हिममानव यती
----------------------------------------
२२ सप्टेंबर १९२१
लेफ्टनंट कर्नल चार्ल्स हॉवर्ड-बरी याच्या नेतृत्वात असलेल्या ब्रिटीश एव्हरेस्ट मोहीमेतल्या सदस्यांपैकी स्वत: हॉवर्ड-बरी, जॉर्ज मॅलरी, गाय बलॉक, हेन्री मोर्सहेड, सँडी वॉलस्टन, एडवर्ड व्हीलर हे सहाजण सव्वीस शेर्पा पोर्टर्ससह पहाटे ४ वाजता २०,००० फूट उंचीवरच्या आपल्या कँपमधून बाहेर पडून लाखपा ला खिंडीच्या मार्गाला लागले होते. हॉवर्ड-बरीची ही एव्हरेस्ट मोहीम शिखरावर प्रत्यक्षं चढाईचा प्रयत्नं करण्यापेक्षा एव्हरेस्ट परिसराची आणि आजूबाजूच्या शिखरांची माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने आखण्यात आली होती. या मोहिमेत मिळालेल्या माहितीवरुनच ब्रिटीश माऊंट एव्हरेस्ट कमिटीने पुढची सलग तीन वर्ष - १९२२, १९२३ आणि १९२४ - एव्हरेस्टवर प्रत्यक्षं चढाईच्या करण्याच्या दृष्टीने दरवर्षी मोहीम आखली होती. यापैकी १९२४ मधल्या शेवटच्या मोहीमेत जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन एव्हरेस्टवर नाहीसे झाले.
लाखपा ला खिंडीच्या मार्गावर असताना सुमारे २१,००० फूट उंचीवरही हॉवर्ड-बरी आणि इतरांना वेगवेगळ्या प्राण्यांच्या पंजांचे बर्फात उमटलेले ठसे पाहून आश्चर्यंच वाटलं. त्या ठशांपैकी ससे आणि कोल्ह्यांचे ठसे अगदी सहज ओळखू येत होते. परंतु सर्वांचं लक्षं वेधून घेतलं होतं ते एका विशिष्ट प्रकारच्या खुणांनी. हे ठसे मानवी पावलाच्या आकाराचे दिसत असले तरी नेहमीच्या पावलाच्या आकारापेक्षा किमान दीडपट लांब-रुंद होते! हॉवर्ड-बरीच्या मते हे ठसे त्या परिसरात वास्तव्यं असलेल्या आणि बर्फावर वावरण्यात तरबेज असलेल्या राखाडी लांडग्याचे होते. बर्फातून उड्या मारत जाताना मागच्या आणि पुढच्या पंजांचे ठसे एकत्रं झाल्यामुळे ते भल्यामोठ्या माणसाच्या पावलांसारखे दिसत असावेत असं त्याचं मत होतं.
हॉवर्ड-बरी म्हणतो,
These tracks, which caused so much comment, were probably caused by a large " loping " grey wolf, which in the soft snow formed double tracks rather like those of a barefooted man.
ब्रिटीशांबरोबर असलेल्या शेर्पांनी मात्रं हॉवर्ड-बरीचं हे मत साफ धुडकावून लावलं!
त्यांच्यापैकी प्रत्येकजण हे ठसे 'मेटोकान्गमी'चे आहेत यावर ठाम होता!
एव्हरेस्ट मोहीमेचे सदस्य दार्जिलिंगला परतल्यावर कलकत्याच्या 'द स्टेट्समन' चा वार्ताहर असलेल्या हॅरी न्यूमनने मोहीमेवर गेलेल्या प्रत्येकाची दार्जिलींग इथे मुलाखत घेतली. ब्रिटीश गिर्यारोहकांमध्ये लाखपा ला खिंडीत आढळलेले ठसे हे नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत याबद्दल संदिग्धता होती, पण शेर्पांना मात्रं ते ठसे नेमके कोणाचे होते याबद्दल कोणतीही शंका नव्हती. त्यांच्यापैकी प्रत्येकाने ते ठसे मेटोकान्गमीचे आहेत असं न्यूमनला ठासून सांगितलं! इतकंच नव्हे तर त्या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा नेमका अर्थही त्यांनी स्पष्टं केला. मेटोकान्गमी हा तिबेटी बोलीभाषेतला एक जोडशब्दं आहे. मेटो (Metoh) याचा शब्दश: अर्थ मानवी अस्वल (Man-bear) आणि कान्गमी (Kangmi) म्हणजे हिममानव (Snowman)! हे दोन्ही शब्दं एकत्रं केल्यावर मेटोकान्गमी या जोडशब्दातून निघणारा अर्थ म्हणजे बर्फावर वावरणारा हिममानव-अस्वल!
न्यूमनने कान्गमी म्हणजे हिममानव (Snowman) हा योग्य अर्थ लावला, पण मेटो (Metoh) या शब्दाचा अर्थ लावताना मात्रं त्याने नेमका गोंधळ घातला. सुरवातीला त्याने गलिच्छ (filthy) असं भाषांतर केलं, पण नंतर त्याऐवजी तिरस्करणीय या अर्थाने वापरला जाणारा Abominable हा शब्दं वापरला आणि पाश्चात्यांना आकर्षित करणारी "The Abominable Snowman" ही संज्ञा प्रचलीत झाली!
तिबेटी भाषेत मेटाकान्गमी आणि इंग्रजीतला "The Abominable Snowman" म्हणजे अर्थातच यती!
हिमालयाच्या सावलीत वास्तव्यास असलेल्या तिबेट आणि नेपाळमधल्या शेर्पांमध्ये अनेक सुरस कथा आणि आख्यायिका पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या आहेत. हिममानव उंच पर्वतात बर्फाच्या गुहेत वास्तव्यास असतो, त्याच्या सर्वांगावर मोठेमोठे केस असतात त्यामुळे त्याचं थंडीपासून संरक्षण होतं, त्याच्यावर पूर्ण विश्वास असणार्यांनाच तो दिसतो, जर आपल्या एखाद्या चुकीमुळे चिडून त्याने हल्ला केलाच तर त्याच्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे उतारावर धावत सुटणं, कारण उतारावर त्याचे लांबलचक केस त्याच्या डोळ्यांसमोर आल्याने पाठलाग करताना त्याला अडचणी येतात अशा अनेक चमत्कारीक गोष्टी यतिबद्दल प्रचलीत आहेत.
शिव धकल यांनी आपल्या Folk Tales of Sherpa and Yeti या पुस्तकात अशा बारा वेगवेगळ्या कथा तपशीलवारपणे मांडल्या आहेत. या सर्व कथांमधून अगदी सुरवातीच्या काळातल्या शेर्पांचं राहणीमान, विचारपद्धती आणि चालीरिती यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. यतीच्या संदर्भात असलेल्या कथांमध्ये शेर्पा हे नायक तर यती खलनायक म्हणून समोर येतो. त्यापैकी एका कथेत शेर्पांना सतत त्रास देणार्या यतींची कहाणी समोर येते. या यतींपासून सुटका करुन घेण्यासाठी शेर्पांनी रचलेलं नाटक हा या कथेचा गाभा. दारुच्या नशेत तर्र झाल्यावर शेर्पा आपापसात मारामारी करण्याचं नाटक करतात आणि ते पाहून यती दारु ढोसून खरंच एकमेकांचा जीव घेतात! शेर्पांची चाल काही यतींच्या लक्षात येते, पण एव्हाना त्यांची संख्या बरीच कमी झालेली असल्याने ते बदला घेण्याचा निश्चय करुन उंच पहाडावर आश्रय घेतात! दुसर्या एका कथेत एक यती नरभक्षक झालेला असतो आणि एका तरुणीवर बलात्कार करतो, पण तिला मारण्यापूर्वीच त्याला पळ काढावा लागतो! आणखीन एका कथेत सूर्योदयाबरोबर उंची वाढत जाणार्या यतीची कथा आहे. त्याच्यावर ज्या शेर्पाची नजर पडेल तो बेशुद्ध पडतो आणि त्याची सगळी शक्ती नष्टं होते! यतीच्या कथांच्या जोडीला जिवलग मित्राच्या पत्नीला आपल्या नादी लावणारा शेर्पा तरुण, लामाला भुलवणारी शेर्पा तरुणी, अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं मूल, धुकं आणि वायू यांच्यातला संघर्ष अशा कथाही येतात. शेर्पांना नैतिक धडे देण्याबरोबरच त्यांच्या उपजत साहसी वृत्तीला खतपाणी घालणं आणि प्रतिकूल हवामानातही कोणत्याही संकटाशी बेडरपणे आणि धैर्याने मुकाबला करण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करणं असे अनेक कंगोरे या कथांमधून समोर येतात. कोणत्याही अपरिचीत आणि अनोळखी जंगली जनावराशी जवळीक साधण्याचा प्रयत्नं करु नये असा धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. लहान मुलांनीही मोठ्यांचा डोळा चुकवून आपली वस्ती सोडून इतस्तत: भटकू नये आणि अनेक पिढ्यांपासून चालत आलेले योग्य ते रितीरिवाज पाळावेत यासाठी त्यांना 'बेटा, सुधर जा नहीं तो यती आ जाएगा' अशा स्टाईलने यतीचा धाक दाखवण्यात आला आहे!
यतीच्या संदर्भात सर्वात जुनी नोंद ख्रिस्तपूर्व काळात आढळते. ग्रीसमधल्या मॅसेडॉनियाचा राजा अलेक्झांडर साम्राज्यविस्तार करत पर्शियन साम्राज्य जिंकून भारतीय उपखंडाच्या वायव्य सीमेवर धडकला होता. सिंधू नदी ओलांडून तो पंजाब प्रांतात शिरल्यावर त्याचा सामना झाला तो पौरव प्रांताचा राजा पुरूशी! ख्रिस्तपूर्व ३२६ मध्ये हिडास्पेस (झेलम) नदीच्या किनार्यावर झालेल्या लढाईत पुरुचा पराभव झाला असला तरी पुरुच्या शौर्याने प्रभावित झाल्याने अलेक्झांडरने आपला सरदार म्हणून त्याची नेमणूक केली. या लढाईनंतरच पुरुच्या सैन्यात असलेल्या पहाडी सैनिकांकडून यतीच्या कहाण्या अलेक्झांडरच्या कानी आल्या! या सुरस आणि चमत्कारीक कहाण्यांनी तो इतका प्रभावित झाला की त्याने यतीला आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम सोडला, परंतु यती बर्फाळ पहाडांमध्ये वास्तव्यास असतो आणि इतक्या कमी उंचीवरच्या वातावरणात त्याचा निभाव लागणं शक्यं नाही असं त्या पहाडी सैनिकांनी स्पष्टं केलं!
अकराव्या शतकातला बौद्ध लामा आणि कवी मिलरेपा याने आपल्या अनेक कवितांमध्ये यतीचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तेराव्या शतकात चंगेज खानाच्या ताफ्यात असलेल्या एका बव्हेरीयन प्रवाशाने हिमालयाच्या पायथ्याशी एका भल्या मोठ्या केसाळ प्राण्याने आपल्यावर केलेल्या हल्ल्याची तपशीलवार नोद केली आहे. सिक्कीम, भूतान आणि नेपाळच्या पूर्व सीमेवर आजही आढळणार्या लेपाची जमातीच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांमध्ये यतीला मानाचं स्थान आहे. लेपाची लोक यतीची शिकारीचा देव म्हणून पूजा करतात! त्यांच्या समजुतीनुसार यती माणसाप्रमाणेच दोन पायांवर चालतो आणि कायम बर्फाच्छादीत असलेल्या शिखरांच्या प्रदेशात त्याचं वास्तव्यं असतं. अणकुचीदार दगड हे त्याचं शस्त्रं असून तो अत्यंत कर्कश्शं आवाजात शीळ घालतो! तिबेटमध्ये अकराव्या शतकापासून अस्तित्वात असलेल्या बॉन पंथातही यतीचं अस्तित्वं मान्यं केलेलं आहे. इतकंच नव्हे तर यतीचं रक्तं काही अत्यंत महत्वाच्या आणि गुप्तं विधींमध्ये वापरलं जातं असंही बॉन पंथीय मानतात!
यतीच्या कहाण्या ब्रिटीशांच्या प्रथम कानावर आल्या त्या १९ व्या शतकात. १८३२ मध्ये ब्रायन हौटन हॉजसन नेपाळच्या उत्तर भागाच्या दौर्यावर असताना त्याच्याबरोबर असलेल्या शेर्पांना सुमारे दीडशे मीटर अंतरावर एक उंचापुरा दोन पायांवर चालणारा एक विचित्रं प्राणी आढळून आला. या प्राण्याच्या देहावर मोठे केस होते आणि हॉजसन आणि त्याच्याबरोबरचे शेर्पा नजरेस पडताच त्याने तिथून पोबारा केला. त्या प्राण्याच्या एकंदर अवतारावरुन आणि हालचालींवरुन तो दुर्मिळ जातीचा ओरँगऊटान असावा असा हॉजसनने अंदाज केला.
हॉजसननंतर तब्बल ६७ वर्षांनी १८९९ मध्ये लॉरेन्स वॅडेल याने आपल्या Among the himalayas या पुस्तकात यतीच्या पावलांचे ठसे आढळल्याचा उल्लेख केलेला आहे. वॅडेलने स्वत: हे ठसे पाहिले नव्हते, पण त्याच्या शेर्पाने वर्णन केलेल्या दोन पायांवर चालणार्या आणि भल्यामोठ्या एप सदृष्यं प्राण्याच्या वर्णनावरुन ते एखाद्या मोठ्या अस्वलाचे असावेत असा वॅडेलचा अंदाज होता. यतीच्या संदर्भातही अनेक कहाण्या त्याच्या कानावर आल्या होत्या, पण आपण स्वत: यती पाहीला आहे असं छातीठोकपणे सांगणारा एकही तिबेटी माणूस त्याला भेटला नाही! प्रत्येकाने सांगितलेली यतीची माहिती ही ऐकीवच होती!
