सिनेमागृहातल्या अंधाराच समाजशास्त्र आणि मानसशास्त्र

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
16 May 2018 - 3:42 pm

'गुलाबजाम ' मधली राधा आगरकर जेंव्हा जेंव्हा vulnerable असते तेंव्हा तेंव्हा चित्रपटगृहात जाऊन बसत असते . तिला रणबीर कपूर आवडत असतो हे एक कारण झालंच . पण माझा असा अंदाज आहे की सिनेमागृहातला तो विशिष्ट अंधार तिला comforting वाटत असणार नक्कीच . तो अंधार तिला काही तासांपुरता का होईना तिच्या वेदना पुरून टाकण्यास मदत करत असणार . थियेटरमधला अंधार ही प्रचंड टेम्पटिंग गोष्ट असते . अंधाराच्या पण जातकुळी असतात . माजघरातला अंधार , दिवे गेल्यावर होणारा अंधार , निर्मनुष्य शेतातला अंधार ह्या सगळ्या अंधाराच्या जातकुळी वेगवेगळ्या आहेत . अंधार हा बहुतेकवेळा भयानक आणि काहीवेळा प्रचंड सुंदर असतो . पण सिनेमा थियेटरमधला अंधार हा टेम्पटिंग आणि comforting असतो . कधीच खुश नसणारा बॉस , घरातल्या कटकटी , आपण खूप काही बनण्याची पाहिलेली आणि पूर्ण न झालेली स्वप्न या सगळ्यांचा विसर पाडण्याचं सामर्थ्य चित्रपटगृहातल्या अंधारामध्ये असतं .हा अंधार थोडा ओलसर असतो .त्या अंधारामध्ये अनेक सुंदर गोष्टी घडतात . आजूबाजूच्या चकचकाटी , कर्कश आणि उत्साही मैफली रंगवण्यात तरबेज झालेल्या जगापासून इथं काहीवेळापुरता का होईना ब्रेक मिळतो . सिनेमा हा पलायनवादी असतो असं एक विधान अनेकदा केलं जातं . ते बऱ्याच प्रमाणात खरं आहे . पण सिनेमाला पलायनवादी हे विशेषण मिळण्यामागे सिनेमातल्या कंटेंटनंतर हा अंधार पण कारणीभूत असणार . सिनेमा आणि अंधार हे कॉम्बिनेशन भारी आहे . पडद्यावर चालणारे visuals , ऐकू येणारं संगीत हे तुम्हाला शंभर टक्के बधिर पण होऊ देत नाही . तुम्ही हा अंधार आणि पडद्याचा फिकट प्रकाश एकाचवेळेला एन्जॉय करू शकता . थिएटरमध्ये एकाचवेळा काहीशे लोक उपस्थित असतात . तरी पण हा अंधार तुमचाच असतो . तो थिएटरमध्ये हजर असलेल्या शेकडो अपरिचित लोकांसोबत वाटून घेण्याची गरज नसते . सिनेमागृहातल्या अंधाराची पण एक sociology असतेच पण ह्या अंधारातलं सौंदर्य हे वैश्विक आणि त्याचवेळेस सगळ्यांसाठी एकसारखंच असतं . म्हणजे आमच्या परभणीमधल्या मोडकळीला आलेल्या फिरोज टाकीमधला अंधार , पीव्हीआर मधला महागडा अंधार , NFAI सारख्या जागांमधला अंधार हे एकसारखेच असतात . हा अंधार आर्थिक -सामाजिक -जातीय -धार्मिक भेद करत नाही . या ठिकाणी सिनेमा बघणाऱ्या लोकांचे समूह -वर्ग वेगवेगळे असतील पण हा अंधार सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो . माझा एक रूम पार्टनर होता . प्रचंड हळवा .काहीसा अस्थिर .तो त्याच्या जीवाचं काही बर वाईट करेल अशी भीती त्याच्या आईवडिलांपासून ते आमच्या घरमालकांपर्यंत सगळ्यांना वाटायची . त्यानं असं काही करू नये याची जबाबदारी त्या सगळ्यांनी माझ्यावर टाकली होती . तो असाच थियेटरमधल्या अंधारात स्वतःला बुडवून टाकायचा . त्यावेळेस इम्रान हाश्मीचा 'जहर ' नावाचा सिनेमा आला होता . या पठ्ठ्याने सलग आठ दिवस तो सिनेमा थेटरात जाऊन पाहिला होता . तो मला सांगायचा की थेट्रातल्या अंधारात त्याला जितकं सुरक्षित वाटतं तितकं चार लोकांमध्ये वाटत नाही . त्याने सगळ्यांना भीती वाटायची तसं जीवाचं बर वाईट काही केलं नाही याचं मोठं श्रेय या अंधाराला आहे . वर्षानुवर्षे हा अंधार कित्येक जीव वाचवत आला असेल . कोण हिशेब ठेवतंय ? सिनेमात काम करणाऱ्या लोकांना तरी या अंधाराचं महत्व किती कळलंय याबद्दल शंका आहेत .थेटरातल्या या अंधाराचं खोलवर मानसिक विश्लेषण होण्याची गरज आहे . हा अंधार सायकॉलॉजिकल थेरेपी म्हणून वापरता येऊ शकतो अनेकांसाठी . ट्रॅव्हलसमध्ये किंवा रेल्वेमध्ये खिडकीजवळ बसून बाहेरचा अंधार निरखून बघत बसणे हा थोडा याच्या जवळ जाणारा प्रकार . अंधार हा शब्द आपल्याकडे नकारात्मक अर्थाने वापरला जातो . अंधार म्हणजे एखाद्या गोष्टीचं संपून जाणं , सुष्ट शक्तीचं संपून जाण असा अर्थ घेतला जातो . पण थेटर /टाकी / टॉकीज मधला अंधार खऱ्या आयुष्यात अनेक लोकांना आधार /आशा /बळ देत आला आहे . थेटरात सिनेमा संपतो . लाईट लागतात . काही वेळ तो प्रकाश डोळ्यांना खुपतो . पण डोळे सरावल्यावर , थेटरातल्या अंधाराने मागचे काही वेळ दिलेला आनंद या त्रासापेक्षा मोठा आहे याची जाणीव होते . बाहेर पडतो तेंव्हा फिकट हसू असतं चेहऱ्यावर .राधा आगरकर जेंव्हा शेवटच्या प्रसंगात सिनेमागृहातून बाहेर पडते , तेंव्हा कॅमेऱ्यात बघून अगदी लख्ख हसते त्या जातकुळीतलं हे हसू असत . आय लौ अंधार .

