(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
वयोगट २-१८ वर्षे : स्वप्नातल्या कळ्यांनो .....
या भागात दोन उपविभाग पडतील – वय २-१२ आणि १३-१८. त्यापैकी २-१२ मध्ये प्रत्येक मुलाच्या चाचण्या करण्याची गरज नसते. फक्त ज्यांच्या बाबतीत एखाद्या आजाराचा कौटुंबिक इतिहास किंवा अन्य काही जोखीम असते, त्यांच्याच बाबतीत विचार करावा. त्यामुळे या भागातील मुख्य विवेचन हे १३-१८ या वयोगटाचे असेल.
यांच्यासाठी ज्या चाचण्यांची शिफारस केली आहे, त्या सर्वांच्या करण्याबाबत मतांतरे आहेत. काही चाचण्यांबाबत तज्ञांचे एकमत आहे तर काहींच्या बाबतीत नाही. इथे स्थलकालपरत्वे मतभेद असणारच.
मुख्यतः ४ आजारांसाठी चाचण्या सुचवल्या आहेत. त्यांचे दोन गट असे आहेत:
१. चयापचयाचे आजार : लठ्ठपणा, मधुमेह (प्रकार-२) आणि उच्च-कोलेस्टेरॉल पातळी. (हा गट गरज वाटल्यास २-१२ वयोगटालाही लागू होतो).
२. जंतूसंसर्ग आजार : HIV ची बाधा
या वयोगटात मधुमेह आणि कोलेस्टेरॉल ही नावे पाहिल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. एकेकाळी चाळीशीला यांचा विचार व्हायचा. पण आज ही अनिष्ट परिस्थिती येऊन ठेपली आहे.
आता या प्रत्येकाचा आढावा घेतो.
लठ्ठपणा :
पौगंडावस्थेतील लठ्ठपणा हा सध्याच्या काळात जगभरात बराच वाढत चालला आहे. बिघडलेल्या जीवनशैलीचा त्यात मोठा वाटा आहे. अतिरीक्त वजनावर याच वयात नियंत्रण ठेवले नाही तर पुढील आयुष्यात अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. त्यांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, संधिवात, झोपेतील श्वसनदोष, हृदयविकार आणि काही कर्करोग यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अशा व्यक्तीला मानसिक त्रास आणि समाजात वावरतानाचे अवघडलेपण हेही भोगावे लागते.
त्यामुळे वर्षातून किमान एकदा शरीराचे वजन मोजले पाहिजे. या चाचणीला सामोरे जाताना त्या व्यक्तीला फक्त वजनकाट्यावर उभे राहायचे आहे, बाकी कुठलाही त्रास नाही ! त्याच्या जोडीला उंची मोजून मग BMI हा निर्देशांक काढला जातो. याची ‘योग्य’ पातळी ही जगातील विविध वंशांप्रमाणे ठराविक असते. त्यानुसार व्यक्ती ही योग्य का अतिरीक्त वजनाची का लठ्ठ हे ठरवले जाते. मग वजन योग्य ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि जीवनशैलीविषयक सल्ला देता येतो.
मधुमेह (प्रकार-२) :
गेल्या दोन दशकांमध्ये विशीच्या आत मधुमेह(प्रकार-२) होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी मधुमेह म्हणजे मध्यमवयीन व सुबत्तेचे जीवन असणाऱ्यांचा आजार असे साधारण चित्र होते. ते केव्हाच पुसले गेले असून आता तो कोणालाही आणि कुठल्याही वयात होऊ शकतो. हे धक्कादायक असले तरी वास्तव आहे.
जेव्हा हा आजार या वयात होतो तेव्हा पुढचे संपूर्ण आयुष्य त्याच्यासह काढावे लागते. या दीर्घ कालावधीमुळे आजाराचे पुढचे वाईट परिणाम होण्याचा धोका वाढतो. हे धोके म्हणजे हृदयविकार, मूत्रपिंड-विकार, दृष्टीवर घातक परिणाम आणि पाय सडण्याचा विकार.
आता या वयात मधुमेह(प्रकार-२) होण्याची शक्यता लठ्ठ आणि अजिबात व्यायाम न करणाऱ्या मुलांना अधिक असते.जर अशा मुलांना खालीलपैकी अजून २ मुद्दे (risk factors) लागू होत असतील तर ही शक्यता बळावते:
१. मुलाच्या आई, वडील वा भावंडे यांना मधुमेह असणे,
२. मुलाचे जन्मतःचे वजन बरेच कमी असणे,
३. गर्भावस्थेत असताना त्याच्या / तिच्या आईला मधुमेह झालेला असणे,
४. मुलाला सध्या उच्चरक्तदाब वा मेदांची वाढलेली रक्तपातळी असणे आणि
५. मुलीच्या बाबतीत तिला अंडाशय-विकार (PCOS) असणे.
