एक 'पोपटी'ची संध्याकाळ

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
14 Jan 2018 - 7:30 pm

जानेवारीची मस्त थंडी आणि त्यात आम्ही दोन दिवसांकरता का होईना पण अलिबागला गेलो होतो. आम्ही उतरलो होतो तो बंगला तर केवळ अप्रतिमच होता. एक मस्त तरण तलाव होता. मागच्या आवारात भरपूर नारळाची झाडं आणि हिरवं गार गवत. एकदम शांत वातावरण. फक्त पक्षांचे आवाज आणि आमच्या गपा-हसण्याचे. याहून छान आणि निवांत अस काही असूच शकत नाही; अस वाटत होत. दुपारच्या जेवणानंतर मस्त वामकुक्षी आटोपून मुलींबरोबर त्या तरण तलावाकाठी गप्पा मारत कॉफीचा आस्वाद घेत बसलो होतो. त्यावेळी बंगल्याचे caretaker विनोदजी आले. त्यांनी विचारले, "या सिझनला पोपटी करतात. तुम्हाला आवडणार असेल तर करतो." म्हंटल,"हे पोपटी काय असत? माहित नाही आम्हाला." ते म्हणाले,"मडक्यात भाजलेलं चिकन आणि भाज्या. बघा आवडेल नक्की." मी म्हणाले,"मी नॉनवेज नाही खात. बाकी हे तिघे सगळं खातात." ते म्हणाले,"वाहिनी, तुमच्यासाठी कणीस, बटाटा, वांगी असतील. खाऊन बघा. नक्की आवडेल." म्हंटल, "हे काहीतरी नवीन आहे. नक्की बघितलं पाहिजे. नक्की खाऊ आम्ही. कराच तुम्ही ही पोपटी."

मी हो म्हंटल्यावर ते तयारी करायला गेले. थोड्यावेळाने बघितलं तर २ किलो वालाच्या शेंगा, तितक्याच वाटाण्याच्या शेंगा, ४-५ बटाटे, वांगी, अंडी आणि चिकन घेऊन ते आले. बटाटा, वांगी आणि चिकन याला फक्त तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आणि अख्खा लसूण लावून त्यांनी ते मुरायला ठेऊन दिल. दिवस मावळला तसं एक मोठस मडक घेऊन ते स्वच्छ धूतल. त्यात ते कोणतीतरी झुडपं घालत होते. मी विचारलं," हे काय आहे नक्की?" त्यांनी माहिती दिली,"हा भांभूर्डीचा पाला आहे. बघा याला वास कसा येतो." हातात घेऊन बघितलं त्याला मस्त ओव्याचा वास येत होता. खूप छान वाटला तो ताजा ओलसर झाडाचा ओव्यासारखा वास. त्यांनी पुढे माहिती दिली. "हा या मडक्यात घालायचा. त्यावर या गावठी वालाच्या शेंगा आणि वाटाणा शेंगा घालायच्या. त्यावर चिकन आणि अंडी. मग परत शेंगा. मग तुमची वांगी आणि बटाटे. परत शेंगा. आणि मग परत भांभूर्डीचा पाला."

एकूण हे सगळ त्यांनी त्या मडक्यात भरलं. मग आवारात एका कोपऱ्यात ते मडक त्यांनी उलट करून ठेवलं. त्यावर सुकलेल्या काथ्या रचल्या. मग सुकलेलं गवत निट रचून त्याला आग लावली चारी बाजूनी. गोल फिरून आग नीट लागली आहे की नाही ते पाहिलं. मी देखील त्यांच्या बरोबर तिथे उभी राहून बघत होते. ते म्हणाले,"वाहिनी, आता २० मिनिट बसा आरामात." साधारण २०-२५ मिनिटांनी त्यांनी काठीने त्या मडक्याच्या बाजूचा जाळ हलवायला सुरवात केली. मडक चांगलच लालसर गरम झालेलं दिसत होत. मी म्हंटल,"आता हे गार होईपर्यंत थांबावं लागेल." त्यावर विनोदजी म्हणाले, "अरे गार झाल्यावर खाण्यात काय मजा? आता ओल्या गोणपाटात मडक उचलून आणतो पुढे. चला तुम्ही." आणि खरच एक गोणपाट ओल करून ते त्या मडक्यावर टाकल. ते गरम मडक उचलून त्यांनी आम्ही बसलो होतो तिथे आणलं. त्या ओल्या गोणपाटानेच त्यांनी वरचा पाला काढला. तिथे एक परात तयार ठेवलेली होती. त्यात त्यांनी ते मडक उलटं केलं. आतून मस्त खरपूस भाजलेल्या शेंगा, बटाटा, वांगी, अंडी बाहेर आली. मग एक मोठा चिमटा घेऊन त्यांनी चिकनचे तुकडे बाहेर काढले आणि परात आमच्या समोर ठेवली. म्हणाले,"हे असंच गरम-गरम खाऊन बघा."

तो एकूण प्रकार बघून मुली काही फार उत्साही नव्हत्या ते खायला. पण त्यांची मेहेनत बघून त्यांनी एक एक चिकनचा तुकडा उचलला. खायला सुरवात केली मात्र... सर्वांचाच चेहेरा खुलला. भाजलेल्या भाज्या आणि चिकन-अंडी सगळ एकूणच इतक अप्रतिम चविष्ट होतं. भाजलेल्या शेंगा देखील अगदी मस्त लागत होत्या. 'मी काही फारस खाणार नाही ह....' अस म्हणणाऱ्या माझ्या लेकीनी अगदी मनापासून सगळ खाल्ल. नंतर शेंगांच्या सालींचा झालेला ढीग बघून आम्ही एकमेकांना चिडवत हसायला लागलो.

खरच! इतकं स्वादिष्ट... मस्त खरपूस भाजलेली... अत्यंत पौष्टिक आणि तेल-तूप किंवा फार काही मसाले नसलेली ती पोपटी आमची संध्याकाळ एकदम सप्तरंगी चविष्ट करून गेली.

पाकक्रियालेख

प्रतिक्रिया

राही's picture

14 Jan 2018 - 8:10 pm | राही

एकेकाळचे ठाणे-कुलाबा आणि आताचे पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतला हा पारंपरिक प्रकार आहे. अतिशय लोकप्रिय आहे. मुंबईनजिक वसई, विरार, पनवेल या भागातही पोपटी पार्ट्या होतात. देशावरच्या हुरडा पार्टीसारख्याच. यात सरसकट कुठल्याही जातीच्या वालाच्या शेंगा चालत नाहीत. या भागात वेगळ्या शेंगा असतात. हिरव्यासफेद रंगाच्या, वरून मऊ लव असलेल्या आणि एक वेगळ्याच ओल्याहिरव्या वासाच्या. या शेंगा नाशिक शेंगांप्रमाणे दोन्ही बाजूंनी वळलेल्या आणि फुगीर नसतात. करंजीसारख्या एका बाजूने सरळ आणि चपट्या असतात. आणखी एक जांभळट रंगाची खास जात असते. पण आजकाल ती फारशी दिसत नाही. अगदी गुजरात सीमेपर्यंत पोपटी करतात. पुढे वापी वलसाडपर्यंत यातच थोडा बदल होऊन उंबाडियूं आणि पुढे सूरतमध्ये ऊंधियूं बनतें.
पोपटी हा शब्द 'फुफाटी' या शब्दावरून आला आहे. मातीत खड्डा खणून त्यात मडके अर्धवट पुरतात. चारी बाजूंनी विस्तव करतात. वाळक्या काटक्या आणि गोवर्‍यांच्या
गरम राखेच्या उष्णतेने मडक्यातले पदार्थ छान भाजून निघतात. फुफाटीत भाजलेली म्हणून फुफाटी-पोपटी. पूर्वी वाटाणा घालत नसत. त्याऐवजी वसईची वेलवांगी, राजेळी केळी असत. शिवाय कोनफळ, रताळी, केळी, तूर आणि वालाच्या शेंगा असत. चिकन अंडी ही अलीकडची सुधारणा दिसते.

गावठी शेंगा फेब्रुवारीत येतील, तेव्हाच पोपटीचा बेत केला आहे. योग्य वेळेवर तारीख कळवली जाईल..

रुस्तम's picture

15 Jan 2018 - 12:17 am | रुस्तम

या पेणला करूयात पोपटी...

मी मांडवा बीचवर पोपटीचा बेत ठेवला आहे.

रुस्तम's picture

15 Jan 2018 - 5:00 pm | रुस्तम

मस्तच...

सुधांशुनूलकर's picture

18 Jan 2018 - 12:21 pm | सुधांशुनूलकर

मला बी पोपटी खायला येऊ द्या की रं...

या हो काका. तुम्ही आलात तर अनायासे ओरिगामीचे लहानसे सेशन सुद्धा होऊन जाईल..

सुधांशुनूलकर's picture

19 Jan 2018 - 3:12 pm | सुधांशुनूलकर

मजा येईल.
धाग्याची वाट पाहतो.

पिंगू, लेका मला नक्की सांग रे... मी येईन...

अरे भाई, तुझा रेशियाड मसाला यावेळेस ट्राय करायचा बेत आहे. तेव्हा तुला बोलावणारच..

केडी's picture

22 Jan 2018 - 3:53 pm | केडी

ओके रे ...

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2018 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

पोपटी !!!!!!!! जुन्या आठवणी जाग्या केल्यात आणि तोंडाला पाणी सुटले ! जमाना झाला पोपटी खाऊन :(

पोपटी हा मुळचा शाकाहारी पदार्थ आहे... चिकन, अंडी हा प्रकार हल्ली सुरू झाला आहे.

पोपटीतल्या वालाच्या शेंगा, नुकत्याच फोडलेल्या त्याच्या कोवळ्या नारळातील खोबर्‍याबरोबर खायच्या असतात... अहाहा !

ज्योति अळवणी's picture

15 Jan 2018 - 1:46 am | ज्योति अळवणी

अधिक संदर्भासाठी काही फोटो टाकले आहेत

1

2

3

4

5

6

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2018 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रे दिसत नाहीत. बहुतेक त्यांना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलेला नाही.

चामुंडराय's picture

15 Jan 2018 - 2:04 am | चामुंडराय

पोपटी कधी खाल्लेली नाही किंबहुना नाव देखील ऐकले नव्हते मात्र मिपा मुळेच अलीकडच्या काळात पोपटीची ओळख झाली, आता प्रत्यक्ष खाण्याचा योग् कधी येतो बघूया.

तुम्ही राहायला कुठे? मुंबई की पुणे?

पोपटी खाल्ली आहे दोनतीनदा नातेवाइकाकडे अलिबागला. विशेष नाही आवडली. गुजराती उंधियो मातमात्र दहा हजारपट चांगला लागतो.

उकडेल्या वालवालापेक्शा तुरी चांगल्या लागतात.

कंजूस's picture

15 Jan 2018 - 11:25 am | कंजूस

>>>वसईची वेलवांगी, राजेळी केळी असत. शिवाय कोनफळ, रताळी, केळी, तूर आणि वालाच्या शेंगा असत. चिकन अंडी ही अलीकडची सुधारणा दिसते.~~>>

हो.

साधारण तीन वर्षापूर्वी मी लिहीले होते आमच्या इथल्या पोपटी विषयी.

राही's picture

15 Jan 2018 - 4:43 pm | राही

हो जागुताई. मायबोलीवरची ती कृती अगदी साग्रसंगीत आणि पायरीपायरीने सांगितलेली होती. फोटो नेहेमीप्रमाणेच सुंदर होते. माझ्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांबुरडा किंवा भांबुरडीची दोन प्रकार असतात हे मला त्या रेसिपीमुळे कळले . काही लोकांना अनोख्या वाटणाऱ्या अशा अनेक पालेभाज्या, रानफळे यांची माहिती आणि त्या वापरून होणाऱ्या पाककृती तू मायबोलीवर प्रकाशित केलेल्या आहेस. मी तेव्हाच एका पाककृतीवर प्रतिसाद दिला होता की हे वैभव जपण्यासाठी त्याचे दस्तऐवजीकरण व्हायला पाहिजे. नवीन आणि विशेषतः शहरी पिढीला यातली काहीच माहिती नाही. तू हे सर्व पुस्तकरूपात येण्यासाठी प्रयत्न कर. वनस्पतींच्या शास्त्रीय नावांबरोबर वेगवेगळ्या प्रदेशांतल्या प्रचलित नावांचाही समावेश करता येईल. ह्या कामासाठी आगाऊ शुभेच्छा.

ही पोपटी खाण्याची इच्छा आहे. बघू कसं जमतंय ते.

ज्योति अळवणी's picture

15 Jan 2018 - 3:24 pm | ज्योति अळवणी

अनेकांना पोपटी माहीत आहे आणि अनेकांनी खाल्ली देखील असेल. माझा पहिलाच अनुभव. आजवर फक्त ऐकून होते. मनापासून आवडली पोपटी म्हणून इथे मिपाकरांशी शेअर केली

माहितगार's picture

15 Jan 2018 - 3:36 pm | माहितगार

या निमीत्ताने प्रथमच कळले . शेअर करण्यासाठी आभार

प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतोच. शिवाय जुने लोकही हल्ली जरा बदल म्हणून काही प्रयोग करतात. उंधियोचेपण असेच झाले आहे॥ खरा पारंपरिक शेतावरचा उंधियो खाल्ला तर सपक लागेल इतके आता मसालेदार बनवतात. यामागची गोष्ट लिहीन कधीतरी.

पगला गजोधर's picture

15 Jan 2018 - 8:59 pm | पगला गजोधर

एपिक चॅनेलवर, लॉस्ट रेसिपीज मधे, गुजरातमधील जुने पारशी लोकांची अशीच एक दुर्मिळ रेसिपी बघितली.
ते लोकं आंब्याची पान मातीच्या मडक्याच्या तोंडाशी लावतात, आंबा पाने फायरप्रूफ असतात, मडके रिव्हर्स पोजीशन तोंड खाली असे असते, जुन्या काळाचा प्रेक्षर कुकरच जणू...
यु ट्यूबवर लिंक शोधतो

राही's picture

20 Jan 2018 - 3:20 pm | राही

ऊंबाडियुं सुद्धा असेच असते. फक्त भाज्या ऊंधियुंचा मसाला नसतो. पण ड्राय कुक्ड चव चांगली लागते.
ऊम्बाडियुंचा अर्थच मुळी 'उपडे' किंवा 'उलटे'.