१९२१ च्या हॉवर्ड-बरीच्या मोहीमेनंतर १९२५ मध्ये रॉयल जिओग्राफीक सोसायटीचा सदस्यं असलेला ग्रीक भूगर्भशास्त्रज्ञ आणि फोटोग्राफर टोंबाझी सिक्कीम प्रांतात संशोधन करत होता. झेमू गॅप शिखरापासून सुमारे दहा मैल अंतरावर १५,००० फूट उंचीवरच्या कँपमध्ये तो आपल्या तंबूत आराम करत असताना शेर्पांनी त्याला तंबूतून बाहेर बोलावलं आणि एका दिशेने त्याचं लक्षं वेधलं. त्याच्या तंबूपाठच्या दरीत सुमारे दोनशे ते तीनशे यार्ड अंतरावर एक मानवी आकाराची आकृती त्याला आढळून आली. ही आकृती गडद काळपट रंगाची होती आणि दोन पायांवर चालत होती. इतकंच नव्हे तर मध्येच एखादं र्होडेडेंड्रॉनचं झुडूप उपटून खाण्याचा प्रयत्नंही करताना दिसत होती. टोंबाझीच्या अंदाजाप्रमाणे त्या आकृतीच्या देहावर कोणतेही कपडे नव्हते. जेमतेम मिनीटभर ती आकृती त्याच्या नजरेस पडली आणि मग घनदाट झुडूपांमध्ये गडप झाली. ती आकृती पाहून तो इतका चकीत झाला होता की फोटो काढायचंही त्याला भान राहीलं नाही!
टोंबाझी आणि त्याच्या शेर्पांनी सुमारे दोन तासांनी ती जागा गाठली. त्या विचित्रं प्राण्याच्या पावलांचे ठसे बर्फात उमटलेले त्यांना आढळून आले. ते ठसे द्विपाद (bipedal) प्राण्याचे होते आणि मानवी पावलाच्या आकाराचे होते. प्रत्येक एक - दीड फूट अंतरावर असलेले असे पंधरा ठसे टोंबाझीने मोजले, पण पुढे हे ठसे दाट झुडूपांच्या झाडीत जात दिसेनासे झाले होते.
टोंबाझी म्हणतो,
"I examined the footprints which were clearly visible on the surface of the snow. They were similar in shape to those of a man, but only six to seven inches long by four inches wide at the broadest part of the foot. The marks of five distinct toes and of the instep were perfectly clear, but the trace of the heel was indistinct, and the little that could be seen of it appeared to narrow down to a point. I counted fifteen such footprints at regular intervals ranging from one-and-a-half to two feet. The prints were undoubtedly of a biped, the order of the spoor having no characteristics whatever of any imaginable quadruped. Dense rhododendron scrub prevented any further investigations as to the direction of the footprints, and threatening weather compelled me to resume the march. From inquiries I made a few days later at Yoksun, on my return journey, I gathered that no man had gone in the direction of Jongri since the beginning of the year."
टोंबाझीच्या बरोबर असलेल्या शेर्पांच्या मते हा प्राणी म्हणजे अर्थातच यती होता!
इटलीला परतल्यावर त्याने आपल्या अनुभवांचं वर्णन करणारं Account of a Photographic Expedition to the Southern Glaciers of Kangchenjunga in the Sikkim Himalaya असं लांबलचक नाव असलेलं पुस्तक प्रसिद्धं केलं. आपल्याला आलेल्या अनुभवाचं आणि बर्फात पाहिलेल्या ठशांचं त्याने अत्यंत बारकाईने त्या पुस्तकात वर्णन केलं होतं. इटली आणि शेजारीच असलेल्या ऑस्ट्रीयामध्ये हे पुस्तक बर्यापैकी सनसनाटी ठरलं होतं.
१९३२ मध्ये फ्रँक स्मिथलाही हिमालयात बर्फात उमटलेले यतीच्या पावलांचे ठसे आढळले होते!
यतीचे ठसे - फोटो: फ्रँक स्मिथ
दुसर्या महायुद्धाला सुरवात होण्यापूर्वी सुमारे वर्षभर - १९३८ च्या जून महिन्यात सिक्कीममधून यती या विषयावर संशोधन करण्याच्या इराद्याने एका खास मोहीमेवर आलेल्या शास्त्रज्ञांनी तिबेटच्या दिशेने प्रस्थान ठेवलं. या मोहीमेत सहभागी झालेले झाडून सर्व शास्त्रज्ञ जर्मन होते आणि या मोहीमेचा प्रणेता होता दुसर्या महायुद्धादरम्यान ज्यू आणि स्लाव्हवंशीयांचा संहारक म्हणून कुप्रसिद्धं असलेला हेन्रीच हिमलर! खुद्दं अॅडॉल्फ हिटलरच्या आशिर्वादाने ही मोहीम आखण्यात आलेली होती!
१९३३ मध्ये सत्तेवर आल्यावर सुरवातीच्या वर्षाभरात हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी आपली सत्ता मजबूत करण्यास आणि विरोधकांचा निकाल लावण्यास प्राधान्यं दिलं. पक्षांतर्गत विरोधक असलेले ग्रेगर स्ट्रास्सर, अर्न्स्ट र्होम, एडमंड हाईन्स आणि हिटलरचे असंख्य वैयक्तीक शत्रू असलेल्यांचा नाईट ऑफ लाँग नाईव्ह्ज आणि इतर प्रकरणात अत्यंत निर्दयतेने काटा काढण्यात आला. खुद्दं हिटलर आणि त्याच्या सहकार्यांपैकी हेन्रीच हिमलर आणि रुडॉल्फ हेस या तिघांनाही अमानवी आणि अतिंद्रीय शक्तींचं प्रचंड आकर्षण होतं. त्याचबरोबर आर्य वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांताने हिटलर - हिमलर दोघंही पछाडलेले होते. या सिद्धांतानुसार शुद्धं आर्य वंश हा सर्वात श्रेष्ठ वंश (मास्टर रेस) असून इतर सर्व मानव त्यातुलनेत नीच पातळीवर आहेत आणि म्हणून जगावर राज्य करण्याचा अधिकार हा सर्वस्वी आर्यवंशीयांनाच आहे असं प्रतिपादन केलं आहे. हे शुद्ध वंशाचे आर्य म्हणजे अर्थातच जर्मन पुरुष असंही हा सिद्धांत सांगतो!
जर्मनीवर नाझी पक्षाचा पूर्णपणे कब्जा झाल्यावर १९३५ मध्ये हिमलरच्या पुढाकाराने आणि हिटलरच्या आशिर्वादाने एहनॅनर्बे (Ahnenerbe) या संस्थेची निर्मिती करण्यात आली. जगभरातील विविध देशात संशोधन करुन शुद्ध आर्यवंशीयांचा शोध घेणं आणि मुख्यत: या शुद्ध आर्यवंशीयांशी जर्मनांचा संबंध सिद्धं करणं हे प्रमुख काम या संस्थेतल्या शास्त्रज्ञांवर सोपवण्यात आलं होतं. तिबेटविषयी जर्मनांना सुरवातीपासूनच आकर्षण होतं. हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्मग्रंथांमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या शम्भला या पुरातन साम्राज्याच्या शोधार्थ जर्मनांनी १९३० आणि १९३४ मध्ये तिबेटमध्ये खास मोहीमही काढली होती. या पार्श्वभूमीवर टोंबाझीचं पुस्तक आणि त्यातला यतीचा उल्लेख याकडे जर्मनांचं लक्षं गेलं नसतं तरच आश्चर्य होतं!
चार्ल्स डार्विनने १८५९ मध्ये Origin of species या आपल्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला आहे. आधुनिक मानव एप्सपासून उक्रांत झाला असं त्यात नमूद केलेलं असलं तरी त्याबद्दल तपशीलवार भाष्यं केलेलं नाही. १८६३ मध्ये थॉमस हेन्री हक्सलीने Evidence as to Man's Place in Nature या पुस्तकात मानव आणि एप्स यांच्यातलं साम्य आणि फरक सप्रमाण दाखवून दिल्यावर १८७१ मध्ये डार्विनने आपल्या The Descent of Man, and Selection in Relation to Sex या ग्रंथात मानव एप्सपासून उत्क्रांत झाला या हक्सलीच्या सिद्धांताचा अधिक विस्तार करताना विरुद्ध लिंगी जोडीदाराबद्दलचं आकर्षण आणि त्यामधून होणारी नवीन जीवाची निर्मिती याबद्दल डार्विनने अत्यंत तपशीलवार भाष्यं केलं.
शुद्ध आर्यवंशाच्या कल्पनेने पछाडलेले जर्मन नेते आणि शास्त्रज्ञ यांनी डार्विनचा सिद्धांत आणि टोंबाझीने वर्णन केलेला यती या दोन्हीची सांगड घातली आणि त्यातून आर्य वंश श्रेष्ठत्वाची कल्पना पुढे रेटली! एप्स आणि मानव यांच्यादरम्यानचा उत्क्रांतीमधला टप्पा म्हणजेच यती असं प्रतिपादन करण्यात आलं. या यतीपासूनच पुढे शुद्ध आर्यवंशीय मानव तिबेटमध्ये उत्क्रांत झाला आणि एकेकाळी संपूर्ण आशिया त्यांच्या वर्चस्वाखाली होता. हे आर्यवंशीय पुढे युरोपात आले आणि मुख्यत: जर्मनीत स्थिरावले आणि यांचेच वंशज म्हणजे आजचे जर्मन नागरीक असा हा सिद्धांत मांडण्यात आला. पुराव्यानिशी हा सिद्धांत शाबित करण्यासाठी हिमलरच्या आशिर्वादाने यतीचा शोध घेण्यासाठी तिबेटमध्ये एक संशोधन मोहीम आखण्यात आली!
जर्मन मोहीमेचं नेतृत्वं अर्न्स्ट शॉफरवर सोपवण्यात आलं होतं. शॉफर पक्षीशास्त्रज्ञ होता. त्याच्याजोडीला भूगर्भशास्त्रज्ञ कार्ल वाईनर्ट, स्टॅटीस्टीशीयन एडवर्ड गेअर, कीटकशास्त्रज्ञ अर्न्स्ट क्रॉस (जीवशास्त्रज्ञ अर्न्स्ट क्रॉस तो हा नाही), मानववंशशास्त्रज्ञ हान्स गन्थर आणि त्याच्या शिष्य ब्रुनो बेगर यांचा समावेश होता. हे सर्वजण जर्मनीत प्रचंड दहशत असलेल्या एसएस (शुत्झस्टाफेल) संघटनेचे सदस्यंही होते, कारण मोहीमेला सहाय्य करताना हिमलरने तशी अटच घातलेली होती! ही शास्त्रीय मोहीम असली तरी त्याच्या जोडीला ब्रिटीशांचे विरोधक असलेल्या तिबेटी लोकांशी आणि राज्यकर्त्यांशी संधान बांधणं आणि भविष्यात जर्मनी विरुद्ध ब्रिटन असा संघर्ष उद्भवण्याची चिन्हं दिसत असताना तिबेटमध्ये जर्मनांचा तळ उभारुन भारतातल्या ब्रिटीशांच्या हालचालींना लगाम घालण्याच्या दृष्टीने चाचपणी करणं हा अंतस्थ हेतूही होताच!
तिबेटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळाल्यावर शॉफर आणि त्याच्या सहकार्यांनी तब्बल आठ महिने तिबेटभर प्रवास करुन अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी आणि कीटक यांचा अभ्यास केला. यतीविषयी मिळेल ती सर्व माहिती जमा करण्यात आली. यतीला प्रत्यक्षं पाहिल्याचा दावा करणार्या अनेक तिबेटी लोकांनी केलेल्या यतीच्या वर्णनाचीही तपशीलवार नोंद करण्यात आली. तिबेटी आणि तिबेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सिक्कीममधल्या सामान्यं लोकांच्या चेहर्याचे प्लास्टरचे मुखवटे बेगरने तयार करुन घेतले. शुद्धं आर्यवंशीयांचा संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एकूण ३०० लोकांच्या चेहर्याचे आणि डोक्याचे असे मुखवटे त्याने जमा केले! अर्थात हे सर्व संशोधन सुरु असताना तिबेटी राजकारण्यांना ब्रिटीशांविरुद्ध चिथावण्याचे शॉफरचे उद्योगही पद्धतशीरपणे सुरु होते. १३ व्या दलाई लामांचा मृत्यू झाला होता आणि १४ वे दलाई लामा १९५१ पर्यंत प्रगट होणार नव्हते, याचा फायदा घेत ब्रिटीश भारतातून तिबेटवर आक्रमण करण्याची शक्यता आहे असं शॉफरने तिबेटच्या काळजीवाहू राज्यकर्त्यांना दडपून दिलं होतं! तिबेटमधल्या मुक्कामात वेगवेगळे प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे सुमारे ३३०० नमुने, गहू, बार्ली, ओट यांच्या सुमारे ४५० जातींची बियाणी अशा अनेकविध वस्तू त्यांनी जमा केल्या! दुसर्या महायुद्धाचे ढग जमा झाल्यावर युद्धाला नेमकं तोंड लागण्यापूर्वी पंधरा दिवस शॉफरच्या तुकडीने कलकत्त्याहून जर्मनीला प्रस्थान केलं!
ज्या यतीच्या शोधात शॉफर तिबेटमध्ये आला होता त्या यतीचं आणि आर्यांच्या वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांताचं काय झालं?
इटलीतल्या एका म्युझियममध्ये पेंढा भरलेला एक भलामोठा 'यती' ठेवण्यात आलेला आहे! हा यती शॉफरच्या १९३८-३९ सालच्या मोहीमेत तिबेटमधून आणला गेला असं मानलं जातं! प्रत्यक्षात या यती म्हणजे तिबेटमध्ये आढळणारं दुर्मिळ जातीचं अस्वल असून त्याचा जबडा अधिक भीतीदायक दिसण्यासाठी त्यात गावठी कुत्र्याचे सुळे बसवण्यात आले आहेत असं पुढे शास्त्रज्ञांनी सिद्धं केलं!
नाझींचा 'यती'
१९३४ मध्ये तिबेटच्या मोहीमेवर गेला असतानाही शॉफरच्या कानी यतीच्या कहाण्या आल्या होत्या. त्या कहाण्यांवरुन यती म्हणजे तिबेटी अस्वलाची एखादी दुर्मिळ प्रजाती असावी असा त्याचा ग्रह झाला होता. १९३८ च्या मोहीमेवर निघताना जर्मनी सोडण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत तिबेटमधून परत येताना जिवंत अथवा मृत यतीचा नमुना आणण्याचं हिमलरने त्याला बजावलं होतं! आपण रिकाम्या हाताने परत गेल्यास हिमलर आपल्याला जिवंत सोडणार नाही अशी प्रत्येकालाच भीती होती! जीवाच्या भीतीने शॉफर आणि त्याच्या सहकार्यांनी एखाद्या भल्यामोठ्या अस्वलाची शिकार करुन त्यात पेंढा भरुन घेतला आणि त्याचा जबडा अधिक भीतीदायक दिसण्यसाठी कुत्र्याचे सुळे बसवले असावे असं मानण्यास जागा आहे. शॉफरची मोहीम जर्मनीला परतण्यापूर्वीच दुसरं महायुद्धं सुरु झालं आणि १९४५ मध्ये दुसरं महायुद्धं संपल्यावर जर्मन राईशच शिल्लक राहीलं नाही, त्यामुळे शॉफरचा हा यती आपोआपच विस्मरणात गेला. खुद्दं शॉफरने १९९२ मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत त्याचा कधीही उल्लेख केला नाही!
