मराठी भाषेमधून ग्रीटिंग मिळू लागायला यावर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. आज महाराष्ट्रात मराठी ग्रीटिंग कार्ड्स सर्वत्र मिळतात. इंटरनेटवरदेखील मराठी ग्रीटींग्स अगदी सहज उपलब्ध आहेत. परंतु मला आठवते आहे की एक काळ असा होता, जेव्हा मराठी ग्रीटींग फक्त दिवाळीचे असायचे आणि आतला मजकूर आणि चित्र ही ठराविक असायचे.
‘ही दीपावली आपल्याला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो’
मात्र त्या वेळेसही बाजारात इंग्रजी भाषेमध्ये बरीच वेगवेगळ्या प्रकारची ग्रीटींग्स उपलब्ध असायची. अगदी वाढदिवसाची ग्रीटींग्स घ्यायला गेले तरी प्रत्येक नात्याकरता (आई, वडील, भाऊ, बहिण, इत्यादी) समर्पक मजकुराची ग्रीटींग्स मिळायची, तर कधी वरच्या पानावर छान इंग्रजी कविता व चित्र आणि शिवाय आत आकर्षक मजकूर. मी माझ्या मैत्रिणीबरोबर कित्येकदा पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील ग्रीटवेलच्या दुकानात जात असे आणि ही विविध प्रकारची ग्रीटींग्स बघत बसे. या विविधतेने विचारात पडून मी मराठी समाजाशी, संस्कृतीशी मिळत्या जुळत्या कोणत्या प्रसंगांना मराठी ग्रीटींग्स देता येतील यावर बाबांशी चर्चा केली. “अशी आपल्या मराठीत संक्रांत, भाऊबीज, दसरा, गुढीपाडवा अशी किंवा सुनेला, जावयाला लिहिलेली ग्रीटींग्स का नाही मिळत? एखाद्या वाढदिवसाच्या ग्रीटिंगकरता ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’या सारख्या कवितांच्या ओळी असलेले मराठी ग्रीटींग मिळायला हवे.” बाबा म्हणाले, “खरे आहे तुझे.” पण तो विषय तिथेच संपला. हे साल होते १९८८.
पुढे १९९२ मध्ये मी ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर’ची प्रेसिडेंट झाले. रोटरीची युथ विंग असलेल्या या रोटरॅक्ट क्लबतर्फे आम्हाला वर्षातून एक मोठा समाजोपयोगी प्रोजेक्ट राबवायचा असतो. हे मी बाबांना सांगताच त्यांनी सुचवले की “तू तुझ्या रोटरॅक्टर्सबरोबर संपूर्ण पुण्यात मराठी ग्रीटींग कॉम्पिटिशन का भरवत नाहीस? काहीतरी आगळे वेगळे करशील.” माझे डोळे आनंदाने लकाकले.
मी माझ्या रोटरॅक्टर्स समोर हा प्रस्ताव मांडताच सगळ्या जणांनी ही कल्पना उचलून धरली. या प्रोजेक्टला खूप प्लॅनिंग, मनुष्यबळ आणि वेळ लागणार याचा आम्हाला अंदाज आला, पण आता प्रोजेक्ट करायचा तर हाच, या विषयावर सगळ्यांचे एकमत झाले. पुढचे ३ महिने झपाटल्यासारखे गेले पण आजही ते आम्हा सर्व रोटरॅक्टर्सच्या आयुष्यातील सोनेरी दिवस बनून राहिले आहेत.
या प्रोजेक्टकरता खूप खर्च येणार होता, त्यामुळे मुख्य प्रश्न होता स्पॉन्सरशिपचा. यावेळेस आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले डेक्कन जिमखान्यावरील ग्रीटवेलचे मालक श्री. दिलीप जाधव आणि नंदादीप प्रॉडक्ट्सचे मालक श्री. सदानंद महाजन. जाधव सरांनी विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि बक्षिसाची रक्कम देऊ केली, तसेच जाहिरातींच्या खर्चाचा मोठा भार उचलला. पुण्यातील महत्वाच्या २-३ वर्तमानपत्रांमध्ये सलग ३ महिने आठवड्यातून २ वेळा जाहिरात येत होत्या. महाजन सरांनी आम्हाला मोठमोठ्या आकाराची पोस्टर्स तयार करून दिली, आमंत्रण पत्रिका छापून दिल्या आणि वरखर्चासाठी रोख रक्कमही देऊ केली.
