व्यावसायिक कला १) बुरुड कला

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
20 Feb 2018 - 11:40 am

एका नवीन लेखाच्या मालिकेला सुरुवात करत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक कला आहेत ज्यांचे स्थान आता कमी होत चालले आहे. त्यांची प्रत्यक्ष त्या कलाकारांकडून माहिती घेऊन ती सादर करण्याचा हा एक प्रयत्न. तर अशा कलांच्या भरभराठीसाठी शुभेच्छा देऊन आजची पहिली कला ह्या लेखाद्वारे सादर करत आहे. (फोटो क्रोम वरून दिसतील)

बुरूड समाजाचा बांबूच्या विणकामाचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे सुबक कलाकुसर. टोपल्या, सुपे, डोबूल, परड्या इतर वस्तू ह्या बुरूड समाजातील व्यक्ती सराईतपणे सुंदर विणतात. सदर विणकामासाठी बांबू तासताना, काड्या विणताना हातावर अनेक यातना, व्रण व शारीरिक कष्ट झेलत एक एक काडी विणत प्रत्येक कलाकृती तयार होत असते.

बांबू विणकामासाठी लागणारी साधने.

टोपलीची विण व्यवस्थित बसवताना.

चिरलेला बांबू

टोपल्यांसाठी बांबूच्या केलेल्या बारीक काड्या.

तयार टोपल्या

माझ्या लहानपणात मी अशा विणलेल्या वस्तू पाहिल्यांत त्या म्हणजे छोट्या-मोठ्या टोपल्या, कोंबड्यांची खुराडी, तांदूळ ठेवण्यासाठी मोठे पिंपासारखे विणलेले कणगे, पाला गोळा करण्यासाठी विणलेला दोन हात रुंद करूनच मावेल इतका मोठा झाप, पावसाळ्यात शेतातील कामे करताना छत्रीसारखा उपयोग होणारे इरले, तांदूळ पाखडण्यासाठी सूप, पकडलेले मासे ठेवण्यासाठी मासेमार कंबरेला बांधायचे ते डोबुल, लग्नसमारंभातील तांदूळ धुवताना लागणारी रोवळी, देवपूजेची फुले गोळा करण्यासाठी परडी, लग्न समारंभातील रुखवतीसाठी ठेवण्यात येणार्‍या शोभेच्या वस्तू तसेच काही विणून बनवलेली काही छोटी छोटी खेळणी. पण ह्यातल्या बर्‍याच वस्तू आता नामशेष होत आल्या आहेत तर काही झाल्या आहेत. परिणामी हा पारंपरिक व्यवसायच आता लयाला चालला आहे.

उरण येथील बुरूड आळीतील उल्हास सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बुरुडकाम करणारी कुटुंबे आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राहिली आहेत. त्यातील काही साईड बिझनेस म्हणून हे काम करतात कोणी आवड म्हणून तर फार क्वचितच कुटुंब फक्त पोटापाण्यासाठी हे काम करतात. पूर्वी डोंगर-रानात बांबूचे भरपूर उत्पादन असायचे. तेव्हा दारावर बांबू विकायला यायचे. बांबूचे अनेक प्रकार असतात त्यात कळका, काठी, मेस, पोकळ, टोकर असे काही प्रकार असतात. पण आता औद्योगीकरण आले आणि डोंगरे-रानांची संख्या कमी झाल्याने बांबूचे उत्पादन कमी होऊन बांबूचे भाव वाढले आहे. १०० रुपयांच्या आसपास एक बांबू मिळतो.

बुरूड व्यवसाय प्रामुख्याने शेती व मासेमारीवर आधारलेला असायचा. शेतीसाठी लागणार्‍या छोट्या-मोठ्या टोपल्या, इरली, झाप, कणगे, सूप हे प्रत्येक घरात लागायचे पण आता शेतीच नष्ट होत चालली आहे. शेतीच्या जागी सिमेंटची शेती ठिय्या मांडून बसली आहे. तसेच कणग्यांच्या जागी आता मोठे धातूचे, प्लास्टीकचे पिंप वापरले जातात. इरलीच्या जागी मेणकापडे आली. प्लास्टीकच्या वस्तूंमुळे नैसर्गिक बांबूच्या वस्तूंच्या प्रमाणात प्रचंड घट निर्माण झाली. मासे विक्रीसाठी कोळी समाजाला टोपल्यांची आवश्यकता असायची. तेव्हा भरपूर टोपल्यांचा खप व्हायचा. पण आता त्यांनाही न गळणारे प्लास्टीकचे टब सहज उपलब्ध झाल्याने तिथेही बुरूड व्यवसायात घट निर्माण झाली. पूर्वी भरपूर प्रमाणात उरणमध्ये मिठागरे (मिठांचे आगर) होती. तेव्हा मिठासाठी मोठ्या मोठ्या टोपल्यांची नियमित विक्री होत असे. आता अग्रेसर कंपन्या आल्या आणि खाडी-आगरांवर मातीचे भराव पडले. त्यामुळे मिठाचा व्यवसायही कमी झाला आणि परिणामी टोपल्यांचाही. पूर्वी बहुतांशी घरात गावठी कोंबड्या पाळल्या जात. त्यासाठी खुराडी लागत पण आता क्वचितच गावठी कोंबड्यांचे पालन होताना दिसते त्यामुळे खुराड्यांची मागणीही होत नाही.

