उपटसूंभ

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 2:40 pm

उपटसूंभ

काही गोष्टी ज्या जाणवतात त्या मांडल्याच पाहीजेत.
जगामधे जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी धरणे भारतात आहेत. भारतात जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी महाराष्ट्रात आहेत. दुसरी गोष्ट महाराष्ट्रामधे नावे घेता येतील असे अनेक जलसंधारण तज्ञ आहेत. त्यातल्या काही तज्ञांचा तर जागतिक किर्तीचे जलसंधारण तज्ञ असाही उल्लेख केला जातो. आपल्याकडे कौतुकाचीही एक विशिष्ट पद्धत आहे. अमुक एक व्यक्ती फार विद्वान आहे म्हणजे मॅट्रिकला बोर्डात आली होती. विद्यापीठाच्या परीक्षेमधे सुवर्णपदक मिळवले होते वगैरे सांगितले जाते. पण प्रश्न पडतो प्रत्यक्ष दिलेल्या कामामधे या लोकांच्या तथाकथित हुशारीचा नेमका उपयोग काय झाला. तुम्ही असाल हो जागतिक जलसंधारण तज्ञ पण राज्यामधल्या अधिकाधिक जमिनीपर्यंत सिंचनाचे पाणी पोचले का ? पाण्याविना शेती उजाड का झाली ? शेतीवर अवलंबून राहणे इतके अवघड का झाले ? शेतीच्या दुरवस्थेने राज्याला आज असे व्यापून का टाकले ? आणि जर असे असेल तर मग तुमच्या सुवर्णपदकाचा, जागतिक किर्तीच्या विद्वत्तेचा, बोर्डात येण्याचा खरंच प्रत्यक्ष कामात काय उपयोग झाला ? पाण्यापासून वंचित राहीलेल्या शेतकर्‍याला सांगू शकाल तुमच्या विद्वत्तेचे कौतुक ?आणि सांगू शकत नसाल तर शेतकर्‍याच्या परीक्षेत तुम्ही नापासच झालेला आहात.

देशाचे एक सर्वोच्च नेते जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ होते. जे पूर्वी देशाचे अर्थमंत्री होते, रिजर्व ब्यांकेचे गवर्नरही होते. त्यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असे वाटले होते. पण झाले भलतेच. देशात अनेक आर्थिक घोटाळे झाले. निरनिराळी लायसन्य देताना खूप खाबूगिरी झाली. त्यांच्या काळात ८६% चलन हे ५०० आणि १००० च्या नोटांच्या स्वरूपात होते. नोटा या साधन म्हणून वापरायच्या ऐवजी साध्य बनल्या. विनिमयाऐवजी साठवून ठेवणे सोपे झाले. त्यांच्या काळात आलेला सरल फॉर्म हा तितकासा सरल नव्हता असे सामान्य माणसाचे मत होते. त्यामुळे अर्थतज्ञ नेत्यांच्या काळात जी आर्थिक शिस्त येइल असे वाटले होते ती आलीच नाही. आजही त्यांचा जागतिक अर्थतज्ञ असा लौकीक कायम आहे.

प्रश्न पडतो मग विद्वत्ता या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि विद्यापीठांमधल्या शिक्षणाला शिक्षण का म्हणायचे ?
कारण लौकिक अर्थाने शाळेचेही शिक्षण पूर्ण न केलेला एखादा मनुष्य देशातल्या व्यवस्थांचा बारकाईने अभ्यास करतो. त्यामधे नेमके बदल सुचवतो. महाराष्ट्र राज्याच्या माहिती अधिकार कायद्याचा मसूदा तयार करतो. हे नवे बदल प्रशासकीय व्यवस्थेला स्वीकारावे लागतात. अति उच्च शिक्षण घेतलेल्या, बुद्धिमान आयएएस अधिकार्‍यांना त्याची अंमलबजावणी करावी लागते.

महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजेंद्रसिंग राजस्थानातून महाराष्ट्रात येतात. मोठ्या धरणांच्या गोष्टी ते करत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमधून भूजलाची पातळी वाढवून दाखवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सिव्हिल इंजिनीयर्सही काम करतात. एरवी सरकारी सेवेत असताना मोठ्या धरणांची बाजू मांडणारे जागतिक जलतज्ञही आता राजेंद्रसिंगाचीच भाषा बोलतात. स्वतः राजेंद्रसिंग सिव्हिल इंजिनीयर नाहीत.

जागतिक अर्थतज्ञ देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकत नाहीत. पण एक अर्थतज्ञ नसलेला मनुष्य मात्र नोटाबंदीचा उपाय सुचवतो. नवी कररचना सुचवतो. व्यवस्थेमधे बदलाचे नवे प्रारूप मांडतो. अर्थविषयाचे विद्यापीठात शिक्षण घेतलेले लोकही मग त्या मनुष्याचीच भाषा बोलायला लागतात.

कृषी विद्यापीठामधून शिक्षण घेतलेले लोक स्वतःला शेती तज्ञ म्हणवून घेतात. तालुक्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रे चालवतात. गिर्‍हाईक म्हणून दुकानात आलेल्या शेतकर्‍याला शेती विषयक सल्ले देतात. त्यांना खते, किटकनाशके विकतात. पण प्रत्यक्षात ते शेती करून ती फायद्यात आणून दाखवताना दिसत नाहीत. असलेच तर अशांची संख्या फार कमी. आपण दिलेल्या सल्ल्यामुळे शेतीचे भलेच होइल अशी खात्री ते देऊ शकत नाहीत.

