटॉप वापरतो, DELL चा.)
26 May 2018 - 10:08 pm | यशोधरा
लेख आवडला. फोटो दिसत नाहीयेत. मोबाईलवरून सुद्धा.
27 May 2018 - 1:54 am | गवि
गणेशा..
27 May 2018 - 6:28 am | कंजूस
फोटो विंडोज फोनवरून काल पहिल्या प्रतिसादाच्यावेळी दिसलेले. नंतर गायब.
आता सकाळी विंडोज फोनात दिसत नाही म्हणून अँड्रॉइड फोनात क्रोम ब्राउजरवर पाहिले तर दिसताहेत.
Google चाच प्राब्लेम आहे.
Blogger वर लेख/फोटो टाका आणि तिथे पुन्हा फोटो अपलोड करून त्या लिंक्स या लेखात बदला हे सुचवतो.
27 May 2018 - 7:59 am | भंकस बाबा
वाचायला आवडेल.
फोटो दिसत नाही आहे.
सुरुवात तर झकास आहे, हाच टेम्पो पुढे ठेवा, ही धमकी नाही, विनंती आहे.
तुमचा पंखा
27 May 2018 - 8:00 am | भंकस बाबा
वाचायला आवडेल.
फोटो दिसत नाही आहे.
सुरुवात तर झकास आहे, हाच टेम्पो पुढे ठेवा, ही धमकी नाही, विनंती आहे.
तुमचा पंखा
27 May 2018 - 8:38 am | कंजूस
फोटो इथे पाहा.
( डाइनलोड केलेले, कमी रेझलुशनचे दिसतील.)
फोटो (५)
लिंक:http://jmp.sh/5bDkrfR
27 May 2018 - 11:20 am | सुबोध खरे
धन्यवाद
मला डेस्क टॉप वर दिसत आहेत पण भ्रमणध्वनीवर दिसत नाहीत. काय गडबड आहे ते कळत नाहीये.
फोटो नसतील तर लेखात फारसं काहीच उरत नाही.
पुढच्या लेखासाठी काय करावे म्हणजे फोटो दिसू शकतील? सगळे फोटो गुगल फोटो वर अपलोड केलेले आहेत. कोणी मदत करू शकेल का?
27 May 2018 - 12:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
व्यनि केला आहे.
27 May 2018 - 1:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर चित्रे टाकण्याची कृती हा लेखही उपयोगी ठरेल.
27 May 2018 - 12:56 pm | कंजूस
ते गुगल फोटो प्रकरण बय्राचदा त्रास देतं. ते सोडा.
तुमचा जीमेल आहेच तर ब्लॅागर चालू करून त्यात हे फोटो डिस्कवरून पुन्हा अपलोड करा आणि त्यातून लिंक्स काढा. त्या लिंक्स इथे लेखातल्या गुगल_फोटोच्या लिंकस काढून डकवा. झाले काम. भटकंती लेखात स्वसंपादन असल्याने तुम्हालाही करता येईल. प्रतिसादात टाकल्यासही चालेल.
महत्त्वाचे - img width = "640" पेक्षा अधिक नको. (आडव्या फोटोकरता),
Img width ="480" पेक्षा अधिक नको उभ्या पोर्ट्रेट। फोटोंसाठी.
27 May 2018 - 12:07 pm | सोमनाथ खांदवे
कंजूस सायेब ,
लै हूर हूर लागली व्हती फोटू बगन्या ची .या पुण्याच्या कडक उन्हाळ्यात त्ये फोटू बघून लै बर वाटलं .
खरे सायेब ,
आमी वाट बगतुया पुढच्या फोटू आणि ल्येखा ची .
27 May 2018 - 9:06 am | प्रमोद देर्देकर
तरीच म्हटलं खरे साहेब मिपा वरून गायब कसे ?
सफरीच वर्णन छान पण फोटो मात्र अजूनही दिसत नाहीत . पण कंजुष काकांनी दिलेल्या लिंकमध्ये दिसत आहेत.
27 May 2018 - 7:03 pm | पैसा
छान सुरुवात!
27 May 2018 - 8:28 pm | Nitin Palkar
नेहमी प्रमाणेच सुंदर वर्णन! कन्जुस्रावांनी दिलेल्या सांध्यावर फोटू बघितले.
28 May 2018 - 10:50 am | अनिंद्य
सुंदर फोटो !
28 May 2018 - 11:25 am | सस्नेह
नयनरम्य फोटो !
पुभाप्र
28 May 2018 - 11:56 am | कंजूस
आता आले लेखातले फोटो.
28 May 2018 - 12:45 pm | गवि
नेदरलँड म्हणजे शेंगेन व्हिसा. तो व्हिसा सेपरेटली येणे आणि तुम्ही पासपोर्ट दाखवून तो घेऊन जाणे ही पद्धत पहिल्यांदाच ऐकली.
28 May 2018 - 1:08 pm | सुबोध खरे
क्षमस्व.
चूक झाली.
पासपोर्ट त्यांच्या कडे दिल्लीला गेला होता त्यावरच व्हिसा छापून आला
आपले ओळखपत्र (म्हणजे पॅन कार्ड/आधार) दाखवून पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन जा असा sms आला होता.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
28 May 2018 - 1:53 pm | गवि
नाही नाही. चूक नव्हती दाखवायची. मला वाटलं खरंच अशी सोपी / लो रिस्क पद्धत उपलब्ध झाली असेल.
28 May 2018 - 1:15 pm | मोदक
झक्कास.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!
28 May 2018 - 4:13 pm | माझीही शॅम्पेन
डॉक , भन्नाट सुरूवात , नेहमी प्रमाणे रंगणार ह्याची खात्री आहे , पु ले शु
28 May 2018 - 5:43 pm | सुबोध खरे
सगळे फोटो जसे आहेत तसेच टाकले आहेत/ टाकले जातील. त्यावर कोणतेही संस्करण(post processing/ enhancement) नाही.
ट्युलिप मुळातच इतके सुंदर दिसतात कि त्यावर अधिक संस्कारांची गरजच नाही.
28 May 2018 - 9:39 pm | शिव कन्या
हा माझा आवडता देश. कधी संधी मिळाली तर उधर जाके रहने का हैं.. :)))
प्रवासाच्या टप्प्यातले बारकावे फार महत्वाचे. उत्तम लेख.
29 May 2018 - 3:55 am | चामुंडराय
सुरेख
अतिशय सुंदर फोटो !
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
ट्यूलिप व्यतिरिक्त ऍमस्टरडॅम इतरही गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे :).
29 May 2018 - 4:20 am | निशाचर
छान सुरुवात! फोटोही आवडले. नेदरलँड्सला जायचा योग येईल तेव्हा येईल. तोपर्यंत व्हर्च्युअल भटकंती करून घेऊ.
29 May 2018 - 6:37 am | कंजूस
**देशातील नागरिकांचे जीवन कसे आहे याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न आहे. **
तिथली इकनॅामी, लोकांचे - विद्यार्थ्यांचे जीवन वगैरे?
29 May 2018 - 3:55 pm | नाखु
पांढरपेशा माणसाला ही मालिका पर्वणी ठरणार असं दिसतंय,आणि मला चक्क सगळी छायाचित्रे दिसतायत.
अच्छे दिनवर विश्वास असलेला नाखु पिटातल्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी
19 Jun 2018 - 11:24 pm | राधासुत
फोटो मस्तच. लेन्स कोणकोणत्या वापरल्या ते ही कृपया सांगा.
शिकायला मिळेल.