शेअरबाजार :Tips Are for Waiters, Not Traders. भाग II

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in जनातलं, मनातलं
28 Sep 2017 - 9:25 am

“मितरों…..” (ईतना सन्नाटा क्यों हो गया भाई??) शेअरबाजारांतील टीप्स, सल्ले यांतुन हमखास पैसा कमवायचे माझे एक 'टॉप सिक्रेट' (फक्त आपणालाच) सांगुन विषयावरील चर्वितचर्वण एकदाचे थांबविणार आहे. ऐकणार ना ??

मी यासाठी सर्वप्रथम बाजारांत नियमितपणे ट्रेडिंग करणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे पत्ते, मोबाईल नंबर, ई-मेल आपणा सारख्यांच्याकडुन मिळवतो. समजा माझ्याकडे किमान काही हजार सभासदांची अशी तपशीलवार माहिती आहे...मी ह्या माहितीची संगणकीकृत पृथ्थ्करण करुन 02 समान गटांत विभागणी करतो..हे अर्थातच काही खुप कठीण काम नाही....

पहिल्या गटातील सभासदांना मी एक SMS/Email/WA करतो, ज्यात माझा बाजारातील गाढा अनुभव, जबरदस्त अभ्यास ई. गोष्टीचे मोजक्याच शब्दांत पण प्रत्ययकारी वर्णन असते. पुढे काही अगम्य व काढु तसा अर्थ निघेल अशी वाक्ये, एखादा चार्ट टाकुन शेवट मात्र 'माझ्या अभ्यासानुसार निफ्टीत या आठ्वड्यांत निःसंशयपणे तेजी असेल..GO LONG !!" अशा ठळक वाक्याने करतो.

दुसऱ्या गटातील सभासदांना पण अगदी 'तस्साच' संदेश जातो, बदलते ते फक्त शेवटचे वाक्य 'माझ्या अभ्यासानुसार निफ्टीत या आठ्वड्यांत निःसंशयपणे मंदी असेल..GO SHORT!!"

शुक्रवारी, बाजाराचे दृष्टिने आठवडा संपताच मी निफ्टीचा आढावा घेवुन अंदाज चुकलेल्या गटाला माझ्या यादीतुन नारळ देतो. आता माझ्याकडे सुरवातीच्या निम्मेच 'क्लायंट्स' आहेत.. हरकत नाही. पुन्हा दोन गट आणि पुन्हा तस्साच अंदाज, आठवड्याअखेर अंदाज चुकलेल्या गटाला फाट्यावर मारणे..थोडक्यांत 'ह्योच तिकिटावर ह्योच खेळ..

असे 04/05 वेळा झाले की आता अगदी मोजकेच पण 'सतत बरोबर अंदाजाचे साक्षीदार' असे सभासद उरतात. अशांना आत्तापर्यंत माझ्या 'अचुक' सल्ल्यांमुळे तुम्हाला हजारो रुपयाचा फायदा झाला असणार..मात्र यापुढे असे अंदाज हवे असल्यास माझी वार्षिक फी रु 6,000 आहे असे कळवतो. त्या 'Granville Market Letter' ची वर्गणी 3000 डॉलर्स होती म्हणे....आपल्याला जास्त लोभ अजिबात नाही...

असो. एका गंभीर विषयाची अशी काहीशी चेष्टा केल्याबद्द्द्ल क्षमस्व. सांगायचे हेच की बाजारांत हमखास यश देणारे सल्ले, टीप्स असे खरेच काही नसते. 'Anchorman' या हॉलिवुड्पटात एका गाजलेल्या संवादात हिरो एका पर्फ्युमच्या प्रभावाबद्दल म्हणतो '60% of the time, it works every time.... तुमचे 60% यशही सर्वोत्तम यशाच्याच तोडीचे आहे असे त्याला बहुधा सुचवायचे असावे. बाजाराबद्दलचे अंदाजही काहीसे याच प्रकारांत मोडतात.

अशा आयत्या टीप्स पेक्षा सामान्य व्यवहारज्ञान, समयसुचकता, प्रसंगावधान हे गुण वापरुन बाजाराकडे पाहिल्यास बाजारांत संधीची वानवा कधीच नसते.

