अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग ३
(अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40769 )
(अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग २ ची लिंक - http://www.misalpav.com/node/40786 )
समुद्राच्या वेगवान लाटांनी त्याचा थकला भागला देह किना-यावर लोटुन दिला . हातांना वाळुचा स्पर्श होताच आपण किना-यावर आलो आहोत याची त्याला जाणीव झाली . होती नव्हती ती शक्ती एकवटुन तो कसाबसा ऊठला . सकाळची कोवळी सुर्यकिरणे त्याच्या अंगावर पडत होती . त्याचा थकवा कुठल्या कुठे पळुन गेला . त्याला आता खुप उल्हसीत वाटत होते . त्याने आजुबाजुला नजर फिरवली . जिकडे पाहावे तिकडे त्याला रुपेरी वाळुच दिसत होती . मधुनच थोडीफार नारळाची झाडे दिसत होती .
आपण कुठे आलो आहोत हेच त्याला काही क्षण समजेना . तो कुठल्यातरी अनोळखी बेटावर आला होता . तरीही त्याची नजर चौफेर कशाचा तरी , कुणाचा तरी शोध घेत होती . अचानक त्याला समोरच पसरलेल्या वाळुमधे काही पाउलखुणा दिसल्या . त्या पाउलखुणा तिथुन दुरपर्यंत कुठेतरी जात होत्या . उत्साहाने तो त्या पाउलखुणांचा माग घेत पुढे पुढे जाउ लागला .
काहि पावलं चालत तो पुढे जात होता . अचानक त्याला समोर कुणाचे तरी ओळखीचे अस्तित्व जाणवले . त्याने चमकुन समोर पाहिले . तर समोर तीच होती . त्याच्याकडे डोळे रोखुन ती पाहात होती . तिच्या नजरेत कधी राग झळकत होता तर कधी आपला विश्वासघात झाल्याचा विषाद .
"तु ? " त्याने दचकुन विचारले .
"हो . मीच ." तिने थंडपणे उत्तर दिले . त्याला काय बोलावे ते सुचेना . ती मात्र बोलतच होती .
"तुला काय वाटलं . मला फसवुन , माझा विश्वासघात करुन तु माझ्यापासुन सुटका करुन घेशील ? पण मी ते होउ देणार नाही . आपण दोघांनी कल्पांतापर्यंत आपण रचलेल्या स्वप्नांच्या नगरीमधे एकत्र राहाण्याच्या आणा भाका घेतल्या होत्या . मी माझी शपथ पाळली . पण तु मात्र अखेरच्या वेळी मागं फिरलास . आपला शब्द मोडलास . मी तुला याबद्दल कधीही माफ करणार नाही ."
तो आता सावरला होता . तिच्या नजरेला नजर मिळवुन तो शांतपणे म्हणाला .
"मला माफ कर . मी तुझ्या बरोबर येउ शकलो नाही . कारण , कारण .. आपल्या लहानग्यांसाठी मला या जगात थांबावेच लागले . "
त्याच्याकडे जळजळीत नजरेने बघत तिची आकृती उन्हामधे वितळुन गेली . त्याने त्या पाउलखुणांच्या मागे मागे आपली वाटचाल परत सुरु केली .
काही अंतर पुढे जाताच त्याला ती दोघे दिसली ज्यांचा तो माग काढत होता . एक होती आदिती भागीरथ आणी दुसरा होता धनसुख . दोघेही भांबावुन इकडे तिकडे बघत होती . आपण कुठे आलो आहोत , कसे आलो आहोत हे त्यांना समजत नव्हते . त्या दोघांचेही लक्ष आता त्याच्याकडे गेले . त्याला बघताच आदितीला त्याच्यामधे आणी तो संशयास्पद फुलांचा बुके आणणारा कुरीअर कंपनीतला तरुण यांच्यात असलेले साम्य जाणवले . ती संतापाने ओरडली .
