उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग
१९५० ते १९७२ या काळात अमेरिकन संशोधक जॉन कोलनने लोकसंख्या वाढीचे परिणाम जाणून घेण्यासाठी उंदरांवर काही प्रयोग केले. या प्रयोगा अंतर्गत त्याने उंदरांना राहण्यासाठी सुमारे ३००० उंदरांना पुरेल असा मोठा पिंजरा तयार केला. पिंजऱ्यात अन्न, पाणी इत्यादीचा मुबलक पुरवठा होता. राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी परिस्थिती तयार करण्यात आली होती. त्यावरुन या प्रयोगाला ‘माऊस युटोपिया एक्सपेरीमेंट’ अर्थात ‘उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग’ असे नाव पडले. यात सर्व काही मुबलक असून बंधन फक्त एकच होते ते म्हणजे जागेचे. ती जागा उंदीर आत-बाहेर करू शकणार नाहीत अशा प्रकारे पूर्ण बंधिस्त करण्यात आली होती. या पूर्ण प्रयोगादरम्यान उंदरांची संख्या आणि त्यांचे सर्वसाधारण सामाजिक वर्तन यांची नोंद घेण्यात आली.
प्रयोगाच्या पहिल्या दिवशी यामध्ये सुदृढ अशा ८ उंदीर (४ नर , ४ मादी) सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात उंदरांनी आजूबाजूच्या वातावरणात जुळवून घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी आपापला मोहल्ला निश्चित करणे, राहण्यासाठी सोय करणे इत्यादी गोष्टी केल्या. हा टप्पा जवळजवळ १०० दिवस चालला.
दुसऱ्या टप्प्यात झपाट्याने उंदरांची संख्या वाढू लागली. या टप्प्यात दर ६ दिवसाला उंदरांची संख्या दुप्पट होत असे. या संपूर्ण पिंजऱ्यात काही विभाग केलेले होते. हे सर्व विभाग संसाधने, जागा इत्यादी बाबतीत अगदी एकसारखे होते. तरीसुद्धा काही भागांमध्ये उंदरांचे केंद्रीकरण झाले. अशा भागात संसाधनांचा जास्त वापर झालेला पाहायला मिळाला. या काळात बऱ्याच भागांमध्ये भरपूर गर्दी झाली. खाणे, पिणे इत्यादी क्रिया उंदरांना सार्वजनिक रित्या कराव्या लागू लागल्या. हा टप्पा साधारण अडीचशे दिवस चालला.
तिसऱ्या टप्प्यामध्ये उंदरांच्या संख्येचा समतोल साधला गेला. उंदरांची संख्या (३००० उंदरांना पुरेल इतकी जागा असून) २२०० ला स्थिरावली. परंतु टप्प्यामध्ये उंदरांचा सामाजिक ऱ्हास होत गेला. ‘अतिरिक्त’ नरांवर स्वीकारले जाण्यासाठी झगडा करण्याची वेळ आली. बहुतांश भागात हिंसाचार सुरु होऊन तो हळूहळू वाढू लागला. नरांमध्ये अतिउन्मत्त होऊन वेडेपिसे झाल्यासारखे वागणे, लैंगिक दृष्टीकोन बदलणे इत्यादींपासून ते इतर उंदरांना खाणे इथपर्येंत विकृती दिसू लागल्या. न स्वीकारले गेलेले नर एकलकोंडे होऊन इतर उंदीर झोपलेले असतानाच फक्त खाण्यासाठी बाहेर पडू लागले. त्यांनी स्वतःला समाजापासून पूर्णपणे तोडून घेतले.
माद्यांमध्ये पाहायला मिळालेल्या बदलांमध्ये मातृत्व धारण न करू शकणे. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न होणे. स्वतःच्याच पिल्लांना इजा करणे, काही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी आणून उरलेल्या पिल्लांना विसरून जाणे, इत्यादी प्रकार दिसले.
अशा परिस्थितीमध्ये जन्मलेली नवीन पिढी अकार्यक्षम होत गेली. हे उंदीर फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि बाह्य सौंदर्यावर अति प्रमाणात काम करणे यामध्ये पूर्ण वेळ खर्च करत असत. बाह्य सौंदर्याबाबद अति जागरूक असलेहे हे ‘सुंदर उंदीर’ प्रजनन मात्र करत नसत तसेच कुठलीही आक्रमकता त्यांच्यात पाहायला मिळाली नाही. हा टप्पा जवळजवळ तीनशे दिवस चालला.