आणि
मग कृषी विद्यापीठात मिळालेले शिक्षण जो नाकारतो आणि पुन्हा पुन्हा "कृषी विद्यापीठे धादांत खोटे बोलतात" असे प्रतिपादन जो करतो. त्याच्याकडे अनेक शेतकरी आणि कृषी पदवीधर मार्गदर्शनासाठी गर्दी करतात.

काय होतंय नेमकं या देशात ? विद्यापीठामधे सुवर्णपदके पटकवणारे लोक काहीच का उजेड पाडू शकत नाहीत. शिक्षणामधेच काहीतरी गडबड झाली आहे का ? आणि म्हणून त्या त्या विषयाचे शिक्षण न घेतलेले उपटसूंभच नव्या क्रांतीचे अग्रदूत बनले आहेत का ?

ashutoshjog@yahoo.com

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

7 Dec 2017 - 2:28 pm | रंगीला रतन

विचार करायला लावणारा लेख.

मराठी कथालेखक's picture

7 Dec 2017 - 3:37 pm | मराठी कथालेखक

मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना अर्थिक सुधारणा झाल्यात हे विसरुन चालणार नाही.
पंतप्रधानपदावर असताना सगळी सुत्रे सोनिया गांधींनी स्वतःकडे ठेवलीत हे उघड गुपीत आहे आणि मनमोहनसिंग यांनीही काहीच कणखरपणा दाखवला नाही हे खरेच. पण कणखरपणाचा सुवर्ण पदकाशी संबंध नाही.

महेश हतोळकर's picture

7 Dec 2017 - 3:56 pm | महेश हतोळकर

जगामधे जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी धरणे भारतात आहेत. भारतात जेवढी मोठी धरणे आहेत त्यातली निम्मी महाराष्ट्रात आहेत.

म्हणजे जगातली २५% (१/४) धरणे भारतात आहेत? संख्येने का आकाराने (पाणलोट क्षेत्राच्या) क्षमतेने?
http://www.icold-cigb.net/article/GB/world_register/general_synthesis/nu... इथल्या माहितीनुसार ९% च आहेत.
बाकी बरेच काही लिहीता येईल. पण टंकाळा...

आशु जोग's picture

10 Dec 2017 - 12:37 pm | आशु जोग

आकाराने मोठी.
आणि आता जुन्या मोठ्या धरणांचे आयुष्य संपल्यावर नव्याने धरण बांधण्याच्या नव्या योजना बनतात का ?
नसल्या तर का नाही ?

विचार करण्याजोग्या गोष्टी आहेत

सुबोध खरे's picture

7 Dec 2017 - 7:35 pm | सुबोध खरे

विद्यापीठामधे सुवर्णपदके पटकवणारे लोक
तुमच्या मूलभूत समजूतीतच चूक आहे.
पाककृती स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या महिलेला प्रत्येक वेळेस उत्तम स्वयंपाक येईलच असे नव्हे.
तसेच एम बी बी एस, एम एस ला सुवर्णपदक मिळवणारा प्रत्यक्ष शल्यक्रियेत नापास होतो असे अनेकदा पाहिले आहे.
सैद्धांतिक ज्ञानात उत्तम असलेला माणूस ( थिअरी पक्की) प्रात्यक्षिकात (practical) पास होईलच असे नाही.
मागच्या पिढीतील असंख्य गुजराती मारवाडी प्रथितयश उद्योगपती हे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नव्हते.

जाता जाता-- मी पण पुणे विद्यापीठात अव्वल(पहिला) आलो होतो. पण तेंव्हा एम डी( क्षकिरण शास्त्र) ला फक्त ६ विद्यार्थी होते.आरक्षित प्रवरा इ विद्यार्थ्यांमध्ये मी पहिला आलो होतो. पण लिहायला काय जाते युनिव्हर्सिटी टॉपर.
तेंव्हा हे "सुवर्णपदक" वगैरेला काही अर्थ नाही.

मराठी कथालेखक's picture

8 Dec 2017 - 7:16 pm | मराठी कथालेखक

या लेखाशी अगदी पुर्ण संबंध नसला तरी एका गोष्टीचे निरिक्षण मला नोंदवावेसे वाटते.
अनेकदा लोकांना आपल्या शिक्षणाचा अगदी गर्व म्हणावा इतका अभिमान असतो. आपण घेतलेले शिक्षण, शाखाच उत्तम आहे असे वाटल्याने दुसरा काही विचार करण्याची , शिकण्याची त्यांची इच्छा नसावी
एक उदाहरण आजच माझ्या बाबत घडले. मी आय टी कंपनीत काम करतो, माझ्या प्रोजेक्ट मध्ये एक जागा खाली आहे, त्याकरिता HR ने internal profile (म्हणजे कंपनीत आधीच असलेली पण सध्या प्रोजेक्टवर नसल्याने उपलब्ध व्यक्ती) पाठवले. पण माझ्या टीममधील लोकांनी त्या उमेदवाराचा विचार करण्यास नकार दिला कारण नऊ वर्षांचा अनुभव असला तरी ती व्यक्ती मुळात बी कॉम शिकलेली होती व पुढे संगणकाचा कसलासा कोर्स केला होता .. इंजिनिअर किंवा किमानपक्षी MCA तरी असावी असा लोकांचा आग्रह.. खरंतर आय टी मध्ये संगणकाशी/आयटीशी संबंधित नसलेले अनेक इंजिनियर (जसे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल) असतात ..मग त्यांच्यात आणि बी कॉम झालेल्या व्यक्तीत खरं तर फरक तो काय...