तेव्हा वरील निकष पूर्ण करणाऱ्या मुलांसाठी मधुमेहाच्या चाचण्या जरूर कराव्यात. या चाचण्या सर्वपरिचित आहेत. खालीलपैकी कोणतीही एक करावी:
१. ग्लुकोज-रक्तपातळी (उपाशीपोटी)
२. --------- ,,----------( ७५ ग्राम ग्लुकोज खाल्ल्यानंतर २ तासांनी)
३. हिमोग्लोबिन- A1c मोजणी
चाचणीचा रिपोर्ट ‘नॉर्मल’च्या वर आल्यास ती दुसऱ्या दिवशी पुन्हा करून खात्री करावी. या रिपोर्ट्स वरून जरी प्रत्यक्ष ‘मधुमेह’ हा निष्कर्ष निघाला नाही तरी मधुमेहाची ‘पूर्वावस्था’ कळू शकते. ते महत्वाचे आहे. या अवस्थेत जीवनशैलीत योग्य बदल केल्यास निरोगीपणाकडे पूर्ववत जाता येते.
उच्च कोलेस्टेरॉल रक्तपातळी :
ही चाचणी सर्वांसाठी गरजेची नाही. ज्या मुलांना खालील मुद्दे लागू होतात त्यांच्यासाठी करावी:
१. उच्च कोलेस्टेरॉल चा कौटुंबिक इतिहास: आई, वडील,भावंडे, काका, मामा यांना असेल तर. किंवा कुटुंबात कुणाला पन्नाशीपूर्वी हृदयविकाराचा झटका आला असेल तर.
२. लठ्ठपणा, मधुमेह वा उच्च-रक्तदाब असणे
३. भरपूर मेदयुक्त आहार आणि व्यायामाचा अभाव
४. सिगारेट अथवा तंबाकूचे व्यसन असणे.
वरीलपैकी ३ व ४ हे मुद्दे विशेष महत्वाचे. १३-१८ या वयांत बरीच मुले याच्या आहारी गेलेली दिसतील. त्याचे अनिष्ट परिणाम १-२ दशकांनी दिसू शकतात. म्हणून आताच जागे होणे हे हितावह असते.
HIV ची रक्तचाचणी:
हे नाव काढताक्षणी काहींच्या भुवया एकदम उंचावतात. बऱ्याचदा आपला दृष्टीकोन “अहो ते सगळे पलीकडच्या देशांमध्ये ठीक आहे हो, आपल्याकडे तेवढे वाईट चित्र नाही”, असा असतो. पण वास्तव नाकारून कसे चालेल? युवकांचे असुरक्षित लैंगिक संबंध हा आता सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. वरून ‘निरोगी’ दिसणाऱ्या कित्येक युवकांना याची लागण झालेली असू शकते.
HIV चाळणी चाचणीचे फायदे:
१. या संसर्गाचे निदान लवकर झाल्यास प्रभावी उपचार करता येतात आणि प्रत्यक्ष AIDS होण्यापासून बचाव होतो.
२. त्या व्यक्तीपासून या संसर्गाचा समाजात प्रसार कमी करता येतो.
३. जरी चाचणीचा निष्कर्ष नकारात्मक असेल पण त्या व्यक्तीस पुढे संसर्ग होण्याचा धोका असेल, तर तिला प्रतिबंधात्मक उपचार घेता येतात.
ही चाचणी कोणाची करावी?
जी व्यक्ती खालीलपैकी एखाद्या गटात (high risk) मोडते तिची:
१. एकापेक्षा अधिक जोडीदाराशी असुरक्षित संभोग
२. दुसरा एखादा गुप्तरोग झालेला असणे
३. समलिंगी संबंध असणे
४. इंजेक्शनने मादक पदार्थ घेणारे व्यसनी
५. लैंगिक जोडीदार HIV-positive असणे
६. हिपटायटीस किंवा क्षयरोग झालेला असणे
ज्या भागांमध्ये HIVचा प्रादुर्भाव खूप आहे तिथे १६ वर्षांपुढील सर्वांची ही चाचणी करावी अशी शिफारस प्रगत देशांत केलेली आहे.