कलाविचार

प्रतिक्रिया

लई भारी's picture

16 May 2018 - 4:46 pm | लई भारी

कधी विचार नव्हता केला असा, पण आपल्या मतांशी बहुतांशी सहमत! :)
पिच्चर आणि टॉकीजच प्रचंड आकर्षण आहेच; त्यामुळेच घरी चित्रपट बघायला मजा नाही येत त्यात हे पण एक कारण असावं.

कुमार१'s picture

16 May 2018 - 5:27 pm | कुमार१

त्यामुळेच घरी चित्रपट बघायला मजा नाही येत >>> + १

पद्मावति's picture

16 May 2018 - 7:55 pm | पद्मावति

मला सुद्धा खूप आवडतो थिएटर मधला अंधार. आधी जाहिराती, ट्रेलर्स सुरु असतांना मंद प्रकाश असतो त्यानंतर लाईट्स बंद होतात आणि स्क्रीन वर मूवी सुरु होणार अशी सूचना येते ते काही सेकन्डस बेस्ट असतात. मी तर क्षणभर डोळे मिटून घेते, खोल श्वास घेते एकदम शांत शांत वाटतं. Therepeutic आहे ते अक्षरश: एक प्रकारची मेंटल व्हेकेशन. लेख मस्तं.

चांगलाच उजेड पाडलात. अंधाराचं शास्त्र यावर विश्वास बसू लागलाय. म्हणजे कधी अंधाराचे जाळे फिटु नये असावे .

