कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख २.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
15 May 2018 - 11:20 pm

चन्द्रगुप्त विक्रमादित्याच्या विष्णुभक्तीचा आणखी स्पष्ट पुरावा पाहण्यासाठी आपणास सध्याच्या मध्य प्रदेशातील विदिशा गावाच्या (२३ ३१' ७९.९" उत्तर, ७७ ४८' ३५.३" पूर्व) जवळच पश्चिम दिशेकडे २-३ कि.मी. वर असलेल्या ’उदयगिरि’ नामक छोटया टेकडीकडे जावे लागेल. हा पुरावा पाहण्यापूर्वी ’उदयगिरी’चा परिचय करून घेऊ.

विख्यात सांची स्तूप, हेलिओडोरसचा बेसनगर येथील गरुडध्वज, ऐतिहासिक विदिशा नगरी (जिचा आणि जिच्या ’दशार्ण’ - म्हणजे दहा नद्या असणाऱ्या - प्रदेशाचा कालिदासाने मेघदूतामध्ये विशेष उल्लेख केला आहे), ह्या सर्वांच्या ८-१० कि.मी. च्या परिघामध्ये ’उदयगिरि’ ह्या नावाने सध्या ओळखली जाणारी ही टेकडी आहे. चन्द्रगुप्ताची राजधानी उज्जयिनी ह्या टेकडीपासून फार दूर नाही. टेकडी तशी छोटीच आहे. आसपासच्या शेतजमिनीपासून तिची उंची ३००-३५० फुटांहून अधिक नाही. टेकडीच्या पश्चिमेस बेस नदी वाहते तर पूर्वेस बेटवा नदी - हीच कालिदासाची वेत्रवती नदी. दोघींचा संगम टेकडीच्या उत्तरेस दिसतो. टेकडी उत्तर-पूर्वेकडून दक्षिण-पश्चिमेकडे पसरली असून तिचा पूर्व-पश्चिम विस्तार कमी आहे. उत्तरेस ती अधिक उंच असून दक्षिणेकडे कमी उंच आहे. ह्या दोन्ही उंचवट्यांच्या मधोमध खोलगट भाग आहे. उदयगिरि लेणी ह्या नावाने ओळखली जाणारी जी अनेक लेणी ह्या टेकडीवर आहेत, त्यांचा पहिला उल्लेख जनरल अलेक्झांडर कनिंगहम ह्यांच्या ’Bhilsa Topes' ह्या १८५४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये सापडतो. ('Tope' हे स्तूप/थूपो ह्याचे इंग्रजी आमदानीतले रूप आहे.) त्यांनी ह्या लेण्यांना १८५०-५१ च्या सुमाराला भेट दिली होती, आणि लेण्यांचे त्रोटक वर्णन केले होते. तदनंतर अनेक अभ्यासकांनी ही लेणी, त्यांतील शिल्पे आणि शिलालेख ह्यांचा अभ्यास केला आहे. कनिंगहम ह्यांनीहि हे सर्व वर्णन नंतर अधिक विस्तृतपणे Archaeological Survey of India Report, Vol X, 1874-75 and 1876-77 मध्ये पृ. ४५-५६ येथे केले आहे. सध्याचे ’विदिशा’ - स्वातन्त्र्यपूर्व काळातील नाव भिलसा - गाव टेकडीच्या पूर्वेस २-३ किमीवर आहे. गुप्तकालातील विदिशानगरी बेस आणि बेटवा ह्यांच्या संगमावर होती पण नद्यांच्या पुरामुळे केव्हातरी (८ व्या किंवा ९ व्या शतकामध्ये) तेथील वस्ती उठून सध्याच्या भिलसा-विदिशा येथे स्थिरावली असा तर्क करण्यात आला आहे. टेकडीवर एकूण २० लेणी पुढील आकृतीनुसार दिसतात. त्यापैकी काही वैष्णव, काही शैव आणि अन्य काही जैन सम्प्रदायातील आहेत. दोन्ही उंचवट्यांवर शुंग काळापासूनचे, म्हणजे इ.स.पूर्व काळातले काही अवशेष मिळाले आहेत.