यापुढच्या टप्प्यात उंदरांची संख्या कमी होऊ लागली. ३००० उंदरांची क्षमता असून सुद्धा सर्वात जास्त संख्या २२०० इतकीच झाली. जन्म झालेले उंदीर जगण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले. अकार्यक्षम अशा ‘सुंदर उंदरांचे’ प्रमाण वाढू लागले. शेवटचे १००० उंदीर हे जगण्यासाठी गरजेच्या गोष्टी, जसे स्वसंरक्षणासाठी आक्रमकता, प्रजनन इत्याही कधी शिकलेच नाहीत. सगळे उंदीर एकमेकांच्या इतके जवळ असून या टप्प्यामध्ये प्रत्येक उंदीर हा इतर उंदरांबद्दल उदासीन होत गेला आणि प्रयोगाच्या जवळजवळ ६०० दिवसानंतर त्या ठिकाणची संपूर्ण उंदरांची जमात नष्ट झाली !
या प्रयोगामध्ये उपलब्ध असलेली जागा उंदरांनी कधीही पूर्ण वापरली नाही. काही जागांमध्ये उंदरांचे केंद्रीकरण झालेले पाहायला मिळाले. काही उंदरांना समाजात कोणतेही स्थान मिळाले नाही, असे उंदीर एकलकोंडे होऊन समाजापासून तुटले. बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम नवीन पिढीवर झाला. प्रत्येक पिढीकडून पुढच्या पिढीकडे अधिक नकारात्मक वृत्ती सोपवली गेली. यातून कुठलेही काम न करणारे, प्रजनन न करणारे उंदीर तयार झाले. या पिढीने जगण्यासाठी आवश्यक अशा आक्रमकता आणि प्रजनन या मुलभूत गोष्टी कधीच आत्मसात केल्या नाहीत. यामुळे कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी परिस्थिती असून उंदरांची जमात पूर्णपणे नष्ट झाली. यामध्ये एक निष्कर्ष असा काढला गेला कि वाढलेल्या संख्येमुळे उंदरांचा एकमेकांशी खूप जास्त संबंध येऊ लागला. त्यांचे खाणे पिणे इत्यादी सर्व क्रिया इतर उंदरांच्या उपस्थितीमध्ये होत असत. हि वाढलेली सामाजिक उंदरांना हाताळता आली नाही. यातून हिसांचार, एकलकोंडे उंदीर, कमी झालेली प्रजनन क्षमता आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिकदृष्ट्या असक्षम अशी शेवटची पिढी असे परिणाम झाले.
या प्रयोगाच्या उपयुक्ततेबाबद काही मतमतांतरे आहेत. हा प्रयोग जसाच्या तसा मानवजातीस लागू होणार नसला तरीसुद्धा या प्रयोगादरम्यान केलेले निरीक्षणं दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. या प्रयोगादरम्यान पाहायला गेलेले संख्येचे केंद्रीकरण आणि न वापरली गेलेली काही जागा हे मानवी जगात देखील पाहायला मिळते. जर्मनीमध्ये शहरात असलेली अति लोकसंख्या आणि त्याच वेळी देशाच्या काही भागात ओसाड पडेलेले गावं (घोस्ट व्हिलेजेस) हे याचच एक उदाहरण म्हणता येईल.
भारतामध्येही मुंबईसारख्या शहरात झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या अशाच प्रकारच्या आहेत. जगाच्या काही भागात अकारण किंवा अतिशय लहान कारणांवरून होणारी हिंसा, सामाजिक सांस्कृतिक ऱ्हास यात त्या त्या झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण हे सर्वात मोठे कारण असू शकते. तसेच विकसित देशांमध्ये या प्रयोगात कमी होत गेलेल्या उंदरांच्या संख्येप्रमाणेच जपान, साऊथ कोरिया इत्यादी देशांमध्ये लोकसंख्या कमी होत आहे.
सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध असून फक्त आणि फक्त मर्यादित (कमी नाही) जागा संपूर्ण जमातीच्या अस्तासाठी कारणीभूत झाली. मनुष्यांच्या बाबतीत ‘इस्टर आयलंड’ हे एक अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. चिली देशाच्या पश्चिमेस सुमारे ३००० किमी दूर दक्षिण पॅसिफिक समुद्रात असलेले इस्टर आयलंड हे बेट आहे. तेथे इ.स.९०० च्या सुमारास काही टोळ्या जाऊन पोहोचल्या. त्यावेळी हे बेट अतिशय निसर्गसंपन्न होते. संसाधनांच्या मुबलक उपलब्धतेमुळे तेथे आलेल्या टोळ्या तेथेच स्थिरावल्या. या टोळ्या म्हणजेच ‘रापा नुई’ नावाने ओळखली जाणारी जमात. (भलेमोठे तोंड असलेल्या प्रसिद्ध मानवी मुर्त्या यांनीच तयार केल्या.) पुढे त्यांची लोकसंख्या वाढत गेली. अतिवापरामुळे नैसर्गिक संसाधने कमी होत गेली. एक वेळ अशी परिस्थिती आली कि बेटावरून बाहेर पडण्यासाठी होड्या बनवण्यापुरते लाकडं सुद्धा बेटावर उरले नाहीत आणि इथले सगळे लोक बेटावर अडकून पडले. या बेटाच्या आजूबाजूला दोन, अडीच हजार किलोमीटर्स पर्येंत दुसरी मानवी वस्ती नाही. त्यानंतर अन्नासाठी एकमेकांमध्ये युद्ध, मानवाने मानवाला खाणे अशा परिस्थितीमुळे तिथली लोकसंख्या खूप कमी होत गेली. चौदाव्या शतकात १२,००० असलेली हि लोकसंख्या अठराव्या शतकात युरोपियन खलाशांना हे बेट सापडले त्यावेळी १११ पर्येंत खालावली.
या प्रयोगातून समोर आलेल्या गोष्टी मानव जातीला नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत. मानवजात अशाच प्रकारे नष्ट होईल असा निष्कर्ष यातून काढता येणार नसेल तरी लोकसंख्येच्या केंद्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमीअधिक प्रमाणात या प्रयोगात पाहिल्याप्रमाणेच असतील. भारतामधील लोकसंख्यावाढीचे काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करून वेळीच उपाययोजना केल्यास सामाजिक ऱ्हास थांबवता येईल.
-प्रतिक कुलकर्णी
---
ब्लॉग वर पूर्वप्रकाशित
https://pratiksk.wordpress.com/
प्रतिक्रिया
30 Jan 2018 - 11:20 pm | एस
विचारप्रवर्तक प्रयोग आहे. याविषयी अधिक वाचायला आवडेल.
30 Jan 2018 - 11:23 pm | गॅरी ट्रुमन
मस्त. रोचक माहिती.
उंदरांच्या प्रयोगावरून व.पु.काळेंचा स्टॅटिस्टिक्स (सुदर्शन) मराठे आठवला :)
31 Jan 2018 - 7:55 am | सुखीमाणूस
:) :)
31 Jan 2018 - 2:04 am | वीणा३
इंटरेस्टिंग
31 Jan 2018 - 2:15 am | रुपी
रोचक!
31 Jan 2018 - 6:21 am | मारवा
एका महत्वाच्या प्रयोगावियी छान माहीती करुन दिलीत. प्रयोगाचे निष्कर्ष विचार करण्यास भाग पाडणारे आहेत.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे.
31 Jan 2018 - 8:09 am | प्राची अश्विनी
+११
31 Jan 2018 - 8:08 am | नावातकायआहे
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!
अधिक वाचायला आवडेल!!
31 Jan 2018 - 10:29 am | ss_sameer
समान लेख मला लोकसत्ता मध्ये वाचलेला आठवतोय. काडीमात्र फरक नव्हता बहुतेक त्यात..
31 Jan 2018 - 11:18 am | प्रतिक कुलकर्णी
नाही, एक महिन्यापूर्वी लिहिलेला आहे. लोकसत्ता मध्ये आलेल्या लेखाची लिंक मिळेल काय? किंवा नाव तारीख काहीही.
31 Jan 2018 - 12:06 pm | आनन्दा
सेम नाहीये, पण या प्रयोगाबद्दल एक लेख मी वाचलाय लोकसत्तामध्ये..
तिथेच मला हा प्रयोग कळला actually
31 Jan 2018 - 12:17 pm | प्रतिक कुलकर्णी
अच्छा असेल, हा प्रयोग बराच प्रसिद्ध आहे तसा.
31 Jan 2018 - 5:40 pm | मारवा
ऐसी अक्षरे वर याच प्रयोगाचा उल्लेख आलेला आहे
हा ही एक अतिशय उत्तम लेख आहे आपण एकदा बघावा
http://www.aisiakshare.com/node/6291
31 Jan 2018 - 12:17 pm | प्रतिक कुलकर्णी
अच्छा असेल, हा प्रयोग बराच प्रसिद्ध आहे तसा.
31 Jan 2018 - 10:33 am | पुंबा
रोचक आहे.
पुभाप्र.
31 Jan 2018 - 11:15 am | प्रतिक कुलकर्णी
धन्यवाद मोत्रहो.
पुढचा लेख लवकरच येईल.
