- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही माणसाला कोर्ट, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढावी लागू नये, असे म्हटले जाते. जनमानसात अशा भितीदायक प्रतिमा तयार व्हायला त्या त्या क्षेत्रातली कठोर वागणूक जबाबदार असते. एखादा आजार उद्भवला तर रूग्णालयात जायचे म्हणून अशिक्षित लोकांच्याच नव्हे तर उच्चशिक्षित- सुशिक्षित लोकांच्याही अंगावर सर्रकन काटा येतो. आजाराचे निदान चुकीचे होईल वा आपण अतोनात लुबाडले जाऊ, हा समज या मागचे कारण असते. म्हणून अनेक लोक आपले दुखणे एकतर अंगावर काढतात वा स्वत:च डॉक्टर असल्यासारखे मेडिकल स्टोअर्समधून त्या त्या आजाराच्या गोळ्या मागवून घरी बरे होण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काही वेळा अनेकांवर जीव गमावण्याचीही पाळी येते.
या वर्षात खाजगी रूग्णालयांतील ज्या चार घटना सामोर्या आल्या त्या भयानक आहेत: एका गर्भवती महिलेच्या बाळंतपणाला रूग्णालयाने एक कोटी बील आकारले. तरीही त्या महिलेच्या बालकाला रूग्णालय वाचवू शकले नाही. एक माणूस साध्या आजारासाठी रूग्णालयात गेला. त्याला अॅडमिट करून आयसीयूत ठेवले. तो वारला. बील झाले तेरा लाख रूपये. एका माणसाला डेंग्यू झाला. आठ दिवस रूग्णालयात. वारला. बील झाले सात लाख. आणि चौथी परवाची ताजी घटना: फोर्टिस रूग्णालयात आद्या नावाची सात वर्षाची मुलगी डेंग्यूने पंधरा दिवस आयसीयूत अॅडमिट होती. वारली. बील झाले सोळा लाख रूपये. म्हणजे प्रत्येक दिवसाला ह्या मुलीला सरासरी एक लाख रूपये खर्च झाला.
मी व्हायरल न्युमोनियाने आजारी होतो. नाशिकच्या एका रूग्णालयात दोन ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर (2017) पर्यंत आयसीयूत अॅडमिट होतो. तीन तारखेच्या सकाळी डॉक्टरांनी माझ्या नातेवाईकांना बोलवून सांगितले: ‘केस क्रिटीकल आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण दिसते. तीच ट्रिटमेंट सुरू आहे आता. कदाचित व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पंधरा ते वीस लाख खर्च येऊ शकेल. कदाचित पन्नास लाखही लागू शकतात. तुमची एवढी तयारी आहे का? तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही की तुम्ही इतका भार पेलू शकाल.’ डिचार्ज मिळाल्यानंतर हे काही दिवसांनी मला नातेवाईकांनी सांगितले. मी सावध होतो. मला तिसर्याच दिवशी बरं वाटायला लागलं होतं. तरीही पंधरा दिवस रूग्णालयात होतो. बील झाले चार लाख. अँटीबायोटीक्सच्या मार्याच्या अशक्तपणामुळे मला अजूनही चालता येत नाही.
एका पेशंटच्या नातेवाईकाने सांगितले की, ज्या मेडिसिनची किंमत बाहेर सहा हजार रूपये आहे ती मेडिसिन विशिष्ट रूग्णालयात 25,850 रूपयाला मिळाली. अनेक मेडिसिन पाच पट, दहा पट आणि वीस पटीच्या वाढीव किमतीत खाजगी रूग्णालयात विकल्या जातात. (जेनेरिक औषधे लपवून बॅन्डेडच्या फुगवलेल्या एमआरपीची शिफारस केली जाते.) भारतात सरकारी रूग्णालयांमध्ये पेशंटकडे दुर्लक्ष होते. नीट ट्रिटमेंट मिळत नाही आणि खाजगी रूग्णालयांमध्ये अतोनात लुबाडले जाते. पेशंट रेफर करणे, कट प्रॅक्टीस, मेडिकल कमिशन, पॅथालॉजी कमिशन या सगळ्या गोष्टीत भरडला जातो तो पेशंट. मेडिक्लेम या इंश्युरन्सच्या कंपन्यांमुळेही अशी बीले भडकायला मदत होत असावी. आयुष्यभर नोकरी वा कामधाम करून माणूस जितके पैसे कमवत नाही, त्यापेक्षा जास्त पैसे एका वेळच्या आजारपणाला खर्च करावे लागत असतील तर लोक नाईलाजाने रूग्णालयात जाणे टाळतात.