शॉफर आणि कंपनी तिबेटमध्ये संशोधनात गुंतलेली असतानाच चार जर्मन गिर्यारोहक गिलगीट - बाल्टीस्तानमध्ये असलेल्या नंगा पर्वतावर चढाईच्या मोहीमेवर आलेले होते. पश्चिमेला असलेल्या डिअॅमीर फेसच्या मार्गाने शिखरावर पोहोचण्याची त्यांची योजना होती. पीटर ऑशनेटरच्या नेतृत्वात आलेल्या या मोहीमेत त्याच्याव्यतिरिक्तं लुडवीग व्होग, हॅन्स लॉबेन्हॉफर आणि हेन्रीच हॅरर यांचा समावेश होता. नंगा पर्वतावर प्रतिकूल हवामानामुळे माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांनी कराची गाठलं आणि जर्मनीला परतणार्या बोटीची ते वाट पाहत असतानाच दुसरं महायुद्धं सुरु झाल्यावर त्यांना ब्रिटीशांनी अटक केली! हॅरर आणि ऑशनेटर यांनी ब्रिटीशांच्या कैदेतून पोबारा केला आणि १९४४ मध्ये तिबेट गाठलं! दुसरं महायुद्धं संपल्यावर १९५१ मध्ये हॅरर जर्मनीला परतला. तिबेटमधल्या आपल्या मुक्कामात हॅररने १४ व्या दलाई लामांचा शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून काम केलं होतं! तिबेटमधल्या सात वर्षांच्या वास्तव्यात दोन ते तीन वेळा बर्फात उमटलेल्या यतीच्या पाऊलखुणा त्याच्या दृष्टीस पडल्या होत्या!
यतीबद्दल पाश्चात्यांचं कुतूहल खर्या अर्थाने जागृत झालं ते १९५१ सालात....
१९४९ मध्ये नेपाळ सरकारने आपल्या सीमा पाश्चात्यांना खुल्या केल्यावर अनेक गिर्यारोहकांचा नेपाळमध्ये राबता वाढला. १९५१ मध्ये एरीक शिप्टनच्या नेतृत्वात ब्रिटीश गिर्यारोहक एव्हरेस्टवर चढाईच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी नेपाळमध्ये आले. या मोहीमेच्या दरम्यान शिप्टनचा सहकारी आणि मोहीमेचा डॉक्टर असलेल्या मायकेल वॉर्डला सुमारे २०,००० फुटांवर मेनलंग ग्लेशीयरच्या बर्फात एका द्विपाद प्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या. मानवी पावलाच्या आकाराच्या पण बर्याच मोठ्या असलेल्या या खुणांकडे त्याने शिप्टनचं त्याकडे लक्षं वेधलं. यतीच्या कहाण्या कानावर आलेल्या शिप्टनने त्या खुणांचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि बरेच फोटोही काढले. त्या खुणांच्या आकाराचा नेमका अंदाज यावा म्हणून त्याच्या शेजारी आपली आईसएक्स (बर्फात वापरण्याची कुर्हाड) ठेवण्याचीही त्याने खबरदारी घेतली होती. शिप्टनबरोबरच्या शेर्पांना अर्थातच या यतीच्या पाऊलखुणा असल्याबद्दल कोणतीच शंका नव्हती!
यतीचा ठसा - फोटो: एरीक शिप्टन
१९५३ मध्ये एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे एव्हरेस्टच्या मोहिमेवर असताना सुमारे २२,००० फूट उंचीवर त्यांना बर्फात उमटलेल्या एका मोठ्या द्विपाद प्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या. या पाऊलखुणा यतीच्या आहेत याबद्दल तेनसिंगला कोणतीच शंका नव्हती! त्याने स्वत: एकदाही यती पाहिलेला नसला तरी दोन वेळा त्याच्या वडिलांच्या दृष्टीस पडला होता!
१९५४ च्या फेब्रुवारीत इंग्लंडच्या डेली मेल या वृत्तपत्राने यतीचा शोध घेण्यासाठी हिमालयात एक मोहीम आखली. प्रसिद्ध गिर्यारोहक जॉन अँजेलो जॅक्सनच्या या मोहीमेत मानववंशशास्त्रज्ञ चार्ल्स स्टोनर, पर्यावरणशास्त्रज्ञ जेरार्ड रसेल, पत्रकार राल्फ इझ्झार्ड, फोटोग्राफर टॉम स्टोबार्ट आणि प्राणिशास्त्रज्ञ बिस्मोय दास यांचा समावेश होता. यतीचा शोध घेण्याबरोबरच हाडाचा गिर्यारोहक असलेल्या जॅक्सनसमोर एव्हरेस्ट ते कांचनगंगा हा लांबलचक ट्रेक करण्याचंही आव्हान होतं. एव्हरेस्टच्या मार्गावर असतानाच जॅक्सनने कांगशूंग मधल्या टेंगबोचेच्या प्रसिद्ध बौद्ध विहाराला (मॉनेस्ट्री) भेट दिली. या विहारात त्याला यतीची अनेक भित्तीचित्रं आढळून आली. टेंगबोचेपासून जवळच असलेल्या पेंगबोचे इथल्या बौद्ध विहारात यतीची कवटी आणि हात ठेवलेला आहे असं कळताच जॅक्सन आणि इतरांनी तो विहार गाठला. तिथल्या बौद्ध भिक्षूंकडून त्यांना त्याचा इतिहास कळला तो असा -
सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी एक बौद्ध भिक्षू ध्यानधारणा आणि प्रार्थनेसाठी निवांत जागेच्या शोधार्थ उंच पहाडात असलेल्या एका गुहेत शिरला. ही गुहा एका यतीची होती आणि तो यती त्यावेळेस गुहेत निद्रीस्तं होता! यतीला पाहताच त्या भिक्षूने तिथून काढता पाय घेतला. पुढे काही वर्षांनी तो भिक्षू पुन्हा त्या गुहेत आला तेव्हा त्या गुहेतला यती मृत झाला असून त्याचा केवळ सांगाडाच तिथे उरला असल्याचं त्याच्या दृष्टीस पडलं! यतीची आठवण म्हणून त्या भिक्षूने त्याची कवटी आणि एक हात सापळ्यापासून वेगळा केला आणि आपला विहार गाठला! यतीची ती कवटी आणि तो हात हा शुभशकुनी असल्याचं विहारातले भिक्षू आणि गावकर्यांचं मत होतं!
जॅक्सनला शास्त्रीय संशोधनासाठी तो हात इंग्लंडला नेण्याची इच्छा होती, पण विहारातल्या भिक्षूंनी त्याची विनंती अर्थातच धुडकावून लावली. त्याने बरीच मनधरणी केल्यावर त्या कवटीवरचे काही केस तेवढे त्याच्या पदरात पडले! तेवढ्यावर समाधान मानून बाहेर पडण्यापलीकडे जॅक्सनसमोर दुसरा पर्याय नव्हता! कांजनगंगाच्या मार्गावर असताना जॅक्सनला बर्फात उमटलेले अनेक प्राण्यांचे ठसे आढळून आले. त्यापैकी काही ठसे त्याने अचूक ओळखले असले तरीही त्यापैकी काही मात्रं तो ओळखू शकला नाही. मानवी पावलाच्या आकाराचे पण जवळपास दुप्पट लांबी-रुंदीचे हे ठसे यतीचे होते असं जॅक्सनच्या शेर्पांचं मत होतं!
इंग्लंडमध्ये परतल्यावर जॅक्सनने पेंगबोचे इथे मिळालेले केस ब्रिटीश संशोधक आणि मानववंशशास्त्रज्ञ फ्रेड्रीक वूड जोन्स याच्या ताब्यात दिले. जोन्सने तपकीरी लाल छटा असलेल्या त्या केसांवर सुमारे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. त्या केसांचे त्याने मायक्रोफोटोग्राफ्सही काढले. जवळपास दीड महिना त्या केसांवर संशोधन केल्यानंतर तो ते केस प्रत्यक्षात डोक्याचे केस नसून खांद्यावर उगवलेले केस आहेत या निष्कर्षाला आला! हे केस हिमालयात आढळणारी कोणत्याही अस्वलाची प्रजाती किंवा एप्सचे असल्याची शक्यता त्याने ठामपणे फेटाळून लावली. त्याच्या मते हे केस पायाला खूर असलेल्या प्राण्याच्या खांद्यावर उगवलेले होते! मात्रं तो प्राणी नेमका कोणता असावा याबद्दल कोणताही अंदाज वर्तवण्यात जोन्स अपयशी ठरला होता. दुर्दैवाने अधिक संशोधन करण्याची संधी मिळण्यापूर्वीच १९५४ च्या सप्टेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला.
यतीच्या कवटीवरच्या या संशोधनाची बातमी डेली मेलमध्ये प्रसिद्ध होताच टेक्सासमधल्या सॅन अॅन्टोनिओ इथला साहसी बिझनेसमन टॉम स्लिक याची उत्सुकता चाळवली गेली. यतीविषयीची पूर्ण माहिती मिळवल्यावर यतीचा छडा लावण्याच्या दृष्टीने स्लिकने १९५७ मध्ये नेपाळ आणि तिबेटमध्ये एक मोहीम आखली. या मोहीमेत स्वत: स्लीकने पेंगबोचे इथल्या बौद्ध विहाराला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्याने तिथे असलेली यतीची कवटी आणि विशेषत: हाताचं बारकाईने निरीक्षण करुन त्याचे फोटोही काढले होते. स्लीकने काढलेले हे फोटो हे यतीच्या हाताचे पहिलेवहिले फोटो होते.
अमेरीकेत परतल्यावर स्लीकने अनेक मानववंशशास्त्रज्ञ आणि प्राणिशास्त्रज्ञांशी या विषयावर चर्चा केली. शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने तो हात अमेरीकेत आणणं आवश्यक असल्याचं सर्वांच एकमत झाल्यावर स्लीकने त्या दृष्टीने दुसरी मोहीम आखली, पण काही कारणाने तो स्वत: या मोहिमेवर जाण्यास असमर्थ ठरल्यावर त्याने आपला जवळचा मित्रं आणि १९५७ च्या मोहीमेतला सहकारी पीटर बायरन याच्यावर मोहीमेची जबाबदारी सोपवली. कोणत्याही परिस्थितीत पेंगबोचेच्या विहारातून यतीचा हात किंवा त्याचा काही भाग मिळवण्याचं त्याने बायरनला बजावलं होतं! स्लीकच्या सूचनेवरुन बायरनने आपल्या मोहीमेची दोन गटात विभागणी केली होती. एक गट उंच पहाडात यतीचा शोध घेणार होता, तर दुसरा गट हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलातून यतीचा माग काढणार होता!
नेपाळमध्ये पोहोचल्यावर मजल-दरमजल करीत बायरनने पेंगबोचे इथला बौद्ध विहार गाठला. तिथे असलेल्या बौद्ध भिक्षूंकडे आणि लामांकडे त्याने शास्त्रीय संशोधनासाठी यतीचा हात अमेरीकेत नेण्याची परवानगी मागितली. पेंगबोचेच्या प्रमुख लामांनी ही विनंती अर्थात धुडकावून लावली. बायरनने त्यांना हजारो डॉलर्सचं आमिष दाखवलं, परंतु लामा बधले नाहीत. यतीचा हात विहारातून बाहेर नेल्यास भिक्षूंवर आणि एकूणच पेंगबोचे गावावर भयंकर संकट कोसळेल अशी लामांना भीती वाटत होती. त्यातच गोर्या अमेरीकन माणसाने यतीच्या हाताची किंमत पैशात करावी हे त्यांना रुचलं नव्हतं! सरळ मार्गाने यतीचा हात मिळत नाही हे लक्षात आल्यावर बायरनने अखेर चोरीचा मार्ग पत्करला!
बायरनच्या दाव्यानुसार त्याने विहारावर पहारा करणार्या स्थानिक लोकांपैकी एकाशी मैत्री केली. एक दिवस तो पहार्यावर असताना बायरन 'सहज' म्हणून त्याच्याशी गप्पा मारण्याच्या मिषाने विहारात शिरला. बोलताबोलता त्याने त्या पहारेकर्याला गुंगीचं औषध मिसळलेली दारु पाजली. दारु आणि गुंगीच्या औषधाचा परिणाम झाल्यावर त्याला गाढ झोप लागली. बायरनने यतीचा हात असलेली पेटी उघडून तो हात ताब्यात घेतला. सगळा हातच गायब झाला तर लगेच चोरी उघडकीला येईल आणि आपल्यावर सर्वप्रथम संशय घेतला जाईल याची कल्पना असल्याने त्याने त्या हातापैकी केवळ दोनच बोटांची हाडं वेगळी करुन आपल्या खिशात टाकली. पूर्वनियोजीत बेताप्रमाणे बरोबर आणलेली मानवी हाताची हाडं त्या जागी तारेने गुंडाळून त्याने तो हात पुन्हा पेटीत बंदीस्त करुन ठेवला आणि तिथून पोबारा केला!
बायरनचे हे उद्योग सुरु असतानाच हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलांतून यतीचा शोध घेणार्या दुसर्या गटाला अत्यंत दाट जंगलात एका सर्वस्वी अनोळखी प्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्या प्राण्याचे काही केस, विष्ठा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झाडाच्या खोडाच्या आधाराने काटक्या आणि पानं एकत्रं करुन बनवलेली काही भलीमोठी घरटी किंवा खरंतर झोपण्यापुरता बनवलेला बिछाना त्यांच्या दृष्टीस पडला! या बिछानासदृष्य प्रकाराचं बारकाईने निरीक्षण केलं असता, आफ्रीकेतल्या घनदाट जंगलात आढळणारे गोरीला आराम करण्यासाठी ज्याप्रकारे बिछाना तयार करतात, त्याच्याशी याचं साम्य असल्याचंही आढळून आलं! या शोधानंतर यती हा अद्यापही शोध न लागलेला परंतु इतर प्रजातींच्या तुलनेत प्रगत झालेला माकड किंवा एपचा एखादा प्रकार (Primate) असावा असंही एक मत पुढे आलं.