31 Jan 2018 - 11:16 am | प्रतिक कुलकर्णी
मित्रहो**
31 Jan 2018 - 1:12 pm | शलभ
मस्त लेख.
31 Jan 2018 - 1:19 pm | देशपांडेमामा
ईंटरेस्टींग प्रकार आहे
पुभाप्र
देश
31 Jan 2018 - 1:28 pm | अभ्या..
ह्या प्रयोगाच्या नोंदी ठेवणाऱ्या लोकांच्या अंगावर लव आणि मागे एक शेपूट फुटले असणार हे निश्चित.
31 Jan 2018 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक संशोधन !
चांगल्या लेखाला गालबोट नको म्हणून एक छोटीशी दुरुस्ती... इस्टर आयलँड चिली या देशाच्या (दक्षिणेला नाही तर) पश्चिमेला दक्षिण प्रशांत (पॅसिफिक) महासागरात आहे.
31 Jan 2018 - 3:57 pm | प्रतिक कुलकर्णी
वाह, धन्यवाद सर. बदल करतो. :)
31 Jan 2018 - 2:03 pm | मराठी_माणूस
इतकी वर्षे अखंड प्रयोग ?!
31 Jan 2018 - 3:58 pm | प्रतिक कुलकर्णी
धन्यवाद तुम्हाला पण. :)
टायपो आहे तो. ६०० दिवस चाललाय प्रयोग साधारण.
31 Jan 2018 - 2:26 pm | सूड
वाचतोय.
31 Jan 2018 - 2:51 pm | जागु
छान.
असच माकडांवरती केलेल्या प्रयोगाचही काहीतरी आठवत.
31 Jan 2018 - 4:01 pm | प्रतिक कुलकर्णी
लेख एडीटायचा कसा सांगू शकेल का कोणी? मला सापडेना.
31 Jan 2018 - 4:26 pm | मुक्त विहारि
मस्त...
31 Jan 2018 - 7:38 pm | पगला गजोधर
चांगला लेख,
अजून असे लेख वाचायला आवडेल.
31 Jan 2018 - 11:35 pm | पिंगू
मस्त आहे. आवडेश. पुढील भाग सुद्धा लवकर येऊ दे.
1 Feb 2018 - 2:49 pm | दीपक११७७
लोकसत्तेत आलेला लेख
1 Feb 2018 - 5:55 pm | मराठी कथालेखक
पण 'सुंदर उंदीर'म्हणजे 'तसेच उंदरांच्या बाबतीत बाह्य सौंदर्यावर काम करणे म्हणजे नेमके काय ?
1 Feb 2018 - 6:20 pm | पैसा
एकदम इंटरेस्टिंग आहे. माणसाच्या जातीची अंदाधुंद वाढ कधीतरी त्याचा विनाश घडवून आणणार आहे.
1 Feb 2018 - 9:21 pm | चित्रगुप्त
- म्हणजे नेमके काय, आणि हे कसे समजले ?
2 Feb 2018 - 1:10 am | अमितदादा
छान लेख...लोकसत्ता मधील लेख सुद्धा वाचला. दोन्ही लेख बरेच वेगळे आहेत.
लोकसत्ता मधील लेखात याचे उत्तर आहे
त्यांचा इतर सगळा वेळ केवळ स्वत:ला चाटूनपुसून स्वच्छ ठेवण्यात जात असे.
2 Feb 2018 - 2:00 am | पर्णिका
माहितीपूर्ण लेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !
आता लोकसत्तेतला लेख वाचते.
2 Feb 2018 - 4:37 pm | प्रतिक कुलकर्णी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
लोकसत्ता लिंक बद्दल धन्यवाद, वाचतो आता.
म्हणजे नेमके काय, आणि हे कसे समजले? >> हे सुंदर उंदीर म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी न करता फक्त स्वतःची केस (फर जे काय म्हणतात ते) साफ ठेवणे इत्यादी गोष्टी करताना आढळले. नॉर्मल उंदीर हे इतक्या प्रमाणात करत नसत.
2 Feb 2018 - 4:39 pm | प्रतिक कुलकर्णी
@मारवा - ऐसी अक्षरे वरील लिंक सुद्धा पाहत आहे, धन्यवाद.
2 Feb 2018 - 8:52 pm | सुबोध खरे
https://nihrecord.nih.gov/pdfs/2008/07252008_Record.pdf
उंदीर आणि माणसात सरळ सरळ तुलना होऊ शकत नाही
आणि असे इतर शास्त्रज्ञांनी केलेलं प्रयोग वेगळेच निष्कर्ष दाखवतात.