घरी कधी जायचं?

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
8 Mar 2018 - 1:08 pm

रस्त्यांवरून फिरताना,
मजेमजेत धावताना
खिदळत असतो, उधळत असतो आम्ही
थकून जेव्हा बसतो
तिथेच, बाजूला एखाद्या झाडाखालच्या दगडावर
माझ्या मांडीवर बसून सानुली माझी
करते चाळा माझ्या शर्टाशी
डाव्या हाताचा अंगठा तोंडात तसाच ठेवून
माझ्याकडे मान तिरपी करत पाहते आणि विचारते
अंगठा तेवढ्यापुरता तोंडातून काढत,
"बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
मी हसतो, लगेच दोन्ही हातांनी तिला उचलून घेतो
गुदगुल्या करीत तिला खांद्यावर टाकतो
खळखळून तिच्या हसण्याने प्रश्न वाहून गेलेला असतो
मग आम्ही जातो बागेत
बरीच गर्दी असली तिथे जरी
हिरवळीवर एक कोपरा धरून आम्ही बसतो
पण, मिनीटभरच, कारण...
पुन्हा सुरू होते पळापळी
सुपारीच्या झाडाभोवती,
खालून वर जाणाऱ्या पायऱ्यांवरती
झाडून सगळ्या बेंचभोवती
मग थोड्या वेळाने घसरगुंडी दिसते, झोकाही असतो
ती मनसोक्त खेळून घेते
मी बाजूला एका कट्ट्यावर बसतो
तिच मन भरल्यावर ती येते. माझ्या दोन गुडघ्यांवर चापटा मारत म्हणते,
"बाबा, घरी ज्यायच्य मला!"
मी झटकन उडी मारतो खाली
उचलून तिला घेत गरगर फिरवतो
पुन्हा तिच्या गरगरण्यात प्रश्न हरवलेला असतो
मी तसाच तिला खांद्यावर ठेवीत
बागेतून बाहेर पडतो आणि शिरतो मंदीरात
साईबाबाच्या... चकाचक फरश्या
संगमरवरी बांधकाम, टेपवर जोरजोरात वाजणारी देवांची गाणी
तिला वाजवायचा असतो देवळातला घंटा
तिला खूप आवडत मोठा आवाज करायला
मग तिला उचलून घेतल्यावर
पोटभर वाजवून घेते ती, मीही तिला वाजवू देतो
आजूबाजूचे पाहतात माझ्याकडे त्रासिक नजरेने
पण आम्ही आपल खेळण्याच्या मूडमध्ये आहोत अजूनही
मी तिथेच एका खांबाला टेकून खाली बसतो
माझ्या सानुलीची अजूनही पळापळ चालूच असते
पंधराएक प्रदक्षिणा झाल्यावर ती माझ्याकडे येते
पुन्हा तोच प्रश्न, "बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"
मी तिला जवळ घेतो, कुरवाळत विचारतो
"आपण आईश्क्रीम खावूया...मग घरी ज्यावू हां बाळा!"
हे बोलताना का कोण जाणे आईसक्रीम खायच्या आधीच माझा घसा थंड झालेला असतो
पुढे काही बोलताच येत नाही
मंदिरातून बाहेर पडल्यावर जाणवते
अंधार वाढायला लागलाय, रस्ता निर्मनुष्य व्हायला लागलाय
सानुली माझी एव्हाना कडेवर आलेली असते
मान माझ्या खांद्यावर टाकून ती निवांत पडलेली असते
मी रस्त्याच्या कडेने शांतपणे चालत राहतो
अचानक त्या शांततेचा भंग होऊन तिचा आवाज येतो
"बाबा, आपण घरी कधी ज्यायच्य?"

- संदीप चांदणे

करुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

8 Mar 2018 - 1:46 pm | गामा पैलवान

संदीप चांदणे,

तुमच्या भावविश्वाचं दर्शन घडवून आणल्याबद्दल आभार. वस्तुत: मला कवितेतलं काही कळंत नाही. पण आजचा मुहूर्त काही वेगळाच आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे.

