'आप' तो ऐसे ना थे..!
सत्ता नावाची गोष्टच अशी असते कि ती भल्याभल्याना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे नाचवत राहते. सत्तेचा उपयोग नीती आणि विवेकाने केला तर तिच्यामुळे माणसातले माणूसपण फुलते. मात्र, हीच सत्ता डोक्यात शिरली कि ती माणसाच्या नैतिक अधःपतनालाही कारणीभूत ठरू शकते. कुणी सत्तेचा वापर जनहितासाठी करतो.. तर कुणी या सत्तेच्या भरवश्यावर आपला स्वार्थ साधून घेतो. सत्ता माणसाला घडवतेही आणि बिघडवतेही. हातात सत्ता असताना नीती नियम आणि तत्तवांचे पालन करून घडलेल्या व्यक्तीची इतिहास नोंद घेतो. तर सत्तेसाठी तत्व सोडून स्वार्थ जपणाऱ्या व्यक्तीला इतिहासही माफ करत नाही, हा सुद्धा एक इतिहास आहे. अर्थात वरील वाक्य फक्त वाचण्या- ऐकण्यासाठीच चांगली वाटतात. यावर जर प्रत्यक्ष अमल करायचा म्हटलं तर व्यवहारवादच आठवतो. राजकारणात तर नीतिमत्ता, आदर्शवाद हे शब्द अंधश्रद्धेसारखे झाले आहेत. तात्विक आदर्शाच्या गप्पा मारणाऱयांनी स्वतःवर वेळ आल्यावर आपल्याच आदर्शावर पाणी फिरवल्याचा एक नवा 'आदर्श' निर्माण केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजीरवाल यांनीही हा 'आदर्श' घेतल्याचे सध्याच्या घडामोडीवरून दिसत आहे. राजकारणातील अनैतिकतेवर प्रहार करत राजकारणात आलेल्या केजरीवालांनी राज्यसभेचे उमेदवार देताना आपल्याच नैतिक आदर्शावर 'झाडू' फिरवला असल्याने 'आप' तो ऐसे ना थे ! म्हणण्याची पाळी त्यांच्याच सहकाऱ्यांवर आली आहे.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलांतून अरविंद केजरीवाल नावारूपाला आले. लोकपालाची मागणी करता करता राजकारणातील अनैतिकतेची घाण साफ करण्यासाठी हातात झाडू घेऊन केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. राजकीय ढोंग, राजकीय अनैतिकता, प्रस्थापितांनी पायदळी तुडवलेली नीतिमूल्ये,भ्रष्टाचार वगैरेंबाबत सातत्याने आगपाखड करत अरविंद केजरीवाल यांनी प्रस्थापित पक्षांपेक्षा 'आप'ला पक्ष वेगळा असल्याचा भ्रम जनतेत निर्माण केला. स्वार्थाच्या राजकारणाला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी ही नवीन पर्याय म्हणून आप ला आपले समजून दिल्लीची सत्ता दिली. मात्र त्यांचा भ्रमनिरास व्हायला जास्त वेळ लागला नाही. सत्तेवर येताच केजरीवालांनी त्यांच्या पक्षाची एक अनोखी आचारसंहिता निर्माण केली. मुख्यमंत्रीपदाला आवश्यक असणारी सुरक्षाव्यवस्था आणि बंगलाही नाकरला. पण ही नैतिकता फार काळ टिकली नाही. सत्तेची खुर्ची मिळताच आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यहाराचे आरोप सुरु झाले. पक्षाला येणाऱ्या निधीपासून ते उमेदवारी देण्यासाठी आर्थिक गैरव्यहारापर्यंतचे आरोप वैक्तिकरित्या केजरीवाल यांच्यावर झाले. यातील अनेक आरोप त्यांच्या सहकार्यांनीच केले आहेत. मध्यंतरी केजरीवाल यांच्या अत्यंत विश्वासातील मंडळीनी 'आप' मध्ये 'पाप' सुरु असल्याचा आरोप करून पक्षाला सोडचिट्ठी दिली. आता राज्यसभेच्या उमेदवार यादीने पक्षातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.
