West Melbourne Marathi Ganeshotsav 2017
गोष्ट आमच्या गणेशोत्सवाची !!!
"प्रथम तुला वंदितो , कृपाळा ........गजानना , गणराया .......". . हे शब्द सकाळी सकाळी रेडिओ वर ऐकून दिवसाची सुरुवात करून आणि तेच गाणे दिवसभर सारखं सारखं गुणगुणत; बालपण सरलेले आम्ही ! आता परदेशात येऊन काही वर्ष झाली तरी ,आपण आपलं “मराठीपण” विसरतो असा मुळीच नाही . आत्ताही हे गाणे कानावर पडले तरी आपला दिवस तसाच जातो . गजानना , गणराया म्हणत म्हणत ....... !!! आम्ही इथेही दाराला तोरण लावतो आणि इथेही बाप्पाचा गणेशोत्सव साजरा करतो !
काही दिवसांपूर्वी मी आणि माझी ऑस्ट्रेलियन मैत्रीण गाडीमधून चाललो होतो .माझ्या गाडीमध्ये असलेल्या डॅशबोर्ड वरच्या गणपती बाप्पा कडे पाहून,त्या माझ्या मैत्रिणीनं विचारलं " What kind of elephant is this ?"
या प्रश्नाने मी एकदम चर्कून गेले . एक क्षण मनातल्या मनात असं झालं कि या पृथ्वीतलावर "गणपती बाप्पा माहित नाही???" असे कोण असेल. आणि जरी कुणी असेल हिच्यासारखे एखादे तर "हिला" आता काय काय सांगावं माझ्या बाप्पा बद्दल? ........ कुठून सुरुवात करावी ?...... आणि सांगायला लागले जरी तरी शेवट कधी होणारच नाही ! म्हणूनच तिला गणपती बाप्पाची आणि त्याच्या भक्तांची एक झलक दाखवण्यासाठी मी बोलावलं; ते आमच्या वेस्ट मेलबर्न मराठी च्या २०१७ च्या गणेशोत्सवात !
आम्ही सगळेजण म्हणजे वेस्ट मेलबर्न मधले मराठी. म्हणजे पु ल जर का आज असते, तर ते आम्हाला 'ऑस्ट्रेलियन महाराष्ट्रीयन मेलबर्नकर' असे काहीतरी म्हणाले असते. कारण तोच मराठी बाणा, तीच निस्सीम इच्छाशक्ती आणि आपल्या लाडक्या गणरायावरचे प्रचंड प्रेम, आणि साहजिकच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा ध्यास !!. आज इथे दूर देशी येऊनही केवळ मराठी लोकांना एकत्र आणून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवून, २७ ऑगस्ट २०१७ ला वेस्ट मेलबर्न मराठी या ग्रुप ने परत एकदा मेलबर्न चा पश्चिम भाग दणाणून सोडला. आपले रीतिरिवाज, आपली परंपरा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपली गणपती बाप्पा वरची भक्ती आख्या जगाला दाखवून दिली.
आपल्या महाराष्ट्रात आपण अनेक गणपती मंडळे पाहतो , त्यांचे देखावे पाहायला जातो , मानाच्या गणपतींची मिरवणूक एन्जॉय करतो . "तिकडचा" तो सगळा ;सगळा "माहोल " इथे तयार करणे हि सोप्पी गोष्ट नाहीये .
तिथे गल्लीतली पोरं मदतीला असतात, इथे ऑफिस मधले मोठे मोठे पदाधिकारी खुर्च्या उचलायला येतात !
तिथे देखाव्यासाठी मोठे मोठे सेट उपलब्ध असतात , इथे दुकानात अष्ठगंध सुध्दा मिळेल कि नाही शंका असते !
पण सगळी आव्हानं स्वीकारत वेस्ट मेलबर्न मराठी (WMM) ग्रुप चे सगळे कार्यकर्ते कामाला लागले; ४ महिने आधीपासूनच ! .
"केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !" या सुविचाराचा खरा खरा अर्थ उमगला; जेव्हा सर्व अडचणींवर,आव्हानांवर मात करून आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते सज्ज झाले . मनामध्ये एकाच इच्छा , करून दाखवण्याची जिद्द, आणि गणरायाचा आशीर्वाद घेऊन WMM चे सदस्य आणि कार्यकर्ते जोमाने तयारी करू लागले. जनगर्जना या ढोल पथकाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आणि एकच उत्साह नसानसांत वाहू लागला . गणपती बाप्पाच्या सुरेख मूर्तीने डोळ्यांचे पारणे फिटले . "गणपती बाप्पा मोरया !!!" च्या गर्जनांनी आसमंत उजळून निघाला .
४ महिने कष्ट करून कार्यकर्त्यांनी काय केला नाही ते विचारा !!
ढोल सुध्दा आणि देखावा सुध्दा,
सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आणि आरती सुध्दा !
संस्कृती ,मराठी भाषा आणि रीतिरिवाज सुद्धा ,
सामाजिक बांधिलकीचा उपदेश सुद्धा,
आणि निखळ आनंद देणारी करमणूक सुद्धा !