तर सांगायचा मुद्दा असा की आजदिनीच्या वर्तमानपत्रांत तुमच्या भावविश्वाशी सुसंगत अशी एखादीच बातमी सापडते. बाकी सर्व बातम्या स्त्री किती खंबीर आणि कणखर आहे यावरच बेतलेल्या आहे. हे सगळं स्त्री कशासाठी करते त्यावर चकार शब्द नाही.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फेमिनाझींचा सण आहे. तिथे बायकांना 'कौटुंबिक जोखड' फेकून 'मुक्त' व्हायला सांगतात.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : वरचा प्रतिसाद अस्थानी आहे हे मान्य. तुमचं भावविश्व व लहानगीचा विश्वासभाव जपला जावा म्हणून लिहिला आहे.

माहितगार's picture

8 Mar 2018 - 4:40 pm | माहितगार

कविता भावली.

...हे बोलताना का कोण जाणे आईसक्रीम खायच्या आधीच माझा घसा थंड झालेला असतो

कदाचित संदर्भा अभावी हि ओळ नीटशी समजली नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2018 - 6:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत !

विशुमित's picture

8 Mar 2018 - 6:09 pm | विशुमित

कामा निमित्त बाहेर राज्यात असल्याकारणाने तुमच्या कवितेमुळे तीव्र आठवण आली.
...
फोन करायला घाबरतोय, कारण पुढून एकच प्रश्न ऐकावा लागणार आहे,
"पप्पा घरी कधी येणार आहात?"
गुद्गुल्या करायला पण चान्स नाही आहे.

अनन्त्_यात्री's picture

8 Mar 2018 - 6:25 pm | अनन्त्_यात्री

आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Mar 2018 - 7:18 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली..

घरी जाणे बाबा का लांबवत असतो ते स्पष्ट झाले असते तर कदाचित अजून आवडली असती. त्याचा ओझरता संदर्भ "हे बोलताना का कोण जाणे आईसक्रीम खायच्या आधीच माझा घसा थंड झालेला असतो" या ओळींमधे आला आहे.

कदचित मला समजले नसेल असेही असेल

पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2018 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

घरी जाणे बाबा का लांबवत असतो ते स्पष्ट झाले असते तर कदाचित अजून आवडली असती.

असेच म्हणतो.

बाकी, संदीपसेठ लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

9 Mar 2018 - 9:58 pm | जव्हेरगंज

असेच म्हणतो.
येवढा सस्पेंन्स का ठेवलाय!!!!

बाकी कविता जोरदार आवडली!!!

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2018 - 8:20 am | प्राची अश्विनी

सेम थ्री सेम.
कविता आवडलीच पण का? हा प्रश्न छळतोय..

माहितगार's picture

10 Mar 2018 - 11:27 am | माहितगार

कवि बाबा घरी जाणे केवळ कविता लिहितानाच्या स्मरणात लांबतोय ? कदाचित या स्मरणातील आठवणी प्रत्यक्षात वेगवेगळ्या दिवशीच्या असतील आणि तिला खेळवतानाच्या आठवणी कविला संपू नये असे वाटत असेल म्हणून त्या जोडून आल्या आहेत ?

गवि's picture

10 Mar 2018 - 10:37 am | गवि

कविता खूप टचिंग आहे.

त्या मूडमधून बाहेर येण्यासाठी,

मा.क.भ.ज.टा.

-(ठाणे महानगरपालिका लेटेस्ट नोटिसवजा जाहिरात, चौकाचौकात लागलेली.)

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2018 - 11:35 am | प्राची अश्विनी

:):):)
ते काय आहे खरंच कळले. नाही

गवि's picture

14 Mar 2018 - 12:48 pm | गवि

मालमत्ता कर भरा, जप्ती टाळा.

-ठामपा

माहितगार's picture

14 Mar 2018 - 12:30 pm | माहितगार

या कवितेवर कवि महोदयांनी एक छानशी दृकश्राव्य यूट्यूब बनवावी असे सुचवावे वाटते

विशुमित's picture

14 Mar 2018 - 12:37 pm | विशुमित

अनुमोदन..

सस्नेह's picture

14 Mar 2018 - 1:32 pm | सस्नेह

याला कविता म्हणावे की मुक्तक, माहिती नाही. पण एकदम गोड आहे.
त्या एका ओळीचा संदर्भ मलाही कळला नाही.

चांदणे संदीप's picture

14 Mar 2018 - 3:51 pm | चांदणे संदीप

वर पैजारबुवा यांनी म्हटल्याप्रमाणे...