शाली's picture

16 May 2018 - 8:47 pm | शाली

वेगळा विचार!

उगा काहितरीच's picture

16 May 2018 - 9:22 pm | उगा काहितरीच

लेख आवडला . काहीसा पटलापण ! बस ते पॕरा पाडून लिहा , अजून वाचनेबल होईल .

अत्रन्गि पाउस's picture

17 May 2018 - 8:11 am | अत्रन्गि पाउस

अतिशय संवेदनशील मनच हे इतक उत्कट लिहू शकते

ब्राव्हो ...

manguu@mail.com's picture

17 May 2018 - 9:45 am | manguu@mail.com

डबल ड्यूटया असल्या की अंधार पाहायला मिळत नाही , म्हणून मी घरात 1-2 तास कॉटखाली झोपतो

जव्हेरगंज's picture

17 May 2018 - 1:20 pm | जव्हेरगंज

कडक लेख!!!

अतिमहाप्रचंड आवडले

+१

सिरुसेरि's picture

17 May 2018 - 1:41 pm | सिरुसेरि

छान लेख . थिएटरमधील अंधारात सिनेमा पाहणे हा एक उत्तम stress buster आहे .

जेम्स वांड's picture

17 May 2018 - 1:58 pm | जेम्स वांड

कसलं भारी वाटलं वाचून, एक नंबर!

गामा पैलवान's picture

17 May 2018 - 5:40 pm | गामा पैलवान

पिंपातला उंदीर,

वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल आभार! :-)

मला वाटतं की अंधार हा आईच्या गर्भातल्या सुरक्षेचं प्रतीक असावा.

आ.न.,
-गा.पै.

भुजंगराव's picture

18 May 2018 - 8:37 am | भुजंगराव

तुमच्या लेखातुन अंधारातील आधारित बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला , जुन्या आठवणी जाग्या झाल्या , आता मात्र फिरोज बंद पडलेत ...............

श्वेता२४'s picture

17 May 2018 - 6:18 pm | श्वेता२४

थेटरातल्या या अंधाराचं खोलवर मानसिक विश्लेषण होण्याची गरज आहे . हा अंधार सायकॉलॉजिकल थेरेपी म्हणून वापरता येऊ शकतो अनेकांसाठी
हे पटलं एकदम

सुधीर कांदळकर's picture

18 May 2018 - 9:43 am | सुधीर कांदळकर

लेख. माझ्या मते हा अंधार हा सोबत काही सवंगडी घेतलेला चमू असतो. ऊंच छत, वातानुकूलनातून सोडलेला गंध, भिंतीवरची चित्रे, म्यूरल्स, आणि चित्रपटाअगोदर पडदा दूर होण्यापूर्वी वाजणारे मधुर संगीत हे ते मुख्य सवंगडी.

भटक्या टोळ्यांच्या अवस्थेतून गाव वसवून स्थायिक होतांना मोकळ्या आभाळाखालून बंदिस्त छताखाली माणूस आला आणि त्याची वागणूक बदलली. कशी ते ’द ह्यूमन झू’ या पुस्तकात छान सांगितले आहे. लेखक आता आठवत नाही. वीसेक वर्षांपूर्वी वाचले होते ते पुस्तक. कमी उंचीचे छत अपुर्‍या प्रकाशात अंगावर येते आणि भिती वाटते. गुहेत अशीच भिती वाटते. उंच छताखाली सुरक्षितता आणि शांततेचा अनुभव येतो. म्हणून प्रार्थनास्थळे उंच छताची असतात. त्यामुळे उंच छत हा एक चित्रपटगृहातल्या शांततेचा मोठा सहगुणक आहे. हे बहुधा माधव आचवल यांच्या किमया या पुस्तकात वाचल्यासारखे धूसर आठवते.