यतीच्या हाताची हाडं चोरल्यावर दुसर्याच दिवशी बायरनने नेपाळमधून भारताचा मार्ग धरला. भारतात प्रवेश करणं त्याला फारसं कठीण गेलं नाही, पण ती हाडं भारतातून बाहेर काढून अमेरीकेत कशी न्यावी हा त्याच्यापुढचा प्रश्नं होता. बायरनने आपली ही अडचण पत्राने स्लीकला कळवताच स्लीकने आपला मित्रं आणि सुप्रसिद्धं हॉलीवूड अभिनेता जेम्स स्ट्युअर्ट याच्याशी संपर्क साधला. स्ट्युअर्ट तेव्हा भारताच्या दौर्यावर आला होता आणि स्लीकच्या शब्दाखातर त्याने ती हाडं आपल्या सामानातून अमेरीकेत आणण्यास ताबडतोब होकार दिला आणि त्याप्रमाणे ती हाडं त्याने अमेरीकेत आणून स्लीककडे पाठवून दिली!
१९६० मध्ये बायरन आणि त्याचे सहकारी अमेरीकेत परतण्याच्या मार्गावर असतानाच सर एडमंड हिलरी आणि अमेरीकन प्राणिशास्त्रज्ञ मार्लिन पर्कीन्स यांच्या भरपूर पूर्वप्रसिद्धी झालेल्या वर्ल्ड बूक तिबेट मोहीमेला सुरवात झाली. हिलरी आणि पर्कीन्सच्या दृष्टीने या मोहीमेचा प्रमुख उद्देश यतीचा शोध घेण्याचा असला तरी त्यांच्याबरोबर अमेरीकेच्या सीआयए या पाताळयंत्री संघटनेचे काही अधिकारीही गुप्तपणे या मोहीमेत शिरलेले होते! तिबेटचा ताबा घेतल्यावर चीन तिथे गुप्तपणे अण्वस्त्रनिर्मीतीसाठी संशोधन करत आहे असा सीआयएला संशय होता! नेपाळमध्ये पोहोचल्यावर पेंगबोचेला जाण्यापूर्वी हिलरीने १९५३ च्या एव्हरेस्ट मोहीमेतला आपला सहकारी असलेल्या तेनसिंगची गाठ घेत यतीबद्दल चर्चाही केली होती.
पेंगबोचेला पोहोचल्यावर हिलरी आणि पर्कीन्स यांनी तिथल्या विहारातल्या लामांची आणि इतर बौद्ध भिक्षूंची गाठ घेतली. शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने यतीची कवटी अमेरीकेत नेण्याची हिलरीने त्यांच्याकडे परवानगी मागितली. पेंगबोचेच्या लामांनी याच मागणीसाठी वर्षभरापूर्वी बायरनला ठाम नकार दिला होता, परंतु हिलरीचं नेपाळी लोकांशी असलेलं नातं वेगळंच होतं. सर्वप्रथम एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा माणूस आणि तेनसिंगचा मित्रं म्हणून त्याच्याबद्दल नेपाळी लोकांमध्ये प्रचंड आदराची भावना होती. यतीच्या कवटीला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची हिलरीने हमी दिल्यावर लामांनी ती कवटी अमेरीकेत नेण्यास होकार दिला, पण कवटीचा संरक्षक म्हणून पेंगबोचेचा गावप्रमुख असलेला शेर्पा खुंजो चुम्बी हा त्या कवटीसह अमेरीकेत येईल आणि एक महिन्याच्या आत ती पुन्हा पेंगबोचेच्या विहारात पोहोचवण्यात यावी अशी अट घातली! हिलरी आणि पर्कीन्स यांनी ताबडतोब या अटी मान्य केल्या आणि ती कवटी ताब्यात घेतली. पेंगबोचेच्या विहारात असलेला हात अमेरीकेत नेण्यास मात्रं हिलरीने नकार दिला कारण तो हात म्हणजे एक शुद्धं थोतांड (hoax) आहे असं त्याचं मत झालं होतं! अर्थात त्याला आणि पेंगबोचेच्या लामांना बायरनने त्या हाताची दोन हाडं लांबवल्याचा पत्ता नव्हता!
दक्षिण कोरीयात सेऊल इथे पोहोचल्यावर पत्रकार परिषदेत हिलरी म्हणाला,
"I have never believed in the existence of the snowman. The yeti is not a strange, superhuman creature as has been imagined. We have found rational explanations for most yeti phenomena. The scalp, has unusual features. It is shaped like a Tibetan priest's cap — rather like a crown — and has a ridge of hair on the top of it. The scalp is hard to explain. It's a convincing sort of specimen. We feel this is the only piece of evidence we haven't found a rational explanation for. It's the sort of thing that must be examined by people better qualified than us, The local people regard it a s a yeti scalp and look upon it with respect."
सेऊल इथल्या पत्रकार परिषदेत एडमंड हिलरी आणि खुंजो चुम्बी
शिकागोतल्या अमेरीकन शास्त्रज्ञांनी यतीची कवटी आणि विशेषत: त्यावर असलेल्या केसांचं काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर हे केस कोणत्याही अज्ञात प्राण्याचे नसून हिमालयात आढळणार्या आणि बोकडाप्रमाणे दिसणार्या सेरो जातीच्या दुर्मिळ हरणाचे आहेत असं त्यांना आढळून आलं! इतकंच नव्हे तर हे केस सेरो जातीच्या हरणाच्या मानेवरचे किंवा खांद्यावरचे असावेत असा त्यांनी निष्कर्ष काढला. अमेरीकन शास्त्रज्ञांनी केलेल्या या निदानामुळे १९५४ मध्ये फ्रेड्रीक वूड जोन्स याने वर्तवलेला अंदाज अचूक असल्याचं आपोआपच सिद्धं झालं! त्याचबरोबर यतीच्या कवटीच्या अस्सलपणाबद्दल अनेक प्रश्नं उभे राहीले ते वेगळेच!
पेंगबोचे विहारातली यतीची कवटी
शिकागोला यतीच्या कवटीचं संशोधन सुरु असतानाच ब्रिटीश शास्त्रज्ञ विल्यम चार्ल्स ऑस्मन हिल लंडन इथे पीटर बायरनने आणलेल्या यतीच्या हाडांवर प्रयोग करत होता. सुरवातीच्या काही प्रयोगांनंतर यतीच्या हाताची ती हाडं ही होमिनीड्स (Hominids) किंवा ग्रेट एप्स वर्गातील आतापर्यंत अज्ञात असलेल्या प्राण्याची आहेत हा त्याने निष्कर्ष काढला. (आधुनिक मानवही याच वर्गात येतो). आणखीन तपशीलवार संशोधनानंतर ती हाडं पुरातन काळातील निअॅन्ड्रेथल मानवाशी साधर्म्य असणारी आहेत असं त्याला आढळून आलं!
निअॅन्ड्रेथल हा आधुनिक मानवाचा सध्या संपूर्णपणे लोप पावलेला पूर्वज आहे असं मानलं जातं. सुमारे अडीच लाख वर्षांपूर्वीपासून ते ४०,००० वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचं पृथ्वीवर अस्तित्वं होतं. उत्क्रांतीच्या चक्रात आधुनिक मानवापुढे निभाव न लागल्याने अखेर निअॅन्ड्रेथल पूर्णत: नामशेष झाले. काही संशोधकांच्या मते निअॅन्ड्रेथल ही संपूर्णपणे वेगळी मानवी प्रजाती होती आणि आधुनिक मानवाबरोबर झालेल्या संघर्षात त्यांचा निभाव न लागल्याने अखेर त्यांचं अस्तित्वं संपुष्टात आलं. आणखीन एका सिद्धांताप्रमाणे सध्याची मानवजात आणि निअॅन्ड्रेथल यांच्यात वंशसंकर घडून आला आणि संख्येने तुलनेने कमी असलेले निअॅन्ड्रेथल मानवजातीत मिसळून जात अखेर लोप पावले!
१९७० मध्ये ब्रिटीश गिर्यारोहक क्रिस बॉनिंग्टनच्या अन्नपूर्णा मोहीमेतला सहकारी डोनाल्ड व्हिलान्स याने एक विचित्रं प्राणी नजरेस पडल्याचा उल्लेख केला आहे. व्हिलान्स आणि त्याचे शेर्पा रात्रीच्या मुक्कामाच्या दृष्टिने तंबू ठोकण्यासाठी जागेच्या शोधात असताना पूर्वी कधीही ऐकू न आलेला आवाज त्याच्या कानावर आला. शेर्पांच्या मते तो आवाज यतीचा होता. रात्री तंबूत आराम करत असताना एक भलीमोठी सावली आसपास वावरत असल्याचं त्याला सतत जाणवत होतं. दुसर्या दिवशी सकाळी तंबूच्या अवतीभोवती असलेल्या बर्फात त्याला मानवी पावलासारखेच पण भलेमोठे ठसे आढळून आले. त्याच संध्याकाळी त्याच्या कँपपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर एक एपसदृष्यं प्राणी त्याच्या नजरेस पडला. व्हिलानने सुमारे वीस मिनिटांपर्यंत त्या प्राण्याचं आपल्या दुर्बिणीतून निरीक्षण केलं. हा प्राणी दोन पायांवर ताठ चालत होता. त्याच्या सर्वांगावर भरपूर केस होते आणि कोणतेही कपडे नव्हते. तो खाण्याच्या शोधात तिथे भटकत असावा असा व्हिलानने अंदाज बांधला. अखेर एका बर्फाच्या उंचवट्याआड तो प्राणी दिसेनासा झाला!
१९७२ मध्ये तीन अमेरीकन प्राणिशास्त्रज्ञ एडवर्ड क्रोनिन, जेफ्री मॅकनीली आणि डॉ. हॉवर्ड एमरी आपल्या शेर्पांसह एव्हरेस्टच्या पूर्वेला असलेल्या अरुण नदीच्या खोर्यात संशोधन मोहीमेवर आले होते. त्यांची ही मोहीम १५ महिने सुरु राहणार होती. एक संपूर्ण वर्ष त्या परिसरात वास्तव्य करुन बदलत्या ऋतूचक्राप्रमाणे प्राण्यांवर होणारा त्याचा परिणाम हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा होता. त्याचबरोबर यतीची गाठ पडल्यास एक प्राणिजमात म्हणूनच त्याचाही अभ्यास करण्याचा क्रोनिनचा इरादा होता!
बेसकँपपासून वर सुमारे १२,००० फूट उंचीवर क्रोनिन, एमरी आणि त्यांच्या दोन शेर्पांना वादळाने गाठलं. घाईघाईत एक बर्यापैकी जागा पाहून त्यांनी तंबू ठोकले आणि दमल्याभागल्या अवस्थेत सर्वजण निद्राधीन झाले. भल्या सकाळी एमरीला जाग आल्यावर तो आपल्या तंबूतून बाहेर आला आणि सहजच तंबूच्या बाजूला असलेल्या बर्फावर नजर जाताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तंबूच्या अगदी जवळून, कोणीतरी चालत गेल्यासारखे बर्फात अगदी स्पष्टं ठसे उमटले होते!
मानवी आकाराचे ते ठसे सुमारे नऊ इंच लांब आणि पाच इंच रुंद होते. ज्या प्राण्याचे ते ठसे होते, तो प्राणी बर्फावरुन अनवाणी चालत गेलेला होता. एमरी आणि क्रोनिन यांनी त्या ठशांचे फोटो काढले आणि त्यावरुन त्या प्राण्याच्या हालचालींचा माग काढण्यास सुरवात केली. उत्तरेकडे असलेल्या उतारावरुन खाली येत त्यांच्या तंबूपासून जेमतेम दीड ते दोन फूट अंतरावरुन जात ते ठसे दक्षिणेच्या दिशेने गेले होते. दक्षिणेच्या उतारावर गेल्यावर काही अंतरावरुन पुन्हा मागे फिरुन तो प्राणी वर चढून आला होता! सुमारे पाच ते सहा वेळा त्या उतारावर चढ - उतार केल्यावर अखेर दक्षिणेला सुमारे अर्धा मैल अंतरावर उघड्या खडकांवर आणि झुडुपांआड अखेर ठशांचा माग हरवला होता!
मॅकनीली तिथे पोहोचल्यावर त्याने त्या ठशांपैकी तीन ठशांचे प्लास्टर ऑफ पॅरीसचे कास्ट बनवून घेतले. दरम्यान क्रोनिनने आसपास तपास केला असता आदल्या दिवशी कँपच्या दिशेने येणार्या त्यांच्या पावलांचे ठसेही त्याच्या नजरेस पडले. आदल्या रात्रभर घोंघावणार्या वार्याचा आणि त्यानंतर सूर्यप्रकाशाचा त्या ठशांवर यत्किंचीतही परिणाम झालेला दिसून येत नव्हता. कोणतीही शंका राहू नये, म्हणून क्रोनिनने त्याच ठशांच्या शेजारी पुन्हा आपले ठसे उमटवले आणि त्याची मोजमापं घेतली. तब्बल बारा तासांच्या फरकानंतरही क्रोनिनच्या दोन्ही ठशांमध्ये तसूभरही फरक पडलेला नव्हता!
क्रोनिन म्हणतो,
"The footprints had not been made by any known, normal mammal. The creature must have been exceptionally strong to ascend this slope in these conditions. No human could have made overnight the length of tracks I could see from the top of the ridge."
क्रोनिनबरोबर असलेल्या शेर्पांना या यतीच्या पाऊलखुणा आहेत याबद्दल तीळमात्रंही शंका नव्हती!