घरी जाणे बाबा का लांबवत असतो

ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जर काही शक्यता विचारात घेतल्या तर प्रत्येकाला एखादे कारण सापडेलच.
माहितगार यांनी एक शक्यता पाहिली. कवितेतल्या बाबाकडे घरच नाही ही एक शक्यता असू शकते.

या कवितेवर कवि महोदयांनी एक छानशी दृकश्राव्य यूट्यूब बनवावी असे सुचवावे वाटते

मस्त कल्पना सुचवल्याबद्दल धन्यवाद माहितगार. पण, कार्यबाहुल्यांमुळे आयुष्यात मिपाशिवाय इतर विषयाला वेळ मिळेनासा झालाय. अगदी कुठल्याही प्रकारचे लिहिणे होत नाही.

सर्व रसिक वाचकांचे आभार्स! :)

Sandy

..कवितेतल्या बाबाकडे घरच नाही ही एक शक्यता असू शकते.

हे जरा कलाटणी देणार अनपेक्षीत आहे, आहेरेंना नाहीरेची प्रकर्षाने जाणीव करून देणारे.

पण माझा तार्कीक छिद्रान्वेषणपणा जरा भावनेच्या पलिकडे जातो, तरीही भटक्या विमुक्तांना घर नसते त्यांची मुले घरी जायचे कसे म्हणत असतील ? , पण भटका नसेल तर अगदी उघड्यावर राहणार्‍यांची आपली म्हणून जागा असणार आणि तिथे वापस जाण्याचा हट्ट स्वाभाविक पणे लहान मूल करणार. खासकरून आईसक्रीमच्या उल्लेखामुळे कविता अगदीच नाहीरे वाली न वाटता मध्यमवर्गीय वाटली . पण हा माझा च्छिद्रान्वेषीपणा

एस's picture

14 Mar 2018 - 5:46 pm | एस

Persuit of Happyness.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Mar 2018 - 5:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

कवितेतल्या बाबाकडे घरच नाही ही एक शक्यता असू शकते.

आइस्क्रिम खाणे आणि ज्या ज्या जागांवर बाबा मुलीला घेऊन फिरत आहेत यावरून... "घरी वाट पहात असणारे कोणी नसावे"... हे कारण मनात आले होते. कविच्या मनात काय होते हे कवीच सांगू शकेल म्हणा !

चित्रगुप्त's picture

14 Mar 2018 - 7:53 pm | चित्रगुप्त

कविता आवडलीच, आणि 'घरी' जायचं बाबा लांबणीवर का टाकत आहे, हे स्पष्ट न करणं तर खासच. अश्या अनुत्तरित रचना मनात दीर्घकाळ रेंगाळत रहातात, याउलट उत्तर मिळलं, की तो विषय तिथेच संपतो.
मुलीचे आईवडील विभक्त झालेले आहेत, आणि आठवड्यातून एकदा वगैरे बाबा मुलीला काही वेळासाठी फिरायला घेऊन आलेले आहेत, त्यामुळे मुलीचा सहवास जास्तीत जास्त मिळावा असे वाटत आहे ... मुलीच्या मनात मात्र प्रश्न विचारताना पूर्वीचे 'ते' एकत्र घर आहे, अशीही एक कल्पना सुचली,

सिरुसेरि's picture

15 Mar 2018 - 8:26 am | सिरुसेरि

भावदर्शी कविता . "कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा " प्रमाणे "घरी जाणे बाबा का लांबवत असतो " हा प्रश्न सतत जाणवतो .

सिरुसेरि's picture

15 Mar 2018 - 8:32 am | सिरुसेरि

एक प्रॅक्टिकल शक्यता - घरात पेस्ट कंट्रोल केले असेल . ( हा प्रतिसाद केवळ एक बदल म्हणुन घ्यावा. )

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Mar 2018 - 3:42 pm | ज्ञानोबाचे पैजार

वरील शक्यते शिवाय अजून एक
घराच्या दारा बाहेर देणेकर्‍यांची रांग लागलेली असते. रात्री उशीरा कंटाळून ते आपापल्या घरी गेले की मग हळूच घरत शिरायचा कविता नायकाचा मनसुबा असावा.

पैजारबुवा,

नाही हो. मा.क.भ.ज.टा. हेच मुख्य कारण आहे.

A

मराठी_माणूस's picture

15 Mar 2018 - 4:58 pm | मराठी_माणूस

घरी कोणत्यातरी कारणाने आई नाहीय्ये हे कारण असु शकते का ?