आजची आरोग्यसेवा भारतीयांच्या आवाक्याबाहेर आहे. पेशंट कोणीही असो, आजार कोणताही असो आणि हॉस्पिटल खाजगी असलीत तरी हॉस्पिटल बीले आणि मेडिकल बीले यात इतका फुगवटा यायला नको. वाजवी बीले आकारायला हवीत. खाजगी रूग्णालये, मेडिसिन विक्रेत्यांवर शासनाचे नियंत्रण असायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात या सगळ्या अनिष्ट प्रवृत्ती कार्यरत आहेत, हे इंडियन मेडिकल असोसिएशन मान्य करते. कोणी तक्रार केली तर त्याला शिक्षाही ठरलेली आहे. मात्र सर्वसाधारण माणूस जो यात भरडला जातो त्याला हे सिध्द करून दाखवणे खूप कठीण जात असते. सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्नांनी ही वैद्यकीय सिस्टिम बदलण्यासाठी कायदेशीर आवाज उठवायला हवा.
डॉक्टरकी पेशा हा आज पेशा राहिला नाही. तो व्यवसाय झाला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक डॉक्टर बरबटलेला आहे आणि तो अनैतिकच वागत असतो. वैद्यकीय क्षेत्रात असेही अनेक लोक दाखवून देता येतील की ते माणुसकीने पेशंटला हाताळतात. पण दुर्दैवाने अशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
प्रतिक्रिया
1 Dec 2017 - 5:59 pm | कंजूस
महागडी ट्रिटमेंट देऊ शकतो हे सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचं लक्षण वाढत चालले हेही कारण.
2 Dec 2017 - 10:22 am | अत्रन्गि पाउस
असले कसले हो डॉक्टर तुम्ही ???
तुम्हाला आजारी पडायला काय त्या हॉस्पिटल ने सांगितले ??? आणि १७६० लायसेन्स वगैरे काढून दुकान मांडलंय त्यांनी ...तुमच्या समाजाने ते करायला भाग पडलाय ... त्यातून त्या डॉक्टरांनी त्यांची असामान्य बुद्धिमत्ता होती म्हणून डॉक्टर झालेत ते उगीच नाही ...आणि सगळा समाज किडका आहे म्हणून नाहीतर असले अनुभव आले नव्हते ....
तुमच्यात डॉक्टर देव मानता का काय नसाल तर आधी भक्त व्हा आणि मग त्यांना देव मना ....प्रश्न विचारताहेत कॉमेंट करतात लेकाचे ...
आणि हो त्या जीपड्यांना कोण आवर घालणार ?? हाकला त्यांना ..आणि ते हे ??? त्यांनाही ढकला ...
2 Dec 2017 - 11:33 am | कपिलमुनी
आधी मराठीमध्ये लिहा !
मना आहे ? असला कसला धेडगुजरी .
2 Dec 2017 - 12:15 pm | सुबोध खरे
मुनिवर
तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती?
हे डॉक्टर साहेब एम ए, पी एच डी आहेत ते पण मराठी भाषेचे
संक्षिप्त परिचय: डॉ. सुधीर रा. देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक. साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक. अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन. ढोल या अहिराणी नियतकालिकाचे संपादक. सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती. ग्रंथ लेखन: १. डंख व्यालेलं अवकाश (जानेवारी १९९९)(मराठी कविता संग्रह) २. आदिम तालनं संगीत ( जुलै २०००) (अहिराणी कविता संग्रह)(तुका म्हणे राज्यस्तरीय पुरस्कार, वर्ष २०००) ३. कला आणि संस्कृती : एक समन्वय (जुलै २००३, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर)(मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२-२००३) ४. पंख गळून गेले तरी !(आत्मकथन, २ आक्टोबर २००७, शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर (स्मिता पाटील पुरस्कार व अंकुर चा दया पवार पुरस्कार) 5. अहिराणी लोकपरंपरा (संदर्भ ग्रंथ –संकीर्ण, 3 डिसेंबर 2011, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई ) 6. भाषा: अहिराणीच्या निमित्ताने (पद्मगंधा प्रकाशन, पुणे), (महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरूंदकर भाषा पुरस्कार, 2014) 7. अहिराणी लोकसंस्कृ ती (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 8. अहिराणी गोत (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 9. अहिराणी वट्टा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 10. माणूस जेव्हा देव होतो (अहिरानी नाद प्रकाशन, सटाणा),
http://sudhirdeore29.blogspot.in/
2 Dec 2017 - 12:23 pm | नाखु
डॉ क , मी मुनीवरांना रैवारी मिसळ खायला बोलावतो, त्रागा कमी होईल आणि डोळे उघडले तर आनंद आहे
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
2 Dec 2017 - 12:43 pm | सस्नेह
लेखामधील आशयाशी सहमत !
(सम-अनुभवी), स्नेहा
2 Dec 2017 - 5:10 pm | डॉ. सुधीर राजार...
सर्वांचे आभार.
9 Dec 2017 - 1:44 pm | अमरप्रेम
आजारी पडण्याचा एवढा मोठा अनुभव नाही आला कधी, पण बऱ्याच मित्रांकडून या गोष्टी ऐकायला मिळतात.
9 Dec 2017 - 1:54 pm | सुबोध खरे
सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्नांनी ही वैद्यकीय सिस्टिम बदलण्यासाठी कायदेशीर आवाज उठवायला हवा.
हे कसं करायचं तेही सांगून टाका डॉक्टर साहेब.