मीरा सन्याल, कुमार विश्वास, आशुतोष किंवा आशिष खेतान ही कितीतरी सरस नावे असताना अरविंद केजरीवाल यांनी 'आप' ल्या पाठबळासाठी पक्षाचे नेते संजयसिंग, व्यावसायिक सुशील गुप्ता आणि सीए नारायणदास गुप्ता यांना उमेदवारी दिल्याचा आरोप केला जातोय. अरविंद केजरीवाल यांच्या स्वभावात अनेक दोष असतील, पण त्यांना कोणीही विकत घेऊ शकत नाही, असा माझा विश्वास होता. आज मी संभ्रमात गेलोय. मी स्तब्ध झालोय आणि खजिलदेखील.. ही योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया आम आदमी पार्टीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. केवळ जनमताच्या आधारावर गोष्टी होऊ नयेत, ज्येष्ठांकडून तपासून घेतल्या जाव्यात तसेच राज्यांना अप्रत्यक्ष प्रतिनिधीत्व मिळाव इत्यादी उद्देशांनी भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांनी राज्यसभेची घडण केली. मात्र राजकीय पक्षांनी या सभागृहाचा वापर विस्थापित राजकारण्यांची सोय करण्यासाठी केला. पक्षाला ‘अर्थपूर्ण’ ताकद देऊ शकणाऱ्यांना राज्यसभा किंव्हा विधानपरिषदेवर पाठविण्याचे प्रकार राजकीय पक्षाकडून केले जातात. तसं पाहता हा प्रकार कितीही गंभीर असला तरी त्यावर फार काही चर्चा वैगरे केली जात नाही. सगळेच एका मळीचे मणी असल्याने ''तेरी भी चूप, मेरी भी चूप' याप्रमाणे हा कार्यक्रम चालतो. मात्र अरविंद केजीरवाल यांनी नेमकं अशाच राजकीय अनैतिकतेवर बोट ठेवून काहूर उठवलं होतं. आजही आपण इतरांपेक्षा वेगळं असल्याचा तोरा ते मिरवत असतात. मात्र त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असल्याचे या घटनांवरून समोर येते.
जनतेने मोठ्या अपेक्षेने सत्तेची सूत्रं आम आदमी पक्षाकडे सोपवली होती. त्या दृष्टीने सुरूवातीला या सरकारचा कारभार उत्तम राहिला. परंतु नंतर केजरीवाल आणि मंडळींच्या डोक्यात राजकारणाची हवा चांगलीच शिरली. त्यात केजरीवाल यांची महत्वाकांक्षा तर राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहचली. आम आदमी पार्टी च्या नेत्यांवर गंभीर आरोप होत असताना केजरीवाल यांनी त्यावर मौन पाळले. स्वतः केजरीवाल यांच्यावरही अनेक गंभीर आरोप झाले आहेत. गेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आप ला याचा मोठा फटका बसला. तरीही केजरीवाल यांना यावर आत्मपरीक्षण करावे वाटले नाही. त्याऐवजी ते राष्ट्रीय नेता बनण्याचे स्वप्न पाहू लागले. अर्थातच राजकारणाचा आणि सत्तेचा हव्यास त्यांना लागला आहे. निवडणुकीच्या राजकारणात लांड्या लबाड्या करणे आवश्यक ठरते, असे म्हटले जाते. त्यामुळे केजरीवाल जे करत असतील त्याला ' राजकारण' हे गोंडस नाव देऊन त्याच ते समर्थन करतीलही. मात्र, नैतिकतेचा पाठ शिकविण्याचा (नैतिक)अधिकार त्यांच्याकडे असणार नाही, हे हि तितकेच खरे..!!
प्रतिक्रिया
6 Jan 2018 - 4:43 pm | सर टोबी
तुम्हाला आपची आठवण व्हावी यातच त्या पक्षाचे अपयशातही यश आहे. परंपरागत राजकारणाला लोक कंटाळले आहेत. सत्तेत असताना जी भूमिका असते त्याच्या नेमकी उलट भूमिका राजकीय पक्ष विरोधात असताना घेतात. संसदेची आणि विधानसभांची अधिवेशने मागून अधिवेशने वाया जात आहेत. कट आणि कारस्थाने या मध्येच सर्व वेळ जात आहे. साध्या साध्या प्रश्नांची उकल होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नावाचा चमत्कार होण्याची वाट पाहावी लागते असे सध्याचे दृश्य आहे.