श्रेय क्र. १

ह्या लेण्यांपैकी क्र.५ वराह लेणे आणि क्र. १३ अनन्तशयन लेणे ह्या लेण्यांकडे विशेष लक्ष देऊ. ह्यामधील प्रमुख शिल्पे अशी आहेत.


श्रेय विकिपीडिया


श्रेय विकिपीडिया

चार्ल्स वेड क्रम्प ह्यांनी १९व्या शतकाच्या मध्यात काढलेले वराह लेण्याचे हे जलरंगातील चित्र पहा.

श्रेय क्र. २

वराह शिल्पामध्ये वराह अवतारातील सामर्थ्यवान् विष्णु समुद्रामधून पृथ्वीला बाहेर काढून आपल्या सुळ्यावर उचलून धरत आहे असे दिसते. अनन्तशयन विष्णूच्या शिल्पामध्ये शेषनागावर शयन करणारा विष्णु दिसत आहे. वराहाच्या चित्रातील शेषनागामागे दोन व्यक्ति वराहापुढे नमन करतांना दिसतात. अनन्तशयन विष्णूच्या शिल्पामध्येहि अशाच दोन व्यक्ति मूर्तीच्या पायाशी दिसतात.

क्र.७ (तवा लेणे) ह्या लेण्यामध्ये चन्द्रगुप्ताच्या वीरसेन नामक मन्त्र्याचा खालील शिलालेख आहे. (Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, p. 34):

सिद्धम् । यदन्तर्ज्योतिरर्काभमुर्व्यां — चन्द्रगुप्ताख्यमद्भुतम्
विक्रमावक्रयक्रीता दास्यन्यग्भूतपार्थिवा — मन: संरक्तधर्मा —
तस्यराजाधिराजर्षेरचिन्त्यो — र्मन: अन्वयप्राप्तसाचिव्यो व्यापृत: सन्धिविग्रह: ।
कौत्सशाब इति ख्यातो वीरसेन: कुलाख्यया शब्दार्थन्यायलोकज्ञ: कवि: पाटलिपुत्रक: ।
कृत्स्नपृथ्वीजयार्थेन राज्ञा — संगत: भक्त्या भगवत: शम्भोर्गृहमेतमकारयत् ।

ह्याचा सारांशरूपाने अर्थ असा:

सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि अद्भुत अशा चन्द्रगुप्ताचा कौत्स गोत्रोत्पन्न वीरसेन शाब नावाचा कौटुंबिक परम्परेने नेमलेला विद्वान, पाटलिपुत्रनिवासी आणि युद्ध आणि शान्ति विभागाचा मन्त्री (सान्धिविग्रहिक) पृथ्वी जिंकण्यासाठी बाहेर पडलेल्या राजासह येथे आला आणि त्याने भगवान् शम्भूचे हे गृह निर्माण केले

---

चन्द्रगुप्ताची अशा प्रकारे सिद्ध झालेली ह्या ठिकाणची उपस्थिति आणि त्याची सर्वज्ञात विष्णुभक्ति ह्यांवरून असे म्हणता येते की वराहाच्या आणि अनन्तशयनाच्या पायाशी बसलेल्या दोन व्यक्ति म्हणजे स्वत: चन्द्रगुप्त आणि आणि कोणी त्याच्या विश्वासातील निकटचा - उदाहरणार्थ त्याचा मन्त्री वीरसेन शाब - हेच असावेत. विष्णूच्या पायापाशी चन्द्रगुप्त बसलेला दाखविला आहे ह्यावरून त्याच्या काळात त्याच्या इच्छेवरून ह्या टेकडीस ’विष्णुपदगिरि’ असे म्हणत असावेत असा तर्क करता येतो. विष्णुपदगिरीच्या पायथ्यापाशी असलेल्या बेटवा-बेस नद्यांच्या संगमावर ’चरणतीर्थ’ नावाची जागा आहे ह्या गोष्टीवरून ह्या तर्कास बळ मिळते.

ही लेणी कोरली जाण्याचा काळ इ.स.चारशेच्या पुढेमागे चन्द्रगुप्ताच्या काळातील असावा. वर उल्लेखिलेले क्र. ७ चे लेणे, तसेच क्र. ५ आणि १३ ही लेणी त्यांचा चन्द्रगुप्ताशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्याच्या राज्यकालात निर्माण झालेली दिसतात. क्र. ६ च्या लेण्यात पुढील अंशत: उर्वरित लेख आहे. ह्या लेखात उल्लेखिलेला ’सनकानिक’ नावाचा प्रदेश मालव प्रान्ताबरोबरच समुद्रगुप्ताच्या वर्चस्वाखाली असल्याचा उल्लेख अलाहाबाद अशोक स्तंभावरील समुद्रगुप्ताच्या लेखामध्ये मिळतो. (Corpus Inscriptionum Indicarum, Vol. III, Inscriptions, p. 1):

सिद्धम्। संवत्सरे ८२ आषाढमासशुक्लैकादस्यां परमभट्टारक महाराजाधिराज श्री चन्द्रगुप्त पादानुध्यातस्य महाराज चगलिगपौत्रस्य महाराज विष्णुदासपुत्रस्य सनकानिकस्य महा...।

ह्याचा अर्थ:

चन्द्रगुप्ताचा (कोणीएक - नाव तुटले आहे) मांडलिक, जो मालव प्रान्तातील सनकानिक प्रदेशाचा अधिपति होता आणि जो महाराज चगलिगाचा पौत्र आणि महाराज विष्णुदासाचा पुत्र होता त्याने (गुप्त) संवत्सराच्या ८२व्या वर्षी आषाढाच्या शुक्ल एकादशीला (लेण्याचे दान केले).

अल्बेरुणीने शकसंवत्सर आणि गुप्त संवत्सर ह्यांमध्ये २४१ वर्षांचे अन्तर आहे असे जे विधान केले आहे त्याच्या आधारे गुप्तसंवत्सर इ.स. ३२० ला प्रारम्भ झाला असे म्हणता येते. (History of the Guptas, रा.ना. दांडेकर पृ. १०-२५). ह्या मार्गाने गुप्तसंवत्सर ८२ हा इ.स. ४०२ ह्या वर्षाशी जुळतो आणि लेणे क्र. ६ चा निर्माणकाल ते वर्ष आहे. त्याच्याहि पुढे जाऊन तिथींच्या सूक्ष्म गणितावरून असेहि दाखविण्यात आले आहे की ह्या लेखात वर्णिलेला दिवस (आषाढाची शुक्ल एकादशी) २६ जून ४०२ आहे.५ दक्षिणायनाच्या प्रारम्भाला म्हणजे २१ जूनला हा दिवस अगदी जवळ आहे. ह्याचेहि महत्त्व ह्यानंतरच्या विवेचनावर स्पष्ट होईल.

---

कालिदासाला ही टेकडी ’नीचै:’ ह्या नावाने माहीत होती आणि तेथे लेणी आहेत ह्याचीहि त्याला कल्पना होती. ह्या टेकडीला ’उदयगिरि’ असे नाव त्याच्या काळात पडले नसावे, अन्यथा त्याने ते अवश्य वापरले असते. स्थानिक सर्वसामान्य लोक अर्थातच त्या टेकडीला ’नीचै:’ ह्या संस्कृत नावाने ओळखत नसणार. त्यांच्या प्रचलित प्राकृत लोकभाषेमध्ये तिचे नाव ’छोटी डोंगरी’ असे काहीसे असणार आणि कालिदासाने त्याचे ’नीचै:’ असे संस्कृतामध्ये भाषान्तर केलेले दिसते. मेघदूतातील दशार्ण देश, वेत्रवती (बेटवा) नदी, नीचै: गिरि, तेथील लेणी (शिलावेश्म) ह्यांचे कालिदासाच्या शब्दांमध्ये वर्णन पहा:

पाण्डुच्छायोपवनवृतय: केतकै: सूचिभिन्नै:।
नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्या: ।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ता:।
संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णा: ॥२४॥
तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीम्।
गत्वा सद्य: फलमविकलं कामुकत्वस्य लब्धा ।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यस्मात्।
सभ्रूभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्मि ॥२५॥
नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतो:।
त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पै: कदम्बै: ।
य: पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्नागराणाम्।
उद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि ॥२६॥

अनुवाद

२४. उमललेल्या केतकीपुष्पांनी - केवडा - झाकल्यामुळे ज्यातील उपवने पाण्डुर दिसत आहेत, ज्याच्या ग्रामांमधील वृक्ष घरटी बांधण्यास प्रारम्भ केलेल्या काक इत्यादि पक्षांनी गजबजून गेले आहेत, पक्व होऊ घातलेल्या जांभळांनी ज्याची वने लगडलेली आहेत असा दशार्णदेश तू (म्हणजे मेघ) येऊ घातल्यावर हंसांच्या थव्यांचे काही दिवसांसाठीचे निवासस्थान बनेल.

२५. त्या दिशेने विदिशा नावाने प्रख्यात अशा राजधानीमध्ये पोहोचल्यावर उसळत्या लाटांच्या आवाजाने रिझवणारे तट असलेल्या वेत्रवतीच्या भ्रुकुटिभंगासारख्या तरंगांनी युक्त जल प्यायला मिळून तुला विलासाचे पूर्ण फल मिळेल.

२६. तुझ्या स्पर्शामुळे पुलकित झाल्यासारखी ज्याच्यावर कदम्बपुष्पे फुलली आहेत अशा ’नीचै” नामक गिरीवर तेथे तू विश्रान्तीच्या हेतूने मुक्काम कर. वारयोषितांच्या रतिगन्धांचे उच्छवास टाकणाऱ्या शिलावेश्मांनी त्या विदिशा नगरीतील युवकांचे उसळते तारुण्य तो उद्घोषित करीत आहे. (शिलावेश्म म्हणजे लेणे.)

विचारसंस्कृती

प्रतिक्रिया

पैलवान's picture

16 May 2018 - 6:55 am | पैलवान

दिल्लीतल्या लोहस्तंभाचा मागोवा घेत तुम्ही आम्हाला मध्यप्रदेशात घेऊन गेलात .... कमाल!!!!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

तुमच्या अभ्यासाला शिरसाष्टांग दंडवत!!

अर्धवटराव's picture

16 May 2018 - 7:05 am | अर्धवटराव

असे लेख वाचायला भाग्य लागतं. धन्यवाद देवा.

शाली's picture

16 May 2018 - 7:20 am | शाली

मस्त! मस्त! मस्त!

उदयगिरीतल्या नरवराहाची मूर्ती जबरदस्तच आहे. एकदम पॉवरफुल.
लेख छानच.

अनुप ढेरे's picture

16 May 2018 - 10:47 am | अनुप ढेरे

उदयगिरीतल्या नरवराहाची मूर्ती जबरदस्तच आहे. एकदम पॉवरफुल.

मूर्ती भारीच!

माहितगार's picture

16 May 2018 - 8:46 am | माहितगार

पुभाप्र

manguu@mail.com's picture

16 May 2018 - 9:48 am | manguu@mail.com

छान

याच गिरीवरती असावा स्तंभ?

शाम भागवत's picture

16 May 2018 - 5:45 pm | शाम भागवत

२६ नंबरमधील लेणी म्हणजे खजुराहो लेणी व विदिशा नगरीतील तरूणांची तेथील शिल्पे अस काहीतरी मला वाटायच. आता नीट कळल._/\_

balasaheb's picture

17 May 2018 - 3:32 pm | balasaheb

खुप सुन्दर

रमेश आठवले's picture

19 May 2018 - 4:41 am | रमेश आठवले

उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेख मालिका.