पालखी

डोबुल, सूप व टोपली

कष्ट करूनही कमी उत्पादन मिळत असल्याने आता नवीन पिढी ह्यांत रस घेत नाही. ते घेत असलेले चांगले शिक्षण तसेच औद्योगीकरणामुळे, नोकरीच्या संधी, इतर व्यवसायांच्या वाढत्या सोयींमुळे नवीन पिढी अर्थातच तिकडे खेचली गेली आहे त्यामुळे ह्या पिढी नंतर हा परंपरागत कलाव्यवसाय जवळ जवळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

बुरूड आळीत रहाणार्‍या श्रीमती चंद्रकला तेलंगे ह्यांचं घर ह्या बुरुडकामावरच चालू आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही काही प्रमाणात ह्या वस्तूंना मागणी असते. लग्नसराईत वड्यांसाठी टोपल्या, रोवळी लागते, गौरीच्या सणाला सुपांची मागणी येते, वटपौर्णिमेला काही प्रमाणात छोट्या टोपल्या लागतात. सणांमध्ये ह्या वस्तू परंपरागत लागतात व ही परंपरा चालू आहे म्हणून थोड्याफार प्रमाणात ह्या वस्तू टिकून आहेत. रात्रंदिवस हे काम करून त्यांच्या पदरी फारच कमी नफा येतो कारण बांबूचे वाढते भाव आणि त्यात भर म्हणून परगावातून काहीजण ह्या वस्तू बाजारात विकायला आणतात त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या धंद्यावर होतो.

पकडलेले मासे ठेवण्याकरीता हा डोबूल कमरेला अडकवलेला असतो.

मासे आहेत आत.

आग्री लग्न सोहळ्यात पारंपारीक वडे करण्यासाठी लागणार्‍या टोपल्या व रोवळी

ही परंपरागत कला नष्ट होऊ नये म्हणून बांबूची अधिक लागवड झाली पाहिजे. नवीन पिढीने निदान कलेची जोपासना करण्यासाठी तरी ह्या कामात रस घेतला पाहिजे व वडीलधाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहीत करून आपल्या कलेचा वारसा त्यांच्यामध्ये रुजविला पाहिजे. सरकारनेही ह्या कलेला प्रोत्साहन दिले तर ह्या कलेची जपणूक होण्यास मदत होईल. प्रदर्शने, सेमिनार सारखे कार्यक्रम आखून ह्या कलेला महत्त्व दिले गेले पाहिजे. शिवाय आपण जनतेनेही घातक असणारे प्लास्टीकला मर्यादा आणून आपल्या परंपरागत ह्या वस्तूंचा वारसा चालविला तर ही आणि अशा इतर अनेक संपुष्टात येणार्‍या कला जपल्या जातील.
सौ. प्राजक्ता प. म्हात्रे

वरील लेख दिनांक ९ फेब्रुवारी २०१८ च्या झी मराठी दिशा या साप्ताहिकात प्रकाशीत झालेला आहे. (कृपया दुसरीकडे पाठवताना साप्ताहिक व मूळ लेखिकेचे नाव लेखासोबत असावे.)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2018 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फक्त मलाच की सर्वांना ?

-दिलीप बिरुटे

खेडूत's picture

20 Feb 2018 - 11:53 am | खेडूत

क्रोममधून दिसत आहेत.
छान लेख. पुभाप्र.
पश्चिम महाराष्ट्रात कोंबड्या ठेवायला जे वापरतात त्याला डालगं म्हणतात. कुत्र्यामांजरांपासून संरक्षण होण्यासाठी त्यात ठेवत असावेत.
भाकरी ठेवायला शिंकाळी बांबूपासून बनवतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2018 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं नावडतं ब्राऊजर आहे ते...जाने दो.
अज्ञानात समाधान.

जागू तै, लेखमालेला शुभेच्छा...! :(

-दिलीप बिरुटे

धनावडे's picture

15 Jun 2018 - 10:30 pm | धनावडे

डालग आणि खुराडा दोन्ही वेगवेगळे असत.