या उलट सामान्य प्रशासन राजकारण मुक्त असावे अशी भुमीका केजरीवालांनी मांडली. शाळांचे प्रवेश, सार्वजनिक स्वछता आणि आरोग्य अशा गोष्टींसाठी कुणा नेत्याचा वशिला लावावा लागू नये अशी हि भूमिका होती आणि आहे.
राजकारणात प्रवेश करणे हि केजरीवालांची महत्वाकांक्षा नसून अपरिहार्यता होती. एवढेच सचोटीचे असाल तर या राजकारणात आणि बघा असे आव्हान मिळायला लागले होते. या उलट अण्णांचे आंदोलन जास्तच दांभिक वाटते आहे. जंतर मंतर आंदोलन करून सरकारवर दबाव आणला ते कोणते प्रश्न सुटले आहेत? उलट ते सर्व प्रश्न आहे तसेच असून उलट उग्र झाले आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर तो होत नाही असे म्हणण्यापेक्षा त्या वर आता कोणी बोलत नाही असे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
आपचा प्रवास कधीही सोपा नव्हता आणि नाहीये. त्यांच्या अनेक कामात नायब राज्यपालांचा हस्तक्षेप आक्षेपार्ह असतो. आपच्या अगोदर असे काही पद असते हे देखील आपल्याला माहित असण्याची गरज नव्हती. आता आपची एखाद्या योजनेत नायब राज्यपाल काय खोडा घालतील याची आपल्याला प्रतीक्षा असते. आपच्या मतदारांना या गोष्टी समजतात. जेटलींच्या कारभाराची चोकशी सुरु केल्याबरोबर मुख्य सचिवांच्या कार्यालयाची झडती घेतली जाते याचा कार्यकारण भाव देखील मतदार ओळखतात.
आम आदमी पक्षाच्या अपयशावर खुश होणे म्हणजे काही तरी चांगले होण्याच्या इच्छा शक्तीला आपणच मूठमाती देण्या सारखे आहे. बाकी तुमची इच्छा.
7 Jan 2018 - 9:27 pm | गॅरी ट्रुमन
पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे?
6 Jan 2018 - 5:31 pm | अँड. हरिदास उंबरकर
राजकीय व्यवस्था भ्रष्ट झाली असताना आम आदमी पार्टीच्या रूपाने एका पर्याय देशासोमोर उभा राहिला. केजरीवाल काही तरी वागले आहे अशी भावना जनमानसात रुजू लागली. केजरीवालांचे वागणे, बोलणे सामान्यांसारखे आहे. ते लोकांमध्ये मिसळतात आणि त्यांचे प्रश्न ऐकूनही घेतात. त्यामुळे साहजिकच त्यांची लोकप्रियता वाढली आणि त्यांना सत्ताही मिळाली. सुरवातीचा काळ खरंच मंतरलेल्या सारखा होता. या देशाला एक नवा आणि चांगला पर्याय मिळाल्याच्या भ्रमात मीही त्यावेळी केजरीवाल यांच्यावर एक लेख लिहला होता. मात्र ‘आप’ने दिल्लीतील ७० पैकी ६७ जागा जिंकल्या, तेव्हापासून या पक्षातील संघर्ष सातत्याने उफाळून येत आहे. आणि केजरीवाल यांची ‘हम करेसो कायदा’ ही हुकूमशाहीच्या दिशेने जाणारी वाटचालही स्पष्ट होऊ लागली आहे. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची ज्या पद्धतीने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, तेव्हाच केजरीवाल यांच्या पुढील वाटचालीची चिन्हे दिसली होती. आता त्याचा पुढचा भाग हळू हळू समोर येऊ लागला आहे.