"हा .. हाच तो ..यानेच तो फुलांचा बुके आणला होता . या सगळ्या घातपातामधे याचाच हात आहे . "
हे ऐकताच धनसुख रागारागाने त्याच्यावर धावुन गेला . पण या तरुणाने धनसुखचा हल्ला शिताफीने चुकवला . आणी धनसुखलाच दोन फटके ठेवुन दिले . या अकस्मात बसलेल्या माराने धनसुख कळवळुन खाली कोसळला . त्याच्यात परत उठायचे त्राण राहिले नाही .
"हा काय प्रकार आहे ? किडनॅपिंग ? काय पाहिजे आहे तुला ? पैसा ? किती पाहिजे ते बोल . पण एक लक्षात ठेव . तुझी या आदिती भागीरथशी गाठ आहे . मी तुला कुठुनही शोधुन काढीन . तु स्वताला समजतोस कोण ? "
आदिती रागारागाने त्याला बोलत होती . तो तरुण शांतपणे आदितीसमोर जाउन म्हणाला .
"माफ करा मॅडम . पण तुमच्यासारख्या धनदांडग्या लोकांच्या पैशांचा मला कसलाही मोह नाही . पैशाच्या गुर्मीत जी लोकं जमिनीला विसरतात . आपल्याच गुरुचा अपमान करतात , अशा घमेंडी लोकांचा एक पैसाही मला नको आहे . मी तुम्हा दोघांना इथे , अशा प्रकारे आणलं ते माझ्या गुरुंच्या अपमानाचा जाब विचारायला . "
"तुमच्या गुरुंचा अपमान ? हा काय वेडेपणा आहे ? कोण तुमचे गुरु ? आणी कुणी त्यांचा अपमान केला ? " आदितीचा राग अजुनही शांत झाला नव्हता .
"ते विचारा तुमच्या पीएला . या धनसुखला . ज्याने नीलकंठ सरांना तुमची भेट स्वताच्या फायद्यासाठी नाकारली . .. प्राध्यापक नीलकंठ हे तुमची अपॉइंटमेंट घेउन भेटायला आले असतानाही याने त्यांना तुम्हाला भेटु दिले नाही . हा त्या लबाड जयपाल बिल्डरसाठी काम करतो . यानेच नीलकंठ सरांचा अपमान केला . त्या धक्क्याने सर अजुनही हॉस्पिटलमधे अत्यवस्थ आहेत . "
त्या तरुणाने सगळा घडलेला प्रकार आदितीसमोर कथन केला . हि सगळी घटना ऐकुन आदितीला धक्काच बसला . ती रागाने धनसुखला म्हणाली .
" धनसुख , हा सगळा प्रकार जर खरा असेल तर तुझी खैर नाही . तुला याचा जवाब द्यावा लागेल . " धनसुख हे ऐकुन घाबरुनच गेला . तो तरुण पुढे सांगु लागला .
"या धनसुख च्या हिकमतींमुळे त्याने आम्हाला , नीलकंठ सरांना कधीच तुम्हाला भेटु दिले नसते . म्हणुन नाइलाजाने मला हा वेगळा मार्ग निवडावा लागला . तुम्हाला भेटणे शक्य नाही म्हणुन नीलकंठ सरांनी तुम्हाला देण्यासाठी हा निरोप दिला आहे . तो निरोप तुम्हाला पोचवणे हेच माझ्यासाठी मुख्य काम आहे . बाकी पुढचा निर्णय तुमचा आहे ."
असे म्हणुन त्या तरुणाने आपल्या कोटातील खिशामधुन एक लिफाफा काढुन तो आदितीकडे दिला . त्या लिफाफ्यामधे नीलकंठ सरांनी आदितीसाठी लिहिलेले एक पत्र होते . आदिती आतुरतेने ते पत्र वाचु लागली . या पत्रामधे सरांनी तपंजय या शिक्षण संस्थेवरील आर्थीक अडचणी , जयपाल बिल्डरचा जाच , संचालक मंडळातील फितुरी यांची सविस्तर माहिती दिली होती . आणी आदितीकडुन काही काळासाठी मदतीची अपेक्षा केली होती . ते पत्र वाचुन आदितीच्या डोळ्यांत पाणीच आले .