सर्व रोटरॅक्टर्स बरोबर चर्चा करून स्पर्धेच्या अटी, नियम, बक्षिसे, प्रदर्शनाचे स्थळ अश्या गोष्टी निश्चित केल्या. बाबांनी ग्रीटिंगला ‘शुभेच्छापत्र’ हा अस्सल मराठी शब्द सुचवला आणि या अश्या मजकुराच्या जाहिराती वेगवेगळ्या वर्तमान पत्रांमधून छापून येऊ लागल्या.
महाजन सरांनी दिलेली मोठाली पोस्टर्स आम्ही पुण्यामध्ये अक्षरशः रस्तोरस्ती लावली. ‘वेडात मराठी वीर दौडले सात’ या उक्तीप्रमाणे आम्ही रोटरॅक्टर्स रोज संध्याकाळी आपापल्या एम-50, स्कूटर्स काढून पोस्टर्स लावत फिरत असू. शाळा, कॉलेजेस्, बस स्टॉप्स, रेल्वे स्टेशन्स,भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व, टिळक स्मारक मंदिर..... अश्या जवळ जवळ १००ठिकाणी आम्ही पोस्टर्स लावली. पुण्याचे शिक्षण अधिकारी श्री. मोहन रानडे यांना आम्ही पुण्यातल्या प्रत्येक शाळेत या स्पर्धेची माहिती दिली जावी असे विनंतीपत्रक पाठवले आणि जोडीला ही १०० पोस्टर्स पाठवून दिली. त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत अनेक शाळांमधून ही पोस्टर्स लावण्याची व्यवस्था केली.
आम्ही आमच्या इतर रोटरॅक्ट क्लब मध्ये, मित्र मंडळीमध्ये, नातेवाईकांमध्ये याची तोंडी जाहिरात करतच होतो. आम्हाला माहीत होते की फक्त जाहिरात करण्याने आणि वारंवार करण्यानेच लोकांपर्यंत ही बातमी पोचणार आहे आणि त्यांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यास उत्सुक बनवणार आहे. आम्ही दर ८-१५ दिवसांनी वेगवेगळ्या इंग्लिश आणि मराठी वर्तमानपत्रांमधून या स्पर्धेची माहिती देणारी बातमी छापून आणत होतो. पुणे आकाशवाणी वरून सुद्धा आम्ही या स्पर्धेबद्दल माहिती देत होतो.
आम्ही सगळे प्रोजेक्टमय झालो होतो. या पोस्टर्स लावायच्या वेळचा एक किस्सा सांगते. आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जाऊन शहरात ५ ठिकाणी उंचावर मोठे बॅनर लावायची परवानगी मागितली, पण आम्हाला फक्त २ ठिकाणी बॅनर लावायची परवानगी मिळाली. जोडीला प्रोजेक्ट संपताच ते बॅनर खाली उतरवण्याची जबाबदारी आमची हे आम्हाला बजावण्यात आले. (आम्ही आमचा शब्द पाळला बर का! टिळक रोडवरचा बॅनर आमच्या रोटरॅक्टर्सनी उंचच्या उंच शिडी मिळवून चढवलाही आणि उतरवलाही.) मात्र वैशाली हॉटेलच्या दारातला रात्री २ वाजता लावलेला बॅनर दुसऱ्याच दिवशी गायब झाला होता. खूप वाईट वाटले.
