रेशमी साड्यांच्या बासनात
मोरपिशी साडीच्या घडीत
अलगद ठेवलेलं, ते पत्र..
तिथून बाहेर नाही काढत कधी
हलकेच चाचपडते अधूनमधून
त्याचं तिथं असणंच पुरेसं आहे...
त्यातला शब्दंशब्द पाठ आहे
लिहून खोडलेला ,
पाण्याने पुसटलेला...
किती मिनतवा-या. हट्ट,
रुसवे फुगवे काय अन् काय
हातानं लिहिलेल्या त्या एका कागदासाठी..
आपल्यामधे जे काही होतं नव्हतं,
(नव्हतं तेच जास्त खरंतर)
ते संपल्यावर तू शेवटचं पाठवलेलं ते पत्र...
तू शिताफीने न लिहिलेलं तुझं नाव
(ते तेव्हांही खटकलेलं थोडं)
एका अधमु-या नात्याची एकमेव खूण..
का कोण जाणे पण आज अचानक वाटलं,
हर रिश्ते की एक उमर होती है तशी,
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?
प्रतिक्रिया
31 Oct 2017 - 11:01 pm | एस
खूपच छान. 'मेरा कुछ सामान...' ची आठवण करून देणारी कविता. जी कधी रुजू शकली नाहीत अशा नात्यांच्या वाळलेल्या रोपांची कलेवरं किती काळ पुस्तकाच्या पानात जपून ठेवायची, असा प्रश्न एक दिवस पडतोच कधी ना कधी. आठवणींना एक्सपायरी डेट नसेल कदाचित, पण विस्मृतीचा अभिशापतरी असावाच.
1 Nov 2017 - 10:57 pm | प्राची अश्विनी
विस्मृतीचा अभिशाप....
वा! क्या बात!
3 Nov 2017 - 8:56 pm | पगला गजोधर
विस्मृतीचा उःशाप....
असं हवं होतं नं ??
31 Oct 2017 - 11:06 pm | पद्मावति
पत्राला पण एक्सपायरी डेट असते का?
असायला हवी खरतर. लेट गो करणं सोपं नसतं पण आवश्यक असतं.कविता आवडलीच.
1 Nov 2017 - 12:45 am | सत्यजित...
अतिशय मार्मीक,मर्मभेदीच झाली आहे कविता!
1 Nov 2017 - 3:19 am | रुपी
सुरेख!
1 Nov 2017 - 10:56 pm | प्राची अश्विनी
रुपी,सत्यजित, पद्मावति, एस,_/\_
3 Nov 2017 - 11:33 am | पैसा
एक्सपायरी डेट हवीच तर प्रत्येक गोष्टीला. रेणुका शहाणेने तिच्या पहिल्या लग्नाबद्दल लिहिले होते की,"it died it's natural death" तेव्हा अंगावर चरचरून काटा आला होता, पण गोष्ट, नाते संपणे आणि पुढे चालू लागणे अपरिहार्य असते. अपरिहार्यतेच्या दु:खासाठी विस्मरण हा अभिशाप नव्हे तर वरदान आहे.
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन
उसे इक खूबसुरत मोड देकर छोडना अच्छा।
4 Nov 2017 - 11:02 am | प्राची अश्विनी
पैताई, खरंच.
रच्याकने, Bridges of Madison County पाहिलायस का?
4 Nov 2017 - 5:17 pm | पैसा
राहून गेलाय तो बघायचा. यावरून brief encounter चीही आठवण झाली.
4 Nov 2017 - 5:59 pm | बाजीप्रभू
+1111
3 Nov 2017 - 11:58 am | शब्दबम्बाळ
आवडलं लिहिलेलं...
कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये नसतेच ती गम्मत किंवा तो आपलेपणा जो माणूस शोधत असतो अशावेळी ती गोष्ट संपणेच योग्य असते. तरच एखाद्या नव्या गोष्टीला सुरुवात करता येते. नाहीतर ती रखडलेली नाती ना पुढे जाऊन देतात ना जवळ असल्याचा आनंद देतात...
नातं संपले कधी हे माहित असणे तसे भाग्याचे म्हटले पाहिजे, नाहीतर काही नात्यांचे धागे इतके विरत जातात कि ते कधी तुटून गेले हे देखील कळत नाही... ज्या व्यक्तीबरोबर आपण कुठल्या तरी नात्यात होतो ते नाते कधी संपून गेले याची काहीच आठवण नसणे जास्त त्रास देते!
4 Nov 2017 - 10:56 am | प्राची अश्विनी
खरंय.