"अहो मॅडम , तुम्ही कशाला त्या ढोंगी माणसावर विश्वास ठेवताय ? हे पत्र सुद्धा खोटेच असणार . " धनसुखने परत आपल्या बचावाचा निष्फळ प्रयत्न केला .
"धनसुख तु गप्प बस . हे पत्र सरांनीच लिहिले आहे . त्यांचे हस्ताक्षर माझ्या चांगलेच ओळखीचे आहे . जेव्हा एखादा विद्यार्थी चांगली कामगिरी करत असे . तेव्हा सर नेहमीच कौतुक करणारे पत्र लिहित असत . नकळत का होइना पण माझ्या हातुन चुक झाली . मला आता काहितरी केलेच पाहिजे . " आदिती कडाडली .
दुरवर समुद्राच्या लाटांना भरती येउ लागली होती . सागरी लाटा अक्राळ विक्राळ रुप घेउन उंच उंच उसळत होत्या . या उसळत्या लाटांची एक भली मोठे भिंत तयार झाली . या लाटा रोंरावत चारी बाजुंनी त्या बेटाच्या दिशेने झेपावु लागल्या . या लाटांचा एक अनोखा नाद त्याच्या कानामधे जाणवु लागला . आपल्यापाशी वेळ खुप कमी आहे हे त्याने ओळखले . तो त्वरेने आपला हात पुढे करुन आदितीला म्हणाला .
"मॅडम , मी तुम्हाला इथे घेउन आलो . आता इथुन तुम्हाला सुखरुप बाहेर काढणे हे माझे कर्तव्य आहे . माझ्यावर विश्वास ठेवा ."
आदितीचा आता त्याच्यावर पुर्ण विश्वास बसला होता . तिने झटकन आपला हात त्याच्या हातात दिला . आपला दुसरा हात काहिशा नाइलाजानेच त्याने धनसुखसमोर केला . धनसुखने तो हात घट्ट पकडला . कारण दुसरा पर्यायच नव्हता .
बघता बघता उसळत्या अजस्त्र सागरी लाटांची भिंत त्या बेटावर येउन थडकली . या लाटांमधे ते अज्ञात बेट कायमचे बुडुन गेले . ती तिघेही त्या लाटांमधे दिसेनाशी झाली . सगळीकडे उरले ते फक्त पाणी ..पाणी .
आदिती स्वताला त्या पाण्यापासुन वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती . अचानक तिला जाणवले की , ती तिच्या हॉटेलच्या रुममधे आहे . तिने आजुबाजुला पाहिले तर कुठेही पाण्याचा थेंबही नव्हता . तिच्या आसपास कोणीही नव्हते . तो फुलांचा बुकेही गायब झाला होता . हे सर्व काय घडले तिला काहिच समजेना . हे सत्य होते म्हणावे तर ती तर तिच्या रुममधेच होती . आणी स्वप्न होते म्हणावे तर .... स्वप्न होते म्हणावे तर .... तिच्या समोरच टेबलवर एक लिफाफा होता . त्या लिफाफ्यामधुन एक पत्र डोकावत होते .
तो लिफाफा , ते पत्र आदितीच्या परिचयाचे होते . त्या पत्रातला मजकुर तिला माहिती होता . त्यामुळे तिने परत ते पत्र वाचायचे कष्ट घेतले नाही .
आदितीने थोडा विचार केला . आपला मोबाईल हातात घेउन ती काही महत्वाचे नंबर डायल करु लागली .
-------------------------
काही दिवसांनंतर -------------
सकाळचे सहा वाजले होते . किचनमधे तो कॉफी बनवण्यात मग्न होता . आज रविवार त्यामुळे तो निवांत होता . आज मुलांची शाळेची गडबडही नव्हती . मुले मस्त झोपली होती . कॉफी बनवताना मधेच शीळ वाजवत एकिकडे टेबलावर हातातली रिंग गोल गोल फिरवण्याचा त्याचा उद्योग चालु होता .