चाचणीचे निष्कर्ष :
१. जर चाचणी नकारात्मक ठरली तर त्याचा अर्थ एवढाच असतो की ती करतेवेळीस संसर्गाचा पुरावा नाही. ज्या व्यक्तीत जोखीम जास्त आहे तिथे नियमित स्वरुपात चाचणी करीत राहावे.
२. जर चाचणी होकारात्मक ठरली तर मात्र अजून पुढची चाचणी करून निदान करावे लागते.
तर असा हा या वयोगटाचा आढावा. खरे म्हणजे आयुष्याच्या सर्व टप्प्यांमधील सर्वात निरोगी असा हा गट असतो. पण बिघडलेल्या जीवनशैलीने अनेक आजारांची बीजे या वयातच रोवली गेली आहेत.
दिवसेंदिवस अनेक आजार हे प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयोगटात येत आहेत. तसेच त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यरक्षणासाठी संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व निःसंशय वाढलेले आहे. एखाद्या आजाराची जोखीम जास्त असणाऱ्यांनी या वयांत अशा चाचण्यांचा जरूर लाभ घ्यावा.
*****************************************************************************
(क्रमशः )
.
प्रतिक्रिया
12 Mar 2018 - 7:42 pm | तुषार काळभोर
वाचताना हेच मनात येत होते.
13 Mar 2018 - 8:17 am | कुमार१
वाचताना हेच मनात येत होते.>>>>>>
अहो, मला तर हे लिहिताना सुद्धा वेदना होत होत्या.
या गटासाठी चाचण्यांची शिफारस करावी लागणे हे खेदजनक आहे.
13 Mar 2018 - 11:57 am | Nitin Palkar
आज पंचविशी, तिशीत असणाऱ्या युवकांच्या पालकांना आपल्या मुलाची जीवनशैली अनेकदा योग्य वाटत नाही. जिथे संवाद आहे तिथे आई वडील त्या वरून मुलांना हटकतही असतात पण दोन पिढ्यांतील मतांतरामुळे अनेकदा त्याचा काही उपयोग होत नाही. अधिकाधिक मोठ्या packageच्या मागे धावत राहणे हे सध्याच्या तरुण पिढीला लागलेले व्यसन आहे असे मला वाटते. शहरात राहणाऱ्या corporate पिढीला सोमवार ते शुक्रवार घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे (डोळे मिटून) धावावे लागते, त्याचा परिणाम म्हणून शनिवार रविवारी सकाळी दहापर्यंत झोपून राहायचे, हॉटेलिंग अथवा आऊटिंग मध्ये आनंद शोधायचा आणि या सर्वांमध्ये स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची होळी करून घ्यायची. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, आम्लता हे विकार बळावतात असे मला वाटते. तुमच्या लेख पासून थोडा दूर जाणारा हा प्रतिसाद आहे पण बिघडलेल्या जीवनशैली वरून जे सुचले ते मांडले.....
13 Mar 2018 - 12:20 pm | कुमार१
तुमच्या लेख पासून थोडा दूर जाणारा हा प्रतिसाद आहे >>>>
अहो, बिलकूल तसे नाही! उलट लेखाला पूरकच आहे. आभार
13 Mar 2018 - 12:52 pm | अनिंद्य
नेहेमीप्रमाणे सुटसुटीत - माहितीपूर्ण लेखन.
महानगरातील जीवनशैली, आपण खात असलेले अन्न आणि त्यात होत असलेली बेसुमार विषपेरणी, ताण-तणाव...विषय चिंता वाढवणारे आहेत. त्यावर मंथन होऊन काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा.
अनिंद्य
13 Mar 2018 - 2:13 pm | चौकटराजा
वरील नावाचे एक पुस्तक वाचले त्याचा माझ्यावर फार प्रभाव आहे. त्याच्या पहिल्याच पानावर पुढील संवाद आहे .
He stood up and asked the almighty " oh Lord , what shall I do to lead very healthy life ?"
" My son , choose your parents carefully ! " said the God. पुस्तक सुरू करताना लेखक म्हणतो " आपण सुमारे ३५० प्रकारची वैशिट्ये आपल्या मातापित्याकडून घेतो न मागता ! माझे निरिक्षण असे की त्यात आपले आईवडील अनेक बाबतीत अनेक कारंणानी आपल्याला वाईट संवयी लावतात त्यात आपण स्वतः ला लावलेल्या वाईट संवयी ची भर ! सबब निसर्ग मग हिसका दाखवतोच !