अजून एक किस्सा. एकदा आम्ही ४-५ रोटरॅक्टर्स पोस्टर्स लावत असतानान एका मेंबर आमच्या ट्रेझरर, गणेश भिडेला म्हणाला, “काही श्रमपरिहार वगैरे मिळणार आहे का?” भिडे म्हणाला, “माझ्या पैशाने देतो, प्रोजेक्टच्या पैशाला हात लावणार नाही.” त्याक्षणी मी ठरवले की आता आर्थिक बाबतीत मी लक्ष घालायची गरज नाही, योग्य व्यक्तीच्या हातात आर्थिक खाते सुरक्षित आहे. क्लबची सेक्रेटरी कांचन काळे पत्रव्यवहारासारखे किचकट काम तीन महिने न कंटाळता करत होती. महेश तळेगावकरला रोज एक आयडिया सुचायची. आपण असे करू या, आपण तसे करू या का...अश्या अनेक चर्चा त्याच्या-माझ्यात रोज चालत असत. एखादे काम करायचे असे ठरायचा अवकाश, प्रसाद जोशी, विनायक देशपांडे आणि संदीप साळवी हे त्याचा फडशा पाडायला निघत. असे सगळेजण माझ्या जोडीला होते, म्हणून हा प्रोजेक्ट इतका सुंदर होऊ शकला.
आम्ही पुण्यातील नामवंत साहित्यिक, प्राचार्य आणि मान्यवर व्यक्तींना आमंत्रण पत्र पाठवले होते. ही कल्पना माझ्या बाबांची.
स्पर्धकांनी तयार केलेली शुभेच्छापत्रे पुण्यात ४ ठिकाणी जमा करण्याची आम्ही सोय केली होती. प्रत्येक कलेक्शन सेंटरवर आम्ही पूर्णपणे सीलबंद बॉक्सेस ठेवले होते. जमा होणारे प्रत्येक शुभेच्छापत्र फक्त परीक्षकांनी पाहावे याकरता आम्ही खास खबरदारी घेतली होती.आता प्रश्न होता परीक्षक कोण? तीन मान्यवरांनी ही जबाबदारी स्वीकारली. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, स्वाती महाळंक आणि अभिनव महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम.नांगरे. आम्ही ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके आणि रवींद्र मंकणी यांनाही विनंती केली होती. परंतु त्या प्रकृती अस्वाथ्यतेमुळे तर मंकणीसर वेळेअभावी येऊ शकले नाहीत. परीक्षकांनी रिझल्ट्सबाबत कोणाही रोटरॅक्टर्सबरोबर चर्चा न करता, ज्यांच्या मित्र मैत्रिणीनी अथवा नातेवाईकांनी यात भाग घेतला नाही अश्या २ रोटरॅक्टर्सच्या हातात दोन दिवस आधी रिझल्ट द्यायचा असे आमचे ठरले होते.
मला आणि माझ्या सर्व रोटरॅक्टर्सना तहान भूक विसरायला लावणारी स्पर्धा जवळ येत चालली होती. माझी ही सगळी धावपळ माझे काका श्री.प्रल्हाद तापीकर बघत होते. त्यावेळी माझे काका पुण्याचे महापौर श्री. शांतीलाल सुरतवाला यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहात होते. महापौरांची कला आणि साहित्यविषयीची आवड माहीत असल्याने काकांनी मला विचारले “तुला प्रमुख पाहुणे म्हणून महापौरांना विनंती करायची आहे का?” मी बघतच राहिले. हे शक्य आहे? माझा विश्वासच बसत नव्हता. काका म्हणाले “उद्या त्यांना त्यांच्या ऑफीसमध्ये भेट. येताना तुमच्या रोटरॅक्टच्या लेटरहेडवर विनंतीपत्र लिहून आण आणि त्यांना थोडक्यात तुमच्या स्पर्धेची माहिती सांग. बघू यात पुढे काय होतंय ते.” मी ठरलेल्या वेळेप्रमाणे महापौरांना विनंती करण्यास गेले. त्यांनी सर्व ऐकून घेतले आणि म्हणाले “मराठी भाषेकरता उत्तम काम करत आहात, मी येईन.” माझा कानावर विश्वास बसेना. काकांनी मला हळूच बाहेर जाण्याची खूण केली. मी “थॅक्यू व्हेरी मच” म्हणत बाहेर आले. मला स्वर्ग अक्षरशः २ बोटे उरला होता.