कॉफीचा मग घेउन तो बाहेर व्हरांड्यात आला . आरामखुर्चीवर बसुन कॉफी पिता पिता नुकतेच आलेले पेपर तो वाचु लागला . पहिल्याच पानावरच्या बातमीने त्याचे लक्ष वेधुन घेतले . ती बातमी होती . " तपंजय शिक्षण संस्थेला सर्व प्रकारची मदत करण्याची भागीरथ उद्योगसमुहाच्या प्रमुख आदिती भागीरथ यांची घोषणा . संचालकपदी प्राध्यापक नीलकंठ यांची फेरनिवड ." हि बातमी वाचुन तो खुप खुश झाला . त्यातच त्याचे पुढल्या बातमीकडे लक्ष गेले .
"कुख्यात बिल्डर जयपाल आणी त्याचा हस्तक धनसुख यांना अटक ."
आनंदाने तो मनाला येईल तसे जुळवुन गुणगुणु लागला . " अशक्य ते शक्य करीता सायास ... याचसाठी केला होता अट्टाहास . "
तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजला . "हॅलो " त्याने विचारले . पलिकडुन आवाज आला .
"हॅलो . मी आदिती भागीरथ बोलत आहे . मी म्हणलं नव्हतं . मी तुम्हाला कोठुनही शोधुन काढीन . " हे ऐकुन त्याला काय बोलावे तेच सुचेना . पलिकडुन परत हसत हसत आदिती बोलत होती .
" तुम्हाला शोधणे एकदमच सोपे गेले . प्राध्यापक नीलकंठ यांचा सर्वात लाडका , जवळचा विद्यार्थी कोण असे विचारल्यावर सगळ्यांनी तुमचेच नाव सांगितले . मी आज प्राध्यापक नीलकंठ यांच्या सत्कारानिमित्त एक समारम्भ आयोजीत केला आहे . तेव्हा तुम्ही नक्की यायचं "
हे ऐकल्यावर त्याच्या जीवात जीव आला . तोही हसत बोलु लागला .
" मॅडम , मी आज पेपरमधे तुम्ही केलेल्या मदतीची बातमी वाचली . मी तुमचा खुप आभारी आहे . " त्यावर आदिती म्हणाली .
"मलाही तुमचे आभार मानले पाहिजेत . कारण कामाच्या नादात मी आपल्याच माणसांना विसरले होते . तुम्ही मला ती जाणीव करुन दिली . "
त्या दोघांच्या गप्पा अशा बराच वेळ चालु होत्या . या गप्पा एका नवीन मितीच्या दिशेने प्रवास करत होत्या . त्यामधुन अनेक नवीन शक्यता निर्माण होत होत्या .
किचनमधील टेबलावरील ती रींग मात्र अजुनही तशीच गोल गोल भिरभिरत होती .
-------- समाप्त ------- हा भाग एका गाजलेल्या चित्रपटावरुन प्रेरीत आहे --------------------------------- काल्पनीक ----------------------
प्रतिक्रिया
30 Aug 2017 - 12:43 am | ज्योति अळवणी
वाटलंच. पत्नीचा उल्लेख आणि त्याच उत्तर वाचून खात्री झाली. कथा अजून खुलवता आली असती. पण ही देखील आवडली
30 Aug 2017 - 1:15 am | एस
अरे! लवकर आटोपलीत कथा. अजून खुलवायला हवी होती. कथा'बीज रोवलं गेलं' न गेलं तोच कथा संपलीसुद्धा. :-)
30 Aug 2017 - 8:58 am | कपिलमुनी
"रींग मात्र अजुनही तशीच गोल गोल भिरभिरत होती"
Inspired from inception ?
30 Aug 2017 - 3:16 pm | संग्राम
तुम्ही फार लवकर कथा संपवता ... अजून फुलवता आली असती
30 Aug 2017 - 4:11 pm | सिरुसेरि
धन्यवाद .