पोपटीत मडकं उलटंच ठेवायचं असतं/ठेवतात.

पोपटी खायची तर आहे, आता पिंगू बोलवतो तर बघू!!

चिंता नको. डीटेल्स कळवेनच..

कपिलमुनी's picture

16 Jan 2018 - 2:35 pm | कपिलमुनी

पोपटीचा विषय आणि सगा सर अनुपस्थित ?

>>पोपटीचा विषय आणि सगा सर~~

पोपटी अष्टागरातली,( अलिबाग परिसर) सगा माणगावचे. तिकडे श्रीवर्धनच्यापुढेसुद्धा याचं फॅड नसेल.

>>पोपटीचा विषय आणि सगा सर~~

पोपटी अष्टागरातली,( अलिबाग परिसर) सगा माणगावचे. तिकडे श्रीवर्धनच्यापुढेसुद्धा याचं फॅड नसेल.

नूतन सावंत's picture

18 Jan 2018 - 9:35 am | नूतन सावंत

मस्त पोपटी लेख.
@ज्योति अलवनि,व्यनि वॆला आहे.

ज्योति अळवणी's picture

18 Jan 2018 - 11:25 am | ज्योति अळवणी

आपल्या व्यनिला उत्तर द्यायला उशीर झाला. परंतु आत्ताच व्यनि केला आहे

तसं नको. एका पोपटी कट्टयाचं आयोजन करणं कोणाला शक्य आहे का? खर्च विभागून कसा करता येईल ते ठरवावं. आणि एक सिरियसली प्लान करणारा धागा काढावा.

संख्या मर्यादित ठेवावी लागत असेल तर प्रथम येणाऱ्याला (कळवून नक्की करणाऱ्याला) प्राधान्य असणं असं काहीतरी करता येईल.

गवि शेठ, या वेळेस मी पोपटी कट्ट्याचे आयोजन करायचा प्रयत्न करणार आहे. साधारण १० दिवसांअगोदर धागा टाकेन.

पिलीयन रायडर's picture

20 Jan 2018 - 2:40 pm | पिलीयन रायडर

पुण्याच्या आसपास कुठे मिळेल का ही पोपटी?

लेख वाचून फारच इच्छा होतेय.

राही's picture

20 Jan 2018 - 3:25 pm | राही

खूप काही चविष्ट नसते ही पोपटीतली भाजी. पण भाज्यांच्या अंगच्या रसात शिजवलेली आणि वाफवलेली असल्यामुळे मूळ ताजी चव येते. शिवाय उघडल्यावर सर्व ताज्या भाज्यांचा एकत्र रोस्टेड-स्टीम्ड असा दरवळच भूक जागवतो.

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 9:14 am | ज्योति अळवणी

काही मिपाकरांनी व्यनि करून आम्ही उतरलो होतो त्या बंगल्याची माहिती विचारली आहे. हा बांगला भाड्याने मिळतो. इथे details देते. आपल्यापैकी कोणाला जायचे असल्यास जरूर जावे.

+919870975005 हा नंबर श्री भरत यांचा आहे. मांडवी गावात हा अप्रतिम बंगला आहे. आपण जरूर जा. बंगल्यामध्ये स्विमिंग पूल देखील आहे. खूपच आवडेल तुम्हाला

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 9:14 am | ज्योति अळवणी

काही मिपाकरांनी व्यनि करून आम्ही उतरलो होतो त्या बंगल्याची माहिती विचारली आहे. हा बांगला भाड्याने मिळतो. इथे details देते. आपल्यापैकी कोणाला जायचे असल्यास जरूर जावे.

+919870975005 हा नंबर श्री भरत यांचा आहे. मांडवी गावात हा अप्रतिम बंगला आहे. आपण जरूर जा. बंगल्यामध्ये स्विमिंग पूल देखील आहे. खूपच आवडेल तुम्हाला

फुंटी's picture

23 Jan 2018 - 9:48 pm | फुंटी

पालघर जिल्ह्यात कोनफळ ,शेवग्याच्या शेंगा आणि इतर भाज्या मडक्यात टाकून उकडहंडी केली जाते.साधारण असाच प्रकार असतो.सगळ्या भाज्यांचं एकत्रित पुरण बनत ते अतिशय चविष्ट लागते..चिकन ,अंडी हे addition ..