3 Nov 2017 - 3:27 pm | sayali
छानच हं !
एकदम पटलं. आपल्यामध्ये काही नव्हतं हे वेळीच ध्यानात येणं हे महत्वाचं. तरीही ते जपून ठेवणं हा कुठला तरी नाजूक धागा मोरपिशी साडीच्या धाग्यासारखाच नाही का ?
4 Nov 2017 - 10:59 am | प्राची अश्विनी
:)
3 Nov 2017 - 5:02 pm | सस्नेह
खोलवरचा सल आणखी खोल गेला !
3 Nov 2017 - 5:47 pm | तिमा
काही ओळी अगदी मर्मभेदी! ज्यांना फुलही रुतून जखमा झालेल्या असतात, त्यांनाच कळेल या ओळींचे मर्म.
जुन्या जखमा जाग्या झाल्या!
3 Nov 2017 - 6:14 pm | दुर्गविहारी
खुपच चटका लावून जाणारी कविता. छान. एकच म्हणेन
" उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या"
पत्राला एक्पायरी डेट असेल, पण ठसठसत्या जाणीवेचे काय ?
4 Nov 2017 - 10:59 am | प्राची अश्विनी
Time is the best remedy.
3 Nov 2017 - 8:18 pm | अभिजीत अवलिया
छान कविता.
4 Nov 2017 - 11:03 am | प्राची अश्विनी
सर्वांनाच धन्यवाद!
4 Nov 2017 - 6:05 pm | बाजीप्रभू
साहिर लुधियानवींची चलो "इक बार फिर से अज़नबी बन जाएँ हम दोनों" कविता आठवली..
5 Nov 2017 - 12:38 am | चलत मुसाफिर
वेळ झाली भर माध्यान्ह...
:-)
7 Nov 2017 - 3:38 pm | माहितगार
गदीमांच्या गीतरामायणातल "दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" हे एक उल्लेखनीय गीत आहे. त्यात सागरातल्या दोन ओंडक्यांची कल्पना कोणतीही दोन नाती एका अर्थाने क्षणिकच असतात हे सांगते.
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा - 6
नको आसू ढाळू आता, पूस लोचानास
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास...
प्रॅक्टीकली माणसे अशीच वागत असावीत. व्यक्तीशः मीही असाच वागतो -तुकारामांच्या गाथेतील "तेलणीशी रुसला वेडा" प्रमाणे - अहं ही फार स्ट्राँग गोष्ट असते , पण तरीही माणसांच्या पुन्हा भेटण्याची शक्यता थेरॉटीकली शिल्लक असते. सांगरातील लाटेने दुरावलेली ओंडकी पुन्हा एखाद्या लाटेने पुन्हा भेटणारच नाहीत हेही कसे सांगावे. मानवाचा पुत्र पराधीन असल्याचे सांगणार्या गदींचा राम भरताशी वनवासानंतर पुन्हा भेटतोच. रोज कितीतरी माणसे भेटून विस्मृतीत जातात , त्या सर्वांबद्दल केवळ दोन ओंडकी जवळ आली म्हणून तुम्ही कविता लिहिता का ? समजा की पाण्याचा ग्लास पूर्ण रिकामा झाला आहे पण कुठेतरी ओल असल्या शिवाय तो रिकामा ग्लासही आठवतो का ? प्रॅक्टिकली माणसे दुरावतात हे मान्य पण थेअरॉटीकली समहाऊ व्यक्तिशः हि शक्यता शिल्लक राहते हे स्विकारणे अधिक रास्त वाटते. (अर्थात हे लिहिताना नात्यांच्या एकाच प्रकारचा मी विचार करत नाही तर विभीन्न नात्यांचा विचार करतो आहे)
8 Nov 2017 - 8:33 am | प्राची अश्विनी
बापरे, तुम्ही फारच philosophical झालात. अर्थात तुमचा मुद्दा पण बरोबर आहे म्हणा.
8 Nov 2017 - 12:18 pm | माहितगार
तसं नाही मगच्या एका मिपाधागा चर्चेतला एक मुद्दा कदाचित खूप लिहूनही मला नीट कव्हर करता आला नव्हता तो यावेळी आपल्या कवितेला प्रतिसादाच्या निमीत्ताने कमी शब्दात आधीपेक्षा बरासा जमतोय असे वाटते ;). एका मुलीने एका बापाला सर्व हेवेदावे सोडून भेटले पाहीजे अशी माझी भूमिका मिपाकराम्च्या कोण टिकेचा भाग झाली होती. असो.