चित्रपटगृहात आपण प्रथम जातो तेव्हाच्या मधुर आठवणींचा तिथले अंधारमिश्रित वातावरण हा एक ट्रिगर पॉईंट - चेतगुणक असू शकतो. पहिला चित्रपट पाहतांना आलेला कुतूहलमिश्रित अनुभवावेळची उत्तेजित मनोवस्था कोणताही चित्रपट पाहण्यापूर्वी पुन्हा प्रत्ययास येत असावी. अर्थात हे सारे माझे माझे विश्लेषण. मी काही मानसशास्त्रज्ञ नाही. त्यामुळे ते चुकीचे देखील असू शकते.

ते काही असो. लेख फारच सुंदर आणि काहीतरी नवे देणारा, आवडला. धन्यवाद.

मला रात्रीचा प्रवास करायला खूप आवडतो, गाडीतून बाहेर दिसणारा अंधार आणि त्यात झाडांचे दिसणारे वेग-वेगळे आकार. एरवी नाही आवडत पण, भुताचे बघितलेले सगळे सिनेमे आठवायला लागतात :P. लेख छान

सचिन काळे's picture

18 May 2018 - 1:51 pm | सचिन काळे

छान लेख! अंधाराविषयी एक नवीन दृष्टिकोन समजला.

@ सुधीर कांदळकर, >>> +१

उंच छताखाली सुरक्षितता आणि शांततेचा अनुभव येतो.>>>>+ १

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2018 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थेट्रातला अंधार सर्व विसरायला लावतो. तरुणपणी चित्रपटातला अंधार फायद्याचा होता. साला लोक गार्डनमधे बसू देत नसायचे, तेव्हा चित्रपटातल्या अंधाराचा फायदा होता. सर्व सुख दुःखाच्या गोष्टी बोलायला ही एक हक्काची जागा होती. चित्रपट कमी लक्षात राहिले पण अंधाराच्या खूप आठवणी आहेत. चावटपणा सोडून दया, पण दोन तीन तास नुस्तं हातात हात घेऊन बसण्याचा अंधारातला आनंद काय अवर्णनीय अनुभव होता. माय गॉड, विचारु नका.

बाकी अंधाराचे मानसशास्त्र असलंच पाहिजे. मला कोणी पाहात नाही, माझी कोनाशी ओळख नाही, मी कोणाला ओलखत नाही. मी मोकळा आहे. मी या अंधारातला सम्राट आहे. अंधार नुसता अंधार नसतो तर कोणी तरी पंखाखाली घेतल्याचा सुरक्षित फिलही असतो. न्यूनगंड असणा-यांना अंधार त्यांचा तो गंड दूर करतो असेही वाटते.

वर कोणी तरी लिहिलय तसं मलाही लहानपणापासून अंधार आवडला आहे. कुटुंब मोठं आणि जागा अपुरेच्या काळात पलंगाखाली बेडशीट तिन्हीबाजूंनी खाली ओढल्या की एक छोटीशी रुम असल्यासारखे वाटायचे आणि अंधार झाली की तिथे गाढ़ झोप यायची. आजही कितीही स्टार हॉटेल असू दे की घरी असू दे, झोपायला गडद अंधारच लागतो. कसलं सुख देतो हा अंधार माहिती नाही. रॉय किणीकरांचा अंधार बघा--

''काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ''

-दिलीप बिरुटे
(अंधार यात्री)

हा महाल कसला, रानझाडी ही दाट
अंधार रातीचा कुठं दिसना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी
सख्या रे घायाळ मी हरीणी

काजळ काळी गर्द रात अन कंपकंप अंगात
सळसळणार्या पानांना, ही रातकिडयांची साथ
कुठे लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावूनी

हा झाला खेबूडकर यांचा अंधार ..गूढ व भीतीदायक

अंधार हा उबदार मायेचा आश्वासक व सुरक्षा देणारा असू शकतो हा नवीनच विचार आपण दिलात तो फार रम्य आहे.

गामा ह्यांचा विचार आवडला
Kanjus yanchi pratikriya avdli.

एमी's picture

29 May 2018 - 11:20 am | एमी

हुंह??

A warm place with no memory?