केजरीवाल यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर तोफा डागत या राजकारणी नेत्यांना पैसा कोठून मिळतो, कोणते उद्योगपती त्यांना विमाने आणि हेलिकॉप्टर देतात, असे प्रश्न विचारून या मंडळींना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सारे राजकीय पक्ष आणि नेते भ्रष्ट आहेत आणि आपण स्वत: आणि आपला पक्ष हेच केवळ स्वच्छ असून, भ्रष्टांचे निर्दालन आपणच करू शकतो, असा त्यांचा आव दिसून आला. पण प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे. ज्यांना लीक पर्याय समजत होते ते सुद्धा प्रस्थापित होण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करताना दिसत आहे. यावर खुश कसा होणार ? आप ला अपयश येते आहे, म्हणून त्यावर विश्लेषण मांडण्याची मला तरी काहिच गरज नाहि. परंतु आपचा मार्ग चुकत असल्याचे दिसल्याने त्यावर भाष्य करावे असे मला वाटले.
आप’च्या बबतीत विचार केला तर विषय दिल्लीत सरकार स्थापनेचा असो किंवा लोकपाल विधेयकाचा असो. ‘आप’ची भूमिका काय आहे? आम्ही सांगू तसे आणि तेच झाले पाहिजे, कारण आम्हीच जनतेचा खरा आवाज आहोत आणि बाकी सगळे बदमाश आहेत. अगदी अण्णांचा प्रत्येक शब्द आम्हाला शिरसावंद्य आहे, असे काही दिवसांपूर्वी म्हणणारे केजरीवाल नंतर अण्णांची कोणीतरी दिशाभूल केल्याचे म्हणताना दिसले होते. सोयीचे असेल तेव्हा नैतिक मूल्यांचा जागर करायचा, आणि गैरसोयीचे असेल तेव्हा सर्व झुगारून द्यायचे, हा प्रकार कितपत योग्य म्हणावा ? आज केजरीवाल यांच्यावर निष्ठा म्हणजेच आम आदमी पक्ष असेल, तर त्या हायकमांडला शरण जाणे म्हणजेच पक्षशिस्त असणार ना? मग हे इतरांपेक्षा वेगळे कसे ?? अर्थात केजीरवाल यांनी काही चांगली आणि नाविन्यपूर्ण कामे दिल्लीत केली. त्याच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, यात दुमत नाहि. पण म्हणून त्यांच्या या कारभारावरही दुर्लक्ष करावे, हे न पटण्यासारखे आहे. म्हणून वेळ जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी आपला मार्ग एकदा तपासून पाहावा, यासाठी आप ऐसे ना थे चा प्रपंच.. हवे तर आपण याला चिमटा म्हणा.. पण हा विरोध किंव्हा अघोरी ख़ुशी मुळीच नाही,, धन्यवाद
6 Jan 2018 - 6:35 pm | सोमनाथ खांदवे
अण्णा च्या आंदोलना पासून माझ लक्ष केजरी वर व्हत , वाटल मानुस जरा साफ सुथरा दिस्तोय , भारतीय राजकारणाला चांगल दिस येतील . पन हा बी यकाच कॉर्टर मदी आवुट व्हनारा पंटर निगाला , कोंग्रेस वर टीका करून करून दिल्लीत सत्ता काबिज केली अन त्याला जे म्हणता पन्त प्रधान व्हन्या ची नशा चढली . त्याला वाटतय की मोदी वर टिका केली की आपन पन्त प्रधान व्हनारच . मानुस चांगला व्हता पन सत्ते च्या नशे पाई आप च वाटूळ झाल.
6 Jan 2018 - 8:16 pm | अँड. हरिदास उंबरकर
म्हणूनच.. 'आप' तो ऐसे ना थे..!
7 Jan 2018 - 9:30 pm | गॅरी ट्रुमन
लेख आवडला पण शीर्षक पटले नाही.
'आप' पहिल्यापासूनच ऐसेईच थे. पण आपण स्वच्छ आहोत असा बुडबुडा उभा करून भल्याभल्यांना नादी लावण्यात मात्र त्यांना जबरदस्त यश आले.
(आप आणि केजरीवाल यांचा मिपावरील सगळ्यात मोठा विरोधक आणि त्याचा प्रचंड अभिमान असलेला) ट्रुमन
8 Jan 2018 - 9:33 am | अँड. हरिदास उंबरकर
'आप' पहिल्यापासूनच ऐसेईच थे.<<
> हे सुद्धा छान हेडिंग झालं असतं..