यतीचा ठसा - फोटो: एडवर्ड क्रोनिन
१९६० मध्ये एडमंड हिलरीने बर्फात उमटलेल्या यतीच्या पाऊलखुणा या दुसर्या लहान प्राण्याच्या खुणा असून केवळ वारा आणि सूर्यप्रकाश यांच्या परिणामामुळे त्या बर्फात पसरट होत प्रमाणापेक्षा मोठ्या दिसत असाव्यात असं हिलरीचं मत होतं. क्रोनिनच्या संशोधनानंतर ते चुकीचं होतं हे सप्रमाण सिद्धं झालं! पेंगबोचे इथल्या विहारातली यतीची कवटी अमेरीकेत नेण्यापूर्वी तिथे असलेल्या यतीचा हात शुद्ध थोतांड म्हणून उडवून लावला होता. पीटर बायरनने लांबवलेल्या या हाताच्या हाडांचं निअॅन्ड्रेथलशी साधर्म्य असल्याचं विल्यम चार्ल्स ऑस्मन हिलने सिद्धं केलं होतं. त्या दृष्टीने त्या हाडांचं आणि बायरनने जमा केलेली यतीची विष्ठा आणि केसांचंही संशोधन होणं अत्यावश्यक होतं. या सर्व गोष्टी टॉम स्लिकच्या कलेक्शनमध्ये जमा झालेल्या होत्या, परंतु त्यावर कोणतेही शास्त्रीय प्रयोग सुरु होण्यापूर्वीच १९६२ च्या ऑक्टोबरमध्ये टॉम स्लिकचा मॉन्टनामध्ये विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला! स्लीकच्या मृत्यूनंतर त्याचं सगळं यतीविषयक संशोधन आपसूकच थंडावलं.
१९८० मध्ये लॉरेन कोलमन टॉम स्लिकचं चरित्रं लिहीण्यासाठी संशोधन करत असताना स्लीकच्या एका इस्टेटवर १९५९ मधल्या स्लीकच्या मोहीमेची तपशीलवार माहिती आणि बायरन आणि इतरांनी जमा केलेले यतीचे केस, विष्ठा आणि पावलांचे ठसे आणि बिछान्याचे फोटो त्याच्या हाती लागले! कोलमनने यतीची ती विष्ठा आणि केस शास्त्रीय प्रयोगांसाठी बेल्जीयन प्राणिशास्त्रज्ञ आणि कल्पित प्राण्यांचा शोध घेण्याच्या शास्त्राचा आद्य प्रणेता (Cryptozoologist) बर्नाड ह्यूव्हेल्मन्स कडे पाठवून दिले. स्लीकच्या मोहीमेत आढळलेल्या विष्ठेचं संशोधन केलं असता त्यात आतापर्यंत कधीही न आढळून आलेले परावलंबी जंतू (Parasites) आढळून आले!
ह्यूव्हेल्मन्स म्हणतो,
"Since each animal has its own parasites, this indicated that the host animal is equally an unknown animal. All evidence indicates this to be yet undiscovered primate."
१९८३ मध्ये मायरा शॅकलीने आपल्या Still Living?: Yeti, Sasquatch and the Neanderthal Enigma या पुस्तकात १९४२ मध्ये दोन गिर्यारोहकांना आलेला यतीचा अनुभव नमूद केला आहे. या दोन्ही गिर्यारोहकांना दरीत सुमारे पाव मैल अंतराव दोन विचित्रं प्राणी दृष्टीस पडले होते.
"The height was not much less than eight feet ... the heads were described as 'squarish' and the ears must lie close to the skull because there was no projection from the silhouette against the snow. The shoulders sloped sharply down to a powerful chest ... covered by reddish brown hair which formed a close body fur mixed with long straight hairs hanging downward."
त्याच मोहीमेतल्या आणखीन एका गिर्यारोहक आपला अनुभव सांगतना म्हणतो,
"About the size and build of a small man, the head covered with long hair but the face and chest not very hairy at all. Reddish-brown in color and bipedal, it was busy grubbing up roots and occasionally emitted a loud high-pitched cry."
१९८३ मध्ये अमेरीकन संशोधन डॅनियल टेलर आणि इतिहासतज्ञ रॉबर्ट फ्लेमिंग ज्यु. यांनी नेपाळमधल्या अरुण खोर्यामध्ये संशोधनाची मोहीम हाती घेतली. प्राणिशास्त्रज्ञ जॉन क्रेगहेड आणि मूळचा नेपाळी असलेला संशोधन तीर्थ श्रेष्ठ यांचाही या मोहीमेत समावेश होता. १९७२ मधल्या क्रोनिन आणि मॅकनीली यांच्या मोहीमेत अरूण खोर्यातच आढळलेल्या यतीच्या पाऊलखुणांवरुन त्याच्या अस्तित्वाचा माग घेण्याची त्यांची योजना होती. नेपाळमधील सर्वात घनदाट झाडी असलेलं जंगल अरूण खोर्यात पसरलेलं असल्याने स्थानिक नेपाळी लोक आणि शेर्पादेखील सहसा या खोर्यात शिरत नाहीत. मोहीमेला सुरवात करण्यापूर्वी काठमांडूला पोहोचल्यावर टेलरने नेपाळच्या राजाची भेट घेतल्यावर त्यानेही याच खोर्यात यतीचा शोध घेण्याची टेलरला सूचना दिली.
टेलर म्हणतो,
"Due to its microclimate, the Barun Valley brings in more moisture than any other valley in the Himalayan system. That means the Barun is really dense jungle with a lot of rain. That is why people didn’t settle it. It is so dense that very few people have actually entered it, even the locals who live on its edge. If you’re looking for the last read-out of the wild, it is this valley. I was advised to go there by the King of Nepal, who said, 'If you want to go to the wildest place, where the Yeti might be, it is the Barun.' And when the King says that, you go, because he really knows his country!"
टेलर आणि फ्लेमिंगलाही क्रोनिन - मॅकनीली यांच्याप्रमाणे पावलांचे ठसे आढळून आले. इतकंच नव्हे तर १९५९ मधल्या स्लीकच्या मोहीमेप्रमाणे अरूण खोर्यातच झाडांवर काटक्या आणि पानं वापरुन तयार केलेले बिछानेही त्यांच्या दृष्टीस पडले. स्थानिक शिकार्यांच्या मते हे बिछाने त्या जंगलांमध्ये आढळून येणार्या अस्वलांच्या प्रजातींपैकी रुख बालू (rukh balu) म्हणजेच झाडावर वावरणार्या अस्वलांनी (tree bear) बनवलेले होते! या रुख बालू व्यतिरिक्तं अस्वलांची आणखीन एक प्रजाती त्या जंगलात आढळत होती आणि त्याला स्थानिकांनी भुई बालू (bhui balu) म्हणजेच जमिनीवर वावरणारं अस्वल (ground bear) असं नाव दिलेलं होतं! टेलर आणि फ्लेमिंगनी सहा महिन्यांच्या नेपाळमधल्या वास्तव्यात या दोन्ही अस्वलांचे केस, कवट्या आणि कातडीही जमा केली. टेलर - फ्लेमिंगच्या या मोहीमेतून हाती आलेली माहिती आणि त्यावर करण्यात आलेल्या शास्त्रीय प्रयोगांचा परिणाम यातूनच यती म्हणजे दुसरंतिसरं काही नसून अस्वल असावं ही संकल्पना रुजण्यास सुरवात झाली.
टेलर - फ्लेमिंग मोहीमेतले सदस्य अमेरीकेत परतल्यावर अरुण खोर्यातून आणलेले 'यती'चे केस, वेगवेगळ्या अस्वलांच्या कवट्या आणि कातडी यावर अमेरीकन आणि ब्रिटीश संशोधकांनी प्रयोग करण्यास सुरवात केली. त्यांच्या संशोधनातून समोर आलेली माहिती अत्यंत मनोरंजक होती.
स्थानिक नेपाळी रहिवाशांनी वर्णन केलेल्या अरुण खोर्यातल्या 'रुख बालू' आणि 'भुई बालू' या अस्वलाच्या दोन स्वतंत्र प्रजाती नसून ही दोन्ही अस्वलं म्हणजे आशियात आढळणारं काळं अस्वल (Asiatic black bear) आहे असं त्यांच्या कवट्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगांवरुन सिद्धं झालं! काळं अस्वल जन्माला आल्यानंतर सुरवातीच्या दोन वर्षांपर्यंत झाडांवर वावरत असतं. या कालावधीत पूर्ण वाढ न झालेल्या या अस्वलाच्या बच्चाचं वजन सुमारे ७० किलो (१५० पौंड) असतं. जमिनीवर वावरणार्या आणि १८० किलोपर्यंत (४०० पौंड) वजन असलेल्या दांडग्या स्वजातियांपासून संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने अस्वलाचे हे बच्चे झाडावर मुक्काम ठोकतात! झाडांवर सफाईने वावरताना फांदीवर पकड घेणं सोपं जावं, म्हणून ही अस्वलं त्यांच्या चारही पायांना असलेल्या लहान बोटाचं नख प्रयत्नपूर्वक नेहमीपेक्षा विरुद्ध दिशेने, बाहेरच्या बाजूला वळवतात! बर्फावर, खासकरुन चढ असलेल्या मार्गावरुन चालताना या अस्वलांच्या पुढच्या पंजांच्या ठशावर मागचे ठसे उमटल्यामुळे बाहेरच्या दिशेने वळलेल्या नखाचा बर्फात उमटलेला ठसा हा पायाच्या अंगठ्यासारखा दिसून येतो आणि हे ठसे एखाद्या एप वर्गातल्या द्विपाद प्राण्याचे (hominid) असावेत असा भास उत्पन्नं होतो! अर्थात या सिद्धांतामध्ये अस्वलाचे मागचे पंजे प्रत्येक वेळी अचूकपणे पुढच्या पंजांवरच पडत असावेत हे गृहीतक काहीसं न पटण्यासारखं असलं, तरी हे काळं अस्वल मागच्या दोन्ही पायांवर उभं राहून चालू शकतं हा मुद्दाही तितकाच महत्वाचा होता!
नॅशनल जिऑग्राफीक मॅगझीनचा संपादक बिल गॅरेट म्हणतो,
"The on-site research sweeps away much of the 'smoke and mirrors' and gives us a believable yeti!"
१९८६ मध्ये ८००० मीटर्सपेक्षा उंच असलेली, जगातली सर्व १४ अत्युच्च हिमशिखरं सर्वप्रथम पादाक्रांत करण्याचा विक्रम नावावर असलेल्या रेन्हॉल्ड मेसनरने आपलं शेवटचं शिखर ल्होत्से पादाक्रांत करुन खाली उतरुन येत असताना रात्रीच्या अंधारात एका भल्यामोठ्या प्राण्याने आपल्याकडे पाहून मोठ्याने गुरगुराट केला होता असा दावा केला! बेसकँपवर परतल्यावर मेसनरच्या शेर्पांनी हा प्राणी म्हणजे यती होता असं त्याला ठासून सांगितलं. १३ वर्षांपासून हिमालयाच्या परिसरात अनेकदा गिर्यारोहण मोहिमांवर आलेला असताना त्याच्या कानावर यतीच्या कहाण्या आल्या होत्या. आता यतीशी प्रत्यक्षं सामना झाल्यावर मेसनरने याचा छडा लावण्याचा निश्चय केला!
टेलर आणि फ्लेमिंगच्या मोहीमेतून समोर आलेल्या माहितीवरुन आशियातल्या काळ्या अस्वलांबद्दल महत्वपूर्ण माहिती हाती लागली होती. मात्रं या अस्वलांचं आणि एकंदरच अरूण खोर्यातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने टेलर आणि तीर्थ श्रेष्ठ यांच्या प्रयत्नातून अखेर मकालू-अरुण (नेपाळी उच्चर बरुण - Barun) नॅशनल पार्कची स्थापना झाली. तिबेटच्या सीमेपर्यंत पसरलेल्या सुमारे १५०० चौरस किलोमीटरच्या प्रदेशाचा या अभयारण्यात समावेश करण्यात आला आहे!
अभयारण्याची घोषणा करण्यात आल्यावर अमेरीकन अल्पाईन क्लबचा अध्यक्षं असलेला रॉबर्ट बेट्स म्हणाला,
"This yeti discovery has apparently solved the mystery of the yeti, or at least part of it, and in so doing added to the world’s great wildlife preserves such that the shy animal that lives in trees (and not the high snows), and mysteries and myths of the Himalayas that it represents, can continue within a protected area nearly the size of Switzerland."
१९९१ मध्ये लॉरेन कोलमनने स्लीक मोहीमेत पेंगबोचे इथल्या यतीच्या हाताची हाडं लांबवणार्या पीटर बायरनची गाठ घेतली. बायरनने आपण पेंगबोचे इथून हाताची हाडं चोरल्याचं आणि जेम्स स्ट्युअर्टने ती अमेरीकेत आणल्याचं मान्यं केलं. इतकंच नव्हे तर त्या संदर्भात आलेलं स्ट्युअर्टचं पत्रंही कोलमनला दाखवलं! बायरनकडूनच मानववंशशास्त्रज्ञ जॉर्ज अगोगिनो याने त्या हाडांच्या तुकड्यांपैकी काही तुकडे अद्यापही जपून ठेवले असल्याचं कळताच कोलमनने त्याची गाठ घेतली आणि त्याच्याकडून ते तुकडे मिळवले. या तुकड्यांवर डीएनए टेस्ट्स करण्यात आल्यावर तो डीएनए आधुनिक मानवाशी साधर्म्य दाखवणारा असला तरी माणसाचाच आहे हे खात्रीपूर्वक सांगता येत नव्हतं!
एनबीसीच्या Unsolved Mysteries या कार्यक्रमात संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर महिन्याभरातच पेंगबोचे इथल्या बौद्ध विहारात असलेला तो यतीचा हात चोरीला गेला! आजतागायत त्याचा पत्ता लागलेला नाही!
१९९६ मध्ये अमेरीकेतल्या फॉक्स टेलिव्हीजन नेटवर्कवर Snow Walker या नावाने यतीचा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला. फॉक्स टीव्हीच्या दाव्यानुसार नेपाळमध्ये गिर्यारोहण करणार्या एका पती-पत्नीने हा व्हिडीओ शूट केला होता आणि त्यात दिसलेला प्राणी हा यती होता. यतीवर संशोधन करणार्या अनेक शास्त्रज्ञांनी हा व्हिडीओ म्हणजे शुद्ध खोडसाळपणा (hoax) असल्याचं ठणकावलं, पण जेफ मेलड्रमसकट यतीवर संशोधन करणार्या काही मोजक्या शास्त्रज्ञांचा मात्रं हा व्हिडीओ खरा असावा असा ग्रह झाला! अखेर काही या कार्यक्रमाचे निर्माते असलेल्या पॅरामाऊंटने हा व्हिडीओ बनावट असून केवळ आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने बनवण्यात आला होता हे जाहीर करुन या वादावर पडदा टाकला! फॉक्स टीव्हीवरच नंतर सादर करण्यात आलेल्या The World's Greatest Hoaxes या कार्यक्रमात याचा तपशीलवार खुलासा करण्यात आला!
२००० मध्ये रेन्हॉल्ड मेसनरने My Quest for the Yeti: Confronting the Himalayas' Deepest Mystery या आपल्या पुस्तकात १९८६ पासून यतीच्या शोधार्थ केलेल्या आपल्या भटकंतीचं वर्णन केलं आणि आपले निष्कर्ष मांडले. मेसनरच्या मते यती हा एप सदृष्यं प्राणी वगैरे नसून हिमालयात आढळणारं तपकीरी रंगाचं अस्वल (Himalayan Brown bear) किंवा खासकरुन तिबेटमध्ये आढळणारं निळसर रंगाची झाक असलेलं तिबेटी अस्वल (Tibetan Blue bear) या दुर्मिळ जातीच्या अस्वलांना गैरसमजातून यती म्हणून ओळखलं गेलं आहे! आपल्या पुस्तकात मेसनरने आपण स्वसंरक्षणार्थ एका यतीची किंवा तपकीरी अस्वलाची शिकार केल्याचाही दावा केला आहे!
हिमालयातील अस्वलांना गैरसमजातून यती मानलं जात असल्याचा मेसनरचा तर्क काही प्रमाणात सनसनाटी असला तरी पूर्णपणे दुर्लक्षं करण्यासारखा नक्कीच नव्हता. मेसनरने वर्णन केलेलं तपकीरी अस्वल किंवा तिबेटी अस्वल ही दोन्ही अस्वलं आपल्या चारही पंजांवर चालू शकत होती तशीच केवळ मागच्या पायांवर उभी राहून माणसाप्रमाणे दोन पायांवरही चालू शकत होती. मात्रं मेसनरने आपल्या पुस्तकात केलेलं एका प्रसंगाचं वर्णन मात्रं यती हा अस्वल आहे या त्याच्या दाव्याला छेद देणारा होता. त्याच्या दाव्यानुसार त्याने खड्या चढाईच्या मार्गावरुन यती किंवा अस्वलाला द्विपाद प्राण्याप्रमाणे मागच्या दोन पायांवर उभं राहून चढून जाताना पाहिलं होतं. जगभरातल्या प्राणिशास्त्रज्ञांच्या मते अस्वलाच्या शारिरीक रचनेचा विचार करता मागच्या दोन पायांवर पूर्ण देहाचा भार पेलून तोल सांभाळात पहाडावर चढणं अस्वलाला अशक्यं आहे! दुसरं म्हणजे अस्वलाच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार चढणीच्या रस्त्यावर चारही पायांचा वापर करणं हे संयुक्तीक होतं!
२००७ मध्ये Destination Truth या प्रसिद्ध अमेरीकन कार्यक्रमाचा संचालक जोशुआ गेट्स याने यतीच्या शोधात नेपाळ आणि तिबेटमध्ये एका मोहीम काढली. गेट्सच्या मोहीमेतील शास्त्रज्ञांना नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या परिसरात यतीसदृष्यं पाऊलखुणा आढळून आल्या. यापैकी प्रत्येक ठसा हा सुमारे ३३ सेमी लांब आणि २५ सेमी रुंद होता. प्रत्येक पावलाला पाच बोटं असल्याचं आणि हे ठसे द्विपाद प्राण्याचे असल्याचं स्पष्टं दिसून येत होतं. या ठशांचेही प्लास्टर कास्ट बनवण्यात आले. जेफ मेलड्रमच्या मते हे ठसे इतके अचूक आणि स्पष्टं होते की यात कोणतीही लबाडी असण्याची शक्यताच नव्हती. हे ठसे मनुष्यप्राण्याचे किंवा टेलर - फ्लेमिंग मोहीमेत वर्णन केल्याप्रमाणे अस्वलाचे असण्याची शक्यताही त्याने साफ फेटाळून लावली.
गेट्सच्या मोहीमेनंतर वर्षभरातच २००८ मध्ये मेघालयातल्या जारो टेकड्यांच्या परिसरात मानववंशशास्त्रज्ञ दिपू मरक यांना एका अज्ञात प्राण्याचे काही केस आढळून आले. इंग्लंडच्या ऑक्सफर्ड ब्रूक युनिव्हर्सिटीतील प्राणिशास्त्रज्ञ अॅना नेक्रीस, सूक्ष्मजीवतज्ञ जॉन वेल्स आणि प्राणिशास्त्रज्ञ आणि एप्सच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेले इयन रेडमंड यांच्या संशोधनातून या केसांचं आणि १९५३ मध्ये एव्हरेस्टच्या मोहीमेनंतर पुन्हा हिमालयात आलेला असताना एडमंड हिलरीला मिळालेल्या प्राण्याच्या केसांशी यांचं साधर्म्य असल्याचं आढळून आलं! या केसांच्या डीएनए संशोधनातून अखेर हे केस हिमालयात आढळणार्या एका विशिष्ट प्रकारच्या बोकडाचे (Himalayan goral) आहेत असं आढळून आलं.
२००९ मध्ये गेट्स पुन्हा यतीच्या शोधार्थ हिमालयात आला. एव्हरेस्टच्याच परिसरात शोध घेताना एका स्थानिक शिकार्याने त्याला काही केस दाखवले. अमेरीकेत परतल्यावर त्या केसांचं डीएनए पृथ:करण केलं असता त्यात असलेलेआ डीएनए सिक्वेन्स आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्याही प्राण्याशी जुळत नसल्याचं स्पष्टं झालं.
२०१० मध्ये चीनमध्ये काही शिकार्यांनी एक विचित्रं प्राणी जिवंत पकडल्याचा दावा केला. हा प्राणी चार पायांवर चालणारा होता, आणि याला कांगारुप्रमाणे मजबूत शेपूट होती. त्याच्या सर्वांगावर अगदी तुरळक केस दिसून येत होते. हा प्राणी म्हणजेच यती असून त्याच्या काही सवयी अस्वलाप्रमाणे असल्याचा चिनी अधिकार्यांनी दावा केला. पूर्ण संशोधनाअंती हा प्राणी सिव्हेट वर्गातला असून काही रोग झाल्यामुळे त्याच्या देहावरचे सगळे केस गळून गेले असल्याचं निष्पन्न झालं!
चिन्यांनी पकडलेला 'यती' - सेव्हीक
२०११ मध्ये रशियन सरकारने आपल्या शास्त्रज्ञांनी यतीचा शोध लावला असून जगभरातल्या शास्त्रज्ञांना त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एका परिषदेचं आमंत्रण दिलं! रशियन शास्त्रज्ञांचा आणि परिषदेला हजर असलेल्या आणि यतीला प्रत्यक्षं पाहिल्याचा दावा करणार्या काही रशियन नागरिकांचा यतीचं अस्तित्व सिद्ध ९५% सिद्ध करण्याइतका आपल्याकडे पुरावा आहे असा दावा होता! मात्रं प्रत्यक्षात रशियनांचा हा दावा अगदीच फुसका बार ठरला. जेफ मेल्ड्रमसारख्या तिथे हजर असलेल्या शास्त्रज्ञांच्या मते हा सगळा प्रकार म्हणजे एकूणच एक निव्वल पब्लिसिटी स्टंट होता. रशियनांनी यतीच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून ज्या काही वस्तू मांडल्या होत्या त्या बनावट होत्या हे अगदी सहजपणे दिसू शकत होतं! इतकंच नव्हे तर त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात रशियनांनीच यतीला पकडल्याचाही दावा केला! या दाव्यानुसार एका शिकार्याने अस्वलासारख्या दिसणार्या एका प्राण्याला आपल्या बकर्यांवर हल्ला करताना पाहिल्यानंतर त्याच्यावर बंदूक चालवली. तो प्राणी पसार झाल्यावर रशियन बॉर्डर पेट्रोलच्या जवानांनी एका गोरीलाप्रमाणे दिसणार्या द्विपाद मादीला जंगलातून 'अटक' केली! गोरीलासदृष्यं दिसणारी ही मादी पानं-फळं तसंच कच्चं मांसही खात असल्याचंही दडपून सांगण्यात आलं. अर्थातच हा सगळा प्रकार बनावट (hoax) होता हे पुढे सिद्धं झालं!
२०११ मध्येच पेंगबोचे इथल्या बौद्ध विहारातून पीटर बायरनने लांबवलेल्या यतीच्या हाताच्या हाडावर डीएनए संशोधन करण्यात आलं. संशोधनाअंती या हाडात आढळलेला डीएनए आधुनिक मानवाच्या डीएनएशी मिळताजुळता असल्याचं निष्पन्नं झालं! हे संशोधन करणारा डॉ. रॉब ओजेन म्हणाला,
"We have got a very, very strong match to a number of existing reference sequences on human DNA databases... Human was what we were expecting and human is what we got."
अर्थात या हाडांमध्ये मानवी डीएनए आढळून आला असला, तरी आधुनिक मानवाशी तो १००% जुळत नाही हे देखिल ओजेनने स्पष्टं केलं!
२०१३ मध्ये ऑक्स्पफर्ड आणि ल्यूसर्न युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आणि रिसर्च सायंटीस्ट म्हणून काम करणार्या ब्रायन साईक्सने यतीच्या व्युत्पत्तीचा शास्त्रीय दृष्टीने छडा लावण्याच्या दृष्टीने आणि त्याचं मूळ शोधून काढण्याच्या इराद्याने जगभरात कोणाकडेही यतीच्या देहाचा कोणत्याही स्वरुपातला आणि कितीही लहान नमुना असला तरी तो संशोधनासाठी आपल्याकडे पाठवण्याचं आव्हान केलं. साईक्सच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ५७ नमुने जमा झाले! यामध्ये यतीचे केस, दात आणि अगदी सूक्ष्म पेशींच्या स्लाईड्सचाही समावेश होता! या ५७ नमुन्यांपैकी ३६ नमुन्यांची संशोधनासाठी निवड करण्यात आली.
साईक्सने निवड केलेल्या या सर्व ३६ नमुन्यांच्या MT-RNR1 (Mitochondrially encoded 12S ribosomal RNA) या जीनच्या डीएनए संशोधनास केलं. या ३६ नमुन्यांपैकी ३४ नमुने आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्या ना कोणत्या प्राण्याशी पूर्णपणे जुळत असल्याने बाद करण्यात आले. लडाख आणि भूतानमध्ये आढळून आलेल्या यतीच्या केसाचा नमुना जीनबँक या ज्ञात प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय डेटाबेसमध्ये असलेल्या जीन्सशी जुळवून पाहिल्यावर सुमारे १,२०,००० वर्षांपासून ४०,००० वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात असलेल्या हिम अस्वलाच्या (Polar Bear) नॉर्वेतल्या स्वालबँड इथे सापडलेल्या जबड्याच्या हाडाशी हे डीएनए १००% जुळत असल्याचं निष्पन्न झालं!
डीएनए संशोधनाच्या निष्कर्षांवरुन साईक्सने एकेकाळी हिम अस्वलाचं हिमालयात अस्तित्वं होतं आणि हिमालयात अद्यापही आढळणार्या तपकीरी अस्वलाशी वर्णसंकर झाल्यामुळे निर्माण झालेल्या अस्वलाच्या नवीन प्रजातीलाच गैरसमजातून यती म्हणून ओळखलं जात होतं!
साईक्स म्हणतो,
"I think this bear, which nobody has seen alive, may still be there and may have quite a lot of polar bear in it. It may be some sort of hybrid and if its behaviour is different from normal bears, which is what eyewitnesses report, then I think that may well be the source of the mystery and the source of the legend."
केंब्रिज युनिव्हर्सिटीत जेनेटीक्स प्राध्यापक बिल अॅमॉसने यतीचा डीएनए हिम अस्वलाशी मिळताजुळता असल्याबद्दल शंका उपस्थित केली, परंतु साईक्सच्या संशोधनाप्रमाणे यतीचे म्हणून सापडलेले केस हे अस्वलाचे आहेत याबद्दल त्याला शंका नव्हती. हिमालयात वावरणार्या अस्वलाच्याच प्रजातीला यती समजलं जात असावं असं अॅमॉसचं मत होतं!
डेन्मार्कच्या कोपनहेगन युनिव्हर्सिटीतला शास्त्रज्ञ रॉस बार्नेटला मात्रं हिमालयात हिम अस्वलांचं अस्तित्वं ही कल्पना अफलातून पण अवास्तव वाटत होती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतच काम करणार्या शास्त्रज्ञ सेरिड्वेन एडवर्ड्सबरोबर त्याने या डीएनएवर स्वतंत्र संशोधनास सुरवात केली. लडाख आणि भूतान इथे आढळलेल्या केसांच्या डीएनएवर बारकाईने संशोधन केल्यावर साईक्स आणि त्याच्या सहकार्यांच्या हातून झालेली एक चूक त्यांच्या नजरेस पडली.
साईक्सच्या दाव्याप्रमाणे यतीच्या केसांचा डीएनए ४०,००० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या हिम अस्वलाशी जुळत होता. प्रत्यक्षात हा डीएनए पुरातन हिम अस्वलाशी जुळणारा नसून सध्या अस्तित्वात असलेल्या हिम अस्वलाशी थोड्या प्रमाणात जुळत होता. परंतु या हिम अस्वलापेक्षाही हा डीएनए हिमालयात आढळणार्या तपकीरी अस्वलाच्या प्रजातीशी मिळताजुळता होता!
बार्नेट आणि एडवर्ड्स यांच्याप्रमाणेच कॅन्सास युनिव्हर्सिटीचा शास्त्रज्ञ रॉबर्ट पाईन आणि सान्ता मारीया युनिव्हर्सिटीचा संशोधक एलिझर गुटिरेझ यांनीही स्वतंत्रपणे केलेल्या संशोधनातून साईक्सचा हिम अस्वलाचा दावा साफ खोडून काढला. आपल्या संशोधनावरच्या पेपरमध्ये पाईन - गुटीरेझ यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावलं,
"There is no reason to believe that Sykes et al.'s two samples came from anything but ordinary brown bears."
साईक्सचं संशोधन आणि त्याच्या निष्कर्षांना कडक टीकेला सामोरं जावं लागल्यावर या प्रकरणाचा निर्णायक सोक्षमोक्ष लावण्याच्या दृष्टीने आयकन फिल्म्स या कंपनीने बफेलो युनिव्हर्सिटीत अस्वलांची उत्क्रांती आणि जेनेटीक्स या विषयावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञ शार्लोट लिन्डक्विस्ट हिच्याशी संपर्क साधला. यतीचा शोध लावण्यापेक्षाही दोन दुर्मिळ जातीच्या अस्वलांच्या अभ्यासाची संधी मिळवून देणार्या संधीला तिने नकार दिला असता तरच आश्चर्य होतं!
लिन्ड्क्विस्टच्या मते साईक्सने मायटोकॉन्ड्रीयल डीएनएबद्द्ल केलेल्या संशोधनात इतरांनी सिद्धं केलेल्या चुका तर होत्याच, पण त्याचबरोबर जा विशिष्टं भागातल्या अस्वलांवर त्याने आपलं लक्षं केंद्रीत केलं होतं, त्या भागात हिम अस्वलं, तपकीरी अस्वल आणि काळी अस्वलं या तीनही प्रजातींची अस्वलं भरपूर प्रमाणात आढळून येत होती! त्यामुळे या परिसरात आढळणार्या कोणत्याही अस्वलाचा किमान (बेसिक) डीएनए सिक्वेन्स एकमेकांशी बर्याच प्रमाणात मिळताजुळता होता. अशा परिस्थितीत ४०,००० वर्षांपूर्वीच्या हिम अस्वलाशी डीएनए जुळण्याचा साईक्सने केलेला दावा साफ चुकीचा होता, कारण तो डीएनए त्या परिसरातल्या कोणत्याही अस्वलाशी सहज मॅच होण्याची शक्यता होती!
एखाद्या प्रजातीचा डीएनए नेमका १००% जुळण्यासाठी मायटोकॉन्ड्रीयल डीएनएच्या अनेक वेगवेगळ्या भागांवर आणि जीन्सवर अत्यंत बारकाईने आणि तपशीलवार संशोधन करण्याची आवश्यकता असते. आयकन फिल्म्सने उपलब्ध केलेल्या 'यती'च्या नऊ वेगवेगळ्या नमुन्यांवर लिन्डक्विस्ट आणि तिच्या सहकार्यांनी हे सर्व प्रयोग केल्यावर नऊपैकी आठ नमुने हे हिमालयात आढळणारी काळी अस्वलं, तिबेटी निळं अस्वल, हिमालयन तपकीरी अस्वल यांचे होते तर उरलेला नमुना हा चक्कं गावठी कुत्र्याचा होता!
लिन्डक्विस्टच्या या संशोधनातूनच हिमालयात आढळणार्या अस्वलांच्या विविध प्रजातींबद्द्ल अत्यंत महत्वाची माहितीही हाती आली. हिम अस्वलं आणि अस्वलाच्या इतर प्रजाती सुमारे ४०,००० वर्षांपासून एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र प्रजाती म्हणून अस्तित्वात आल्या आहेत! सर्वात विस्मयकारक गोष्टं म्हणजे हिमालयातलं तपकीरी अस्वलही इतर प्रजातींपासून स्वतंत्र झालेलं आहे! हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारं तपकीरी अस्वल आणि तिबेटमध्ये आढळणार्या तपकीरी अस्वलापासून सुमारे ४०,००० वर्षांपूर्वीच त्याने फारकत घेतलेली आहे! या अस्वलाचे जीन्स आपल्या भाईबंदांपेक्षा वेगळे आहेत! इतर अस्वलांच्या तुलनेत हिमालयातल्या या तपकीरी अस्वलाचं रुपही बदललेलं आहे!
२०१७ मध्येच डॅनियल टेलरचं यतीबद्द्ल तपशीलवार विश्लेषण करणारं Yeti: The Ecology of a Mystery हे पुस्तक प्रसिद्धं झालं. यतीच्या इतिहासाचा आणि एरीक शिप्टनपासून ते क्रॉनिन - मॅकनीली आणि २००७ मध्ये गेट्सला आढळलेल्या यतीच्या पाऊलखुणांचा आणि इतिहासाचा त्यात मागोवा घेतलेला आहे. या सर्व संकलनातून टेलरनेही यती म्हणजे दुसरंतिसरं काही नसून हिमालयात आढळणारी विविध जातीची अस्वलंच आहेत असं ठामपणे प्रतिपादन केलं आहे. आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ टेलरने रॉयल जिऑग्राफीकल सोसायटीच्या जुन्या कागदपत्रांमध्ये आढळलेला आणि पूर्वी कधीही प्रसिद्धं न झालेला एरीक शिप्टनने १९५१ मध्ये काढलेला एक फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यात एका झाडाच्या बुंध्याव अस्वलाच्या नख्यांमुळे खरवडण्याच्या खुणा (Scratch Marks) स्पष्टपणे आढळून येतात!
२००० मध्ये आपल्या पुस्तकात मेसनरने यती हे अस्वल असल्याचा केलेला दावा डीएनए संशोधनामुळे अधिकच बळकट झालेला आहे!
यतीबद्दल इतका उहापोह केल्यानंतर आणि यतीचे नमुने म्हणून मिळालेले केस, हाडं वगैरे हिमालयात आढळणार्या अस्वलांच्या विविध प्रजातीपासून मिळालेले आहेत हे वैज्ञानिक दृष्टीने सिद्धं झालेलं असूनही काही प्रश्नं अनुत्तारीत राहतात.
१९५९ मध्ये टॉम स्लिकच्या मोहीमेत आढळून आलेली यतीची विष्ठा ही नेमकी कोणत्या प्राण्याची आहे?
बर्नाड ह्यूव्हेल्मन्सच्या संशोधनातून आतापर्यंत कधीही न आढळून आलेले परावलंबी जंतू (Parasites) आढळून आले आहेत. एप वर्गातला (primate) हा प्राणी नेमका कोण? यती हे अस्वल आहे असं सिद्ध करणार्या शास्त्रज्ञांसह या प्राण्याबद्दल आजतागायत कोणालाही काही स्पष्टीकरण देता आलेलं नाही!
यातूनच पुढे येणारा दुसरा प्रश्नं म्हणजे हिमालयासारख्या अतिथंड हवामानाच्या आणि बर्फाच्छादीत प्रदेशात एपवर्गीय प्राणी टिकून राहणं कितपत शक्यं आहे?
मूळचा रशियन असलेला टेनेसी युनिव्हर्सिटीत प्राणिशास्त्राचा प्राध्यापक असलेलेला व्लादीमीर डिनेट्सच्या मते एप वर्गीय प्राणी हिमालयात टिकून राहणं अशक्यं नसलं तरी हे केवळ हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलांमध्येच केवळ शक्यं आहे. मात्रं या जंगलांमध्ये वस्ती करुन राहणार्या शेर्पा आणि इतर लोकांच्य दृष्टीआड राहत अन्नाच्या शोधार्थ भटकणं हे त्याच्यामते निव्वळ अशक्यं आहे!
डिनेट म्हणतो,
"There are places in the Himalayas where a population of large apes could theoretically survive. But all these places have lots of people living off the land, so all local species of mammals larger than a rat are regularly hunted by various means."
हिमालयात असलेलं प्रतिकूल हवामानही एपवर्गीयांच्या दृष्टीने मारक ठरणारं आहे. जपानमध्ये आढळणार्या आणि वर्षातले किमान काही महिने बर्फाळ जमिनीवर वावरणार्या जपानी मॅकॅक (Macaque) जातीच्या माकडांनाही हिमालयासारख्या प्रदेशात थंडीच्या काळात कमी उंचीवरच्या प्रदेशांमध्ये उतरुन यावं लागेल तिथे इतरांची काय कथा? हिमालयात वावरणारी एपची प्रजाती असलीच तर खाली मोजक्याच असलेल्या जंगलात छपून राहणं त्यांच्यादृष्टीने अशक्यंच आहे! अर्थात हे सर्व मुद्दे विचारात घेतले तरी हिमालयात एप प्रजातीचा प्राणी टिकूच शकणार नाही असं खात्रीपूर्वक म्हणणं अशक्यं आहे! वर्षानुवर्षांच्या अस्तित्वात एपच्या एखाद्या जातीने तिथल्या बर्फाळ वातावरणाशी कदाचित जुळवून घेतलंही असेल! व्हू नोज?
यतीच्या संदर्भात आणखीन एक अत्यंत महत्वाचा प्रश्नं म्हणजे कोणाच्याही दृष्टीस न पडता एखाद्या मोठ्या प्राण्याची प्रजाती पृथ्वीवर आपलं अस्तित्वं राखू शकते का?
आतापर्यंत शोध लागलेल्या अनेक प्राण्यांच्या आणि पुरातन मानवी प्रजातींचा विचार केला तर हे अजिबात अशक्यं आहे असं म्हणता येत नाही. २००८ मध्ये सायबेरीयात असलेल्या एका गुहेत डेनिसोवानन या पुरातन मानवाचे अवशेष सर्वप्रथम आढळून आले आहेत. कार्बन डेटींगवरुन ही मानवी जमात ४०,००० वर्षांपूर्वी अस्तित्वात होती हे सिद्धं झालं, परंतु २००८ मध्ये शोध लागेपर्यंत त्यांच्या अस्तित्वाचा एकही पुरावा आढळलेला नव्हता!
आफ्रीकेच्या जंगलात आजही अस्तित्वात असणार्या ह्युरॉनी किंवा ऑका अदिवासींबद्दलही हेच म्हणता येईल! त्यांच्या अस्तित्वाबद्दल माहिती असली तरी वर्षानुवर्ष त्यांनी आधुनिक मानवी जीवनाशी संपर्क टाळलेला आहे. अंदमान परिसरातल्या अनेक आदीवासी प्रजातींनीही स्वत:ला आधुनिकतेचा स्पर्श होवू दिलेला नाही!
१९९३ आणि १९९४ या दोन वर्षात व्हिएतनामच्या 'द लॉस्ट वर्ल्ड' या नावाने ओळखल्या जाणार्या घनदाट जंगलांमध्ये एक अँटलोप आणि दुसरा जंगली बैल अशा दोन वेगवेगळ्या प्राण्यांच्या नवीन प्रजाती शास्त्रज्ञांना आढळून आल्या! या प्राण्यांवर आणि त्यांच्या डीएनएवर तपशीलवार संशोधन केल्यावर हे दोन प्राणी हे आतापर्यंत पूर्णपणे अज्ञात असलेल्या प्रजातींपैकी आहेत असं सिद्धं झालं! याच जंगलांमध्ये अनेक रहिवाशांच्या दृष्टीस पडलेल्या आणि मानवसदृष्यं द्विपाद प्राण्याचा मात्रं अद्यापही पत्ता लागलेला नाही! सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या प्राण्याचं वर्णन हिमालयातल्या यतीशी कमालीचं साधर्म्य दर्शवणारं आहे!
इंटरनॅशनल क्रिप्टोझूऑलीजीकल सोसायटीचा सेक्रेटरी जे. रिचर्ड ग्रीनव्हील याने व्हिएतनामच्या शेजारी असलेल्या चीनमधल्या येरेन (Yeren) या जंगलात वावरणार्या एप - मानवाचा शोध घेण्यासाठी १९९४ मधे अमेरीकन आणि चीनी शास्त्रज्ञांची एक मोहीम काढली. चीनमधल्या अत्यंत दूरच्या प्रदेशात असलेल्या जंगलाच्या आसपास राहणार्या स्थानिक लोकांकडून ग्रीनव्हीलला येरेनबद्दलच्या अनेक कहाण्या कळल्या. या जंगलामध्ये आढळून आलेल्या केसांचे अनेक नमुने ग्रीनव्हीलने जमा केले.
शांघायच्या न्यूक्लीअर फिजीक्स लॅबमध्ये या केसांचं पृथक्करण केलं असता समोर आलेली माहिती काहीशी आश्चर्यकारक होती. एप वर्गातल्या प्रत्येक प्रजातीच्या शरीरात (मानवासकट) लोह आणि तांबं हे दोन्ही धातू एका विशिष्ट प्रमाणात आढळून येतात. परंतु ग्रीनव्हीलला मिळालेल्या केसांमध्ये आढळून आलेलं या दोन्ही धातूंच प्रमाण आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्याही एप वर्गीय (Primate) प्राण्यामध्ये आढळलेल्या प्रमाणापेक्षा भरपूर जास्तं होतं! याचा अर्थ स्पष्टं होता तो म्हणजे हे केस ज्या प्राण्याचे होते त्याचा आजतागायत कोणालाही पत्ता लागलेला नव्हता!
यती दिसण्याच्या संदर्भात अनेकदा हिमालयाच्या परिसरात असलेल्या अस्वलांना गैरसमजातून यती म्हणून ओळखलं जात असण्याची बरीच शक्यता आहे. डॅनियल टेलरने अस्वलांच्या पायात वळलेल्या नखामुळे मानवी पावला प्रमाणे त्यांची पावलं दिसू शकतात हा तर्कही सर्वस्वी नाकारता येत नसला तरी पूर्ण मान्यही करता येत नाही.
युरोपचा अपवाद वगळता जगभरातल्या जवळपास सर्व खंडात पिढ्यान पिढ्या जंगलात आढळणार्या एप सदृष्यं प्राण्याचं वर्णन कथांमधून आढळतं. दळणवळणाची फारशी साधनं उपलब्ध नसतानाच्या काळात जवळपास एकसारखंच वर्णन असलेल्या कथा हा केवळ योगायोग की एकाच पुरातन मानव जातीतले हे घटक वेगवेगळ्या प्रांतात विखुरले गेले आणि स्थानिक कथांमध्ये मानाचं स्थान पटकावून बसले? हिमालयातला यती, बांग्लादेशातला बन-मानूष, मेघालयातल्या जारो टेकड्यांच्या परिसरातला मन्डे बारुन्ग, रशियातला चुचुना, व्हिएतनाममधला बातुतूत, चीनमधला येरेन आणि अमेरीकेतला प्रसिद्ध बिगफूट किंवा सॅसक्वाच हे सर्व एकाच कुळातले की वेगवेगळे? आणि यांच्यापैकी कोणी खरोखरच अस्तित्वात आहे किंवा होतं का?
शार्लोट लिन्डक्विस्टने यतीचे म्हणून मिळालेले सर्व नमुने हे अस्वलाचे होते हे सिद्धं केलं असलं तरी यतीच्या अस्तित्वाची शक्यता ती पूर्ण नाकारत नाही.
"We’re never going to be able to 100 percent prove that yetis do not exist!" ती म्हणते, "Science simply can’t say that something is definitively untrue. You can’t prove a negative."
नॅशनल सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशनची डायरेक्टर असलेली युजेन स्कॉटचंही मत लिन्डक्विस्टप्रमाणेच आहे.
"I hope there is a yeti! There wont be a single scientist in the country who would not be excited by the idea of existence of a strange primate unknown so far of ancient races of mankind! But I and other scientists would rather know than believe and so far the evidence is unfortunately unconvincing."
नेपाळ आणि तिबेटमध्ये पिढ्यान पिढ्या वास्तव्यास असणार्या शेर्पांचा आजही यतीच्या अस्तित्वावर गाढ विश्वास आहे. यतीवर विश्वास असणार्यालाच योग्य वेळी यती दिसतो असं शेर्पा मानतात! नेपाळमध्ये दरवर्षी होणार्या मनी रिम्बू उत्सवात होणार्या बौद्ध भिक्षू विविध देवतांचे मुखवटे घालून धार्मिक विधी आणि नृत्य करतात. यापैकी एक मुखवटा यतीचा असतो! भूतानमध्ये तर यतीसाठी साकतेंग अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे! भूतानमध्ये यतीला मिगोई या नावाने ओळखलं जातं!
कांगो नदीच्या खोर्यातल्या आदीवासी लोकांनी झेब्रा आणि जिराफ यांचं मिश्रण असलेल्या प्राण्यासारख्या कहाण्या पाश्चात्यांना सांगितल्या तेव्हा त्या अर्थातच अफवा म्हणून उडवून देण्यात आल्या. अखेर १९०१ मध्ये हॅरी जॉन्स्टनला या प्राण्याची कातडी आणि कवटी आढळल्यावर ओकापीच्या अस्तित्वाची खात्री पटली. त्याच्याही आधी १८६० मध्येच आफ्रीकन आदीवासींनी जंगलात वावरणार्या मानवसदृष्यं प्राण्याचा सांगितलेल्या अनुभवांवरही पाश्चात्यांनी सुरवातीला विश्वास ठेवला नाही. परंतु अखेर चिंपांझी अस्तित्वात आहेत हे सिद्धं झालं. पॅसिफीकमधल्या कमोडो बेटांवर असलेल्या भल्यामोठ्या सरड्यांच्या (Komodo Dragons) कथाही डच दर्यावर्दीं प्रत्यक्षं तिथे पोहोचेपर्यंत थोतांडं (hoax) म्हणूनच उडवून लावण्यात आल्या होत्या. तसंच काहीतरी यतीच्या बाबतीतही झालं असेल का?
शास्त्रीयदृष्ट्या यती अस्तित्वात नाही हे १००% पुराव्याने सिद्ध होत नाही तो पर्यंत यतीचा शोध सुरुच राहील हे नि:संशय!
कोणी सांगावं, आणखीन काही वर्षांनी हिमालयाच्या बर्फातून एखादा यती खराच प्रगट होईलही!
संदर्भ :-
------------
Among the Himalayas - लॉरेन्स वॅडेल
Mount Everest The Reconnaissance, 1921 - चार्ल्स हॉवर्ड-बरी
Unknown Hominids and New World legends - बेसिल कर्टली
Attack on Everest - नील मॅकिन्टायर
Himmler’s Crusade: The Nazi Expedition to Find the Origins of the Aryan Race - क्रिस्तोफर हेल
Seven Years in Tibet - हेन्रीच हॅरर
Everest 1951: The Mount Everest Reconnaissance Expedition 1951 - एरीक शिप्टन
On the Track of Unknown Animals - बर्नाड ह्यूव्हेल्मन्स
Man of Everest — The Autobiography of Tenzing - तेनसिंग नोर्गे, जेम्स रॅम्से उलमन
Still Living?: Yeti, Sasquatch and the Neanderthal Enigma - मायरा शॅकली
Tom Slick and the Search for Yeti - लॉरेन कोलमन
Tom Slick: True Life Encounters in Cryptozoology - लॉरेन कोलमन
Adventure Travels in the Himalaya - जॉन अँजेलो जॅक्सन
The Arun: A Natural History of the World’s Deepest Valley - एडवर्ड क्रॉनिन
My Quest for the Yeti: Confronting the Himalayas' Deepest Mystery - रेन्हॉल्ड मेसनर
Yeti: The Ecology of a Mystery - डॅनियल टेलर
Genetic analysis of hair samples attributed to yeti, bigfoot and other anomalous primates - ब्रायन साईक्स आणि इतर
No need to replace an "anomalous" primate (Primates) with an "anomalous" bear (Carnivora, Ursidae) - रॉबर्ट पाईन आणि एलिझर गुटिरेझ
Evolutionary history of enigmatic bears in the Tibetan Plateau–Himalaya region and the identity of the yeti - शार्लोट लिन्डक्विस्ट आणि इतर
बीबीसी आणि इंटरनेटवरील अनेक संस्थळांवरील महत्वपूर्ण माहिती.
----------------------
टीप: विदाऊट अ ट्रेस या माझ्या मालिकेतल्या दुसर्या भागावर कॉमेंट करताना सोन्याबापूंनी यतीवर लिहावे ही सूचना केली होती. वर्ल्डकपवरच्या मालिकेमुळे आणि इतर काही कामात बिझी झाल्याने तब्बल वर्षभराने का होईना अखेर हा लेख लिहून पूर्ण झाला!
प्रतिक्रिया
29 Apr 2018 - 10:50 am | मंदार कात्रे
रोचक !
29 Apr 2018 - 1:56 pm | विजुभाऊ
झकास.
काय जबरदस्त वेग आहे हो तुमच्या लिखाणाचा.
आणि वाचनाचा आवाकाही
29 Apr 2018 - 2:09 pm | टवाळ कार्टा
खिळवून ठेवणारा लेख
29 Apr 2018 - 2:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम !
वाचन लैच दांडगं आहे तुमचं ! एवढ वाचून-पचवून एका लेखात त्याचं सार लिहायचं म्हणजे भयंकर चिकाटीचं काम आहे हे !!
एवढा मोठा लेख आहे म्हणून दोन-तीन बैठकांत वाचू असे ठरवले होते. पण, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर संपल्यावरच वर पाहिले. :)
असेच लिहित रहा... आम्ही वाचत राहू यात वाद नाहीच.
1 May 2018 - 5:32 pm | अजया
हेच म्हणते :)
लिहित रहा. वाचत राहूच!!
29 Apr 2018 - 4:29 pm | manguu@mail.com
छान
29 Apr 2018 - 5:19 pm | श्रीगुरुजी
उत्तम व रोचक माहिती!
29 Apr 2018 - 5:30 pm | अभ्या..
अरे जब्बरदस्तच.
प्रचंड माहीतीपूर्ण लेख.
29 Apr 2018 - 5:30 pm | प्रसाद_१९८२
अगदी रोचक लेख!
लेखनशैली अत्यंत आवडली.
29 Apr 2018 - 6:17 pm | DAGDU
शालेय जीवनापासूनच हिमालयात येती असतात अस वाचून/ऐकून होतो परंतु मराठीत येती वर काही पुस्तके लिहिली आहेत की नाही याबद्दल काहीच माहिती नव्हती, येती चा मुव्ही असेल या आशेने स्टिव्हन स्पिलबर्गचा E.T. बघून झाला, आतापर्यंत येती बद्दलची अनामिक जिज्ञासा तुमच्या लेखामुळेपुर्ण झाली. खरच धन्यवाद हा अप्रतिम लेख लिहिल्याबद्दल.
30 Apr 2018 - 12:02 am | शलभ
खूपच मस्त लेख आहे. यती बद्दल च्या सगळ्या शंका दूर झाल्या. लेखाची मांडणी खूप छान आहे.
30 Apr 2018 - 2:06 am | दिपस्तंभ
अन माहितीपूर्ण...
30 Apr 2018 - 4:22 am | शेखरमोघे
"तब्बल वर्षभराने का होईना अखेर हा लेख लिहून पूर्ण" केल्याबद्दल खन्त करण्याचे अजिबात कारण नाही. उलट त्यावर यथायोग्य वेळ खर्च केल्याने लेख सुन्दर, माहितीपूर्ण आणि रोचक झाला आहे.
30 Apr 2018 - 5:18 am | निशाचर
माहितीपूर्ण लेख
30 Apr 2018 - 10:11 am | अनिरुद्ध.वैद्य
खुप छान अन माहितीपुर्ण!
30 Apr 2018 - 11:31 am | बोलघेवडा
सर, जबरदस्त माहिती आणि उत्तम लिखाण. यति वरून एकदम स्टारवार्स मधला "चुबाका" आठवला.
30 Apr 2018 - 12:45 pm | दीपक११७७
एकदम माहिती पुर्ण लेखं
धन्यवाद
1 May 2018 - 7:10 pm | इरसाल कार्टं
+1
30 Apr 2018 - 5:12 pm | पुजारी
गिल्डरॉय लॉकहार्ट च " An Year With Yeti " वाचलं नाही काय तुम्ही ? ह.घ्या.
30 Apr 2018 - 5:18 pm | मनिम्याऊ
माझी फार फार इच्छा होती की स्पार्टाकस यांनी एकदा येतीवर लिहावे. खूप खूप धन्यवाद.
30 Apr 2018 - 6:04 pm | गामा पैलवान
स्पार्टाकस,
नावातंच कस असल्याप्रमाणे लेख कसदार आहे ! :-)
शेरपांच्या कथांविषयीचा हा परिच्छेद विशेष रोचक भासला :
यावरून मी बांधलेले अंदाज सांगतो.
रामायणांत वानरांविषयी अशाच कथा आहेत. वालीशी कोणी युद्ध करायला गेला तर त्याची अर्धी शक्ती वालीस प्राप्त होत असे. जिवलग मित्राच्या पत्नीला आपल्या नादी लावणारा शेर्पा तरुण हे खलनायकी पात्र सुग्रीवावर बेतलेलं वाटतं.
हनुमान हा वायुपुत्र होता. त्यामुळे प्रस्तुत लेखातले यति वायुपुत्र वा तत्सम असल्याने त्यांना उड्डाणविद्या किंवा अतिउंच उड्यांची कला अवगत असावी. उतारावरून धावंत सुटल्याने बहुधा आकाशवासी होत असावेत. म्हणून त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी शेरपा ही युक्ती अवलंबित असावेत. यति अचानक नाहीसे होण्यामागे त्यांचं उड्डाण व/वा उंच उड्या कारणीभूत असाव्यात.
नवनाथ भक्तिसारात नवनाथांना जति म्हणजे यति म्हंटलं आहे. खरा यति कोण यावरून हनुमान व मच्छिंद्रनाथ यांचं युद्धही झालं आहे. विश्वास ठेवणाऱ्यास यति दर्शन देतो म्हणजे तो हनुमान वा इतर रामभक्त वानरांपैकी कोणी असावा. तसंच वालीच्या सैन्यात वानरांप्रमाणे अस्वलेही होती. त्यामुळे यति दोनतीन प्रकारचे असून त्यापैकी एखादी प्रजाती अस्वलसुद्धा असू शकते.
असो. हे विचार विस्कळीत आहेत. या प्रकाराबाबत अधिक संशोधन होतं जरुरी आहे.
आ.न.,
-गा.पै.
30 Apr 2018 - 6:06 pm | गामा पैलवान
भीमाला हिमालयात हनुमान वृद्ध मर्कटाच्या की यतिच्या रुपात भेटला होता अशी महाभारतात उपकथा आहे.
-गा.पै.
30 Apr 2018 - 6:30 pm | खिलजि
सुंदर लेख . स्पार्टाकस साहेब . आवडला , लिखाणही आणि लेखही
सिद्धेश्वर विलास पाटणकर
1 May 2018 - 8:24 am | प्रमोद देर्देकर
जबरदस्त अभ्यास !
तुमच्या सगळे लिखाण खूप विविध माहिती पूर्ण असते.
येवू दे अजुन.
1 May 2018 - 9:40 pm | मदनबाण
अभ्यासपूर्ण लेखन !
काही काळापूर्वी तू-नळीवर बिग फुट संदर्भात काही व्हिडियो पाहिल्याचे स्मरते, जे या लेखनामुळे आठवले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- The Ventures - Wipeout live in Japan 1966
2 May 2018 - 2:20 pm | Jayant Naik
अतिशय सुरेख लेख. अनेक गोष्टी अश्या असतात कि त्याचे रहस्य आपल्याला कळल्यासारखे वाटते पण ते पूर्ण पणे कधीच उलगडत नाही . चिरंजीव असलेल्या लोकांचे दर्शन ..यती चे गूढ ...बर्मुडा त्रिकोण ...पिरामिड्स चे बांधकाम ...आपण शोध घेत राहायचे इतकेच .
2 May 2018 - 5:43 pm | पैसा
यती म्हणजे सन्यासी. हिमालयात अती उंचीवर लोकांपासून दूर राहणारे म्हणून त्यांना यती नाव पडले असावे. ही माणसाची प्रजाती का अस्वल का एप हे प्रत्यक्ष कोणी हाती लागल्याशिवाय कळणार नाही.
3 May 2018 - 12:16 pm | खटपट्या
खूप छान माहीती. लहानपणापासून कुतुहल आहेच यतीचं. अजुन येउदेत अशा प्रकारचे लेख
3 May 2018 - 10:58 pm | रंगीला रतन
लेखनाला सलाम!
4 May 2018 - 3:06 pm | राहूल.
...
6 May 2018 - 1:29 pm | जेम्स वांड
अद्भुत आहे हे सगळे!! तुम्हाला दंडवत!!
2 Nov 2018 - 11:36 pm | राघव
केवढा तो व्यासंग आणि अभ्यास! _/\_
थोडंसं काही सुचलं / सापडलं की लिहून प्रसिद्ध करण्यासाठीच्या मोहाच्या तुलनेत, हे सखोल आणि संतुलित लेखन वाचून थक्क व्हायला झालं! वाचनखूण साठवलेली आहे.
अवांतर:
आता बाकीचे लेखनही वाचून काढावे लागणार!
26 Jun 2019 - 8:00 pm | इरामयी
केवळ Mummy सिनेमात यती पाहिले होते. त्यांच्याबद्दल एवढी खोलवर माहिती प्रथमच मिळाली. खूप अभ्यासपूर्ण लेख. बरेच संदर्भ सुसंगतपणे मांडले आहेत तुम्ही. एव्हढे दर्जेदार लेखन सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार!
26 Jun 2019 - 11:10 pm | जालिम लोशन
+1