अनिंद्य's picture

20 Feb 2018 - 11:54 am | अनिंद्य

@ जागु ,

लेखमालेची कल्पना आणि लेख उत्तम.
ह्या बहाण्याने या कलांचं डॉक्युमेंटेशन होईल हा मोठाच फायदा.

पु ले शु,

अनिंद्य

दुसऱ्या लेखावर प्रतिसाद लिहून प्रकाशित करेपर्यंत लेख उडाला. असो. छान लेखमाला. पुभाप्र.

कपिलमुनी's picture

20 Feb 2018 - 1:51 pm | कपिलमुनी

खुप सारे बुरुड मित्र असल्याने हा व्यवसाय जवळून पाहिला आहे.सांगलीतील बुरुड गल्ली प्रसिद्ध आहे .
आता पारंपारीक व्यवसायासोबत फ्लेक्स च्या फ्रेम्स बनवणे, प्लास्टरींग साठी लागणारे प्लॅटफॉर्म बनवणे , बांबूचे फर्निचर अशा नव्या कामातून रोजगार मिळवत आहे.
बाली किंवा इतर पौर्वात्य देशात बाम्बूच्या कलाकुसरीच्य वस्तूचे चांगले मार्केटींग केले जाते. आपल्या क्डे त्याचा अभाव जाणवतो. सध्या या व्यवसायात सुद्ध कुशल कामगार आणि कच्चा मालाचा तुटवडा जाणवतो.

जागु's picture

20 Feb 2018 - 4:30 pm | जागु

डॉ. दिलिप, एस धन्यवाद.
खेडूत त्या डालगं ला आम्ही खुराडा म्हणतो.

ह्या बहाण्याने या कलांचं डॉक्युमेंटेशन होईल हा मोठाच फायदा. अनिंद्य माझा हाच हेतू आहे. धन्यवाद.

कपिलमुनी, खर आहे आपल्याकडे आता ह्या कामात नविन पीढी इंटरेस्ट घेत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Feb 2018 - 10:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय उपक्रम ! अशा आता हळू हळू नाहिश्या होत चाललेल्या कला व व्यवसायांचे दस्तऐवजीकरण हे फार महत्वाचे काम तुम्ही हाती घेतले आहे, त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !

पुढच्या लेखाची प्रतिक्षा आहे.

अमितदादा's picture

20 Feb 2018 - 11:35 pm | अमितदादा

उत्तम आणि वेगळा लेख...माझा एक मित्र ह्या व्यवसायात आहे. मध्यंतरी टोम्याटो साठी करंडे लागायचे तेंव्हा हा व्यवसाय तेजीत असायचा. आता प्लास्टिक चे कॅरेट वापरात असल्याने व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आमची ही बांबू ची चार बेटे आहेत.
अवांतर: मोदी सरकार ने बांबू च्या बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे जो म्हणजे त्याला वन कायद्यातून मुक्त केलय(बहुदा वृक्ष ह्या प्रकारातून काढलाय). ईशान्य भारतात हे अनेक ठिकाणी उत्पनाचे प्रमुख पीक आहे तिथे हा निर्णय दूरगामी आहे.

डॉ. सुहास, अमितदादा धन्यवाद.
अमितदादा बांबूच्या वनाचा फोटो पहायला आवडेल. तसेच बांबूविषयी अधिक माहीती असेल तर तिही सांगा.

जास्त काही माहिती नाही त्रोटक माहिती आहे फक्त आणि बाहेरगावी असल्याने फोटो नाहीये माझ्याकडे. असो पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.

जागु's picture

22 Feb 2018 - 10:57 am | जागु

ओके. धन्यवाद.

सूड's picture

21 Feb 2018 - 7:54 pm | सूड

स्तुत्य उपक्रम.

पैसा's picture

22 Feb 2018 - 9:02 am | पैसा

माहितीपूर्ण छान लेख

जागु's picture

22 Feb 2018 - 10:58 am | जागु

सूड, पैसा धन्यवाद.

एकनाथ जाधव's picture

15 Jun 2018 - 11:33 am | एकनाथ जाधव

छान उपक्रम. काही फोतो दिसत नाही.

चहाबिस्कीट's picture

15 Jun 2018 - 2:52 pm | चहाबिस्कीट

शिवाय आपण जनतेनेही घातक असणारे प्लास्टीकला मर्यादा आणून आपल्या परंपरागत ह्या वस्तूंचा वारसा चालविला तर ही आणि अशा इतर अनेक संपुष्टात येणार्‍या कला जपल्या जातील

+100

मदनबाण's picture

15 Jun 2018 - 9:28 pm | मदनबाण

फोटो दिसेना !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय एम ए स्ट्रीट डान्सर... :- इल्जाम (1986)