या स्पर्धेत ६ वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षाच्या आजीबाईपर्यंत अनेक जणांनी भाग घेतला होता. एकूण ४०० शुभेच्छापत्रे जमा झाली होती. यात पुण्याचा अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी ब्रेल लिपीत केलेली शुभेच्छापत्रेदेखील होती. ही सगळीच्या सगळी ४०० शुभेच्छापत्रे प्रदर्शनाच्या हॉलमध्ये लावायची असे आम्ही ठरवले. त्याकरता आम्ही बालगंधर्व कलादालनाचा हॉल बुक केला. सकाळी बक्षीस समारंभ आणि उरलेला दिवस प्रदर्शन असे ठरले होते.
पु. ल. देशपांडे यांना इच्छा असूनही प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला जमू शकत नसल्याचे सुनीताबाईंनी फोन करून कळवले, परंतु त्यांनी पत्रातून त्यांच्या शुभेच्छा कळवल्या. अजून काय पाहिजे आम्हाला? आमच्या अंगात उत्साह सळसळला.
प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ८ वाजता हॉल ताब्यात मिळाला. आमची पहिली रोटरॅक्टर्सची बॅच हजर होती. आम्ही शुभेच्छापत्रे लावायला सुरुवात केली. आम्हाला ४०० शुभेच्छापत्रे लावायची होती. आम्ही शुभेच्छापत्रे विषयवार आणि वयानुसार केलेल्या गटाप्रमाणे लावत होतो. विजेत्या शुभेच्छापत्राखाली रिझल्ट लावत होतो. शुभेच्छापत्रे भिंतीवर लावताना खबरदारी म्हणून प्रत्येक शुभेच्छापत्राला प्लास्टीकचे कव्हर लावत होतो. मराठी भाषेची महती सांगणाऱ्या कवितांच्या ओळी आम्ही छापून घेतल्या होत्या, त्या देखील आम्ही जागोजागी चिकटवत होतो. पु.ल., शांता शेळके, माधव गडकरी यांची पत्रे आम्ही प्रथमदर्शनी दिसतील अशी लावली.
रात्रीचा १ वाजला, तरी निम्मेच काम पूर्ण झाले होते. मिनिटामिनिटाला आमचे टेन्शन वाढत होते. आधी गप्पा टप्पा, एकमेकांच्या खोड्या काढत, हसत खेळत काम करणारे आम्ही एकदम गंभीर झालो. जर कमी शुभेच्छापत्रे लावली गेली आणि एखाद्या स्पर्धकाला, मुख्य म्हणजे एखाद्या विजेत्याला त्याचे शुभेच्छापत्र दिसले नाही तर? ... त्यालाच काय, पण आम्हालाही वाईट वाटणार होते. आम्ही न बोलता मुकाट्याने भराभर शुभेच्छापत्रे लावू लागलो. सगळी शुभेच्छापत्रे लावून होईपर्यंत सकाळचे ६:३० वाजले. आता आमची रोटरॅक्टर्सची पुढची फळी हजर झाली. हॉल सुशोभित करणे, व्यासपीठ तयार करणे, बक्षिसे ओळीने मांडून ठेवणे, दरवाज्यात रांगोळी काढणे अशी अजून बरीच कामे होती. मी आणि माझे सहकारी, जे रात्रभर काम करत होतो, ते एक तासाकरता घरी जायला निघालो. स्वतःचे आवरून, आम्हाला ठीक ९ वाजता महापौरांच्या स्वागताकरता हजर व्हायचे होते.
पटपट तयार होऊन, परत हॉलवर येताना रिक्षामध्ये मी आई-बाबांनी आयत्या वेळेस तयार केलेले अध्यक्षीय भाषण वाचून पहात होते. इतके रेडीमेड भाषण हातात असूनही माझे लक्ष लागत नव्हते. माझ्या डोक्यात विचार चालू होते की कोणती कामे राहिली असतील, आत्ता हॉलवर पोचल्यावर मला कोणकोणत्या गोष्टी नजरेखालून घालायच्या आहेत. शेवटी, मी पहिली १-२ पाने वाचली आणि भाषण पर्समध्ये ठेवून दिले.