तीनेक वर्षांपुर्वी दै.सकाळच्या ऑटॉविषयक पुरवणींत आलेला The Royal Enfield चा प्रवास वाचुन खरेतर मी तीची मालकी असलेल्या ‘Eicher Motors’ या शेअरकडे आकर्षित झालो. एकदा चर्चेच्या ओघांत माझ्या एका दुबईस्थित मित्राने त्याच्या ऑफिसजवळच या कंपनीचे नवीन शो रुम उघडले आहे आणि प्रतिसाद दणक्यात मिळतो आहे असा फीडबॅक दिला.

हळुहळु अन्य तांत्रिक आकडेवारीबरोबरच माझ्या लक्षांत आले की मी कुठेही बाहेर निघालो की किमान एखादी तरी नवी 'RE' माझ्या बाजुने पास होतेच, मग हिच्या स्पेशल एडिशनचा दणक्यात, केवळ २२ मिनिटांत, 'फुल्ल' झालेला ऑनलाईन सेल, पेपर्समधल्या ‘बुलेटच्या फटाका सायलेन्सर वर बंदी' अशा बातम्या, एरवी अतिशय सोबर व्यक्तीमत्व असलेल्या माझ्या एका विद्यार्थीप्रिय सरांनाही ही 'बुलेट' घेण्याचा पडलेला मोह.... अशा घटनांनी ह्या गाडीची 'केझ' वाढत असल्याची माझी खात्री झाली आणि मी हळुहळु ह्या शेअर्समध्ये गुंतवणुक कराव्यास सुरवात केली.. माझी पहिली खरेदी रु.15000 भावाच्या आसपास होती..

मग सैराट चित्रपट आला.. त्यात आर्चीचे परश्यानंतर सर्वात जास्त सीन बुलेट बरोबरचे होते म्हणा ना.. (नेमके तेंव्हाच कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर्स विकल्याची बातमी येवुन बुलेट जरा 'स्कीड' झाली, आम्ही पुन्हा 18000 भावाने शेअर्स घेतले.) काळ बदलतो तसा बदलत राहिला, एनफिल्ड्चे आयकॉन्स बदलत राहिले. मध्यंतरी श्रीमंत उदयनराजे यांची 45 तोळे सोन्याने मढवलेली दुचाकी चर्चेत आली, आणि तीही अर्थात बुलेट्च..

अगदी आजची दुरचित्रवाणीवरील लोकप्रिय जोडी आपले राणादा/आंजलीबाई हे ही बुलेटच वापरुन त्यांची लव्ह्ष्टोरी खुलवतायत की.. फरक ईतकाच की ते 'लेटेश्ट' बटनस्टार्ट गाडी वापरतात.

या सगळ्या दरम्यान बुलेटची विक्रीचे आकडे वाढता वाढता वाढे..असेच होते आणि सहाजिकच परवा Eicher Motors ने 33,000 ची भावपातळी भेदुन सीमोल्ल्घंन केले.

मंडळी, मी कोणी ग्रेट Stock Picker आहे असा माझा मुळीच दावा नाही. उलट आपली ज्ञानेंद्रिये जागृत ठेवल्यास एखादा सामान्यही कोणत्याही उसन्या अर्धवट माहितीवर अवलंबुन न रहाता बाजारातुन कसा फायदा मिळवु शकतो याचे उदाहरण म्हणुन मी हा तपशील दिला आहे, महत्वाचे म्हणजे ही Eicher Motors विकत घेण्याची शिफारस नाही.

जाता जाता- याच Royal Enfield चा एक आणखी 'फायदा'...माझ्या एका मित्राकडे RE Classic 350 होती. त्याचे एका मुलीशी सुत जमले. हा तिला घेवुन फिरायला जाई, आणि काय हो, ते नाजुक, लडिवाळ बोल हीच्या फायरिंगमुळे नीट ऐकुच येईना झाले सरकारांना. वैतागुन याने जड अंतःकरणाने बुलेट विकुन दुसरी शांत सोज्वळ गाडी घेतली.

प्रदीर्घ प्रेमाराधनानंतर वर्षापुर्वीच दोघांचे लग्न झाले आणि ..गेल्याच आठवड्यांत मित्राने नाईलाजाने RE Desert Storm 500CC आणली !!!

