महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न :
===================
बेलाग कातळ कड्याची कपार
त्यातून खुणवी गरुडाचे घर
घाटाचे वेटोळे माळती डोंगर
माडा पोफळीशी खेळतो सागर
पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर
घामाच्या खताने फुलते शिवार
शेताच्या बांधाशी चटणी भाकर
कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर
खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार
भारूडा भुलवी लावणी शृंगार
ओवीच्या अंतरी शांतीचा सागर
अभंग झंकारे झेलून प्रहार
भक्तीने भिजतो चंद्रभागातीर
दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर
पडघम ढोलाचा,लेझीम लयदार
तडतड ताशाची, वाजंत्री सुस्वर
मंजुळ सनई, चौघडा गंभीर
कीर्तनाचे रंगी टाळांचा झंकार
मेणाचे मार्दव, वज्रास टक्कर
रांगडा, भावुक, उदात्त, गंभीर
शौर्याचा डिंडिम अटकेच्या पार
मानवी रत्नांचा अथांग सागर
...भारतवर्षाचा भक्कम आधार.
प्रतिक्रिया
1 May 2018 - 5:32 am | तुषार काळभोर
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
1 May 2018 - 11:44 am | प्रचेतस
क्या बात है...!
मस्त गीत
2 May 2018 - 10:23 am | अनन्त्_यात्री
धन्यवाद!