सकाळचे ९ वाजले. हॉलमध्ये मंद स्वरात सनई लावली होती. हॉल निमंत्रितांनी खचाखच भरला होता. आमच्या पेरेंट रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रमेश भिडे, दिलीप जाधव सर, सदानंद महाजन सर, अनेक स्पर्धक, त्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी, इतर रोटरॅक्ट क्लबचे प्रेसिडेंटस् आणि आमच्या क्लबचे मेम्बर्स – सगळ्याचा उत्साह ओसंडून वहात होता. आम्ही हॉलखाली प्रवेशद्वारापाशी महापौरांची वाट पहात उभे होतो. बरोब्बर ९:३० वाजता महापौर आले. मी आणि रोटरी क्लबचे प्रेसिडेंट रमेश भिडे त्यांच्या स्वागताला पुढे झालो. मी महापौरांबरोबर वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रवेश केला. महापौरांना पहाताच सगळे उपस्थित उठून उभे राहिले, टाळ्या वाजू लागल्या, व्हिडीओ शूटींग करणारे पुढे झाले, प्रोफेशनल फोटोग्राफर पुढे झाले. मी ‘महापौर’ या पदाची महती जाणली आणि दोन पावले मागे सरकले. मी मागे राहिलेली पाहून महापौर “बरोबर रहा” इतकेच म्हणले. एक अविस्मरणीय क्षण माझ्या मनात जपला गेला.
सुरुवातीला दीप प्रज्वलन करून महापौरांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. आमच्या पेरेंट क्लबच्या प्रेसिडेंटने त्यांच्या भाषणात “सर्व रोटरॅक्टर्सनी रोटरी आणि रोटरॅक्ट क्लबची शान उंचावली” अश्या शब्दात आमचे कौतुक केले. महापौरांनी अश्या स्पर्धा, अशी प्रदर्शने वारंवार भरवली जावीत अशी आशा व्यक्त केली. महापौरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. नंतर त्यांनी प्रदर्शनाला धावती भेट दिली. सर्व रोटरॅक्टर्सचे भरभरून कौतुक केले. महापौर प्रदर्शन बघत असताना लावलेल्या ‘मराठी पाउल पडते पुढे’ या गाण्यामुळे हॉलमधील वातावरण अधिकच भारले गेले.
अनेक नवोदित कलावंत, त्यांचे मित्र, त्यांचे पालक, त्याचे नातेवाईक यांनी हॉल फुलून गेला होता. हॉलमध्ये अनेक जण उत्साहाने एकमेकांना शुभेच्छापत्रे दाखवत होते. आम्ही सगळे रोटरॅक्टर्स एकमेकांकडे कृतकृत्य होऊन बघत होतो. पुढे दिवसभर प्रदर्शन पाहायला उत्साही पुणेकरांची रीघ लागली होती. काही रसिकांनी ते बाहेरगावाहून प्रदर्शन बघायला आल्याचे आवर्जून सांगितले तर काहींनी क्लबच्या मेम्बर्सकडे प्रदर्शन एकच दिवस ठेवल्याबद्दल खंत व्यक्त केली. प्रतिक्रियांची पुस्तिका तर अनेकविध दिलखुलास शेऱ्यांनी ओसंडून वाहत होती.
दुसऱ्या दिवशी पुण्याच्या अनेक वर्तमानपत्रांनी या स्पर्धेची दाखल घेतली.
माझ्या अध्यक्षीय भाषणात मी सुनील गावस्कर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की “यापुढे १०,००० धावांचा विक्रम अनेक वेळा मोडला जाईल, पण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा विक्रम पहिल्यांदा रचण्याचा मान माझ्याच नावावर असेल.” तसेच मी म्हटले की,”यापुढे मराठी शुभेच्छापत्रे ३००० होतील ३०,००० होतील, पण त्याची मुहूर्तमेढ ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर’ (वर्ष १९९२) च्या रोटरॅक्टर्सनी रोवली, याचा मला सार्थ अभिमान आहे.”
***********************************************************************************
आमची स्पर्धा संपली. आम्ही लावलेला हा इवलासा वेलू गगनावर चढवण्याचे श्रेय मात्र जाते डेक्कन जिमखान्यावरील ग्रीटवेलच्या श्री.दिलीप जाधव सरांकडे. त्यांनी मराठी शुभेच्छापत्रांची मोठी मोहीम उभारली आणि अनेक होतकरू कलाकारांनी बनवलेली शुभेच्छापत्रे त्या कलाकाराच्या नामनिर्देशनासकट छापून कमर्शिअल मार्केटमध्ये आणली. या मोहिमेला नवोदित कलावंतांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने मराठी शुभेच्छापत्रे बाजारात रुजली.
प्रतिक्रिया
28 Dec 2017 - 11:35 am | एकनाथ जाधव
खुप छान उपक्रमाची सुन्दर माहिती दिलित.
2 Jan 2018 - 9:56 pm | प्राची अश्विनी
+११
28 Dec 2017 - 1:52 pm | एस
अरे वा! फारच छान उपक्रम. यानिमित्ताने मिपाकर माधुरी विनायक यांची आठवण झाली.
28 Dec 2017 - 1:52 pm | एस
अरे वा! फारच छान उपक्रम. यानिमित्ताने मिपाकर माधुरी विनायक यांची आठवण झाली.
28 Dec 2017 - 5:49 pm | नाखु
परिचय करून दिला आहे
अभिनंदन
28 Dec 2017 - 6:28 pm | सिरुसेरि
खुप छान आठवणी . या लेखामधुन एकप्रकारे तुम्ही १९९२ / १९९५ च्या पुण्यातुन फिरवुन आणले .
28 Dec 2017 - 8:19 pm | अभ्या..
छान परिचय जुन्या काळातला.
ग्रीटवेलचे नंतर काय झाले माहीत नाही, नंदादीप मात्र माणिकचंद धारीवालानी घेतले व ते सध्या लग्नपत्रिकातच आहेत.
आपण शेवटी म्हणल्याप्रमाणे मात्र मुहुर्तमेढ रोवण्याचा मान पूणे रोटरॅक्टचा नाही,कारण १९९० पासून सोलापूरला वैभव कार्डस वाले राजकुमार शहा अशी स्पर्धा महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्हीकडे आयोजित करत होते. बरीच वर्षे चालवल्यानंतर ती स्पर्धा त्यांनी बंद केली. मला पक्के आठवतेय कारण एका स्पर्धेत मला बक्षीस मिळालेले होते.
30 Dec 2017 - 8:43 am | पारुबाई
वैभव कार्ड्सच्या उपक्रमाविषयी ऐकून छान वाटले. तुम्हाला मिळालेल्या बक्षीसाबद्दल अभिनंदन.
तुमच्याकडे वैभव कार्ड्सची काही माहिती असेल तर मला त्यांना संपर्क करून अधिक माहिती मिळवायला आवडेल.
28 Dec 2017 - 8:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
स्पृहणिय उपक्रम आणि तितकाच उत्तम परिचय !
29 Dec 2017 - 1:00 am | रुपी
वा! उत्तम उपक्रम! तेवढेच सुंदर लेखन. आठवणी आणि वर्तमानपत्रातली कात्रणे यांमुळे लेख फारच वाचनीय झाला आहे.
31 Dec 2017 - 10:01 pm | चामुंडराय
व्वा पारुताई, रोटरॅक्टचे जुने सोनेरी दिवस आठवले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
रोटरॅक्ट मध्ये केलेले वेगवेगळे प्रकल्प, सहली, मिटींग्स, कॉन्फरन्सेस आठवल्या आणि नॉस्टेल्जीक झालो.
Good old days ...... rather GOOD YOUNG DAYS... huh ..
गेले ते दिन गेले.
राहिल्या त्या फक्त आठवणी.
रोटरॅक्टने मला काय दिले याबद्दल कधीतरी लिहीन म्हणतो, बघूया कसे जमते ते !
2 Jan 2018 - 5:37 pm | पद्मावति
अतिशय उत्तम लेख.
2 Jan 2018 - 8:23 pm | सानझरी
+१.. असेच म्हणते.. सुंदर लेख!
3 Jan 2018 - 1:44 pm | अभिजीत अवलिया
छान आठवण आहे.