- प्रसाद भागवत 9850503503

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

28 Sep 2017 - 9:48 am | मार्मिक गोडसे

मस्तच. लेखाचा शेवट तर भारीच.

भ ट क्या खे ड वा ला's picture

28 Sep 2017 - 10:46 am | भ ट क्या खे ड वा ला

तुम्ही मागे दिलेला एक सल्ला चांगलाच फायदेशीर ठरलाय.
शिंच्या सायकलिंग च्या वेडाने इकडे बघायला सवड कमी मिळत्ये हल्ली.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 1:39 pm | पगला गजोधर

सर, तुमचे लेख हमखास चांगलेच असतात,
म्हणुनी ही प्रतिक्रिया आधी नोंदवतो, व आता लेख वाचतो.

प्रसाद भागवत's picture

28 Sep 2017 - 2:27 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद.. एवढा विश्वास दाखवल्याबद्दल, पण आता लेख वाचल्यावर परत प्रतिक्रिया देणे आले..

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 5:34 pm | पगला गजोधर

मला समजा, भारतीय भांडवल बाजाराद्वारे आंतर राष्ट्रीय भांडवल बाजारात पैसे गुंतवायचे जर असतील, तर कशा प्रकारे गुंतवणूक केली जाते ?
उदा. हायपोथेटिकली मला वाटते की रुपये पाच हजार, ब्राझीलच्या भांडवली बाजारात गुंतवावे ? एका सर्वसामान्य भारतीयांसाठी काय पर्याय उपलब्ध आहेत ?

प्रसाद भागवत's picture

28 Sep 2017 - 6:07 pm | प्रसाद भागवत

Equity - International funds या प्रवर्गाअंतर्गत आपल्याकडे जवळपास 50 ईक्विटी फंडस आहेत जे वेगवेगळ्या थीमने जागतिक बाजारांत गुंतवणुक करतात.. आपल्याला HSBC Brazil Fund या फंडात गुंतवाणुक करुन आपले उद्दीष्ट साध्य करता येईल. (ही गुंतवणुकीची शिफारस नाही)
गुंतवणुकीच्या पद्धतीत कोणताही बदल नाही. अगदी आपल्या नेहमीच्या पधतीने ती करता येते.
महत्वाचा भाग म्हणजे अशा आंतरराष्ट्रीय फंडांत केलेल्या गुंतवणुकीवर, अगदी ते ईक्विटी फंडस असुनही भाडवली नफ्यावरील करसवलती मिळत नाहीत.

पगला गजोधर's picture

28 Sep 2017 - 7:30 pm | पगला गजोधर

Thanks

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख.

खाबुडकांदा's picture

28 Sep 2017 - 9:37 pm | खाबुडकांदा

छान As usual :-)

स्वलेकर's picture

29 Sep 2017 - 12:34 pm | स्वलेकर

नेहमीप्रमाणेच छान लेख.

उपाशी बोका's picture

29 Sep 2017 - 6:08 pm | उपाशी बोका

तुम्ही नेहमी साध्या-सरळ-सोप्या भाषेत शेअरमार्केटबद्दल माहिती देता आणि टिप्सपासून दूर रहा असा जो सल्ला देता, ते खरंच कौतुकास्पद आहे.
give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime.
असेच अजून लिहित रहा.

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 6:28 pm | सुबोध खरे

आयत्या टीप्स पेक्षा सामान्य व्यवहारज्ञान, समयसुचकता, प्रसंगावधान हे गुण वापरुन बाजाराकडे पाहिल्यास बाजारांत संधीची वानवा कधीच नसते.
सोळा आणे सत्य

सुबोध खरे's picture

29 Sep 2017 - 6:29 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून बरेच लोक बाजाराकडे पाहतात आणि आत्मघात करून घेतात.

उपेक्षित's picture

29 Sep 2017 - 8:29 pm | उपेक्षित

life time classic plan - ICICI हा प्लान कोणी घेतलाय का ? अथवा कोणाला काही माहिती आहे का ? असल्यास जरूर कळवा.

भंकस बाबा's picture

30 Sep 2017 - 4:18 pm | भंकस बाबा

असंच लिहीत रहा

भंकस बाबा's picture

30 Sep 2017 - 4:18 pm | भंकस बाबा

असंच लिहीत रहा