14 Mar 2018 - 7:28 pm | कुमार१
या पुस्तकाचा परिचय आपण इथे सवडीने लिहावा ही वि.
16 Mar 2018 - 8:47 pm | चौकटराजा
हे पुस्तक माझ्या संग्रही नाही. अमेझोन वर त्याची किमत फार म्हणजे ६५०० इतकी आहे . ३५२ पानाचे पुस्तक .लेखक DR. JOHN M. DWYER.हे इम्युनोलोजीस्ट. पुस्तक १९८९ मध्ये प्रथम प्रसिदध् झाले. त्याला ४.१ हे ५ पैकी रेटिंग आहे. त्यात आपले शरीर इतके ७० ते ८० वर्ष जगते तरी कसे ? याचे उत्तर म्हण्जे निसर्गदत्त प्रतिकार शक्ती ची देणगी. मग शरीराचे शत्रू व्हायरस, बेक्टीरिआ ,फंगी ,,प्यारासाईट ई ची माहिती . तसेच शरीरातील विविध पेशिंची फौज. या कौरव पांडव दोघांची तपशील वार माहिती . कॉनस्टीट्युशनल व एक्वायरड अशी रोगांची विभागणी , एडस ,हेपेटायाटीस, डेंगी,कर्करोग , ट्रान्स प्लानट,एलरजी,आटो इम्युनिट,, आय जी जी , आय जी एम यांचे विवेचन यात आहे. काही अत्यंत दुर्मिळ अशा जीवाना प्रतिकार यंत्रणेची देणगीच नसते असे जीव आईचे चे दूध तुटताच मरण पावतात अशी एक केस ही दिली आहे. व्हायराल लोड म्हणजे काय याचेही विवेचन आहे.
17 Mar 2018 - 6:47 am | कुमार१
म्हणजे एकूणच हे पुस्तक 'लय भारी' दिसतंय .
त्याचे शीर्षक तर मस्तच आहे.
15 Mar 2018 - 5:07 pm | अनिंद्य
थोडक्यात,
Your genetics load the gun. Your lifestyle pulls the trigger !
15 Mar 2018 - 5:39 pm | कुमार१
15 Mar 2018 - 5:39 pm | कुमार१
15 Mar 2018 - 5:40 pm | कुमार१
4 Aug 2018 - 11:44 am | lakhu risbud
'प्रत्येक जण इथे मरणासन्न अवस्थेतच आहे आणि तो आता थोड्याच काळाचा सोबती आहे'अशा छापाचा प्रतिसाद वाटतोय हा ! उत्तम आरोग्य ही मनुष्याची सामान्यतः किमान असणारी मानसिक आणि शारिरीक स्थिती ही त्याच्या आयुष्याचे सर्वोच्च निधान आहे अशा प्रकारची मांडणी हे खास पाश्चात्त्य तंत्राधिष्ठीत जीवनशैलीची मांडणी.
दुर्दैवाने ते ज्या चुका करत आहेत त्याच चुका आपणही आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आहारपद्धत स्वीकारुन करत आहोत.
मनुष्य म्हणून जगण्यासाठी जी किमान अवस्था पाहिजे तिलाच अस्तिवाचे अंतिम ध्येय समजले तर भरकटणे होणारच !
17 Mar 2018 - 8:46 am | चामुंडराय
आपल्या तुकोबांनी म्हटलेच आहे " रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग."
आणि आपल्या सर्वांच्या बाबतीत शारीरिक पातळीवर हे अगदी खरे आहे.
17 Mar 2018 - 10:10 am | कुमार१
एकदम सहमत आहे.
13 Mar 2018 - 2:27 pm | कुमार१
अनिंद्य व चौरा, आभार.
काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा. >>>>> बरोबर. आणि ते प्रतिबंधात्मकच असतील.
" My son , choose your parents carefully ! " >>> एकदम सही !!
14 Mar 2018 - 2:10 am | एस
उत्तम लेख. पुढील वयोगटांच्या विशेषतः ज्येष्ठ नागरिक वयोगटासंबंधीच्या लेखांच्या प्रतीक्षेत.
14 Mar 2018 - 6:44 am | कुमार१
एस, आभार !
पुढील गट हा १९ - ४९ असा मोठा असणार आहे
18 Mar 2018 - 5:56 am | कुमार१
भाग ४ इथे आहे:
https://www.misalpav.com/node/42234