आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावर्षीसाठी. टीव्ही वरूनच घेतलं. परंतु टीव्ही वरून जेंव्हा त्याचं लोभस आणि गोजिरं रूप पाहिलं तेंव्हा मात्र नकळत का होईना मनातून नमस्कार केला. मुद्दामचं प्रत्यक्ष नाही गेलो. शेवटी गणपती हे परब्रह्माचच रूप. ते सर्वंकडे आहेच. अगदी आपल्याला सर्वात जवळ अश्या आपल्या शरीरात आणि मनातदेखील. अगदीच मनाचं समाधान होण्यासाठी शरीराने देवाचं दर्शन घ्यावे असं वाटलं मग कोणत्याही सध्या गणपतीच्या मंदिरात जिथे खरी मानसिक आणि आत्मिक शांतता लाभेल तिकडे जावे कि अत्यंत गर्दीमध्ये धक्काबुक्कीत राजाकडे जावे असा प्रश्न जेंव्हा मनात येतो तेंव्हा मन साहजिकच पहिल्या पर्यायाकडं झुकतं. आणि हेच कारण म्हणून कि काय आजपर्यंत मी राजाचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं नाहीये. याचा अर्थ मला तासनतास ताटकळत रांगेत उभा राहून देवाचं दर्शन का घ्यावं असा अहंकार नाही. अनेक देवदेवतांचं दर्शन मी अगदी रांगेत १५-२० तास थांबून आनंदाने घेतलय. तुम्ही विचाराल मग रांगेत थांबून दर्शन घेण्याऐवजी त्याच देवाच्या कोणत्याही जवळच्या मंदिरात जाता येत नाही का? मी म्हणेन येते आणि जातोही. परंतु काहीकाही ठिकाणी रांगेत थांबून प्रत्यक्ष दर्शन देण्याचं माझं कारण वेगळं आहे त्याबद्दल सविस्तर खाली लिहीनच.
काही वर्षांपूर्वी जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा मला राजाच्या दरबारात येणाऱ्या भक्तांची (?) गर्दी पाहून नवल वाटायचं. जसा थोडा मोठा झालो तेंव्हा खरा कारण लक्षात आलं. समजल की राजाच्या दरबारात एवढ्या गर्दीचं कारण म्हणजे तो नवसाला पावतो. आता नवस किंवा त्याची पूर्तता याच्या सत्यासत्यातेच्या खोलात जाणे हा या लेखाचा उद्देश नाही. उसळलेली गर्दी पाहता काही अंशी सत्य नक्कीच असणार. असो. केवळ वर्षातून एकदाच येतो म्हणून कि काय लाखो लोक संपूर्ण वर्षासाठीच्या मागण्या घेऊन त्याच्या दारात उभे असतात. अनेकजण नवस फेडण्यासाठी आणि पर्यायाने आणखी जास्त नव्या मागण्या घेऊन राजापुढे उभे असतात. आता यांना भाविक म्हणावे की याचक की व्यापारी?
सांसारिक मागण्यांना अंत नाही. हे जगच असं आहे जिथे कितीही मिळालं तरी आणखी काही हवंच असतं. इच्छांची हि साखळी अनंत आहे आणि हीच माया आहे. या मायेला तरून जायचे असल्यास इच्छांचा त्याग करावा असे सर्व संतमंडळी सांगून गेलेत. परंतु हल्ली केवळ नवसाला पावतो म्हणून काहीतरी मागण्या घेऊन जाणाऱ्या लोकांची गर्दी पाहून मन विषण्ण होते. राजाच्या दर्शनास हल्ली अगदी १००% नाही परंतु ९९% लोक हे मनामध्ये काहीतरी नवस घेऊनच येतात असं माझं मत आहे. मग त्या मागण्यांच्या तरंगात आणि याचकांच्या अथवा व्यापारांच्या गर्दीत जाण्याऐवजी मी दर्शनाचे सुख हे जवळच्या गणपती मंदिरात जाऊनच घेतो. बाकी देवांचं म्हणा किंवा पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं दर्शन मी कित्येक तास रांगेत थांबून घेतलंही आहे. तिथे रांगेत थांबण्याची मजा काही औरच. बरीचशी मंडळी ही भक्तभावाने दर्शनास येतात. काही मागणी असतीलही बऱ्याच जणांची परंतु केवळ मागणं हा प्राधान्यभाव लालबागच्या राजाच्या गर्दीत जो आढळतो तो बाकी काही ठिकाणी म्हणजे पुण्याचा दगडूशेठ अथवा तिरुपती बालाजी, याठिकाणी नसतो असे माझे मत आहे. असो.
यावेळी मला विवेकानंदांची एक गोष्ट लक्षात येते. कुटुंब विपन्नावस्थेत असताना ते एकदा गुरूंकडे म्हणजेच रामकृष्ण परमहंसांकडे गेले व कुटुंबास काही आर्थिक सोय करून देण्याची कालीमातेला गळ घालावी अशी विनंती केली. परमहंसांनी विवेकानंद यांनाच देवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावयास सांगितले. मंदिरात देवीच्या मूर्तीसमोर उभे राहिल्यावर विवेकानंद कुटुंबासाठी आर्थिक मदत सोडाच पण स्वतःसाठीदेखील भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांखेरीच काहीच मागू शकले नाहीत. असे एकदा दोनदा नाही तर तीन वेळा घडले.
आपण विवेकानंद नसून साधी माणसे आहोत हे जितके खरे तितकेच देवाला सतत तात्कालिक सांसारिक गोष्टी मागण्याऐवजी सर्वांबरोबर प्रेम, दया आणि सदभावनेने वागण्याची बुद्धी आणि षड्रिपूंपासून सुटका एवढे जरी मागितले तरी आपल्यापेक्षा बाप्पा नक्कीच जास्त खूष होतील.
कधीकाळी लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला गेलोच तर मीही एक नवस घेऊन जाणार आहे. बाप्पाला मागणार आहे की बाप्पा, तुझ्या दरबारात क्षणिक आणि भासमान सुख देणाऱ्या सांसारिक मागण्यांऐवजी भाविकांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मागण्याची बुद्धी त्यांना दे. असे झाल्यास नवस फेडण्यास मी एकदा काय लाखो वेळा येईन.
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 9:51 am | खेडूत
सांसारिक मागण्यांऐवजी भाविकांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मागण्याची बुद्धी त्यांना दे!
असा नवस बोलायला तिथे जायचीही गरज नाही. घरी बसून मागणी केली तरी ऐकेलच.
वरील कारणासाठीच मी तरी कुठल्याही 'प्रसिद्ध' देवाकडे जाणे टाळतो.
काल अंबानीच्या घरी गणपतीला म्हणून जमलेल्या असंख्य सेलेब्रिटीजचे लक्ष्य सारा अली खानने वेधून घेतले अशी बातमी आलीय. :)
28 Aug 2017 - 10:30 am | ज्योति अळवणी
भावना महत्वाची असते. कोणत्याही देवाने कधीच म्हंटले नाही की मी अमुक मंदिरात तमुक मूर्तीत सापडेन. पण जेव्हा एखादी सांसारिक अडचण येते आणि मार्ग दिसत नाही तेव्हा मनुष्य आपसूक नवस-सायास अशा उपायांकडे वळतो. ते साहजिक देखील आहे. म्हणून शेवटी भावना महत्वाची
28 Aug 2017 - 8:41 pm | रामपुरी
" उसळलेली गर्दी पाहता काही अंशी सत्य नक्कीच असणार. असो."
असोच...