नैवेद्य आणि महाराष्ट्रीयन जेवण सुध्दा,
२ वर्षांचा चिंटू आणि ८० वर्षांचे आजोबा सुध्दा ,
.सगळं सगळं आणि सगळे सगळे !!
ना कुठला नेता ,ना कुठला राजकीय पक्ष , ना कुणी मानाचा , ना कुणी सराफाचा ! हा बाप्पा म्हणजे फक्त आपला बाप्पा ! एवढा एकच भाव सर्वांच्या मनात . कारण भारतात असताना फक्त मिरवणूक आणि देखावा पाहायला जाणारे आम्ही, इथे मेलबर्न मध्ये WMM चे कार्यकर्ते झालोत काय आणि मनातला भक्तीचा ओलावा फक्त देखाव्यापुरता मर्यादित न ठेवता इथे दूर देशात आलेल्या आपल्या बांधवांना एकत्र आणण्यासाठी , एकमेकांच्या मदतीसाठी धडपडतो काय . खरंच !!
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगति.......!!!*
*आणि*
एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश.........!!!!*
वेस्ट मेलबर्न मराठी या गृप ने दाखवून दिले कि "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे "! WMM च्या गणेशोत्सवाची विशेष दाखल घेऊन , यंदाच्या गणेशोत्सवाला Deputy Mayor of Hobsons Bay आणि Multicultural Officer of Hobsons Bay यांनी सहकुटुंब हजेरी लावली आणि आपले सर्वांचे बाप्पावरचे प्रेम पाहून तेही भारावून गेले. Elephant सारखा दिसणारा आपला बाप्पा आपल्यासाठी काय आहे; हे WMM ने ऑस्ट्रेलियन लोकांना पण दाखवून दिले.
सर्व कार्यकर्त्यांचा उदंड उत्साह , WMM च्या सदस्यांची निष्ठा , वचनबद्धता आणि अतूट सहकार्य ,आणि मेलबर्न मधल्या मराठी समुदायाचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा प्रोग्रॅम यशस्वीरीत्या साजरा झाला . आपला मराठी बाणा असाच निरंतर राहो आणि आपली मराठी संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला आत्मसात करता यावी हाच वेस्ट मेलबर्न मराठी WMM चा उद्देश आहे .
गणपती बाप्पा मोरया !!
--------------------------शलाका एकबोटे .
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 1:26 pm | अनन्त अवधुत
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!! भारताबाहेर गणेशोत्सवासाठी असा माहोल उभा करणे खरेच अवघड आहे. तुमच्यासह इतर कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन!!
ह्या लेखात फोटो असते तर अजून मज्जा आली असती.
विशेष आवडले कि तुम्ही स्थानिक लोकांना यात सामील करून घेतले.
(गल्ली पासून सातासमुद्रापारच्या मंडळातला कार्यकर्ता)
-अनंत
28 Aug 2017 - 3:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
दणक्यात साजरा केलेला दिसतो गणेशोत्सव वेस्ट मेलबर्नकर मराठ्यांनी ! फोटो टाकले असते तर अजून मजा आली असती.
इथेच प्रतिसादांत फोटो टाकलेत तर ते लेखात हलवण्याची व्यवस्था केली जाईल.
28 Aug 2017 - 7:55 pm | तुषार काळभोर
फोटो पाहीजेतच!
पश्चिम मेलबर्नचा राजा!!
29 Aug 2017 - 12:00 am | ज्योति अळवणी
मस्त
गणपती बाप्पा सगळ्यांचेच आवडते असतात
29 Aug 2017 - 7:10 am | फिझा
29 Aug 2017 - 7:10 am | फिझा
29 Aug 2017 - 7:11 am | फिझा
29 Aug 2017 - 7:13 am | फिझा
29 Aug 2017 - 7:15 am | फिझा
29 Aug 2017 - 7:55 pm | एस
फोटो दिसत नाहीयेत. कृपया फोटोंना पब्लिक ऍक्सेस दिलाय का ते एकदा चेक करा.
29 Aug 2017 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
गुगलफोटोत तुम्ही ज्या फोल्डरमध्ये* हे फोटो ठेवले आहेत त्या फोल्डरला "पब्लिक अॅक्सेस" द्या.
* अगोदरच केले नसल्यास इथले सर्व फोटो गुगलफोटोत एका वेगळ्या फोल्डरमध्ये ठेवा व त्या फोल्डरला "पब्लिक अॅक्सेस" द्या. असे केल्याने हवे असलेलेच फोटो दिसतील; इतर फोटो सर्वांना दिसणार नाहीत.
31 Aug 2017 - 5:37 am | फिझा
29 Aug 2017 - 11:47 pm | पैसा
छान लिहिलय! फोटो येऊ द्या.
31 Aug 2017 - 5:35 am | फिझा
31 Aug 2017 - 10:31 am | सुमीत भातखंडे
पण फोटो दिसत नाहियेत.
31 Aug 2017 - 10:53 am | संजय पाटिल
छान! गणेश चतुर्थीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा!